डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कुर्बानभाईंच्या दुकानावर पूर्वीसारखा अड्डा जमत नव्हता. ते विझल्याविझल्यासारखे राहत होते. खूप कमी बोलत होते आणि आम्हांला पहाताच दुकानदारीत व्यस्त होत होते. ते आतल्या आत कुढत होते... 

पण खुलत नव्हते. आम्ही त्यांना खुलवू शकलो नाही. एक दिवस मी जेव्हा पोहोचलो तेव्हा त्यांची माझ्याकडे पाठ होती. कुणाला तरी सांगत होते.. ‘‘तुम्ही काय डोंबलाचा इतिहास वाचलाय? म्हणतात की पार्टिशन झाले होते! नाही झालेले... आत्ता होते आहे... सुरूच आहे..’’ आणि मला बघून एकदम कामाला लागले. या कथेचा शेवट चांगला नाहीये. मला वाटते की तुम्ही तो वाचू नये आणि वाचलात तर विचार करा, की या कथेचा अजून एखादा शेवट होऊ शकतो? चांगला शेवट? आणि जर झाला तर तो कसा?
 

तुम्ही कुर्बानभाईंना ओळखत नाही? कुर्बानभाई या गावातील एक शानदार व्यक्ती आहेत. या शहराचे हृदय आहे. आझाद चौक आणि ऐन आझाद चौकात कुर्बानभाईंचे किराणामालाचे छोटेसे दुकान आहे. इथे प्रत्येक वेळी पंधरा लेंगा आणि सदरा घातलेले, दोनदोन चारचार आण्याचे सामान मागणाऱ्या मुलांच्या आणि मोठ्यांच्या गर्दीने वेढलेले कुर्बानभाई आपल्याला दिसतील. जर गर्दी नसेल तर उकिडवे बसून ते काहीतरी लिहीत असतील. वारंवार मोठ्या फ्रेमचा चश्मा बोटाने वर चढवत, आणि कपाळावरील काळेपांढरे केस डाव्या किंवा उजव्या हाताने मागे सरकवत असतील. जर तुम्हांला तिथून सामान घ्यायचे असेल तर तुमचे स्वागत आहे. अतिशय रास्त भाव आणि वजनात अजिबात खोट नाही. ज्या वस्तूंनी त्यांचे समाधान होणार नाही त्या वस्तू ते विकत नाहीत. कधी असा खराब माल चुकून दुकानात आलाच तर तो दुकानात सडून जाईल, पण ते तो विकणार नाहीत. तुम्हांला सरळ नाही म्हणून सांगतील. ‘‘लाल तिखट? तुमच्या लायक नाहीये. या वेळी रंग मिसळलेले तिखट आले आहे. तेल! चांगले नाही. दिवाबत्तीसाठी हवे असेल तर घेऊन जा.’’

याच कारणाने जो एकदा किराणा घ्यायला त्यांच्या दुकानात जातो तो दुसऱ्या कोणत्या दुकानात जात नाही. तशी तर चहुबाजूला सिंधी, मारवाडी व्यापाऱ्यांची मोठी मोठी दुकाने आहेत. पण कुर्बानभाई म्हणजे प्रामाणिकपणा, उधारीची सोय आणि विश्वास.

पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जे सामान आपण घेऊन चालला आहात त्याची पिशवी किंवा लिफाफा बघितल्याशिवाय फेकू नका. कदाचित त्यावर एखादा स्वाभिमानी किंवा भयंकर शेर लिहिलेला असण्याची शक्यता आहे. त्यांना कितीतरी लोकांनी सागून झाले की, कुर्बानभाई एखादी वही गल्ल्यात ठेवा. शेर झाला की तो त्या वहीत नोंदवून ठेवा. कुर्बानभाई ती सूचना ऐकतात, त्याच्याशी ते सहमतदेखील होतात, जे शेर हरवले त्यावर दु:खं व्यक्त करतात, पण करतात मात्र तेच.

माझीही या शानदार माणसाशी अशीच ओळख झाली. मी ऑफिसातून परतताना कुर्बानभाईच्या दुकानातून काहीतरी वस्तू खरेदी करून घरी आलो... लिफाफ्यावर लिहिले होते...

‘फकत पासे-वफादारी है, वरना कुछ नाही मुश्किल.

बुझा सकता हूँ अंगारे, अभी आँखों में पानी है!’

आणि हा माणूस आजदेखील चार-चार आण्यांचे सामान तोलतो आहे! आणि का तोलतो आहे याचीदेखील एक कहाणी आहे.

कुर्बानभाई यांच्या वडिलांचा अजमेरमध्ये रंगांचा व्यापार होता. दोन मोठी मोठी घरं होती. हवेल्या होत्या असेच म्हणायला हवे. नव्या बाजारात खूप मोठे दुकान होते. बारा नोकर होते. घरी बग्गी होती. एक ‘बेबी ऑस्टिन’देखील होती. जी फिरायला जायच्या कामी येई. एकत्र कुटुंब होते. पिता मौलाना आझाद यांच्या प्रेमातील होते. मोठे मोठे नेते आणि शायर घरी येऊन थांबत. कुर्बानभाई त्या वेळी अलिगढ विश्वविद्यालयात शिकत होते. त्यांना भविष्याची चिंता नव्हती की, म्हातारपणाची काळजी नव्हती. आयुष्य मजेत चालले होते. इश्क, शायरी, होस्टेल आणि स्वप्न.

त्याच वेळी फाळणी झाली. दंगे झाले. दुकान जाळले गेले. नातेवाईक पाकिस्तानात पळून गेले. दोन भावांची हत्या केली गेली. पिताजींनी त्या धक्क्याने बिछाना पकडला. आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. नोकर घरातील चीजवस्तू घेऊन पळाले. जे वाचले होते त्यांना घेऊन कुर्बानभाई नागौर इथे गेले. तिथून मेडता, मेडतावरून टौंक. ...कुठे जाणार? कुठेे आसरा घेणार? पाकिस्तानात जावे का... पण नाही गेले. कारण जोश गेले नाहीत. सुरैया गेली नाही.... कुर्बानभाईंना आवडणारे अनेक लोक गेले नाहीत... मग कुर्बानभाई का जातील?

हळूहळू घरातील विकण्यासारख्या सगळ्या वस्तू विकल्या गेल्या. कुठेे काही काम किंवा नोकरी मिळाली नाही- जी त्या काळात मुसलमानांना मिळणे अवघडच होते. त्यांच्या हातात कोणतेही कौशल्य नव्हते. कला नव्हती. शिक्षण अर्धवट होते. शेवटी एका शेठच्या इथे लोखनाचे काम करू लागले. पण आपला प्रामाणिकपणा, सभ्यता या दुर्गुणांमुळे लवकरच हाकलून दिले गेले. मालक होण्याचे त्यांचे वेड मावळले. परिस्थिती अशी होती की, ते हिंदूंमध्ये मिसळले तर त्यांच्याबद्दल शंका घेतली जाई. आणि मुसलमानांमध्ये मिसळले तर धार्मिक उन्मादाला तोंड देणे त्यांना अवघड होऊन जाई. मग त्यांनी मजुरी केली, हमाली केली, छोटी-मोठी कामे केली. ते नवीन नवीन काम शिकले. लाचारी माणसाला सगळे काही शिकवते. त्यांनी सायकलची पंक्चरं जोडली, पत्र्याचे डबे जाळले. कुलूप-छत्र्या दुरुस्त केल्या. कंदील दुरुस्त केले. कापड रंगवण्याचे काम केले. पण हळूहळू त्यांच्या शरीराने साथ देणे नाकारले. धक्के खाता खाता कसे कुणास ठाऊक ते या शहरात आले आणि एका वयस्कर नमाजीकडून त्यांनी पन्नास रुपये उधार घेऊन हे किराणामालाचे दुकान सुरू केले. एखाद्या माणसाच्या संघर्षाची कहाणी इतक्या कमी शब्दांत सांगणे हा त्याच्या संघर्षाचा अपमान करण्यासारखे आहे. पण काय करू? त्याची कथा मी तुम्हांला सांगणार आहे म्हणून ही प्रस्तावना.

दुकानाचा जरा जम बसल्यावर कुर्बानभाईंनी वृत्तपत्र मागवायला सुरुवात केली. सगळं तर मार्गी लागलं होतं. दोन जोडी कपडे झाले, पोट भरण्याचे साधन मिळाले. अजून काय हवे होते? त्यांची मुलं जगली नव्हती. मौजमजा, हिंडणे-फिरणे ते विसरले होते. मियाँबीबीसाठी अल्लाहने खूप काही दिले होते....मग ते वृत्तपत्र का मागवणार नाहीत? त्या काळी वृत्तपत्र पोस्टाने मागवावे लागे. ते घेण्यासाठी कुर्बानभाई स्वतः पोस्टात जात. वृत्तपत्र सांभाळून ठेवत आणि त्यातील अक्षर न्‌ अक्षर वाचीत असत. तोच तो मजकूर वारंवार वाचीत असत. वृत्तपत्र दुसऱ्यांकडून मागूनही आणीत असत. आपण खरेदी केलेल्या वृत्तपत्राची त्यांनी फाईल केली होती. प्रत्येक पेपर ते जपून ठेवत.

या क्रमाने त्यांचे संस्कार बोलू लागले. लोकांनी पाहिले की, हा माणूस कधी खोटे बोलत नाही. फसवाफसवी करीत नाही. वजनात कधी काटा मारत नाही. अश्लील बोलत नाही. सभ्यपणे बोलतो. आणि अडचणीच्या प्रसंगी कुणालाही मदत करतो. प्रत्येक कामात त्याचे संस्कार झळकतात. म्हणून हळूहळू शहरातील प्रतिष्ठित लोक दुआ-सलाम करू लागले. व्यापाऱ्यांकडे लग्नकार्य असेल तर त्यांना निमंत्रण पत्रिका दिली जाऊ लागली. लोक त्यांच्याकडे येऊ लागले. कुर्बानभाई त्यांना चहा पाजू लागले. दुकानदारी सोडून गालिबवर चर्चा करू लागले.

हळूहळू कुर्बानभाईंच्या दुकानावर सुशिक्षित लोकांचा अड्डा जमू लागला. प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, लिहिणारे-वाचणारे यांचा त्यात समावेश असे. संध्याकाळ होता होता कुर्बानभाई यांचे दुकान फुलून जाई. कुर्बानभाई आदाब अर्ज करीत. चहावाल्याला आवाज दिला जाई. ओट्यावर पोती अंथरली जात. गिऱ्हाइकी चालू असे, हसणे-खिदळणे चालू असे. मध्ये मध्ये ते कुणाला काम सांगायलादेखील संकोच करीत नसत. कुणाला पिशवी घेऊन दूरवर ठेवलेल्या पोत्यातून मिरची भरायला सांगत, तर कुणाला किमतीची बेरीज करायला सांगत. इंग्रजी साहित्याचा व्याख्याता रस्त्यावर उभा राहून लसूण पाखडतोय, किंवा स्थानिक पेपरचा पत्रकार ओट्याखाली ठेवलेल्या पोत्यातून मुलतानी माती कुणालातरी भरून देतोय हे दृश्य खूपच मजेशीर असे.

आम्हां लोकांच्या संपर्कामुळे कुर्बानभाई बदलू लागले. त्यांना पहिल्यांदा जाणवले की, आपल्याला या समाजात मान आहे. आम्ही त्यांच्याकडून उर्दू भाषा शिकलो. त्यांची लायब्ररी जी मुळातच खूप समृद्ध होती, ती आम्ही व्यवस्थित लावली. पुस्तकांना कव्हरं घातली. त्या लायब्ररीचा आम्ही खूप फायदा करून घेतला. आम्ही कुर्बानभाईंना पकडून पकडून मुशायऱ्यांना घेऊन जाऊ लागलो. आम्ही त्यांना अशी नियतकालिके दाखवली... अशा कवी-लेखकांबद्दल सांगितले, जे फक्त त्यांच्या कल्पनेत होते... अशा शायरांच्या रचना ऐकवल्या की ज्यांनी साकी आणि शराब यांना कधीच अलविदा म्हटलेले होते. आणि अशा राजकारणाशी त्यांचा परिचय करून दिला, ज्यांच्याबद्दल त्यांनी केवळ ऐकलेले होते; त्यांच्या डोक्यातदेखील खूप धार्मिक कचरा भरला होता. ते आधीपासून प्रबुद्ध होते. पण आम्ही झाडू घेऊन त्यांच्या डोक्यातील कचरा साफ केला. आम्ही त्यांना विचार करायला भाग पाडले. यापूर्वी कुणी तसा प्रयत्न केलेला नव्हता.

त्याचा परिणाम हा झाला की, त्यांनी आठवड्यातून एक दिवस सुट्टी घ्यायला सुरवात केली. रात्री जेवणानंतर आम्ही फिरायला जाऊ लागलो. आपल्या भूतकाळाचा विचार करून त्यांना खूप राग येई. पण आता कधी कधी भविष्याबद्दल त्यांना आशा वाटू लागली. आमची जवळीक वाढली. एक प्रकारचे बाल्य त्यांच्यामध्ये दिसू लागले. त्यांना आमचे व्यसन लागले. दररोज संध्याकाळी ते आमची वाट पाहू लागले. जर आम्ही पोहोचलो नाही तर ते स्वतः आमच्या घरी येऊ लागले.

आता झाले असे की, या शहरातील प्रतिष्ठित आणि सभ्य नागरिक म्हणून कुर्बानभाई जरी ओळखले जाऊ लागले असले तरी त्याचा आम्हांला काही फायदा झाला नाही, पण आमच्या बदनामीच्या फेऱ्यात मात्र ते अडकले. ज्या प्रमाणात कुर्बानभाईंचा आम्हांला वेळ मिळत होता, त्या प्रमाणात तो त्यांच्या मित्रांना...लतीफसाहब, हाजीसाहब, इमामसाहब यांना मिळत नव्हता. नमाज पढण्यासाठी ते फक्त शुक्रवारी जात होते, तेही त्यांनी बंद केले. धार्मिक सभांना पूर्वीही त्यांना कुणी बोलावत नव्हते, आताही कुणी बोलावत नाही. मदरशाला ते पूर्वीही वर्गणी देत होते, आताही देतात. कधी कधी होणाऱ्या राजकीय सभांना जाण्यासाठी आणि शहरातील राजकारणात भाग घेण्यासाठी त्यांना कुणी काही म्हणत नसे. उलट त्यांचा सहभाग धोकादायक ठरू शकतो अशीच त्यांच्या समाजाची धारणा होती. त्यांचे मत होते की, राजकारण हा आपला प्रांत नाही.

‘‘दोन वेळेची रोटी मिळतेय ती खा आणि गप्प बसा. शांततेने जगायचे असेल तर अल्लाहचे नाव घ्या आणि या लफड्यात पडू नका... कधीतरी पकडले जाल. आणि आम्हांलाही अडकवाल. आता इथे राहायचे आहे तर...पाण्यात राहून माशांशी वैर करून चालणार नाही.’’ 

पण आम्ही मात्र आपल्याच मस्तीत होतो. आम्हांला आणि कुर्बानभाईंना हे लक्षातच आले नाही की, त्यांना इमामबाडेवालेच नाही, तर शाखावालेही विचारीत नाहीत. संध्याकाळी त्यांच्या दुकानात येणाऱ्या देशप्रेमी लोकांच्या अनुपस्थितीचा गूढार्थही आम्हांला समजला नाही. त्यामुळे शेवटी ती घटना झाली, जिने या कथेला एका अशा अप्रिय टोकाला पोहोचवले- जिने मनात कडवटपणा निर्माण केला.

एका दुपारची गोष्ट आहे. एका बैलगाडीवाल्याने त्यांच्या दुकानासमोर गाडी थांबवली. बैल सोडले आणि गाडीचा पुढचा भाग कुर्बानभाईंच्या दुकानाच्या ओट्यावर टेकवला. गावातून येणारे या चौकातच गाड्या उभ्या करतात. बैल सोडतात आणि त्यांना चारा टाकून आपल्या कामाला निघून जातात. संध्याकाळी परततात आणि बैल गाडीला जुंपून निघून जातात. पण ते गाडी कुणाच्या दुकानासमोर उभी करीत नाहीत. आणि कुणाच्या ओट्यावर गाडीचे जू टेकवण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. या माणसाने तर अशा प्रकारे गाडी खेटून लावली होती की, कुणी गिऱ्हाईक कुर्बानभाईंच्या दुकानापर्यंत पोहोचूच शकत नव्हते. उलट ते स्वतःही शेजारच्या ओट्याचा वापर केल्याशिवाय आपल्या दुकानातून बाहेर पडू शकत नव्हते. गाडीवाला वकील ऊखचंद यांचा माणूस होता. आणि कुर्बानभाईंना हे माहीत होते की, तो आता संध्याकाळशिवाय परतणार नाही. कुर्बानभाईंनी त्याला गाडी जरा बाजूला उभी करायला आणि बैल रस्त्याच्या कडेला बांधायला सांगितले. त्याने ते न ऐकल्यासारखे केले. कुर्बानभाईंनी त्याला पुन्हा सांगितले. तर एकदा त्यांच्याकडे पाहून तो आपल्या कामाला निघून गेला. कुर्बानभाई स्वतः त्याच्या गाडीचे जू उचलून गाडी बाजूला करू लागले...इतक्यात त्या माणसाने त्यांचा गळा पकडला आणि तो त्यांना शिव्या देऊ लागला. त्याने कुर्बानभाईंचा चश्मा खेचून घेतला, तो त्यांना धक्काबुक्की करू लागला. ठीक त्याच वेळी वकील ऊखचंद कोर्टातून परतत होते. त्यांनी विचारले, ‘‘काय झालं र गोम्या?’’ गोम्या म्हणाला, ‘‘हा मला मारतोय.’’ वकील ऊखचंद यांनी विचारले, ‘‘कोण?’’ गोम्या म्हणाला, ‘‘हा मियाँ.’’

कुर्बानभाई सुन्न झाले. त्यांच्या डोळ्यांसमोर तारे चमकले. ते जमिनीवर उकिडवे बसले आणि त्यांनी आपले डोके गच्च पकडले. अंधाराचा एक गोळा त्यांच्या काळजातून उठला आणि घशात येऊन फसला.

...हे कसे झाले?.. गोम्या त्यांना ओळखत नाही का?...एका मिनिटात ते ‘कुर्बानभाईं’चे ‘मियाँ’ कसे झाले?.... एक मिनिट लागला नाही ! अनेक वर्षांपासून प्रयत्न करून त्यांनी जी प्रतिष्ठा मिळवली होती... दररोज एका अग्निपरीक्षेतून जात, जो सन्मान, जे प्रेम मिळवले... प्रत्येक दिवशी स्वतःला समजावले की, पाकिस्तानात जाऊन काही नबाबी मिळणार नव्हती...आपण जसे आहोत तसे सुखात आहोत...अल्लाह सगळे पाहतो आहे...जोश, सुरैया यांचे काहीही होवोे...सगळे लुटले जाऊ दे...बदमाशांच्या ताब्यात हवेल्या जाऊ दे...भावांच्या कबरी दुर्लक्षित राहू दे...भरलेल्या घराचे स्वप्न दफन होऊ दे...पण कधीतरी आपले दिवस येतील...तोपर्यंत वाट पाहू....रोज थोडी थोडी किंमत चुकवून... त्यांनी या शहरात थोडी प्रतिष्ठा, थोडा आपलेपणा...थोडी सामाजिक सुरक्षितता...थोडासा आत्मविश्वास कमावला होता. हीच आपली संपत्ती आहे असे ते समजत होते.... तर घ्या! हे काय झाले? तीळतीळ जमवून उभा केलेला पहाड एका फुंकरीत उडून गेला. एक निरक्षर माणूस....पण निरक्षर तो आहे की मी? मी एका मिनिटात ‘कुर्बानभाई’चा ‘मियाँ’ होऊन जाईन हा विचारच कधी का केला नाही? मी आपल्या कष्टाने उभा आहे. मग हे लोक मला आपल्या छातीवरील ओझे का समजताहेत? ही गोष्ट माझ्या कधीच कशी लक्षात आली नाही? पाकिस्तानात गेलो असतो तर असे ऐकावे तर लागले नसते. धिक्कार आहे! अशा जगण्यात काय अर्थ आहे!

अल्लाह! अल्लाह!!

वकील ऊखचंद गोम्याला समजावत घेऊन गेले. बैलगाडी तिथेच सोडून गेले. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी कुर्बानभाईंना सांभाळले. त्यांची दातखीळ बसली होती. आणि ओठांच्या कोपऱ्यातून फेस निघत होता. लोकांनी गाडी-बैल हटवले. कुर्बानभाईंना ओट्यावर झोपवले. त्यांच्या तोंडावर थंड पाणी मारले. वकील ऊखचंद यांना शिव्या दिल्या. कुर्बानभाईंना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण कुर्बानभाईंच्या आत काय मोडतोड झालीय याची त्या लोकांना काय कल्पना ? आत्ता आत्ता... इतकी वर्षं त्यांनी अशी मोडतोड होऊ दिली नव्हती. आतली जखम दिसते कुठे?

लोक एकत्र झाले. सगळ्या शहरात बातमी पसरली. ज्यांना ज्यांना ही बातमी कळली, ते भेटायला आले. आम्हीदेखील पोहोचलो. आता अनेक लोक जमा झाले होते. पण प्रत्येकाचे विचार वेगळे होते. खूप वेळ विचार केल्यावर ठरले की हा उद्धटपणा सहन केला जाणार नाही. पोलिसांत तक्रार करायला हवी.

मग चला पोलीस स्टेशन मध्ये...पण रस्त्यात कुणाला लघवी लागली....कुणाला संडास. पोलीस स्टेशनला पोहोचता पोहोचता फक्त आम्हीच राहिलो कुर्बानभाईंच्या बरोबर.

ठाणेदार नव्हता. आत्ताच मोटारसायकल घेऊन निघून गेला होता. कारकून होता. कारकुनाने तक्रार लिहून घ्यायला साफ नकार दिला. कारण ठाणेदाराला आधीच वकील ऊखचंद यांचा फोन आला होता. वकील ऊखचंद सत्ताधारी पार्टीचे जिल्हामंत्री होते. कुर्बानभाई कोण होते? आम्ही कोण होतो?

अर्धा तास हुज्जत घालत आणि दीड तास ठाणेदाराची वाट पाहिल्यानंतर आम्ही तोंड घेऊन परत आलो. संध्याकाळी पुन्हा येऊ. संध्याकाळी आमच्याशिवाय दुकानावर कुणी पोहोचले नाही. आणि आमच्या बरोबर पोलीस स्टेशनवर चलण्याचा जराही उत्साह कुर्बानभाईंनी दाखवला नाही. त्यांच्या दुकानात ते व्यस्त झाले. त्यांना आमच्याशी बोलायलाही वेळ मिळाला नाही.

अपराधी भावनेने आम्हीदेखील कुर्बानभाईंपासून अंतर ठेवून वागू लागलो. खरे म्हणजे घटना इतकी मोठी नव्हती. ठाणेदारच काय- पण कुणीही असता तरी तो त्या माणसाचा मूर्खपणा होता असे समजून ती घटना विसरून गेला असता. पण आम्हांला वाटत होते की, तो आमच्या मित्रावर हल्ला झाला आणि आम्ही काही करू शकलो नाही. त्यांच्या उपयोगी पडलो नाही. असेही वाटले की, जास्तीचा उत्साह दाखवला तर कुर्बानभाईंसाठी अडचणीचे ठरेल. आणि आम्ही काहीही करू शकणार नाही. असेही वाटले की, जे काही झाले त्यात पोलिसांच्या हस्तक्षेपाची अशा बाळगणे व्यर्थ आहे. याचा मुकाबला राजकीय स्तरावरच केला जाऊ शकतो. त्यासाठी लवकरात लवकर आपली शक्ती वाढवावी लागेल. पाचाचे पन्नास व्हायला हवेत.

पण हा सगळा बहाणा होता. कुर्बानभाईंना आम्ही एकटे सोडले होते. कदाचित त्यांचा त्रास आम्ही वाटून घेऊ शकत नव्हतो. पण आम्हांला तसा प्रयत्न जरूर करायला हवा होता.

कुर्बानभाईंच्या दुकानावर पूर्वीसारखा अड्डा जमत नव्हता. ते विझल्याविझल्यासारखे राहत होते. खूप कमी बोलत होते आणि आम्हांला पहाताच दुकानदारीत व्यस्त होत होते. ते आतल्या आत कुढत होते... पण खुलत नव्हते. आम्ही त्यांना खुलवू शकलो नाही. एक दिवस मी जेव्हा पोहोचलो तेव्हा त्यांची माझ्याकडे पाठ होती. कुणालातरी सांगत होते.. ‘‘तुम्ही काय डोंबलाचा इतिहास वाचलाय? म्हणतात की पार्टिशन झाले होते! नाही झालेले... आत्ता होते आहे... सुरूच आहे..’’ आणि मला बघून एकदम कामाला लागले.

या कथेचा शेवट चांगला नाहीये. मला वाटते की तुम्ही तो वाचू नये आणि वाचलात तर विचार करा, की या कथेचा अजून एखादा शेवट होऊ शकतो? चांगला शेवट? आणि जर झाला तर तो कसा?

गोष्ट इतकीच शिल्लक राहिली आहे, की मी कित्येक दिवसांनंतर आझाद चौकातून चाललो होतो... ज्याचे नाव आता संजय चौक केले गेले होते... आणि तो शुक्रवार होता, मी पाहिले, की कुर्बानभाईंच्या दुकानासमोर लतीफभाई उभे आहेत...आणि कुर्बानभाई दुकानाला कुलूप लावताहेत...आणि त्यांनी टोपी घातलेली आहे...आणि दोघे मशिदीकडे चालले आहेत.

अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ, मुंबई

(भारत देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षांत पदार्पण करीत असताना ही कथा प्रसिद्ध करणे आवश्यक वाटले.)

1947 ते 2019 असे 72 वर्षांचे आयुष्य लाभलेले स्वयंप्रकाश हिंदीतील महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, निबंध हे चार साहित्यप्रकार हाताळले आहेत. शिवाय ‘वसुधा’ आणि ‘चकमक’ या नियतकालिकांचे ते संपादकही होते.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

स्वयंप्रकाश

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके