डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तुमचा शोमॅन दिग्दर्शक चित्रपटात पूर आल्यावर मंदिराच्या कळसावर नायक-नायिकेचे मीलन दाखवतो. किती रोमँटिक होते ना ते? पूर आल्यावर जीव वाचवण्याच्या आकांताने मिळेल त्या फळकुटावर बसून आम्ही आसरा शोधत होतो. आमचा तीन वर्षांचा मुलगा माझ्यासमोर वाहून गेला. मी त्याला वाचवण्याची धडपड करूनही काही होऊ शकले नाही. तो पोरगा परत कधी दिसला नाही. मेला असेल असे गृहीत धरले. बायकोचा हात घट्ट धरून दोन दिवशी उपाशी त्याची वाट बघितली. सडलेल्या प्रेतांमध्ये फिरून तो कुठे दिसतो का ते बघत होतो. मिळाला नाही. भुकेने आईबाप समोर मेले.

त्याला हल्ली करमत नव्हते. न करमायचे खरे तर काहीच कारण नव्हते. पृष्ठभागावर सर्वच छान होते. खरे तर न करमण्याएवढा त्याच्याकडे वेळच नसायचा. दहा वर्षांपूर्वी सकाळी उठून कफ परेडला फिरायला जायचा, अगदी समुद्राजवळ जाता यायचे नाही तरी बऱ्यापैकी जवळून समुद्र पाहता यायचा. एरव्ही तो घराच्या खिडकीतून दिसतोच. ऑफिसमधील केबिनची खिडकी उघडली तरी दिसतो. घर कफ परेडला. ऑफिस नरिमन पॉईंटला. दोन्हीकडे वडिलांनी खिडकीतून समुद्र दिसेल, अशी जागा निवडली. ते मुंबईत कुठेही जागा घेऊ शकले असते; पण त्यांना ह्याच दोन्ही जागा आवडल्या; कारण समुद्र. तो समोर असला की मन शांत असते, म्हणायचे. तसे ते आध्यात्मिक नव्हते; पण मनाच्या शांततेबद्दल बरेच बोलायचे, तेव्हा आपल्याला ते ऐकण्याचा फारसा उत्साह नसायचा. अध्यात्म वगैरे सर्व 'हंबग'च वाटायचे. अजूनही वाटते. देवपूजा, धार्मिकता यात आपण कधी अडकलो नाही; पण कंपनीत अधूनमधून स्टाफबरोबर या संदर्भात ढोंगबाजी करावी लागते. त्याने माणसे जोडता येतात. लोकांना नास्तिक, तर्ककठोर माणसे आवडत नाहीत. धार्मिकतेने माणसे जोडता येतात. शेवटी व्यवसाय म्हणजे काय असतो? लोकांना सर्व प्रकारे बांधून घेणे असते. वडिलांनीच हे शिकवले. वडील हे मॅनेजमेंटच्या पुस्तकात शिकले नाहीत. ते जेमतेम मॅट्रीक पास होते. त्यांनी ह्या देशातील राजकारणी, नोकरशहा, स्टाफ, कामगार, सप्लायर्स सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे जोडले. त्यांच्या यशस्वी व्यवसायाचे हेच इंगित आहे, असे ते नेहमी सांगायचे. त्यांनी आपल्याला ह्यूस्टनला मॅनेजमेंट शिकण्यासाठी ठेवले. शाळेनंतरचे सर्व शिक्षण अमेरिकेतच झाले. मॅनेजमेंट पूर्ण झाल्यावर त्यांनी लगेच आपल्याला त्यांच्या व्यवसायात आणले.
 
दहा वर्षांपूर्वी आपले समुद्रावर फिरायला जाणे बंद झाले. तेव्हा आपण नुकतेच चाळिशीला पोहोचलो होतो; व फिरायला जायला सुरुवात करून एक-दोन वर्षेच झाली होती. रेग्युलर हेल्थ चेकअपमध्ये कोलेस्टेरॉल एकदम जास्त निघाले आणि फिरायला जाणे नशिबी आले. आधी कंटाळा यायचा, मग ते आवडू लागले. वेगवेगळे लोक भेटायचे. नमस्कार-चमत्कार व्हायचे. मग सुरक्षेच्या कारणास्तव फिरायला जाणे बंद झाले. देशात दहशतवादी कारवायांना जोर चढला होता. खंडणीखोरांचे शहरावर प्राबल्य वाढले होते. पैसे कमावणे पाप होत चालले होते. मग वडिलांनी एक दिवस सांगितले, एकतर सुरक्षा रक्षकांना बरोबर घेऊन जात जा अथवा घरी जिम् तयार करून घे व तेथेच व्यायाम करत जा. देशातील सर्वांत मोठ्या उद्योगपतीचा मुलगा होतो. आपल्या प्राणाची मोठी किंमत होती. मग घरी लगेच अद्ययावत जिम आले. जिम सर्व सुखसोयींनी युक्त होते. जिममध्ये व्यायाम करून खाण्यावर नियंत्रण ठेवून कोलेस्टेरॉल मर्यादित आले होते, पण हे सर्व रुटीन आता आयुष्यभरासाठी चिकटले होते. आता त्यातून सुटका होणे शक्य नव्हते. 

जिम् झाले की नाश्ता. त्यावेळी कुटुंबाबरोबर गप्पा, हा दंडक वडिलांपासून चालत आला. सर्वांनी नाश्त्याच्या वेळी एकत्र टेबलावर बसलेच पाहिजे. आधी बहीण होती. तिचे लग्न होऊन ती सासरी गेली. माहेरी कधी आली की तिच्याही कुटुंबाने एकत्र टेबलावर नाश्त्याच्या वेळी असलेच पाहिजे. मुलगा आता बारावीत आणि मुलगी दहावीला म्हटले तर दोघांचेही महत्त्वाचे वर्ष. आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणारी वर्षे. पण ह्या दोघांच्या बाबतीत तसे टर्निंग काहीच होणार नाहीय. मुलगा आय. आय. टीला जाईल नाहीतर अमेरिकेतील कुठल्या तरी विद्यापीठात. शिकून तो परत आपल्या व्यवसायातच येणार. त्याचे भवितव्य काही वेगळे असणार नाहीय, हे सांगायला कुठल्या कुडमुड्या ज्योतिष्याचीही गरज नाही. मुलगी तिच्या कलाने ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेईल व तिचेही लग्न कुठल्यातरी श्रीमंत खानदानात होईल. तिची इच्छा असेल तर ती कुठल्याही व्यवसायात मदत करू शकेल. आपल्या बायको, बहिणीप्रमाणे नाहीतर वहिनीप्रमाणे श्रीमंती समाजसेवा करेल किंवा आर्ट गॅलरी उघडेल. ह्या वर्तुळापलीकडे आणखी काय वेगळे घडणार आहे? पस्तीस वर्षापूर्वी आपल्या वडिलांना मुलांच्या करिअरची फार चिंता होती. ते शिकले नाहीत पण मुलांनी शिकले पाहिजे असे त्यांना मनापासून वाटायचे. त्यांच्या बिझिनेसची ती नुकतीच सुरुवात होती. त्यांची सगळीच धडपड चालली होती. तेव्हा त्यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय होता. आपल्याला ट्रेडर नाही तर मॅन्युफॅक्चरर बनायचे आहे हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी भरपूर भांडवलाची गरज होती. ट्रेडिंगमधून जमवलेले पैसे वेगळे काढून ठेवणे भाग होते. ज्याच्याकडे संपत्ती असते त्यालाच जग विचारते हे ते पक्के जाणून होते. एकीकडे संपत्ती निर्माण करण्याची धडपड, दुसरीकडे दोन्ही मुलांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण मिळावे ही ओढ.

"माझ्या मुलांना माझ्यासारखी धडपड करायला लागू नये असे नेहमी वाटते. व्यवसाय उभा करायचा तर एका पिढीला पूर्णपणे त्याग करावा लागतोच. त्याची फळे पुढच्या पिढीला मिळतात. मला सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीची सवय आहे. ह्याचा अर्थ पुढील पिढीने त्यातून जावेच असे बिलकुल नाही." ते आईशी या बाबतीत नेहमी बोलायचे. आई बिचारी गावंढळ. तिला इंग्लिश बोलता वाचताही यायचे नाही. नवऱ्याला साथ द्यायला ती कायम तत्पर होती. आपल्या दोन्ही मुलांसाठी तिने भरपूर खस्ता काढल्या. तेव्हा तिच्या स्वतःकडे दोन साड्या होत्या. रोज साडी धुवून दुसऱ्या दिवशी नेसण्याचे काम ती करायची. दोन्ही मुलांना मात्र तिने काही कमी पडू दिले नाही. आपल्याला अमेरिकेत शिक्षणाला पाठवताना तिने अंगावरील सर्व दागिने काढून वडिलांच्या हाती सुपूर्द केले. वडीलही थक्कच झाले. आपल्याला शरमल्यासारखे झाले.

"मी भारतातच शिकतो. अमेरिकेत शिकून वेगळे काय होणार आहे? इथे चांगले लोक शिकत नाहीत काय?" रागाने आपणही वडिलांना विचारले.

"शिकतात. पण मी ग्लोबल स्वप्न बघतो. मला माझी कंपनी फक्त भारतापुरती ठेवायची नाहीय. तिला आंतरराष्ट्रीय नकाशात स्थान द्यायचंय. शक्यता आहे की तेथे माझी दृष्टी कदाचित कमी पडेल. त्यासाठी मला माझी मुलं तयार करायची आहेत. तुम्हांला आतापासून बाहेरच्या वातावरणाची सवय हवी. तुझा धाकटा भाऊ आणखी तीन वर्षांनी अमेरिकेला येईल. ती जागा जगात सर्वांत चांगली आहे. तेथे आयुष्याकडे स्वच्छपणे, मोकळेपणाने बघता येते. इथे भारतात ‘ईझम’ चे पगडे फार असतात. आधुनिक जगात जगण्यासाठी ते अजिबात उपयोगी पडत नाहीत. आपणा भारतीयांना भूतकाळात रमायला आवडते. आमच्याकडे बुद्ध, गांधी, आंबेडकर कसे होऊन गेले हेच ते लोकांना सांगत राहतात. त्या काळात ते मोठे होते. कबूल. पण काळाप्रमाणे प्रश्न बदलतात, जगण्याच्या पद्धती बदलतात हे आपण समजून घ्यायला पाहिजे." आपल्या वडिलांची समजूत प्रचंड मोठी होती. त्यांनी आईचे दागिने स्वीकारले. ते खूपच व्यवहारी होते. भावनेने ते प्रश्न सोडवायचे नाहीत. नंतर आईला त्यांनी सोन्याने मढवले असेल! पण तेव्हा आईचे दागिने स्वीकारण्यात शरम बाळगली नाही. आपल्याला त्यांचा काहीसा रागच आला होता.

अमेरिकेमध्ये आपल्या शिक्षणाचा खर्च काही सोपा नव्हता. रुपया तेव्हाही डॉलरच्या दृष्टीने क्षुल्लकच होता. आज तो अधिकच क्षुल्लक झाला आहे. नंतर आपल्याला काही स्कॉलरशिप्स मिळाल्या. सुट्टीच्या दिवशी आपण पेट्रोलपंपावर, रेस्टॉरंटमध्ये मिळेल ती कामे केली. कुठल्याच कामाची अप्रतिष्ठा मानली नाही. नंतर धाकट्या भावाच्या शिक्षणाचीही सोय केली. आपण शिकून तयार होईपर्यंत वडिलांनी पहिली फॅक्टरी सुरू केली होती. त्या सर्व प्रगतीचे आपण साक्षीदार आहोत व भागीदारही आहोत. पण मूळ श्रेय सर्व वडिलांचेच.

कापड, रसायन, इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल्स, आयटी, टेलिकॉम सर्व क्षेत्रांत आपल्या ग्रुपच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीज् उभ्या आहेत, त्या वडिलांच्या दूरदृष्टीमुळे. आपला ग्रुप भारतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक नंबरचा तर आहेच; पण फॉर्च्युन 500 मध्ये आपल्या ग्रुपला शेवटून दहामध्ये का होईना, स्थान आहे. आता या ग्रुपला फॉर्च्युन 500 च्या अग्रगण्य कंपनीजमध्ये न्यायचे आहे. एरव्ही आपल्या आयुष्याचा "मोटो" काय आहे? आयुष्यात जगण्यासाठी काही तरी "मोटो" असावा लागतो. छोटेसे का होईना, कुठलेतरी ध्येय, काहीतरी मिळवण्याची जिद्द, कुठल्या तरी पूर्ततेचा आनंद लागतो. आपण या कंपनीसाठी काय केले? गेली. पंचवीस वर्षे या कंपनीतच आपले आयुष्य गेले. तरी ही कंपनी अजूनही वडिलांच्या नावेच ओळखली जाते. तेच खरे या कंपनीचे, उत्कर्षाचे शिल्पकार आहेत, असे सर्वजण समजतात. गेल्या बारा-तेरा वर्षांत खरेतर कंपनीचे सर्व मोठे निर्णय आपण धाकट्या भावाच्या साहाय्याने घेतले. वडील नुसते अधूनमधून कंपनीत येऊन बसायचे. त्यांना परॅलॅटिक अटॅक येऊन गेल्यानंतर काम करणे अवघडच झाले होते. त्यांचे बोलणेही समजणे अवघड जायचे. बाहेरच्या लोकांशी त्यांचा फारसा संवाद उरला नव्हता. घरच्या लोकांना मात्र त्यांचे बोलणे बरोबर समजायचे. याही परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी ते मदत करायचे. कंपनी मॅडसारखी वाढली ती गेल्या पंधरा वर्षांतच. म्हणजे आपल्याच कारकिर्दीत. पण त्याचे श्रेय जाते वडिलांना. कधीकधी त्यांच्याबद्दल सूक्ष्मसा मत्सर वाटायचा; पण उघडपणे त्याबद्दल कोणाशी बोलणे शक्यच नव्हते. त्यांना मुलांबद्दल पूर्ण आदर होता, त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान होता. कंपनी ज्या वेगाने वाढतेय ती मुलांमुळेच हे ते उघडपणे बोलायचे; पण लोकांना ते समजायचे नाही. समजलेच तर बाप मुलांबद्दल कौतुकाने चांगले बोलतोच असेही त्यांना वाटायचे. त्यांना जाऊन वर्ष झाले. ते गेल्यावर मात्र प्रचंड पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटतेय. ते आपल्या मागे उभे आहेत. या कल्पनेनेच आधार वाटायचा. आपण चुकलो तर कोणी तरी ती चूक निस्तरेल असे वाटायचे. धाकट्या भावाबरोबर आपले ट्यूनिंग एकदम चांगले असले, तरी मोठा भाऊ म्हणून निर्णयांची जबाबदारी आपल्यावरच येते. एकदा वडिलांनी दोन्ही मुलांना त्यांच्या बायकांना एकत्र बोलावले आणि सांगितले,

"महाभारत सगळीकडेच घडते. तो मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. उद्या संपत्तीवरून, सत्तेवरून आपल्याही घरात महाभारत घडू शकते. सर्वांचे पाय मातीचेच असतात हे खरे, पण त्यातून वर उठायचे असेल तर समजूत वाढवायला हवी. महत्त्वाचे काय हे समजायला हवे. महत्त्वाचा आपला ग्रूप. आपण निमित्तमात्र. मी आस्तिक-नास्तिक या वादात कधी पडलो नाही. देव असेलच तर तो माझ्या बाजूने असेल असे नेहमी मानत आलो. नाहीतर एवढे मोठे काम आपल्या हातून का व्हावे? आज आपल्या ग्रुपचे पस्तीस लाख भागधारक आहेत. लाखो लोक आपल्या ग्रुपवर अवलंबून आहेत. हे सर्व कशामुळे, हे लक्षात यायला हवे. उद्या तुम्ही दोघे वेगळे झालात, तर लोकांना आश्चर्य वाटणार नाही. एकत्र राहिलात तर मात्र वाटेल. एकत्र राहण्यात जे फायदे आहेत ते वेगळे होण्यात नाहीत, हे लक्षात ठेवा. मूळ उद्दिष्टे काय आहेत हे लक्षात ठेवा. शेवटी तो रशियन लेखक म्हणून गेला ते खरे आहे. "जगण्यासाठी शेवटी साडेतीन हात जमीन लागते." संपत्ती जमवण्यात काही गैर नाही. पण मन आध्यात्मिक राहील याची काळजी घ्या. ही गोष्ट बायकांनी विशेषतः लक्षात ठेवली पाहिजे." त्यांचे बोलणे खोलवर आत झिरपत गेले होते. धाकट्या भावाशी वादाचे कधी प्रसंग आले नाहीत असे नाही; पण संघर्ष कधी झाला नाही. हीसुद्धा वडिलांचीच कृपा. आपल्याला त्यांच्यासारखे होता का आले नाही, याची कधी कधी खंत वाटते.

सकाळचा नाश्ता झाला की ऑफिस. वाशीजवळ इन्फोकॉम सिटी झाल्यापासून नरिमन पॉईंट ऑफिसला जायचे सुख संपले. रोज नाहीतर आठवड्यातून तीन वेळा तरी तेथे जावे लागते. म्हणजे जाण्या-येण्यात चार तास जातात. तेवढ्या वेळात लॅपटॉप- मोबाईलवर ऑफिसचे काम. इन्फोकॉममध्ये जास्त लक्ष द्यावेच लागते कारण ते नवीन अपत्य होते. इन्फोकॉम सिटी वर्ल्ड क्लास आहे. तेथे सर्व तऱ्हेच्या सुखसोयी आहेत. आपली राहण्याचीही सोय आहे. पण हे घर सोडवत नाही. तेथे हेलिबेस असला तरी इथे नाही. मग कारशिवाय पर्याय नाही. अर्थात कम्युनिकेशन सुलभ झाल्यामुळे वेळ वाया जात नाही. तेवढ्या वेळात वाचनही होतेच.

आज इन्फोकॉम सिटीमध्ये पहिली मिटींग लीगल आणि मार्केटिंगच्या व्हॉईस प्रेसिडेंटबरोबर होती. मोबाईल फोनच्या रेटवरून देशभर तुंबळ युद्ध चालले होते. प्रतिस्पर्धी कंपनीने लवादाकडे रिट् अर्ज दाखल केले होते. आय टी मिनिस्टरला राजीनामा द्यावा लागला होता. त्याने आपल्याला "फेवर" केले असा प्रतिस्पर्ध्यांचा दावा होता. निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीचा आढावा घेणे भाग होते. खरे तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे रिमोट मिटींग्जही सहज सोप्या झाल्या होत्या. घरी बसून सर्वांचा चेहरा समोर ठेवून संवाद साधता येऊ शकत होता. तरीसुद्धा प्रत्यक्ष भेटीतून जो "मानवी" संवाद घडतो, त्याला पर्याय नव्हता. व्हिडिओसमोर बसल्यावर कधीकधी उगीचच अवघडल्यासारखे होते. एक प्रकारची औपचारिकता येते व मनातले सर्व बोलणे जमत नाही. इथेही वडिलांचेच वाक्य ध्यानात ठेवावे लागते. "मशीन आपल्यासाठी आहेत, आपण मशीनसाठी नाही. शेवटी हे सर्व माणसांसाठी आहे. त्यांच्या आहारी जाता कामा नये. त्याच्या पलीकडे मानवी भावना जपल्याच पाहिजेत. माणसाचे मशीन होऊन चालणार नाही.”

मिटींगला बसल्यावर त्याच्या लक्षात आले, आपले सहकारी खरोखर खूप हुशार आहेत. हे प्रतिस्पर्धी कंपनीजमधून आपण पळवून आणले. नुसता जास्त पगार देऊन नाही; तर त्यांच्या सृजनशीलतेला भरपूर वाव देण्याची पूर्ण हमी देऊन.

"वेल जंटलमेन. मला तुमचे बोलणे पूर्णपणे लक्षात आले. साम, दाम, दंड, भेद! सर्व मार्ग अवलंबून बघा. आपला विजय होणे सर्वांत महत्त्वाचे. ते कसे जमवायचे हे तुम्ही ठरवा. त्याचे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हांला आहे. सर्व रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत. काही कमी असेल तर मला सांगा. प्रतिस्पर्ध्यावर मात कशी करायची हे तुम्ही जाणताच. मी तुम्हांला वेगळे सांगण्याची गरज नाही. विश यू ऑल द बेस्ट!” मिटींग संपवताना तो बोलला. आपल्या सहकाऱ्यांवर त्याचा पूर्ण विश्वास होता. खरे तर या क्षेत्रात ते आपल्याला सिनीअर आहेत. त्यांची व्यूहरचना ठरलेलीच आहे. त्यांना फक्त आपल्याकडून ग्रीन सिग्नल हवा होता. तो दिल्यावर काम होणार याची खात्री आहेच. या देशातील व्यवसाय तरी आपल्या मनासारखा होतो आहे. भारत हीच फार मोठी बाजारपेठ आहे. पंचवीस कोटी मध्यमवर्गीय ह्या देशात राहतात. म्हणजे तीन सर्वांत मोठ्या युरोपियन देशाच्या एकत्रित लोकसंख्येएवढी संख्या आहे. आणखी काय हवे? दोघे निघून गेल्यावर तो खिडकीपाशी आला. पडदे बाजूला केले. आपल्या बायकोने- रमोलाने ही सिटी बनवण्यात किती मोठा इंटरेस्ट घेतला! स्वतः आर्किटेक्ट लोकांबरोबर बसत आली. दिवसरात्र मेहनत घेतली तेव्हा एवढी सुंदर सिटी उभी राहिली. भारतात अशी इन्फोकॉम सिटी दुसरीकडे कुठेही नाही. परत एक रितेपण भरून आल्यासारखे त्याला वाटू लागले. एक प्रचंड पोकळी आपल्या आयुष्यात निर्माण झालीय असे वाटल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. तळवे किंचित ओलसर झाले. डॉक्टरांनी हल्लीच आपल्याला चेक केले. सर्व चांगले आहे. पण मग ही बेचैनी कशासाठी? ही अस्वस्थता कशासाठी? आपल्याला नेमके काय पाहिजे आहे? जे हवे ते सर्व मिळते आहे. खरे तर आपल्याला फारसे काही करावेही लागत नाही. सृजनशील मॅनेजर्स आहेत. त्यांना कंपनी पुढे कशी न्यायची याची पूर्ण कल्पना आहे. आपल्याला त्यांना हलकीशी पाठीवर थाप देऊन दिशा दाखवावी लागते. ह्यात आपला रोल तो काय? गोंधळल्यासारखे वाटते आहे. सायकीअॅट्रीस्टला दाखवावे काय? रमोलाला काही सांगितले तर ती घाबरून जायची. धावपळ सुरू करायची. सर्वांचे टेन्शन वाढायचे. वरती पोहचताना एकेक मित्र कमी होत गेले. एकतर भारतात आपण फक्त शिकलो. बाकीचे शिक्षण झाले अमेरिकेत. तेथे मित्रमंडळी बरीच जमवली. पण ती सगळी तेथीलच होती; किंवा भारतातून तेथे आलेली मंडळी तेथेच सेटल झाली. परत इथे कोणी आलेच नाही. इथे कंपनीत वडिलांबरोबर काम करायला लागल्यावर मित्र कोणी मिळालेच नाहीत. मिळाले ते सहकारी. सहकारी हे कामापुरते असतात. त्यात आपण मालकाचा मुलगा. सर्वजण आपल्याकडे त्या दृष्टीनेच बघायचे. मोकळेपणी कोणीच बोलायचे नाहीत. जसजसे सोशल स्टेटस वाढायला लागले तसतसा विविध क्षेत्रांतील लोकांशी संपर्क येऊ लागला. पण मुळात तोही कामापुरताच. सगळे भासवतात की आपण एकमेकांच्या खूप जवळ आहोत. आपल्याला एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा आहे. मग खोटेखोटे हसायचे. प्रसंगी हलकेसे जवळ येऊन उडता किस घ्यायचा. यांच्यापैकी कोणाला आपण हा त्रास सांगू शकतो? एकालाही नाही. आपण या दुनियेत एवढे एकटे आहोत? मग पस्तीस लाख शेअर होल्डर्स, लाखो लोकांचे आपण पोशिंदे, वगैरे हे सर्व झूठ? कोणालाही आपण मनाची गोष्ट सांगू शकत नाही? मग एवढा मोठा पसारा आपण कशासाठी उभा केला? आपण कुठे उभा केला? वडिलांनी तो उभा केला आणि आपण तो सांभाळतो आहोत. वडिलांना त्यांच्या प्रवासात कोणी जिवाभावाचे भेटले की नाही? तेवढे विचारायचे एक राहून गेले. आता त्यांना विचारूही शकत नाही. ते आज असते तर त्यांचाच सल्ला घेतला असता. आपला प्रवास वडिलांपासून वडिलांकडे होतोय. यातून सुटकाच नाही. का? कोणाला कसे विचारायचे? बिझनेसबद्दल सल्ला देणारे आपल्याकडे टॉपक्लास मॅनेजर्स आहेत. आपल्या अगदी आतील गोष्टींबद्दल बोलू शकणारे कोण आहेत? आपण असे केले तर? कुठल्या जवळच्या माणसाला शोधण्यापेक्षा संपूर्णपणे अनोळखी माणसासमोर आपले मन मोकळे केले तर? कदाचित तेच चांगले असेल. ओळखीचा माणूस आपल्याबद्दल आधीच काहीतरी ठोकताळे बांधू शकतो. पण आपली प्रतिमा तर जनमानसामध्ये माहिती आहे. या देशात एक बरेय. क्रिकेटर्स व फिल्म स्टार्सना जेवढी प्रसिद्धी इथे मिळते तशी उद्योगपतींना कधीच मिळत नाही. एरव्ही त्याबद्दल आपली कायम तक्रार असते. समाज म्हणून आपण प्रगल्भ कसे नाही, उद्योगपतींना अजूनही ह्या देशात चोर कसे समजले जाते, वगैरेंबद्दल बोलत असतो पण आज त्यामुळेच आपल्याला एकप्रकारे सुरक्षित वाटतेय. त्याने पर्सनल सेक्रेटरीला आत बोलावले.

"मला जरा यलो पेजची डिरेक्टरी दे ना.”
"काय पाहिजे सर? मी बघून देते."
“नको. मलाच बघायचे आहे.” 
"सर, तुम्हांला भेटायला फिनलंडच्या उद्योगपतींचे शिष्टमंडळ आलेय. बरोबर त्यांचे राजदूतही आहेत. तुमची त्यांच्याशी अपॉईंटमेंट ठरलेली आहे.”
"ओह! कुठे भेटायचे आहे?"
"कॉन्फरन्स रूममध्ये. रूम नंबर पाचमध्ये. त्यांना सरळ तिकडे बोलावू?"
"तू मला यलो पेजेसची डिरेक्टरी आणून दे. नंतर त्यांना आपला कँपस् अर्ध्या तासात दाखव. लेट देम गेट इंप्रेस्ड. मग तोपर्यंत मी तू म्हणशील तेथे येतो."

सेक्रेटरी चक्रावून गेल्यासारखी वाटली. एरव्ही छोट्याछोट्या गोष्टींसाठीही आपण तिच्यावर अवलंबून असतो. त्या तिने नीट केल्या नाहीत की लगेच चिडतो. त्याने “यलो पेजेस”ची डिरेक्टरी हातात घेतली. तर सेक्रेटरी त्याच्याकडे रोखून बघत होती. 
"विल यू प्लीज प्रोसिड फॉर युअर वर्क? मला माझे काम करू दे.” शक्यतोवर कुठलेच भाव चेहऱ्यावर न आणण्याचा प्रयत्न करत ती निघून गेली.

कित्येक वर्षांत स्वतःचे काम स्वतः केलेले नाही. घरीदारी सगळीकडे नोकरचाकर सदैव दिमतीला असतात. इंडेक्स बघून सायकीअॅट्रीस्टचे नाव बघण्यास त्याला वेळ लागला. फारशी नावे नव्हती. यलो पेजेसमध्ये जाहिरात करणे डॉक्टरांना आवडत नसावे. हे डॉक्टर चांगले असतील कशावरून? उलट नको तो गोंधळ वाढवून ठेवायचे. पण एरव्हीही आपले फॅमिली सायकीअॅट्रीस्ट थोडे कोणी आहेत? आजपर्यंत कुटुंबातील एकही व्यक्तीला सायकीअॅट्रीस्टकडे नेण्याची वेळ कधी आली नाही. आपले त्रास सायकॉलॉजिकल आहेत कशावरून? म्हणजे आपल्याला शारीरिक त्रास तर काही नसेल? त्यापेक्षा आपल्या फिजिशीयनला दाखवून व तो जे म्हणेल ते करावे. पण आपल्याला शारीरिक त्रास काही नाहीए, हे नक्की. ही मनाची अस्वस्थता आहे व त्याच्यावर उपाय करणारे डॉक्टर नाहीत. मग एकदा हे ट्राय करून बघूच. मग त्याने फोन नंबर फिरवण्यास सुरुवात केली. 
"डॉ. आरोसकर?"
“हो. मीच."
"मी..." समोरचा डॉक्टर काहीसा हडबडला असावा. त्याने परत नाव विचारले. मग परत नाव व हुद्दा सांगितल्यावर समोरचा डॉक्टर वरमला असावा.
"सॉरी सर. मी तुम्हांला ओळखले नाही.'
"अबसोल्यूटली नो प्रॉब्लेम. तुमच्याकडे माझे काम आहे."
"माझ्याकडे?"
"हो. तुम्ही मला आज दुपारी चार वाजता माझ्या वाशीच्या ऑफिसमध्ये भेटू शकता?"
"हो. नक्कीच. पण कामाचे स्वरूप काय आहे?"
“माझे तुमच्याशी व्यक्तिगत स्वरूपाचे काम आहे. तुमचा पत्ता नीट सांगितला तर माझी गाडी तुम्हांला घ्यायला येईल." 
“नको नको. मी येईन ना.”
"नाही. मी गाडी पाठवतो. आमची इन्फोकॉम सिटी भूलभुलैया आहे. तुम्हांला माझ्यापर्यंत एरव्ही पोहोचणे तितकेसे सोपे नाही. माझी गाडी आली म्हणजे सगळे सोपे जाईल.”
मग डॉक्टरांनी पत्ता सांगितला. फोन ठेवेपर्यंत परत सेक्रेटरीचा फोन. "सर पाहुणे तुमच्यासाठी थांबलेत."
“हो आलोच. माझ्या ड्रायव्हरला आत पाठव." परत सेक्रेटरी चकित. यावेळी सर ड्रायव्हरला कधीच बोलवत नाहीत.
ड्रायव्हर आत आल्यावर त्यांनी त्याच्या हातात पत्ता ठेवला. चार वाजता माझ्याकडे त्यांना सरळ घेऊन ये. कुठे एंट्री करू नकोस. मी सेक्रेटरीला सेक्युरिटीला सांगायला सांगतो. जाताना त्याने सेक्रेटरीला सांगितले.
"माझ्याकडे मित्र येताहेत. डॉ. आरोसकर. त्यांना सरळ आत येऊ दे. सिक्युरिटीला सांग गेटपास वगैरेंची गरज नाही." सेक्रेटरी त्याच्याकडे बघतच राहिली. आपला बॉस कधी नियम तोडत नाही. स्वतः इतर स्टाफसारखाच वागतो. मग आज ह्याला काय झालेय?

मग तो हसतमुखाने कॉन्फरन्स रूममध्ये गेला. नेहमीची औपचारिकता पार पाडली. फिनलँड हा युरोपमधील छोटा देश. युरोप एकूणच समृद्ध. त्यात फिनलँडही बऱ्यापैकी समृद्ध. तेथेच “नोकिया" ही जगातील प्रचंड मोठी मोबाईल फोनची कंपनी आहे. त्या लोकांना आपल्याशी टायअप करायचेय. आपली पसंती कोरियन कंपनीजना आहे, पण हेही प्रयत्न करताहेत. यांचे बोलणे तरी ऐकून घेऊ. त्यांच्यासाठी त्यांचे मुंबईतील राजदूत आपल्या भेटीला येतात. आपल्या देशातील उद्योग पुढे नेण्यासाठी येथील नोकरशहांनी कधीच मनापासून प्रयत्न केले नाहीत. मिटींग नेहमीप्रमाणे चांगली झाली. त्यातून निष्कर्ष काही निघाले नाहीत; पण लोक चांगले वाटले. राजदूत मनापासून बोलत होता. येथील नोकरशहा फक्त स्वतःच्या खिशात किती पैसे जातील एवढे बघतात. मग उद्योगपतीही त्यांना पटवूनच जास्त पैसे कमवायचे बघतात. स्वच्छपणे इथे व्यवसाय करताच येत नाही.

आपल्या केबिनमध्ये परत आल्यावर सेक्रेटरीने विचारले, 
"सर जेवण झाले ना नीट?"
"हो. का गं?"
"नाही. नसेल झाले तर इथे मागवू का?"
"नको. पुढची अपॉइंटमेंट कोणाबरोबर आहे?"
"फायनान्स कंट्रोलरबरोबर आहे. साडेतीन वाजता."
"चार वाजता माझा मित्र येणार आहे. अर्धा तास त्यांना पुरेल?"
"सर तुम्ही त्यांना दीड तास दिलाय. त्यांना महत्त्वाच्या इश्युजबद्दल तुमच्याशी बोलायचेय असे ते म्हणत होते. मधे तुमची अपॉईंटमेंट नव्हती म्हणून त्यांना "हो" म्हणाले.
"मग त्यांना पाचनंतर विचार वेळ आहे का?"
"मी विचारते" म्हणत ती निघून गेली. मग वेळ जावा म्हणून तो समोरचा पेपर, बिझनेस मॅगझिन्स चाळू लागला. एक-दोन मॅगझिन्समध्ये त्याचे फोटो व एका ठिकाणी त्याची मुलाखतही दिसली. हे नेहमीचेच होते. मग इंटरकॉमवर फोन वाजला.
"सर ते तयार आहेत, पण तुमच्याकडे पाच वाजता प्रेसचे लोक येणार आहेत."
"ते महत्त्वाचे आहे का?" 
"विशेष नाही. रुटीन."
"मग ते कॅन्सल कर. आपल्या माणसांना भेटणे महत्त्वाचे." 
"ओके सर. "

थोडा वेळ वाट पाहण्यात गेला आणि मग डॉक्टर आरोसकर आले. पन्नाशीच्या पुढचे. चष्मा, हसतमुख, आनंदी चेहरा. छान व्यक्तिमत्त्व लाभलेला डॉक्टर होता. आपला सोनेरी काडीचा चष्मा पुसत ते म्हणाले.
"बसू?" 
"ओह! सॉरी. मी तसे बोलण्याचे विसरून गेलो. बसा ना."
"विचारांच्या तंद्रीत दिसता आहात." 
"हं... जरासे.... उगीच..."
"फारच ग्रँड सिटी तुम्ही बनवली आहे."
"नंतर तुम्हांला दाखवेनच." मग जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. थोड्या वेळाने डॉक्टरच म्हणाले,
"काय काम काढले होते?” प्रश्न विचारल्यावर तो काहीसा गंभीर झाला.

"वेल, नक्की शब्दांत सांगणे अवघड आहे. मला काय होतेय हे माझे मलाच समजत नाही. हल्ली सगळेच व्यर्थ वाटू लागते. सिनीकल व्हायला होते. कशातच अर्थ वाटत नाही. अपसेट व्हायला होते. समोर माणसे नकोशी वाटतात. कधीकधी तळव्यांना घाम येतोय असे वाटते."

“अशी अवस्था प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी न कधी येते. या अवस्थेचे स्वरूप कितपत गंभीर आहे, त्यामुळे शरीराला काही त्रास होतोय का, हे बघणे महत्त्वाचे असते. शरीराचे आजार तसेच मनाचे आजार. यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सगळे ठीक होईल. मला तुमच्यावर ट्रीटमेंट करायला आवडेल. अर्थात तुमची परवानगी असेल तर.”

"माझे कशातच मन रमत नाही. सगळे रुटीन वाटते. सगळे सहजसोपे वाटते. न होण्यासारखे काही वाटत नाही. त्याचाही त्रास होतो. वाटते, हे काय आयुष्य आपल्या वाट्याला आले? आयुष्यात कसलाच त्रास नसणे हाही त्रासच असेल नाही?"

"खरेय. एक सहज म्हणून विचारतो. कुठे बाहेर का जाऊन येत नाही? कुटुंबाबरोबर कुठेही." 
"कुठे?"
"भारत एवढा मोठा देश आहे. गोवा, मनाली, नैनीताल, मसुरी, उटी, कडॉई, कॅनॉल, पचमढी कुठेही."
"सगळीकडे जाऊन आलो. भारतातील एकही महत्त्वाचे ठिकाण बघायचे राहिले नाही."
“भारताबाहेर जाऊन या.”
"कुठे?"
"कुठेही."
"मी स्वित्झर्लंडपासून अख्खा युरोप पालथा घातलाय. आफ्रिकेच्या जंगलात फिरलोय, इजिप्तची पिरॅमिडस्, अमेरिका, अमॅझॉनचे खोरे, सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक, जपान सर्व पालथे घातलेय. यापैकी कित्येक देशांत व्यवसायानिमित्त जाऊन आलो. पाहिजे ते देश कुटुंबाबरोबर जाऊन आलो. हल्लीच वेस्ट इंडिज बेटे, मॉरिशस वगैरेही झाले. काही बघण्याचे उरलेय असे वाटत नाही." 
"एक विचारू?"
“विचारा."
"ही सगळी ठिकाणं तुम्ही कितपत खोलवर बघितलीत?"
"म्हणजे?"
"म्हणजे तुम्ही हे देश बघितलेत म्हणजे नेमके काय बघितलेत? प्रेक्षणीय स्थळे! बरोबर?".
"हो."
“बिझनेससाठी गेला असाल तर एअरपोर्टवर तुम्हांला घ्यायला गाडी आली असेल. तेथून तुम्ही थेट हॉटेलवर गेला असाल. कार एसी असेल. हॉटेल एसी असेल. मग तेथून तुम्ही बिझिनेसच्या जागी गेला असाल. तेथे यशस्वी चर्चा केल्या असतील. बिझिनेसच्या लोकांबरोबर उत्तमोत्तम रेस्टॉरंटमध्ये लंच किंवा डिनर घेतले असेल व तेथून झोपण्यासाठी परत हॉटेलवर गेला असाल.
"बरोबर आहे."
“मग यात देश बघण्याचा कुठे संबंध येतो? याला देश बघणे म्हणत नाहीत. शेवटी महत्त्वाची आहेत माणसे. त्यांनी बनवलेले जग. त्यांच्यामधील व निसर्गाचा संबंध. हे तपासण्यासाठी आयुष्य पुरेसे नाही आहे हो. आपली गल्ली, शहर एका आयुष्यात समजणे अवघड आहे तेव्हा जग समजण्याचा प्रश्न येतो कुठे? माफ करा. मी स्पष्ट बोलतोय. पण यामुळे कदाचित तुम्हांला मदत होईल. आवडले नाही तर तसे स्पष्ट सांगा. मी पाहिजे तर लगेच उठेन. आपल्यामधील चर्चा गुप्त राहील ह्याची खात्री बाळगा.”

त्याच्या डोक्यात एकदम वीज चमकून गेल्यासारखे झाले. त्याच्याशी इतपत स्पष्टपणे बोलण्याचे धाडस कोणी कधीच केलेच नव्हते. सगळेच आपल्याला रुचेल अशा पद्धतीने बोलतात. आपल्या एखाद्या मॅनेजरला कडवट गोष्ट सांगायची असेल तरी तो साखरेच्या शब्दांत घोळून सांगतो.
“मग मी काय करू असे तुमचे म्हणणे आहे?"
"जीवन अनंत आहे. त्याची लांबी-रुंदी- खोली मोजणे अवघड आहे. आपल्याला जमेल तेवढी खोल बुडी मारायची. काही समजल्याचे दावे करायचे नाहीत. शोधत राहायचे. मग कधीच कंटाळा येणार नाही. कुतूहल सर्वांत महत्त्वाचे. त्यासाठी आपली गल्ली. शहरही पुरेसे आहे. मुंबईत तुमचा जन्म गेला ना?"

"अमेरिकेमधील जवळपास दहा वर्षे सोडून सर्व आयुष्य ह्याच शहरात काढले.” 
“मग ह्या शहराबद्दल तुम्हांला काय माहिती आहे असे तुम्हाला वाटतेय?” त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला.
"नक्की सांगता येणे अवघड आहे.” 
"मग अनुभवून बघा हेच शहर, ह्या शहरात सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस देणारे लोक आहेत. जवळून बघा येथील लोकांना. तुमच्यावर कुठलाच औषधोपचार न करता कदाचित तुम्ही बरेही व्हाल. नाहीतर नेहमीचे उपचार करून बरे व्हाल. तुम्ही ठरवा.
"मला सर्व अनुभवयाचे आहे”. 
"मी व्यवस्था करतो. काहीही बघण्याची तयारी आहे?"
"हो.”
"नक्की?"
"नक्की."
"दोन दिवसांत मी तुम्हांला फोन करेन." मग चहा पिऊन विश्वासाणे डॉ. आरोसकर उठून गेले तेव्हा त्याची बेचैनी अधिकच वाढली.

दोन दिवसांनी-
"सर, मी एक सव्र्व्हिस प्रोव्हायडर शोधलाय. पाहिजे असेल तर तुमची गाठ घालून देतो."

“आरोसकर, माझे नाव जे मागे लागलेय त्याने मोठा प्रॉब्लेम होतो. त्यात मी ह्या खुर्चीत बसलो असलो की माणस त्या खुर्चीशी जास्त बोलतात आणि माझ्याशी कमी. मला तुम्ही त्याला घेऊन बाहेर भेटा."
“मलाही ते आवडेल." 
“मग वडाळ्याला नेप्रोल टॉवर्समध्ये मला भेटा. फ्लॅट नंबर ए- चारशेतीन. संध्याकाळी सात वाजता काम संपवून मी तेथे येईन."

आज त्याचे कामात लक्ष नव्हतेच. रोबोप्रमाणे तो सर्व काम संपवत होता. सर्व्हिस प्रोवायडर आपल्याला काय सांगणार आहे, ह्याचीच उत्सुकता त्याला लागली होती..

“मुंबईतीलच नव्हे तर जगातील श्रीमंतांचा खेळ आहे." सर्व्हिस प्रोवायडर बोलू लागला.
"त्यांना सगळ्यांचाच कंटाळा येतो. त्यांना त्यांच्या स्तरातील लोकांमध्ये वावरेनासे वाटू लागते. मग ते इतर स्तरांतील लोकांमध्ये विरंगुळा शोधतात. मनोरंजनाचा नवीन प्रकार. मी तुम्हांला कुठल्याही स्तरातील लोकांमध्ये काही तास, काही दिवस, एक रात्र वगैरे नेऊ शकतो. अट एकच. तुमचा हा पोषाख चालणार नाही. हा सूट वगैरे चालणार नाही. तुम्हांला वेषांतर करावे लागेल. त्यांच्यामधील एक बनावे लागेल. तुम्हांला पाहिजे तेवढा वेळ त्यांच्याबरोबर राहा, तुमच्या संरक्षणासाठी माझीही माणसं आजुबाजूला फिरत असतील. तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी. जोपर्यंत तुम्हांला थ्रील वाटेल तोपर्यंत तुम्ही त्यांच्यामध्ये राहू शकता. रेट्स त्याप्रमाणे वाढतील.
"रेट्सची चिंता करू नका." 
"मग झाले तर. तुम्ही सांगा तुम्हांला काय बघायचे ते. ह्या मुंबईत सर्व प्रकारची माणसं मिळतील. भिकारी, हिजडे, वेश्या, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार, चित्रविचित्र व्यवसाय करत स्वतःची पोट भरणारी माणसं. तुम्ही फक्त सांगा. एकच नाही, अनेक सांगितली तरी हरकत नाही. अस्सल अनुभव देण्याची जबाबदारी माझी."
"मग सुरू करूया हा खेळ. मला प्रथम पुरुष वेश्येला भेटायचेय.” 
"पुरुष वेश्या? तुम्ही?"
"नाही मी होमो नाही. मला अशा प्रकारच्या कुठल्याही अनैसर्गिक सेक्सचे आकर्षण नाही. मी या लोकांबद्दल अस्पष्टसे ऐकून आहे. खरे तर मागे भारतात होतो, तेव्हा एकाबद्दल असे बोलले जायचे. तेव्हा मी शाळेत होतो. नीट समजायचे नाही. आता समजावून घ्यावेसे वाटते आहे.”

"म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर काही करणार नाही? नुसत्या गप्पा मारणार?" 
"हो."
"गप्पा मारण्यासाठी मला एवढे पैसे देणार?”
“पैशाबद्दल बोलू नका हो. मला त्याबद्दल बोलायचा उबग आलाय. तुम्हांला पाहिजे ते पैसे मिळतील." झालेल्या विचित्र मागणीमुळे सर्व्हिस प्रोव्हायडरही काहीसा चिंतेत पडला. 
"ठीकाय. मिळेल. कुठे पाठवायचे त्याला?"
"ह्याच घरी पाठवा."
"ह्या अॅग्रीमेंटवर सही करा व मला काही अॅडव्हॅन्स लागेल."
"माझ्या वतीने सर्व सह्या व पैसे हे डॉक्टर देतील." मग सर्व करारनामे झाल्यावर सर्व्हिस प्रोवायडर निघून गेला. चिकटवलेल्या दाढी मिशा त्याने उतरवल्या. 
“त्याने मला ओळखले नसेल ना?"
"नाही, आणि घाबरू नका. हे लोक व्यावसायिक असतात. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाल्याशी मतलब असतो."

आज सकाळी त्याने ड्रायव्हरला सांगितले, “तुझी आज मला गरज नाही. मी माझी गाडी चालवणार." ड्रायव्हर एकदम चकित झाला.
"पण तुम्ही एकटे एवढ्या दूरवर गाडी ड्राईव्ह करणार? मला मॅडम रागावतील."
"तू इन्फोटेक पार्कला ये. मी सध्या बाहेर चाललोय. तेथून मी परस्पर येईन. येताना तू बरोबर असशीलच."
"पण तुम्हांला काही झाले तर? मी तुम्हांला एकटा नाही सोडू शकत.”
"मला काही होत नाही. आणि हटवादीपणा करशील तर नोकरीतून काढून टाकेन." मग ड्रायव्हर गप्पच बसला. कधी स्वतंत्रपणे काही न करण्याचा हा परिणाम होता. सगळ्या नोकरचाकरांवर अवलंबून राहण्याची आपणच त्यांना सवय लावली. एक दिवस सेक्रेटरी ऑफिसला येणार नाही कळले की ऑफिसलाच जावेसे वाटत नाही. एकट्याने सर्व काम जमेल ना, अशी शंका; काहीशी भीती वाटत राहते.

एकट्याने ड्राईव्ह करण्याची फारशी सवय उरलेली नाही. त्यात मर्सिडीजसारखी मोठी गाडी रस्त्यावरून चालवणे अवघडच जाणार. मग त्याने ड्रायव्हरला विचारून छोटी सेंट्रो चालवायला काढली. अमेरिकेत एवढी वर्षे आपणच गाडी चालवायचो. तेथे नोकर-चाकर प्रकार नव्हता.

सेंट्रो चालवताना तो विचार करू लागला, "आपल्या आयुष्यात वेगळे काही घडू पाहतेय का? आपण नेमके काय करतो आहोत? यातून साध्य काय करणार आहोत? यात आयुष्य वेगळ्याच वळणावर पोहोचणार नाही ना? इथे कंपनीत नवीन प्रोजेक्टस येताहेत. ग्लोबलला मोठी कंपनी आपल्याला बनवायचीय. त्यात हे नवीन काय झेंगट आपण सुरू केलंय? आता सुरू केलंय तर खोलवर उतरून बघूयाच."

फ्लॅटवर पोहोचल्यावर मेकअपमन व डॉक्टर हजर होते. डॉक्टरांनी त्याला सांगितले, “आजपासून हा तुमचा मेकअपमन. तुम्हांला बहुरूप्याचे सोंग आणून दाखवील. तुम्ही फक्त सांगायचे. आपल्या खूप विश्वासातील आहे.” तो हसला. त्याला ह्या सर्व गोष्टींची मजा वाटू लागली.

"मला आज उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत माणसाचाच चेहरा पाहिजे. फक्त हा नको. मला कोणी ओळखता कामा नये." 
"एका तासात सर्व होईल." मेकअपमन आत्मविश्वासाने बोलला. 
"मी निघू साहेब?" डॉक्टरांनी विचारले. 
"हो."
"काही लागेल तर मी मोबाईलवर आहेच."
"हो चालेल." डॉक्टर निघून गेले. मग मेकअपमनचे काम सुरू झाले. बरोबरच पंचावन्न मिनिटांनी मेकअपमनने त्याला आरशासमोर उभे केले. त्याला क्षणभर हसूच फुटले. मग तो स्वतःकडे नीट निरखून बघू लागला. स्वतःलाच आपण ओळखत नाही आहोत. दाढीमिशी नसलेल्या माणसाला रूबाबदार दाढी व मिशी आलीय. वय काहीसे कमी वाटतेय. केसांची ठेवण बदललीय. चष्मा नसलेल्या आपणाला सोनेरी काडीचा चष्मा आलाय; आपले व्यक्तिमत्त्व बदललेय. शाळेत असताना कधीतरी नाटकात काम केले होते. त्यानंतर प्रथमच मेकअप केलाय. 
"मला जरा अवघडल्यासारखे वाटतेय."

"पंधरा मिनिटात सवय होईल. आपण मेकअप केलाय ह्याकडे लक्षच देऊ नका. तुम्ही "तेच" आहात. पण वरतून बदललाय. आत्मा तोच आहे."
"दाढी मिशा पडणार नाहीत ना?” 
"तसे चित्रपटात होते. असे प्रत्यक्षात होत नाही. पाहिजे तर हा मेकअप कायमचा ठेवू शकता." 
"नाही. मला हा मेकअप फक्त दुपारसाठी हवाय."
"तुमचे काम झाले की तुम्ही तुमचा मेकअप उतरवू शकता. फार सोपेय. नंतर चेहरा दोन-तीन वेळा धुवून घ्या इतकेच. मदत लागली तर मला बोलवा. मी निघू?"
"हो."
"ऑल द बेस्ट."
"थँक्यू."

मग तो खिडकीत उभा राहिला. ह्या वेषात रमोला तरी आपल्याला ओळखेल का? ओळखेल बहुधा. शेवटी आपली बायको आहे. तेवढ्यात मोबाईलवर फोन वाजला. डॉक्टरांचा फोन होता.
"तो आता येतोय."
"येऊ द्या. मी तयारीत आहे." 
थोड्या वेळाने दरवाज्याची बेल वाजली. त्याने दरवाजा उघडला. बाहेर पंचविशीचा देखणा तरुण उभा होता. जीन्स, टी-शर्ट, हसतमुख चेहरा. शरीरयष्टी कमावलेली.

"प्लीज कम." त्याचा चेहरा गोंधळलेला दिसत होता. मग त्याला तरुणाचा गोंधळ लक्षात आला. त्याला एखादी बाई दरवाजा उघडेल हे अपेक्षित असेल.
"डोंट वरी, प्लीज कम. मीच तुम्हांला बोलावलेय."
"पण...."
"आत या. मग सांगतो. तुम्हांला अॅडव्हॉन्स मिळालाय ना?"
"हो. पण...."

"आत तर या." मग तरुणाने नाईलाजाने आत पाऊल ठेवले.
"शूज काढून ठेवा. बी कंफर्टेबल. माझ्याकडून तुम्हांला काहीही दगाफटका होणार नाही."
"पण कस्टमर कुठेय?”
"घाई आहे का? तुम्हांला तीन तासांचे पैसे आधीच दिलेत. कस्टमरला तुमची सर्व्हिस एकच तास पाहिजे असेल तर?"
"मग मी एकच तास आलो असतो." 
"पण मला तुम्ही तीन तास हवे आहात."
"ठीकाय. बसतो" तरुणाने शूज काढून ठेवले.
"आपले नाव?"
"खरे की खोटे? बायका त्यांना आवडते ते मला ठेवतात. तेवढ्यापुरते.
"खरे सांगा."
"सुदाम जाधव."
"बसा. काय घेणार?" 
"पाणी. थंड पाणी द्या." त्याने फ्रीजमधून थंड पाणी आणून दिले. सुदामची नजर इकडे-तिकडे भिरभिरत होती.
"घरात आणखी कोणी नाहीए. मीच आहे."
"पण मी.... मी होमो नाही." 
"कोण म्हणतो मी होमो आहे? मला तुमच्याकडून तसे काही नको."
"मग? मग बोलावले कशाला?" 
"एका माणसाने दुसऱ्या माणसाशी गप्पा मारू नये काय?" 
"काय चावटपणा आहे हा? हल्लीच्या जगात असे कोणी कोणाशी सहानुभूतीने प्रेमाने, निरर्थक, निर्हेतुक बोलते काय? तुम्ही निरुद्योगी आहात वाटतं."

"असंच समजा. तुम्ही इथे बसण्याचे, तुमची कहाणी सांगण्याचे मी तुम्हाला पैसे देतोय समजा."
"हे सगळे मला अजब वाटते. स्टोरीरायटर आहात वाटते? माझ्या कहाणीवर पिक्चर काढणार असाल म्हणजे भरपूर पैसे मिळतील."

"पैसे पैसे पैसे. पैशाशिवाय आयुष्यात दुसरे काही नसते काय?"
"काय असते दुसरे? सगळ्यांची पैशासाठी नुसती पळापळ चाललेली असते. आपले सगळे आयुष्यच सेक्स आणि पैशासाठी आहे असे मला वाटते."
"हे तुझे बोलणे सिनीकल समजायचे की तुला पटलेले वास्तव?"
"मला पटलेले वास्तव. नाही, हेच वास्तव आहे. तुम्ही काय करता?" 
"मोठ्या कंपनीत नोकरी करतो. समाधानासाठी."
“समाधानासाठी. आपण काही तरी चांगले काम करतो ह्याचे समाधान असते, आनंद असतो."
"मग मालकाने फुकट काम करून हे समाधान मिळवायला सांगितले तर कराल काय?"
"नाही. जगण्यासाठी पैसे लागतातच."
"मग हेच तर म्हणतो. तुम्ही ताकाला जाऊन भांडे लपवता व मी हे उघडपणे म्हणतो. मी बघा कसा धंदा निवडला. बेस्ट. त्यात दोन्ही मिळते."
"तू तर पुरुष वेश्या आहेस. पण स्त्री-वेश्यांना हसत असशील किंवा त्यांचा राग करत असशील किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटत असेल."
"कशासाठी? प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जगावे. जगण्यासाठी जे करावे लागते ते करावे. जगण्याचे रेटिंग करू नये."
"तू ह्या व्यवसायात कसा आलास?”
“तुझ्या घरचा बॅकग्राऊंड काय आहे?" 
"माझी मुलाखत घेऊन तुम्ही नक्की काय करणार?”
"काहीच नाही. माझ्या आयुष्याची समजूत वाढवण्याचा प्रयत्न करतोय."

"त्यासाठी मला एवढे पैसे देणार? म्हणजे शेवटचे एक तास कोणी येणार नाही तरी? मला दिवसातून एक बाई लागते."
"पाहिजे तर मागवतो."
"अरे वा! माल खूप आहे वाटतं?” 
"असे नाही. पण तुझी तीच गरज असेल तर तयार आहे."
"गरज वगैरे सर्व झूठ असते हो. सगळा सवयीचा प्रश्न असतो. माझ्याकडे चार वर्षांपासून कार आहे. त्याआधी मी सर्व ठिकाणी पायी हिंडायचो. बसचेही पैसे वाचवायचो. आता पाच मिनिटं चाललो की किती उन्हें आहेत म्हणतो." 
"खरंय."
"माझे वडील भांडुपला खिळे तयार करणाऱ्या कारखान्यात काम करायचे. एक दिवस कारखाना बंद पडला. मालकाने कारखाना मुंबईबाहेर हलवायचे ठरवले. मालकाची इच्छा झाल्यावर इतरांचे काही चालत नाही. माझ्या वडिलांसारखे त्या कारखान्यात वीस-पंचवीस वर्षे काम केलेले अनेक कामगार होते. ते कारखाना सोडून कुठे जाणार होते? त्यांची कुटुंब इथे वाढलेली. मालक म्हणाला, पाहिजे तर तामिळनाडूत या. कोण जाणार होते तिथे? मालकाला तेच हवे होते. त्याने छदाम न देता कारखाना बंद केला. कामगार कोर्टात गेले; पण कित्येक वर्षांनी निकाल त्यांच्याविरुद्ध लागला. तेव्हा आम्ही काय करायचे होते?"
"तू एकदम सुंदर दिसतोय."
"आम्ही उच्च जातीचे आहोत. माझी आई सुंदर आहे. खानदानी आहे. तिचे रूप माझ्याकडे आले. माझी बहीण वडिलांसारखी झाली. ते काळे आहेत व दिसायलाही चांगले नाहीत. निसर्ग असा खेळ का खेळतो हे समजत नाही. मी वडिलांसारखा असतो व बहीण आईसारखी तर किती बरे झाले असते नाही?" 
"का?"
"आज बहिणीसाठी आई-वडील दोघेही सारखे हिंडत असतात. पण तिचे लग्न अजूनही जमत नाही. काळ्या लोकांना ह्या जगात कोण विचारत नाही. खरे सांगायचे तर अपंग, दुर्बळ, असहाय, गरीब, परिस्थितीने गांजलेल्या कोणालाही हे जग विचारत नाही. हे जग फक्त श्रीमंत, सबलांची पूजा करते. बाकीच्यांनी जणू जगूच नये अशी ही व्यवस्था आहे. म्हणून मी ह्या व्यवस्थेत सामील झालो."
"ते कसे?" 
"मी देखणा आहे. देखणेपण हेच माझे भांडवल आहे. पुरुष वेश्या ही संकल्पना लोकांना विचित्र वाटेल, अविश्वसनीय वाटेल पण माझ्यासारखे बरेच लोक मुंबईत रग्गड पैसे कमावताहेत."

“तुमचे कस्टमर्स कोण असतात?" 
"अर्थात श्रीमंत स्त्रिया. ह्या स्त्रियांचे पुरुष दिवसरात्र बाहेर असतात. बाहेरगावी, परदेशी हिंडत असतात. त्यांना कामापुढे, पैशापुढे काही सुचत नसते. कदाचित बाहेर त्यांच्याही ठेवलेल्या बायका असतील. मग ह्या बायकांना तरुण पोरं लागतात. त्यांना रिझवायला. त्यासाठी त्या भरपूर मोबदला देतात. काम फक्त दुपारचे असते. मग ह्या बायका घरी बोलवतात. त्यांचे फ्लॅटही बरेच असतात. सहसा बाहेर बोलावत नाहीत, कारण कोणी पहायची चोरी."

"त्या तुम्हाला कॉंटॅक्ट कसे करतात?"
"ह्या देशात धंदा कुठलाही असो, दलालांचा धंदा तेजीत असतो. आमच्याकडेही दलाल आहेत. आमचे कोडवर्डस आहेत. भेटण्याची ठिकाणं ठरलेली आहेत. पत्ता-टोकन अॅडव्हॅन्स मिळाला की पोहोचायचे. काही बायका परतपरत बोलावतात. काही बायकांची आमच्यात भावनिक गुंतवणूकही होते. एक बाई म्हणाली, "माझ्याशी लग्न कर. आपण दोघे सुखात राहू." तिचा नवरा दुबईस्थित आहे व जगभर हिंडत असतो. एकेकाच्या कहाण्या आणि सवयी सांगितल्या तर चांगल्यावरचा विश्वास उडून जातो."

"सुरुवात कशी झाली?" 
“सगळ्याच वेश्या व्यवसायास बळजबरीने, मजबुरीने सुरुवात होते. माझीही तशीच झाली. माझ्या बहिणीला कॉलेजच्या बोटॅनिकल ट्रीपला जायचे होते. सगळ्यांनी जाणे सक्तीचे होते. वडील नुकतेच बेकार झाले होते. माझे शिक्षण होऊन मीही बेकारच होतो. घरून त्याबद्दल ऐकून घ्यावे लागतच होते. ह्या देशात असंख्य तरुण काम करण्यास तयार आहेत, पण त्यांना कामच मिळत नाही. मलाही मिळत नव्हते. पराभूत मनोवस्था होती. अशावेळी चाळीत राहणाऱ्या मित्राच्या मित्राकडून निरोप आला, बाईला ठोकायचेय का? म्हटले खिशात दमडी नाही आणि ह्यासाठी पैसे कुठून आणू? तर तो म्हणाला नाही रे... ठोकायचे तुलाच पैसे मिळतील. मला हसू आले. असे काही असते हेच माहिती नव्हते. मुंबईतील जुन्या गिरण्या, कारखाने बंद पडून तेथे व्यापारी, निवासी संकुले बांधण्याची सुरुवात झाली होती.

याला आपण नवीन इकॉनॉमी म्हणतो. तसाच एक कारखाना बंद पडून मुलुंडला तेथे मोठे निवासी संकुल उभे राहिले होते. आम्हांला एवढ्या टोलेजंग इमारतीचे अप्रूप वाटायचे. त्या इमारतीकडे बघायची भीतीही वाटायची. तेथे सगळी व्यापारी मंडळी राहायची. तो म्हणाला, ह्या इमारतीमध्ये जायचे आहे. तुला पाहिजे तेवढे पैसे माग. त्या बाईला कोणीतरी व्हर्जिन पाहिजे. मला एकदम शिसारी आली; पण घरचे वातावरण बघून एकदा रिस्क घ्यावीशी वाटली. त्यात स्त्रीसुखाची ओढ तर होतीच. नवीन काहीतरी करतोय असे वाटत होते. मग ठरवले बघूच. मोठा धीर धरून गेलो. बाई चाळिशीची होती. मला काही सुचतच नव्हते. कधी डिसचार्ज केले हेच समजले नाही. मग बाईने माझ्याबरोबर जे जे केले ते सांगणे मला सभ्यपणाचे लक्षण वाटत नाही. बाईने बरेच पैसे दिले. घरी सांगितले, पार्टनरच्या साथीने नवीन व्यवसाय सुरू केलाय. ट्रॅव्हल एजन्सीचा. त्याचे पैसे मिळाले. बहिणीला ट्रीपची फी तर दिलीच पण वरतीही पैसे दिले. ती खूष झाली. जग फक्त पैसे बघते. त्याचे स्रोत बघत नाही. नाहीतर एवढा भ्रष्टाचार वाढलाच नसता. मी नाखुशीने ह्या व्यवसायात सामील झालो. सुरुवातीला टोचणी असायची मग तीही निघून गेली. जग बघितले, माणसे उघड्या डोळ्यांनी बघितली. मग स्वतःचे तत्त्वज्ञान बनवले. कधीकधी आपलाही जीव एखाद्या बाईत अडकायला होतो. पण तेवढ्यापुरताच. स्वतःला सावरतो." 
“असे किती दिवस चालणार? तारुण्य ओसरले की तुला कोण विचारणार?"
"उद्याचा विचार कोणी केलाय? आपले आयुष्य किती आहे. हे कोणाला माहिती? आजचा क्षण महत्त्वाचा. सुदैवाने सध्या डिमांड आहे, पैसे कमावतोय. त्यातून सेव्हिंगही करतोय. लग्नाचा मात्र विचार अजिबात नाही." 
"का?"
"एवढ्या बायका बघितल्यावर बायकोबरोबर रत तरी व्हायला होईल का? त्यात कोणावरच विश्वास उरलेला नाही."
"का चांगले काही नसतेच?" 
"असेल ना. मला दिसले नाही. जेव्हा दिसेल तेव्हा बघू." मग तो उठला. खिशातून पाकीट काढले व भरपूर नोटा सुदामच्या हातात ठेवल्या.
"हे कशासाठी?"
"माझ्याकडून."
"पण का?"
"तुला लागतील. "
"माझी फिकीर करू नका. मी भरपूर पैसे कमवतो. तुम्हांलाच उद्या कदाचित कमी पडतील. तुमच्याकडे ठेवा. तुमचा मतलब अजूनही लक्षात आला नाही.”
"सगळ्याच गोष्टींना मतलब नसतात हे तुझ्या लक्षात येईल तो सुदिन.”
"ठीक आहे. तुम्ही म्हणताच आहात तर ठेवून घेतो. असेच तेव्हा कोणी पैसे दिले असते तर ह्या उद्योगात पडलोच नसतो. निघू मी?"

"ठीकाय. सॉरी, इथे खायला काही ठेवलेले नाही.”
"हरकत नाही. मी खाली रेस्टॉरंटमध्ये खाईन." सुदाम निघून गेला आणि तो सुन्नपणे त्या दिशेने बघत राहिला.
त्या रात्री तो रमोलाकडे अधिक ओढीने गेला. तिलाही त्याचे आश्चर्यच वाटले. आधाशासारखा तो तुटून पडला मग थकून क्लांत होऊन पडून राहिला. रमोला त्याच्या केसांमध्ये हात फिरवत झोपून गेली.

"मला भिकार्यांमध्ये राहायचंय." तो डॉक्टरांना म्हणाला आणि डॉक्टर त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. समोर सर्व्हिस प्रोवायडर होताच.
“त्यांच्यामध्ये राहून तुम्हांला काय करायचेय?"
"काही नाही. त्यांना समजावून घ्यायचेय. त्यांना बघायचेय." तो गंभीरपणे बोलत होता.
"ते सगळे अरेंज करता येईल. तुमची सुरक्षितता हीच माझी सर्वांत मोठी काळजी आहे. तुम्हांला काही होऊन चालणार नाही." मग डोके खाजवत तोच बोलला, "ठीक आहे, माझीही चार माणसे तुमच्या आजूबाजूला राहतील. किती तास त्यांच्याबरोबर राहायचेय?"

"किमान एक रात्र.” 
"त्यांच्याबरोबर भीक मागायचीय का फक्त त्यांच्याबरोबर राहायचेय?" 
"जमलं तर दोन्ही करू.”
“भिकारी हे अस्वच्छ असतात. त्यांना विविध प्रकारचे रोग झालेले असतात. त्यांच्या संसर्गाने तुम्हांला काहीही होऊ शकते. बरे त्यांच्याबरोबर राहताना तुम्हांलाही भिकारी बनावे लागेल. नाहीतर ते तुम्हांला हाकलून देतील." 
“माझी तयारी आहे.”
“स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याची गरज आहे का?" डॉक्टरांनी परत विचारले.
“माझी ती मानसिक गरज आहे. मला पाहिजे ते बघितल्याशिवाय स्वस्थ वाटणार नाही.”
"तुम्ही फक्त स्वतःसाठी जगत नाही आहात. तुमच्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. तुम्ही शिंकलात की शेअर बाजार गडगडतो.”

“किती दिवस मी या सर्वांसाठी जगू? माझा जन्म बिझनेससाठी आहे असे माझे वडील सांगत आले. मी पटवून घेत आलो. वाटले तेच आयुष्य. तेच खरे जग. मला हळूहळू माझ्या "स्व"पलीकडची जाणीव होते. तुम्ही आता मला कृपया थांबवू नका."
"ठीक आहे. आम्ही सगळी काळजी घेऊच पण जपून रहा."
"मी कुठे उभे राहायचे?"
"गेटवेसमोर. रात्री तिथे ओळीने लोक झोपतात. कधीपासून जायचे?" 
“आजपासून" तो निर्धाराने बोलला.

गेटवे. रात्री आठची वेळ. समोरच्या ताजमध्ये आपण कित्येक वेळा बिझनेस पार्टीजसाठी येतो. या पार्टीज बऱ्याच वेळा सोपस्कार असतात. बिझनेसची गरज. त्यांत कितपत खरी माणसं दिसतात? माणसं खरी असतात तरी कधी? हा खोटेपणा हाही जगण्याचाच एक भाग आहे. सर्व्हिस प्रोवायडरने आपल्याला कारने रिगल पलीकडच्या गल्लीत सोडले. त्याने एकदा स्वतःकडे बघितले पोषाख तर हुबेहूब भिकाऱ्याचा आहे. त्याने मेकअपही तसाच केलाय. पण आपल्या शरीराच्या भाषेत भिकारी दिसू का? आपण काही अव्वल दर्जाचे अभिनेते नाहीत. जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ बघू. नाही जमले तर आजूबाजूला आपली माणसं आहेतच. आपल्यासाठी कार, अॅम्ब्युलन्स सर्व काही ताजसमोर तयार आहे. केवढा हा बंदोबस्त! यात नैसर्गिकपणे काय होणार ते माहिती नाही. हातात जुनं भांडं, काखोटीला झोळी, त्यात एक जुना कपडा व चादर, भांड्यात आधीच चिल्लर पैसे टाकून ठेवलेले. समोर फक्त कोणी ओळखायला नको. कधीकधी रमोला मुलांना घेऊन ताजमध्ये डिनरला येते. ती समोर यायला नको.

"नवीन आहेस काय?" भांडं घेऊन ताजकडे बघत उभे असताना बाजूला एक भिकारी येऊन उभा राहिला.
“ह्या भागात नवीन आहे.”
"इथे स्थानिक दादाला रोज रात्री मिळकतीचा ठराविक हिस्सा यावा लागतो.” भिकाऱ्याने मराठी, हिंदी, स्वतःची लोकभाषा मिश्रित वेगळ्याच भाषेत बोलायला सुरुवात केली. त्याला त्या भाषेचे पटकन आकलन झाले नाही. 
"म्हणजे भिकाऱ्यांच्या मिळकतीतसुद्धा खंडणी?" त्याने आश्चर्याने विचारले.
“काय राव? हा येथील जुना रिवाज आहे. मी इथे वीस वर्षांपासून हाच व्यवसाय करतोय.”
"हा कसला व्यवसाय? ही तर मजबुरी. आपल्याकडे पैसे असते, कोणी आपल्याला काम दिले असते; तर इथे उभे राहिलो असतो का?"
"म्हणजे लोक फक्त मजबुरी म्हणूनच भीक मागतात? ही तुमची प्रचंड गैरसमजूत आहे. नाही म्हणजे बहुतांश भिकारी तसे असतीलही; पण शेवटी भीक म्हणजे काय हो? हे वरच्या स्तरातील लोक बँकांना जाऊन कर्ज मागतात ते नेमके काय असते? कर्ज मागणे ही भीक नव्हे का?"

"बँका त्यासाठी व्याज लावतात. तो त्यांचा व्यवसायच आहे. ते पैसे देतात कोणावर उपकार म्हणून नाही. भीक म्हणून नाहीच नाही. पैसे फिरते राहण्यासाठी हे आवश्यकच आहे."

“मग आम्ही थोडेच पैसे आमच्याकडे ठेवतो? आम्हीही रोज गाडीवर उसळपाव, वडापाव खातो, तेव्हा त्याचे पोट भरते. समोरच्या मुत्रीलाबी पैसे द्यावे लागतात. इथे झोपण्यासाठी दादा पैसे घेतो; तसेच हवालदारही घेतो. कधीकधी म्युनिसिपालिटीवाले ही त्रास देतात. ह्या सगळ्यांची पोटे आमच्यामुळेच भरतात. तुमचे पैसे फिरत राहण्याचे तंत्र इथेही आहे." तो चकित झाला.
"भिकारी असून एवढा विचार करण्याची अक्कल कशी? नाही म्हणजे स्पष्टच विचारतो याबद्दल माफ करा.”
"हीही तुमची गैरसमजूतच आहे. भिकाऱ्यांना कमी अक्कल असते हे तुम्हांला कोणी सांगितले? अक्कल कमी असल्यामुळे लोक भिकारी होतात असे थोडेच आहे? प्रश्न जगण्याच्या समजुतीचा असतो. ती समजूत कोणाहीकडे असू शकते. तुम्ही या देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा असतात तर? तुम्ही त्या घरात जन्म घेतला. ह्याला नेमके काय म्हणायचे? गेल्या जन्मीचे पुण्य? मग फारच कमी पुण्यवान असतील, नाही? याचा अर्थ देव तुमच्यावर मेहेरबान आहे असे समजायचे? मग तो देव खूपच दुष्ट असला पाहिजे. आमच्यावर तो कधीच मेहेरबान नाही. प्रश्न परिस्थितीचा, मिळालेल्या संधीचा व मिळालेल्या संधीचा फायदा उचलू शकणाऱ्या बुद्धीचा असतो. जन्मतः मिळालेल्या बुद्धीमध्ये फार कमी-जास्त फरक नसतो हो. पण राव तुम्ही भिकारी दिसत नाही." तो मनातल्या मनात वरमला. काहीसा खजिलही झाला. 
"हो. खरे म्हणजे मी तुम्हा लोकांना अनुभवायला आलोय. मला तुमच्यामध्ये राहू द्या. मी तुम्हांला त्रास देणार नाही." 
"त्या अनुभवाची किंमत द्यावी लागेल. भिकाऱ्याची शरीराची भाषा असते हो. तो बिचारा गांजून गेलेला असतो. तुमची तशी वाटत नव्हती."

"तुम्ही हळूहळू शिकवा." 
“मग आजचे दादाचे पैसे तुम्हीच देऊन टाका. एक दिवस आपण बैदाकरी खावे म्हणतो. रोज उसळपाव खाऊन कंटाळा आलाय." 
"चालेल. तुम्ही कुठून आलात?"
"आंध्रामधून. विशाखापट्टणजवळ आमचे गाव आहे. ओरिसाला लागून आहे. आमच्या भागात नेहमी चक्रीवादळ आणि पूर येतो. दरवर्षी हजारो लोक बेघर होतात, करोडो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होते. मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान सर्वजण परिस्थिती बिघडल्यावर हेलिकॉप्टरमधून पाहणी करतात, खाली उतरायची हिंमत करत नाहीत. फोटोग्राफर फोटो काढून मिडिआमध्ये छापतात. त्यांना अशा फोटोचे बक्षीसही मिळते. टीव्हीवर हृदयद्रावक दृश्ये दिसतात. बघणारे हळहळतात. त्यांपैकी काहीजण मदतही करतात. मुंबईत चित्रपटतारे ट्रकमध्ये उभे राहून रस्त्यावरून फेरी मारतात व लोक त्यांना बघण्यासाठी जमतात व पैसे देतात. यापैकी बहुतेक चित्रपट तारे स्वतःच्या खिशातून एकही पैसा देत नाहीत. ते म्हणतात एक दिवस दिला ना. आपली प्रसिद्ध गायिका कशी तिच्या वडिलांच्या नावे हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रोग्राम करून लोकांकडून पैसे जमा करते! क्रिकेट मॅच आयोजित करून प्रेक्षकांकडून, प्रायोजकांकडून पैसे जमा करते! हॉस्पिटलसाठी ती स्वतःची जीवनशैली अजिबात बदलत नाही अथवा स्वतःच्या जीवाला कधीच खार लावून घेत नाही. दुसऱ्यांच्या खिशातून पैसे काढणाऱ्यांचा हा जमाना आहे आणि आम्ही भीक मागतो याचा तुम्हांला लगेच त्रास होतो. भिकारी वाढले म्हणजे त्यांना एकदा पकडून जायकवाडी धरणावर कामाला पाठवले तर ते तेथून पळून आले व परत मुंबईच्या रस्त्यावर भीक मागू लागले."

"ही चांगली गोष्ट थोडीच आहे?" 
"तुम्ही व्यवसाय करता. नोकरी करता. त्याचे तुम्हांला पैसे मिळतात. आम्ही उन्हातान्हात उभे राहतो. मुलाला मादक द्रव्य पाजून आया ते मेल्याचे नाटक करत रस्त्यावर रडतात. यासाठी काहीच कष्ट, कौशल्य लागत नाही काय? हा आमचा व्यवसाय आहे. आम्ही अशा रीतीने पैसे कमावतो. तुम्ही व्हाईट कॉलर लोक काय ते फक्त बुद्धी वापरता. म्हणून तुम्ही श्रेष्ठ. आमचे काम हीनदीन. आम्हांला कसलीच प्रतिष्ठा नाही. मग आम्ही काय शिकण्यास नाही म्हणालो होतो? आम्हांला काय तुमच्यासारखे एअरकंडिशन घरात राहायला आवडले नसते? आम्हीही तुम्ही करता तसे कष्ट करण्यास तयार होतो. दर सालाला चक्रीवादळात घर कसे उडून जाते हे तुम्हांला माहिती आहे? भीतीने थरथरत एका कोपऱ्यात म्हाताऱ्या आई-वडिलांना बिलगून बसलो होतो. ते आठवले की अजूनही अंगावर शहारे उठतात. मरणाच्या इतके जवळ तुम्ही कधी गेला आहात? आपण हतबल, असहाय, येणाऱ्या परिस्थितीला शरण जाणे व त्याही परिस्थितीत जगणे एवढेच हातात. तुमचा शोमॅन दिग्दर्शक चित्रपटात पूर आल्यावर मंदिराच्या कळसावर नायक-नायिकेचे मीलन दाखवतो. किती रोमँटिक होते ना ते? पूर आल्यावर जीव वाचवण्याच्या आकांताने मिळेल त्या फळकुटावर बसून आम्ही आसरा शोधत होतो. आमचा तीन वर्षांचा मुलगा माझ्यासमोर वाहून गेला. मी त्याला वाचवण्याची धडपड करूनही काही होऊ शकले नाही

. तो पोरगा परत कधी दिसला नाही. मेला असेल असे गृहीत धरले. बायकोचा हात घट्ट धरून दोन दिवशी उपाशी त्याची वाट बघितली. सडलेल्या प्रेतांमध्ये फिरून तो कुठे दिसतो का ते बघत होतो. मिळाला नाही. भुकेने आईबाप समोर मेले. हेलिकॉप्टरमधून पॅकेटस् फेकायचे, अन्नाचे. ते फेकले की आम्ही लांडग्यासारखे त्याच्यावर तुटून पडायचो. माणसांमध्ये प्रचंड मारामारी व्हायची. कुत्रे एकमेकांशी जेवढे भांडत नसतील तेवढे आम्ही एकमेकांचे लचके तोडायचो. पॅकेटस् नेहमीच अपुरे असायचे. साली खाणारी तोंडं केवढी आणि अन्न केवढे. एक घास तोंडात गेला, तर परमसुख वाटायचे. आधी ते आईवडिलांना द्यावे लागायचे. वाटायचे, त्यांनी मरून जावे म्हणजे आपल्याला काहीतरी खायला मिळेल. पण खरे सांगतो. जेव्हा अन्न मिळाले, तेव्हा त्यांना आधी खायला दिले. हे फक्त विचार! पण ते खरोखर मेले. वडील मांडीवर डोके ठेवून मेले. त्यांना काहीतरी बोलायचे होते. मरताना त्यांचे तोंड उघडे होते. त्यांच्या तोंडात टाकायला जवळ स्वच्छ पाणी नव्हते. दुर्गंधीयुक्त चिखलाचे पाणी होते. तुम्ही लोक मिनरल वॉटरशिवाय दुसरे पाणी तोंडात टाकत नाही. तुमच्याकडे कुत्रा आहे?" 
"आहे."
"ह्या देशातील पाळलेल्या तमाम कुत्र्या-मांजरांचे आयुष्य आमच्यापेक्षा चांगले आहे. ह्यांच्या एकदशांश बरे आयुष्य आमच्या वाट्याला आले असते तरी खूप सुखी असतो."
"मग काय केले?"
"वादळ शमले. पूर ओसरला. मग मंत्री, पुढारी येऊन भाषण ठोकून गेले. घर उरले नव्हते, काम नव्हते. जगायचे कसे हे माहिती नव्हते. बायकोला घेऊन कुठल्या तरी रेल्वे स्टेशनला फिरत आलो. दिसेल त्या गाडीत बसून इथे येऊन पोहोचलो. इथे यायचे काही ठरवले नव्हते. मध्ये तिकीट नसल्यामुळे दोनदा कोठडीत राहून आलो. कोठडीत राहिल्यामुळे खायला तरी मिळाले. गाडीत बसून टीसीने आपल्याला पकडावे असेच वाटत होते. पण नंतरच्या टीसीलाही कळले की ह्यांना पकडून फायदा नाही. ह्यांच्या खिशात दमडीही नाही. खायला काळ आणि भुईला भार. त्याने नंतर तसेच सोडून दिले. मुंबईला येणे नशिबात असावे. पण ह्या शहराने सांभाळून घेतले बाबा. इथे आल्यापासून अन्नाची कमी कधी पडली नाही. जगायचे कशासाठी? दोन वेळेला पोटात ढकलण्यासाठी, ते इथे मिळते."
"आपण बैदाकरी खायची?"
"चला. आधी बायकोला बोलावून आणतो."
"ती कुठे आहे?"
"पुढच्या नाक्याला उभी असेल. तिलाही मजा येईल." तो त्याला न झेपेलशा चालीने भराभर पुढे गेला व बायकोला घेऊन आला.

"राव, झोपणार कुठे?" 
"तुमच्याबरोबर."
“आम्ही ह्या शिवाजीच्या पुतळ्याखाली गवतावर झोपतो. तुम्ही झोपाल?"
"हो." 
"भीती नाही वाटणार?" 
"कसली भीती?"
“आपल्याला कोणी लुटले, कोणी मारले ह्याची भीती?"
"छे. मी सर्व मागे सोडून आलोय. तुमच्याबरोबर राहण्यासाठी. तुम्हांला समजावून घेण्यासाठी."

“हे बेस झालं. असेच कोणीतरी नेहमी येत जावे. मग नेहमी बैदाकरी नाहीतर कोंबडीवडे मिळत जातील." मग तिघेही हसले. खाताना तो दोघांकडे निरखून बघत होता. दोघांच्याही चेहऱ्यावर असीम आनंद दिसत होता. हा आनंद काय असतो? तो कुठून येतो? लोकांचे आनंद किती छोट्या गोष्टीत सामावलेले असतात...! आणि आपले?" 
"रात्री खूप उशिरापर्यंत हा परिसर जागा असतो. त्यामुळे धंदाही बरा होतो. हल्ली लाँच पार्टीचे खूळ फार वाढलेय. पावसाळा सोडता आठही महिने इथे धनिकांच्या लाँच चालूच असतात. ते उशिराने समुद्रावरून परत येतात. समोरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधूनही रात्री उशिरापर्यंत पार्टी साजरी करून लोक बाहेर येतात. मग त्यांपैकी काही गेटवेला फिरतात. इथे शरीराला मालिश करून घेणारे खूप भेटतील. करून घ्यायचेय?"
"मी सुद्धा भिकारी आहे. ते मला कसे परवडेल?"
"हो. ते मी विसरलोच."

"रात्रीचा वेश्याव्यवसाय इथे तेजीत असतो. एरवीही दिवसा इथे तो तेजीतच असतो. पण रात्री त्याला बहार येते. त्यासाठीच वेगवेगळे लॉजेस आहेत. शरीराचा व्यापार हा येथील सर्वांत तेजीमधील धंदा आहे. गरिबी, बेकारी, दारिद्र्य वाढले की तो अजून तेजीत येतो. ह्याबद्दल कुठल्याच बिझनेस मॅगझीनमध्ये छापून येत नाही. ह्या बिझनेसचा एकच एक असा उद्योगपती नाही. तो अनादि काळापासून चालत आलाय. ह्या धंद्याचा टर्नओव्हर किती, त्यात फायदा किती, त्यात किती लोक गुंतलेले आहेत ह्याचा कोणालाच अंदाज नाही. याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध होत नाही पण तरी तुम्हाला गेल्या वीस वर्षांच्या अनुभवावरून सांगतो हा सर्वांत तेजीचा धंदा आहे. तुम्हांला त्याची झलक बघायचीय?"
"बघूया पण अनुभवायची नाही." 
"हरकत नाही, पण गाईड म्हणून फी मिळेल ना?"
"त्याची काळजी करू नकोस. "
"ह्या पुतळ्याखाली आयुष्य काढले. एक रात्र समोरच्या हॉटेलमध्ये बायकोबरोबर झोपायचेय. त्याला दहा हजार रुपये लागतात म्हणे."
"मी तुझी इच्छा पूर्ण करेन."
"खरेच?" 
"हो. पण सगळे गुप्त ठेवायचे."
"मंजूर. चला आज रात्री तुम्हांला आजपर्यंत कधी न बघितलेली माणसं दाखवितो."
"दाखवा."
"तुम्ही आत गार्डनमध्ये बसा."
"ते बंद आहे. "
"बंद लोकांसाठी. आपल्यासाठी नाही. गेटवर उडी मारून आत जायचे. इथे रात्रीच्या पोलिसांचे हप्ते ठरलेले आहेत. चिंता करू नका."

मग तो उडी मारून आत जाऊन बसला. थोड्या वेळाने चार-पाच जण आत आले. तोच चौघांना घेऊन आला होता. त्यांपैकी दोन बारा-तेरा वर्षांची मुलं होती.
"ह्यांना कशाला आणलेस?" 
"ते त्यांची कहाणी सांगतील, पण त्यांनाही नंतर खूष ठेवावे लागेल."
"करू." 
मग काही वेळ कोणीच बोलले नाही. 
"सांगा ना."

"ही काय चित्रपटाची गोष्ट थोडीच आहे? मी पटकथा लेखक नाही आणि तुम्ही दिग्दर्शक नाही." 
"मान्य."
"मग तुम्ही ऐकून काय करणार? सहानुभूती दाखवणार? ती गेली चार- पाच वर्षे आमच्या वाट्याला येतेय. त्याच्यापलीकडे आमच्या आयुष्यात काय फरक पडला?"
"मी खोटी आश्वासनं देणारा मंत्री नाही, पण शक्यतोवर सगळी मदत करेन."
"काय कराल नक्की? या नरकातून आम्हांला बाहेर काढाल?"
"मी ते आता नक्की कसे सांगू? मी प्रयत्न नक्की करेन."
"प्रयत्न करणार म्हणजे नेमके काय करणार? साले आमचे खानदान भिकारी. माझा बाप भिकारी होता. मी भिकारी आणि पोरंही भिकारी. माझा बाप भिकारी का होता, हे मला माहिती नाही. मी भिकार्याशिवाय आणखी काय होऊ शकलो असतो, हे मला माहिती नाही. माझा बाप समोरच्या फूटपाथवर मेला. तेव्हा हे नवीन हॉटेल नव्हते, फक्त जुने होते. त्याची डेडबॉडी म्युनिसिपालिटीने उचलून नेली. आम्ही दोन दिवस त्याच्या डेडबॉडीजवळ बसून होतो. मी भिकाऱ्याशिवाय दुसरे काय होऊ शकत होतो? एक इयत्ता शिकलो नाही. बापाने भीक मागायला शिकवले. मी सुद्धा माझ्या मुलांना तेच शिकवले. आणखी काय शिकवणार होतो? तुम्ही म्हणाल, स्वतःचे नशीब स्वतः घडवायचे. म्हणजे नेमके काय करायचे होते मी? मला माझे नशीब नेमके कुठून साथ देणार होते? यातून बरा काही मार्गच दिसत नाही. माझ्या मुलांना वेगळा मार्ग मिळाल्यासारखे वाटू लागले होते. ते गोरे लोक इथे रोज सकाळी यायचे. माझ्या दोन्ही मुलांना घेऊन जायचे. त्यांना खाऊपिऊ घालायचे. ते नेमके काय करायचे, हे तेव्हा त्यांनीही सांगितले नाही. या गोऱ्या माणसांबरोबर एक दिवस सकाळी ते गेले आणि परत आले ते पोलिसांबरोबर. आम्ही एकदम घाबरून गेलो. म्हटले, पोरांनी गोर्या लोकांचा काहीतरी गुन्हा केलेला दिसतोय; किंवा त्यांच्याकडे कसलीतरी चोरी केलेली दिसतेय. आमचा स्वतःच्या पोरांवर विश्वास नव्हता, तेवढा त्या गोऱ्यांवर विश्वास होता. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा परिणाम! समजेना आता काय करावे. तेवढ्यात पोलिसांनी सांगितले, ह्या दोन मुलांनी काहीच केले नाहीय. केलेय ते गोर्यांनी. ते रोज ह्या दोघांना घेऊन जायचे. ते एका फाईव्ह स्टारमध्ये उतरले होते. ह्या समोरच्या नाही. पोलिस म्हणाले, तुम्हांला पोलिस स्टेशनवर यावे लागेल. ह्या गोऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी. आम्ही घाबरून गेलो. पोलिसांची एरव्हीही भीतीच वाटते. आपण काही गुन्हा केला नसेल, तरी पोलिस आपल्याला पकडून आत टाकतील, असे डोक्यात कुठेतरी बसले आहे. यावेळी पोलिस आमच्याशी चक्क बऱ्या भाषेत बोलत होते. आम्हांला त्याचीही भीती वाटली. यामध्ये काहीतरी कावा आहे वाटले. पोलिस स्टेशनला नको जायला असेच वाटू लागले. न जाणो तेथे काहीतरी दगाफटका व्हायचा. तेवढ्यात मुलगाच बोलला.

"जाऊया पोलिस स्टेशनमध्ये. हे दोघे आमच्याकडून काय काय करवून घ्यायचे. करवून घेतल्यावर चॉकलेट द्यायचे आणि इथे परत आणून सोडायचे. आम्ही चॉकलेट कारमध्ये खाऊन टाकायचो. इथे आल्यावर ते सुखाने खायला तर मिळाले नसते."
"पण त्यांनी तुम्हांला काय केले?" आम्ही त्यांना घाबरून विचारले.
“हॉटेलमध्ये न्यायचे. खाऊपिऊ घालायचे. मग अंगावरील एकेक कपडे काढायचे. सुरुवातीला लाज वाटली. पण ते आमच्याशी एकदम गोड बोलायचे. ते काय बोलायचे हे समजायचे नाही, पण त्यांच्या खुणांवरून, स्पर्शावरून समजायचे. मग त्यांच्यापैकी एकजण कॅमेऱ्याने आम्ही जे करतो त्याचे शूटींग करायचा, फोटो काढायचा. आम्हांला त्याचे नेमके काय वाटले हे सांगणे अवघड आहे, पण ते वाईट असावे. मग काय काय करावे हे ते समजावून सांगायचे. प्रसंगी स्वतःच त्यात भाग घ्यायचे."
ते ऐकून आम्ही शहारलो. दोघा मुलांना एकदम जवळ घेतले.
“हे सर्व तुम्ही कशासाठी सहन केले? आम्हांला का नाही आधीच सांगितले?" 
“आमचे चुकले. भीती, कुतूहल, मिळणाऱ्या गोष्टींचा हव्यास सगळ्यांतून ते घडले असावे."

“तुम्ही घाबरू नका. हे दोघे आता सुटणार नाहीत. आमच्याकडे सज्जड पुरावे आहेत. तुम्ही फक्त तक्रार नोंदवा. कोर्टात साक्ष द्या. ह्यांचा आम्हांला कधीचा संशय होता. त्यांच्यावर आम्ही पाळत ठेवून होतो." पोलिस अधिकारी प्रेमाने बोलला. मग धीर धरून आम्ही सर्वजण पोलिस स्टेशनवर गेलो. त्यांनीच काहीतरी लिहून काढले. आमच्या सर्वांच्या बोटांचे ठसे उमटवून घेतले. ते करतानाही भीती वाटत होती न जाणो हे गोरे लोक ह्यांना पैसे देऊन सुटायचे आणि नंतर आमचे काहीतरी वाईट करायचे; पण पोलिसांनी त्यांना चक्क कोठडीत टाकले. असेही काही होऊ शकते, ह्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही पोलिसांत तक्रार करून आलो. पोलीस अधिकारी म्हणाला, "तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी उभा आहे पण नंतर तक्रार मागे घेऊ नका. ह्यांना शिक्षा देऊच." पोरं घाबरून गेली होती. त्यांच्या हातून भयंकर काहीतरी घडून गेलेय हे त्यांना कळून चुकले होते. आम्हांला उपाशी राहणे नवीन नाही, तो आमच्या जगण्याचाच एक भाग आहे. पण या प्रसंगानंतर पोरं दिवसभर जेवलीच नाहीत. त्यांच्यासाठी. आम्ही पावभाजी घेतो म्हणालो. एरव्ही त्यांना ती फार आवडते पण यावेळी ती नकोच म्हणाली.

दुसऱ्या दिवशी वेगळाच प्रकार घडला. सकाळी सकाळी काही माणसं आम्हांला शोधत आली. ती कुठल्यातरी टीव्ही चॅनेलची माणसं होती. ह्या लोकांना "बातमी"चा सुगावा लागला होता. त्यांच्यासाठी ही सनसनाटी बातमी होती. त्या बातमीमध्ये "सेक्स" होते. मग तर आणखीनच बहार! बातमीदार आमच्यावर टोळधाडीसारखे तुटून पडले. आम्हांला काही समजेचना. मग त्यांनी आमच्या मुलांना शोधून काढले. लाईटस्, कॅमेरे ऑन केले.

"त्यांनी नक्की तुम्हांला कसा त्रास दिला?" बातमीदाराने विचारले. पोरं स्तंभित. ते कुतूहलाने कॅमेर्याकडे बघत होते. त्यांची काही बोलण्याची हिंमतच नव्हती. मग चॅनेलवाल्यांनी त्यांना आमिषं दाखवली. पैशांचे खाण्याचे, कपड्यांचे. आम्ही त्यांना सांगितले, "जे काही बोलायचं होतं ते पोलिसांना सांगून झालंय. आम्हांला वेगळं काही सांगायचं नाही." आमचे भिकारी मित्र वैतागले. त्यांनी आम्हांला बाजूला घेतले आणि म्हटले, "त्यांच्याकडून मिळते ती मदत घ्या. फुकटच मिळतेय. कशासाठी सोडायची? तुम्हांला नको असेल तर घेऊन आम्हांला द्या. तेवढेच दोन दिवस मजेत जातील." आमच्या अंगात कुठल्या हत्तीचे बळ संचारले होते कोणास ठाऊक.

"आम्हांला तुमचे काही नको. जे काही सांगायच ते आम्ही कोर्टातही सांगू. आम्ही आता मागे हटणार नाही.” हे बोलताना आम्हांला भूक लागली होती, कारण आदल्या रात्री भीक मागणे जमले नव्हते. एक दिवस भीक मागितली नाही की उपाशी राहायची पाळी. आमचे पोट अजूनही भिकेवर अवलंबून आहे. आजारी पडलो तर हॉस्पिटलमध्येही आम्हांला कोणी घेत नाही. आमचा अवतार बघतात आणि हाकलून देतात. ही सरकारी इस्पितळांची कथा. खाजगीमध्ये तर आम्ही जायचा प्रश्नच येत नाही. आम्ही ह्या रस्त्यावरच्या कुत्र्यांसारखे जगतो. आजारी पडलो की नैसर्गिक शक्तीनुसार आजाराशी लढायचे. हरलो तर मरायचे. इतर प्रतिबंधक उपचार आमच्यासाठी नाहीत. "सर्वांना आरोग्य" हे एक स्वप्न आहे. पत्रकार मोठे चिकट असतात. ते मुलांना नाहीतर आम्हांला, इतर भिकार्यांना काहीतरी प्रश्न विचारत राहिले. आम्ही कसे जगतो यावर एकाने लघु फिल्म करायचे ठरवले. आमचे जगणे लोकांसमोर न्यायचाच त्यांचा निग्रह होता. त्याने आमच्या जगण्यात काही फरक पडणार नव्हता. मग एका चॅनेलचे लोक आले म्हटल्यावर इतरही चॅनेल मागे राहणे शक्य नव्हते. दोन-तीन दिवस आम्हांला चॅनेलवाले, वृत्तपत्रवाले शोधत होते. आमचा भाव चांगलाच वधारला होता. दुर्दैवाने त्याने आमचे भीक मागणे बंद होऊ शकत नव्हते. सर्वांत महत्त्वाचे चांगलेपणाने जगणे. तेच आमच्या बाबतीत आतापर्यंत होऊ शकले नाही. "का", ह्याचे उत्तर नाही. दोन-तीन दिवसांनी बातमीचे मूल्य संपले. मग आमचेही महत्त्व संपले. आम्ही व्हीआयपी भिकारी बनलो होतो ते परत नेहमीचे भिकारी बनलो.

पोलिसांनी चिकाटी सोडली नाही. त्यांनी सर्व साक्षी पुरावे जमा केले. ते गोर्यांच्या देशात जाऊनही साक्षी घेऊन आले. खटला उभा राहिला. एक दिवस त्यांच्या देशातील वकिलातीमधील माणसं शोधत आली. सोबत त्यांनी दुभाषे आणले होते.

"आमच्या देशाची या खटल्यात बदनामी होतेय" ते बोलू लागले.
"तुम्ही तक्रार मागे घ्या. आम्ही तुमचे पुनर्वसन करू. तुम्हांला घर देतो. नोकरीची व्यवस्था करतो. वर पैसेही देतो. ह्या खटल्याने तुमचेही भले होणार नाही. तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सन्मानाने जगण्याची. भीक मागत किती दिवस तुम्ही जगणार? त्यापेक्षा ह्या संधीचा फायदा घ्या. झाले गेले विसरून जा." क्षणभर आम्हांलाही त्यांचे म्हणणे पटले. पण मग वाटले, “आयुष्यात काहीतरी बरे केले ह्याची नोंद स्वतःच्या मनात होऊ देत. आपण कुठेतरी सन्मानाने जगलो ही जाणीव मनात किती सुखकारक असते, नाही?"

"आम्ही ठरवले, लढायचे. तक्रार मागे घ्यायची नाही. गोऱ्यांचा हा देश म्हणे पृथ्वीवरील स्वर्ग मानला जातो. त्या देशातील लोक मात्र तुमच्या आमच्यासारखेच सामान्य आहेत हे कळले. त्या पोलीस अधिकाऱ्याची मेहनत आम्हांला वाया जाऊ द्यायची नव्हती. इथेही सर्व माणसे वाईट असतात हे खरे नाही, हे आमच्या लक्षात आले. आम्हांला न्याय मिळवून देण्यात पोलिस अधिकाऱ्याचा कुठलाच स्वार्थ नव्हता. कोर्टात खटला  उभा राहिला. हा अधिकारी आम्हांला न्यायला यायचा व सोडायचाही. कोर्टात गेल्यावर तो आम्हांला भरपूर खाऊपिऊ घालायचा. त्यामुळे आम्हीही कोर्टाच्या तारखेची वाट बघायचो. चार वर्षे खटला चालला होता. आम्हांलाही थकायला झाले. कोर्टात वाटेल ते प्रश्न विचारून झाले. विरुद्ध बाजूने आमच्यावर नाना आरोप झाले. पैशासाठी, प्रसिद्धीसाठी आम्ही हा स्टंट केला, असे ते वकील म्हणाले. न्यायाधीशांना ते पटले नाही. त्यांनी सर्व पुरावे ग्राह्य मानले व गोऱ्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली. सत्याचा विजय झाला. पोलिस अधिकार्यालाही खूप आनंद झाला. त्याचे पेपरात खूप नाव झाले होते. आमचे नाव अजूनही कोणाला माहिती नाही. रस्त्यावरचा भिकारी हीच आमची ओळख. आम्हांला त्याचे दुःख नाही. आम्ही तसे आहोतच. आम्हांला प्रथमच आयुष्यात काहीतरी मिळवल्यासारखे वाटले. लक्षात आले की आयुष्य अशाच गोष्टीसाठी जगायचे असते. निकाल लागल्यावर अधिकार्याने भरपूर जेवण दिले व इथे आणून सोडले. त्यानंतर गेल्या वर्षभरात मात्र तो आमच्याकडे फिरकला नाही. कदाचित त्याला वेळ झाला नसेल. मानवी संबंध असेच असतात. या खटल्यामुळेच आमचीही समजूत वाढली.

भिकाऱ्याचे बोलणे ऐकून त्याला रडू येते की काय वाटले. मन भरून आले होते. छातीत धाप लागल्यासारखे वाटत होते. याच्यापुढे काय बोलावे हेच सुचत नव्हते.

"आम्हाला काम द्या म्हणून मी बरेच वर्षे आक्रोश केला. कोणी ऐकलेच नाही. त्या एकेक कहाण्या सांगत बसलो तर रात्र पुरणार नाही. मी शाळेचे शिक्षण जवळपास पूर्ण केलेय. मॅट्रीक होऊ शकलो नाही. तीनदा नापास झालो. अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्यात जगण्यासाठी पडेल ते काम करावे लागायचे. एक-दोन कंपन्यांमध्ये चपराशी म्हणून काम केले. त्यांपैकी एक बंद पडली. दुसरीने ऑफिस गुजरातमध्ये हलवले. खाण्याची भ्रांत होऊ लागली. आजूबाजूला लोक गुन्हेगारीकडे वळत होते. माझे मन धजावेना. मग रस्त्यावर येण्याशिवाय इलाज नव्हता. सुरुवातीला भीक मागायला खूप लाज वाटायची. आपला कोणी चेहरा पाहत तर नाही नाही ना वाटायचे. मान खाली घालून भीक कशी मागणार? पोटात कावळे ओरडू लागले की आपोआप मान वर जाऊन भीक मागितली जायची. आता त्याची सवय होऊन गेली. असे म्हणतात की शिवाजी महाराज रयतेची काळजी घ्यायचे. आताचे राज्यकर्ते फक्त त्यांचे नाव घेतात, ते स्वतःची तुंबडी भरण्यासाठी. रयतेशी त्यांचे काही देणे घेणे उरले नाही. ज्या दिवशी या देशातील शेवटचा भिकारी नष्ट होईल तेव्हा खर्या अर्थाने हा देश सुफलाम्, सुजलाम होईल." तिसऱ्या भिकाऱ्याने सांगितले.

"मला तुमचे सर्व लक्षात आले. प्रश्न गुंतागुंतीचे आहेत हे खरे. याची उत्तरे शोधण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते स्वतःमध्ये मश्गूल आहेत. मी तुमच्यासाठी काहीतरी नक्की करेन. लवकरच."

मग ते सर्व निघून गेले. पहिला भिकारी त्याच्या बायकोबरोबर उठला. 
"इथे झोपताय ना?" 
"हो."
"झोप येणार?"
"प्रयत्न करायचा. एवढे सगळे ऐकल्यावर झोप येईल असे वाटत नाही."
"ही तर सुरुवात आहे असे बरेच ऐकायची तयारी ठेवावी लागेल. इथे प्रत्येकाच्या कहाण्या वेगळ्या आहेत. प्रत्येक दुःखाची तर्हा वेगळी आहे. सुखी माणसाच्या कहाण्या एकसारख्या असतात. पण या जगात दुःखच जास्त आहे."

"या गवतावर झोपा. चप्पल काढून ठेवा. कोणी चोरणार नाही. आम्ही जवळच आहोत. काही लागले तर हाक मारा." त्याने दूरवर बघितले. त्याचे सुरक्षारक्षक तसेच उभे होते. क्षणभर वाटले, त्यांना जाऊन सांगावे झोपून जा. इथे मी सुरक्षित आहे. पण तसे जाऊन सांगण्याची चोरी होती कारण मग इतरांना कळले असते. त्यात जवळ मोबाईलही ठेवला नाही. गेल्या आठ वर्षांत मोबाईलशिवाय जगू शकतो अशी कल्पनाही केली नव्हती. मोबाईल कुठे विसरलो की चिडचिड व्हायची. अस्वस्थ वाटायचे. आता तो जवळ नाही तर किती बरे वाटतेय. रमोलाला सांगितलेय बिझनेस ट्रीपसाठी बाहेर चाललोय. तिला हे कळले तर? ती आपल्याला फाडून खाईल.

झोपल्यावर तो मनाशी विचार करत बसला. आपण आयुष्यात आजपर्यंत काय केले? शिकल्यावर वडिलांचा बिझनेस जॉईन केला आणि मग गेली सत्तावीस वर्षे झाली तोच वाढवायचा विचार डोक्यात घेऊन बसलो. बिझनेस वाढवणे, स्पर्धकांना दूर करणे, साम-दाम-दंड-भेद सर्वांचा वापर करत राहणे व अडथळे दूर करणे. सर्व विचार केवळ बिझनेसच्या वृद्धीसाठी पूरक. आपण ह्या काळात दुसरा विचारच केला नाही. किंबहुना आणखी दुसरा विचार करायचा असतो, हे कधी शिकलोच नाही. आपण हैद्राबादला मॅनेजमेंट स्कूल काढले. भारतातील उत्तमोत्तम लोक तेथे येऊन शिकवतात. देशातील सर्वोत्तम मॅनेजमेंट स्कूलपैकी एक असा त्याचा लौकिक आहे. तेथे विद्यार्थी लाखो रुपये मोजून येतात. मग ते विद्यार्थी उत्तम कार्पोरेटस् मध्ये सामावून घेतले जातात. आपल्याला वाटायला लागले, आपण शिक्षणक्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी केली. पुण्याला वडिलांच्या नावे आपण हल्लीच फाईव्ह स्टार हॉस्पिटल सुरू केले. तेथे उत्तमोत्तम डॉक्टरना बोलावून नोकरी दिली; किंवा कन्सलटंट म्हणून ठेवले. जगातील मेडिकल सायन्समधील अद्ययावत उपकरणे मागवली. आता तेथे जगातील कुठलेही ऑपरेशन केले जाऊ शकते. देशभरातून धनिक लोक तेथे अॅडमिशनसाठी रांगा लावतात. कारण तेथे सोयीच तशा आहेत. आपल्याला वाटले आपण आरोग्यक्षेत्रात काहीतरी भरीव केले. कार्पोरेट क्षेत्रात तर आपण अग्रगण्य आहोतच. मग हे सर्व केले ते व्यर्थ आहे का? आपण इथे मनोरंजनासाठी आलो आणि आपली अस्वस्थता वाढतेच आहे. खड्डयात गेले मनोरंजन आणि भिकारी. आपण आपले परत जावे. डोक्याला त्रास करून घेऊ नये. शेवटी आपला बिझनेस बरा. आताच उठावे. नको. आणखी थोडे समजावून घेऊ. थोडे थांबू. थोडी कळ सोसू. बघूया काय होते ते. एवढे बघितलेच आहे.

उशिराने त्याला कधीतरी झोप लागली. जाग आली तेव्हा डोक्यावर उन्ह आले होते. म्हणजे आपल्याला इथेही झोप लागते तर?

सकाळी उठल्यावर ब्रश करणे आणि संडासला जाणे हा त्याचा दिनक्रम होता. इथे कुठे जायचे? सोबत ब्रश नाही आणि पेस्टही नाही. सरळ ताजमध्ये जावे व स्वतःची ओळख करून द्यावी. एवढेच कशाला घरही इथून कारने दहा मिनिटांवर आहे. रमोला खुश होईल. पोरांना भेटता येईल. हे कसले लोढणे गळ्यात बांधून घेतले. तेवढ्यात पहिला भिकारी आला.
"झोप लागली वाटतं?"
"हो."
"तुम्हांला रोज फिरायची सवय असेल."
"हो."
"मग फिरून घ्या. इथे कुलाब्यातील श्रीमंत लोक फिरायला येतात. त्यांना हार्टचे दुखणे लवकर लागते. आम्हा लोकांना ते दुखणे कधी लागत नाही. सगळ्या चिंता आता सोडून दिल्यात ना. आपले यापेक्षा अधिक बरे होऊ शकत नाही ह्याची पक्की खात्री आहे. इथे लोक कुपोषणाने मरतात. त्यांना खायलाच मिळत नाही. मिळते ते कमी प्रतीचे. मग कुठले कुठले रोग होतात. रोग झाले की झिजत मरायचे. उपचारांचा प्रश्नच येत नाही. हा देश संरक्षणासाठी लाखो कोटी रुपये खर्च करतो. त्यापैकी काही पैसे लोकांच्या आरोग्यावर खर्च केले तर? आमच्यासारखेच लोक शेजारी देशातही आहेत. हे देश आपापल्या लोकांची आधी काळजी का घेत नाहीत?" 
"माझ्याकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत."
"इथे सगळेच चुकलेय. मी इथे का आलो? लोक, पत्रकार म्हणतात मुंबईचा उकिरडा झालाय. ती दिवसेंदिवस बेकार होत चाललीय. त्यांचा रोख आमच्यासारख्यांकडे असतो. सगळ्यांना वाटत असते गरीब लोक या जगातून नष्ट व्हावेत. ते लोक या पृथ्वीला लागलेली कीड आहे. मग एकदाच काय ते जगातील दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या लोकांना एकत्र जमा करून त्यांच्यावर अणुबाँब का टाकत नाहीत? तुमचे प्रश्न एकदमच मिटतील. मग या जगात फक्त सबल, श्रीमंत लोक जगतील. मजाच मजा नाही?" 
"प्लीज. अशी मजा नको."
"अहो मला माझ्या गावालाच रहायला आवडेल. ह्या नरकात राहण्याची कोणाला हौस आहे? पण माझ्या गावात मी करायचे काय, हेच मला समजत नाही. ह्या देशाची किंबहुना जगाचीच दिशा भरकटलेली आहे असे तुम्हांला नाही वाटत?"

"माझ्या हातांत काहीच नाही." 
"असे तुम्ही का म्हणता? तुम्ही कोण आहात हे मला माहिती नाही. समजा उद्योगपती असाल तर तुमचा स्वतःचा दबावगट असतो. तुम्ही सरकारला तुमच्या मर्जीनुसार, सोयीनुसार धोरण ठरवायला लावता. तुम्ही मध्यमवर्गीय असाल तर तुमचाही दबावगट असतो त्यानुसार इन्कमटॅक्स कमी केला जातो आणि चंगळवाद कसा वाढेल हे बघितले जाते. आम्हांला राजकारणी पाच वर्षातून शंभर रुपयांत विकत घेतात. आम्हांला शंभर रुपयेही मोठे वाटतात. आम्ही जो पैसे, दाम, अन्न देतो त्याला मत देतो. मान्य. पण मग आम्ही काय करायचे? आमचा कसलाच दबावगट नाही. आम्ही सरकारवर कसलाच प्रभाव टाकू शकत नाही. सगळेच आपापल्या गटासाठी भांडतात. आमच्यासाठी कोणीच भांडत नाही. मग आम्ही जे मिळते त्यात भागवून घेतो." मग काही वेळ थांबून तो बोलला.

"ही मुंबई आणि देश म्हणजे प्रचंड विरोधाभास आहे. ह्या देशात एकाच वेळी दोन देश आहेत. ह्यात शंकाच नाही. आम्ही भारतात राहतो. ह्या देशाचे कसलेच भवितव्य नाही. इथे कुठे उजेडच दिसत नाही. इथे भयानक दारिद्र्य, गरिबी, अवहेलना आहे. ह्या जगण्याला जगणे म्हणणे अशक्य आहे. आम्हा लोकांची कोणालाच फिकीर नाही. आम्ही पुढे कसे यायचे; गरिबीवर मात कशी करायची हे आम्हांला माहीत नाही. आम्ही रस्ता शोधतोय. आम्हांला कोणी रस्ता दाखवत नाही. लोक म्हणतात शिक्षण घ्यावे. ते कसे, कुठे घ्यावे हेच आम्हाला समजत नाही. शिक्षण घ्यायचे तर कमवायचे कोणी, हे प्रश्न सुटत नाहीत. आम्हांला राहायला जागा नाही. खायला अन्न नाही. आरोग्य कशाशी खातात हेच आम्हाला माहिती नाही. दुसरा देश आहे इंडिया. ह्या समोरच्या हॉटेलमध्ये तो देश आहे. आजूबाजूच्या श्रीमंत वस्तीत तो देश आहे. त्या देशातील लोकांना या देशातील लोकांशी कसलेच देणेघेणे नाही. उलट त्यांना हा देश त्यांच्या प्रगतीमधील अडथळा वाटतो. ते ह्या देशाचा राग करतात पण ते सगळे सोयीसाठी असते. त्यांच्या घरात, ऑफिसमध्ये काम करणारे कित्येक लोक ह्या देशामधील असतात. त्या देशामधील कित्येकांना "इंडिया" हा पाश्चात्य देशांपेक्षा चांगला वाटतो कारण स्वस्तात मिळणारा मजूरवर्ग. बाहेर देशांमध्ये त्यांना सर्व कामे स्वतःची स्वतः करावी लागतात. इथे पैसे असतील तर अधिक सुखाने जगता येते. आपण विकसित देशांनी विकसनशील देशांकडे अधिक सहानुभूतीने बघावे म्हणतो; मग इंडियाने भारताकडे अधिक सहानुभूतीने बघायला काहीच हरकत नाही ना?"

तो परत निरुत्तर झाला. आयुष्यात एवढ्या वेळा निरुत्तर होण्याची वेळ कधी आली नव्हती. प्रत्येक गोष्टीवर युक्तिवाद करता येऊ शकतो, असे त्याला नेहमीच वाटायचे. यावेळी त्याला कसलाच युक्तिवाद नकोसा वाटत होता. वादासाठी वाद घालणे त्याला मूर्खपणा वाटत होता.

"तुम्ही आज आमच्या सार्वजनिक संडासात जा. उघड्यावर आंघोळ करा. येथील टपरीवर चहा आणि नंतर उसळपाव खा. हे सगळे केल्यावर तुम्हाला वेगळ्या भिकाऱ्यांची ओळख करून देतो." 
"हे कुठले आहेत?"
"त्यांना प्रत्यक्ष भेटा. त्यांची कहाणी त्यांच्या तोंडून ऐका. मग आपण सर्व मिळून "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." ही शाळेत शिकवलेली प्रार्थना म्हणू. आपल्या शिक्षणपद्धतीचे एवढ्या लवकर धिंडवडे का निघाले ह्याचा विचार करू. ही प्रार्थना प्रत्येक पुस्तकात कित्येक वर्षी पहिल्या पानावर दिलेली असते. शाळेत ती रोज म्हटली जायची. मग प्रत्यक्ष आयुष्यात त्या प्रार्थनेचे काय झाले हे आपल्याला दिसतेच आहे." भिकाऱ्याची बडबड असह्य होऊन तो सकाळची सर्व आन्हिके आटोपून परत आला. ही आन्हिके आटोपणे त्याच्यासाठी सोपे काम नव्हते. सगळे त्रासदायक होते पण मोठ्या जिकिरीने त्याने ते आटोपले.

"तुमचे काही मित्र तुमची वाट बघताहेत. माणसाला आपली दुःखे कोणाला तरी सांगायला आवडतात. हो. दुःख हलके झाल्याचा भ्रम तरी निर्माण होतो. माणसाची ती मूलभूत गरज आहे."
"खरंय."
"ह्या लोकांनाही तसेच वाटतेय. माणूस हा शेवटी आशेवर जगतो. कोणीतरी आपली प्राप्त परिस्थितीतून सुटका करेल ह्या आशेवर तो जगत असतो. त्या आशेतूनच देव ही संकल्पना निर्माण झाली असावी. ह्यांची कहाणी ऐकल्यावर तुमचा सगळ्याच गोष्टींवरचा विश्वास उडून जाईल." तो मनातून काहीसा थरथरला. समोर मूळचे बरे वाटणारे पण आता भिकारी अवस्थेत असणारे कुटुंब उभे होते. एक पन्नाशीच्या आतील माणूस, त्याची बायको, त्याची म्हातारी आई व विशीची मुलगी असे चौघेजण दिसत होते.

"सांगण्यासारखे काही नाहीच. सगळ्यांचीच शरम वाटते. गेल्या कित्येक महिन्यांत कितीतरी वेळा आम्हाला धरणीमातेने दुभंगून आत गाडून घ्यावे वाटले. त्या भूकंपातून आम्ही का वाचलो हेच आम्हांला समजत नाही. तेव्हाच सगळे मेलो असतो तर किती बरे झाले असते. पुढच्या गोष्टी बघणे तरी टळले असते. भूकंपाचा धक्का आम्हालाही जाणवला. त्या दिवशी सुटीमुळे सगळेच घरी होतो. सगळे एकमेकांना बिलगुन बसलो. सगळी इमारत थरथरली. वाटले आपण संपलो. सगळी भांडी खाली पडली. एक कपाट आडवे झाले. ती दोन मिनिटं भयानक होती. पण त्यातून आम्ही वाचलो. सगळे शांत झाल्यावर धावत खाली आलो. बिल्डिंगमधील सर्वांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. वाचल्याच्या आनंदात आम्ही सर्व भरपूर रडलो होतो. एकमेकांना मिठ्या मारताना कोणाचाच धर्म आडवा आला नाही.

सगळेच जिवंत असल्याचा आनंद होता. परत इमारतीमध्ये जायची भीती वाटत होती. रात्र सगळ्यांनी बाहेर काढली. एकोप्याने सगळे जेवले, झोपले. एकमेकांना मदत केली. जगण्यात आनंद वाटत होता. त्यानंतर वर्षभरात असे काही होणार आहे ह्याची कल्पनाही केली नव्हती. आमचे धर्म एकमेकांचे एवढे वैरी बनणार आहेत ह्याची कल्पनाही केली नव्हती."

"आणि ते घडले. गोध्र्याला हिंदूंना जिवंत जाळण्यात आले. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे यातही शंकाच नाही. पण त्यानंतर आमच्यावर जो सूड उगवण्यात आला तो भयानक होता. पंधरा कोटी मुसलमानांना तुम्ही कुठे पाठवणार आहात? असे शक्य तरी आहे का? आमचा श्वास या भूमीतील आहे. आमची जन्मभूमी, कर्मभूमी हीच आहे. आमच्या गुजरातमध्ये मात्र राज्यकर्त्यांना हे मान्य नसावे. त्यांच्या आशीर्वादाने आमची पद्धतशीर हत्याकांडं करण्यात आली. अमानुष नरसंहार करण्यात आला. हल्ली देशात सर्वसामान्य हिंदू मुसलमानांकडे संशयानेच बघतो. मान्य आहे, हल्ली दहशतवादाशी इस्लामचे नाव जोडले गेलेय. इथे गैंगस्टारमध्ये प्रामुख्याने नावं मुसलमानांचीच असतात. सलमान खान जेवढा वाईट निघाला तेवढाच आमीरखान चांगला नाही निघाला? हिंदूंमध्ये गँगस्टार नाहीच आहेत? अख्खा मुसलमान धर्म त्यामुळेच वाईट कसा होतो? वाईटपणा हा धर्माशी नसून माणसाशी निगडीत आहे. माझे होत्याचे नव्हते होऊनही मी वाईट मार्गाला का नाही लागलो? मुसलमानांमध्ये शिक्षणच कमी. मुल्ला- मौलवींचा प्रभाव जास्त. वाईट मार्गाकडे नेण्यास प्रवृत्त करणाऱ्या भरपूर वृत्ती आहेत. त्यांच्यापासून सुटका करायची तर आम्हांला मुख्य प्रवाहात आणणे हा एकमेव मार्ग सर्वांपुढे उरतो. पंजाबमधील दहशतवादास एक दिवस तेथील दहशतवादीही वैतागले. दहशतवादाने प्रश्न सुटत नाहीत हे खरे; पण मग तशा प्रवृत्ती तयार का होतात ह्याचा विचार आपण केला पाहिजे. तशी परिस्थिती निर्माण होणार नाही, हे आपण बघितले पाहिजे. माझ्यावरील अत्याचार ऐकले तर तुम्हांला पटेल की एक दहशतवादी सहज निर्माण होऊ शकतो.
"असे काय घडले?"

"आम्ही चांगल्या घरचे आहोत. मी तेलाचा व्यापारी आहे. आमचा तो परंपरागत व्यवसाय आहे. अल्लाच्या कृपेने तो चांगला चालला होता. अहमदाबादला आधी आम्ही जुन्या वस्तीत रहायचो. आजूबाजूला बरेच मुसलमान होते. मग हाती पैसे आल्यावर घरातील सर्वांनीच ठरवले की पॉश वस्तीत फ्लॅट घ्यायचा. मग आम्ही हिंदू वस्तीत फ्लॅट घेतला. तेव्हा डोक्यातही पुढील भविष्याबद्दल आले नाही. तीस वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये हिंदू मुसलमान दंगली झाल्या होत्या तेव्हा मी नुकताच तरुण झालो होतो. आमच्या भागालाही झळ पोहोचली होती. पण तो भूतकाळ होता. अयोध्येपासून देशातील वातावरण दूषित झालेले असूनही आम्ही हिंदू वस्तीत राहण्याचे ठरवले. हा मूर्खपणा होता की अनाठायी विश्वास हे तेव्हा कळले नाही. आता दोन्ही खरे होते हे पटले."

"गोध्र्याच्या हत्याकांडाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून मुसलमानांवर हल्ला झाला असता तर एकवेळ ते नैसर्गिक म्हणून खपून गेले असते. इथे तसे झाले नाही. आम्ही त्यानंतरही निवांत होतो. म्हणजे डोक्यात टेन्शन होते पण घर सोडून जावे असे तेव्हाही मनात आले नाही. सावधगिरी म्हणून दुकान व गोडाऊन बंद ठेवले होते. "

"गोध्र्याच्या घटनेनंतर तीन दिवसांनी संध्याकाळी घरी फोन आला की तुमचे गोडाऊन पेटवले आहे व आगीचा डोंब उसळला आहे. तेलाचे साठे पेटवल्यावर काय होईल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. मनात आतून शंका होतीच आणि ती खरी ठरली. काय करावे ते सुचेना. घरचे घाबरून गेले. जावेद अठरा वर्षांचा होता. तो खवळून गेला. हातात जे हत्यार मिळेल त्याने तो घराबाहेर पडू बघत होता. त्याला थांबवणे फार मुश्किल गेले. तो बेभान झाला होता. आम्हांला काय करावे हेच सुचत नव्हते. बायका-मुली रडू लागल्या. कष्ट करून जमा केलेली आयुष्याची कमाई अशा रीतीने कोणी लुटत असेल तर फार त्रास होतो हो. मी पोलिसांना फोन करत होतो. अशावेळी पोलिस कधीच जागेवर मिळत नाहीत. एक तर फोन लागत नव्हता किंवा एंगेज्ड येत होता किंवा नुसता वाजत होता. एक दोन स्थानिक पुढारी ओळखीचे होते, पण त्यांनी काही मदत करण्यास स्पष्टपणे असमर्थता व्यक्त केली. अशावेळी कोणाची बाजू घेणे अवघड आहे म्हणाले. गोडाऊन अहमदाबादच्या बाहेर उभे होते. दंगलीचे तेथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते; पण शेवटी ते माझे गोडाऊन होते.

मी फायरब्रिगेडला फोन केले. तेथेही उर्मटासारखी उत्तरे. सगळीकडेच आगी लागल्यात. कुठेकुठे विझवायच्या? जेव्हा बंब येतील तेव्हा पाठवू. बायकोने आणि अम्मीने जावेदला आवरले. मी एकट्यानेच रिक्षा करून गेलो. स्वतःची कार काढण्याची हिंमतच नव्हती. रिक्षा गोडाऊनच्या काहीशी दूरच उभी केली. दुरूनच आगीचे डोंब उसळताना दिसत होते. आयुष्यभराची कमाई अशी जळताना दिसत होती. आपण एकट्याने ती आग कशी विझवायची हेच समजत नव्हते. वेड्यासारखा मोबाईलवरून कोणाकोणाला फोन करत होतो. इथे मदत करणारे कोणीच नव्हते. सगळे नुसते बघे होते. गोडाऊन जाळला गेलेला मुसलमान असणार ह्याबद्दल कोणालाच शंका नव्हती. माझ्या बाजूने सहानुभूती असणारेही कमीच होते. गांधींच्या गुजरातमध्ये लोक हिंसक बनले होते. गांधींना आम्ही सगळे लवकरच विसरलो. त्यांची तर ह्या देशात हेटाळणी केली जाते. उद्या नथुरामाचा पुतळा संसदेत उभा केला जाईल. ह्या मुसलमानांना अद्दल घडवलीच पाहिजे असे सर्वसामान्य हिंदूही आजकाल बोलतोय. हे असे का, ह्याचा विचार मुसलमानांमध्ये करायला कोणी चांगले पुढारीच नाहीत. स्पष्ट विचारवंत नाहीत. आम्ही सगळे दिशा भरकटलेले लोक झालो आहोत पण ह्या देशाचे आहोत. या देशाचे रशियासारखे जात, धर्म, प्रांत, भाषानुसार तुकडे व्हावेत का? ह्याचा सर्वांनीच विचार करायला हवा." 

"मी एकट्याने मोठ्याने रडत राहिलो. गोडाऊन जळून खाक झाल्यावर उरलेले सोपस्कार संपवायला फायरब्रिगेड, पोलिसांची माणसं आली. तेव्हा खूप उशीर झाला होता. "तुमचे कोणाशी वैर होते का? तुमचा कोणावर संशय आहे का?" सारखे वेडपटपणांचे प्रश्न पोलिसांनी विचारले. त्यांना मी काय उत्तर देणार होतो? समस्त हिंदू समाजावर माझा संशय आहे असे म्हणणार होतो? पोलिस स्टेशनवर गेलो. रीतसर तक्रार नोंदवली. त्यात रात्री उशीर झाला. पोलिसांना सांगितले भर बाजारात माझे तेलाचे दुकान आहे. त्याचे तरी संरक्षण करा. दुकानाचा पत्ता त्यांना दिला. ते घाबरू नका, म्हणाले. घरी एकट्याने आलो तेव्हा मनाने पार उद्ध्वस्त झालो होतो. वातावरणात जाणवत होते की आपले संरक्षण करणारे कोणी नाही. घरी सगळ्या बायका म्हणाल्या की, हे घर सोडून जाऊ. मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन राहू.

पण असे परांगदा होणे एवढे सोपे असते का? आमचे काही नातेवाईक मुस्लिम मोहल्ल्यात होते. त्यांनीही आम्हांला त्यांच्याकडे जाऊन राहायला सांगितले. काय करावे हे सुचत नव्हते. तेही तेथे सुरक्षित होते असा भाग नव्हता. उलट तेथे ठरवून हल्ले करणे हिंदूंना सोपे जात होते. दोन दिवस असेच मानसिक अवस्थेत काढले. करत काहीच नव्हतो. नुसता वेळ ढकलत होतो. टीव्हीवर दंगलीचे दृश्य बघत होतो. खाजगी वाहिन्यांवर पक्षपाती असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात होता. पण खरे तर सरकारच निष्क्रिय बनले होते. दंगलखोरांना हत्यारे पद्धतशीरपणे पोहोचवली जात होती. पोलिस बघ्याची भूमिका घेत होते. दंगली आधीसुद्धा झाल्या. त्याचा आपल्याकडे उज्वल इतिहास आहे. पण अशी पद्धतशीर दंगल याआधी झाली नव्हती. ह्या दंगलीचे हेच वैशिष्ट्य होते. संघवाले हिटलरला आदर्श मानतात. यावेळी त्यांनी ते प्रत्यक्षात आणून दाखवले." 

"दुकान उघडण्याची तर हिंमत नव्हती पण तिकडे दिवसातून एक-दोनदा चक्कर मारल्याशिवाय राहवत नव्हते. दुकानाबद्दल भीती मनात होतीच, पण ते वाचवायचे कसे हे समजत नव्हते. मी माझ्या काही व्यापारी मित्रांना फोन केला. इंदिरा गांधी हत्येनंतर शीख समाजाने संरक्षणासाठी मुंबईतील हिंदू पुढार्याला पैसे दिले होते ऐकून होतो. म्हटले तसाच प्रयत्न आपणही करून बघावा. शेवटी जीव व मालमत्ता महत्त्वाची. एका स्थानिक पुढाऱ्याकडून मुख्यमंत्र्यांना निरोप पोहोचवण्याची व्यवस्था केली. मुस्लिम व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी, सधन लोकांनी यासाठी तयारी दाखवली. त्या पुढाऱ्याकडून कुठलाही निरोप येण्याच्या आधीच सगळे संपले" त्याने दीर्घ श्वास घेतला. काही क्षण थांबला आणि मग परत सांगण्यास सुरुवात केली.

"माझे दुकानही जाळून टाकण्यात आले. भर बाजारात मुस्लिमांची दुकाने वेचून काढण्यात आली होती. परत तसेच. काही कळण्याच्या आधीच अर्धे दुकान जळालेले. तेलाचे डबे कुठून वाचणार? नशिबी फक्त रडणे होते. पण यावेळी मामला तेथेच थांबला नाही. बातमी कळाल्यावर जावेदने यावेळी कोणाचेच ऐकले नाही. त्याला आवरणे शक्यच नव्हते. माझ्या आधी तो पळाला. त्याने हातात घरातील सुरा, हातोडासारख्या गोष्टी घेतल्या होत्या. हा निव्वळ वेडेपणा होता. त्याचा जोश, संताप मला थोपवणे अवघड होते. त्याच्यापाठोपाठ मी पळालो. जावेदला गाठणे मला जमले नाही. बाजारात खूप जमाव होता. किंचाळ्या, आरोळ्या, घोषणा यांनी सर्व बाजार दुमदुमून सोडला होता. कशाला कशाचाच पत्ता नव्हता. मी जावेदला शोधत होतो. तो पटकन् दिसत नव्हता. मी दुकानाकडे धाव घेतली. तेथे तर आगीचा डोंब उसळला होता. मला काहीच सुचत नव्हते. एकीकडे दुकान. दुसरीकडे जावेद. तेवढ्यात जावेदची किंचाळी ऐकल्यासारखे वाटले. मी नजर फिरवली आणि दुरूनच ते दिसले. चार गुंडांनी जावेदला दोन्ही बाजूला घरले होते आणि ते त्याला दुकानाच्या आगीत फेकण्याच्या तयारीत होते. तो हातपाय झाडत होता. मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो पण मला ते जमत नव्हते. मलाच धक्काबुक्की होत होती आणि माझ्यासमोर ते घडले.

माझ्या एकुलत्या एक मुलाला माझ्या डोळ्यांसमोर आगीत फेकले गेले. नंतर ऐकू आली ती प्रदीर्घ किंचाळी आणि गुंडांचा माझ्यासमोर नंगा हैदोस! ते मला वेडावून दाखवत होते, वाकुल्या दाखवत होते. त्यांच्या अंगात राक्षस संचारला होता. मी त्यांच्यापुढे हतबल होतो. मला एकदम रडू फुटले. मी आगीच्या दिशेने झेपावलो पण दोघा जणांनी अडवले. कोणी तरी म्हटले "उसको भी फेक दो." जीव अशाही परिस्थितीत फार प्यारा वाटला. घरी तीन बायका आपली वाट बघताहेत हे डोक्यात आले असेल. मरणाची भीती वाटली असेल. जावेद मिळाला ते ओळखू न येण्याच्या अवस्थेत. त्याचा कोळसा झाला होता. त्याच्या हातातील सुरा तसाच होता. त्यावरून मी त्याची बॉडी ओळखली. घरी कसे सांगायचे हे समजत नव्हते. सांगणे तर भाग होते. उठावेसे वाटत नव्हते. अंगात त्राण नव्हते. कोणी तरी घरी आणून सोडले. त्यानेच जावेदचे वर्तमान सांगितले. घरात भावनांचा कल्लोळ उडला तेव्हा मी शुद्धीवर नव्हतो. शुद्ध आली तेव्हा सगळे सुतकात बसल्याप्रमाणे वाटत होते. बायकांना म्हटले, चला नव्याने सुरुवात करू. झाले गेले विसरण्याचा प्रयत्न करू. आयुष्य इथे थांबत नाही. मी असे म्हणालो तेव्हा मनावर किती संयम ठेवला असेल ते माझे मलाच माहिती. सगळेच लुटले गेले होते. वाटले जे घडायचे ते घडून गेले. दुर्दैवाच्या दशावतारांना आता तरी पूर्णविराम मिळाला असेल. हल्लेखोरांना आपले उदरनिर्वाहाचे साधन ओढून घेऊन आनंद मिळाला असेल. पण दशावतार इथे संपणार का होते? मी वेडा कसा झालो नाही ह्याचे मला कधीकधी आश्चर्य वाटते." 

"आणखी काय घडले?"
"दंगल थांबायला तयारच नव्हती. एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेली ही पहिलीच दंगल असेल. सरकार ती थांबवण्यासाठी काही करतेय असे वाटत नव्हते. याचा शेवटच दिसत नव्हता. आमचा शेवट मात्र जवळ आलेला दिसत होता. जावेदच्या धक्क्यातून कोणीच सावरलेले नव्हते. परत एके रात्री जमाव चालून आला. घर खाली करा म्हणू लागला. रात्रीचे बायकांना घेऊन आम्ही कुठे जाणार होतो? अशी वेळ कधी आयुष्यात आली नव्हती. बिल्डिंगमधील सर्वांनी तसा आग्रह धरला. तसे केले तर किमान सुरक्षित बाहेर पडाल म्हणाले. मालमत्ता तरी वाचेल म्हणाले. आपण निघाल्यावर घर वाचेल ह्यावर फारसा विश्वास नव्हता. आम्हांला जायला कुठे जागाच नव्हती. जायचेच असते तर आधीच गेलो असतो. या घरावर सर्वांचेच प्रेम होते. घर सोडून परागंदा होणे म्हणजे काय हे ज्याचे त्यालाच समजू शकते. रात्रीपुरता राहण्यासाठी सवलत द्या, सकाळ झाल्यावर चंबुगबाळं आवरून निघतो असा निरोप हल्लेखोरांकडे दिला.

ते ऐकायला तयार होईनात. रात्री तर अहमदाबादच्या बऱ्याचशा भागात कर्फ्यू लागला होता. एक दोन नातेवाईकांना फोन केला. ते या म्हणाले, पण तेच स्वतः असुरक्षित होते व त्यांच्या घरून निघून जायचा विचार करत होते. अशी वेळ आयुष्यात कधी आली नव्हती. तीन बायकांबरोबर सुरक्षितपणे घरून निघायचे होते. बायकोने दागिने, काही कॅश बरोबर घेतले. कपड्यांची एक बॅग भरली. नातेवाईकांची कार मागवली. शेवटचे घराकडे बघितले आणि बिल्डिंगखाली उतरलो. बिल्डिंगमधे दोनच मुस्लिम कुटुंबे होते. त्यापैकी एकाचे मूळ गाव उत्तर प्रदेशमध्ये होते. ते तिकडे आधीच निघून गेले होते. आम्ही एकटेच राहिलो होतो. अख्खी बिल्डिंग आमच्याकडे नुसती बघत होती पण कोणीही पुढाकार घेऊन आम्हांला थांबवून घेतले नाही. एरव्ही भित्रे समजले जाणारे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय ह्या दंगलीत भलतेच धीट झाले होते. दंगलीत तेही अग्रेसर होते. बिल्डिंगखाली उतरल्यावर जमावाने आमची झडती घेण्यास सुरुवात केली. बायकांना हात लावल्यावर मी ओरडलो तर ते हसू लागले. सुमार हिंदी चित्रपटातील व्हिलन जे काम करतो ते काम हा जमाव करत होता. त्यांच्यापैकी एकाने मला पकडले आणि बायकोच्या हातांतील दागिने आणि पैसे हिसकावून घेतले. सहन होणार नाही अशा भाषेत ते आम्हांला शिव्या देत होते, "और किधर क्या छुपाया है?" म्हणत त्यांनी बायकोच्या अंगावरील कपडे काढावयास सुरुवात केली. तो थांबला. त्याला दम लागला होता. मग अकस्मातपणे तो हमसाहसमी रडू लागला. कोणीच काही बोलत नव्हते. त्याला तीन बायकांनीच शांत केला.

"माझ्या बायकोवर सर्वांसमोर त्यांनी बलात्कार केला. एरव्ही असे काही होऊ शकते हे मलाही पटले नसते. हिंदी चित्रपटातून ते बघायचो तेव्हा तो बटबटीतपणा व अवास्तवता वाटायची. आज माझ्या आयुष्यात ते घडून गेलेय. आणि मी नपुसंकासारखा ते बघत राहिलो. माझ्या हातात काही नव्हते. अपमानित व कंगाल अवस्थेत आम्ही घर सोडले. आमच्या मदतीला कोणीही आले नाही. बिल्डिंगमधील सर्वांनी आपापले दरवाजे पटकन लावून घेतले. नातेवाईकांकडेही राहण्यात अर्थ नव्हता. तेथेही परत तेच घडले असते. तरी दोन दिवस तेथे काढले. मग कळाले की सरकारने आम्हा लोकांसाठी कँप काढले आहेत. दंगलग्रस्तांना तेथे आश्रय मिळतोय. काहीतरी मिळेल या आशेने आम्ही तेथे गेलो.

"कॅप म्हणजे आनंदच होता. तंबू झोपण्यापुरते होते. बाकी सर्व विधी उघड्यांवर कुठे तरी जाऊन करायचे. एवढेच की इथे मारायला कोणी येणार नव्हते. वाईट का होईना हक्काचे चार घास मिळत होते. तेथे जमलेल्या प्रत्येकाची अशीच काहीतरी कहाणी होती. काही एरव्हीही रस्त्यावरच झोपणारे लोक इथे येऊन राहिले होते. त्यांना हक्काचा निवारा व अन्न मिळत होते. सगळ्यांचेच होत्याचे नव्हते झाले होते. प्रत्येकाने एकमेकांना कहाणी सांगताना भरपूर रडून घेतले. आपल्यासारखेच इतरही दुःखी आहेत. हा दिलासा माणसाला जगण्याची आशा देत असावा. घरी जायची सोय नव्हती. घरी काही शिल्लक असेल अशी आशाही नव्हती. खरे तर गोडाऊन, दुकान, घर या सर्वांचा इन्शुरन्स माझ्याकडे होता. पण तिघांपैकी काहीच शिल्लक असण्याची शक्यता नव्हती. कॅपमध्ये एक दिवस उच्च स्तरावरील सरकारी अधिकारी आले. खरे तर आतापर्यंत भरपूर राजकीय नेते येऊन गेले होते. अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांनी मोठी आस्थेने चौकशी केली होती. माणूस नाटक करण्यात अगदी हुशार असतो. त्यासाठी रंगभूमीवर काम करण्याची गरज नसते. त्यापेक्षा मोठे अभिनेते आपल्याला रोजच्या जीवनात दिसतात त्यात सर्वांत महत्त्वाचे राजकारणी. आधी मला वाटायचे आपला राजकारणाशी आणि त्यामधील लोकांशी कसलाच संबंध नाही. आपण आपले जगत असतो. कोण निवडून येतो याचीही आपण फारशी फिकीर करत नाही. एवढे दाहक अनुभव घेतल्यावर लक्षात आले की राजकारण्यापासून आपल्याला सुटका नाही. आपल्याला जाणवत नाही, कळत नाही तेवढे राजकारण आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. राजकारणी आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. ते जे निर्णय घेतात त्यावर अवलंबून आपण आपले निर्णय घेतो. त्यांच्या निर्णयाचे आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतात. ते कदाचित आपल्याला दृश्य स्वरूपात जाणवत नसतील; पण असतात. आपल्याला हवा कुठे दिसते? पण त्याशिवाय आपण जगू शकतो काय? तसेच राजकारण्यांचे झालेय. त्यांनी ह्या देशाचे वाटोळे केले. हे जेवढे खरे तेवढेच आपल्या निष्क्रिय भूमिकेतून आपण त्यांना मदत करत आलोय. आपल्यापैकी कोणाचीही त्यांना कसलीच भीती वाटत नाही. ते कायद्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानतात. मागच्या काळातील राजेशाही बरी म्हणायची वेळ आलीय. गुजरातमधील माझ्या ओळखीच्या एका राजकारण्याचे उदाहरण सांगतो. त्याची माझी प्रत्यक्ष ओळख नाही पण आमच्या बाजारात घडलेला किस्सा आहे." 

"हा राजकारणी आजही गुजरातमधील सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्याने आमच्या जवळच्या इलेक्ट्रिकल बाजारातून एका व्यापाऱ्याकडून साडेतीन लाखाचा माल विकत घेतला आणि व्यापाऱ्याला साठ हजार कमी दिले. कशासाठी तर त्याची मनमानी म्हणून. आधीच आमदाराला माल द्यायचा म्हणून व्यापाऱ्याने "ना नफा ना तोटा" तत्त्वांवर माल विकला होता. व्यापाऱ्याने आमदाराला आधी शांतपणे साठ हजार कमी दिल्याबद्दल सांगितले. त्याला वाटले आमदाराकडून चूक झाली असेल. नजरचुकीने पैसे कमी दिले असतील. आमदाराने गुर्मीत उरलेले पैसे देण्यास नकार दिला. व्यापाऱ्याला काय करावे हेच समजेना. त्याची काहीच चुकी नव्हती. मालात काही खोट नव्हती. साठ हजार रुपये रक्कम त्यासाठी फार मोठी नसली तरी तो दुखावला गेला होता. कारण नसताना त्याचे नुकसान होणार होते. ते त्याला सहन होत नव्हते. त्याने अन्याय सहन न करण्याचे ठरवले. त्याने आमदाराकडे, त्याच्या सहायकाकडे आधी बऱ्याच वेळा विनवणी केली. स्वतः आमदाराच्या घरी जाऊन आला. प्रत्येक वेळी त्याला अपमानास्पद वागणूक मिळाली.

आमदाराच्या वागणुकीने तो मनोमन अधिकच दुखावत गेला. त्याने आमदाराला कायद्याच्या भाषेत नोटीस पाठवली व पोलिसात तक्रारही केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली पण पुढे काहीच केले नाही. आमदाराने नोटिसीला कसलेच उत्तर दिले नाही. नोटीस त्याला मिळाली होती कारण कुरिअर कंपनीचा पुरावा त्याच्याकडे होता. मग त्याने दर दोन महिन्याने एक अशा सहा महिन्यांत एकूण चार नोटीस पाठवल्या. कशाचेच उत्तर नाही. मग ह्याने न्यायालयात अर्ज दिला. न्यायालयाकडून आमदाराला कोर्टात हजर राहण्याविषयी पत्र दिले गेले. तरी आमदार फिरकला नाही. मग तीन महिन्यांनंतर परत कोर्टाची तारीख पडली. परत आमदाराला नोटीस दिली. यावेळी त्याने आजारी असल्याचे सांगितले. डॉक्टरांचे सर्टिफिकेट दिले. मग परत तारीख पडली तेव्हा आमदाराला विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी हजर राहणे आवश्यक होते. तसे त्याने पत्र दिले. पुढची तारीख तीन-चार महिन्यांच्या आत कधीच पडत नाही. अशा पाच तारखा पडल्या. प्रत्येक वेळी काहीतरी कारण काढून आमदार गैरहजर राहायचा. कोर्ट त्याचे कारण ग्राह्य मानायचे. यामध्ये सुमारे दोन वर्षे निघून गेली. तरी व्यापारी जिद्द सोडत नव्हता. त्याला कायद्याच्या कक्षेत राहून आमदाराला शिक्षा द्यायची होती. तोही वकिलावर पैसे खर्च करत होता. शेवटी कोर्टाने त्याच्यावर समन्स बजावले. तरीही आमदार बधला नाही. तो कोर्टात हजर झालाच नाही. दरम्यान कोर्टाचे न्यायाधीश बदलले होते. त्यांची भेट घेऊन व्यापाऱ्याने केस समजावून सांगितली. आपण काहीतरी करू म्हणाले. मग पुढच्या वेळेस कोर्टाने अटकेचा आदेश काढला. अटक करणारे पोलिस हात हलवत परत आले. आमदार सापडत नाही म्हणाले. आमदाराने सगळ्यांनाच विकत घेतले होते. यावेळी मात्र न्यायाधीशांना राग आला. त्यांनी आमदाराला व्यापाऱ्याचे पैसे परत देण्याचा एकतर्फी आदेश दिला. निकाल व्यापाऱ्याच्या बाजूने लागला होता. पण तरी आमदाराने त्याला एक पैसाही दिला नाही. मग परत व्यापाऱ्याने कोर्टात धाव घेतली. न्यायालयाची बेअदबी झाली होती. मग कोर्टाने आमदाराला दिवाळखोर घोषित केले. तरी आमदाराने त्याला एक पैसा दिला नाही, उलट व्यापाऱ्याला घरी बोलावून घेतले. प्रेमाने खाऊपिऊ घातले. चांगलेपणाने बोलत त्याला विचारले,

"काय मिळवलेस ह्यामधून? किती पैसे खर्च केलेस? जगण्यातील तत्त्व लक्षात ठेव. शेळीने कधी उंटाच्या गांडीचा मुका घ्यायचा नसतो. मनस्ताप तुला झाला. मी अजूनही मजेत आहे. कोर्टाने मला दिवाळखोर घोषित केले. त्याने मला काय फरक पडला? या देशात न्यायव्यवस्था कधीच संपलीय. न्याय चालतो तो आमच्या लोकांचा. हे सगळे प्रकार केल्याबद्दल माझी माफी माग. मी तुझे सर्व पैसे द्यायला तयार आहे." व्यापाऱ्याने ह्या गोष्टीस नकार दिला. हताश होऊन तो उठला. पुढे तो गप्प बसला. सगळ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की आमदाराच्या मागे लागणे मूर्खपणा आहे. कोणीच एकजुटीने आमदाराविरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला नाही. यासाठी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे होते. बंद, जाळपोळ व्हायला पाहिजे होती. तेव्हा कदाचित सरकारचे लक्ष या गोष्टीकडे वेधले असते. यापैकी काहीच झाले नाही. सगळे स्वान्तसुखाय होते. स्वतःमध्ये मश्गुल होते."
"माझ्याबद्दल सांगता सांगता दुसऱ्याबद्दल सांगत बसलो."
"इथे मुंबईत कसे आलात? दंगल तर कधीच संपली."
"आमचे दुर्दैवाचे दशावतार चालू आहेत. ते संपतच नाही आहेत व त्याला आमचा धर्म जबाबदार आहे. खरे तर धर्म ही वैयक्तिक बाब आहे. ती रस्त्यावर आली नाही पाहिजे. धर्म हा मोक्षाचा मार्ग आहे. अल्लाच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. तुम्ही त्याला देव म्हणता मग त्याची पूजा कशी करायची हे ज्याचे त्याने ठरवावे. मी याबाबत हिंदूंना दोषी ठरवू इच्छीत नाही. मुसलमानही तेवढेच जबाबदार आहेत. शिकून-सवरून स्वतःचे व समाजाचे उन्नयन करण्याऐवजी, मुख्य प्रवाहात येण्याऐवजी त्यांना मदरसे प्रिय आहेत. बहुतेक गुंड मुसलमान असतात. काश्मिरात त्यांनी हिंदू पंडितांवर असेच अन्याय केले. आमचे दुःख एकच आहे. कोणीतरी हा अतिरेक थांबवा. त्याने दोघांचाही सत्यानाशच होईल. आम्हांला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा."
"हे शहाणपण तुम्हांला आता सुचले की तुम्ही याच विचारांचे होता?" 
"मी पाक मुसलमान होतो. दिवसातून पाच वेळा नमाज पढायचो. इस्लाम धर्मावर नितांत श्रद्धा होती. पण हिंदू धर्माचा कधी तिरस्कार केला नाही. त्यांच्याशी जमवून घेतलेच पाहिजे हे उपजत शहाणपण होतेच. मी व्यापारी आहे. व्यापाऱ्याचा धर्म व्यापार करणे असतो. पण माझ्या आयुष्यातील घटनांनी समजूत वाढवली हे नक्की. आधी काश्मिरमधील विस्थापित हिंदूंचे दुःख समजायचे नाही. ते आता समजते. आमच्यावरील अन्यायाने हिंदूंचा तिरस्कार करू लागलो होतो. मग लक्षात आले की धर्मांधता जगभर वाढते आहे. आपले सर्वांचेच चुकलेय."
"तुम्ही स्वतःबद्दल सांगता होता." 
"फार अवघड आहे सर्व सांगणे. फार त्रास होतो त्यांचा. मन मोकळे करावेसे वाटते आणि सांगवतही नाही. स्वतःचीच अब्रू चव्हाट्यावर आल्यासारखी वाटते." 
"माझा अजिबात आग्रह नाही. कदाचित तुम्हांला मन मोकळे केल्यासारखे वाटेल. पण तुमची मर्जी." 
"मी सांगू का?" पहिल्या भिकाऱ्याने विचारले.
"सांग मला अवघड वाटते" मग पहिला भिकारी सांगू लागला.
"एक दिवस शिबिरातून त्याच्या मुलीला-झीनतला उचलून नेण्यात आले. हे चौघेही तंबूत झोपायचे. सगळेच झोपले होते. कधीतरी तिच्या आईने कूस वळवली तेव्हा तिच्या लक्षात आले की बाजूला झीनत नाही. ती एकदम घाबरली. तिने घाबरून नवऱ्याला उठवले. नवरा उठला, आधी वाटले झीनत बाहेर विधी उरकायला गेली असेल. बायका उघड्यावरील विधी आटोपण्यासाठी आधी उठायच्या. पण बाहेर मिट्ट काळोख होता. ते काही वेळ तसेच बसले. मग दोघांच्याही शरीरावरून भीतीची लहेर फिरली. काही सुचेना. म्हातारी आई तर झोपलेली होती. बायकोने रडणे मुश्किलीने आवरले. म्हातारी आई उठली असती तर गोंधळच सुरू झाला असता. काय करावे हे सुचत नव्हते. मग दोघेही उठले. एकमेकांचा हात धरून तंबूबाहेर आले. बाहेर मुलीला कुठे शोधायचे हे समजत नव्हते. एकूणच वातावरणात शांतता होती. पहाटेची वेळ होती. लोक उठायला अजून अवकाश होता. वारा पडला होता. सगळेच उदास वाटत होते. मग दोघे एकमेकांचा हात धरून मैलभर पुढे चालून आले. नजर भिरभिरती होती. एरव्ही बायका जेथे संडासला जातात तेथेही जाऊन आले. मुलगी कुठेच दिसत नव्हती. परत येताना बायकोला रडू आले. मनावर दगड ठेवणे तिला शक्य नव्हते. तिच्या रडण्याच्या आवाजाने एकदोन जण उठले. काय झाले म्हणून विचारू लागले. त्यांना काय सांगायचे हा प्रश्नच पडला. शेवटी स्वतःच्याच अब्रूचा प्रश्न होता. नवरा बायकोला हळू आवाजात समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या तंबूजवळ आल्यावर बायकोने एकदम बसकण मारली."

"सूर्य उगवण्याच्या आत चार धटिंगणांनी झीनतला उचलून आणली व तंबूबाहेर ठेवली. झीनत बेहोष दिसत होती. तिच्या अंगावरील कपडे फाटलेले दिसत होते. एकदोन ठिकाणी रक्तही होते."

"क्या हुआ मेरी बेटीको? झीनत बेटी तू ठीक तो है ना?" करत आई ओरडत झीनतजवळ गेली. 
"तुम्हारी लड़की मे मजा है. इसलिए उठाके बड़े साबके पास लेके गये थे. कल उनके नजरमें ये पसंत आयी थी. अब जादा आवाज मत करो. चुपचाप सह लो नही तो बोलेंगे ये लडकीही छिनाल है. साला यहाँ पे धंदा करती है. कहीं कम्प्लेन करने की कोशीस मत करना. कुछ फायदा नही होगा. इस राजमें इस देश में हमारा राज है; और हमाराही रहेगा. कोई हमारा कुछ भी बिघाड नहीं सकता." नवरा-बायकोलाच दम देऊन ते धटिंगण निघून गेले. झाल्या प्रकाराने दोघेही स्तंभित झाले होते. आवाज ऐकून म्हातारी आई उठून आली. नातीला ह्या अवस्थेत बघून ती हंबरडाच फोडणार होती पण मुलाने तिच्या तोंडावर हात ठेवला.
"चूप कर माँ. हमारी इज्जत का सवाल है. यहाँ कुछ नहीं होगा. लोग सिर्फ आयेंगे, आहें भरेंगे और चले जायेंगे. कोई हमारे लिए कुछ नहीं कर सकता है."
"तो फिर क्या करेंगे? चुपचाप बैठेंगे? अन्याय सह लेंगे? परिस्थितीके खिलाफ आवाज नहीं उठाऐंगे? ये तो तूने सीखा नहीं था?"
"फिलहाल यही जरूरी है. हमारे भी दिन आएंगे. मगर आज नहीं, आज हम विवश हैं." मग तिघांनी झीनतला उचलून आत आणले. दोन-तीन जणांनीच हा प्रकार पाहिला. पण, तेही चूप बसले. परिस्थितीच तशी होती. हिटलरच्या छळछावण्या कशा असतील ह्याचा त्यावरून अंदाज बांधता येतो.

झीनतला काही तासांनी होश आला. होश आल्यावर ती रडू लागली. तिच्यावर झालेल्या अन्यायाचे चित्र तिने डोळ्यांसमोर उभे केले. ते इथे तसेच्या तसे सांगणे शक्य नाही. वास्तव हे अधिक भयानक असते. ते सौम्य करत जगत रहावे लागते.
"हम यहाँ नहीं रहेंगे." नवरा म्हणाला.
"फिर कहाँ जाएंगे?"
"कहाँ भी. मगर यहाँ नहीं. मैं और कुछ देखना नहीं चाहता हूं. तुम तिनो औरत मेरी जिंदगी है, और फिलहाल बोझ! हम और कहाँ जाऐंगे?"

"किधर? और जिएंगे कैसे? हम तो पूरे लूट गये हैं. यहाँ खानेको और रहनेको तो फुकट मिलता है. अब तो हमारे पास कुछ नहीं रहा."
“चलो घर चलते हैं." 
"कौनसा घर? तुम्हे उम्मीद है की वो अब रहा होगा? ये लोग उसे संभालके रखेंगे? वो तो कभी का बेचिराख हुआ होगा. वो हमे देखा नहीं जाएगा. चलो और किधर नयी जिंदगी चालू करते हैं."
"कहाँ? हमारे पास क्या है? दो औरतोंकी तो इज्जत लूट चुकी है. अब रही है बुढी माँ. उसको कुछ होते मुझे देखना है क्या?"
"तो फिर क्या करते हैं?"
"मुझे भी क्या मालूम? किसी सवाल का जबाब हमारे पास है तो नहीं. इस अंधेरे में कोई तो कमसे कम लालटेन लगाएगा इस उम्मीद पे बैठे है. कौन लगाएगा हमारे जिंदगी में लालटेन?"
"शायद मुंबई. बडा अच्छा शहर है. सबको काम देता है. किसी को भूखा नहीं रखता. चलो वहाँ चलते हैं. वहाँ हमे कोई पहचानता नहीं. हमारा अतीत वहाँ कोई पूछेगा नहीं. शायद नई जिंदगी चालू हो जाये."

मग चौघांनीही त्वरित अंगावरचे गाठोडे घेऊन शिबीर सोडले. विदाऊट तिकीट मुंबईची ट्रेन पकडली. विरारला उतरून लोकल ट्रेन पकडली व चर्चगेटला उतरले. मध्ये टीसीने पकडले नाही हे त्यांचे सुदैव. चर्चगेटहून हे सरळ गेटवेला आले. कुठे राहायचे हा प्रश्नच होता. मुंबईत कोणी नातेवाईक नव्हते. गेटवेला शिवाजीच्या पुतळ्याजवळ बसून राहिले. तो पुतळा सर्वांना सामावून घेतो. आम्ही मग त्यांच्याजवळ जमलो. आम्हांलाही सुरुवातीला ते काहीच सांगायला तयार नव्हते. हे सर्व सांगणे एरव्हीही सोपे नाहीच. पण मग त्यांच्या लक्षात आले असावे की इथेच काही दिवस तरी काढायचे आहेत तेव्हा आम्ही त्यांचे सखे असणार. आमच्या मदतीची त्यांना जरूरच होती. सुरुवातीला भीक मागणे त्याला फार अवघड गेले. फार मानी गृहस्थ आहेत. आयुष्यात कधी कोणासमोर हात पसरले नव्हते. आता वयाच्या पन्नाशीत ही वेळ आली होती. पण भीक मागिल्याशिवाय खायलाच मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने होकार दिला. त्याला फार त्रास झाला. रात्रभर सगळे मिळून रडत होते. आम्हांला त्यांना समजावून सांगताना मुश्किल गेले. त्याने काम शोधण्याचाही खूप प्रयत्न केला. मसजिद बंदर, महमदअली रोड, भायखळा ह्या मुस्लिमांच्या वस्तीत जायचा. दिवसभर पडेल ते काम करून यायचा. त्याने तसेही करून पैसे कमावले, नाही असे नाही. दोन महिने होत आले ते असेच राहताहेत. स्वतःचे घर शोधावे इतपत पैसे त्याला अजून जमवता आले नाहीत. सगळे मिळून भीक मागताहेत व त्यासाठी पैसे कमावताहेत. देव त्यांचे भले करो. लवकरच त्यांना घर मिळो. आमच्या नशिबी एवढ्या वर्षांत ते आले नाही. त्यांच्या तरी ते येवो."

दीर्घ बोलून पहिला भिकारी थांबला. तिन्ही बायका दूर जाऊन बसल्या होत्या. त्यांना स्वतःबद्दलची कहाणी परत ऐकणे शक्य नव्हते. सगळेच काही वेळ स्तब्ध बसले. बोलण्यासारखे काही उरले नव्हते. सगळ्यांच्याच मनात एक प्रकारचा. मानसिक थकवा आला होता.
"मी निघतो." त्याने पहिल्या भिकाऱ्याला सांगितले.
"एवढ्या लवकर?"
"हो. कामं आहेत. ती करायलाच हवीत."
"आम्हांला कामंच नाहीत."
"माझा माणूस तुमच्याकडे येईल व तुमची इच्छा लवकरच पूर्ण करेल." 
"खरे सांगता की मंत्र्यांसारखी आश्वासनं देता?"
"मी अगदी खरे बोलतोय. आता माझ्या खिशात पैसे नाहीत, नाहीतर लगेच दिले असते."
"मी विश्वास ठेवतो."
त्याने हलकेच भिकाऱ्याचा हात हातांत घेतला.
"तुम्ही मला काय दिलंय हे सांगता येणं अवघड आहे. समज वाढवणे हा प्रकार पैशात मोजता येत नाही. त्याचे व्यवहारात कितपत फायदे आहेत हे माहिती नाही. पण माझ्यासाठी ते अनमोल आहे."
"आमची आठवण ठेवा."
"जरूर." मग हात बाजूला घेऊन तो चालू लागला. रस्त्यापलीकडे जाऊन सिक्युरिटी गार्डला सांगितले. 
"निघायचेय." सिक्युरिटी गार्डची एकदम तारांबळ उडाल्यासारखे वाटले. 
"सर गाडी इथे आणू?"
"नको गाडी तेंडुलकर्सजवळ लाव. मी तेथे येतो."
"ओके."

गाडीत बसल्यावर तो लगेच झोपला. जाग आली ती वडाळ्याच्या घरापाशी. तेथे त्याने गाडीतच भिकाऱ्याचा वेष उतरवला. मग स्वतःचा ड्रेस चढवला आणि ऐटीत नेफ्रोल टॉवरच्या गाईचा सलाम सिक्युरिटी स्वीकारला.

कुपरेजचे मैदान खचाखच भरले होते. पाऊस सुरू व्हायला अजून अवकाश होता. हवा पडली होती. अंगाची काहिली होत होती. शेअर होल्डर्सची पहिली मिटींग आपल्या वडिलांनी ह्याच मैदानात भरवली होती. आता परत कित्येक वर्षांनी ह्या मैदानात मिटींग भरत होती. ह्याला कारण होते. वडिलांच्या निधनानंतर कंपनीच्या शेअर होल्डर्सची पहिली वार्षिक मिटींग भरत होती. काही वर्षे ती बंदिस्त हॉलमध्ये होत होती. वडील असतानाही एरव्हीही बरेच वर्षे तोच वडिलांच्या वतीने भाषण करायचा. पण वडील व्हीलचेअरमध्ये का होईना, यायचे. त्यांचा आशीर्वाद असायचा. त्यांच्याशिवाय ही पहिली मिटींग होत होती. त्याला काहीसे टेन्शन आले होते. बरोबर भाऊ होताच. सेक्रेटरी व एक्झिक्युटिव्ह असिस्टंटने भाषण तयार करून दिले होते. पण यावेळी ते भाषण वाचायचे नाही हे त्याने मनातच ठरवले होते. त्याचीच काहीशी धडधड मनात होती. यावेळचे भाषण नेहमीचे नव्हते. त्याच्याबद्दल फक्त डोक्यात विचार करून ठेवला होता. त्याची लेखी प्रतही नव्हती. दिशा माहिती होती पण शब्द नेमकेपणाने ठरवलेले नव्हते. यावेळच्या बोलण्यात "कॅलक्युलेटिव्ह"पणा अजिबात नसणार होता. असणार होती ती उत्स्फूर्तता. मनाच्या आतल्या गाभ्यातून आलेले शब्द. त्यात स्वार्थ नव्हता, व्यवहार नव्हता, हिशेब नव्हता. असणार होती सहजता, प्रेम, आपुलकी, सहानुभूती. आपल्यात बदल होतोय असे त्यालाच वाटत होते.

नेहमीप्रमाणे समारंभास सुरुवात झाली. कंपनीचा ताळेबंद वाचून दाखवण्यात आला. गेल्या वर्षी कंपनीने जोरदार कामगिरी बजावली होती. नफ्यात पंचेचाळीस टक्के वाढ साध्य करण्यात आली होती. टर्नओव्हरही पस्तीस टक्क्यांनी वाढला होता. एक्सपोर्ट सत्तर टक्क्यांनी वाढला होता. शेअर्सची किंमत संपूर्ण वर्षभरात बारा टक्क्यांनी वाढली होती. कुठल्याही दृष्टीने कंपनीची कामगिरी लखलखीत होती. एकेक गोष्ट सांगितली जात होती तसातसा टाळ्यांचा गजर वाढत होता. वडिलांना आदरांजली वाहिली गेली तेव्हा हजारो लोक स्तब्धपणे उभे राहिले. त्यालाही भरून आले. वडिलांनी शेअर मार्केटमध्ये क्रांती घडवून आणली होती. छोट्याछोट्या गुंतवणूकदारांना त्यांनी शेअर मार्केटचा लळा लावला. देशभरात पस्तीस लाख लोक कंपनीचे शेअर्स होल्डर असणे ही चेष्टा नव्हती. वडिलांच्या कामगिरीपुढे आपली कुठलीही कामगिरी खुजीच वाटेल. इतर सर्व झाल्यावर तो आपल्या खुर्चीत नीट सरसावून बसला. माईकची अॅडजस्टमेंट झाली. सुई पडली तरी आवाज येईल अशी शांतता होती.

"मित्रांनो, तुम्हा सर्वांना इथे बघून माझे मन भरून आलेय. तुमचा या कंपनीबद्दलचा असलेला जिव्हाळाच यातून दिसतो. याला कारणीभूत आहेत माझे वडील. गेल्या चोवीस वर्षांत ते सतत शेअरहोल्डरचा फायदा बघत आले. प्रत्येक वर्षी न चुकता डिव्हिडंड, विशिष्ट कालावधीनंतर बोनसची घोषणा, चोख हिशेब, वेळेवर पैसे देणे ही त्यांची वैशिष्ट्ये आजही वाखाणली जातात. आमच्याकडे त्यांचा समृद्ध वारसा आला आहे. तो जपणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही ते कर्तव्य अत्यंत कठोरपणे पार पाडू, हे आम्हा दोघा भावांच्या वतीने मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतो. यावेळीही आम्ही घसघशीत लाभांशाची घोषणा करत आहोत. तुम्ही सर्व लोक आमचे आश्रयदाते आहात. तुमच्या विश्वासामुळेच ही कंपनी सतत पुढे जातेय व त्यामुळेच जगातील फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये भारतातील ही एकमेव खाजगी कंपनी आहे. आपणा सर्वांना त्याचा अभिमान वाटावा अशीच ग्रुपची कामगिरी आहे. मी आज तुम्हा सर्वांशी आमच्या कंपनीच्या लख्ख कामगिरीबद्दल फक्त बोलणार नाहीय. मला तुमच्याशी आज आणखी खूप काही बोलायचेय ते मी एरव्ही तुमच्याशी कधीच बोलू शकणार नाही. मी जे बोलणार आहे ते नेमकेपणाने ठरवलेले नाही. ते खूप आतले आहे म्हणूनच खरे आहे. आपण एकमेकांचा फायदा कसा होईल हे आजपर्यंत बघत आलो. पण हे सर्व फायद्याच्या पलीकडचे आहे. मी गेल्या दोन महिन्यांत जे अनुभवले आहे, बघितले आहे, ऐकले आहे त्याने सुन्न झालोय. बधीर झालोय. माझी स्वतःबद्दलची, जगाबद्दलची, माणसांबद्दलची, जगण्याबद्दलची समजूत वाढलीय. मी जे तुम्हांला सांगणार आहे ते आत्मिक समृद्धीबद्दल आहे. त्याने नेमका फायदा काय होतो, हे ठरवणे अवघड आहे. त्याचे मोजमाप करता येत नाही."

"या देशात दोन देश आहेत. एक आहे सर्वांचा "इंडिया", जेथे आपण सर्व राहतो. आपल्या सर्वांना "पुढे पुढे " जायची घाई आहे. त्यासाठी बहुतेकांना सुखसोयी, संधी उपलब्ध आहेत. आपल्यापैकीच काही जण या देशातील घाणीला, भ्रष्टाचाराला, कारभाराला वैतागून आणखी सुखसोयीसाठी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांत जाऊन राहतात. त्यांना इथल्यापेक्षा अधिक चांगल्यापैकी चंगळवाद करता येतो. खरे तर ते येथील परिस्थितीला बघून नाही; तर स्वतःच्या अधिक सुखासाठी हे देश सोडून गेलेले असतात. मलाही ही संधी उपलब्ध होती. पण वडिलांनी सांगितले जे काही करायचेय ते या मातीसाठी या मातीत राहून करायचेय. आपले जे काही बरे-वाईट होईल ते इथेच. त्यांचे ऐकून मी देशात परत आलो. अमेरिकेत दहा वर्षे राहिल्यावर इथे राहणे अवघड गेले होते. पण वडिलांनी सांगितले, “सगळेच इथून पाय लावून पळू लागले तर इथल्यांचे भले कोणी करायचे? आपणच ना? दुसरे कोणी आपले भले करेल ह्याच्यावर भरवसा ठेवू नका, आपणच आपले भले करायचेय." मी त्याप्रमाणे कामाला लागलो. आज मी जो काही आहे तो वडिलांच्या शिकवणीमुळे. भारतात राहून उद्योगधंदा करायचा असेल तर तुम्हाला सर्वांना मॅनेज करावे लागते. तुम्ही धुतल्या तांदळासारखे असूच शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे की शोकांतिका हे प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे ठरवावे. गेल्या तीस वर्षांत आम्ही एवढे पुढे आल्याबद्दल पुष्कळणण आमच्यावर नाना आरोप करतात. मग मी म्हणतो इथे सर्वांनाच "मॅनेज" करण्याची समान संधी आहे. मग आम्हीच का पुढे गेलो? आमचे एकेक प्रॉडक्शनचे प्लॅट असोत नाहीतर इनफोकॉम सिटी, सर्व काही ग्लोबल दर्जानुसार आहे. जागतिक ख्यातीचे तज्ज्ञ हे सर्व पाहतात व अचंबित होतात. भारतात जागतिक दर्जाचे काही असू शकते यांवर त्यांचा विश्वास बसत नाही. आम्ही ते केलेय. पस्तीस लाख शेअर होल्डर्सचा विश्वास आम्ही संपादन केलाय, तो त्यांना फसवून अथवा मॅनेज करून नव्हे. कधीकधी आम्ही रस्ता भरकटलो असू नाही असे नाही पण लगेच स्वतःला सावरलेसुद्धा." 

"या "इंडिया "मध्ये राहून तुम्ही-आम्ही स्वतःची प्रगती करून घेतली अथवा घेतो आहोत. ही चांगली गोष्ट आहे पण याहीपलीकडे आणखी एक देश आहे तो म्हणजे "भारत". या देशात किमान पंचवीस कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जगतात. ह्यात आदिवासी, शेतावर राबणारे मजूर, शहरात रस्त्यांवर झोपणारे लोक, खेडेगावात कसलाच कामधंदा नसणारे लोक असे कितीतरी लोक आले. गेल्या पन्नास वर्षांत देशाचा विकास नक्कीच झाला. कित्येक बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. एवढे मोठे उद्योगधंदे निर्माण झाले, पंचवीस कोटी मध्यमवर्गीयांची मोठी बाजारपेठ निर्माण झाली वगैरे. पण मग या भारताचे काय? मला मधे कंटाळा आला होता. काहीसे डिप्रेशन आले होते. मी तेच तेच करतोय असे वाटत होते म्हणून मानसोपचार तज्ज्ञाने वेगळे आयुष्य बघण्याचा सल्ला दिला. मी तो मानला आणि माझ्या समजुतीमधे आमूलाग्र बदल घडला. मी पुरुषवेश्या बघितली. पुरातून, दंगलीतून उद्ध्वस्त झालेली माणसं बघितली, बारा तेरा वर्षांच्या वयात लैंगिक छळ झालेली मुलं बघितली, मला आणखीही बरेच काही बघता आले असते; पण सहन झाले नाही. आपल्या घरी एक तास पाणी गेले की आपण चिडतो. मुंबईत कधी लाईट जात नाही. खेडेगावात बायका कित्येक किलोमीटर एका हंड्याच्या पाण्यासाठी वणवण करतात. तेथे दहा-बारा तास वीज नसते. माझ्यासारख्या उद्योगपतींचा राजकारण्यांमुळे प्रचंड फायदा झाला; पण हेच राजकारणी भारतामधील लोकांना क्षुल्लक फायद्याचे आमिष दाखवून फसवतात, लुबाडतात. राजकारणाशी आपल्याला काय देणे घेणे, असे आपण म्हणतो. पण वस्तुस्थिती ही आहे की राजकारण आणि राजकारण्यांनी आपले सर्वांग व्यापलेय. राजकारण हे आपल्या जीवनाचाच एक भाग आहे. त्यांच्या बर्या वाईट निर्णयाचे आपल्या सर्वांगावर परिणाम होतात. आपण राजकारणापासून दूर होऊ शकत नाही.”

“ह्या भारतातील लोकांचे आयुष्य बघून मला गौतम बुद्धांची आठवण झाली. कुष्ठरोगी बघून, त्याचे दुःख बघून राजकुमार सिद्धार्थ सर्व परित्याग करून बुद्ध झाला. त्याने आपल्या सर्वांना अमोल विचार दिले. आज आपण बघतो. की बुद्धाचाही फक्त धर्म उरलाय; विचारांचे आचरण कोणीच करत नाही. आपण सर्व बघतो की लोक मंदिरात, चर्चमध्ये, मशिदीमध्ये जातात, तेथे चांगल्या विचारांची प्रवचने ऐकतात पण आचरणात मात्र काहीच आणत नाहीत. जात, भाषा, प्रांत, धर्म या सर्वांमध्ये आपण विभागले गेलोत. या सर्व गोष्टींचा नव्याने विचार करण्याची प्रचंड प्रमाणात जरूरी निर्माण झालीय. मला वाटले आपणही सर्व गोष्टींचा त्याग करावा; व "माणुसकी नावाचा नवीन धर्म तयार करावा व लोकांचे दुःख नष्ट करण्यात उरलेले आयुष्य घालवावे." पण, मग लक्षात आले की आपल्याही धर्माचा पुढे पंथ निर्माण होईल. लोक आणखी एका पंथात विभागले जातील. बुद्धाचे तेच झाले. गांधींचे तेच झाले व आंबेडकरांचेही तेच झाले. मनुष्य जातीला मिळालेला हा शाप आहे का? आपण विचार केला त्याप्रमाणे कृती केली तर हा शाप दूर होऊ शकतो. मी आदर्शवादी नाही, व्यवहारवादी आहे, किंबहुना त्यामुळेच हा विचार करू शकतोय."

"आपण भारतीय खोटे आहोत, दांभिक आहोत, वृथा परंपराचे ओझे बाळगणारे आहोत. आपल्याला कोणीतरी "देव" लागतो, "महात्मा" लागतो, "मसिहा" लागतो. त्याच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे टाकून आपण मजा करायला मोकळे असतो. त्यामुळे आपल्याकडे फक्त विचार निर्माण झाले; कृती झाली नाही. म्हणून आपल्यावर शेकडो वर्षे आक्रमणे होत राहिली व आपण पराभूत होत आलो. जगताना "व्यावहारिक" असण्याचे भान आपण कधी बाळगलेच नाही. त्याने आजपर्यंत भयंकर नुकसान झालेय."

"इंडिया "मधील लोक “भारता” मधील लोकांना तुच्छ समजतात, "इंडियाला" असलेला डाग आहे, असे समजतात. त्यांच्यामुळे इंडियाची प्रगती थांबली आहे असे मानतात, भारतातील लोक नष्ट झाले तर बरे, असेही त्यांना मनातून वाटत असेल. तशीच परिस्थिती हिंदू- मुसलमानांची आहे. बहुतेक हिंदूंना मुसलमान लोक नष्ट झाले पाहिजेत असे वाटते. त्यांच्यामुळे देशावर संकटांची मालिका कोसळतेय वाटते. आपला शत्रू पाकिस्तान आहे की मुसलमान हे आपण एकदा नीट ठरवले पाहिजे. मुसलमान आपले शत्रू आहेत, असे मानले तर नेमके काय होते? मुसलमानांमध्येही आपल्याबद्दल संशय, भीती व राग निर्माण होतो. त्यातून तेही बाँबस्फोटासारखी कृत्ये करत राहतात. समजा पंधरा कोटी मुसलमान सक्षम, सुशिक्षित, सधन झाले, तर काय होईल? हिंदूंना आपल्याच देशात प्रचंड मीठी बाजारपेठ निर्माण होईल. पंधरा कोटी मुसलमान म्हणजे दोन मोठ्या युरोपीय देशांएवढी लोकसंख्या. मुसलमान तसे झाले तर आत्मघातकी कृत्य करण्यास धजावणार नाहीत. तेच मुसलमान तसे झाले व हिंदूंच्या मुख्य प्रवाहात ते सामील झाले तर महमदअली रोडवर जाऊन सुलेमान मिठाईवाल्याकडे जाऊन रमजानचे दिवस मजा करण्याची गरज उरणार नाही, असे अनेक सुलेमान मिठाईवाले आपल्याला नाक्यानाक्यावर मिळतील. हे मी फक्त उदाहरण म्हणून सांगितले. खरे तर आपल्या शेजारी राष्ट्रानेही तो विचार करण्याची गरज आहे. आज जग कुठे चाललेय ह्याचे आपल्याला पुरेसे मान नाही. “युरो" चलन डॉलर्सपेक्षा मजबूत होत चाललेय. ह्याचे कारण तुम्हांला माहितेय? बारा युरोपीय देश आपले मतभेद विसरून एकत्र आलेत व लवकरच त्यांची संख्या पंचवीस होणारेय. आपले चलन मजबूत कधी होणार? अशा तऱ्हेने कधीच नाही कारण आंतरराष्ट्रीय व्यापारात आपला वाटा नगण्य आहे. भारतीय वस्तूंकडे संशयित नजरेने बघतले जाते. कारण पन्नास वर्षे आपण समाजवादाचे फायदे उपभोगले. परिणाम? जगात आपली किंमत शून्य व "भारत" व "इंडिया" हे दोन देश निर्माण झाले.

"समाजवाद ही संकल्पना म्हणून चांगली. पण साम्यवादी व समाजवादी राष्ट्रांचे निघालेले धिंडवडे आपण बघतोच आहोत. चर्चगेट स्टेशनला उभे राहून टाटा, अंबानी, बिर्ला किंवा मी गोरगरिबांमध्ये संपत्तीचे वाटप करू शकत नाही. ह्याला समाजवाद म्हणत नाहीत. आपल्याकडे समाजवादाच्या काहीशा अशा स्वरूपाच्या भोंगळ कल्पना होत्या. त्याने श्रीमंत अधिक श्रीमंत झाले व गरीब अधिक गरीब झाले. मग आदर्श काय? आपण सर्वांनी मिळून डोळ्यांवरची झापडे काढून शोधले पाहिजे."

"भारत अधिक गरीब व इंडिया अधिक श्रीमंत होऊन आपले फायदे होणार आहेत काय? हे मुंबईत परप्रांतीय लोंढे थांबवा म्हणण्यासारखे आहे. ते इथे का येतात, ह्याचा मुळात विचार केला पाहिजे. उत्तर प्रदेश व बिहार मागास राहण्यात आपला तोटा आहे; कारण त्यांचे लोंढे तोपर्यंत इथे येतच राहतील. त्या राज्यांचा विकास होण्यात आपला फायदा आहे. इथे गुन्हेगारी वाढलीय. खंडणीखोरांचे प्रमाण वाढले. दरोडे, लुटी वाढल्यात. ते वाढणारच. कारण समाजात मोठ्या प्रमाणावर असमानता होतेय, असंतोष वाढतोय, तुम्ही "भारत" व "इंडिया" हे वेगळे कंपार्टमेंट करूच शकत नाही; कारण दोघांनाही इथेच राहायचेय व सुखाने नांदायचेय. त्यासाठी इंडियाने भारताकडे अधिक सहानुभूतीने, समजुतीने बघितले पाहिजे व वागले पाहिजे. दारिद्र्यरेषेखालील पंचवीस कोटी लोक सधन बनण्यात आपला फायदा आहे." 

“मघाशी आपण दांभिक व खोटे आहोत असे मी बोललो. आपल्याला संत ,महात्मे यांचे वेड आहे, ते आपल्याला आदर्श वाटतात. संपत्तीचे आपल्याला वडे आहे असे आपण दाखवतो व दुसरीकडे ती मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतो. आपले आदर्श वैज्ञानिक, उद्योगपती का नाहीत? प्रामाणिकपणे कष्ट करून खूप संपत्ती. निर्माण करण्यावर व त्याचा योग्य तो विनिमय करण्यावर आपला विश्वास का नाही? आपल्याला तसे शिकवले गेले नाही. महात्मा गांधी मोठे असतील पण मला त्यांच्यापेक्षा टाटांचे काम अधिक महत्त्वाचे वाटते. असे अनेक टाटा निर्माण होण्याची आपल्याला गरज आहे. "

“देशाचा विकास झाला असे कधी मानायचे? इंडियातील लोकांची परिस्थिती बघून, की भारतातील लोकांची परिस्थिती बघून? माझ्या मते भारतातील लोकांची परिस्थिती हा विकासाचा निर्देशांक आहे. त्यांना कामधंदा दिला पाहिजे; अधिक रोजगार निर्माण झाला पाहिजे, त्यांना संधीची समानता लाभली पाहिजे. सगळी माणसं सारखी असूच शकत नाहीत. निसर्गानेच भेदभाव निर्माण केला आहे. त्याच्याशी भांडण्यात अर्थ नाही. काही लोक आळशी, कामचुकार, गुन्हेगार प्रवृत्तीचे वगैरे असणारच. पण आपल्या इथे त्याचे प्रमाण भयावह आहे. मानवाच्या इतिहासात आदर्श संस्था कुठली? आदर्श असे काहीच नसते. सर्वगुणसंपन्न काहीच नसते. कोणीच नसते. आपण त्याच्या जवळ जायला बघायचे. संपत्तीचा द्वेष करू नका. ती अधिकाधिक निर्माण होईल हे बघा. आपण अमेरिकेचा द्वेष करतो. आपण स्वतः अमेरिकेसारखे बलशाली राष्ट्र बनण्याचा प्रयत्न का करत नाही? बलशाली बनणे म्हणजे अण्वस्त्रधारी बनणे नव्हे. आज जग अर्थकारणावर चालते. तुम्ही जगापासून अलिप्त राहू शकत नाही. नाहीतर तुमचा म्यानमार देश होईल. व्यवहार सर्वांत महत्त्वाचा असतो.

चांगलेपणाने जगणे सर्वोत्त महत्त्वाचे असते. त्यासाठी तसे वातावरण तयार करण्याची गरज आहे. हे वातावरण तयार करणे, आपल्या सर्वांच्या हातांत आहे. हे काम फक्त राजकारणीच करू शकतात, ही आपण सोईस्कर समजूत करून घेतली आहे. राजकारणी कोण आहेत? ते आपल्यातूनच आलेत. आपण त्यांना नको इतके महत्त्व दिले. सगळे निर्णय त्यांच्या हातांत सोपवले व स्वतः त्यापासून फटकून राहिलो म्हणून हा केऑस निर्माण झालाय. परिस्थिती हाताबाहेर गेलीय. पण, ती नियंत्रणात आणणे आपल्याच हातांत आहे. निराश होऊन चालणार नाही. एकजुटीने एकदिलाने प्रयत्न होणे जरुरीचे आहे. त्यासाठी आपल्या भोवतीच्या कृत्रिम भिंती गळून पडाव्या लागतील. त्याने आपलाच फायदा आहे. स्वार्थी असणे मनुष्याचा स्वभावधर्म आहे. ते नैसर्गिक आहे. तो सर्वांच्या फायद्याचा असेल तर अधिक उत्तम. गांधीजी त्या अर्थाने स्वार्थी होते. भारताचे पारतंत्र्य जावे ही त्यांची स्वतःची आत्मिक गरज होती. त्यासाठी ते झटले. आपण त्यांचा आदर्श या बाबतीत ठेवला पाहिजे. त्यासाठी विचारांचा मोकळेपणा हवा. पण विचारसरणी आपल्या सर्वांचे बरे करू शकते हे खरे नाही. आपले भवितव्य आपल्या हाती आहे. ते दुसरे कोणी घडवू शकत नाही. मी बुद्ध बनायला निघालो होतो.

अंगावर भगवी वस्त्रं घालायचेच बाकी ठेवले होते. कारण माझ्यावरही परंपरांचे ओझे आहे. हाच मार्ग मुक्ती देऊ शकतो; मोक्ष देऊ शकतो असे वाटत होते. मग स्वतःशीच विचार केला, समजूत वाढवली. आजचे जग अधिक गुंतागुंतीचे आहे. डोळ्यांवरची झापडे काढण्याचा प्रयत्न केला. यापुढील माझ्या आयुष्याचे ध्येय भारतातील लोकांचे अधिक भले करण्याचे आहे. त्यासाठी तुम्ही साथ देण्याचा प्रयत्न करा. कोणाचा द्वेष करू नका. स्वतःकडे न्यायाधीशाची भूमिका घेऊ नका. मोकळेपणाने जग बघा. यासाठी मी बुद्धाचा मार्ग स्वीकारून नवीन धर्म तयार करणार नाही. त्यांच्यापैकी कोणाच्याच मार्गाने जगातील माणसांचे दुःख दूर झालेले नाही. मी व्यवहारी आहे. त्या मार्गाने काय करता येईल ते मला बघायचेय. भारतीय परंपरेत त्याला स्थान नसेल. पण मला त्याची पर्वा नाही."

"मी आज खूप जास्त बोललो. चांगला बोललो का, ते मला माहिती नाही. मनापासून बोललो हे मात्र नक्की. देव्हारे बांधणे मला मंजूर नाही. तुम्ही मला देव्हार्यात कधी बसवू नका. मी साधा माणूस आहे. रोज चुका करतो. कदाचित माझे भाषणही चूक असेल. तसे असेल तर माझी चूक मला सुधारू द्या. एवढ्या वेळ शांतपणे बसून राहिल्याबद्दल आभारी आहे. यानंतर सर्वांनाच जेवण आहे. व्यवहार कोणाला चुकला नाही.”

एवढे बोलून त्याने समोरच्या ग्लासमधील पाणी संपवले तेव्हा टाळ्यांचा गजर होत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो गेटवेवर एकट्याने फिरायला आला. गेटवे ऑफ इंडिया! भारताचे प्रवेशद्वार. गेटवेसमोर टाटांनी जिद्दीतून निर्माण केलेले ताजमहाल हॉटेल आहे. इथेच गेटवेसमोर भारताच्या विविध भागांतून आलेले असंख्य भिकारी बसलेले असतात. रात्रीच्या अंधारात ताजच्या दोन्ही इमारती अधिक खुलून दिसतात. त्याचवेळी इथे असंख्य अवैध धंद्यांना सुरुवात झालेली असते. तो पहिल्या भिकाऱ्याला शोधत होता.

Tags: Ambani Ratan Tata Babri Demolition Godhra Riots Myanmar Australia London Usa Gateway Of India Mumbai Taj Mahal Hotel Mahatma Gandhi Dr. Babasaheb Ambedkar Gautam Buddha अंबानी रतन टाटा बाबरी विध्वंस गोध्रा दंगल म्यानमार अस्ट्रेलिया लंडन अमेरिका गेटवे ऑफ इंडिया मुंबई ताजमहाल हॉटेल महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके