डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दीर्घकालीन आजार, अतिसार, अतिउपास यामुळे जो चेहरा दिसतो त्यास हिपोक्रेटिस फेस असे संबोधन आहे. ही मृत्यूची चाहूल समजली जाते, तसेच घसा आणि श्वासनलिकेत होणाऱ्या आवाजाला नळीतून जाता होणारा पाण्याचा आवाज हिपोक्रेटिस ध्वनी असे संबोधन आहे. वैद्यक- शास्त्रात दिलेल्या या अतुलनीय योगदानामुळे त्यांना पाश्चिमात्य वैद्यकशास्त्राचे आणि रोगतपासणी आणि निदानशास्त्राचे पिता अशी मान्यता आहे. त्यांच्या कार्यकाळात हिपोक्रेटिक ओथ (शपथ) हा फारच महत्त्वाचा घटक आहे. शरीरवैद्याने आपले व्यक्तिमत्त्व आणि आचरण यामध्ये सुसंगती आणली पाहिजे. डॉक्टरचे चारित्र्य हे वादातीत आणि इतरांना आदर्शवत असले पाहिजे हा हिपोक्रेटिसचा कटाक्ष होता. त्यामुळे त्याच्या ठिकाणी गुणवत्ता, चारित्र्य आणि करुणा याचा संगम असायला हवा. अशी हिपोक्रेटिसची धारणा होती.

हिपोक्रिटिस आद्य भेषक। पाया रचिला शास्त्र वैद्यक। निरिक्षणे मांडिली वेचक। नानाविध व्याधिंची।।

व्याधिने शरिर ग्रासले। कायेचे तपमान वाढिले। अतिसूक्ष्मपणे निरिक्षिले। नोंदी तयाच्या ठेविल्या।।

कायेच्या त्वचेचा रंग। दावि व्याधींचे अंग। वेदना करिती संग। माणूस व्याधिग्रस्त जाणावा।।

शरीराची हालचाल। दावी अवयवांचा मेळ। बदल घटता दखल। तक्षणी घ्यावी पै।।

मलाचे महत्त्व जाणावे। शरीरी न साठवावे। साठण्याचे कारण शोधावे। व्याधी निदान कराया।।

नित्य व्यायाम करावा। योगासनांचा आधार घ्यावा। आहार नियंत्रित करावा। मलावरोध टाळाया।।

या दोषांचा अभ्यास। नित्य करी हिप्पोक्रेटिस। त्याने योजिल्या तत्त्वास। आजही अधिष्ठान प्राप्त असे।।

दोष हृदय वाहिनीचा। शोध घेतला कारणांचा। त्या लागी औषधांचा ढाचा। हिप्पोक्रेटिसने शोधिला।।

शल्यक्रियेवर प्रभुत्व दावी। नानाविध मार्ग सुचवी। आद्यकाली त्याची ठेवीती। भेषकही जाण पा।।

भारतीय वैद्यकशास्त्राच्या इतिहासात सुश्रूताचे जे स्थान आहे तेच स्थान युरोपियन वैद्यकशास्त्राच्या इतिहासात हिपोक्रेटिस यांचे आहे.

यांचा कार्यकाल हा इ.स.पूर्व 460 ते 370 वर्षे मानला जातो. यांचा जन्म कोस या ग्रीक बेटावर झाला. त्यांचे वडील हेराक्लिडस हे एक शरिर वैद्य (फिजिशियन) होते. त्यांच्याकडूनच त्यांना वैद्यकशास्त्राचे धडे मिळाले.

त्यांनी वैद्यकशास्त्रात नवीन कल्पना आणि प्रवाह आणले. त्यांचे मुख्य योगदान म्हणजे रोगांचा उगम हा नैसर्गिक कारणांधून होतो. त्याचा देवाच्या कोपाशी काहीही संबंध नाही असे प्रतिपादन केले. ग्रीक राज्यव्यवस्थेशी त्यांचे मतभेद झाल्यामुळे त्यांना 20 वर्षे कारावास भोगावा लागला.

त्यांनी वैद्यकशास्त्रात मूलभूत योगदान देऊन लक्षणांवर आधारित योगनिदानाचा पाया घातला. वैद्यकशास्त्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचे वर्णन त्यामुळे केवळ त्रोटकपणेच करणे शक्य आहे. रोगांचा उगम हा नैसर्गिक कारणांमुळे होतो या त्यांच्या प्रतिपादनामुळे वैद्यकशास्त्र हे धर्मापासून अलग होऊन त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले.

त्याचप्रमाणे रोगनिदान आणि उपचार याविषयीच्या विचारांची दिशा बदलून तिला वैज्ञानिक पद्धतीचे अधिष्ठान लाभले. वातावरणीय घटकांबरोबरच आहार आणि सवयी यांचाही विचार रोगनिदानासाठी होऊ लागला. शरीरवैद्याने रोगनिदान आणि उपचार करताना पालन करण्याची पद्धती त्यांनी विकसित केली आणि त्या पद्धतीच्या काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला.

शरीरवैद्याने आपली निरीक्षणे अचूकपणे नोंदवावीत, शिवाय त्यात व्यक्तिनिरपेक्षता आणि स्पष्टता असणे आवश्यक आहे. अशा  प्रकारच्या नोंदी इतर शरीरवैद्यांना वापरणे त्यामुळे शक्य होते. हिपोक्रेटिस यांनी याचे तंतोतंत पालन केले.

त्यांनी शरीराची ठेवण, नाडी, तपमान, वेदना, मलोत्सर्जन आणि हालचाली यांच्या नोंदी केल्या. त्यांनी कुटुंबाच्या आरोग्यविषयक इतिहासाचीही नोंद केली हे विशेष. हिपोक्रेटिस यांच्या कालखंडात समाजात अनेक समजुती प्रचलित होत्या. त्यामुळे शरीररचना समजून घेण्यास वाव नव्हता. त्यामुळे हिपोक्रेटिस यांनी शरीररचनेविषयी केलेले निदान आणि लक्षणे ही अचूक ठरली हे विशेष.

त्यांनी रोगांचे वर्गीकरण ही अचानक उद्‌भवणारे, जुनाट (दीर्घकालीन), एंडेमिक आणि साथीचे असे वर्गीकरण केले. हिपोक्रेटिस यांनी ‘हिपोक्रेटिस कार्पस’ हा ग्रंथ लिहिला अशा मान्यता आहे. हिपोक्रेटिस यांचे वैशिष्ट्य म्हणजे वैज्ञानिक, सैद्धांतिक पाया ठिसूळ असूनही त्यांनी केलेले रोगनिदान आणि उपचार समर्पक असे होते.

गुदद्वाराच्या विकारावर त्यांनी केलेले उपचार त्या काळच्या मानाने खूपच प्रगत असे होते. हे विकार पित्तामुळे होतात अशी त्यांची धारणा होती. रक्ताच्या गाठी तापलेल्या लोखंडी सळईने जाळण्याची पद्धत त्यांनी विकसित केली. आजही अशा गाठी नष्ट करण्यासाठी जाळणे, आवळणे आणि काढून टाकणे (कापणे) या पद्धतींचा वापर होतो.

हिपोक्रेटिस यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहिले. वीस वर्षे त्यांना तुरुंगवास भोगावा लागलाच. परंतु त्यांना अनेकदा स्थलांतर करावे लागले. त्यांची ख्याती युरोप आणि मध्यपूर्वेपर्यंत पसरली होती. त्यांनी वैद्यकशास्त्रात दिलेल्या योगदानाच्या खुणा वैद्यकशास्त्रात आजही पहायला मिळतात.

बाह्य लक्षणांवरून त्यांनी केलेले रोगनिदान अचूक होते. सुजलेल्या बोटांचा संबंध त्यांनी फुफ्फुसाचा कर्करोग आणि हृदयरोगाशी असतो हे दाखवून दिले. त्यामुळे अशा बोटांना हिपोक्रेटिस फिंगर्स असे म्हणतात.

दीर्घकालीन आजार, अतिसार, अतिउपास यामुळे जो चेहरा दिसतो त्यास हिपोक्रेटिस फेस असे संबोधन आहे. ही मृत्यूची चाहूल समजली जाते, तसेच घसा आणि श्वासनलिकेत होणाऱ्या आवाजाला नळीतून जाता होणारा पाण्याचा आवाज हिपोक्रेटिस ध्वनी असे संबोधन आहे.

वैद्यक- शास्त्रात दिलेल्या या अतुलनीय योगदानामुळे त्यांना पाश्चिमात्य वैद्यकशास्त्राचे आणि रोगतपासणी आणि निदानशास्त्राचे पिता अशी मान्यता आहे. त्यांच्या कार्यकाळात हिपोक्रेटिक ओथ (शपथ) हा फारच महत्त्वाचा घटक आहे. शरीरवैद्याने आपले व्यक्तिमत्त्व आणि आचरण यामध्ये सुसंगती आणली पाहिजे. डॉक्टरचे चारित्र्य हे वादातीत आणि इतरांना आदर्शवत असले पाहिजे हा हिपोक्रेटिसचा कटाक्ष होता. त्यामुळे त्याच्या ठिकाणी गुणवत्ता, चारित्र्य आणि करुणा याचा संगम असायला हवा. अशी हिपोक्रेटिसची धारणा होती.

Tags: डॉ. पंडित विद्यासागर हिपोक्रेटिस वैद्यक शास्त्र vidnyanbodh pandit vidyasagar hippocrates medical science weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके