डिजिटल अर्काईव्ह

एकाच आठवड्यात समाजवादी चळवळीतील दोन शिलेदारांचे निधन झाल्याने, महाराष्ट्रातील लाखो पुरोगामी व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्यावर दुःखाचे सावट आहे. त्या दोघांचे आणि त्या दोघांवरचे विपुल म्हणावे इतके लेखन साधनात प्रसिद्ध झालेले आहे, त्या दोघांचा या ना त्या कारणाने संबंध आहे किंवा उल्लेख आलाय अशा लेखांची संख्याही बरीच आहे. तो एकूण आकडा पाचशे तरी आहे आणि ते सर्व लेख साधनाच्या वेबसाइटवर वाचता येतात. त्यामुळे, त्यांच्या कार्य कर्तृत्वाविषयी वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असे काय प्रसिद्ध करता येईल.

9 जुलै 1933 रोजी, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका व्यापारी कुटुंबात जन्म झालेल्या पन्नालाल सुराणा यांचे 2 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर येथे निधन झाले. 93 वर्षांच्या आयुष्यातील सात दशके ते सार्वजनिक जीवनात सचोटीने व चिकाटीने कार्यरत होते. या संपूर्ण काळात समाजवाद हा त्यांच्यासाठी केवळ राजकीय विचार नव्हता, तर जीवननिष्ठा होती. मनोविकास प्रकाशनांकडून आलेल्या त्यांच्या आत्मकथेचे नावही 'पायपीट समाजवादासाठी' असेच आहे. 'राष्ट्र सेवा दल' पासून 'आपले घर'पर्यंतच्या अनेक संस्था संघटनांशी ते जोडलेले होते. अनेक सभा समारंभात ते सामील होत होते. अनेक चर्चासत्रे व कार्यक्रम उपक्रम राबवत होते. अनेक सामाजिक प्रश्नांवर लढत होते. अखेरपर्यंत ते कार्यरत होते. त्यांनी देहदान केले, त्यांचा देह सोलापूर येथील डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला गेला. अनेकविध विषयांवर ते सातत्याने लेखन करीत होते. त्यांनी साधना साप्ताहिकात 1953 मध्ये पहिला लेख लिहिला, तेव्हा ते केवळ 20 वर्षांचे होते. आणि त्यांचे साधनातील सर्वांत अलीकडचे लेखन (म्हणजे त्यांची अतुल देऊळगावकर यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत) 30 ऑगस्ट 2025 च्या अंकात आहे. दरम्यानच्या 73 वर्षांत त्यांनी साधनात लिहिलेल्या लहान-मोठ्या लेखांची संख्या दोनशेपेक्षा अधिक आहे.

1930 ते 2025 असे 95 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाबा आढाव यांचे 8 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत त्यांचे पार्थिव (कोणतेही धार्मिक विधी न करता) अर्पण केले गेले. राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून घडलेल्या आणि समाजवादी शील अखेरपर्यंत जपणाऱ्या बाबा आढाव यांनी तब्बल पाऊण शतक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सकारात्मक हस्तक्षेप केला. आयुष्याच्या पूर्वार्धात ते राजकीय परिवर्तनासाठी लढत राहिले. पण तिथे टिकून राहण्यासाठी प्रवाहपतित होण्यापेक्षा, सामाजिक परिवर्तनासाठी लढत राहणे त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात पसंत केले. सामाजिक न्यायासाठी आणि समतेसाठी त्यांनी उभे आयुष्य खर्च केले. त्यांनी सुरू केलेली, 'एक गाव एक पाणवठा' ही सत्तरच्या दशकातील केवळ एक चळवळ नव्हती, अनेक आंदोलनांना आणि कार्यकर्त्यांना त्या चळवळीने जन्म दिला. अनेक उपेक्षित घटकांचे अनेक प्रश्न त्या चळवळीने चव्हाट्यावर आणले. एक गाव एक पाणवठा ही चळवळ चालू असताना, बाबांनी लिहिलेले गावोगावचे वृत्तांत साधना साप्ताहिकात प्रसिद्ध होत होते, नंतर ते लेख पुस्तकरूपाने आले, मराठीतील ते विशेष महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. बाबांनी साधना साप्ताहिकात पहिला लेख त्यांच्या वयाच्या पंचविशीच्या टप्प्यावर असताना म्हणजे 1957 मध्ये लिहिला, त्यानंतरच्या सत्तर वर्षांत त्यांनी साधनात शंभरांहून अधिक लेख लिहिले. बाबांच्या नव्वदाव्या वाढदिवसाला हरी नरके यांनी अप्रतिम दीर्घ लेख लिहिला होता, तो साधनाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केला होता. त्या लेखाचे शीर्षक 'म्हातारा न होणारा डोंगर' असे दिले होते. अगदीच खरे होते ते. अखेरपर्यंत कार्यरत राहिलेला हा डोंगर म्हातारा न होता अनंतात विलीन झाला आहे.

एकाच आठवड्यात समाजवादी चळवळीतील दोन शिलेदारांचे निधन झाल्याने, महाराष्ट्रातील लाखो पुरोगामी व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्यावर दुःखाचे सावट आहे. त्या दोघांचे आणि त्या दोघांवरचे विपुल म्हणावे इतके लेखन साधनात प्रसिद्ध झालेले आहे, त्या दोघांचा या ना त्या कारणाने संबंध आहे किंवा उल्लेख आलाय अशा लेखांची संख्याही बरीच आहे. तो एकूण आकडा पाचशे तरी आहे आणि ते सर्व लेख साधनाच्या वेबसाइटवर वाचता येतात. त्यामुळे, त्यांच्या कार्य कर्तृत्वाविषयी वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असे काय प्रसिद्ध करता येईल, याचा शोध आम्ही घेत आहोत; ते लेखन क्रमशः किंवा एकाच अंकात देण्याचा विचार करीत आहोत. त्या दोघांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी