डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

 कोपर्निकसने पाया रचिला। गॅलिलिओ वाढवी त्याला। 
खगोल, भौतिकी गणिताला। गवसणी घाली हा।।
 चंद्र, ग्रह असती दूर। पाहूनी मानव अचंबित फार।
 काही कल्पनांचा भार। सत्य असत्य जाणिला।।
 गॅलिलिओ बनवी टेलिस्कोप। खगोल आले समीप। 
चंद्राचा पृष्ठभाग खडबडीत। सर्वज्ञात झाले पै।। 
जहाज असता दूरवरी। दूरदर्शक दृष्य करी। 
लक्ष ठेवण्या शत्रूवरी। साधन उपलब्ध जाहले।।
 चर्चध्ये जाई नियमित। परि लंबक हेलकावत।
 ठोके नाडीचे आपुल्या मोजीत। कार्यकाल मोजला।। 
लंबकांचे अभ्यासी गुणधर्म। शोधिले तत्त्व जाणुनी मर्म। 
द्रव वजन काट्याचा धर्म। त्याने सहजी जाणिला।। 
सूर्यालेचे निरीक्षण करी। लक्ष ठेवी भ्रणावरी। 
कोपर्निकस सिद्धांत खरोखरी। सत्य आहे जाणिले।। 
सूर्याभोवती फिरती ग्रह। धराही सामील निःसंदेह। 
तिच्या स्थिरतेचा आग्रह। मोडूनि त्याने काढला।। 
चर्चला हे नाही पटले। पोपने शासन दिले।
 कारागृही बंदी केले। सत्य वदणे अपराध।। 
 

गॅलिलिओ यांचे वर्णन ‘सूर्य पाहिलेला माणूस’ असे केले जाते.

पृथ्वी ही स्थिर नसून सूर्याभोवती फिरते. या कोपर्निकस यांनी केलेल्या प्रतिपादनाला स्पष्टपणे दुजोरा देणारा गॅलिलिओ हा पहिला संशोधक होता. या शोधाबरोबरच गॅलिलिओ यांनी भौतिक शास्त्रात इतरही मौलिक संशोधन केले आहे.

गॅलिलिओच्या वडिलांचा आग्रह त्यांनी वैद्यकशास्त्र शिकावे असा होता. परंतु गॅलिलिओ यांचा ओढा लहानपणापासूनच गणित व भौतिकशास्त्र या विषयांकडे होता. चर्चमध्ये हलणाऱ्या लंबकाचा कार्यकाल त्यांनी नाडीच्या ठोक्यांचा उपयोग करून मोजला आणि त्यावरून लंबकाच्या कार्यकालाविषयी निश्चित नियम प्रतिपादित केले.

गॅलिलिओ यांना डच कारागिराने तयार केलेल्या दूरदर्शकाने खूपच आकर्षित केले. त्यांनी विशेष रस घेऊन स्वतः दूरदर्शक बनवला. या दूरदर्शकामुळे त्यांना अनेक ग्रह तसेच उपग्रह यांचे निरीक्षण करता आले. त्यांनी चंद्रावरील पर्वतांचे निरीक्षण केले, त्याचप्रमाणे आकाशगंगेध्ये अनेक छोटे तारे आहेत हेही त्यांना दिसले.

गुरूग्रहाभोवती फिरणाऱ्या चार उपग्रहांचे त्यांनी निरीक्षण केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. त्यांनी शुक्रग्रहाचे निरीक्षण केल्यानंतर त्यांना चंद्राप्रमाणे कला दिसून आल्या त्यामुळे शुक्र हा ग्रह पृथ्वीभोवती नाही तर सूर्याभोवती फिरत असावा याची त्यांना खात्री पटली.

कोपर्निकस याने सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात असे प्रतिपादन केले होते.

तर टायको ब्राहे या शास्त्रज्ञाने पृथ्वी सोडून इतर सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात असे प्रतिपादन केले होते.

सूर्याचे निरीक्षण केल्यानंतर त्यांना सूर्यावर असणारे डाग आढळून आले. या आणि अशा इतर निरीक्षणांवरून कोपर्निकस यांच्या प्रतिपादनावर त्यांचा ठाम विश्वास बसला. त्यांनी त्या मताचा पुरस्कार करायला सुरुवात केली.

परंतु पृथ्वी स्थिर आहे या मताचा पगडा एवढा प्रबळ होता की त्यांच्या सहकाऱ्याने त्यांच्याविरुद्ध चर्चकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. पहिल्या तक्रारीमध्ये चर्चच्या चौकशी समितीला तथ्य आढळून आले नाही, कदाचित त्यामुळे गॅलिलिओ यांचा आत्मविश्वास वाढला असावा.

पोप पॉल पाचवे यांनी गॅलिलिओ यांना कोपर्निकस यांच्या मताचा पुरस्कार न करण्याची ताकीद दिली. त्यानंतरच्या काळात गॅलिलिओ यांचा प्रशंसक माफिओ बारबेरेनी हे पोप या पदावर नियुक्त झाले. त्यांनी गॅलिलिओंना अनेक वेळा चर्चेसाठी बोलावून घेतले होते. त्या चर्चेदरम्यान त्यांनी कोपर्निकसच्या सिद्धांताविषयी चर्चा केली. त्यामुळे गॅलिलिओ यांनी कोपर्निकस यांच्या सिद्धातांचा पुरस्कार करणारे पुस्तक प्रसिद्ध केले.

परंतु याचा परिणाम मात्र चांगला झाला नाही. गॅलिलिओ यांना पुन्हा चौकशी समितीपुढे बोलावून त्यांच्यावर चर्चच्या अवमानाचा आरोप ठेवण्यात आला. हा आरोप सिद्ध होऊन गॅलिलिओ यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु ही शिक्षा सौम्यपणे भोगता यावी म्हणून त्यांना त्यांच्या घरात स्थानबद्ध करण्यात आले.

त्या काळात त्यांच्या मुलीने त्यांना खूप मोठा आधार दिला. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी आपले लिखाण सुरू ठेवले, त्याचबरोबर लंबकाच्या घड्याळाची रचना तयार केली.

त्यांच्या मृत्यूनंतरही चर्चने त्यांची पाठ सोडली नाही. आपल्या वडिलांच्या शेजारी आपले दफन करावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु चर्चच्या भीतीमुळे त्यांच्या नातेवाईकांना ती पूर्ण करता आली नाही.

त्यांच्या मृत्यूनंतर 350 वर्षांनी पोप जॉन पॉल दुसरे यांनी 1992 साली चर्चकडून काही चुका झाल्याचे आणि गॅलिलिओचे प्रकरण समाप्त झाल्याचे घोषित केले. परंतु चर्चचा निर्णय संपूर्णपणे चुकीचा होता हे त्यांनी मान्य केले नाही.

Tags: डॉ. पंडित विद्यासागर गॅलिलिओ माफिओ बारबेरेनी टायको ब्राहे चर्च पोप जॉन पॉल दुसरे pandit vidyasagar Mafio Barbareni Tycho Brahe Church Pope John Paul II Galileo weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके