डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

परि निरिक्षणाहूनी थोर। असे प्रयोगाची धार। 
प्रयोग सिद्ध सार। मान्यता पावे विज्ञानात।। 
केवळ सिद्धांत मांडिला। परी प्रयोगे नाही पडताळिला। 
तर तो सिद्धांतच राहिला। अंतिम मान्यता त्याला नसे।। 
आइन्स्टाइन प्रतिपादी असे ज्ञात। सापेक्षतेचा सिद्धांत। 
परी नोबेल त्यासी प्राप्त होत। प्रकाश परिणामासाठी।। 
कारण सिद्धांत मांडिला। परी प्रयोगे नाही दुजोरीला। 
म्हणोनि नाही योग्य झाला। नोबेल पुरस्कारासाठी।। 
प्रयोगांती निरीक्षण। निष्कर्षाचे परीक्षण। 
त्यास नियमांचे निरूपण। सामोरे येत गा।। 
नियम असती स्थल कालातीत। नियम व्यक्ति निरपेक्षित। 
भाषा, वंश, स्थलाने न बंधित। नियम तो जाणावा।। 
नियम असावा वैश्विक। नियम निसर्गकार्याला पोषक। 
कुणी दावी त्रुटी नेक। नियम बदलण्या वाव असे।। 
 

विज्ञानात प्रयोगाने सिद्ध झालेले प्रतिपादन स्वीकारण्यासाठी योग्य मानले जाते. ज्या वेळी साधनांच्या अभावी प्रयोग करणे शक्य नसते, अशा वेळी अपवादात्मक परिस्थितीत तर्कांवर आधारित गृहीतकास मान्यता दिली जाते. मात्र अशा गृहीतकाची प्रयोगाद्वारे सिद्धता करण्यासाठी संशोधकांचा प्रयत्न सतत सुरूच राहतो. प्रयोगामध्ये सामान्य निरीक्षणाबरोबरच मापनाचा समावेश होतो. मापनासाठी लागणारी साधने उपलब्ध नसल्यास प्रयोग सिद्ध होत नाही. मानपनाद्वारे मिळालेली माहिती अंकांच्या स्वरूपात प्राप्त झाल्याने विश्लेषण अधिक सखोल आणि प्रमाणभूत होते. त्याचप्रमाणे या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी तिला संख्याशास्त्रीय निकष लावता येतात. प्रयोगाद्वारे मिळालेल्या माहितीमध्ये दडलेल्या संकल्पना आलेखांमुळे स्पष्ट होण्यास मदत होते. गॅलिलिओने चर्चमध्ये असणाऱ्या लंबकाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर त्या लंबकाच्या आंदोलनाचा काल तोच राहतो असे अनुमान काढले. मात्र या अनुमानाचे रूपांतर निष्कर्षामध्ये करण्यासाठी त्याने आंदोलनाचा काल मोजण्याचा प्रयोग केला. त्यासाठी त्या काळी कालमापनाचे साधन सहजरीत्या उपलब्ध नसल्याने त्याने नाडीच्या ठोक्यांचा आधार घेतला. हृदय आकुंचन आणि प्रसरण पावताना रक्तवाहिनीचे आकुंचन आणि प्रसरण एका मिनिटात साधारणपणे किती होते हे त्या काळी माहीत होते. त्यावरून त्याला लंबकाच्या आंदोलन कालाविषयी निष्कर्ष काढता आला.

सिद्धांत मांडून जर त्याला प्रयोगाचा आधार देता आला नाही तर अशा सिद्धांताला अंतिम मान्यता मिळत नाही. आइन्स्टाइन हे विसाव्या शतकातील विज्ञान क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व. त्यांनी 1905 साली सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. अतिशय मूलगामी अशा या सिद्धांतामुळे न्यूटनने प्रतिपादलेल्या नियमांमध्ये सुधारणा करावी लागली. मात्र या सिद्धांताला दुजोरा देणाऱ्या प्रयोगाची सिद्धता 1919 सालापर्यंत होऊ शकली नाही. प्रकाश हा ‘फोटॉन’ या  वस्तुमानविरहित ऊर्जा कणांचा बनलेला असतो. लहरींच्या स्वरूपात असणाऱ्या प्रकाशावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होण्याची शक्यता त्या काळी गृहीत धरली जात नव्हती. मात्र आइन्स्टाइन यांच्या प्रतिपादनानुसार गुरुत्वाकर्षणाचा परिणाम प्रकाशकिरणांवर व्हायला हवा. मात्र अशा प्रकारचे निरीक्षण करण्यासाठीच्या प्रयोगाची सिद्धता होत नव्हती. ती संधी खग्रास सूर्यग्रहणामुळे चालून आली.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिंग्टन यांनी खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात सूर्यापलीकडे असणाऱ्या ताऱ्याचा प्रकाश सूर्याजवळून येताना वक्रीभूत होतो हे सप्रमाण दाखवून दिले. यासाठी त्यांनी वेस्ट इंडीजजवळील बेटावर खास शोधमोहीम राबवली. परंतु प्रयोगांती मिळालेले हे निष्कर्ष संपूर्णपणे स्वीकारार्ह होण्यास काही कालावधी लागला. त्यामुळे 1926 साली आइन्स्टाइन यांना ज्या वेळी नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले त्या वेळी सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा मानपत्रात केवळ उल्लेख करण्यात आला. त्यांना नोबेल पारितोषिक ‘प्रकाश विद्युतीय परिणाम’ (फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट) यासाठी देण्यात आले. निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्या निष्कर्षांची पडताळणी पुन्हा पुन्हा करणे आवश्यक असते. निष्कर्षांची अनेकवार पडताळणी केल्यानंतर त्यातून नियम तयार करण्यास योग्य पार्श्वभूमी तयार होते. मात्र विज्ञानातील नियमांसाठी काही निकष असतात. या निकषांवर नियमांची पडताळणी होणे आवश्यक असते. 

नियमांची पहिली कसोटी म्हणजे तो स्थलकालातीत असणे जरुरीचे असते. विश्वात कुठेही नियमाची पडताळणी करता यावी अशी अट विज्ञानात असते. पृथ्वीवर सर्वत्र हा नियम लागू पडतो हे ओघाने आलेच. या नियमाच्या अनुसरणाला देश, वंश, भाषा, लिंग, वर्ण यांचे बंधन असत नाही. या सर्वांसाठी हा नियम सारखाच असतो.

व्यक्तिनिरपेक्षता हा विज्ञानाचा स्थायीभाव आहे. विज्ञानाचे वेगळेपण आणखी एका बाबतीत आहे. विज्ञानामध्ये नियमात दुरुस्ती करण्याला, सुधारणा करण्याला किंवा रद्द करण्याला मुभा असते. स्वयंसुधारणा करण्याची सोय विज्ञानाच्या रचनेत अंगभूत आहे. परंतु असे बदल घडवून आणण्याची विशिष्ट पद्धत आहे. कुठलाही बदल घडवून आणण्यासाठी सबळ प्रायोगिक आधार, निरीक्षण अथवा तार्किकी मांडणीची आवश्यकता असते. अशा बदलांमुळे अगोदर नियम अथवा प्रतिपादन केलेल्या शास्त्रज्ञाचा अवमान होत नाही. गॅलिलिओच्या कालखंडापूर्वी पृथ्वी स्थिर असून सूर्य आणि ग्रह तिच्याभोवती फिरतात असे मानले जाई. मात्र कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांनी निरीक्षणाआधारे सूयाभोवती इतर ग्रह फिरतात हे दाखवून दिले. या प्रतिपादनाला सबळ पुरावे मिळाल्यामुळे या प्रतिपादनाला मान्यता मिळाली.

(क्रमश:)

Tags: आइन्स्टाइन एडिंग्टन गॅलिलिओ विज्ञानबोध डॉ. पंडित विद्यासागर pandit vidyasagar vidnyanbodh science weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके