डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारताच्या फाळणीनंतर जे मुस्लिम बांधव भारतातच राहिले, त्यांच्यात असुरक्षिततेची भावना कशी घर करून आहे, याचे आपल्या कवितेतून यथार्थ चिंतन. बाबरी मशीद पाडून टाकण्यात आल्यावर ‘आवाजे जरब’ हा त्यांचा हिंदीतला कवितासंग्रह. नंतर ‘चांदनी का दर्द’ हा उर्दूमधील कवितासंग्रह. सुंदर, सहज, सोपी कविता आविष्कारण्याची मन्सूर एजाज जोश यांची वास्तवी शैली, त्यामुळे त्यांची कविता मेंदूतून थेट हृदयावर वार करते. ‘आवाजे जरब’चा गुजरात हत्याकांडानंतर अरुण साधूंच्या प्रस्तावनेसह ‘जेरबंद’ हा कवितासंग्रह मराठी भाषेत मी केलेला अनुवाद- भावनेची भाषा शब्दाशब्दांत तंतोतंत पकडत असल्याने ते मला आवडतात. 

ता.क. : महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणारा उर्दू साहित्य अकादमीचा उर्दू भाषेच्या सेवेबद्दलचा जीवनगौरव राज्य पुरस्कार नुकताच त्यांना देण्यात आला आहे
 

प्रार्थना 

मी माणूस 
भारतीय मुसलमान 
अन्य कुठल्याही मृत्यूस नकार देतो
हिंदुस्थानी गोळीनेच मरण्याचा
जन्मसिद्ध अधिकार माझा.  

मूळ निवासी 

घनदाट वृक्षावर
बऱ्याच प्रतीक्षेनंतर जेव्हा फळं आलीत 
तेव्हा पक्षी गाणी म्हणत नाचू लागले.
 0
एक दिवस 
त्या वृक्षाचा वानरांनी कब्जा घेतला. 
आणि दहशत पसरली सगळीकडे 
आक्रोश अन्‌ हुंदक्यांत गाणी विरून गेलीत.
0
आता आहे घनदाट वृक्ष 
आणि वानरांची दादागिरी. 

योद्धा 

तो मर्द नाहीच
जो आपल्या ओठांवर मिशी ठेवतो.
मर्द तो आहे,
जो जल्लादासमोरही सत्य असेल तेच बोलतो. 

सत्य 

सारं शहर नाराज आहे माझ्यावर
पण, घृणा कुणीच करीत नाही माझी.
कदाचित,
मी कुठलाही विचार न करता 
सत्य काय ते बिनधास्त बोलून देतो. 

उलटी गंगा 

म्हाताऱ्यांनी सांगितलं होतं. 
बालपणात ऐकलं होतं. 
आता समजलं,
ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत 
हिंदमहासागर ते हिमालयापर्यंत
गंगा उलटी कशी वाहते! 

जिंदाबाद 

तुम्ही आपल्या लाडक्या पुढाऱ्यांची 
मरून कुजलेली भ्रष्ट शरीरं मसाला भरून 
पूजत राहा... ओवाळत राहा...!
0
अशफाकउल्ला आणि भगतसिंह जिवंत आहेत
आणि 
जिवंतच राहणार...!!! 

देश 

संस्कृती अन्‌ सभ्यतेचं
सुन्दर मिश्रण.
प्रेम, दयेची मनस्वी सांगड
शुद्ध हवेचा ताजेपणा, 
उंच पर्वतांची अस्मिता माझ्यात. 
0
एकाएकी काय झालं कुणास ठाऊक?
अजान आणि भजनाचे बोल ॲटमबॉम्ब 
झालेत.
मीही ताणून तलवारीसारखा ताठ झालो. 

माणूस 
पशू कसा होऊन गेला? 

लोकशाही – 

आणि मग असं झालं! 
माठातील घोटभर पाण्याला 
बारीक-बारीक दगडांनी
शोषून घेतलं,
कावळा जंगल-जंगल भटकून 
जीवतोड मेहनत करून
शेवटी, तसाच तृष्णेने तडफडत राहिला. 

गुजरात 

निरागस बालकाने
वडिलांना विचारले-
आईला डोळ्यांसमोर जाळण्यात आलं 
लहान मुलांना धगधगत्या आगीत
निर्दयपणे फेकून दिलं.
तरुणींना गिधाडांनी लुचलं
याला जर लोकशाही म्हणतात
तर मग;
हिटलरशाही, सरंजामशाही, पेशवाई कशाला
म्हणतात? 
असाह्य बाप जिवाच्या आकांताने 
गुजरात... गुजरात... गुजरात ओरडत 
बेहोश होऊन कोसळला. 

शपथ 

ज्या आईने मला जन्म दिला
तिची शपथ
वचन आहे माझं, 
-जर कुणी मला निरपराध असताना मारेल,
तर मी निश्चितच एकटा मरणार नाही. 

ओळख 

कोण आहेस तू? 
-मी पीएच.डी आहे.
प्राध्यापक आहे बी.एड कॉलेजात
चूप!
मूर्खा, नाव सांग?
ओळख दाखव? 
मी भारतीय आहे. भारतवासी.
चूप बे साल्या...
हिंदू की मुसलमान ते सांग? 
मन 
तुम्ही माझ्या डोक्यावर मनसोक्त नाचा
पाठीवर कुदा 
पोटावर मारा
पण लोक हो! 
माझं नाजूक मन दुखवू नका! 
मन दुखेल तर!
मी राक्षस होऊन जाईन...!! 

मी 

मी माझ्या बायको-मुलांसोबत 
जेव्हा युद्धभूीत उतरेन
त्या वेळी जगातील सर्व
अन्याय, अत्याचारांचा सर्वनाश होईल.

भारत

दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करून
थकून-भागून घरी आलो 
तर, माझ्या मुलाच्या फाटक्या कपड्यातून 
माझा भारत डोकावून बघत होता. 

निर्णय

 -आणि शेवटी 
नव्या पिढीने निर्णय घेतलाच.
जीव गेला तरी चालेल,
मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायचीच. 
0
ऊष्ण रक्ताच्या या निर्णयाने 
सगळे म्हातारे धराशायी झालेत! 

मुका 

ज्या गावात मी राहतो
तेथील लोक आंधळे नाहीत
पण,
मुके आहेत सर्व.
0
हळूहळू शेवटी मीही मुका होऊन जातो. 

माणुसकी 

दंगल शमली
0
रक्तरंजित रात्रीनंतर 
शेजारची लहान-सहान मुलं
माझ्या अंगणात खेळायला आली.

युग

नवी पिढी विद्रोही निपजल्याने 
सर्व म्हातारे नाराज आहेत.
0
आमचं युगच असं 
चंगेजखानी विचारांनी घेरलेलं. 

मराठी अनुवाद : लोकनाथ यशवंत

Tags: माणुसकी दंगल चंगेजखान विद्रोही नवी पिढी humanity riots Genghis Khan rebels new generation weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके