डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

उद्गीर येथील महाविद्यालयात अनेक वर्ष अध्यापन कऱणारे, समाजवादी विचारांचे प्रा. ना.य.डोळे विद्यार्थी तसंच त्यांच्या कष्टकरी पालकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. ग्रामीण भागातील, तळागाळातील तरुणांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी ते अहोरात्र झटले. ‘प्राचार्य’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या ठायी असणाऱ्या सेवाव्रती शिक्षकाची प्रचिती येते.

‘विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये पोलीस येता कामा नये’ असा माझा आग्रह होता. विद्यार्थीकल्याण मंडळाच्या निवडणुका, स्नेहसंमेलन, विद्यापीठ परीक्षा या काळातही मी पोलिसांना कॉलेजच्या प्रांगणात येऊ दिले नाही. 28 वर्षांच्या कालावधीत कोणा विद्यार्थ्याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली नाही.

कुलगुरुपदासाठी, राज्यपाल श्री. कोना प्रभाकर राव यांनी कुलपती या नात्याने मुलाखतीसाठी बोलावले होते. या मुलाखतीत राज्यपालांनी विचारले की, ‘विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचा प्रश्न तुम्ही कसा हाताळाल?’ मी त्यांना माझ्या पद्धती सांगितल्या आणि अभिमानाने सांगितले की 1962 पासून मी पोलिसांची मदत कधी घेतली नाही. ‘इम्पॉसिबल’ अशी त्यांची प्रतिक्रिया होती. मुलांशी जवळीक कशी निर्माण करावी याचे धडे मला राष्ट्र सेवादलाच्या शाखेत वयाच्या दहाव्या वर्षापासून मिळाले होते.

मला असे वाटे की, प्राचार्य हा कुटुंबप्रमुख आहे. रागावलेल्या मुलांना प्राचार्य स्वतः आपले म्हणणे ऐकण्यासाठी आपल्याकडे येत आहेत, आपली समजूत घालीत आहेत याचेच कौतुक वाटे. अर्धा राग माझ्या येण्यानेच कमी होत असे. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मी तात्काळ निर्णय देत असे. ‘पहिल्यांदा वर्गात बसा, लेखी तक्रार द्या, चौकशी करतो, कमिटी नेमतो, माझ्या केबिनमध्ये फक्त दोन चारजण येऊन गाऱ्हाणे सांगा. मग मी विचार करतो- अशा पद्धती मला मान्य नव्हत्या, आणि नाहीत.  मुले रुसली तर आई ‘लेखी तक्रार द्या’ असे म्हणते का? मी एकाच वेळी मुलांचा पालक, मोठा भाऊ, वडील, आई सर्व काही होत असे. हा कदाचित साने गुरुजी, एस.एम.जोशी यांचा प्रभाव असावा.’ (प्राचार्य, पान 43,44,45)

महाराष्ट्र-कर्नाटक आंध्रच्या सीमेवरील उद्गीर हे मध्यम वस्तीचे व्यापारी गाव. तेथे पहिले कॉलेज स्थापन करण्यापासून 28 वर्षे त्याचा कारभार चालवण्याचे काम आपण कसे केले, याचे सुरेख वर्णन डॉ.ना.य डोळे यांनी ‘प्राचार्य’ या आपल्या पुस्तकात केले आहे. मराठी, कन्नड, उर्दू, तेलगु अशा बहुभाषिक संमिश्र व ग्रामीण परिसरातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाची दारे मोकळी करण्याचे काम करताना डोळे जितके रंगून गेले होते तितकेच या आठवणी सांगताना तल्लीन झालेले आढळतात.

मुलींनी कॉलेजात जावे म्हणून त्यांच्या पालकांना भेटणे, स्टाफरूम पत्र्याच्या खोलीत चालेल, पण लेडीजरूम सर्व सोयींसह आधी उभारणे, स्नेहसंमेलनात त्यांनी भाग घ्यावा म्हणून नाटकाच्या तालमीसाठी त्यांना घरून आणण्याची व पोहोचवण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर सोपवणे, नागपंचमीच्या वेळी कॉलेजच्या आवारात झाडांवर झोके बांधून देणे- असे विविध उपक्रम त्यांनी केले. सायकल चालवायला शिकवण्यासाठी रोज दहा सायकली कॉलेजच्या खर्चाने भाड्याने आणून त्यांनी मैदानावर ठेवल्या. गरीब, दलित विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. सरकारकडून मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना गरजेनुसार देण्याची व्यवस्था त्यांनी केली. 

बहिणीचे बाळंतपण, आईचे आजारपण यासाठी शिष्यवृत्तीतले पैसे पाठवायला त्यांनी हरकत घेतली नाही. आपली अडचण प्राचार्य जाणतात, हा दिलासा मिळाल्याने त्या मुला-मुलींनीही गैरफायदा घेतला नाही. एका संस्था सदस्याने खासगी कारणावरून एका विद्यार्थ्याला वर्गात येऊन मारले. याच्या निषेधार्थ सर्व मुला-मुलींचा मोर्चा त्यांनी त्या पालकाच्या घरावर नेला व शांतपणे पार पाडला. एका गावी गाय कापल्याची अफवा येऊन विद्यार्थ्यांत तणाव निर्माण झाला, तेव्हा त्यांना नजीकच्या गावी एका दलित तरुणीवर झालेल्या बलात्काराची व तिच्या खुनाची हकीकत सांगून ‘गायीबद्दल तुम्हीला एवढे वाटते, पण बाईची अब्रू लुटली गेली… याबद्दल काहीच वाटत नाही का?’ असा प्रश्न विचारून डॉ. डोळे यांनी त्यांना आत्मपरीक्षण करायला लावले. 

उन्हाळ्यात पाण्याचे रांजण भरपूर भरून ठेवायचे. येळीवस सणाच्या दिवशी कॉलेजच्या शेतात जेवण करायचे. मुलांना खेळण्यासाठी विटी-दांडू आणून ठेवायचे. मुलांना आरशात पाहावेसे वाटते हे लक्षात घेऊन प्राचार्य डोळ्यांनी कॉलेजात चार कोपऱ्यांवर चार मोठे आरसे लावून ठेवले. उन्हाळ्यातसुद्धा अनवाणी येणाऱ्या मुलाला पादत्राणे घेण्यासाठी स्वतःच्या खिशातून डॉ. डोळे पैसे द्यायचे. कॉलेज सुरू होण्यापूर्वी अर्धा तास चांगली गाणी फिजिक्स विभागातील लाऊडस्पीकरवरून लावायची, कमवा आणि शिका योजना राबवायची, हे सर्व उपक्रम या सगळ्या बाह्य सोयी झाल्या.

मुला मुलींनी अभ्यासात रमावे यासाठी वेळापत्रक त्यांच्या सोयीने ठरवणे, प्राध्यापकांचे शिकवणे समजते की नाही याची विचारपूस करणे, ज्यांचे शिकवणे क्लिष्ट असते त्यांना ते सोपे करायला सांगणे, ग्रंथालय समृद्ध बनवणे, विद्यार्थ्यांना त्याचा मनसोक्त वापर करता यावा अशी व्यवस्था करणे, परीक्षेला एखादी मुलगी वेळेवर आली नाही तर तिच्या घरी सेवकाला पाठवणे आणि कुणालाही कॉपी करू न देणे- असेही उपक्रम प्रा. डोळे करीत आले.

शिक्षक पालक मेळावे अलीकडे शाळांत होतात. पण प्रा. डोळ्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी कॉलेजात पालक मेळावे भरवायला सुरुवात केली. खेड्यांतील शेतकरी-शेतमजूर स्त्री पुरुष कॉलेजच्या पायरीच्या पाया पडून वर येताना दिसले की सगळ्यांचे अंतःकरण भरून यायचे. आपल्या गरीब आई बापांना इतके सन्मानाने वागवले जात आहे हे पाहून ते विद्यार्थी किती हरखून जात असतील!

ग्रामीण भागातील महाविद्यालय म्हणजे त्या परिसरातील शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र असे म्हटले जाते. प्रा. डोळेंनी महाराष्ट्र उदयगिरी विद्यालयाला तसे स्थान प्राप्त करून दिले. ‘स्कायलॅब कोसळून आपल्यावर आदळणार’ या आशंकेने भयग्रस्त झालेल्या खेडूत भावा-बहिणींना धीर देणारे पत्रक काढणे ‘अष्टग्रहीचा धोका खरा नाही उगीच घाबरून जाऊ नका’ असे सांगण्यासाठी गावोगाव विद्यार्थी प्राध्यापकांची पथके पाठवणे.... असे अनेक अंधश्रद्धा निर्मूलनाचे उपक्रम प्रा. डोळेंनी केले. 

कॉलेजात येणारी देशी-परदेशी वर्तमानपत्रे, नियतकालिके गावातल्यांना वाचायला मिळावीत म्हणून संध्याकाळी उघडे असणारे म. गांधी वाचनालय गावात सुरू केले. प्राध्यापकांची गुणवत्ता वाढावी यासाठीही डोळे प्रयत्नशील होते. ‘तुम्ही पीएच. डी. व्हा’ असा प्रेमळ आग्रह ते प्रत्येकाला करीत. त्यासाठी आवश्यक ते ग्रंथ कॉलेजच्या ग्रंथालयासाठी घेत. स्टाफ अकादमीतर्फे व्याख्याने, चर्चा घडवीत.

एन.सी.सी. हा उपक्रम प्रा. डोळ्यांना आवडला नाही. त्यात दिखाऊपणा व लबाडीच जास्त असते, असे त्यांना वाटे. एन.एस.एस. चा कार्यक्रम मात्र त्यांनी उत्साहाने राबविला. ग्रामीण भागात शिबिरे घेतली. प्राध्यापकांना विद्यार्थ्यांबरोबर राहायला लावले. एक शिबीर मरसांगवी या उद्गीरपासून 32 मैलांवर असलेल्या गावी घेतले. जायला रस्ता नाही. सामान डोक्यावरून न्यावे लागले. त्या वेळी प्रधानमंत्री राजीव गांधी होते. त्यांनी म्हटले होते की उपेक्षित राहिलेल्या दुर्गम गावाला रस्ता, वीज, पाणी वगैरे सोयी अग्रक्रमाने दिल्या जातील. म्हणून डॉ. डोळे यांनी थेट त्यांनाच पत्र लिहिले. राज्य सरकारचे अधिकारी म्हणाले, ‘तुम्ही थेट दिल्लीला का गेलात?’ पण त्यांना आवश्यक ती पावले उचलणे भाग पडले.

हे सगळे करताना डॉ. डोळे यांचा स्वतःचा व्यासंग, लेखन चालू होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. मोठमोठ्या दैनिका-साप्ताहिकातून प्रासंगिक लेख लिहिले. शेकडो व्याख्याने दिली. समाजवादी पक्षाचा प्रचार केला. राष्ट्र सेवादल, युक्रांद, छात्रभारती या संघटनांच्या उभारणीत मदत व मार्गदर्शन केले आणि आपल्या मुला-मुलींसाठी आपल्या कॉलेजात वशिला न लावता त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायला प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्यांच्या शब्दाला व मौनाला वजन प्राप्त झाले. डॉ. डोळे यांचे ‘प्राचार्य’ हे पुस्तक वाचणे म्हणचे सात्त्विक, बौद्धिक मेजवानीच होय.

प्राचार्य 
ले. प्रा. डॉ. ना. य. डोळे
साकेत प्रकाशन, औरंगाबाद
किंमत : 65 रुपये

Tags: महाराष्ट्र उदयगिरी विद्यालय  एस.एम.जोशी साने गुरुजी पन्नालाल सुराणा लातूर उद्गीर ना.य.डोळे. प्राचार्य ग्रंथ परिचय S.M. Joshi Sane Guruji Pannalal Surana Latur Udgir Pracharya N.Y. Dole Granth Parichay weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके