डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सर ओरडले, ‘काय हरवलंय रे तुमचं?’

हरवलंय तर खरं; पण सरांना सांगणार कसं? शेवटी ‘रुमाल शोधतोय’ म्हणून सांगितलं. सगळेजण खाली उतरले होते. आम्ही दोघंच सीटखाली वाकूनवाकून पाहात होतो. पिल्लू काही दिसत नव्हतं. डोळ्यांत पाणी येऊ लागलं. सरांनी पुन्हा आवाज दिला. जड पावलांनी आम्ही खाली उतरलो. बस निघून गेली. घरी आलो. सहल कशी झाली म्हणून आई विचारत होती. मी काहीही न बोलता झोपी गेलो. म्हणजे डोक्यावरून पांघरूण घेऊन पडून राहिलो. मला रडू येत होतं. झोपही येईना. 

मराठीचे सर शिकवताना मधेच थांबले. ऐन रंगात आलेली कविता अचानक गाडीला ब्रेक लागावा तशी थांबली. वर्गात आमची कुजबूज सुरू झाली. सरांनी नेहमीप्रमाणे टेबलावर जोरात छडी वाजवली. ‘शांत बसाऽऽ, बोलू नका’ अशी नेहमीची ताकीद दिली. वर्ग चिडीचाप झाला. 

शिकवताना मधेच अचानक काहीतरी सांगण्याची सरांना सवयच होती. म्हणजे ऐन रंगात आलेली कविता अचानक थांबवून सर म्हणायचे, ‘उद्या पोळाऽय्‌ बरं का. शाळेला सुट्टीऽय्‌’ आणि पुन्हा कविता सुरू. 

आम्हांलाही या अचानक लागणाऱ्या ब्रेकची सवय झालेली होती. आजही ब्रेक लागला. 

‘वारूळ वारूळ, मुंग्यांचे वारूळ
कृमी कीटकांनी बांधिले देऊळ...’ 

कविता थांबली.  सरांची सूचना सुरू झाली, ‘येत्या शुक्रवारी आपल्या शाळेची सहल शिकारघाटला जाणार आहे. ज्यांना सहलीला यायचे आहे, त्यांनी मध्यंतरात मला भेटावे.’

हे ऐकल्याबरोबर आम्ही पोरांनी ‘हुय्याऽऽ’ केलं. सरांनी टेबलावर छडी वाजवली. वर्ग चिडीचाप झाला. पुन्हा कविता सुरू झाली. 

‘वारूळ वारूळ, मुंग्यांचे वारूळ...’ झालं, त्या क्षणापासून आमच्या डोक्यांत सहल घुसली. सकाळी जाऊन संध्याकाळी सहल वापस येणार होती. तरीही तयारी तर करायलाच हवी ना! 

सोबत डब्यात हे हवंय, ते नको, असे हट्ट आयांजवळ सुरू झाले. शिकारघाटबद्दल आम्हांला उत्सुकता होती; पण खरं आकर्षण होतं घाटाखालून वाहणाऱ्या गोदावरी नदीचं. नदीत धिंगाणा करायच्या कल्पना रंगू लागल्या. 

पाहता पाहता सहल निघण्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. सरांनी टेबलावर छडी वाजवून सांगितलं, ‘इकडं लक्ष द्या रेऽऽ. उद्या चौकातल्या वडाखाली सकाळी आठ वाजता सगळ्यांनी जमायचं आहे. जेवणाचा डबा विसरू नका. पायांत चप्पल-बूट काहीतरी घालून या. उशीर  करू नका.’  आम्ही सगळे ‘हुय्योऽऽ’ करीत घरी पळालो. आणि तयारीला लागलो. 

सकाळी बरोब्बर साडेआठ वाजता आमची बस सुटणार होती. तेवढ्यात गोविंद्याचं पोट गच्च झालं. त्याला असं बरेचदा होत असे. सरांनी त्याला घरी धाडलं. पाच मिनिटांत तो ‘फ्रेश’ होऊन आलाही ! 

मला खिडकीची जागा मिळाली होती. माझ्याशेजारी चेतन होता. सगळी मुलं जोशात होती. कच्चा रस्ता, पुन्हा त्यात खटारा बस. खड्डा आला की जोरात गचका बसायचा. मुलं जोरात ओरडायची. एकदा तर एका मोठ्या खड्‌ड्यात बस आदळली आणि आम्ही सीटवर चक्क उडालो. आदळलो. 

एकदाची बस शिकारघाटच्या पायथ्याशी येऊन थांबली. धडाधड उड्या मारत आम्ही खाली उतरलो. आपले डब्बे सांभाळत, चपला फरकवत सगळे रांगेत चालू लागले. 

शिकारघाट म्हणजे गुरु गोविंदसिंगांचं शिकारीचं ठिकाण. टेकडीवरचा चढणीचा खडा रस्ता चढून गेल्यावर गुरुद्वारात सर्वजण गोळा झाले. सुंदर बांधकाम, स्वच्छ परिसर. पण आम्हांला गडबड होती, पुलाखालच्या नदीत नाचायची!

घाटाखाली नदीवर बांधलेला भक्कम पूल होता. हा पूल बांधायला पंजाबमधून शीख आले होते, असं वडील सांगायचे. रांगेत राहूनच आम्ही पूल पार केला. पुलाच्या टोकाला खाली नदीपात्रात उतरण्याकरिता पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांवरून उड्या मारतच आम्ही खाली आलो. 

खाली पात्रात मऊमऊ वाळू होती. उन्हात या वाळूचा पिवळसर रंग चमकायचा. शिवाय उन्हात ही वाळू प्रचंड तापणारी. नदीचं पात्र खूप मोठं होतं. पाय उचलला की वाळूत खड्डा पडायचा. लांबवर नदीचं वाहतं पाणी दिसत होतं. कधी एकदा पाण्यात जाऊ, असं झालं होतं आणि एकदम सर बोलू लागले, ‘एक मिनिट... सगळे इकडे लक्ष द्या... वाळू तापायच्या आधी झाडाखाली बसून आपण डबे खाऊ या. नंतर तुमचा पाण्यात धिंगाणा चालू द्या. पण पाण्यात काठावर खेळायचं. खोल पाण्यात जाऊ नका. वाहत्या पाण्याला ओढ असते. चला आता, हात धुवून डबे काढा.’

पाहता पाहता गोल पंगत बसली. प्रार्थना म्हणून झाली. वेगवेगळ्या पदार्थांचा वास एकत्र झाला. अन्नाच्या वासानं तीन-चार कुत्रे भोवती येऊन बसले. कुत्र्यांचीही चंगळ झाली. पोळी, पुरी, धपाटे वर फेकले की कुत्रे अलगद झेलू लागले. हा खेळ जेवण संपेपर्यंत सुरूच होता. जेवणं संपली. 

आम्ही पोरं पाण्याकडे पळालो. ‘पाण्यात खोल जाऊ नका रे...’ अशी सरांनी पुन्हा सूचना दिली. आज छडी नव्हती. उलट सरांचा मूड मस्त होता. जणू सर गुणगुणत होते- 

‘या बाळांनो, या रे या 
मजा करा रे, मजा करा 
आज दिवस तुमचा समजा...’  

तोंडावर रुमाल झाकून झाडाखाली सरांची वामकुक्षी सुरू झाली. पाण्यात पाय ठेवल्याबरोबर काहीजण आनंदाने ओरडू लागले. सदू आणि नारायण तर शंखशिंपले गोळा करण्यात मग्न झाले. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणं सुरू झालं. 

मी आणि चेतन सगळ्यांपासून लांब पाण्यात होतो. सगळे कपडे ओले झाल्यामुळे मग रीतसर पाण्यात डुंबायला सुरुवात झाली. पाण्यात पायाला छोट्या मासोळ्या गुदगुल्या करायच्या. मी आणि चेतन मासोळ्यांची गंमत पाहात होतो. आम्ही दोघांनी या मासोळ्या पकडायचा प्रयत्न सुरू केला; पण त्या चपळ मासोळ्या काही हाती लागेनात. 

शेवटी चेतनने मोठा रुमाल काढला. दोघांनी दोन्ही बाजूंनी रुमाल धरून पाण्यात जाळ्यासारखा फिरवायला सुरुवात केली. खूप प्रयत्नांनंतर दोन मासोळ्या रुमालात अडकल्या. चांगल्याच तडफडत होत्या. म्हणून डब्यात पाणी भरून त्यात त्या मासोळ्या ठेवल्या. 

पुन्हा रुमाल हातांत धरून  जरा खोल पाण्यात गेलो. चांगलं आमच्या गळ्याएवढं पाणी होतं. पायाखाली मऊ मुलायम वाळू होती. आमचं रुमाल फिरवणं सुरूच होतं. तेवढ्यात रुमाल एकदम जड लागला. बहुधा मोठा मासा रुमालात अडकला होता. रुमाल घट्ट धरून आम्ही काठावर आलो. पाहतो तो काय, रुमालात चक्क एक कासवाचं पिल्लू आलं होतं. पिल्लू पाहताना विश्वासच बसत नव्हता. घाबरून पिल्लूने पाय-तोंड आत घेतलं होतं. नुसता काळसर, गोलसर दगड वाटत होता. सगळंच अद्‌भुत होतं!

चेतनने मोठा डबा विसळून घेतला. त्यात पाणी भरलं आणि मी पिल्लूला डब्यात ठेवलं. पिल्लूलाही शांत वाटलं. आता त्याने तोंड बाहेर काढून आमच्याकडे पाहिलंसुद्धा. ही बातमी कुणालाच कळू द्यायची नाही असं ठरवलं. 

आम्ही लांब पाण्यात खेळत असल्यामुळे सोबतच्यांना काही माहीत नव्हतं. प्रत्येक जण आपल्याच मस्तीत होता. पिल्लूला घरी न्यायचा बेत मी आणि चेतनने ठरवला. आमच्या अंगणातल्या मोठ्या हौदात पिल्लूला सोडण्याचं ठरलं. हा प्रकार सरांना कळला असता तर फारच पंचाईत झाली असती.

आता बऱ्यापैकी ऊन उतरलं होतं. वाळू थंड होत होती. सरांनी झाडाखालून हाक दिलीच, ‘चला रे पोरांनो, बसची वेळ होतेय.’ आम्ही लगबगीने डब्याचं झाकण लावलं. चेतनने अलगद डबा हातातच धरला. काही जणांना पाण्यातून निघवेना. आम्हांला मात्र कधी एकदा घरी जातो असं झालं. 

पुलावरून चालत बसस्टॉपवर आलो. थोड्या वेळात तीच खटारा बस आली. मी आणि चेतन मुद्दाम मागच्या सीटवर बसलो. हातातला डबा बघून विचारणाऱ्यांना ‘आजीसाठी गोदावरीचं पाणी नेतोय’, असं ठोकून दिलं. सरांनी मुलं मोजली. कंडक्टरने दोरी ओढून टिण्‌ टिण्‌ घंटी वाजवली. बस सुरू झाली. मधेच गचका लागायचा. पिल्लूला हवा मिळावी म्हणून मध्येच डबा थोडासा उघडा करायचो. 

आता बाहेर अंधारून आलं होतं. आमचं लक्ष मात्र कासवाच्या पिल्लूत होतं. खूप इच्छा असूनही पिल्लूबद्दल काही बोलता येत नव्हतं. धाडकन्‌ आवाज झाला. बस मोठ्या खड्‌ड्यामुळे आदळली. आम्ही सगळेजण सीटवर आदळलो. 

चेतनच्या हातातला डबा खाली पडला. डब्यातलं पाणी सांडलं. पिल्लू सीटखाली पडलं. अपुऱ्या प्रकाशातही पिल्लू मला दिसलं. झाप मारून मी उचललं. पुढच्या सीटवरचा रवी मागे पाहात होता म्हणून पिल्लूला मी पटकन चड्डीच्या खिशात टाकलं. खिशाच्या तोंडावर हात धरून बसून राहिलो. थोडा वेळ खिशात वळवळ झाली, पण नंतर पिल्लूही शांत झालं. मला मात्र बागेतला मोठा पेरू खिशात ठेवल्यासारखं वाटू लागलं. खिडकीतून वारा येत होता. दिवसभर पाण्यात खेळल्यामुळे आता थकवा जाणवत होता. माझे डोळे पेंगू लागले; तरी माझा खिशावरचा हात पक्का होता.

नंतर ‘चला, उठा रेऽऽ’ अशा सरांच्या आवाजानेच जाग आली. बस गावात येऊन थांबली होती. पण वाईट गोष्ट म्हणजे झोपेत माझा खिशावरचा हात सैल झाला आणि नेमकं पिल्लू गायब झालं होतं. चेतनलाही झोप लागली होती. आम्ही घाबरलो. 

आजूबाजूला, सीटखाली पिल्लूचा शोध सुरू केला. पिल्लू काही सापडेना आणि हरवलंय म्हणून कुणाला सांगताही येईना. मुलं खाली उतरत होती. सरांचं लक्ष आमच्याकडे गेलं. 

सर ओरडले, ‘काय हरवलंय रे तुमचं?’

हरवलंय तर खरं; पण सरांना सांगणार कसं? शेवटी ‘रुमाल शोधतोय’ म्हणून सांगितलं. सगळेजण खाली उतरले होते. आम्ही दोघंच सीटखाली वाकूनवाकून पाहात होतो.  पिल्लू काही दिसत नव्हतं. डोळ्यांत पाणी येऊ लागलं. सरांनी पुन्हा आवाज दिला. जड पावलांनी आम्ही खाली उतरलो. बस निघून गेली. घरी आलो. सहल कशी झाली म्हणून आई विचारत होती. मी काहीही न बोलता झोपी गेलो. म्हणजे डोक्यावरून पांघरूण घेऊन पडून राहिलो. मला रडू येत होतं. झोपही येईना. 

दुसऱ्या दिवशी शाळेत सगळे खुशीत होते. आम्ही दोघे मात्र अबोल होतो. कशातच लक्ष लागत नव्हतं. मला तर चड्डीच्या खिशात पिल्लू आहे असंच वाटायचं. चेतनचा चेहराही लाल झाला होता. मी दुपारीही जेवलो नाही. 

संध्याकाळी अंगणातल्या हौदावर एकटाच बसलो होतो. हौदातल्या पाण्यात एकटक पाहात होतो. तेवढ्यात आजी आली, ‘काय झालं रे? तिन्हीसांजेला एकटाच बसलास! आणि हो, आज जेवलाही नाहीस म्हणे. बरं वाटत नाही का?’ 

आता मला रडूच आलं. आजीने माझे डोळे पुसले. मला जवळ घेतलं. मग मीही आजीला सगळं खरं खरं सांगून टाकलं. माझं सगळं ऐकून आजी हसली, ‘अरे वेडोबा, ते कासव गेलं असेल त्याच्या त्याच्या घरी; आणि आपल्या हौदात त्याचं काही बरं-वाईट झालं असतं म्हणजे?’ 

‘नाही आजी, मला कासवाचं पिल्लू पाहिजेच.’ मी हट्ट सोडला नाही. 

‘अरे, कासव कधी हरवत नसतं.’ माझी आशा वाढली. 

‘मग कुठाय ते कासव?’ ‘कुठाय म्हणजे. विठ्ठल मंदिरात मोठी घंटा आहे ना. त्या घंटेच्या खाली रुसून बसलंय ते.’ 

मला आनंद झाला. एकदाची रात्र संपली. भल्या पहाटेच मी मंदिरात जाऊन पाहिलं, तर घंटेखाली एक कासव बसलेलं होतं. पण दगडाचं. हळद-कुंकू वाहिलेलं. आजीने आपली समजूत काढलीय हे माझ्या लक्षात आलं होतं. 

... आजही असं दगडाचं कासव मी पाहतो, तेव्हा मला बसमध्ये हरवलेल्या पिल्लूची आठवण येतेच येते. 

Tags: सहल गोदावरी कासव घंटा मंदिर tour Godavari tortoise bell temple weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दासू वैद्य,  औरंगाबाद
dasoovaidya@gmail.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक असलेले दासू वैद्य हे मराठीतील आघाडीचे कवी असून, त्यांनी ललित लेख, बालसाहित्य व गीतलेखन केले आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके