डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कालगणनेसाठी कत्यख, मन्वंतर आणि युग यांसारखी परिमाणे योजण्यात आली आहेत.चार लाख बत्तीस हजार वर्षांनंतर मन्वंतर होते अशी धारणा त्यात व्यक्त केली गेली आहे.भूमितीय संज्ञांचा ऊहापोहही यामध्ये आढळतो. विशेषत: साईन या भूमितीय संज्ञेची मूल्ये यामध्ये दिलेली आहेत.गोलपद या ग्रंथात ग्रह तारे आणि नक्षत्रे यांचे प्रमाण, उदय, अस्त तसेच त्यांच्या कक्षा यांविषयीचे संशोधन आहे. ग्रहणे आणि ग्रहणकाल यांची माहिती यात आहे. ग्रहगोलांची भूमितीय परिमाणे यांचा या विभागात समावेश आहे.

खगोलशास्त्राची पहाट। भारतवर्षे आणी आर्यभट्ट।

मोठा गणिती हा सुभट। संशोधनी मग्न राही।।

अभ्यासिले पृथ्वीचे चलन। म्हणे अक्षावरी संतुलन।

करी त्याभोवती भ्रण। अचूक निरीक्षण केले पै।।

काटकोन त्रिकोणाचे धर्म। कोन संबंधाचे जाणी मर्म।

साईन कोष्टकाचे वर्म। त्याने प्रथम जाणिले।।

या विचारांची थोरवी। जाणून घ्यावी बरवी।

सहस्र वर्षांनी गिरवी। पुन्हा आद्य संशोधक।।

केला प्रयोगांचा पुरस्कार। घेतला निरीक्षणांचा आधार।

त्याने सिद्धांतांचे द्वार। आपोआप उघडले।।

विविध यंत्रे बनविली। प्रयोगासाठी योजिली।

मापनाची गुरुकिल्ली। त्यातूनी हाती येतसे।।

निरीक्षण केंद्र उभारिले। प्रमुखपद भूषविले।

कुसुपुरी वास्तव्य केले। नालंदासाठी योगदान।।

आर्यभट्ट हे भारतीय खगोलशास्त्राच्या आणि गणितींच्या परंपरेतील अध्वर्यू मानले जातात. त्यांचा कालखंड इ.स.476 ते 550 हा होता. आर्यभट्ट यांच्या जन्मस्थानाबद्दल संभ्रम असला तरी उत्तर पश्चिम महाराष्ट्र ते राजस्थान या दरम्यान ते असावे असा कयास आहे. अस्मको प्रदेशावरून हे अनुमान काढण्यात येते. इतिहासकालीन साहित्य अनेक वेळा काळाच्या ओघात नष्ट होते. आर्यभट्ट यांच्या लिखित स्वरूपात उपलब्ध असलेल्या ग्रंथांबाबतही हीच स्थिती आहे.

उपलब्ध ग्रंथांमध्ये आर्यभटीय हा प्रमुख ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेल्या गणित आणि खगोलशास्त्र या विषयांतील संशोधनाचे संकलन आहे. यात अंकगणित, बीजगणित, भूमिती या विषयांचा समावेश आहे. त्यांचा दुसरा ग्रंथ आर्य-सिद्धांत हा उपलब्ध नाही. त्यांच्या तिसऱ्या ग्रंथाचे अरबी भाषेतील भाषांतर उपलब्ध आहे.आर्यभटीय या ग्रंथास आर्यशताष्टा असे संबोधन वापरले जाते. कारण त्यात एकशेआठ पदे आहेत. त्यांची विभागणी गीतिकापद, गणितपद, कालक्रियापद आणि गोलपद या चार भागांत केलेली आढळते. त्यापैकी गीतिकापद या विभागात विशेषकरून कालगणनेविषयी माहिती आणि चर्चा केलेली आहे.

कालगणनेसाठी कत्यख, मन्वंतर आणि युग यांसारखी परिमाणे योजण्यात आली आहेत.चार लाख बत्तीस हजार वर्षांनंतर मन्वंतर होते अशी धारणा त्यात व्यक्त केली गेली आहे.भूमितीय संज्ञांचा ऊहापोहही यामध्ये आढळतो. विशेषत: साईन या भूमितीय संज्ञेची मूल्ये यामध्ये दिलेली आहेत.गोलपद या ग्रंथात ग्रह तारे आणि नक्षत्रे यांचे प्रमाण, उदय, अस्त तसेच त्यांच्या कक्षा यांविषयीचे संशोधन आहे. ग्रहणे आणि ग्रहणकाल यांची माहिती यात आहे. ग्रहगोलांची भूमितीय परिमाणे यांचा या विभागात समावेश आहे. गणितपद आणि कालक्रियापद या विभागात त्यांच्या नावाप्रमाणे गणित आणि वेळ याविषयीचे संशोधन आणि माहितीचा समावेश आहे. अंकगणित, भूमिती, कोनाचे गुणधर्म आणि निरनिराळ्या समीकरणांचा ऊहापोह हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.

काल व कालमापन हा सततच अभ्यासाचा आणि औत्सुक्याचा विषय राहिला आहे. आजही काल या शब्दाची समर्पक व्याख्या करता येत नाही. आर्यभट्ट यांनी कालाच्या वेगवेगळ्या परिमाणांची चर्चा केली आहे. तिथी, वार, नक्षत्र, दिवस, महिना यांच्या कालावधीसंबंधी विश्लेषण यात आढळते. आर्यभट्ट यांनी सिद्धांत प्रतिपादनाबरोबरच मापनावर भर दिलेला दिसतो. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मापनासाठी लागणारी निरनिराळी यंत्रे त्यांनी तयार केली. त्यात शंकू यंत्र, छाया यंत्र, धनुर आणि चक्र यंत्र, यास्ति यंत्र आणि छत्र यंत्र यांचा समावेश आहे. त्यातील छाया यंत्राचा उपयोग कालमापनासाठी तर धनुर यंत्राचा उपयोग कोनमापनासाठी केला जाई. विशेष म्हणजे कालमापनासाठी धनुष्याकृती आणि दंडगोलाकृती अशी दोन घड्याळेही त्यांनी बनविली होती.

आताच्या पटना शहराचे नाव पूर्वी कुसुपुरा असे होते. या शहरात खगोल अभ्यासासाठी मोठे निरीक्षण केंद्र होते. आर्यभट्ट या केंद्राचे प्रमुख होते असे उल्लेख आढळतात. विशेष म्हणजे त्याच काळात नालंदा विद्यापीठाचीही भरभराट होत होती. त्यामुळे आर्यभट्ट नालंदा विद्यापीठामधील खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख असावेत असे अनुमान निघते. त्याच काळात त्यांनी बिहारमधील तरेगना येथे खगोल निरीक्षण केंद्राची स्थापना केली असे मानले जाते.

पृथ्वी ही आपल्या आसाभोवती फिरते असे त्यांनी केलेले प्रतिपादन हे क्रांतिकारीच मानले पाहिजे. त्यांनी काटकोन त्रिकोनाच्या गुणधर्मांचाही अभ्यास केला होता. खगोलशास्त्राच्या संशोधनाची जी परंपरा भारतामध्ये स्थापन झाली त्याचा भक्कम पाया आर्यभट्ट यांनी घातला. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध परंपरेतील अभ्यासकांनी त्यांच्या कार्याचा सतत मागोवा घेतला. आजच्या काळात ही परंपरा अनेक संशोधक चालवीत आहेत. डॉ.जयंत नारळीकर हे त्यांतील एक अग्रगण्य नाव आहे. पुण्यात आयुकाची स्थापना करून त्यांनी खगोलशास्त्रातील संशोधनाला चालना दिली आहे. त्याच संस्थेत आर्यभट्ट यांचा पुतळा मूर्तिकाराच्या कल्पनेतून साकारण्यात आला आहे. आर्यभट्ट यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन भारतातील तरुण संशोधकांनी ही परंपरा पुढे चालवावी हाच संदेश यातून मिळतो.

Tags: गोलपद आर्य-सिद्धांत आर्यभटीय गणिताची परंपरा भारतीय खगोलशास्त्र आर्यभट्ट Goalpad Aryan Theory Aryabhatiya Mathematical Tradition Indian Astronomy Aryabhata weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके