डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आर्किमीडीज राजाला युद्धासाठी नवनवीन अस्त्रे बनविण्यात मदत करीत असले तरी त्यांचा मूलभूत संशोधनाकडील ओढा अजिबात कमी झाला नाही. त्यांचा शेवट हा अचानक आणि दु:खदपणे झाला असेच म्हणावे लागेल. रोम सेनापती मार्कस मार्सेलस याने सिरॅक्यूजवर हल्ला करून ते जिंकले. रोम सैनिक ज्या वेळी अर्किमिडीज यांच्या निवासस्थानी पोहोचले त्यावेळी ते गणितातील कूट प्रमेय सोडविण्यात मग्न होते. सैनिकांनी त्यांना ताबडतोब सेनापतीपुढे हजर होण्यासाठी फर्मावले. मात्र आर्किमिडीजने त्यास नकार दिला. प्रमेय सोडविल्यानंतर मी येईन असे सांगितले. सैनिकाने त्यांच्या या उत्तराने चिडून त्यांना ठार मारले. वस्तुत: आर्किमिडीज यांना इजा न पोहोचवता सेनापतीसमोर हजर करण्याचे निर्देश सैनिकांना दिले होते.

घनपदार्थ तरंगे द्रवावरी। तो द्रव बाजूस सारी। 
आकारमान मोजल्यावरी। पदार्थाएवढे जाणावे।। 
पदार्थ द्रवामाजी बुडता। वजन घटे तत्त्वत:। 
ते किती असे पाहता। निस्सारी जलाएवढे।। 
तरफेचे तत्त्व जाणिले। अधिक वजन पेलले। 
मानवी श्रम कमी केले। कार्य अधिक करावया।। 
तरफेच्या गुणावरी। अर्किमिडीज विश्वास करी। 
म्हणे मिळाला बाह्य आधार। जरी धरा मी उचलील।। 
कप्पीचे मर्म जाणिले। एकमेकी त्यांना गुंफिले।
त्याने कार्य सहज झाले। चलनवलन करावया।। 
आर्किमिडीजने स्क्रू बनविला। पाणी उपसण्या योजिला। 
सहस्रावधी वर्षे राहिला। उपयुक्त तो सर्वांशी।। 
युद्धासाठी साहाय्य केले। राक्षसी आकडे बनविले। 
सहजी शत्रूचे जहाज बुडविले। दहशत बसविली।। 
आरशांचा उपयोग केला।प्रकाशझोत मिळविला। 
तो जहाजांवरी सोडला।बेचिराख करण्याशी।। 
परि गणितामाजी मन रमविले।त्यासाठी सर्वस्व अर्पिले। 
हुकूम सैनिकाचे नाही मानिले। प्राणार्पण करूनिया।। 

इ.स. पूर्व काळात होऊन गेलेले आर्किमिडीज हे अनेक आयाम असलेले शास्त्रज्ञ होते. गणिती, भौतिकशास्त्रज्ञ, अभियांत्रिकी आणि खगोलशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. ते जसे तरफेच्या शोधासाठी प्रसिद्ध आहेत तसेच पाण्यात बुडणाऱ्या आणि तरंगणाऱ्या पदार्थांच्या नियमांसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘पाय’ या भूमितीमधील संज्ञेची किंमत अचूक शोधली. 3 या अंकाचे वर्गमूळ शोधले. त्याचबरोबर पॅराबोला या भूमितीतील आकृतीने सामावलेल्या क्षेत्रफळाचेही अचूक मापन केले.

आर्किमिडीजचा जन्म इ.स.पूर्व 287 साली सिसिली येथील सिरॅक्यूज येथे झाला. त्यांचे वडील खगोलशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांच्या जीवनातील घटनांबाबत अनिश्चितता आहे. त्यांचे लग्न झाले होते अथवा नाही याविषयीही निश्चित माहिती नाही. त्यांचे शिक्षण इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे झाले असण्याचीही शक्यता आहे. आर्किमिडीज ज्या शोधांविषयी प्रसिद्ध आहेत ते बुडणाऱ्या आणि तरंगणाऱ्या पदार्थांशी संबंधित आहेत. त्याविषयीची आख्यायिका प्रसिद्ध आहे. राजाने सोनाराला सोन्याचा मुकुट बनवायला सांगितला होता. मुकुट बनवून आल्यानंतर राजाला त्यामध्ये तांबे अथवा इतर निकृष्ट धातू मिसळला नाही ना, अशी शंका आली.

राजाने प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जबाबदारी आर्किमिडीजवर सोपविली. मुकुटाला नुकसान न पोहोचविता हे शोधणे त्या काळी खूपच अवघड होते. या प्रश्नाचा विचार करतानाच ते आंघोळीसाठी टबमध्ये उतरले. त्यांच्या वजनामुळे पाणी बाहेर फेकले गेले. त्यावरून त्यांना या प्रश्नाचे उत्तर शोधता येईल असे वाटले. त्यामुळे अत्यानंदाने ते युरेका! युरेका! असे ओरडत विवस्त्र अवस्थेत राजदरबाराकडे पळत सुटले, अशी ती आख्यायिका आहे.

पाण्यात  बुडणारी वस्तू आपल्या आकारमानाइतके पाणी बाजूस सारते. याचा उपयोग करून मुकुटाची घनता शोधणे शक्य आहे. मुकुटामध्ये कमी घनतेचे इतर पदार्थ मिसळले असल्यास त्या मुकुटाची घनता शुद्ध सोन्याच्या घनतेपेक्षा कमी येणार. यावरून भेसळ शोधणे शक्य आहे, परंतु हा प्रयोग करण्यासाठी अचूक मापनाची आवश्यकता असते. मात्र त्या काळी अशा मापनाची शक्यता कमी होती. त्यामुळे अर्किमिडीजने त्याच्या दुसऱ्या तत्त्वाचा वापर करून घनता शोधली असे मानले जाते.

अभियांत्रिकी क्षेत्रात आर्किमिडीज यांना दोन गोष्टींसाठी श्रेय दिले जाते. सिरीक्यूजसाठी सहाशे लोक आणि इतर सामग्री वाहून नेणारे सर्वांत मोठे जहाज त्यांनी बांधले, अर्किमिडीज यांनी खालून वर पाणी खेचणारा जो स्क्रू बनविला त्याला तोड नाही. जरी ही कल्पना बॅबिलोनियन काळातील असली तरी अर्किमिडीज यांनी त्याला नवे परिमाण दिले. या स्क्रूचा उपयोग जहाजातील पाणी बाहेर फेकण्यासाठी केला जाई. ह्या स्क्रूचा उपयोग आजही केला जातो हे विशेष. शत्रूच्या जहाजांना बुडविण्यासाठी आर्किमिडीजने मोठा हूक बनवला होता. क्रेनच्या हाताप्रमाणे असणाऱ्या उपकरणाच्या साहाय्याने तो जहाजावर फेकला जाई. त्याच्या साहाय्याने जहाज वर उचलून ते बुडविण्यात येई.

सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांनी तीव्र प्रकाशझोत तयार करण्यात यश मिळवले. किनाऱ्यावर निरनिराळ्या ठिकाणी आरसे ठेवून सूर्यप्रकाशाचे एकत्रीकरण करण्यात येई. सूर्यप्रकाश जहाजावर एकवटल्याने उष्णता निर्माण होऊन जहाज पेट घेत असे.

आर्किमिडीजने जरी तरफेचा शोध लावला नसला तरी तरफेच्या गुणधर्माची आणि उपयुक्ततेची त्यांना पुरेपूर जाणीव होती. तरफेच्या साहाय्याने कमी श्रमाचे अधिक काम करता येते. मोठा दगड हलविण्यासाठी लांब पहार आणि टेकूचा उपयोग केला तर सामान्य कुवतीचा माणूसही तो हलवू शकतो. तरफेच्या या गुणधर्माचा उपयोग करून वजनदार पदार्थ उचलता येणे ही आर्किमिडीज यांच्या दृष्टिकोनातून किरकोळ बाब होती. त्यांनी या बाबतीत केलेल्या विधानावरून त्याचा प्रत्यय येतो. त्यांनी म्हटले होते की मला जर उभे राहण्यासाठी पृथ्वीच्या बाहेर जागा दिली तर तरफेच्या साहाय्याने मी पृथ्वीही उचलू शकेन.

आर्किमीडीज राजाला युद्धासाठी नवनवीन अस्त्रे बनविण्यात मदत करीत असले तरी त्यांचा मूलभूत संशोधनाकडील ओढा अजिबात कमी झाला नाही. त्यांचा शेवट हा अचानक आणि दु:खदपणे झाला असेच म्हणावे लागेल. रोम सेनापती मार्कस मार्सेलस याने सिरॅक्यूजवर हल्ला करून ते जिंकले. रोम सैनिक ज्या वेळी अर्किमिडीज यांच्या निवासस्थानी पोहोचले त्यावेळी ते गणितातील कूट प्रमेय सोडविण्यात मग्न होते. सैनिकांनी त्यांना ताबडतोब सेनापतीपुढे हजर होण्यासाठी फर्मावले. मात्र आर्किमिडीजने त्यास नकार दिला. प्रमेय सोडविल्यानंतर मी येईन असे सांगितले. सैनिकाने त्यांच्या या उत्तराने चिडून त्यांना ठार मारले. वस्तुत: आर्किमिडीज यांना इजा न पोहोचवता सेनापतीसमोर हजर करण्याचे निर्देश सैनिकांना दिले होते.

Tags: डॉ. पंडित विद्यासागर विज्ञानबोध युरेका पॅराबोला वर्गमूळ पाय आर्किमिडीज science vidnyanbodh pandit vidyasagar eureka parabola square root archimedes weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके