डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भोवंडून टाकणाऱ्या वर्तमानाचा अस्वस्थ करणारा आरसा

या कादंबरीला अद्‌भुतिका म्हणत असला, तरी मला ती आजच्या रोजच्या जगण्याला अत्यंत टोकदारपणे भिडणारी वास्तववादी कादंबरी वाटते. प्रणवच्या सगळ्याच लिखाणातून हा कन्स्ट्रक्ट अगदी ठळकपणे जाणवत असतो. तो म्हणजे- आपल्या जगण्याशी संबंधित वेगवेगळे पैलू घेऊन त्यांची वाचकांना अपरिचित अशा वेगळ्याच जगात मांडणी करण्याचं त्याचं कसब. या कादंबरीमध्येही आपण वाचताना अनेक वेळा अडखळतो, कारण आपल्याला परिचित असणाऱ्या वस्तू वेगळ्याच भूमिकेतून आपल्यावर येऊन आदळतात. ज्या गोष्टी आपण रोजच वापरत असतो, त्यांचा इतका वेगळा वापर कथावस्तू म्हणून होताना आपण बघतो, तेव्हा आपल्याला सेट व्हायला काही काळ लागतो. पण एकदा का आपली नजर आणि मन स्थिरावलं की, मग आपणही मयंकसोबत त्या ‘96 मेट्रोमॉल’मध्ये जाऊन उभे राहतो.

ॲमेझॉनवर 40 ते 60 टक्के डिस्काऊंटची ऑफर आहे मम्मा... फोर सीझनमध्ये बंपर ऑफरची जाहिरात बघितली पप्पा... ड्यूड, हा फोन आऊटडेटेड झालाय, तो बघ काल आलेला नवा रापचिक पीस... मला न घालायला कपडेच नाहीयेत धड... फक्त आणि फक्त आमचीच शाळा, फक्त आणि फक्त आमचाच पक्ष... फक्त आम्ही म्हणू तेच खरे, आम्ही आहोत ना, मग विचार कसला करताय...

या आणि अशा सगळ्या वातावरणात आपण जेव्हा जगतो- नव्हे, आपण जेव्हा आरामात जगतो; तेव्हा ‘96 मेट्रोमॉल’ची गरज असते... आपण काय करायला हवं, आपल्या जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या, कोणत्या नाहीत, आपल्याला काय घ्यायला हवं, काय नको- हे जेव्हा जाहिराती ठरवतात, तेव्हा ‘96 मेट्रोमॉल’ची गरज असते... कोणत्या पक्षाला आपण मत द्यायला हवं, कोणाशी लग्न करावं, कोणाला टाळावं, आपण जे आहोत ते बरोबर नसून जे असायला हवं ते जेव्हा दुसरेच सांगतात; तेव्हा ‘96 मेट्रोमॉल’ची गरज असते...

गेल्या दीड-दोनशे वर्षांत झालेल्या सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्य चळवळ व शिक्षणप्रसारातून आजवर शिक्षणाच्या कवेत न आलेला बहुसंख्य समाज शिकायला आणि त्यातून बदलायला लागलेला आपल्याला दिसतो. या टप्प्यावर लोक भोवतालच्या चौकटीला धक्के देताना दिसतात आणि नव्या गोष्टी करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. यातही समाजातील रूढ अर्थाने वरच्या स्तरातले आणि सत्तास्थानाच्या जवळ असणारे लोक येणारे बदल प्रथम स्वीकारतात आणि मग त्याचं अनुकरण खाली झिरपत जाताना दिसतं. खुला विचार हा कायमच सामूहिकतेकडून व्यक्तिगततेकडे घेऊन जाणारा असतो. आलेलं शिक्षण आणि त्यातून येणाऱ्या नव्या विचाराने जगणं आतून-बाहेरून बदलायला सुरुवात होते... आणि अशा वेळी भाषा, खाणं-पिणं, कपडे, घर, नातेसंबंध अशा सगळ्याच गोष्टी बदलत जातात. 

याच सगळ्या बदलांकडे, यातील मुळात असणाऱ्या बदलाच्या आकांक्षांकडे आणि मूलभूत प्रेरणेकडे लक्ष ठेवून बसलेला एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बाजार. (जो या कादंबरीतला मुख्य घटक आहे) हा बाजार लोकांच्या गरजा पूर्ण करतो, हे बरोबरच, पण लोकांच्या गरजा निर्माण करणं, त्यांच्या वाढत्या गरजांच्या माध्यमातून त्यांच्या आकांक्षा आणि जगण्याला आकार द्यायचं कामही बाजार करत असतो. आधी बाजार हा तुलनेने स्थानिक होता आणि स्थानिक लोकांच्या गरजांप्रमाणे पुरवठा करणं हे त्याचं मूळ उद्दिष्ट होतं. हजारो वर्षांच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना बाजार शक्तिशाली होत गेला आणि आता गेल्या तीसेक वर्षांमध्ये बाजार सर्वव्यापी बनला. आता तर माझ्या गावाच्या दुकानात काय विकलं जावं, याचा निर्णयही एखाद्या भलत्याच विकसित देशातली कंपनी करत असते. अनेक देशांच्या एकूण उत्पन्नापेक्षाही मोठाले टर्नओव्हर असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आज आपल्या जगण्याचे निर्णय घेतात.

बाजारू कंपन्यांसोबतच मानवी जगण्यातील एक महत्त्वाचा भाग असलेला मनोरंजन उद्योग एका बाजूला गाणी, सिनेमा, मालिका अशा सगळ्या माध्यमांतून लोकांचं मनोरंजन करतो आणि दुसऱ्या बाजूला त्यातूनच समाजाच्या सामूहिक व व्यक्तिगत अशा दोन्ही पातळ्यांवरील धारणांना आकार देण्याचं कामही करतो. मानवी भावभावना, परस्पर-नातेसंबंध, प्रेम, धर्म- अशा सर्वच धारणा गेल्या शतकांत मनोरंजन माध्यमाच्या आधाराने वेगळ्या स्वरूपात पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. आपल्या कोणत्याही भावना- मग त्या अत्यंत खासगी असोत किंवा सामूहिक- त्या व्यक्त करताना आपल्याला या मनोरंजन माध्यमाने दिलेल्या साधनांचा वापर करावा लागतो.

वेगवेगळ्या स्थानिक पातळीवर विखुरलेला बाजार जेव्हा संघटित स्वरूप घ्यायला लागला, तेव्हा वस्तू तयार करणं हे जसं आव्हान होतं तसंच ते विकणं हेही मोठं आव्हान झालं. याच टप्प्यावर जाहिराती, मार्केटिंग क्षेत्र आणि मीडिया आपली भूमिका घेऊन येतो. आधी हळुवार विनंती करणारी, आपलं उत्पादन घ्यावं म्हणून आर्जव करणारी ही व्यवस्था मग बाजाराच्या बदलत्या स्वरूपाप्रमाणे आता भयंकर ॲग्रेसिव्ह होत आपल्या जगण्याच्या सर्वच कक्षा व्यापून पुढे जाते आहे. आपल्या भोवतालातील सगळ्याच अवकाशाला जाहिरातींनी घेरलं आहे. आता आपण कोणते कपडे घालावेत, काय प्यावं, कधी खावं, काय खावं, दिसावं कसं, शिकावं कसं- हे सगळं बाजार ठरवायला लागला आहे. जी पिढी या चक्रवाताच्या आधी जन्माला आलेली आहे, ती किमान आधी आणि नंतर असा फरक करायचा प्रयत्न तरी करते; पण जी नवतरुण पिढी- आजच्या भाषेत मिलेनिअल्स- जे या धुवांधार वर्षावात जन्मले, त्यांना हा सगळा गोंधळ आणि उन्माद म्हणजेच ‘हॅपनिंग लाईफ’ वाटते. आणि सलग, सातत्याचा एखादा विचार करण्याची पद्धत आउटडेटेड वाटते. 

मीडियाने, या बाजाराने आपल्या जगण्याचं काय करून ठेवलं आहे याचे पुरावे आपण पदोपदी बघत असताना प्रणव सखदेव लिखित ‘96 मेट्रोमॉल’ ही लघुकादंबरी आपल्या हाती येणं हा योगायोग नाही, तर ती गरज आहे. या कादंबरीचं प्रमुख पात्र मयंक नावाचा एक विशीतला, उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय नवतरुण आहे. पण या कादंबरीचा प्रोटोगॉनिस्ट हा बाजार आहे. हा मयंक भयंकर दारू पिऊन चिल मारताना, ‘फुलटास’ होतो आणि एका मायावी राज्यात पोहोचतो. तिथे त्याला त्याच्या रोजच्या जगण्यातले मोबाईलड्यूड, कोल्ड्रिंक्स, टॅब्ज आणि वेगवेगळी गॅझेट्‌स भेटतात. फरक एकच असतो- मयंकच्या रोजच्या जगण्यात तो त्यांना वापरत असतो आणि इथे या अद्‌भुत राज्यात ही गॅझेट्‌स मयंकला वापरत असतात. या सगळ्या भोवंडून टाकणाऱ्या प्रवासात मयंक भरकटतो, गोंधळतो, हतबल होतो आणि येईल त्या अनुभवाला सामोरा जात राहतो- कोणताही विचार न करता. करून तर बघू, ट्राय मारते है- या अभिनिवेशात. वेगवेगळ्या पाटर्यांना जाण्याचा मोह न सोडता आल्याने जाईल तिथे त्रास करून घेतो आणि पळत राहतो ऊर फुटेस्तोवर. इथे मयंकला भेटते एक मीडियाराणी. या मीडियाराणीला दोनच मिती असतात. तिला तिसरी मितीच नाही, जी गोष्टींचे पूर्ण रूप समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. मयंक आधी तिच्याकडे ओढला जातो आणि मग त्या भोवऱ्यात सापडून पळत सुटतो.

हा सगळा प्रवास म्हटलं तर एका रात्रीचा आहे, म्हटलं तर एका पिढीचा आहे. या प्रवासात भेटणारी सगळीच गॅझेट्‌स आपल्या भोवतालचे मानवी व्यवहार आणि भावना घेऊन येतात. इथे सगळ्यांनाच फक्त उपभोग घ्यायचा असतो. इथला प्रत्येक जण (पक्षी : वस्तू) आपण विकले जाणार का, या विवंचनेत असतो आणि त्यात मीडियाराणी आपल्याला सोबत घेणार की नाही, या शंकेने घेरलेला असतो. स्वत: विकले जाण्याच्या प्रक्रियेत या वस्तू त्यांच्या उपभोक्त्यालाच गिळंकृत करायला बसलेल्या आपल्याला दिसतात. तरुण मुलं आणि पुरुषांना नादी लावणारी पोर्न इंडस्ट्री असो, नाही तर रोजच्या जगण्यातल्या पेन्सीलपासून फ्रीजपर्यंतच्या गोष्टी- प्रत्येक जण मीडियाराणीला अंकित झालेला असतो. 

वंडरलँडच्या ॲलिसला प्रणवने ही लघुकादंबरी अर्पण केली आहे. खरं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या ॲलिसची अद्‌भुत कथा अजूनही भुरळ घालत असते. याच कथेतील अद्‌भुताचा माग काढत प्रणव आपली अद्‌भुतिका रचतो. पण मला प्रणवचे कौतुक वाटते ते यासाठी की, अद्‌भुतरम्य जगात फिरण्याच्या सगळ्याच शक्यता आणि संधी असताना त्याच्यासारखा तरुण लेखक जमिनीवर पाय घट्ट रोवून रोजच्या जगण्याला भिडणाऱ्या या हिंस्र अद्‌भुत जगात शिरतो. तेवढंच महत्त्व मला रोहन प्रकाशनचेदेखील वाटते. सुरस-निरसतेच्या निसरड्या वाटेवर जाऊ शकणारी ही कादंबरी स्वीकारून प्रकाशित करणं, हेही धाडसच.

प्रणव या कादंबरीला अद्‌भुतिका म्हणत असला, तरी मला ती आजच्या रोजच्या जगण्याला अत्यंत टोकदारपणे भिडणारी वास्तववादी कादंबरी वाटते. प्रणवच्या सगळ्याच लिखाणातून हा कन्स्ट्रक्ट अगदी ठळकपणे जाणवत असतो. तो म्हणजे- आपल्या जगण्याशी संबंधित वेगवेगळे पैलू घेऊन त्यांची वाचकांना अपरिचित अशा वेगळ्याच जगात मांडणी करण्याचं त्याचं कसब. कादंबरीही वाचताना अनेक वेळा अडखळतो, कारण आपल्याला परिचित असणाऱ्या वस्तू वेगळ्याच भूमिकेतून आपल्यावर येऊन आदळतात. ज्या गोष्टी आपण रोजच वापरत असतो, त्यांचा इतका वेगळा वापर कथावस्तू म्हणून होताना आपण बघतो, तेव्हा आपल्याला सेट व्हायला काही काळ लागतो. पण एकदा का आपली नजर आणि मन स्थिरावलं की, मग आपणही मयंकसोबत त्या ‘96 मेट्रोमॉल’मध्ये जाऊन उभे राहतो.

अशा प्रकारच्या संरचनाआधारित लिखाणावर स्वार होताना तांत्रिकतेच्या ओझ्याखाली मूळ सांगायची असलेली गोष्ट धूसर होण्याची किंवा विरून जाण्याची एक भीती कायम असते. प्रणवने ही भीती मनावर न घेता ही कथा सांगायचे धाडस केले आहे, ते मला महत्त्वाचं वाटतं. खरं तर या मेट्रोमॉलमध्ये प्रवेश करताना भोवताल माझ्या डोक्यात गोंधळ घालत होता आणि आपल्या वर्तमानाचा धांडोळा घेतल्याशिवाय या कादंबरीबद्दल बोलणं शक्य नव्हतं. कारण चहूबाजूंनी आक्रमण करणाऱ्या बाजाराचे अत्यंत प्रत्ययकारी रूपक म्हणजे ‘96 मेट्रोमॉल’ ही कादंबरी आहे.

देशात चालू असणाऱ्या कोरोनापासून वाढत्या बेरोजगारीपर्यंत, बंद असलेल्या शिक्षणापासून वाढत जाणाऱ्या आत्महत्यांपर्यंत सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करून मीडियाराणी ज्या उत्साहाने व आक्रमकतेने रिया चक्रवर्तीचे लचके तोडण्यात आणि सुशांतसिंगच्या मृत्यूला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्यात मश्गुल आहे, त्या काळात ‘96 मेट्रोमॉल’ येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

96 मेट्रोमॉल
लेखक : प्रणव सखदेव
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 128, किंमत : 150 रुपये

Tags: नवे पुस्तक मराठी साहित्य ॲमेझॉन रोहन प्रकाशन 96 मेट्रोमॉल प्रणव सखदेव weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके