डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्राध्यापक, समीक्षक व भाषाशास्त्राचे अभ्यासक अशी ओळख असलेले डॉ. गं. ना. जोगळेकर (1935 ते 2007) यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष या नात्याने उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी वयाच्या 24 व्या वर्षी लिहिलेल्या या कवितेने 1960 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथम क्रमांक मिळवला होता.

महाराष्ट्र देशात जन्मुनी कृतार्थ झाले जिणे 

भक्तीच्या मंदिरास येथे शौर्याची तोरणे ।

सह्यकड्याची निधडी छाती आवेशाने स्फुरे

गिरीकुहरी स्वच्छंद नाचती प्रेमरसाचे झरे ।

कृष्णा, पूर्णा, तापी, भीमा वरदा गोदावरी

तीर्थ तयांचे प्राशुन झाली अमृतमय वैखरी ।

राकट आहे इथली माती, कणखर इथली मने

स्वातंत्र्याची नसानसांतुन, श्वासांतुन स्पंदने ।

अन्यायाची चीड येथल्या हाडांमधुनी रुजे

अंत्यजबाळा बघता डोळा इथे पापणी भिजे ।

पंचवटी, करवीर, पंढरी, तुळजापुर, पैठण

इहलोकी कैवल्य भोगते इथे मराठी मन ।

संन्याशाचे पोर दाविते मोक्षाचे साधन

भक्तिभाव वाण्याचा करितो दंभाचे भंजन ।

महाराष्ट्रधर्मास जागवी समर्थ नारायण 

खड्‌गाच्या पात्यास लाभले चारित्र्याचे धन ।

शककर्त्याच्या पराक्रमाचे निनादती चौघडे

ध्येयाचा इतिहास येथल्या मातीमधुनी घडे ।

तानाजी, बाजी, जनकोजी, बापू वीराग्रणी

युगे युगे ते जगती, जगती, देह ठेवुनी रणी ।

पानिपतावर फुटे बांगडी अहेवपण लेउनी

कीर्तिलेख रुधिराने लिहिते देहाची लेखणी ।

पराक्रमाचे पवाड गाया थाप डफावर पडे

कविरायाची कविता श्रवता रसरंगी मन बुडे ।

सत्तावनचे समर पेटले अग्निकुंड धडधडे

खवळुनि उसळे रक्त येथले, गर्जे मन रांगडे ।

वासुदेव बळवन्त ओढतो जुलुमावर कोरडे

धगधगत्या ज्वालेत नाचती धगधगणारी धडे ।

नव्या युगाच्या झडल्या भेरी अंतराळ कोंदले

वीर तळपले-आगरकर, रानडे, गोखले, फुले ।

सिंहगर्जना करी भयंकर महाराष्ट्र-केसरी

थरारली त्रिभुवने, सागरा धडकी भरली उरी ।

स्वप्न मनोरम, खुले फुलासम, मानसलतिका डुले

नव्या युगाचा वामन उमजे काळाची पावले ।

भुकेजला ग्यानबा आजला उरी सले वेदना

घास सुखाचा उद्यास देइल दयावती कोयना ।

वऱ्हाडापरी वैभव लाभो कष्टाळू कोकणा

अभिमानी कृष्णेस कळावी पूर्णेची भावना ।

कैलासाचे काव्य जाणु दे मोहक मुंबापुरी

प्रीतीच्या नर्तनी विरावी गतदुःखे बोचरी ।

वाग्देवीच्या परी रमावी चंचल कमला सुखे

प्रीतिसंगमी विहारावी नव आशेची बालके ।

अन्यायाचा नसो किनारा शौर्याच्या सागरा

द्वेषकेतुचे ग्रहण नसावे विजयाच्या भास्करा ।

समतेचा ध्वज नित लहरूदे महाराष्ट्र मंदिरी

वैराग्याची नित्य डुलावी मुग्ध तुळसमंजिरी ।

दाहीदिशा दिपवीत शोभुदे महाराष्ट्र भारती

पराक्रमाची ज्याच्या गातिल नवी युगे आरती ।

महाराष्ट्रदेशात जन्मुनी कृतार्थ झाले जिणे 

महाराष्ट्र-मातेस आमुची कोटि कोटि वंदने ।

(पूर्वप्रसिद्धी साधना - 1 मे 1960)


 

Tags: गंगाधर जोगळेकर कविता gangadhar jogalekar poem kavita weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके