माणसाचे जीवन म्हणजे बाल्यावस्थेपासून सुरू होणारी एक विकास- सातत्याची अवस्था आहे. त्यामुळेच किंबहुना बाल्यावस्था ही आपण सर्वसाधारणपणे समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाची बाब आहे; आणि म्हणून अगदी बाल्यावस्थेपासून बालकाला सर्जनशील आणि उत्पादक अशा कार्याचे अनुभव दिले पाहिजेत. असा फ्रोबेलचा सल्ला आहे.
रूसोने निसर्ग आणि बालकांचे शिक्षण यांचा संबंध लक्षात आणून दिला, पेस्टालॉझीने हा संबंध प्रत्यक्षपणे शैक्षणिक व्यवहारात उतरवण्याचा घाट घातला. पेस्टालॉझीच्या शाळेत अनुभव घेऊन, फ्रोबेलने दोन्ही म्हणजे तात्त्विक आणि व्यावहारिक पातळीवर बालकाच्या नैसर्गिकतेशी बालकाच्या शिक्षणाचा संबंध बांधला. अशा तऱ्हेने, एकीकडे आपल्या पूर्वसूरींचा वारसा फ्रोबेलने चालवला तर दुसरीकडे, बालक आपल्या इंद्रियांच्या वापरातून, नैसर्गिकरीत्या आपल्या संकल्पना विकसित करीत असते. मूर्ताकडूनच अमूर्ताकडे प्रवास करीत असते. अशा प्रकारचा विचार मांडून, त्याच्यानंतर दीडशे वर्षानंतरच्या पियाजेच्या सिद्धांताशीही जवळीक साधली. फ्रोबेलचा महत्त्वाचा ग्रंथ 'एज्युकेशन ऑफ मॅन' हा 1926 साली प्रसिद्ध झालेला आणि त्याच्या शैक्षणिक प्रयोगांतून साकारलेला असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे मूळ सूत्र असे आहे की माणूस म्हणजे निसर्गाचे, मानवतेचे आणि देवाचे मूल आहे. या सर्व गोष्टी निसर्गनियमांनी परस्परांशी बांधलेल्या आहेत आणि या नियमाच्या मागचे प्रमुख सूत्र आहे ते म्हणजे हे अद्वैत साधणारा परमेश्वर. हे अद्वैत ओळखून, शिक्षणाने एक विचार करणारा, बुद्धिमान असा आणि स्वतःच्या जाणिवा शुद्ध करून, आपल्या अंतर्गत असणारे हे 'स्व'त्व केवळ वैचारिक स्तरावर नव्हे तर हृदयापासून ओळखणारा असा माणूस घडवायचा आहे.
माणसांत एकाचवेळी असणाऱ्या, समानता, विभिन्नता आणि व्यक्तिविशेषता या तीन अनुक्रमे ईश्वरी, नैसर्गिक आणि मानवी वैशिष्ट्यांच्या दृष्टिकोनांतून माणसाकडे पाहिले गेले पाहिजे आणि याच तीन गोष्टी उत्स्फूर्तपणे आपल्या कृतींतून व्यक्त करीत राहणे याला 'स्वयंकृतीचे तत्त्व' असे फ्रोबेल म्हणतो आणि अशाप्रकारे बालकामधील 'निसर्ग’ शिक्षकाने जोपासला पाहिजे व त्यालाच 'शिक्षण' म्हणता येईल अशी फ्रोबेलची शिक्षणविषयक तात्त्विक भूमिका होती. माणसाचे जीवन म्हणजे बाल्यावस्थेपासून सुरू होणारी एक विकास सातत्याची अवस्था आहे. त्यामुळेच किंबहुना बाल्यावस्था ही आपण सर्वसाधारणपणे समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाची बाब आहे; आणि म्हणून अगदी बाल्यावस्थेपासून बालकाला सर्जनशील आणि उत्पादक अशा कार्यांचे अनुभव दिले पाहिजेत. असा फ्रोबेलचा सल्ला आहे. बालकाचे सारे आयुष्य हे जसे एकीकडे, अंतर्गत अशा निसर्गतत्त्वाने बेतलेले असते, तसेच ते आजूबाजूच्या समाजसंबंधांनी वेढलेले असे असते. त्यामुळे बालकाचा केवळ सामाजिक वातावरणातच विकास होत असतो: बालकाचे मन समान अशा सामाजिक व्यवहारांतूनच घडत जाते; त्यामुळे मूल हे जेवढे त्या कुटुंबाचे तेवढेच ते समाजाचेही आहे असे मानून, त्याचा काही वेळ हा 'बरोबरीच्या मुलांच्यात आणि एकत्रित अशा कामांमध्ये’ गेला पाहिजे. अशी फ्रोबेलची भूमिका होती.
मुलांच्या ज्ञानेंद्रियांइतकीच त्यांची इच्छाशक्तीही प्रबळ असते आणि ही इच्छाशक्तीच त्यांना कृतिशील बनवत असते. त्यामुळे बालकांचे शिक्षण हे स्वतः कृती करून होणारे असते यावर फ्रोबेल भर देतो. सुरुवातीस जे सहजपणे साध्य असते, त्यापासून त्याचे स्वयंशिक्षण चालू होते. त्यासाठी अर्थातच जे सहजपणे उपलब्ध असते आणि जे आकर्षकही असते, त्याच्या सहाय्याने बालकांच्या शिक्षणाची सुरुवात करावी, कारण त्यातूनच पुढे मुले आपल्या सर्व क्षमता विकसित करीत जातात आणि मुले स्वतःचा स्वतःच विकास साधतात, स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित करतात. असे 'स्वतःला जिंकणे' म्हणजेच खरे स्वातंत्र्य असे तत्त्वविचारही फ्रोबेल मांडतो. फ्रोबेलच्या शिक्षणविषयक तत्त्वज्ञानात स्वयंकृतीला खूप महत्त्व आहे. बालकामध्ये निसर्गतःच एक सर्जनशील अशी ऊर्जा आहे आणि तिचाच वापर बालकाच्या शिक्षणविषयक व्यवहारात करून घेतला पाहिजे. 'ही उर्जाच बालकाची बुद्धिमत्ता असते आणि तीच तिचे स्वतःचे विश्व निर्माण करीत असते', असे फ्रोबेल म्हणतो. बालकाच्या मनात उत्स्फूर्तपणे उद्भवणारी अशी ही सर्जनशील ऊर्जा असते आणि तिच्याकरवीच बालक स्वतःची आणि जगाचीही ओळख करून घेत असते. त्यामुळेच फ्रोबेल बालकाच्या या सर्जनशील ऊर्जेलाच शिक्षणाचे साधन बनवू पाहतो.
बालकामधील सर्जनशील उर्जेचे प्रत्यक्षातले रूप म्हणजे बालकाचे मुक्तपणे स्वच्छंदपणे खेळणे होय. त्यामुळे फ्रोबेलच्या बालशिक्षणाच्या पद्धतीमध्ये खेळाला अनिवार्य असे महत्त्व देण्यात आलेले आहे. फ्रोबेलच्या मते 'खेळ' ही बालकाची सर्वोच्च अशी अभिव्यक्ती आहे. फ्रोबेलने स्वतःच असे म्हटले आहे की, “खेळाला आपण दुय्यम लेखता कामा नये. उलट ती एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कळीतून फूल उमलत जावे तसे खेळाच्या साहाय्याने मूल आनंदाने विकसित होत असते. कारण आनंद हाच त्या वयातील सर्व कृतींचा प्राण असतो.” अशाप्रकारे बालकाच्या खेळाकरवी घडून येणाऱ्या सहजकृती आणि त्याचे विकसित पावणारे मन यांच्यातील नातेसंबंध सांगण्याचे आणि त्याचे बालशिक्षणात असलेले महत्त्व जाणवून देण्याचे श्रेय आपण फ्रोबेलला द्यायला हवे. फ्रोबेलने पुढे आपल्या शिक्षणपद्धतीला 'किंडरगार्टन' म्हणजे 'बालोद्यान' पद्धती असे नाव का दिले आहे तेही लक्षात येईल. फ्रोबेलचे सामान्यतः दुर्लक्षिले जाणारे बालशिक्षणातील एक मोठे योगदान आहे ते म्हणजे त्याने सांगितलेले, बालशिक्षणातील भाषेचे सामर्थ्य होय. त्याच्या मते, भाषा शिकण्याची क्षमता, बालकामध्ये उपजतच असते. त्यासाठी भाषेतील शब्द आणि व्यवहारांतून वस्तू यांची त्याच्यासाठी सांगड घालण्याचे कार्य सहवासातील इतर प्रौढांनी किंवा शिक्षकांनी करायचे असते.
फ्रोबेल असे म्हणतो की, वस्तू आणि शब्द यांत सुरुवातीला बालकाच्या दृष्टीने काहीच भेद नसतो. ते एकजीवच असतात. फ्रोबेल असेही पुढे सांगतो की वाचणे आणि लिहिणे ही कौशल्ये कितीही महत्त्वाची असली, तरी त्यांच्याकरवी बालकाला जगाची ओळख करून घेणे शक्य नसते. त्यामुळे मुलाला मुक्तपणे आणि प्रभावीपणे बोलण्याची कला अवगत झालेली नसते, तोवर त्याला वाचायला शिकवणे निरर्थक असते. 'मुलाला वाचायला शिकवण्यापूर्वी त्याला चांगले बोलता आले पाहिजे' असे फ्रोबेलने म्हटले आहे. लेखनाविषयी फ्रोबेलने असे मत मांडले आहे की, लेखनकला हे चित्रकलेचेच एक खास असे उपयोजित रूप मानले पाहिजे आणि हे रूप वाचनाच्या आधी अंगवळणी पडले पाहिजे. पुढे मग ते सहजपणे हातांत हात घालून जाऊ शकते. त्यामुळे रूसोप्रमाणेच फ्रोबेलचेही मत असेच आहे की वाचनाकडे मुलांना जरा उशीराच वळवावे. फ्रोबेल असे मानतो की बालकाचे तीन ते सहा हे वय अतिशय महत्त्वाचे आहे. मूल अजून औपचारिक शिक्षणाला, म्हणजे शाळेसाठी तयार झालेले नसते. नुकतेच ते मर्यादित अशा कौटुंबिक जगातून बाहेर पडून, बाहेरच्या अधिक विशाल अशा जगाकडे डोळे उघडून पाहू लागलेले असते. आपल्या खेळांमधून आणि कृतीतून जसे जाणवते तशी जगाची प्रतिमा ते आपल्या मनःपटलावर उमटवीत असते.
अशावेळी, त्याला बाह्य जगात नव्याने नातेसंबंध बांधले जाण्याची गरज असते. बरोबरीच्या मुलांच्या संपर्कात येण्याची आवश्यकता असते. औपचारिक शिक्षणाचे नव्हे तर त्या शिक्षणाकडे वाटचाल करण्याचे हे वय असते आणि म्हणून अशा या महत्त्वाच्या वयात, शिक्षणाकडे होणारी वाटचाल आनंददायी कशी होईल, विकासाभिमुख कशी होईल, यासाठी योग्य पद्धती बांधण्याचे काम फ्रोबेलने केले आहे. फ्रोबेल हा स्वतः जसा आयुष्यात वेळोवेळी शिक्षक होता, प्रयोगशील शिक्षक होता. तसाच तो तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यासक आणि चिंतनशील स्वभावाचा तत्त्वज्ञ होता. एकूणच जीवनाविषयीचे जे तत्त्वज्ञान त्याने आपलेसे केले तेच शिक्षणात आणण्याचा प्रयत्न त्याने केला. फ्रोबेलने 'एज्युकेशन ऑफ मॅन’ मध्ये म्हटले आहे की, “जीवनाचे सर्वांगीण आकलन होणे हे एक शास्त्र आहे असे म्हणता येईल आणि जाणीवपूर्वक विचारपूर्वक आणि बुद्धीचा वापर करून त्याची अभिव्यक्ती करणे किंवा ते व्यवहारात उतरवणे याकरिता शिक्षणाचे शास्त्र निर्माण होते.”
Tags: Kindar Gartan Fredrich Froebel Johann Heinrich Pestalozzi Russo Ramesh Panase 'एज्युकेशन ऑफ मॅन' किंडरगार्टन फ्रेडरिक फ्रोबेल योहान हेन्रीच पेस्टालॉझी रूसो रमेश पानसे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या