डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अतुल पेठे हे माझे वडील असल्याने फार साहजिकरीत्या या नाटकात काम करायची संधी मिळाली असेल, न्‌ प्रक्रिया कदाचित जास्त सोपी गेली असेल. याचं उत्तर ‘नाही’ आणि ‘हो’ असं दोन्हीही आहे. ‘नाही’ अशाकरता, कारण सावित्रीबार्इंच्या कामासाठी मी अक्षरश: शेवटचा पर्याय होते, अनेक लायक अभिनेत्रींना आलेल्या अडचणींच्या पायी ही भूमिका मला करायला मिळाली. आणि ‘हो’ अशाकरता, कारण मी माझ्या वडिलांच्यामुळे घरी अनेकविध गोष्टींचा, विचारांचा, माणसांचा परिचय थोड्या प्रमाणात अनुभवत आल्याने नाटकाच्या ओघाने येणाऱ्या गोष्टींशी माझी ओळख होती. पण आपले वडील नेमकं काय करतात याची जाणीव ‘सत्यशोधक’नं करून दिली.

‘सत्यशोधक’नं मला काय दिलं, तर अनेक प्रकारची, अनेक पातळ्यांवरची जाणीव दिली, समृद्ध अनुभूती दिली आणि खूप आनंद दिला. प्रयोगानंतर सद्‌गदित होऊन, भरलेल्या डोळ्यांनी लोक येऊन भेटतात, नमस्कार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील अश्रू एकदम खूप काही देऊन जातात. सांगोलासारख्या गावात आम्ही मेकअपरूमवजा खोलीत राहात असतो तेव्हा तिथला वास, ते निराळं वातावरण मनात भरून राहतं. रहिमतपूरसारख्या ठिकाणी मंगलकार्यालयात राहत असताना रात्री झोपतानाचे दोन क्षण, आपण इथं कसे आलो बुवा असं वाटून जातं. दुसऱ्या राज्यात प्रयोग करून भारावलेल्या मन:स्थितीत कॉलेजची परीक्षा द्यायला विमानानं येताना, वर आकाशात असताना विलक्षण दैवी अनुभव देऊन जातो, तर पहिल्यांदाच पाच हजार प्रेक्षकांसमोर प्रयोगात एन्ट्री घेतल्यावर वाटणारा उल्हास शब्दांत न मांडता येण्यासारखा. असे असंख्य अनुभव खूप काही देऊन गेले.

पुण्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या मुलीला, वयाच्या बाविसाव्या वर्षी जगण्याविषयी जे प्रश्न पडतात, ज्या गोंधळाच्या परिस्थितीतून जावं लागतं त्याला मीही अपवाद नाही. काही वर्षांपूर्वी हा गोंधळ फार आहे, त्यात आपली घुसमट होतीय वगैरे वाटायचं. आता मात्र तशी घुसमट वगैरे काही वाटत नाही. जगण्याकडे स्वच्छ दृष्टीनं पाहणं शक्य होऊ लागलंय. जगणं ही फार सुंदर गोष्ट आहे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद आत साठवून ठेवायची आस आता लागली आहे. आता घुसमट होत नाही वा प्रश्न पडत नाहीत, असा याचा अर्थ नाही. पण ही प्रक्रियासुद्धा सुंदर आहे असं वाटू लागलं आहे. ‘सत्यशोधक’चा या सर्व जाणिवांमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. एवढं मोठं जग आहे, त्यात केवढी लोकं आहेत, त्यात लोकांचे किती असंख्य प्रश्न आहेत, आपल्या एकट्याच्यानं काय होणार, हे सारं अजूनही वाटतंच. पण एकट्या माणसानं काम सुरू केलं तर प्रदेशाचा कायापालट घडवून आणायला, समाज हलवायला एक माणूसही पुरेसा असतो, यावर जोतिबांमुळे विश्वास बसत जातो, परिस्थिती आशादायी वाटू लागते. 

आपला जन्म आपण का जगतो आहोत या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आहे हे खरंच आहे, पण त्यात प्रत्येक माणसाची जबाबदारी केवढी आहे आणि ही जबाबदारी प्रत्येकानं पेलली तर केवढं आशादायी चित्र उभं राहू शकतं... राग, ईर्ष्या, द्वेष भरलेला आहेच सगळीकडे, पण एका माणसाची माणुसकी यातून समाजाला तारून नेऊ शकते हा  आशावाद ‘सत्यशोधक’नं दिला. या वयात, प्रश्नांवर नीट शांत होऊन मात नाही केली तर ते कायम मनात घर करून राहतात, अन्‌ नंतर ते निस्तरणं फार अवघड जात असावं. अशा परिस्थितीत जगण्यातील सौंदर्याची आणि जबाबदारीची जाणीव ‘सत्यशोधक’मुळे झाली.

आपण जन्माला आलोय, तर मरायच्या आधी संपूर्ण जगातला कानाकोपरा पाहता यावा असं खूप वाटतं, ते अर्थातच पूर्णत: शक्य नाही. पण मग जमेल तेवढं खूप खूप बघून घेऊन, मनात साठवून ठेवत राहावंसं वाटतं, सगळीकडे फिरावंसं वाटत राहतं. फर्गसन कॉलेजमधल्या माझ्यासारख्या मुलीला महाराष्ट्र फिरण्याचीही संधी क्वचितच मिळाली असती. त्यातही अगदी छोटी गावं ते मोठी शहरं, असा एक आलेखही मनात होत गेला. इतक्या ठिकाणी फिरून किती काय काय बघता आलं, अगदी जवळून. कुठेही राहायची, खायची, टॉयलेटला जायची संधी मिळाली. होय, मला ही संधीच वाटते, कारण ही संधी सर्वांत जास्त मोलाची ठरली, खूप शिकायला मिळालं. ‘थिएटर्स’ची भयानक अवस्था, अस्वच्छता, गावागावानुसार बदलणारी माणसं न्‌ त्यांचे स्वभाव, विविध ठिकाणचं वातावरण, तिथलं जेवण, वास- हे मोठं संचित बनलंय. विविध सामाजिक संस्थांनी प्रयोग घेतल्यामुळे या संस्थांचं कार्य, त्यांचे नेते मनात घर करून राहिले. दिल्लीचे सुधन्वा देशपांडे, मलायश्री हाश्मी, मुंबईच्या उल्का महाजन, नंदुरबारच्या प्रतिभा शिंदे, बेळगावची मराठी विद्यानिकेतन शाळा, नसिरुद्दीन शहा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नांदेडचे डॉ.खुरसाळे अशा अनेक संस्था, व्यक्ती, त्यांचं कार्य आणि माणसं अनुभवता आली, हा अविस्मरणीय भाग. यामुळे खूप प्रेरणादायी वाटत राहिलं. 

हे नाटक ज्यांच्यासोबत केलं... ते आमचे सगळे सफाई कर्मचारी... आणि इतर लोक. प्रथम धाकधूक होती, त्यांना न्‌ आपल्याला एकमेकांशी जुळवून घेता येईल की नाही याची... पण हा प्रश्न कधीच उद्‌भवला नाही. खूप चांगल्या पद्धतीनं हे नातं दृढ होत गेलं. मी ज्या सामाजिक चौकटीत जगत होते, त्यापेक्षा एक नवीनच वर्ग अनुभवायला मिळाला. नवीन जीवनकथा कळल्या. एका संपूर्ण वेगळ्या जीवनशैलीशी ओळख झाली. सगळ्यांकडूनच खूप शिकायला मिळालं. आमच्या शोभाताई, नागनाथकाका, पारसे काका, संदीप यांची नवनवीन गोष्टी शिकायची आस, या वयातही गोष्टी टिपून घेणं आणि जगताना त्यात बदल करणं हे फार कौतुकास्पद वाटतं. सावित्रामावशी, संतोष गायकवाड यांच्यातली एक तरल शांतता तसंच रणजित, प्राजक्ता, अमृता, आदित्य, नितीन, ब्रह्मानंद संतोष, चेतन हे कामगार नसलेले, पण अतिशय मनापासून शिकू पाहणारे आणि खूप काम करणारे मित्र जोडले गेले. त्यांच्याविषयी खूप प्रेम आणि आदर आणि श्रेया ही छोटी मुलगी, जिला मी या दीड वर्षात क्वचितच रडताना पाहिलं. या हुशार आणि समजूतदार बाळाचा तर फार लळा लागला. घरातल्या अडचणींमुळे वा घरच्यांच्या सामाजिक दडपणामुळे ज्यांना नाटकात काम करता आलं नाही, त्या पुष्पातार्इंची कायम आठवण येत राहील. या सर्व लोकांचे जीवनानुभव थक्क करायला लावणारे आहेत. ज्या उमेदीनं नाटक झालं त्यातून एक निराळीच शक्ती प्रयोगात उभी राहायची. ती शक्ती वेगवेगळ्या जातकुळीच्या लोकांची, वेगवेगळ्या प्रकारची (distinct flavour) शक्ती झाली. 

जोतिबांचं काम करणारा माझा सहकलाकार ओंकार हा इतका पराकोटीचा आहे की, पहिले काही दिवस त्यानं केलेल्या अभ्यासानं मला खूप न्यूनगंड दिला. मी बऱ्यापैकी स्फुरेल तसं काम करायचे आणि तो नीट मेथडने, शिस्तशीरपणे. त्याच्याबरोबर काम करणं याला मी खूप पद्धतशीर आनंद म्हणेन. 

अतुल पेठे हे माझे वडील असल्याने फार साहजिकरीत्या या नाटकात काम करायची संधी मिळाली असेल, न्‌ प्रक्रिया कदाचित जास्त सोपी गेली असेल. याचं उत्तर ‘नाही’ आणि ‘हो’ असं दोन्हीही आहे. ‘नाही’ अशाकरता, कारण सावित्रीबार्इंच्या कामासाठी मी अक्षरश: शेवटचा पर्याय होते, अनेक लायक अभिनेत्रींना आलेल्या अडचणींच्या पायी ही भूमिका मला करायला मिळाली. आणि ‘हो’ अशाकरता, कारण मी माझ्या वडिलांच्यामुळे घरी अनेकविध गोष्टींचा, विचारांचा, माणसांचा परिचय थोड्या प्रमाणात अनुभवत आल्याने नाटकाच्या ओघाने येणाऱ्या गोष्टींशी माझी ओळख होती. पण आपले वडील नेमकं काय करतात, याची जाणीव ‘सत्यशोधक’नं करून दिली. ती जाणीव नव्हती असं नाही, पण प्रत्यक्ष काम करण्याच्या अनुभवातून समृद्ध होत गेली. या नाटकाच्या निमित्ताने वडिलांचं झालेलं आकलन ही माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाची जाणीव. दिग्दर्शक म्हणून त्यांच्या खूप गोष्टी शिकवून गेल्या. सर्व लोकांना बरोबर नेणं, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, व्यापक दृष्टिकोनातून गोष्टींकडे बघणं, कमालीची अभ्यासू वृत्ती, पराकोटीचं डेडिकेशन आणि नेटानं काम करत राहण्याची त्यांची सचोटी अफाट आहे. इतकी वर्षं नाटक करून प्रत्येक प्रयोगाला या माणसाची ऊर्जाही वाढतच गेली. इतकी पॅशनेट व्यक्ती अनुभवणं खूप मोलाचं. वडील-मुलगी, दिग्दर्शक-अभिनेत्री या नात्यात काही गोष्टी पटतात, काही नाही पटत. पण याउपर जाऊन त्यांच्यातल्या या गुणांची खूप जवळून ओळख झाली. या गुणांपैकी माझ्याकडे अक्षरश: काहीही गुण नाहीयेत आणि प्रयत्नपूर्वक मला हे गुण काही प्रमाणात तरी आत्मसात करता आले पाहिजेत असं वाटतं... 

हा सर्व भाग प्रक्रियेचा झाला. ‘सत्यशोधक’ हे जोतिबा फुले, सावित्रीबार्इंवरचं नाटक पहिल्यांदा ऐकल्यावर त्यातल्या अनेक प्रसंगांनी चकित व्हायला झालं... वरवर साधे वाटणारे प्रसंग, आतवर पाहिलं की त्यांतला आशय हळूहळू समजत गेला. अजूनही त्यातले प्रसंग ऐकताना नव्याने संदर्भ समजत जातात. प्रत्येक प्रयोगात जोतिबा- सावित्री नव्यानं भेटतात. त्यांची व्यक्तिमत्त्वं किती प्रभावी असतील, या विचारानं भारावून जायला होतं. सावित्रीबार्इंचं काम करायला मिळणं इतकी सुंदर आणि भाग्याची गोष्ट नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व स्वच्छ, नितळ तरीही समर्पित होऊन खूप काम करणारं. गोष्टी समजावून घेऊन, त्या काळात जोतिबांना समजावून घेऊन, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं, हे किती अवघड असणार. तरीही त्यांनी सच्चेपणाने आणि माणुसकीला धरून काम केलं! हे वागणं कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं माझ्यापर्यंत येऊन दररोज आदळतं. 

प्रयोगाच्या आधी पेटलेल्या कंदिलातल्या वातीकडे मी बघते, सावित्रीबाई तशाच असतील असं वाटतं, शांत पण धगधगणाऱ्या. त्यांची भूमिका करणं खूप आव्हानात्मक आणि जबाबदारीचं वाटतं. ही भूमिका मला आयुष्यासाठी खूप काही देऊन गेलीय- खूप सकारात्मकता, खूप आशावादी दृष्टिकोन. मला ही भूमिका करणं हीलिंगसारखं वाटतं. माझी स्वत:ची आणि इतरांची पण... इतके प्रयोग झाले, त्यामुळे दरवेळी नवनवीन काही शोधत राहण्याची संधी मिळाली, जी फार कमी वेळा अभिनेत्री म्हणून वाट्याला येते. इतकं फिरल्यानं, गोष्टी- माणसं बघितल्याने अभिनेत्री म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण एक सत्त्व हाती लागल्यासारखं वाटतं. शांत, नितळ आशादायी सत्त्व, जे पुढे टिकून राहावं आणि जगताना प्रत्येक क्षणी माझ्यासोबत असावं... मला सावित्रीसारखं जगता यावं... 

Tags: अतुल पेठे महात्मा फुले सावित्रीबाई फुले सत्यशोधक पर्ण पेठे Atul Pethe Mahtama Phule Savitribai Phule Satyshodhak Parn Pethe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Shantaram Bhuravne- 04 Jan 2021

    खूप छान! आपल्या भावना अतिशय उत्कटतेने मांडल्यात.

    save

  1. Smita Gandhi- 06 Jan 2021

    भूमिका करणं आणि तिच्या पोटात शिरूनही अलिप्तपणे त्या अनुभवाचा लेख जोखा मांडणं या भिन्न गोष्टी आहेत. पर्ण, तू ते उत्कटपणे करण्याचा व आमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहेस! सकौतुक अभिनन्दन!

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके