डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सर्व माणसांना सुखी व स्वाभिमानी जीवन जगण्याची संधी मिळावी आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू देऊ नये अशा रीतीने कल्पना, तंत्रज्ञान, भांडवल व श्रमशक्ती यांचे जगभर मुक्त प्रवाह खळाळत रहावेत, या भूमिकेवर आधारलेला दहा कलमी लोकसंकल्प सेवाग्राम मेळाव्यात स्वीकारण्यात आला.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. आठ एप्रिलपर्यंत कुठे कोण उमेदवार आहे व कुठल्या पक्षातर्फे तो निवडणूक लढवतो आहे हे स्पष्ट झालेले असेल. मतदारांपुढे आपापली भूमिका मांडण्याच्या मोहिमा तीन-चार आठवडे चालतील. या प्रक्रियेत मतदारांनी केवळ श्रोत्यांची भूमिका घेऊन चालणार नाही. देशाचा कारभार कसा चालावा याबाबतची आपली मते सत्ताकांक्षी पक्षांसमोर मांडली पाहिजेत. एकेकटा मतदार स्वतःला दुबळा, असहाय समजतो. त्यातले अनेकजण, विशेषतः कष्टकरी थर आपापल्या विशिष्ट मागण्यांसाठी जनआंदोलने चालवीत असतात. निवडणुकीच्या वेळी ती स्थगित ठेवायची आणि उभ्या राहिलेल्या उमेदवारांना त्यांची प्रचारमोहीम एकेरी मार्गपद्धतीने चालवू द्यायची - हे बरोबर नाही. या मोहिमेत आपले प्रश्न व आपल्या भूमिका इच्छुक पक्ष आणि व्यक्ती, तसेच सर्वसाधारण मतदारांसमोर आपल्या विविध क्षेत्रांतील भावाबहिणींसमोर मांडण्याचे काम जनआंदोलनांनी केले पाहिजे. आपल्या मांडणीशी सहमत असणाऱ्या व तसे त्यांचे सार्वजनिक चारित्र्यही असणाऱ्या उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

सेवाग्राम (जि. वर्धा) येथे देशभरातील 71 जनआंदोलनांच्या सुमारे तीनशे प्रतिनिधी कार्यकर्त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तसे करायचे ठरवले आहे. 9 एप्रिल हा मतदार दिवस मानून आपापल्या कार्यक्षेत्रात 'जनआंदोलनांचा राष्ट्रीय संकल्प' उमेदवार आणि मतदार सर्वांसमोर ठेवण्याचे ठरवले आहे. जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय गतिशील व शक्तिशाली बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे राष्ट्रीय संयोजक निवडण्यात आले आहेत -

1) डॉ. बनवारीलाल शर्मा, आजादी बचाव आंदोलन, इलाहाबाद,

2) थॉमस कोचरी, राष्ट्रीय मच्छुआरा महासंघ, कोची, केरल,

3) लता प्र. म., महिला संगठन व नर्मदा बचाओ आंदोलन,मुंबई  

4) प्रा. संजय मं. गो., समाजवादी जनपरिषद, ठाणे,

5) नफीसा, युवाग्राम, नवा पाडा, झाबुआ, मध्यप्रदेश

6) फिरोज मिठी बोरवाला, राष्ट्रीय युवा संगठन, मुंबई

7) सुरेश खैरनार, गंगामुक्ती आंदोलन, कलकत्ता,

8) जी. नारायणा, आंध्रप्रदेश,

9) मेधा पाटकर, नर्मदा बचाव आंदोलन, बडोदरा.

10) अमरनाथभाई, सर्व सेवा संघ, वाराणसी,

11) डिस्सा, सद्प्रयास, कुल्लू, हिमाचल प्रदेश,

12) बाबू मॅथ्यू, मजदूर नेता, बंगलोर.

भारताच्या चारी कोपऱ्यात काम करणाऱ्या या विविध जनआंदोलनांच्या प्रतिनिधींना आपापले संघर्ष एकेकट्याने लढवून भागणार नाही, त्यासाठी राष्ट्रव्यापी एकजूट उभारली पाहिजे असे वाटत होते. नुसते आपले एक कलमी संघर्ष करून भागत नाही, सत्ताकारणात देशघातक शक्ती बलशाली होऊ नयेत, जनहितकारी शक्ती प्रबळ व्हाव्यात व निर्णय प्रक्रियेत त्यांनी आपली भूमिका ठोसपणे बजावावी यासाठीही सर्वसंपत्तीने आवश्यक ती हालचाल करावी असे या कार्यकर्त्यांचे मानस बनले आहे. परंपरागत स्वरूपाचा राजकीय पक्ष स्थापन करावा असे नाही. तर गेल्या पंचेचाळीस-पन्नास वर्षांत "लूट आणि फूट" करणाऱ्या ज्या शक्ती मुजोर बनल्या आहेत त्यांना नमवण्यासाठी जे उपेक्षित राहिले वा ज्यांचे शोषण केले जात आहे अशा जनसमूहांनी आपला लोकसंकल्प जाहीर करावा आणि त्याच्या सिद्धीसाठी शांततामय मार्गाने संघर्षाचे व राष्ट्र उभारणीचे कार्यक्रम चालवावेत. त्यातून उचित किंवा श्रेयस्कर राजकीय शक्तीला मूर्तरूप प्राप्त होईल असा आत्मविश्वास 16-17-18 मार्चला सेवाग्राम येथे झालेल्या चर्चेत प्रकट होत होता.

सन्मानाने जीवन जगणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मनापासून कष्ट केल्यानंतर स्वतःचे व कुटुंबाचे चांगल्याप्रकारे भरणपोषण त्याला आणि तिला करता आले पाहिजे. जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधनांचा वापर करून कुठल्या वस्तू वा सेवा निर्माण करायच्या याचा निर्णय दूर बसलेल्या नोकरशहा किंवा धनिकशहांनी करणे ही व्यवस्था आम्ही चालू देणार नाही. सगळ्यांच्या प्राथमिक गरजा चांगल्या प्रकारे भागवल्या जातील अशा वस्तू व सेवांचे उत्पादन करायचे हे उद्दिष्ट आर्थिक निर्णय घेताना सर्वतोपरी मानले जावे. मानव हा निसर्गाचा भाग आहे, केंद्रबिंदू नाही. जमीन, पाणी, वनस्पती, पशुपक्षी वगैरेंचा आपल्या सुखासाठी वाटेल तसा वापर करायचा आपल्याला अधिकार आहे असे माणसाने मानता कामा नये. वनस्पती, पशु-पक्षी, पाणी, वारा यांना आपल्याप्रमाणेच जीवन जगण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवून नैसर्गिक साधनांचा वापर करायचा हे बंधन मानवाने पाळले पाहिजे.

आपल्या प्राथमिक गरजा भागवताना आपल्याला व इतरांनाही सुख मिळेल अशी वृत्ती माणसाने जोपासली पाहिजे. चंगळवादाच्या आहारी न जाता आपण एक सुसंस्कृत प्राणी आहोत याचे सतत भान ठेवून वस्तूंचा सुयोग्य वापर करायचा आहे. अनावश्यक संचय नको, हे आर्थिक रचनेचे सूत्र असले पाहिजे. माणसामाणसांत जात, धर्म, लिंग वगैरे कारणांवरून भेदभाव करायचा नाही. इतिहासक्रमात जे दुबळे राहिले त्या दलित, आदिवासी, महिला यांना सामर्थ्यवान बनवणे हे आर्थिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थेचे उद्दिष्ट असले पाहिजे. व्यक्तिगत नफा, त्यासाठी संपत्तीसंचय, दुसऱ्यांचे शोषण आणि ज्ञानतंत्रज्ञानावर मक्तेदारी यांवर आधारलेले जागतिकीकरण हे मानवजातीला लांछनास्पद आहे. सर्व माणसांना सुखी व स्वाभिमानी जीवन जगण्याची संधी मिळावी आणि पर्यावरणाचा समतोल बिघडू देऊ नये अशा रीतीने कल्पना, तंत्रज्ञान, भांडवल व श्रमशक्ती यांचे जगभर मुक्त प्रवाह खळाळत रहावेत, या भूमिकेवर आधारलेला दहा कलमी लोकसंकल्प सेवाग्राम मेळाव्यात स्वीकारण्यात आला.

या लोकसंकल्पाचा प्रसार-प्रचार करण्याची मोहीम 9 एप्रिल - मतदार दिवस पाळून सुरू होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक जनतेला विश्वासात न घेता परकीय भांडवलदारांना वारेमाप सवलती देण्यासाठी महाराष्ट्रीय व भारतीय जनतेची लूट करणारा, प्रदूषण वाढवणारा एनरॉन् प्रकल्प रद्द व्हावा यासाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात त्या प्रकल्पाच्या समोर निदर्शने होणार असून देशभरातील जनआंदोलनांचे प्रतिनिधी त्यात सामील होणार आहेत. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असणाऱ्या सर्व धर्मातील जातीजमातींना शिक्षण, शेती, उद्योग व सरकारी नोकऱ्या यात उचित संधी मिळण्यासाठी मंडल आयोग पूर्णांशाने लागू करावा, भंवरीदेवीवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन व्हावे व त्या अपराध्यांची उच्च जातीच्या आधारे भलावण करणाऱ्या न्यायाधीशांचा निषेध करावा यासाठी सह्यांची मोहीम व पत्रमोहीम चालवली जाणार आहे.

भूसंपादन कायद्याचा उपयोग धनिकांच्या व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी केला जात आहे. त्यासाठी लाखो कष्टकऱ्यांना विस्थापित केले जात आहे. हे थांबवण्यासाठी भूसंपादन कायदा रद्द करावा व कमालधारणा कायद्यातून मोठ्या कंपन्यांचा अपवाद करणारे बदल रद्द करावेत यासाठी तीव्र संघर्ष केले जाणार आहेत आणि जातिधर्माच्या नावाने आपली दिशाभूल होऊ न देता व चंगळवादाच्या आहारी न जाता आपल्या पायावर उभे राहून स्वाभिमानी व समाजोपयोगी जीवन जगण्याची सवय युवक-युवतींनी अंगी बाणवावी अशी संस्कार मोहिमही चालवण्याचा या सर्व जनआंदोलनांनी संकल्प केला आहे. सर्वसाधारण मतदारांनी, विशेष युवक युवतींनी या जनमंथनात सहभागी व्हावे असे कळकळीने सुचवावेसे वाटते.

Tags: निदर्शन एनरॉन् लोकसंकल्प जनआंदोलन सेवाग्राम भूसंपादन Project Anron Movement Mass acquisition Land weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके