डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेल्या तंत्रज्ञानाच्या घोडदौडीमुळे ही सगळी संकटे निर्माण झाली आहेत हे खरे, पण म्हणून ‘विज्ञानच नको’ असे म्हणून चालणार नाही. त्याचा मानवी हिताच्या दृष्टीने उपयोग करायलाच हवा. त्यासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, यावर लेखिकेने भर दिला असून; त्या दिशेने विविध देशांत व भारतातही चाललेल्या सौर ऊर्जा, सेंद्रिय शेती आदींची माहिती या पुस्तकात दिली आहे.  इतर अनेक पुस्तकांप्रमाणे याही पुस्तकात वाचक म्हणून समोर ठेवला आहे, तो नोकरीवाला, पैसेवाला, मध्यमवर्गीय माणूस. खरे म्हणजे समाजात त्यांची संख्या फार थोडी असून शेती, बाजारपेठ आदी जीवनोपयोगी व्यवहार चालवणारे जे बहुसंख्य कष्टकरी लोक आहेत, त्यांना येणारे अनुभव व त्यांनी त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबद्दल लेखकांनी विचार करून आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत.
 

कोरोना या बारीकशा विषाणूने सगळ्या मानवजातीला वेठीस धरले आहे. निसर्गातल्या अनुकूल गोष्टींचा उपयोग करून घेऊन माणसाचे जगणे सुखकर बनवता येते. विषारी वनस्पती, पशुपक्षी, प्राणी यांच्यापासून आपले संरक्षण करण्याचे कसब माणसाला सहज अवगत करून घेता येते. माणसाच्या शरीराची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. गेल्या काही शतकांत क्रमाक्रमाने हाडे, हृदय, शिरातून होणारे रक्ताभिसरण, मांसपेशींची रचना, पचनक्रिया याबद्दलची माहिती माणसांना मिळाली व त्यातून आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे याबद्दलचे शास्त्र वैज्ञ़ानिकांनी विकसित केले. शरीरातील रासायनिक प्रक्रियांची माहितीही आता उपलब्ध झाली आहे. ती फारच गुंतागुंतीची आहे. म्हणून डॉ.सुनीती धारवाडकर यांनी आपल्या पुस्तकाला ‘अद्‌भुत जैविक विश्व’ हे नाव दिले आहे. अद्‌भुत या शब्दामुळे काही तरी गूढ आहे, असा समज होतो. पण आता त्याबद्दलची बहुतेक सगळी माहिती उपलब्ध झाली आहे. त्या प्र्रक्रियांची रचना इतकी गुंतागुंतीची आहे की, ते पाहून माणसाचे मन स्तिमित होते एवढेच. मात्र सामान्य माणसांनीसुद्धा आपल्या आरोग्यरक्षणासाठी ती सर्व माहिती समजून घेणे जरुरीचे आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींशी सहज गप्पा माराव्यात अशा पद्धतीने, अतिशय सोप्या भाषेत लेखिकेने ती माहिती दिली आहे.

मानवी शरीर व वनस्पती यांच्यातील रासायनिक प्रक्रियांची माहिती मिळाल्याने जैवतंत्रज्ञान या ज्ञानशाखेचा विकास झाला असून, एका सजीवाच्या जीन्समधून काही गुणसूत्रे काढून दुसऱ्या सजीवात घालण्याने संकरित बियाणे मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ लागले आहे. बी.टी कॉटन या बियाणामुळे उत्पादन खूप वाढते हे खरे आहे. पण रासायनिक खते व किटकनाशके यांचाही वापर जास्त करावा लागतो. त्याचे अनिष्ट परिणाम त्या वस्तूवर तर होतातच, शिवाय जवळपासच्या अन्य पिकांवर आणि जमिनीच्या पोतावरही होतात, असे लेखिकेने पुराव्यासह मांडले आहे. बटाट्यात कोंबडीची काही गुणसूत्रे घालून अधिक पौष्टिक बटाटे करण्यात आले आहेत. पण नैसर्गिक प्रक्रियांमध्ये इतका हस्तक्षेप केला तर त्याचे आज न समजणारे खूपच हानीकारक परिणाम होऊ शकतात, असा इशारा लेखिकेने दिला आहे. मागील आठवड्यात हरिद्वारच्या उत्तरेकडील हिमनग फुटून जो प्रलंयकारी महापूर आला, त्यात विद्युतनिर्मितीचे दोन प्रकल्प उद्‌ध्वस्त झाले आहेत. त्या प्रदेशात नद्यांना अडवून धरणे बांधणे अतिशय हानीकारक ठरतील, असा इशारा अनेक निसर्गप्रेमी वैज्ञानिकांनी दिला होता. प्रा.अग्रवाल या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने त्यासाठी उपोषण करून प्राणांचे बलिदानही दिले होते. हे लक्षात घेऊन निसर्गावर वर्चस्व गाजवणाच्या ईर्षेला विवेकाचा लगाम लावणे फार आवश्यक आहे. माणसाने निसर्गशत्रू न होता निसर्गमित्र राहूनच वैज्ञानिक कर्म करावीत.

आपल्या पुस्तकाला लेखिकेने ‘कृत्रिम जीवनशैलीचे परिणाम’ हे उपशीर्षक दिले आहे. आपल्या शरीराला विषाणूंचा धोका अलीकडल्या काळात वाढला आहे. त्याचे मुख्य कारण गेल्या दोन-तीन शतकांत झालेल्या औ़द्योगिकरणामुळे पर्यावरणाचे प्रदूषण वाढले असून माणसाच्या शरीराला अन्न, पाणी, हवा व सूर्यप्रकाश शुद्ध स्वरूपात मिळणे दुरापास्त झाले आहे. कोळसा व तेल ही खनिज इंधने जाळून मोठ-मोठे कारखाने व वाहने चालवली जात आहेत. त्यातून बाहेर फेकला जाणारा CO2 हा विषारी वायू हवा, पाणी व जमीन यांच्यात प्रदूषण मिसळवतो आहे. अलीकडेच उपलब्ध झालेल्या टीव्ही व संगणकामुळे जी प्रकाशकिरणे बाहेर पडतात, त्यांचा अनिष्ठ परिणाम डोळे व अन्य अवयवांवर होतो आहे. या सर्व यांत्रिक साधनांच्या वापरामुळे शरीरावर होणाऱ्या भौतिक दुष्परिणामांच्या जोडीला सगळ्या जीवनशैलीत धावपळ वाढली असून, त्यामुळे मन व हृदय यावरही दुष्परिणाम होऊ लागले आहेत. सुखोपभोगाच्या नवनव्या वस्तू उपलब्ध होत असल्याने, म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी भांडवलदार वर्ग त्यांचे उत्पादन वाढवत असल्याने आणि विक्री वाढावी यासाठी केल्या जाणाऱ्या बीभस्त जाहिरातीमधून चंगळवाद वाढवला जात आहे. मनाला लागणाऱ्या त्या वाईट सवयींमुळेही शरीराचे आरोग्य बिघडत चालले आहे. ते सुदृढ ठेवायचे असेल तर ‘मन करा रे प्रसन्न’ असा बाळबोध सल्ला लेखिकेने दिला आहे. कोरोनामुळे माणसांना यातल्या काही धोक्यांची जाणीव होऊ लागली आहे. आपण नेहमी वापरतो त्यापेक्षा कमी वस्तू वापरूनही आपल्याला चांगले, सुखदायी व सर्जनशील जीवन जगणे शक्य आहे, हे आता माणसांच्या लक्षात यायला लागले आहे. या दिशेने आपली जीवनशैली व सामाजाचे आर्थिक व्यवहार यात आवश्यक ते बदल घडवायला या पुस्तकाने खूपच साह्य होणार आहे.

लेखिकेच्या भाषाशैलीचा सोपेपणा पुस्तकातल्या काही प्रकरणांच्या शीर्षकावरूनही दिसून येतो. उदा. दिव्याखाली अंधार, निद्रेची लयबद्ध आवर्तने, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, कोरोनासे डरो ना, मन करा रे प्रसन्न.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे झालेल्या तंत्रज्ञानाच्या घोडदौडीमुळे ही सगळी संकटे निर्माण झाली आहेत हे खरे, पण म्हणून ‘विज्ञानच नको’ असे म्हणून चालणार नाही. त्याचा मानवी हिताच्या दृष्टीने उपयोग करायलाच हवा. त्यासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे, यावर लेखिकेने भर दिला असून, त्या दिशेने विविध देशात व भारतातही चाललेल्या सौर ऊर्जा, सेंद्रिय शेती आदींची माहिती या पुस्तकात दिली आहे.

इतर अनेक पुस्तकांप्रमाणे याही पुस्तकात वाचक म्हणून समोर ठेवला आहे तो नोकरीवाला, पैसेवाला, मध्यमवर्गीय माणूस. खरे म्हणजे समाजात त्यांची संख्या फार थोडी असून शेती, बाजारपेठ आदी जीवनोपयोगी व्यवहार चालवणारे जे बहुसंख्य कष्टकरी लोक आहेत, त्यांना येणारे अनुभव व त्यांनी त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याबद्दल लेखकांनी विचार करून आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत. लॉकडाऊनच्या काळात टीव्ही व आकाशवाणीवरून सारखे सांगितले जात होते- घरात राहा. आता हा उपदेश कोणसाठी? खरोखरच सगळ्या लोकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी घरातच 24 तास बसून राहायचे ठरवले असते तर काय झाले असते? आपल्या समाजातील बहुसंख्य कष्टकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची सवय लेखक, संशोधक, प्रशासक, पत्रकार आदी सगळ्यांनी लावून घेतली पाहिजे.

अद्‌भुत जैविक विश्व

लेखक : डॉ. सुनीती धारवाडकर,
Mob. 9423734089
सौरभ प्रकाशक, औरंगाबाद
किंमत - रु. 150/-

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके