डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विशेष म्हणजे त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले. स्थितिक विद्युत तयार होताना जो विद्युतभार निर्माण होतो, तो वाहकाच्या बाह्यभागावरच असतो हे त्यांनी दाखवून दिले त्यासाठी त्यांनी एक नाविन्यपूर्ण प्रयोगही केला. एका मोठ्या धातूच्या गोलामध्ये लाकडी आसनावर बसून त्या गोलाच्या बाह्यभागावर त्यांनी स्थितिक विद्युतभार तयार केला. या भाराचे मूल्य खूपच जास्त असूनही त्यांना कुठलीही इजा पोहोचली नाही, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. प्रकाशावर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होतो अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले, अर्थात उपकरणांच्या कमतरतेुळे ते यशस्वी झाले नाही.


ढगामाजी वीज संचारे। दिसतसे विविध आकारे। 
झेप घेई धरेवर सत्वरे। मानव भयभीत होतसे।। 
तिच्या वर्तने अचंबित होई। प्रचंड उर्जा तिचे ठायी। 
भिडेल ते लयास नेई। म्हणे निसर्गाचा खेळ हा।। 
शास्त्रज्ञे किमया केली। स्वये विद्युत निर्मिली। 
नियमांनी बांधीत केली। फलदायी कराया।। 
व्होल्टा, फॅरेडेचे योगदान। ठरले मानवा वरदान। 
सयंत्रे निर्मिती, संशोधन। अथकपणे करूनिया।। 
विद्युत जनित्र बनविले। यांत्रिकीचे रूपांतर विजेत केले। 
ट्रान्सफॉर्मर मोटार योजिले। बुद्धी चातुर्य दाखवी।। 
दायित्व फॅरेडे युगपुरुषाचे। उघडी द्वार तंत्रज्ञानाचे। 
विजेच्या सुयोग्य उपयोगाचे। मार्ग त्याने दाविले।। 
बेन्झिनचा शोध लाविला। अनोड कॅथोडचा उद्‌घोष केला। 
इलेक्ट्रोड आयन समजवी सामान्याला। अविष्कार अजोड ।। 

परिस्थिती प्रतिकूल असतानाही माणूस आत्मविश्वास आणि जिद्‌दीच्या जोरावर काय करू शकतो, याचे मायकेल फॅरेडे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. अगदीच कमी शिक्षण असतानाही केवळ जिज्ञासेच्या जोरावर त्यांनी विज्ञानाचा अभ्यास स्वतःहून केला. पुस्तकांच्या दुकानात काम करत असताना त्यांनी न्यूटनसारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन केले. 

रॉयल सोसायटीमध्ये डेव्ही यासारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने दिलेल्या व्याख्यानावर 300 पानांचे टिपण तयार केले. त्यांच्या या कृतीमुळे हम्प्रेडेव्ही यांनी त्यांना प्रयोगशाळेत साहाय्यक पदाची नोकरी दिली. त्या ठिकाणी त्यांनी पडेल ती कामे केलीच, परंतु, त्याचबरोबर अनेक मानहानीकारक प्रसंगांनाही तोंड दिले. हे सर्व करत असतानाच त्यांनी विज्ञानातील अनेक प्रयोग आत्मसात केले. त्याच्याच जोरावर त्यांनी पुढे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत नाविन्यपूर्ण प्रयोग करून अनेक नवीन शोध लावले. त्यांचे प्रायोगिक कौशल्य एवढे मोठे होते की गणिताची विशेष मदत न घेता त्यांनी मूलभूत शोध लावले. 

आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाच्या टेबलावर न्यूटन, मॅक्सवेल यांच्याबरोबर मायकेल फॅरेडे यांचा फोटो ठेवलेला असे. त्यांनी ‘इंडक्शन’ही विद्युत चुंबकीय लहरींशी संबंधित प्रक्रिया शोधली. आज ट्रान्सफॉर्मरमध्ये या तत्त्वाचा वापर केला जातो. विजेचा वापर करून मोटर तयार करण्याची प्रक्रिया आता सर्वसामान्य आहे. त्याविषयीचा पहिला प्रयोग फॅरेडे यांनी केला. पदार्थांमध्ये सूक्ष्म स्वरूपात चुंबकीय गुणधर्म असतात हे त्यांनी दाखवून दिले. रासायनिक द्रवामध्ये धातूंचे होणारे विघटन याबद्दलचे नियम त्यांनी शोधले. विशेष म्हणजे विद्युत चुंबकीय रेषाबद्‌दलचा सिद्धान्त त्यांनी प्रथम मांडला. विद्युत प्रवाहाचा उपयोग करून जे तंत्रज्ञान विकसित झाले त्याचा पाया त्यांनी घातला.  त्यांनी ‘बेंझिन’ या रासायनिक पदार्थाचा शोध लावला. त्याचप्रमाणे कार्बन आणि क्लोरीन यांची दोन संयुगे त्यांनी शोधली. प्रयोगशाळेमध्ये पदार्थ गरम करण्यासाठी जो बर्नर वापरतात, त्या बुनशेन बर्नरचा शोध त्यांनी लावला. ‘कपॅसिटर’ या नेहमीच्या वापरातील घटकाचा शोध त्यांनी लावला.

विशेष म्हणजे त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले. स्थितिक विद्युत तयार होताना जो विद्युतभार निर्माण होतो, तो वाहकाच्या बाह्यभागावरच असतो हे त्यांनी दाखवून दिले त्यासाठी त्यांनी एक नाविन्यपूर्ण प्रयोगही केला. एका मोठ्या धातूच्या गोलामध्ये लाकडी आसनावर बसून त्या गोलाच्या बाह्यभागावर त्यांनी स्थितिक विद्युतभार तयार केला. या भाराचे मूल्य खूपच जास्त असूनही त्यांना कुठलीही इजा पोहोचली नाही, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. प्रकाशावर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होतो अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले, अर्थात उपकरणांच्या कमतरतेुळे ते यशस्वी झाले नाही. 

फॅरेडे यांनी पर्यावरणविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी योगदान दिले. लंडनमधील थेम्स या नदीमध्ये झालेल्या प्रदूषणाचा त्यांनी अभ्यास केला. या त्यांच्या कार्याबरोबरच त्यांनी खाणीमध्ये होणारे अपघात, दीपग्रह आणि शिक्षण या विषयांतही महत्त्वाचे योगदान दिले. विशेष म्हणजे त्यांनी 1847 मध्ये ‘अब्जांशी कणां’ची निर्मिती केली. अब्जांशी कणांपासून तयार केलेल्या सोन्याचे गुणधर्म हे मोठ्या कणांपासून बनलेल्या सोन्यापेक्षा वेगळे असतात हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. या त्यांच्या कार्यामुळेच विज्ञानाच्या इतिहासातील एक महान प्रायोगिक शास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. 

Tags: कपॅसिटर मायकेल फॅरेडे चुंबकीय क्षेत्र प्रकाश अब्जांशी कण capacitors Michael Faraday magnetic fields light billions of particles weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके