आम्ही अभिवाचक म्हणजे फक्त लमाण होतो, खरं तर! सावित्रीबाईंचं म्हणणं त्यांच्याच शब्दात पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आत्तापर्यंत मी ज्या प्रकारच्या प्रेक्षकांसमोर अभिवाचन करत आले आहे, त्यापेक्षा हा प्रेक्षकवर्ग वेगळा होता. साहित्यापेक्षा सावित्रीबाईंच्या ओढीने आलेला होता. त्यामुळे शब्दप्रधान असा हा कार्यक्रम कसा रिसिव्ह होईल अशी शंका होती. पण तिथे जमलेल्या स्त्रियांचं हसून दाद देणं, मध्येच डोळे पुसणं, टाळ्या वाजवून प्रतिसाद देणं, हे सर्व कार्यक्रम छान झाल्याची पावती होती! अभिप्राय देताना तर किती भरभरून बोलल्या त्या सगळ्या!
सावित्रीबाई फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 2 जानेवारी 2024 रोजी आम्ही 'सावित्री वदते' हा अभिवाचनाचा प्रयोग सादर केला. 'कागद, काच-पत्रा कष्टकरी पंचायत' आणि 'स्वच्छ पुणे' या संस्थांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
खरं तर माझा 'सावित्री वदते'चा हा पहिलाच प्रयोग आणि तोसुद्धा नेहमीची अभिवाचक प्रयोग करू शकणार नव्हती म्हणून. पण त्यामुळे का होईना, या प्रयोगाचा भाग होता आलं याचा मला फार आनंद झाला; कारण तो अनुभवच तितका खास होता!
अवघा तीस मिनिटांचा कालावधी असणारा हा प्रयोग. आम्ही चौघे (मी, राम, कृतार्थ, परिक्रमा) अभिवाचक, गौतमीचं दिग्दर्शन, शीतल साठे-अनिकेत (नवयान महाजलसा) यांचं संगीत, प्रणिताने बांधलेली नेमकी-सुबक, विशेष म्हणजे सावित्रीबाईंनी लिहिलेल्या निवडक कविता आणि पत्रे यांवर आधारलेली संहिता आणि समोर बसलेले दोनशे अडीचशे स्वच्छता कर्मचारी आणि इतर! आम्ही सगळ्यांनी मिळून त्या दिवशी सावित्रीबाई समजून घेतल्या आणि असं हे एकत्र जमून सावित्रीबाईंच्या विचारांचे केलेले चिंतन, कायमचं स्मरणात राहील असं झालं!
सावित्रीबाई फुले यांची शाळेच्या पाठ्यपुस्तकातून झालेली ओळख थोडक्यात सांगायची तर ती अशी :
सावित्रीबाई या जोतीरावांच्या पत्नी होत्या, ज्यांना शिकवून जोतीरावांनी स्त्रीशिक्षणाला सुरुवात केली. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या प्रयत्नांना खंबीर साथ दिली. वेळप्रसंगी अंगावर फेकलेला चिखल आणि शेणगोळे झेलले, पण शिक्षण पूर्ण केलं. त्या फक्त स्वतः शिकल्या नाहीत तर इतर मुलींनाही शिकवू लागल्या आणि अशा प्रकारे त्या भारताच्या पहिल्या 'महिला शिक्षिका' झाल्या. अगदी आता आतापर्यंत सावित्रीबाई फुले म्हटलं की साधारण एवढंच मनात यायचं (अर्थात, त्यासाठी माझं सीमित वाचन हे कारणीभूत आहेच.) कधीतरी 'त्यांनी जे केलं ते केलं नसतं, तर आज आपण जसे आहोत तसे नसतो', हे प्रकर्षाने जाणवून त्यांच्याप्रति मनोमन नितांत आदराची भावना निर्माण होत आली. पण तेवढंच.
'सावित्री वदते'मुळे मात्र या ओळखीच्या पलीकडे ज्या सावित्रीबाई समजल्या, त्यानंतर 'क्रांतिज्योती', 'ज्ञानज्योती' ह्या बिरुदांचं महत्त्व कळलं.
ह्या प्रयोगामुळे सगळ्यात आधी जी गोष्ट मला जाणवली ती म्हणजे सावित्रीबाई फक्त साक्षर नाही तर खऱ्या अर्थाने एज्युकेटेड झाल्या. शिक्षणामुळे फक्त अक्षरओळख होणं अपेक्षित नसतं, तर नव्या विचारधारांची ओळख होणंही अपेक्षित असतं. शिक्षणामुळे आपल्या जाणिवांच्या कक्षा रुंदावतात, वेगळ्या विचारपद्धतींची ओळख होते, सारासार विचार करण्याची सवय लागते, सदसद्विवेकबुद्धी वाढीस लागते - किमान असं होणं अपेक्षित असतं.
सावित्रीबाईंच्या कवितांमधून नेमकं हेच झालेलं दिसतं. आता या काही ओळी बघा :
'धोंडे मुले देती । नवसा पावती ।।
लग्न का करिती। नारी नर ।।
सावित्री वदते। करुनी विचार।।
जीवन साकार । करूनी घ्या ॥'
अनिष्ट रूढी-परंपरा, अंधश्रद्धाळू वृत्ती यावरचं किती मार्मिक भाष्य आहे हे!
किंवा
'सांगते पहा दुष्ट शत्रूचे
नाव नीट रे ऐक तयाचे
अज्ञान धरुनी त्याला पिटायाचे
आपल्या मधुनी हुसकायाचे'
अज्ञान हे सर्व समस्यांचे मूळ आहे आणि म्हणूनच तो माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे असं सांगतायत सावित्रीबाई आणि तेही कधी तर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात! त्यांच्या वयाच्या अगदी तरुणपणी! हा काळाचा आणि वयाचा संदर्भ लक्षात घेतला तर सावित्रीबाईंनी दाखवलेलं धाडस आणि परिपक्वता किती कमालीची होती हे कळतं !
एखादा नवीन विचार किंबहुना विचारपद्धती आपल्यात रुजवणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची प्रगती झाल्याचं महत्त्वाचं लक्षण आहे. कारण एखादा नवीन विचार आत्मसात करणं हे एखादा बाह्य बदल करण्याच्या तुलनेने फार कठीण आहे आणि जर तो विचार हा आजूबाजूच्या असंख्य लोकांशी मिळताजुळता नसेल किंवा /आणि आपल्याच आधीच्या मानसिकतेच्या किंवा भूतकाळात तयार झालेल्या समजुतींच्या विरुद्धचा असेल तर तो अंगीकारणं अधिकच अवघड ! यासाठीचं बळ येतं ते त्या नव्या जाणिवेवरच्या विश्वासामुळे ! मुळातल्या संवेदना, सहवेदना याला योग्य तर्कशुद्ध विचारांची जोड मिळाली की हा विश्वास तयार होतो आणि ठाम होऊ लागतो. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेल्या पत्रांतून हे जाणवतं.
एकदा भावासोबत झालेल्या वादाबद्दल त्या जोतिबांना लिहितात, "तू शेळी गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस. नागपंचमीला विषारी नाग पकडून त्यास दूध पाजतोस. पण महार मांग हे तुझ्यासम मानव असतात. तरी त्यांना अस्पृश्य समजतोस, त्याचं कारण सांग?"
भावाला रोजच्या जगण्याचा संदर्भ देऊन, प्रश्न विचारून, वागण्याविषयी विचार करायला भाग पाडलं सावित्रीबाईंनी. या पत्राच्या शेवटी त्या लिहितात, "आपल्याविषयी दुष्टावा माजवणारे विदूषक पुष्कळ आहेत. त्यांना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे? सदा सर्वदा कामात गुंतावे. भविष्यातले यश आपलेच आहे."
त्यांनी जोतिबांना हे सगळं सविस्तर लिहून पाठवणं हे त्यांच्या समान, विचाराधिष्ठित आणि सदृढ सहजीवनाबद्दल खूप काही सांगून जातं. सुरुवातीला सावित्रीबाईंनी त्यांना दिलेली साथ ही त्यांच्यावरच्या विश्वासापोटी, श्रद्धेपोटी, नवरा म्हणून वाटणाऱ्या प्रेमामुळे असावी; पण नंतर मात्र त्यांचं खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहणं, जोतिबा गेल्यावरसुद्धा त्यांचं काम समर्थपणे चालू ठेवणं हे एका आतून पटलेल्या विचारांच्या प्रेरणेने झालं असं मला वाटतं. कारण अंधपणे किंवा बुद्धी न वापरता केलेलं अनुसरण हे असं किती काळ एखादं मोठं कार्य स्वतंत्रपणे निभावून नेण्यासाठी समर्थ ठरेल?
सावित्री-ज्योती म्हणूनच मला एक 'पॉवर कपल' वाटतं. "आम्हांला दोघांनाही मूल होत नाही तर केवळ माझंच का, सावित्रीचेही दुसरे लग्न लावून द्या", असं सहज म्हणून जाणारे जोतिबा हे पुरुषार्थाचे उदाहरण म्हणून का बघत नाही आपण ? आजही असा दृष्टिकोन असणारे तरुण सापडणं विरळाच!
आम्ही अभिवाचक म्हणजे फक्त लमाण होतो, खरं तर ! सावित्रीबाईंचं म्हणणं त्यांच्याच शब्दात पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आत्तापर्यंत मी ज्या प्रकारच्या प्रेक्षकांसमोर अभिवाचन करत आले आहे, त्यापेक्षा हा प्रेक्षकवर्ग वेगळा होता. साहित्यापेक्षा सावित्रीबाईंच्या ओढीने आलेला होता. त्यामुळे शब्दप्रधान असा हा कार्यक्रम कसा रिसिव्ह होईल अशी शंका होती. पण तिथे जमलेल्या स्त्रियांचं हसून दाद देणं, मध्येच डोळे पुसणं, टाळ्या वाजवून प्रतिसाद देणं, हे सर्व कार्यक्रम छान झाल्याची पावती होती!
अभिप्राय देताना तर किती भरभरून बोलल्या त्या सगळ्या! एक ताई म्हणाल्या, "आमच्या डोक्यात उजेड पडला. त्यासाठी धन्यवाद." दुसऱ्या म्हणाल्या, "आज किती नवीन गोष्टी कळल्या ! आता घरी जाऊन या नव्याने कळलेल्या सावित्रीबाई मी माझ्या मुलीला सांगणार आहे." एक बाई तर गोड हसून म्हणाल्या, "माझा नवरा म्हणजे माझ्यासाठी जोतिबाच आहेत." How romantic!
आम्ही तर भारावून गेलो होतो! हे सगळं आमच्या मनामध्ये साठवून, पुढच्या प्रयोगांसाठीचा उत्साह घेऊन आम्ही लगेच फुलेवाड्याला गेलो. मग त्या दिवशी फुलेवाडा वेगळाच भासला. अगदी आतून भेटला. सावित्री जोतिबांसमोर हात जोडणं हा फक्त रिवाजाचा भाग म्हणून नाही झालं त्या दिवशी.
माहिती होतीच, पण या 30 मिनिटांच्या प्रयोगांतर, त्याचा ऐकणाऱ्यांवर झालेला परिणाम बघून, त्यांच्या कार्याची 'महती' कळली. याच सगळ्या समाधानाच्या, overwhelmed झाल्याच्या अवस्थेत गाडी काढली आणि सावित्रीबाईंच्या ओळी गुणगुणत घरी आले!
'वाचे उच्चारी । तैसी क्रिया करी ।।
तीच नरनारी । पूजनीय ।।
मानवाचे नाते । ओळखती जे ते ।।
सावित्री वदते । तेच संत ।।'
दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'श्यामची आई' या मराठी चित्रपटात श्यामच्या आईची (यशोदा) भूमिका करणाऱ्या गौरी देशपांडे या अभिनेत्रीचे 'पाथेय' हे युवा सदर आगामी वर्षभर महिन्यातून दोन वेळा प्रसिद्ध होईल. - संपादक
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या