डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लीलावती या ग्रंथामध्ये अंकगणिताबरोबरच भूमिती, गणितीय व्याख्या आणि समीकरणे या विषयांचा समावेश आहे. यातही प्रामुख्याने शून्याचे गुणधर्म, गुणाकार आणि वर्ग काढण्याच्या पद्धती. व्याज दर आणि व्याज काढणे इत्यादींचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी समीकरणे सोडविण्यासाठी वापरलेले नियम व सतराव्या शतकात युरोपियन संशोधकांनी दिलेले नियम सारखेच आहेत. पायथागोरसच्या काटकोन त्रिकोणाशी संबंधित सिद्धांताची सोडवणूक त्यांनी केली होती.  

भारतभूच्या लौकिकाला।भास्कराने कळस चढविला।

गणिताचा झेंडा रोविला।कॅल्क्यूलस शोधोनिया ।।

 ग्रहांचे गणित मांडले।भ्रण मार्ग प्रमाणित केले ।

समीकरणे रचियेले।स्वयं गणिता आधारे ।।

त्रिकोणमिती अभ्यासी।अंकासंबंधी ।

रची विविध सिध्दांतासी।गणिती ऐसा थोर हा ।।

समाजा रूढी ग्रासिले।पुरोगामित्व लयास गेले ।

भास्कराने धारिष्ट्य दाविले।दुहितेस गणित शिकविले ।।

विचारांना दास्यत्व आले।राष्ट्र लयास चालिले ।

पारंगत विदुषी केले।आगळेपण दिसतसे ।।

गणित विषय कठिण।सर्वसामान्य मानी जन ।

परी योजिता रंजन।सोपेपण येतसे ।।

भास्करे सुभाषिते रचिली।गणिती कोडे गुंफिली ।

मनोरंजक बनविली।आकर्षण वाढविले ।।

भारतीयांचा जगात धाक।म्हणती बाळगती जनुक ।

गणित प्रज्ञा अंगीभूत।ऐसी जगी मान्यता ।।

नव पिढीचे दायित्व।टिकविण्या गणित प्रभुत्व ।

त्यालागी ठेवा ममत्व।गणित शिकण्या कारणे ।।

मध्ययुगीन कालातील महान भारतीय गणिती ही ओळख आहे भास्कराचार्य यांची. त्यांचा जीवनकाल हा 1114 ते 1185 हा मानला जातो. महान शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहेच परंतु गणित क्षेत्रात त्यांनी दिलेले मूलभूत योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

गणित, अंकगणित, बीजगणित, भूमिती, खगोलशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांत त्यांनी संशोधन केले. त्यांनी दिलेल्या योगदानाची केवळ जंत्री करायची ठरविले तर कित्येक पाने खर्ची पडतील. त्यामुळे या संक्षिप्त आढाव्यात या सर्वांचा ओझरता उल्लेख करणेच केवळ शक्य आहे. त्यांनी लिहिलेल्या सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाचे लीलावती, बीजगणित, ग्रहगणित आणि गोलाध्याय असे चार भाग आहेत.

लीलावती या ग्रंथामध्ये अंकगणिताबरोबरच भूमिती, गणितीय व्याख्या आणि समीकरणे या विषयांचा समावेश आहे. यातही प्रामुख्याने शून्याचे गुणधर्म, गुणाकार आणि वर्ग काढण्याच्या पद्धती. व्याज दर आणि व्याज काढणे इत्यादींचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी समीकरणे सोडविण्यासाठी वापरलेले नियम व सतराव्या शतकात युरोपियन संशोधकांनी दिलेले नियम सारखेच आहेत. पायथागोरसच्या काटकोन त्रिकोणाशी संबंधित सिद्धांताची सोडवणूक त्यांनी केली होती.  

भास्कराचार्यांचे जन्मस्थान हे कर्नाटकमधील बिजापूर जिल्ह्यात होते. परंतु त्यांनी बराच काळ उज्जैन येथे व्यतीत केला. उज्जैनच्या प्रसिद्ध खगोलशास्त्रीय निरीक्षण केन्द्राचे ते प्रमुख होते. ब्रह्मगुप्त आणि वराहमिहिर या दिग्गज गणिती आणि खगोल संशोधकांचा वारसा त्यांनी पुढे चालविला.

न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षण आणि गतीच्या नियमांबरोबरच कॅल्क्युलस ही गणितातील पद्धती विकसित केली. परंतु भारतीय शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी या क्षेत्रात केलेले कार्य हे पाचशे वर्षे अगोदर होते ही गोष्ट ध्यानात घेतली तर भास्कराचार्यांचे मोठेपण ध्यानात येते.

ग्रहगोलांविषयी त्यांनी केलेले कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. पृथ्वीचा सूर्याभोवतीच्या भ्रणाचा काळ त्यांनी अचूकपणे मोजला. सूर्य आणि चंद्र ग्रहणांविषयी त्यांनी अचूक अनुमाने केली. चंद्रकोरीविषयी त्यांनी संशोधन केले. गोल (स्फिअर) याविषयी त्यांनी सखोल अभ्यास केला. गोलाचे गुणधर्म त्यांनी शोधलेच, त्याचबरोबर त्याचे उपयोजन ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी केले. खगोलशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त अशी उपकरणे त्यांनी बनविली तसेच ऋतुचक्रांचाही अभ्यास केला.

कोणतेही कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. उर्जेचे एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होते. परंतु, उर्जा न पुरविता एखादी क्रिया अखंडपणे सुरू ठेवता येईल का? हा प्रश्न प्राचीन कालापासून मानवाच्या मनात घर करून राहिला आहे. अखंडपणे फिरणारे यंत्र बनविता येईल अशा प्रकारचा दावा भास्कराचार्यांनी अखंड फिरणाऱ्या चक्राचा पुरस्कार करून त्यांनी केलेला आढळतो.

भास्कराचार्य यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी गणितातली सूत्रे सहज आणि सोप्या भाषेत शब्दबद्ध केली. लालित्यपूर्ण भाषेत असणारी ही सूत्रे त्यांनी त्यांची मुलगी लीलावती हिच्यासाठी केली असे म्हटले जाते. गणित हा विषय कठीण अशी सर्वसामान्यपणे समजूत असते. त्यामुळे हा विषय गुंतागुंतीचा आणि सर्वसामान्य माणसाच्या बुद्धिमत्तेच्या आकलनापलीकडे मानला जातो. गणित विषय सहजपणे समजावा यासाठी त्यांनी गणितातील प्रश्नांची रचना काव्यात्मक स्वरूपात केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

Tags: गोलाध्याय गणित बीजगणित लीलावती सिद्धांत शिरोमणी भास्कराचार्य Golodaya mathematics Algebra Lilavati Siddhartha Shiromani Bhaskaracharya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके