मालवण तालुक्याच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात युवक उद्योग प्रबोधिनीतर्फे झालेल्या शिबिराचा वृत्तान्त.
‘‘संपूर्ण क्रांतीचे ध्येय केवळ निवडणुका अथवा सत्ता घेऊन साकार होणार नाही. त्यासाठी जनतेचा आणि विशेषकरून तरुण पिढीचा विधायक पुरुषार्थ जागृत करावा लागेल. जुनी व्यवस्था मोडून समतेच्या पायावर नवी व्यवस्था उभी करायची आहे. त्यासाठी मी काय करणार? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने शोधले पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करायला हवे. तरुणांनी जनता पक्ष माझ्यासाठी काय करणार, असा प्रश्न विचारण्याऐवजी जनता पक्षाला नवा समाज निर्माण करण्यासाठी मी काय देणार हे ठरवले तर त्यात व्यक्तीच्या उन्नतीबरोबरच आपल्या सामाजिक उद्दिष्टासाठी खटपट केल्याचे श्रेय लाभेल.’’ मालवण तालुका मित्रमंडळाने आयोजित केलेल्या युवकांच्या ‘उद्योग प्रबोधिनी’ शिबिराकरता हा संदेश माननीय श्री एस. एम. जोशी यांनी पाठवला होता. रत्नागिरी जिल्हा मागासलेला म्हणून जाहीर झाला आहे.
मालवण तालुका हा या जिल्ह्याचा एक विभाग. या विभागाचा मागासलेपणा, निष्क्रियता, विज्ञाननिष्ठेचा अभाव, जड़ता यांच्यामधून निर्माण झालेला आहे. हा मागासलेपणा घालवावा, लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तेथील साधनसामग्रीचा योग्य विनियोग करावा, युवकांना शास्त्रीय दृष्टिकोन देऊन त्यांना मालवण तालुका समृद्ध करण्यासाठी कार्यप्रवण करावे या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते मालवण तालुक्यामध्ये गेली 2 वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहेत. रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांचा हा मतदारसंघ. प्रा. मधु दंडवते व सौ. प्रमिला दंडवते यांचे मार्गदर्शन सातत्याने कार्यकर्त्यांना मिळत असते. मालवण तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 25 हजार आहे. त्यामध्ये 71 हजार स्त्रिया व 54 हजार पुरुष आहेत. स्त्रियांची संख्या जास्त असावयाचे कारण येथील कर्ती-सवरती पुरुष मंडळी मुंबईला कामाकरता पळतात. पुरुषांमध्ये प्रामुख्याने मुंबईच्या नोकरीतून निवृत्त होऊन आपल्या गावी स्थायिक होण्यासाठी आलेल्या 60 वर्षांवरील वृद्धांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे समाजपरिवर्तन करायचे तर तेथील मूठभर युवकांना नवीन दृष्टी देण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम करून त्यांना पुरुषार्थाला प्रवृत्त करायचे आहे. या भागामध्ये नैसर्गिक साधनसामग्री विपुल आहे. आंबा, काजू, रातांबा, फणस यांसारखी मधुर फळे येथे पिकतात. आंबा व काजू यांना परदेशांमध्ये मोठी मागणी आहे. या तालुक्याला असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीचा धंदा चालतो.
परंतु तो बव्हंशी पारंपरिक पद्धतीने. आज मालवण भागातील बहुसंख्य लोक मुंबईहून येणाऱ्या मनिऑर्डरवर कसेबसे जीवन जगत आहेत. मालवणला वर्षाकाठी सुमारे 2 कोटींच्या मनिऑर्डर्स येतात. हे सर्व बदलले पाहिजे व युवा शक्ती जागृत करून त्यांना रचनात्मक कामामध्ये गुंतवणे, उत्पादनाची नवीन तंत्रे शिकवणे, स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याची जाणीव करून देणे यासाठी उद्योग प्रबोधिनी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये कोकण विकास महामंडळाचे श्री जे. जी. रामाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग महामंडळाचे श्री मधु मंगेश कर्णिक, अपना बाजारचे श्री उपेंद्र चमणकर व श्री गजानन खातू, स्थानिक बँकांचे अधिकारी, कोकण कृषी विद्यापीठाचे श्री मगदूम, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. एस. डी. पुणेकर यांनी मार्गदर्शन केले. 28 गावांतील 40 युवक-युवती शिबिरात सहभागी झाल्या होत्या.
या शिबिरातील युवक आपापल्या गावी परतताना किमान संकल्प करून गेले आहेत. आपल्या गावात प्रत्येकाला आंबा, काजू, रातांबा यांची प्रत्येकी 5 झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करावयाचे. गावातील आंबे गोळा करून मुंबईला पाठवायचे, मत्स्यकुटीच्या छोट्या गिरण्या काढायच्या, असे संकल्प आहेत. मालवण भागातील तरुणांचे मानस उद्योगाभिमुख करण्याचा प्रयत्न या शिबिराने साध्य झाला आहे. या प्रयत्नांना अधिक गती मिळाली ती ऑल इंडिया हॅन्डिक्रॉफ्ट बोर्डाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीचंद जैन यांच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दोऱ्यामुळे. सौ. प्रमिला दंडवते, आमदार मंगला पारिख व श्री मधु पानवलकर श्री जैन यांच्या बरोबर दोऱ्यात होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हस्तोद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने श्री जैन यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या बरोबर विचारविनिमय केला.
दि. 24 डिसेंबर 1978 रोजी साने गुरुजी जयंतीच्या दिवशी मालवण येथील कलावंतांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सात दिवस असेल. मालवण तालुक्यात मूर्ती तयार करणे, नारळाच्या झाडापासून विविध वस्तू तयार करणे, भांडी तयार करणे, इ. छोटे उद्योग सुरू करण्याच्या विचार झालेला आहे. मालवण तालुका मित्रमंडळ स्वत: काही उद्योगधंदे सुरू करणार आहे. त्याचा आराखडा तयार केला जात आहे. आमची अशी अपेक्षा आहे की, येत्या 2-3 वर्षांत मालवण तालुक्याचे आर्थीक स्थित्यंतर दृष्टोत्पत्तीस येईल. तेथील युवा शक्ती रोजगारासाठी मुंबईकडे धाव न घेता तेथील उद्योगधंद्यात सामील होईल व मालवण तालुक्याच्या भरभराटीस साहाय्यभूत होईल!
Tags: मधु दंडवते व प्रमिला दंडवते विकासाचे प्रयत्न रत्नागिरी जिल्हा तरुणांचे स्पंदन Madhu Dandvate and Pramila Dandvate Development Efforts Ratnagiri District Youth Vibration weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या