डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

क्षोभ : 1896 मधील प्लेगच्या काळातील

अलबत, परशुरामास हा प्लेग क्यांपचा फायदा घेणें शक्य नव्हतें, कारण त्यास पैशाची एवढी अनुकूलता नव्हती, व त्यास वशिलाही सुलभ नव्हता. त्यांत गांव ओस पडल्यामुळें त्याची कोठऱ्यांकडील शिकवणीही सुटली! व त्याच्या चाळींतील सर्व बिऱ्हाडकरू ऐपतदार असल्यामुळें ते झाडून सर्व पळून गेले! व आसपासच्या ओस घरांतही एवढेंच घर या वस्तीचें असल्यामुळें त्यांतील असंख्य उंदीर त्याच्या चाळींत घुसले! व ते जागोजाग रोज मरूं लागले! पण अशा परिस्थितींत परशुराम व लक्ष्मी यांस पांच मुलांसह राहाणें भाग होतें! लोकांची वस्ती मुंबर्इंत नाहींशी झाल्यामुळें गांवांतील शाळा ओस पडल्या! हजार आठशे मुलांच्या परशुरामाच्या एल्फिस्टन मिडल स्कुलांत फक्त पंधरा मुलें शिल्ल्क राहिलीं व सरकारच्या बडतर्फीच्या भयामुळे फक्त सर्व मास्तर जागी हजर राहिले तर इतर शाळांची स्थिती काय विचारावी!

1. प्लेग - प्लेग म्हणजे गांठ्या ताप. हा ताप नाईल व युफ्राटिस ह्या नद्यांच्या कांठीं हिंदुस्थानांतील बरसातीच्या वाऱ्याप्रमाणें तेथील लोकांस नियतकालिक होतो. त्या प्रदेशाशीं हिंदुस्थानचें दळणवळण वैदिक काळापासून आहे व तें गलबतें व आगबोटी यांनी दिवसानुदिवस वाढत जाऊन तें अलीकडे अत्यंत वारंवार व जलद झालें आहे. म्हणून  हा रोग तिकडून इकडे प्राचीन काळीं येऊन पश्चिम व उत्तर हिंदुस्थानांतील कित्येक भागांत अनेकदां पसरल्याचें दिसून येतें. ह्या रोगाचा अत्यंत जुना उल्लेख हिंदुस्थानांतील चरक ग्रंथांत आहे. त्यापुढें इतिहासांत असा उल्लेख सुमारें सात आठ वेळां झाल्याचें आढळतें. त्यांत त्याची बाधा पश्चिम हिंदुस्थानांत बोरिवली, चौल, मंबई व अहंमदाबाद व उत्तर हिंदुस्थानांत आग्रा ह्या शहरांस झालेली आहे.

इ.स.1896त प्लेगची पहिली केस तारीख 21 ऑगस्टला मुंबईच्या मांडवी भागांत डाक्तर वाझ यांस आढळली. कोणाच्या मनीं मानसीं नसतांही सदरहू डाक्तरसाहेबांनीं केलेलें अनुमान मोठें प्रशंसनीय होय. पण त्यांस सर वगैरे पदवी देऊन त्यांच्या चतुराईचा थोडाही मोबदला त्यांस कोणीं दिला नाहीं. मांडवींत देशी व्यापाऱ्यांची दाट वस्ती व धान्याचीं मोठमोठीं कोठारें आहेत. त्या कोठारांत व वस्तींत प्रथम उंदीर मरूं लागले, व त्या उंदरांमागून माणसें मरूं लागलीं’! पुढें शेकडों उंदरांचे थवे त्या मांडवींतून इतरत्रं स्थानांतर करूं लागले व नंतर त्याप्रमाणेंच शेंकडों माणसांचे थवे त्या मांडवींतून इतरत्र स्थानांतर करूं लागले. तेणेंकरून डिसेंबरच्या सुमारास मुंबईभर गांठ्या ताप पसरून तो बाहेर गांवीं आगबोटी व आगगाड्यांनीं जाऊं लागला! तेव्हां त्या रोगानें युरोपांत ‘ब्लॅक डेथ’प्रमाणें सप्पा उठविण्यास येऊं नये, म्हणून इतालींत जिनोआ येथें युरोपांतील नामांकित वैद्यांची एक परिषद भरली व तिनें मेहेरबानी करून येथील सरकारास ‘सेग्रिगेशन’ व ‘डिसइन्फेक्शन’ हे उपाय सुचविले. मुंबईस तेव्हां कारकीर्द लार्ड सांडहर्स्ट यांची होती. त्यांनीं ह्या उपायांची अंमल बजावणी लोकांच्या दृष्टीनें अपूर्व कठोरतेनें केली. ते संशयित मनुष्यास मुंबईत व बाहेर बंदरोबदरीं व स्टेशनोस्टेशनीं कोंडून ठेऊं लागले! त्यांत नवराबायको, व मुलें आईबाप यांची ताटातूट होऊन अनाथ व बिनवारशी स्थितींत लोकांस मरण्याची पाळी येऊं लागली! त्यांत पक्षपात, अन्याय व दिवसाढवळ्या लुटालूट होऊं लागली! त्यांतील सर्व गोष्टी सांगणें ह्या पुस्तकांत कठीण आहे.

पण नावें गावें न देतां एक उदाहरण मासल्याकरीतां देऊं, गदक म्हणून कर्नाटकांत एक आगगाडीवर सेग्रिगेशन क्यांप होता. त्या क्यांपवर एका तरुण असिस्टंट पो.सुपरिंटेन्डेंटाची नेमणूक झालेली होती. एक ब्राह्मणाची बाई पुण्याहून आपल्या नवऱ्याकडून कर्नाटकांत आपल्या बापाकडे जावयास एकटी निघाली. तिला गदक येथें त्या साहेबाने संशयित रोगी म्हणून उतरून घेतलें, व आपल्या राहत्या घरांत पंधरा दिवस घातलें! त्या बाईच्या बापाला ती निघून गेल्याचें पत्र गेलें होतें. त्यास ती वेळीं आली नाहीं हें पाहून तपासास निघावें लागलें. त्यास तिचा पत्ता पुण्यापासून गदक क्यांपपर्यंत लागे, व पुढें लागेना! पण येथील सेग्रिगेशन क्यांपमध्यें इतर सामान्य संशयित रोग्यामध्यें त्याला तिचा मांगमूस मिळाला नाहीं, तेव्हां त्या बापाचा संशय दुणावला व त्यानें कटून फारच बारिक तपास चालविला. ते वेळीं त्यास कळून चुकलें की आपली मुलगी एका मोठ्या स्पेशल प्लेग क्यांपमध्यें झरोक्यांत नेऊन ठेविलेली आहे! त्यानें वात्सल्यानें त्या क्यांपभोंवती किती घिरट्या घातल्या व किती दीनदयाळ आफिसर म्हणविणारांच्या विनवण्या केल्या, पण व्यर्थ! कोठेंही दाद लागून त्याच्या मुलीच्या सुटकेची आशा दिसेना! तेव्हां त्यानें अती धीटपणा करून त्या जिल्ह्यांच्या कलेक्टरकडे दाद मागितली! त्यानेंही प्रथम त्यास पुष्कळ दर्डाविलें, शेवटीं त्याच्या फिर्यादिचा खरेपणा पटून त्यानें एका नेटिव्ह आफिसरास स्वतःचे अधिकार देऊन पाठविलें, पण तो नेटिव्ह होता म्हणून त्या आफिसराची तो युरोपियन अधिकारी पर्वा करीना! शेवटीं, त्या नेटिव्ह आफिसरानें प्रत्यक्ष कलेक्टरच्या अधिकारदानाचा दाखला त्यास दाखविला तेव्हां निरुपाय होऊन टाळाटाळी करतां करतां व हुलकावण्या दाखवितां दाखवितां त्यास आपलें रहातें घर शोधूं द्यावें लागलें! व त्यांत काय झालें? ती बाई त्याच्या घराच्या झरोक्यांत मूर्तिमंत सांपडली! पण परिणाम काय? या बाईची जन्माची माती झाली! पण त्या साहेबाची त्या क्यांपवरून बदली झाली व तो हल्लीं एका मोठ्या हुद्यावर प्रतिष्ठेनें लोकांस नीतीतलें शिकवीत मिरवत आहे!

हीच स्थिती डिसइन्फेक्शनची! त्या उपायांच्या नांवानें किती सच्चा लोकांचें बिछानेच सामान जाळण्यांत आलें व किती लोकांच्या घराच्या जमिनी व भिंती खोदण्यांत आल्या व त्यावरील कौलें काढण्यांत आलीं यांत किती चोऱ्यामाऱ्या, लुच्चेगिऱ्या, व अब्रूलूट होऊं लागली! तेणेंकरून लोक पळू लागलें. मुंबईस इतर गांवाच्या मानाने सेग्रिगेशन व डिसइन्फेक्शनचा त्रास कमी होता. पण मुंबई ओस पडली! ती इतकीं कीं ज्या मुंबईत पादचारी लोकांस घोडे, गाड्या, ट्राम, बायसिकल्स वगैरे वाहनांच्या तडाक्यांतून जीव घेऊन मोठ्या मुष्किलीनें जावें लागतें ती झाडून सर्व शुक्क झाली. काळबा देवी सारख्या या रहदारीच्या मोठ्या राजरस्त्यावर सोवळ्या ब्राह्मणांचीं हजारों पात्रें सांडिलीं असती तरी त्यास कोणी व्यत्यय करितना, एवढेच नव्हे तर त्यांचे जेवण सकाळपासून रात्रीपर्यंत होतें तरी त्यास कोणीं विटाळही करिता ना! व्यापार बंद पडला! उन्हाळ्याला मुंबईचा प्लेग शमला, व रोग्याच्या कामावरील अधिकारी आम्ही रोगास आपले ‘सेग्रिगेशन व डिसइन्फेक्शन या उपायांनीं हटवून टाकिलें अशा बढाया मारूं लागले! तों तो रोग झाडून सर्व इलाखाभर तर काय पण दक्षिणेस म्हैसूरकडे व उत्तरेस माळवा, कलकता व पंजाबकडे पसरत गेला! तो पुढें प्रत्येक हिंवाळ्याच्या सुमारास मांडवींत हटकून प्रकट होऊं लागला! त्यावर वरिल उपायांची कांहीं मात्रा चालेना! रोग पडला नवा अपरिचित म्हणून शोध चालू असें ठरलें.

ह्या रोगाचीं पहिलीं चिन्हें मनुष्यास सुस्ती येते, त्यांस थंडी वाजूं लागते, त्यास वांती होते. ती वांती अनेक वेळां काळ्या रंगाच्या द्रव्याची असते. रोग्याचा चेहरा जड व मूर्खासारखा वेडावांकडा व विद्रूप होतो, व त्याचे डोळे लाल भडक होतात. त्याला  मोठा ताप येतो व त्याच्या जांघा अथवा कांखा यांत दुःख धुसधुसूं लागतें व त्यांतील मांस पिंडांत गांठी उठतात. कधींकधीं शरीरात विषमज्वराप्रमाणें पुरळ उठतो. पुष्कळ घाम येणें हें सुचिन्ह व जुलाब व नांक अथका आंतडीं यांतून रक्तस्राव व बेशुद्धी हीं प्रतिकूल चिन्हें ठरलीं. रोगी अत्यंत अस्वस्थ होतो व त्याचे स्नायूंस पुष्कळ आंचकें येतात. ह्या चिन्हांचें वर्गीकरण करून ह्या रोगाचे दोन तीन प्रकार मानण्यांत आलेः- (1) फुफ्फुस ज्वर अथवा असा ज्वर कीं ज्यांत फुफ्फुसें विकृत झाली आहेत. हा प्रकार अत्यंत स्पर्शसिंचारी व प्राणघातक असतों. (2) आंत्र ज्वर अथवा ज्यांत असा ज्वर कीं ज्यांत आंतडी विकृत झालीं असतांत व त्यांतून रक्तस्राव होतो. हा प्रकार वरच्या प्रकाराखालोखाल प्राणघातक, व स्पर्शसंचारी समजतात. (3) ग्रंथी ज्वर अथवा असा ज्वर कीं ज्यांत जांघा व काखा यांतील मांसपिंड गांठविकृत होऊन गांठी उठतात. हा प्रकार वरच्या दोहों प्रकारापेक्षा अगदींच कमी प्राणघातक असें म्हणता येत नाहीं, पण हा अत्यंत कमी स्पर्शसिंचारी असतो.

हे प्रकार एका जातीच्या सूम्ह जंतूंच्या योगानें उद्‌भवतात. जे जंतू हवा, पिसवा, रोग्याच्या कपड्यांशीं संबंध आलेले जिन्नस, जीवंत किंवा मृत उंदीर व इतर तसले प्राणी व धान्य यांबरोबर मनुष्यांच्या शरीरांतील रक्तांत संचार करितात व वृद्धी पावतात. हा संचार झाल्यापासून हे जंतू मनुष्यास आठ दहा दिवसांत बाधा करितात. रोग असाध्य असला कीं त्याचा पुरा परिणाम दोन तीन दिवसांत होतो, पण रोग दुःसाध्य असला तर रोगी बरा व्हावयास दोन तीन आठवडेही लागतात. ह्या रोगाचे घातक दिवस म्हटले म्हणजे पहिला, तिसरा व सातवा हे होत. पांच दिवस मधे गेले व गांठी चांगल्या पिकल्या तर रोगी निर्भय बहुत करून होतो. पण ह्या रोगांतील अत्यंत असह्य तापामुळें सर्व इंद्रियें व विशेषतः त्याचें हृदय इतकें दुबळें होते कीं रोगमुक्त काळांतही थोडें कुपथ्य म्हणजे जोरानें उठणे, बसणें, धांवणें, ताणाताण वगैरे त्याज्य क्रिया घडल्या कीं ती आपली कामें करावयाची सोडून देतात व रोगी मरतो. मग रोगयुक्त काळांत तसें कुपथ्य झाल्यास काय होतें हे का निराळें सांगण्याची जरूर आहे? मुळींच नाहीं.

ह्या रोगाच्या प्रसारास अनुकूल परिस्थिती कोणती म्हणावे तर उष्ण, समशीतोष्ण व दमट हवा नद्यांच्या कांठच्या मलईच्या जमिनी; दाट वस्तीची वाईट उजेडाच्या अंधाराची गांवे व निर्वात शहरें व अपुरें व कदान्न खाणारी माणसे ही होय. अशा परिस्थितींत उद्भवलेला एकदां रोग जोरावला कीं तो इतर परिस्थितींतही शिरावयास कमी करीत नाहीं. ह्या सर्व गोष्टींचा केवळ एका जंतूचा विचार करून हाफकिन साहेबानें ह्या जंतूंच्या  शवांच्या अर्काचा अंतःक्षेप (इनाक्युलेशन) करण्याची ह्या रोगावरील निवारक औषध  होय. अर्थात शोध केला व त्याप्रमाणें त्याच्या योगानें कांहीं निवारकता निरोगी मनुष्यांत उद्‌भवते, पण ती निवारकता थोडा वेळ टिकणारी असते व ती पुन्हां पुन्हा मिळविण्याच्या प्रयत्नांत निरोगी मनुष्य त्या विदेशी द्रव्याच्या रक्तांतील मिश्रणानें रोगी होण्याचा थोडा तरी संभव असतो. म्हणून त्या अंतःक्षेपा पेक्षां स्थानांतर हा साधा उपाय जास्त प्रशस्त होय असें उंदरांच्या स्वाभाविक व प्रत्यक्ष पूर्वोक्त स्थानांतरावरून धडधडीत ठरलें. म्हणून ‘प्लेग क्यांप’ सुरू झाले. त्यांचा फायदा फक्त श्रीमंत लोकांस होऊं लागला. पण त्यांचा फायदा गरीब लोकांस मिळाला नाहीं. त्यांस कारणें तीन होतीं- (1) घर सोडिले तर प्रत्येकास प्लेग सरल्यावर पूर्वींचें बिऱ्हाड मिळावें म्हणून पूर्वींच्या बिऱ्हाडाचें भाडें देत राहावें लागे, (2) प्लेग क्यांप मधील झोंपडीं घेण्यास चाळीस ते  साठ रूपये द्यावे लागत व (3) तीं झोंपडीं मिळविण्यास वशिले लावावे लागत.

अलबत, परशुरामास हा प्लेग क्यांपचा फायदा घेणें शक्य नव्हतें, कारण त्यास पैशाची एवढी अनुकूलता नव्हती, व त्यास वशिलाही सुलभ नव्हता. त्यांत गांव ओस पडल्यामुळें त्याची कोठऱ्यांकडील शिकवणीही सुटली! व त्याच्या चाळींतील सर्व बिऱ्हाडकरू ऐपतदार असल्यामुळें ते झाडून सर्व पळून गेले! व आसपासच्या ओस घरांतही एवढेंच घर या वस्तीचें असल्यामुळें त्यांतील असंख्य उंदीर त्याच्या चाळींत घुसले! व ते जागोजाग रोज मरूं लागले! पण अशा परिस्थितींत परशुराम व लक्ष्मी यांस पांच मुलांसह राहाणें भाग होतें! लोकांची वस्ती मुंबर्इंत नाहींशी झाल्यामुळें गांवांतील शाळा ओस पडल्या! हजार आठशे मुलांच्या परशुरामाच्या एल्फिस्टन मिडल स्कुलांत फक्त पंधरा मुलें शिल्ल्क राहिलीं व सरकारच्या बडतर्फीच्या भयामुळे फक्त सर्व मास्तर जागी हजर राहिले तर इतर शाळांची स्थिती काय विचारावी! ज्या मराठा हायस्कुलांत परशुरामाची पहिली हरी व यशवंत दोन मुलें जात असत, त्यांतील झाडून सर्व मुलें व मास्तर दोन्हीही नाहींसे झाले. म्हणून परशुरामाचीं दोन मुलें अर्थात घरीं बसलीं! त्यांचा तिसरा मुलगा दतु गिरगांव म्युनिसिपल मराठी शाळेंत जात असे, तो मात्र त्या शाळेंत तसाच जात राहिला!  तो एक दिवस घरीं ताप घेऊन आला! त्यास पूर्वोक्त फुफ्फुस ज्वर झाला! त्यास औषध डाक्तर देशमूख ह्यांचें सुरूं करण्यांत आलें. हा ताप स्पर्शसचांरी असल्यामुळें परशुरामाचें धाबें दणाणून गेलें होतें व परशुराम व लक्ष्मी हीं अनन्यभावें देवावर भरीभार ठेऊन राहिलीं होतीं! पण देवाच्या कृपेनें असें झालें कीं दतूच्या आंगांत त्या ज्वराचें वीष फार भिनलें नव्हतें किंवा डाक्तर देशमुख यांचा उपचार चांगला, कसेंही म्हणा, म्हणून दतूच्या तापाला नऊ दहा दिवसांनंतर उतार पडत चालला, पण त्या त्याच्या ज्वरासंबंधें तपास करितां असें कळलें कीं दतू हा त्यांच्या शाळेंत मोठा धीट मुलगा होता म्हणून एके दिवशीं त्या शाळेंत मेलेले उंदीर पडले असतां त्याच्या बेअक्कल मास्तरनें त्याच्याकडून त्याच्या वर्गातील उंदरांची शेपटें धरून त्यांस दूर फेंकविलें होतें व वरील ज्वर हा त्याचा परिणाम होता! ज्याचा शेवट चांगला, तें सर्व कांहीं चांगलें! देवानें खैर केली म्हणून मास्तरच्या बेंवकूफपणाचीं कडू फळें परशुराम व लक्ष्मी यांस चाखावीं लागलीं नाहींत! दतूचा श्वासनलिकादाह उपशम पावत गेला व तो कांहीं दिवसांनीं निखालस बरा झाला!

ह्या सर्व दुःखांत कुटुंबावर ईश्वराकडून एक दोन गोष्टी मोठ्या मेहेरीच्या झाल्या. त्या ह्या कीं ज्या चाळींत परशुराम व लक्ष्मी हीं राहत होतीं, ती सोमणाची चाळ अगदीं नवीन कोरी करकरीत बांधलेली होती व इतर सर्व बिऱ्हाडें निघून गेल्यावर त्याचें बिऱ्हाड अनायासें ‘प्लेग हट’ प्रमाणें इतर मनुष्यांच्या संसर्गांपासून मोकळें झालें होतें व अशा संकटांत दादर येथें प्लेग क्यांपांत कोठारे यांचें घराणें कोहीनूर मिलजवळ राहण्यास गेलें होतें, तेथे सदरील कोठाऱ्यांनीं आपला भाचा सोकरजी व इतर मुलें यांस इंग्रजी मराठी शिकविण्यास दादरचा पास देऊन थोड्या दिवसांनी परशुरामास बोलाविले! व तेणेंकरून ह्या कुटुंबास पैशाची थोडी मदत झाली व वर सांगितलेल्या उंदारांच्या पाठीमागून एक मोठी चपळ काळी मांजर त्या बिऱ्हाडीं येऊन राहिली व तिनें त्या बिऱ्हाडांत त्या उंदरांच्या शिकारीचा सपाटा चालवून व त्यांत एकही उंदीर फिरेनासा करून त्यांत गांठ्या तापाच्या जंतूंचा संसर्ग व होईनासा केला! तो इतका कीं त्या मांजरीच्या राखणेवर ह्या कुटुंबाने त्या बिऱ्हाडांत प्लेगची पहिलीं चार वर्षे बिनधास्त काढिलीं!

2. बदली - पण मध्यंतरी असें झालें कीं परशुरामानें नाशिक येथें काशिनाथ तात्या यांस प्लेगच्या प्रादुर्भावाची हकीगत कळविली, त्याबरोबर तात्यांनीं त्यास जमेल तर नासिक हायस्कुलांत बदली करून घेऊन गांठ्या तापाच्या आपत्तींतून सुटून जाण्याचा उपाय सुचविला. खरोखरी ह्या वेळीं तात्यांचें हृदय खऱ्या मायेनें द्रवल्याचें प्रत्यक्ष चिन्ह त्यांचे पत्रांत दिसत होतें! व म्हणून परशुराम व लक्ष्मी यांनीं त्याप्रमाणें सहज साधलें तर करण्याचा निश्चय केला! मे. चाट फील्ड साहेब डिरेक्टर यांनीं या सुमारास एक हुकूम मिडल स्कूलच्या हेड मास्तरांस असा दिला कीं या शाळेंतील मास्तरांस मुलांच्या अभावीं कामें नाहींत, म्हणून त्यांनी मुंबर्इंतील आपलें काम सोडून वाटेल तिकडे जातां कामा नये, त्यांनी शाळेंत मुलें असोत कीं नसोत रोज शिरल्याप्रमाणं वेळच्या  वेळीं कामावर हजर राहत जावें, पण ह्या हुकमाप्रमाणें जो वागणार नाहीं त्यास मुंबई सरकारच्या प्लेगांत सरकारी नोकरांनीं कसें वागावें ह्याबद्दल काढलेल्या वटहुकमाप्रमाणें बडतर्फ करण्यात येईल, पण कोणा नोकरास जिल्ह्यांतील इंग्रजी शाळेंत तूर्त किंवा कायमच्या जागीं काम करण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेप्रमाणें इकडे कळविण्यांत आल्यास त्यास सवडीप्रमाणें तिकडे बदलण्यात येईल. ह्या पत्राचा फायदा घेण्याचा निश्चय करून परशुरामानें आपली इच्छा नाशकास काम करण्याची वरिष्ठांस कळवून ठेविली. तेव्हां त्या वर्षांची सांथ उपशम पावण्याचीं स्पष्ट चिन्हें दिसत होतीं!

पण हें वरिष्ठास कळवितांना परशुरामाचा कोटीक्रम पुढीलप्रमाणे होताः- जे थोडे लोक मुंबईस मरत राहतील त्यांत आपला समावेश कशावरून होणार नाहीं? वर सवड मिळाली तर तिचा फायदा न घेणें म्हणजे शुद्ध मूर्खपणाची दांडगाई हौस! नेहमीं ‘सेफ साईडनें’ म्हणजे निष्कंटक मार्गानें गमन करीत असावें! कारण म्हटलें आहे कीं ‘न्यायें वागे त्यातें तिर्यंच्यांचीहि साह्यता’ होते. हे मनांत आणून जी इच्छा परशुरामानें धरिली, तीप्रमाणें त्यास नाशिक येथें हायस्कूलांत गद्रे मास्तर यांच्या जागीं बदली नेमिलें. त्यांस पांच रुपये बढती मिळाली. हायस्कूलचे हेडमास्तर द्वारकानाथ राघोबा तर्खडकर हे होते. बदली तीन महिने चालली. परशुरामाला तिसऱ्या व चवथ्या यत्तेचे वर्ग शिकवावे लागले. परशुराम नाशकास येऊन प्रथम तात्यांकडे उतरला होता. पण त्यांचेजवळ सीताबाई जहागीरदारीण राहत होती व तिच्या एकमुखी राज्यांत तीस परशुरामाचें तात्यांवरील वजन अत्यंत असह्य झालें! म्हणून तिनें त्यास घरांतून पळविण्याकरितां लक्ष्मीस त्रास देण्यास सुरवात केली!

तात्यांसारख्या हूद्देदाराच्या घरांत तांदूळ आपले शिजविण्यास बाजारांतून यावयाचे, पण सीताबाईनें आखाड सासू होऊन साळ आणिली व ती रोज लक्ष्मीकडून सडून घेण्याचा सपाटा चालविला! एक दिवस शेतीवरून आवईच्या माजऱ्या शेंगा आणून त्यांची भाजी ह्या कुटुंबास तिनें खाऊं घातलीं, तेणेंकरून तें सर्व कुटुंब बहुतेक बेशुद्ध व बेजार झालें! एवढा कडक उपाय योजण्याचें कारण असें झालें होतें कीं तात्यांनीं ह्या वेळीं पेनशन घेतलें तर त्या नवीन घटलेल्या उत्पन्नाच्या मगदुराप्रमाणें परशुरामानें तात्यांस पूर्वींचा खर्च कमी करण्यास सुचविलें होतें! परशुरामानें लगेच निराळें बिऱ्हाड तात्यांच्या इच्छेविरुद्ध केलें! तो पुलापलीकडे नावरेकरांच्या वाड्यांत  राहण्यास गेला. तेथें राहत असतां परशुराम व लक्ष्मी यांचा काळ प्रथम सुखानें जाऊं लागला. पण त्यास व्यत्यय आणण्यास पुढें असें बलवत्तर कारण झालें कीं त्यांची दोन मुलें-यशवंत व कुशी ही आजारानें अत्यंत बेजार झालीं! तो आजार कोणता म्हणाल तर  प्लेगाशिवाय दुसरा तिसरा कोणताही नव्हता! मुंबईस असतां त्यांच्या दतू मुलास मेलेले उंदीर उचलल्यानें प्लेग झाला होता, त्याप्रमाणें ह्या मुलांस नाशकास असता अगदी विनाकारण प्लेग झाला! त्या मुलांनीं कधींहीं मेंलेले उंदीर उचलले नव्हतें. एवढेंच नव्हे तर त्यांना मुंबई सोडून एक महिन्यावर दिवस झाले होते व नाशकांत त्यावेळी प्लेगनें आपले बिऱ्हाड अद्याप केलें नव्हतें व त्यामुळें स्पर्शसंचाराचा संशय घेण्यास जागा नव्हती. आपल्या कुटुंबात प्लेगाचा संचार न व्हावा म्हणून परशुरामानें त्यास मुंबईहून नाशकास आणिलें होतें तरी भवितव्यता त्याच्या मागची चुकली नाहीं! त्यांच्या मागून प्लेग मुंबईहून नाशकास आला!

ज्याप्रमाणें दतूस प्लेगाचा प्रकार फुफ्फुस ज्वर याची बाधा झाली होती, त्याप्रमाणें यशवंतास प्लेगाचा प्रकार आंत्र ज्वर याची बाधा झाली व कुशीस प्लेगाचा प्रकार ग्रंथि ज्वर याची बाधा झाली! अशा प्रकारें या यमसिंकर प्लेगानें आपले तिन्ही मासले या कुटुंबास दाखवून यमदरबारचें निरंकुशत्व पूर्णपणें प्रतीतीस आणून दिलें! यशवंत यास अतिशय ताप चढे व तो फार बेफाम होई! तो इतका कीं त्यास दोऱ्यांनीं घराच्या चौकोनीं खांबास बांधून ठेवावें लागत असे! कारण तो गोविंदराव बेलसरे मास्तरसारख्या बळकट पुरुषास आटोपत नसे! बेलसरे हे कोण हें सांगावयास नकोच. हे भुसावळ येथील परशुरामाचे फर्स्ट असिस्टंट. हे भुसावळ येथून बदलून हायस्कुलांत एक असिस्टंट होऊन परशुरामाप्रमाणेंच आलेले होते. हे मोठे धीट व बळकट होते व म्हणूनच परशुरामानें त्यांस बडवणी संस्थानांत पूर्वीं सांगितल्याप्रमाणें वसाहतीच्या कामास नेण्याचा विचार केला होता. हे परशुरामास ह्या आणीबाणीच्या प्रसंगी फार उपयोगीं पडले, संकटांत उपयोगीं पडतो, तो खरा स्नेही! हे रोज रात्रीं निजण्यास परशुरामाकडे येत असत. ते या आजारास भीत नसत. याप्रमाणें परशुरामानें मुंबईचे डाक्तर सदाशिव वामन काणे यांस सदरीं विराट पुरुषाच्या अक्राळविक्राळ सहस्राननांत दुनिया कशी जाऊन पडत आहे हें लिहून त्यांस स्वतःच्या मुलांचें प्रकृतिमान कळवून त्यांस उपचार विचारिले. तेव्हां त्यांनीं पत्रानें उत्तर न देतां नाशिकच्या पीची फिप्सनच्या आरोग्य गृहांत बिऱ्हाड आणून ठेविलें व तेथून घोड्याची गाडी करून ते स्वतः परशुरामाकडे आले व त्यांनीं मुलांच्या उपचाराची कांहीं व्यवस्था लावून दिली व त्या व्यवस्थेप्रमाणें पंचवटींतील एका दवाखान्यांतून कांहीं उपचार चालू झाले. पण कांहीं उपयोग झाला नाहीं, कारण मूर्तिमंत प्लेगाला ते बिचारे काय करणार! पण ह्या त्यांच्या कृत्यानें त्यांच्या दयाळूपणाची उत्तम साक्ष पटली.

यशवंत दिवसानुदिवस अधिकाधिक बेफाम होत चालला! त्याचे हातपाय वा कानाच्या पाळ्या वारंवार थंड पडत चालल्या! तो वांचण्याची आशा कमी वाटूं लागली, कारण तो फार खंगत चालला! पण हा मुलगा गोरागोमटा व बराच बुद्धिमान असल्यामुळें परशुराम व लक्ष्मी यांस असें वाटत असें कीं ह्या मुलास आपण चांगलें शिकवून डाक्तर करून हा आपल्या घराण्याचें नांव राखील, एवढेंच नव्हे तर तो घराण्याचें गेलेलें नांव पुन्हां मिळवील. पण तो परलोकीं चालला असें वाटून त्यांस काय दुःख झालें असेल तें अनुमानानेंच ताडणें बरें! त्यांतल्या त्यांत ह्या मुलावर लक्ष्मीचें सर्वांत जास्त प्रेम होतें. तेव्हां तीस परशुरामापेक्षांही जास्त वाईट वाटूं लागलें! ती फार गयांवयां करूं लागली! पण काय करणार! धन्याचा धनी कोण! वगैरे ठराविक समाधानाच्या गोष्टी सांगून परशुराम स्वतः दुःखी असतां लक्ष्मीचें समाधान करण्याचा नेहमीं प्रयत्न करीत असे! पण त्या कोटीक्रमानें का कोठें कोणाच्या पोटांतील खरी दुःखाची कालवाकालव बंद पडते! पुढें ज्वराच्या दहा अक्रावे दिवशीं परशुरामानें तो ज्वर विषम समजून स्वःच्या अकलेने त्रंबकींतून विषम ज्वरावर औषध काढिलें व तें बाजारांतून आणून त्याचा काढा केला व तो त्यास दोनदां तीनदां दिला असेल नसेल व परशुराम व लक्ष्मी यांनी त्याचें आयुष्य वाढविण्याकरितां मोठ्या सद्गदित अंतःकरणानें व मोठ्या भक्तिभावें आपले पुण्याचें पाणी त्याच्या हातावर सोडलें असेल नसेल तोंच त्यास घाम सुटला व अत्यंत दुर्गंधी जुलाब जंतासह झाले व त्यास दिवसानुदिवस आराम पडत चालला! पण तो इतका अशक्त झाला कीं त्याच्या कित्येक दिवस तो उभा राहिला कीं झेंपा जात असत! अशा प्रकारें तो एक दिवस तोंड धुण्यास घराच्या जोत्याच्या कांठाजवळ जात असतां त्याची झेंप गेली व तो जोत्यावरून पडला व त्याचा एक पुढचा दांत पडला व कपाळावर एक खोंक पडली, त्यांच्या खुणा अद्याप त्याचे आंगावर आहेत!

याप्रमाणेंच स्थिती कुशीची होती! तिचे आंगात ताप अत्यंत जोराचा असे. पुढें तिच्या जांघेत गांठी आल्या व ती बेशुद्ध झाली! ती इतकी कीं तिच्या तोंडात अर्ध्याभर दूध ओतलें तर तें गिळण्याची तिला जाणीव नव्हती, मग औषधाची गोष्ट कशास हवी! तिला औषधापाण्यावांचून पाटींत झांकून ठेविलें होतें! उपचार केले नाहींत असें नच म्हणावयास तिच्या गांठीभोंवती समुद्रफळ उगाळून लावून त्यांवर बिब्बा घालण्यांत आला होता! तिच्या वांचण्याची आशा यशवंतापेक्षां जास्त होती असें मुळींच नव्हतें! त्यांत ती परशुराम व लक्ष्मी यांची एकुलती एक मुलगी! ती कुच्चर आहे असें परशुरामास आढळलें होतें म्हणून परशुरामाचें तिजवर लक्ष्मीच्या प्रेमाइतकें प्रेम नव्हतें तरी ती मृत्यूच्या दारीं पडली असतां तिजवर परशुरामाचें लक्ष्मी इतकेंच प्रेम होतें! पण बायकांस मुली मुलांपेक्षां नेहमींच जास्त आवडत असतात या न्यायानें पाहिलें असतां लक्ष्मीचें प्रेम तिजवर परशुरामाच्या प्रेमापेक्षां एकंदरीत जास्त होतें! पण सर्व संततींत ही संतती केवळ परशुरामाच्या प्रथम उचलीनें झाली व ह्या संततीस स्त्रीत्व लक्ष्मीच्या इच्छेप्रमाणें केवळ काकतालीय न्यायानें मिळालें होतें, म्हणून कोणास दुसऱ्यावर प्रेमाच्या बाबतींत उणेपणा दाखवून हिणविण्याचें कारण नव्हतें! तेव्हां ती मरावयास टेकली असतां तिच्या संबंधें ह्यांस अत्यंस दुःसह दुःख होऊं लागलें! पण देव तारी त्यास कोण मारी! ती मृत्यूच्या जबड्यांतून त्या ईश्वरी संकेतानें ओढून दुनियेंत ठेवण्यांत आली! ती हळूहळू बरी होती गेली!

अशीं हीं दोन परशुरामाचीं व विशेषतः लक्ष्मीचीं लाडकी मुलें ईश्वरी दयेनें वांचण्याच्या पंथास लागली तेव्हां त्यांच्या आनंदाचा पारावार काय वर्णावा! ह्याच वेळीं नाशकांतील पेठ तालुक्यांतील पिकें बुडून पडलेला दुष्काळ तेथील लोकांस अत्यंत जाचकारक झाला. म्हणून तेथील लोक पोटाकरितां शहरांस उतरून आले! त्यांचें स्वरूप असें होतें- त्यांच्या हातापायांच्या काड्या, पोटाचें ढेरकें, व तोंडांचा हुक्का झालेला होता! त्यांच्या बृहतींत लंगोटी व आंगावर लकतऱ्या होत्या! अशा स्वरूपाचीं माकडें नव्हेत तर नांवाची माणसें तेथें गोदावरी नदीभर उतरलीं होतीं! त्यांतील पुरुष व स्त्रिया शहरांतील लोकांच्या दारोदार फिरत व भाकरीतुकडा ओला सुका तसाच खात व गंगेचे पाणी पीत व तिच्या वाळवंटांत किंवा खडकांवर निजत! पण त्यांस धंदेवाल्या व पिढीजाद्या भिकाऱ्यांप्रमाणें भीक कशी मागावी हें मुळींच समजत नसे. तें असें कीं त्यांस कोणी भीक घालण्यास पुढें केली तर ती घेण्यास त्यांस आपला पदर पुढें करण्याची अक्कल नसे! अशीं हीं अकृत्रिम दयेस पात्र माणसें होतीं! हें जाणून परशुराम व लक्ष्मी यांनीं आपल्या मुलाच्या वांचण्याबद्दल कृतज्ञ होऊन चणेचुरमुरे त्यांस वाटण्याची सुरूवात केली! हें त्याचें कृत्य कांहीं दिवस चाललें होतें! त्यांनी सिंहस्थविधी भटाच्या विनवण्यास भुलून केला नाहीं व त्यांनीं सर्व बचत या धर्मकृत्यांत घातली! इतक्यांत ते काम परशुरामाप्रमाणें मुंबईहून प्लेगाकरितां पळून आलेल्या भाट्ये लोकांनीं उचलून मोठ्या प्रमाणावर चालू केलें तेव्हां परशुरामाच्या तुटपुंज्या धर्मादायाचा फारसा उपयोग नाहींसा झाला! तेव्हां त्यानें चणेचुरमुरे त्यांस गंगेवर वांटण्याचें सोडून एकाच मनुष्यास भाकर पुरवून वांचविण्याचें ठरविलें व त्याप्रमाणें तो तें करूं लागला!

इकडे भाट्ये लोकांनीं जे अन्नदान चालू केलें, त्याचा परिणाम तें घेत्याच्या मरणांत होऊं लागला! तीं माणसें कित्येंक दिवस उपासमार झालेलीं होतीं. त्यांस भाट्यांच्या अन्नछत्रांतून डाळभात मिळूं लागला. पण तो त्या नाचणी वरी वगैरे निकस अन्न सदां खाणाऱ्या माणसांस मानवला नाहीं. त्यांत पटकी चालू झाली. तिच्या योगानें तींतील फार माणसें मरूं लागलीं! त्याबरोबर तीं नाशकांतून पळून जाऊं लागलीं! व जातां जातां रस्त्यानें मरून पडलेलीं आढळूं लागलीं! व त्यांच्या संसर्गानें तेथील मूळच्या रहिवाशांत पटकी पसरूं लागली! तेव्हां तें पाहून सरकारनें पोलीसमार्फत त्या लोकांच्या टोळ्या पेठेकडे नेऊन घालण्याची सुरवात केली तसे रस्त्यानें मरून पडणाऱ्या लोकांच्या संख्येची कमाल झाली!

परशुरामानें यशवंत बरा झाल्यावर त्यास गंगापूरचा धबधबा पाहण्यास तात्यांच्या तांग्यातून नेलें होतें तेव्हां त्यांच्या हा हृदयद्रावक देखावा नजरेस पडला! एके दिवशीं परशुराम मुलांसह डोंगरउताऱ्यावरून पंचवटींतील कुंभारांच्या विटांच्या भट्ट्यांमधून आग्रारोडनें चालला असतां त्यास सांसर्गिक पटकीनें ग्रस्त झालेली पण जवळ चिटपाखरूंही नसलेली एक कुंभारीण आढळली! तिला वरचेवर जुलाब व वांत्या होत होत्या! तिचे डोळे खोल गेलेले होते! तिच्या हातापायांतून पुन्हः पुन्हां पेटके येत होते! तिची वाचा नीट नव्हती!  तिचे जवळ पाणी पिण्यास एक थंड पाण्याचें मडकें होतें! परशुरामाने तीस ‘औषध घेतेस का’ म्हणून विचारिलें. तेव्हां तिनें मरेन तर बरें असें म्हटलें. त्यानें असें कां? म्हणून विचारिलें. तिने माझेवर प्रेम करणारें कोणी नाहीं, पण गांवीं गेलेल्या माझे नवऱ्याचें आयुष्य वाढो असें म्हटलें. त्याबरोबर परशुरामास तिचें महत्व जास्त वाटलें व त्यानें तीस मरण्याची इच्छा न करण्यास व औषध घेण्यास तिचें मन वळविलें व घरातून त्यानें लक्ष्मीजवळून भिलावे व चिंच यांच्या गोळ्या साबूदाण्याची कांजी करून आणून तीस देण्यास प्रारंभ केला व ती थोडे दिवसांनीं अगदीं निकोप बरी झाली व ती व तिचा नवरा हीं कृतज्ञतेनें परशुरामाच्या बिऱ्हाडीं कधींकधीं येऊंजाऊं लागलीं!

इतक्यांत गद्रे कायमची नोकरी सोडून जाणार होते. पण ते तसें न करितां त्यांची तीन महिन्याची रजा संपतांच एप्रिल महिन्यांत आपले नासिक हायस्कुलांतील जागेवर रुजू झाले. तेव्हां परशुरामास नासिक सोडून परत मुंबईस आपल्या मिडल स्कुलांतील जागेवर रुजू होण्यास परत जावें लागलें! पण गद्रे पुन्हां रजेवर जाण्याचा किंवा रिटायर होण्याचा संभव होता, व नासिकची हवा मुंबईपेक्षां तर काय पण सगळ्या हिंदुस्थानांत अत्यंत आरोग्यकारक होती व परशुराम आठपंधरा दिवसांत मे महिन्यांत उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त परत नाशकास येणार होता म्हणून परशुरामानें लक्ष्मीस मुलांसह नाशकासच ठेविलें व तो एकटाच मुंबईस निघून गेला, पण तो तिकडे जाण्यापूर्वीं तो हरीसह तेथील कोरीव लेणी पाहून आला. इकडे लक्ष्मी नाशकास एकटी राहिली असतां तेथें पेठच्या लोकांच्या संसर्गानें मूळच्या लोकांत उठलेल्या पटकीची इतकी कमाल झाली कीं सरकारने पटकीचा गांवोगांव प्रसार बंद करण्याकरितां त्या वेळीं सिंहस्थ पर्वणीनिमित्त येणारी यात्रा बंद करावी लागली! पुढें नाशकास परशुराम परत सुट्टींत आला असतां लार्ड सँडहर्स्ट यांच्या हातून नासिक येथील गंगेवरील काशिनाथ तात्यांनीं सर्व पैसे जमा करून आपल्या हयातीचें व नोकरीचें कायमचें व शेवटचें स्मारक म्हणून उभारलेला पूल चालू करण्यांचा विधी तमाम लोकांच्या टाळ्यांच्या गजरांत उरकण्यांत आला! फक्त या विधीस येथील कांहीं फुकट खाऊ व नवविद्वेकी भटभुक्षुकांचीं रिकामटेकडीं टारगीं व असमंजस पोरें असंमत्तीपर हुशहुश उद्गार काढतांना कोठेंकोठें दिसत होतीं! पण तींच पुढें बहुजन समाजाच्या लोटाबरोबर त्या नासिक व पंचवटी जोडून लोक कल्याण साधणाऱ्या पुलावरून मोठ्या आतुरतेनें व अहमहिमिकेंनें पंचवटींत जाऊन आपण केलेल्या नीच कृत्याबद्दल मनांतल्या मनांत पस्तावल्याचीं उघड चिन्हें प्रदर्शित करीत होतीं! हा विधि पाहिल्यावर परशुराम व सुट्टी सरल्यावर परशुराम एकटाच मुंबईत गेला व नातूच्या चाळींत बिऱ्हाड पाहून त्यानें लक्ष्मीस मुलांसह मुंबईस आणिलें! कारण गद्रे रजा किंवा पेनशन घेऊन त्यास त्याची जागा मिळण्याची आशा बिलकुल राहिली नाहीं.

3. महत्त्व - ह्या व ह्यापुढील मिळून एक तपभर परशुरामानें मुंबईस वस्ती केली. त्यांत पूर्वोक्त प्लेगाचें अधिभौतिक संकट ह्या कुटुंबाच्या अखंड राशीस लागलें होतें, व त्यांस पगाराशिवाय त्यांच्या इतर प्राप्तीला अगदीं पुरी चाट बसली होती! ती इतकीं  कीं त्यांस प्लेगाचीं पहिलीं चार वर्षें वगैरे कोणाच्याही हेल्थ क्यांपमध्यें एखादी अगदीं लहानशी झोपडी विकत घेऊन राहण्याची एवढेंच नव्हे तर त्यास स्वतःचा चरितार्थ अब्रूनें पुरा चालविण्याचीही ऐपत नव्हती! मग त्यांत मुलांचे कपडेलत्ते व शाळांची फी, त्यांची दुखणी पहाणी व मुंजीलग्नें वगैरे बाबींचे नित्य व नैमित्तिक खर्च कसे निभणारं! पण त्या चार वर्षांत तर काय पण पुढील आठ वर्षें हे झाडून सर्व खर्च मुंबई सारख्या महागऱ्या शहरीं अगदीं बिनभोभाट भागले, त्यांत त्याचें श्रेय ह्या कुटुंबांतील इतर मेंबरांकडे जितकें आहे त्याहून तें कितीतरी पटीनें खुद्द लक्ष्मीकडे आहे, कारण त्यांतील इतर मेंबरांच्या कर्तृत्वापेक्षां लक्ष्मीचें कर्तृत्व कितीतरी मोठें व महत्वाचें व्यापक होतें!

 ह्या कुटुंबाचें तारूं प्लेग व दुष्काळ यांच्या भर तुफानांत एकीवर एक लोटत येणाऱ्या लाटांच्या तडाक्यांनीं संसारसागराच्या एका किनाऱ्यावरील खडकांच्या सुळक्यापासून दुसऱ्या किनाऱ्यावरील खडकांच्या सुळक्यांवर क्षणोक्षणीं आपटूं पाहत असतां त्यावरील एखाद्या उतारूचें धैर्य अगदीं अखंड अचल राहिलें असेल तर ह्या लक्ष्मीचेंच होय व ह्या प्राणावर बेतणाऱ्या संकटांत अमूक एक काम मी करणार नाहीं असें न म्हणून तें छातीनें व आत्मनिरपेक्ष तडीस नेणारी नावाड्याची व नाखव्याची व्यक्ती  असेल तर ती ह्या लक्ष्मीचीच होय! ही व्यक्ती इतर उतारूंबरोबर उतारूं, इतर नावाड्यांबरोबर नावाडी, हें तर काय पण सुकाण्या व नाखवा यांचें सहकारितेनें व स्वतंत्रपणानें जसें पडेल तसें काम करणारी होती! ती एका क्षणीं त्या तारवावरील भटारखान्याचें काम करण्यास तत्पर असे तर दुसऱ्या क्षणीं त्या तारवांत पूर्वोक्त तुफानानें शिरलेलें पाणी हवेस करून काढून टाकण्यांत गुंग असे, ती एका क्षणीं तारवांची गती वाढविण्यास इतर नावाड्याबरोबर वल्ह्यांनीं हलेसे मारण्यांत गुंतलेली असे तर दुसऱ्या क्षणीं तारवाच्या सगळ्यांतील उंच तक्तपोशीवर बसून दुर्बिणीनें खडक निरखून ते टाळण्याकरितां  सुकाण्यास ओरड न करितां अगदीं गापचुप नेत्रसंकेतानें इशारे देण्यांत गढलेली असे! अशा प्रकारच्या लक्ष्मीच्या अप्रतिम दक्षतेमुळें व बहुगुणीपणामुळें ह्या देवक्षोभाच्या वेळीं परशुरामाचे कुटुंबाचे कोठेंही दगा फटका न होतां गरीबी असतांही अब्रूनें निभावलें, एवढेंच नव्हे तर त्या कुटुंबाचें डोकें इस्टेट गेल्यामुळें आलेल्या हीन स्थितींतून हळूहळू वर निघूं लागलें व तें इतरांस हीन स्थितींतून त्यांचीं डोकीं वर काढण्यास मदत करूं लागलें!

म्हणूनच पूर्वापार कुटुंबवत्सल पुरुषांचें महत्त्व नंग्याभटिंगापेक्षां ह्या देशांत जास्त मानीत आले आहेत, व त्या ध्येयाप्रमाणें ह्या देशांत नंग्याफटिंगापेक्षां बायका मुलांच्या धन्यांची संख्या जास्त आहे, पण निलाजऱ्या भटिंगांनीं भरलेल्या राष्ट्रापुढें सध्याच्या कालमहिम्याप्रमाणें अबू्रदार कुटुंबवत्सलांनी भरलेल्या राष्ट्रांस मात्र हार खावी लागत आहे. येंत तें ध्येय फिकें पडूं पहात आहे ही मोठी दुःखाची गोष्ट आहे! पण थोड्या कालांतरानें नवी दुनिया अनुभवानें शहाणी होऊन आत्मघातकी नंग्याभटिंगाचें ध्येय सोडून देऊन जुन्या आत्मोन्नतिकारक कुटुंबवत्सल धन्यांचे ध्येयाकडे वळेल ही खात्री आहे!

  0

(परशुराम हरी थत्ते यांना 1856 ते 1940 असे 84 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी लिहिलेले अलक्ष्यरूप : सौ.लक्ष्मीबाई व परशुराम थत्ते यांचे चरित्र व संसार या नावाचे हस्तलिखित पुस्तकरूपाने आले आहे. मराठी संशोधन मंडळ, मुंबई यांनी ते पुस्तक प्रकाशित केले आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप कर्णिक यांनी अभ्यास-संशोधन करून ते पुस्तक दिमाखदार पद्धतीने काढले आहे. त्याला विवेचनात्मक प्रस्तावनाही लिहिली आहे. त्या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करीत आहोत. बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वीचे म्हणजे 1896 मधील प्लेगच्या काळाचे वर्णन करणारे प्रकरण.. - संपादक)

Tags: प्लेग इतिहास परशुराम हरी थत्ते मराठी साहित्य नवे पुस्तक सौ.लक्ष्मीबाई व परशुराम थत्ते यांचे चरित्र व संसार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

परशुराम हरी थत्ते

(1856 - 1940) परशुराम हरी थत्ते यांनी लिहिलेले अलक्ष्यरूप : सौ.लक्ष्मीबाई व परशुराम थत्ते यांचे चरित्र व संसार या नावाचे हस्तलिखित पुस्तकरूपाने आले आहे. वेदांंच्या काळाचा इतिहास हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके