डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

समाजवादी ऐक्य व तरुणांवर विशेष जबाबदारी सोपवण्यावर कटाक्ष असणारा नेता...

अखेरीस पक्ष फुटला. मग भाई, मी व बापू मिळून आग्रह धरला की आपण सोशलिस्ट पार्टीचे पुनरुज्जीवन करावे. सुरेंद्र त्या वेळी राज्यसभेचे सभासद होते. त्यांच्या तीन मूर्ती लेनमधील बंगल्यावर बैठक झाली. ज्येष्ठ नेते मिठाची गुळणी धरून बसले. आम्ही विमनस्कपणे मुंबईला परलो. 1980 च्या निवडणुकीत जनता पक्षाचा दारुण पराभव झाला, मात्र पुढे बोफोर्स प्रकरणावरून काँग्रेस अडचणीत आली. विश्वनाथ प्रतापसिंहांच्या बंडखोरीमुळे त्या पक्षाचा पराभव झाला. चंद्रशेखर वा देवीलाल यांच्याऐवजी व्ही.पी.सिंग यांनाच पंतप्रधान करावे या दिशेने प्रयत्न करण्यात सुरेंद्र प्रमुख होते. ती मांडामांड झाल्यावर व्ही.पी. सुरेंद्रना म्हणाले की, तुमची राज्यसभेची मुदत संपत आली आहे, तर परत तुम्हालाच करू या. त्यावर सुरेंद्रजी म्हणाले, की जनता दलाच्या वतीने आपण अनुसूचित जातीच्या व्यक्तीला ते पद द्यावे. मग प्रकाश आंबेडकरांना ते तिकीट देण्यात आले.   

देशभरच्या समाजवाद्यांचे ज्येष्ठ बंधू असलेले सुरेंद्र मोहन यांचे 17 डिसेंबर 2010 रोजी सकाळी निधन झाले. 11 डिसेंबर रोजी मुंबईत सोशलिस्ट पार्टीच्या समितीच्या बैठकीत त्यांनी भाग घेतला होता. नेहमीप्रमाणे थोडी गरमागरमी झाली होती. 13 डिसेंबरला उमरावमल पुरोहित, डॉ.शांती पटेल यांना भेटले. संजीव आम्ही बोलत बोलत पुढील काही कार्यक्रम ठरवले. त्यामुळे 17 डिसेंबरला सकाळी फोन आला तेव्हा त्यावर विश्वासच बसेना. अजित झा म्हणाला की 16 रोजी संध्याकाळी भ्रष्टाचार विरोधी निदर्शनातही ते सामील झाले होते. अंबाला येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सुरेंद्र मोहन यांनी सोशिऑलॉजी घेऊन एम.ए. केले होते. काही दिवस शिकवण्याचे काम केले. पण समाजवादी चळवळीत स्वत:ला झोकून द्यावेसे त्यांना वाटले. पंजाबात काही दिवस मजूर संघटना व इतर कामे केल्यावर उत्तर प्रदेशात जायला त्यांना सांगण्यात आले. लखनौला पानदरिबा भागातील पक्ष कार्यालयातच रहायचे. आचार्य नरेंद्र देवांच्या हाताखाली शेतकऱ्यांचे व आदिवासींचे लढे त्यांनी चालवले. पक्षकार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे हे त्यांनी मुख्य काम मानले.

1953 साली प्रजा सोशलिस्ट पार्टी अस्तित्वात आल्यावर प्रेम भसीन यांनी त्यांना केंद्रीय कार्यालयात घेतले. मानधनाची शाश्वती नसायची. कधी कुणी मित्र जेवू घालायचे. पुढे मधु दंडवते लोकसभेत निवडून गेल्यावर त्यांना मिळालेल्या दोन फ्लॅटस्‌पैकी एका खोलीचा फ्लॅट सुरेंद्रजींना मिळाला. त्यांनी लग्न उशीरा केले. तरी देशातून आलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याचा मुक्काम त्यांच्याकडे असायचा. बाहेरून दहा- बारा रोट्या विकत आणायच्या. एखादी भाजी व लोणचे असे कामचलाऊ जेवण व्हायचे. 1974 च्या जे.पींच्या नवनिर्माण आंदोलनात सुरेंद्रजींनी अनेक राज्यांचे दौरे केले. अखिल भारतीय किसान तथा खेतमजदूर पंचायत या संघटनेत ते विशेष लक्ष घालीत. प्रसोपा व संसोपा यांचे एकीकरण करायची बैठक 1974 च्या जूनमध्ये हडपसरला घेतली होती. राजनारायण या वादळी नेत्याला पत्रकारांपर्यंत पोहोचू द्यायचे नाही असे त्यांनी सुचवल्यावरून मी तशी व्यवस्था केली. मग बिहारमधील जहानाबाद जवळ खेतमजदूर पंचायतीच्या अधिवेशनासाठी एस.एम., राजहंस व सुरेंद्रजी पुढे गेले. निवडणूक सुधारणासंबंधी तारकुंडे समितीच्या अहवालाचे मराठी भाषांतर करून मी दुसऱ्या दिवशी गेलो. ते तिघे अधिवेशनाचे काम लवकर संपवून परतताना आमची भेट झाली. चौघे पटन्याला रेल्वे स्टेशनच्या डॉर्मिटरीत थांबलो. फोनाफोनी केल्यानंतर कळले की, जे.पीं.ची दिल्लीत बोट क्लबवर फार मोठी सभा झाली, पण त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होईना, सकाळी सहा वाजता मी एका प्रवाशाच्या रेडिओवर ऐकले, ‘‘दि प्रेसिडेंट हॅज डिक्लेअरड इमरजन्सी. बट देअर इज नो रीझन टु पॅनिक’ (राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केली आहे, पण चिंता करण्याचे कारण नाही.) इंदिराजींचा चिरका आवाज वाटत होता शांत. पण दडलेली अस्वस्थताही प्रकटत होती.

मी अण्णांना उठवून सांगितले. खाली जाऊन पेपर घेतले. त्यात काही नव्हते. थोड्या वेळाने रामानंद तिवारी व काही कार्यकर्ते जीप घेऊन आले. ‘‘जे.पी. व मोरारजीभार्इंना अटक झालेली दिसते, पण नक्की काही कळत नाही’’ रामानंद काळजीच्या सुरात बोलत होते. मी सुरेंद्रजींना बाजूला घेऊन म्हटले, ‘आता आपण एकत्र राहणे बरोबर नाही, मी एका मार्गाने दिल्लीला येतो. तुम्ही दुसऱ्या मार्गाने या.’ अण्णा व राजहंस येथील कार्यकर्त्यांना भेटतील. तेथून भूमिगत राहणे सुरू झाले. सुरेंद्रजींनी काही पत्रके मधूनमधून पाठवली. जे.पीं.ना किडनीचा त्रास सुरू झाल्यावर त्यांना सोडण्यात आले. जसलोकमध्ये उपचार सुरू झाले. मधूनमधून सुरेंद्रजींची भेट होत होती.

चार पक्षांचा मिळून एक पक्ष करावा या सूचनेने चांगलाच जोर धरला होता. सोशलिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय समितीचे जेवढे सभासद बाहेर आहेत त्यांची बैठक मुंबईत बोलवायचे ठरले. जनसंघ व संघटना काँग्रेसबरोबर मिळून एक पक्ष करावा हे मला अजिबात रुचत नव्हते. सुरेंद्रजींना माझा युक्तिवाद पटायचा, पण एस.एम., नानासाहेब, मधु लिमये व मधू दंडवते यांच्यापुढे माझे काही चालत नाही म्हणायचे. राष्ट्रीय समितीची निमंत्रणे मी पाठवली. देशभर हिंडून एक अहवाल तयार केला, तो सर्वांना पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि अचानक नगर स्टेशनवर शरद राव आणि मी पकडले गेलो. पुढे मुंबईची बैठक झाल्याचे सुरेंद्रजींनी कळवले. 19 जानेवारी 1977 रोजी इंदिराजींनी लोकसभा निवडणूक घेण्याची घोषणा केली. मिसाबंदी कार्यकर्त्यांची सुटका होऊ लागली. लोक संघर्ष समितीतील जनसंघ, समाजवादी भारतीय क्रांतिदल व संघटना काँग्रेस यांचा मिळून ‘जनता पक्ष’ बनवल्याचे जाहीर झाले. मला त्यात जावेसे वाटत नव्हते, पण महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष म्हणून एस.एम. व सेक्रेटरी म्हणून माझे नाव सुरेंद्रजींनी जाहीर करून टाकले.

नाशिक तुरुंगातून सुटून मी मुंबईला पोहोचलो तर स्टेशनवर नारायण तावडे येऊन मला म्हणाले की, आपण अण्णांना एकटे सोडता कामा नये. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. इंदिरा राजवटीतील अत्याचार व जनहितविरोधी निर्णय यांचा एकेक बाँबगोळा सुरेंद्र मोहन रोज टाकत होते आणि देशभरची वर्तानपत्रे छापत होती. इंदिराजींची जुलमी राजवट जनतेने पाहतापाहता गुंडाळून टाकली. मग सरकारची निर्मिती, त्यातील ओढाताण वगैरे सुरू झाले. सुरेंद्रजी संघटनेचे काम सांभाळत राहिले..

सोशलिस्ट पार्टीच्या विसर्जनाचा ठराव पास करण्यासाठी रफी मार्गवर बैठक झाली. पक्षाचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस तुरुंगातच होते. आपला विरोध असल्याने त्यांनी सुरेंद्रजींना कळवले होते. बैठकीत मी व सुरेंद्र मोहन यांनी विरोध केला. आमचे ते अरण्यरुदन ठरले. सुरेंद्रजी भेटून म्हणाले, ‘चलो, यह भी करके देखा जाय.’ मंत्री बनण्याची घोडदौड सुरू झाली होती. मधु लिमये बाहेर राहिले. सुरेंद्रजीनीही तोच मार्ग अवलंबला. पक्षाचे धोरणविषयक निवेदन, घटना वगैरे करत राहिले. तिकडे ज्येष्ठ नेत्यांची वेगळीच भांडणे चालली होती. अखेरीस पक्ष फुटला. मग भाई, मी व बापू मिळून आग्रह धरला की आपण सोशलिस्ट पार्टीचे पुनरुज्जीवन करावे. सुरेंद्र त्या वेळी राज्यसभेचे सभासद होते. त्यांच्या तीन मूर्ती लेनमधील बंगल्यावर बैठक झाली. ज्येष्ठ नेते मिठाची गुळणी धरून बसले. आम्ही विमनस्कपणे मुंबईला परलो. 1980 च्या निवडणुकीत जनता पक्षाचा दारुण पराभव झाला, मात्र पुढे बोफोर्स प्रकरणावरून काँग्रेस अडचणीत आली. विश्वनाथ प्रतापसिंहांच्या बंडखोरीमुळे त्या पक्षाचा पराभव झाला. चंद्रशेखर वा देवीलाल यांच्याऐवजी व्ही.पी.सिंग यांनाच पंतप्रधान करावे या दिशेने प्रयत्न करण्यात सुरेंद्र प्रमुख होते. ती मांडामांड झाल्यावर व्ही.पी. सुरेंद्रना म्हणाले की, तुमची राज्यसभेची मुदत संपत आली आहे, तर परत तुम्हालाच करू या. त्यावर सुरेंद्रजी म्हणाले, की जनता दलाच्या वतीने आपण अनुसूचित जातीच्या व्यक्तीला ते पद द्यावे. मग प्रकाश आंबेडकरांना ते तिकीट देण्यात आले.  

तरी नेत्यांच्या आग्रहास्तव खादी ग्रामोद्योग कमिशनचे अध्यक्षपद सुरेंद्रजींना घ्यावे लागले. ते काम त्यांनी चांगल्याप्रकारे केले. ‘जनता’ या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादकपद त्यांनी स्वीकारले, दर आठवड्याला ते एक स्तंभ लिहीत. तो लेख देशातील शंभर-सव्वाशे दैनिकांत प्रसिद्ध होत असे. राज्यसभेचे पेन्शन त्या वेळी मामुली होते. दोन्ही मुले शिकत होती. लेखनातून होणाऱ्या कमाईमुळे घरखर्चाला हातभार लागत होता. मंजूबेनची तारांबळ चाललेली असायची. राष्ट्र सेवादलाच्या कामात सुरेंद्रजी पहिल्यापासून लक्ष घालत होते. अनेक शिबिरांना ते आले. बाबरी मशीद विध्वंसानंतर उत्तर भारतात ‘राष्ट्रीय एकता संमेलन’ घेण्याचे आम्ही ठरवले. सुरेंद्रजींनी रविकिरण जैन या अलाहाबादच्या ख्यातनाम वकिलांना स्वागताध्यक्ष होण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. मुलायमसिंग त्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडून मदत मिळवून दिली. सेवादलाच्या कामात अखेरपर्यंत ते लक्ष घालत राहिले. हिंद मजदूर सभेच्या कामातही ते भाग घेत. विशेषत: कार्यकर्त्यांचे वैचारिक प्रशिक्षण व्हावे असा त्यांचा प्रयत्न असे. ‘हिंद किसान मजदूर पंचायत’ व ‘हिंद मजदूर सभेचे’ एकीकरण घडवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाला ते नेहमी मदत करीत. बाबा आढावांच्या असंघटित श्रमिक चळवळीत त्यांनी आत्मीयतेने लक्ष घातले होते. देशभर त्यांचा संचार चालू असायचा.

17 व 18 सप्टेंबर रोजी काठमांडू येथे नेपाळी काँग्रेसचे सुवर्णहोत्सवी अधिवेशन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्रजी उपस्थित राहिले. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वच नेत्यांनी जमवून घेतले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. डॉ.लोहिया यांची जन्मशताब्दी चांगल्या प्रकारे साजरी व्हावी यासाठी सुरेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली. लेख व पुस्तिका लिहिल्या. येत्या 23 मार्च 2011 रोजी लोहियांचे जन्मगाव अकबरपूर येथे मोठा मेळावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. लहानापासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांशी ते मिळून-मिसळून बोलत. थट्टामस्करी करीत. समाजवादी ऐक्य व तरुणांवर विशेष जबाबदारी सोपवणे यांवर त्यांचा कटाक्ष असायचा. सुरेंद्र मोहन यांच्या प्रेरक स्मृतीला प्रणाम.

Tags: सोशलिस्ट पार्टी समाजवादी पक्ष आंदोलन जुलमी राजवट इंदिरा जनता पक्ष समाजवादी नेता सुरेंद्र मोहन पन्नालाल सुराणा आदरांजली socialist party samajwadi paksh andolan julmi rajvat Indira Gandhi janta party janta paksh samajwadi neta surendra mohan pannalal surana Adranjali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके