डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

गावातली छोटी पोरं अधूनमधून विचारीतः 
"भाषणवाले काका ते कुठे गेले?" 
पोरांना उत्तर तरी कोण आणि कसं देणार?
प्रत्येकाच्या थोबाडावर पॅण्टीच्या खिशात 
भीतीदायक हात गच्च ठेवलेले! 

कावळा

कुंभ

घरात,
मनात,
जात
पेशीत
रंग
पोथीत
अंत
डोळ्यांत 
नित्य
समीप.
साक्ष
तुपाची
आण
धुपाची.
धूर
उदाचा
सुंभ
जळेना
धीट
कावळा
पिंड
शिवेना!

महावीर जोंधळे

त्यांचे हात

त्यांचे हात खूप दूरवर पोचतात,
पण हे कसं काय? 
कारण हात तर पॅण्टीच्या खिशात घालून
 ते उभे असतात.

त्यांचे हात खिशात असतात 
म्हणूनच ते असे दूरवर पोचतात
इतके दूर, इतके दूर की,
कुठल्याही देशातलं चलन ते चालवतात.

दारूच्या हातभट्ट्या गावात नको,
असं तो म्हणू लागला भाषणं देत.
तेव्हा त्याला त्याचं भाषण संपल्यावर
खिशातल्या कोण्या एका हाताने संपवला. 
गावातून त्याचं नाव कायमचं खोडल 
पोलिसांना बोलावणं तर शक्यच नव्हतं 
पोलिसांनी नंबर आपल्या टेलिफोनचे 
नाण्याएवढ्या स्वरांनी आधीच खोडले होते.

गावातली छोटी पोरं अधूनमधून विचारीतः 
"भाषणवाले काका ते कुठे गेले?" 
पोरांना उत्तर तरी कोण आणि कसं देणार?
प्रत्येकाच्या थोबाडावर पॅण्टीच्या खिशात 
भीतीदायक हात गच्च ठेवलेले!

थोबाड जरी बंद केलं गच्च असं तरी,
केविलवाणे डोळे मात्र उघडे सताड
त्यांच्यासमोर पॅण्टीचे भलेमोठे खिसे
आणि त्या खिशांत हात दूरवर पोचणारे

- मंगेश पाडगावकर

चौकट

चौकट असतेच देहाची
त्यात मन
चौकटीबाहेर झेपावत
फोफावणारी गारवेल

काहींना सुरक्षित वाटतं 
चौकटीच्या आत
मग ते स्वतःला छाटत राहतात
वेलीला वाढू देत नाहीत
बुटके बुटके होत
चौकटीच्या परिघात
विसर्जित होऊन जातात

तसे तर पिंजरेच पिंजरे असतात चहूकडे 
काहींचं लक्ष असतं अहोरात्र
की दार कधी किलबिलतं
नि आपण फडफडतो निळाईत
आपसूक
आणि काहीजण
पिंजऱ्याचं दाट सताड उघडं झालं तरी 
स्वरांच्या रेषा काढत राहतात
पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात
स्वतःभोवती आणखी एक पिंजरा...

पिंजरा असतो
छोटा-मोठा
प्रत्येकाभोवती
पण त्या पिंजऱ्याची दांडी
क्षितिजरेखेएवढी असायला 
काय हरकत आहे?

-  नरेंद्र बोडके

इथली झाडे

इथली झाडे दाट उंच
घट्ट पाय रोवून खुणावणारी उभ्या उभ्याने.... 
कित्येक ऋतू अंगावर झेलून
महायोग्याचा चेहरा भरलेला असावा दिव्य तेजाने
तशी प्रौढ भासणारी गहिरी पाने. 
दाट हिरव्या प्राणातून
इथल्या भिंतींना....
लाख फुलांचे ताजेपण
अंगात बाळगून
फुलपाखरी स्वप्न लाभलेले
जसे इथल्या
सर्व जीवांना
धनरात्रीच्या शेवट प्रहरी
शांत क्षणांच्या
गूढ पायऱ्या
मागे टाकत
शिखर गाठते
ओली जाणीव,
आणि कल्पनेच्या पंखावरती
दिशांत भटकून
थबकून बसते
अदृश्य रूपाच्या
भीती कोरीव!

- रेणू पाचपोर

या उत्क्रांतीच्या प्रवाहात

त्या वाहत्या नदीला त्याचा मूळ थेंब मिळाला
किंवा माणसाला त्याचे गोत्र
तर थांबेल का हा प्रवाह...
अथपासून इतिपर्यंत
या भूतकाळाच्या मागोमाग किती धावणार
उर फुटेपर्यंत?
जिथे सगळी युगंच कोसळत आहेत.
तिथे या उदासीन तीरावरचा
एैल काय नि पैल काय...
आपल्या अस्तित्वाची ही जाणीव
सत्याच्या अलिकडची पलीकडची...?
या आवेगाचा ओघ
सर्व इंद्रियांतून खोलवर वाहतोय
म्हणूनच हा प्रवाहाचा भास...!
आणि आपण आपल्या जीवाला
कुरवाळायचं तरी किती
केवळ याच्या जाणीवेने 
या उत्क्रांतीच्या प्रवाहात
सर्व इंद्रिय एकदा मोकळी झाली की
आपल्या अस्तित्वाचा प्रश्न
तेवढा मागे उरेल.

-संदीप देशपांडे

जलाशय

आज
हे उद्विग्न पहाड, ही अस्वस्थ झाडे
आकाशही कसे मूड्स बदलणारे झाडांपहाडांसारखेच 
मी वर्षानुवर्षे 
जलाशय मात्र कसे शांत अचल
वर्षानुवर्षे त्यांचे मूड्स रेखाटणारे तटस्थपणे
उठलेच कधी तरंग तर यदृच्छेने 
एरव्ही शांतपणे रोज फुलून येतात कमळे. 
किती सोशिकपणे जपत असते ते आपले स्त्रीत्व 
सृष्टीचे सर्व बदलते विभ्रम शांत तटस्थपणे साहत

आज हे पहाड उद्विग्न झाडे अस्वस्थ 
आकाशही तांबारलेले 
त्यांची प्रतिबिंबे पडताहेत माझ्या मनात 
आणि तरीही मी माझ्यात 
असे एक स्त्रीत्व जपून त्या जलाशयासारखेच 
सारे काही साहतसोसत
नवी कमळे फुलवण्यासाठी निग्रहाने...

- संतोष शेणई

1 मे

महाराष्ट्र दिन
कामगार दिन
शाळांचे निकाल 
असे झेंडे फडकवत
उगवला एक मे

प्राथमिक शाळेसमोर गर्दी
पालकांची आणि निरागस पोरांची, 
वडिलांची आधाशी नजर 
नुकत्याच मिळालेल्या गुणपत्रकात
मुलगा मात्र टक लावून पाहतोय
आईसफ्रुटच्या बर्फगोळ्याकडे

आणि गुणपत्रिका झाली
रेसकोर्स मैदान,
प्रत्येक रकान्यात मुलाची पिछाडी 
वडिलांचा चेहरा उतरलेला, 
मुलाच्या चेहऱ्यावर पसरलाय 
रंग बर्फगोळ्यावरचा.
बर्फगोळ्याच्या गाडीला खेटून
तो केव्हाचा उभा आहे

- दासू वैद्य

गुंगी गुडिया!

तिला नाही घर स्वतःचे! 
आईबापांचे!!
ना पहिल्या नवऱ्याचे! 
ना दुसऱ्या नवऱ्याचे !!

तिच्या बाळानं
कुठं जन्म घ्यावा?
 तिची रस्सीखेच इकडून तिकडं!
 तिकडून इकडं!!

पैशावर तिच्या रहाण्याची बोली!
एखाद्या वस्तू विक्रयासारखी!
 आजही तिचं भवितव्य 
काळोखात! बुरख्यात!! अंधारात !!!

येणारं मातृत्व
देईल फैसला तिच्या भवितव्याचा?
तथाकथित धर्म करील 
तिचा न्यायनिवाडा?

- शैला सायनाकर

चार कविता

1.
 दुखणं चरत चाललंय आतबाहेर, अंगभर जमेल तसं 
फोड दिसत नाही, पू होत नाही, हे असं नकोसं टाळून जखम जगते
 झाकून ठेवलेलं चिघळणं कसं उघडायचं? फक्त औषध तगमगतं!

सापडत नाही मूळ, होत नाही निदान सुखाच्या शोधात.. 
असलेल्या दुखण्याचं तेच जणू चकवतं महाकाव्यातल्या धोब्यास, 
निऱ्याची होत जाते अखेर शिंदी, हेही कळतं शेंड्यावरल्या गोभ्यास!

आनंद खुणावतच असतो. दुणावतच असतो अंग चोरून,
 शाप असतो आनंदाला जागेचा, जिवलगाचा कदाचित जगण्याचा, 
आणि सायलेंस झोनमधूनही बडबडत जाणारा भयभीत वेडा बघण्याचा!

2.
दू:ख डोळ्यांतच डळमळते
दुःख सोहळ्यात तळमळते

शब्द नाही, वाचा नाही 
दुःख कोवळ्यात वळवळते

चिणलेले भिंतीतच बंद 
दुःख मावळ्यात हळहळते

कात वारीचा अंगावर
दुःख सावळ्यात सळसळते

दुःख नदीचं ज्याची त्याची.
एकटी डोळ्यांत खळखळते.

3.
भरलेली विहीर आज खोल कशाने 
तळाशी काठावरची ओल कशाने

 पायालाच दोरीही धरून असते
 अनावर एकाएकी तोल कशाने

 भजनात रमले त्याही मृदुंगाचे
 मिरवणुकीतले झाले ढोल कशाने 

आत-बाहेर तेच चौकटीत जगणे .
भावड्यास वाटते जग गोल कशाने 

कळवळते कुंकू पदराच्याच खाली 
येतो पतिव्रतेवरचं बोल कशाने

कधीच नव्हते कुठे दुकान थाटले 
वाढले दुःखाचेही मोल कशाने

4.
पान लागले
पान लागले
जहर चालले चढत 
फरक नाहीच पडत

पान लागले
पान लागले 
वचन ओठांत बंद 
नयन स्वप्नात अंध

पान लागले
पान लागले 
पवन हिंडू पाहे 
फुटत झेंडू आहे

- फ. मुं. शिंदे

माझ्या मातीच्या चुलीला

माझ्या मातीच्या चुलीला
 नको कसला सुवास 
दरवळतो तिच्यातून
 माणसांचा सहवास

माझ्या मातीच्या चुलीला 
नको भांडी महागडी
गळणारी-थांबणारी
 पुरे तिला एक हंडी....

माझ्या मातीच्या चुलीला
 नको कसलाच थाट 
तिच्यापाशी सजतात
 फक्त मातीचेच हात....

माझ्या मातीच्या चुलीला
नको सुग्रण परकी
 हात भाजून घेणारी 
हवी तिला तिची सखी!

अंजूम मोमीन

धुके

धुके दाटलेले 
सकाळी सकाळी 
दिसू लागलेले 
पारवे आभाळी 
उन्हे चाललेली
 मनाची उभारी 
चिंब भावलेली 
धुके निवालेले
निरव संध्याकाळी 
काहूर दाटलेले
 साकळल्या कातरवेळी

- वैजनाथ महाजन

शब्द, बेभरवशाचे

शब्द, कधीकधी 
वेगळेच रंग लेवून येतात.
अचपळ होतात नको इतके
सांगायचं असतं एक
हे तिसरंच सुचवून देतात बघता बघता
अशा सहजपणे,
 की बोलणाऱ्यालाही वाटून जावे,
 'हो, हेच म्हणायचंय मला नेमकं' 
आणि शब्द, काडी लावू शकतात विश्वासाला

कधी
असा रंग भिनवून येतात स्वतःत 
जसा आभाळ रंग चढावा निखळ पाण्याला
म्हणूनच
भय वाटंत शब्दांचं
खूप काही आतलं सांगताना....

- उषा मेहता

लव्हाळी दूरवर

माझ्या दगडी वाड्याच्या मातीच्या भिंतींना
 येणाऱ्या कुबट वासाबरोबर
करतात आक्रमण
आर्य-द्रविड-शक-कुशान-हुणांच्या
मोगलांच्या-गोऱ्यांच्या
आणि इतर एतद्देशीय वा परदेशी टोळ्या 
कोंदट वाड्यातला स्वच्छ लखलखीत दिवाणखाना 
सौम्य तेवणारे खानदानी झुंबर 
नक्षीदार फर्निचर
मावळतीचे आकाश स्वच्छ पाहता येणारं सौध
प्रशस्त वायूजीवन होणारी दालने 
गूढ रोमँटिक अंतर्गृहे
स्वच्छ, चकचकीत बाथरूम भले मोठे 
कमोड व भारतीय शौचकूपासह
गडांकडे जायचे वळणवळणाचे रस्ते 
हिरवी झाडी भोवती 
इमारतींच्या कमानी 
भूलभुलैय्यात नेणारे असंख्य जिने
पोचतात माझ्या पेशींपर्यंत.
 निळे-काळे हिरवे-काळे
रक्ताचे इंद्रधनुषी पाट वाहतायत
मातीत
मातीतून फोफावणारी लव्हाळी सर्वदूर 

माधव पंडित बावडेकर

दोहे

जाळायाचा काय असा, नदीकाठचा गाव 
पात्र नदीचे कोरडे, पाण्याचा ना ठाव

सत्ता आणि असत्याचा, जिथे लागतो पाट 
देशच तेव्हा बनतो रे, नुसता स्मशानघाट

 कितीही मारा डूबक्या, हाती केवळ शंख
 कसे मिळावे नभ त्यांना, उडती से बिनपंख 

लाज राखण्या आपली, उगीच ते बेजार
 कधीच त्यांची फाटली, नको तिथेच इजार 

गाढव आणिक घोडा, उभेच दोन्ही कान
 लावर जर भागते, का शिंगांचा ताण,

- लक्ष्मीकांत तांबोळी

मि. जाखाऊच्या कवि(व्य)था

तो काहीच बोलत नाही
कारण, 
आता केळीला लागत नाही घड
 कपाशीचे फुटत नाही बोंड
 वयात येत नाहीत तुरीची शेंग
 दाणे धरत नाही कणसं - 
तरीही तो काहीच बोलत नाही.

त्याने केले म्हणतात
संशोधन 
मुक्या बहिऱ्या आणि आंधळ्या 
माणसांच्या सहनशक्तीवर
 त्यांच्या मते
 माणसांना चूप करणं अगदीच सोपं आहे.
 सांगावं त्यांना तुम्ही आहात वारसदार
अलौकिक प्रेम पित्याचे 
तुम्ही करूच शकत नाही बंड
 कारण,
तुमच्या रक्तात नाराजी नावाची
 पेशीच नसते.
ती असते फक्त पशूंमध्ये 
म्हणूनच
तो आता काहीच बोलत नाही
 त्याचा देश, त्यांचा वंश, त्याची भाषा
 नकाशावरून केव्हाच पुसून टाकली 
तरीही तो
काहीच बोलत नाही!

- नरेंद्र लांजेवार

तीच माझी दवा

तीच माझी दवा शेवटी; 
जा, तिला बोलवा शेवटी.

काय आजार होते कमी;
रोग लागे नवा शेवटी.

 पत्र आधी सुगंधी लिहा
 पत्रिका पाठवा शेवटी.

 मारले मीपणाने मला: 
तारण्या तू हवा शेवटी. 

देव मेले तरी द्या मरू; 
माणसे वाचवा शेवटी.

लाजते फार कोजागिरी:
 तो दिवा मालवा शेवटी.

पेटलेली चिता सांगते
 चेहरा आठवा शेवटी.

-  श्रीकृष्ण राऊत 

गायींच्या डोळ्यांतले स्वातंत्र्य

गव्हाणीत बैलांना वैरण घालणारा बाप, 
खंडीभर गायी रानात चारून जीवाजतन 
गोठ्यांत परत घेऊन येणारा बाप, 
दुधाच्या धारा काढून
शेणाचा गारा उकंड्यात सांडून
श्रमानं
देखणा
 होणारा बाप
 घरादारांचं भव्य वैभव. 
त्याचा सर्व सिलॅबस 
असा ढोरावासरांच्या पाठीवरून फिरतफिरत,
त्याच्या काळजात जमा होणारा.
आम्हांस
आता
 कळते
आहे
की:
बापाचे इतके सर्वांगसुंदर आयुष्य कुणामुळे? 
ढोरावासराला त्यानं कधी काठी मारली नाही.
 दावणीला ढोर त्यानं कधी बिनभाकरीचं ठेवलं नाही. 
गोठ्याचं बंधन गायीच्या डोळ्यांत
त्यानं कधी उतरू दिलं नाही! 
बाप 
ढोरावासरांचा
राणा: 
बाप, गुरावासरांचा हिर्वा आशीर्वाद!

- केशव सखाराम देशमुख

नवं नक्षत्र

प्रकल्पवर्षाची
चौकटीतली रंगीत बातमी वाचून 
काळीज पार कोरडं पडलेलं 
आणि तरीही भिजऱ्या पापण्यांखाली
 पाण्याचं थारोळं शोधणाऱ्या घरचिमण्या, 
लाहा लाहा करणारी
 खपाट पोटाची कुत्री, 
नळाच्या गळ्यातून
 ओला स्वर निघावा म्हणून 
वाट पाहणाऱ्या माणसांची
 न बुजणारी रांग 
आणि शेतकाम सांडून 
भरती केलेल्या गाईगुरांच्या 
वावरांतल्या छावण्या...

आता पावसाळाही
वरच्या दुधासारखाच. 
अघटितानं मनाचं रान 
एकाएकी ओल्या फुफाट्यासारखं.

चित्रातल्या पावसाकडं बघताना 
डोईवर कुंची असल्याचा
 भास व्हावा तसा मी 
पावसाच्या एका नव्या नक्षत्रानं
 हरवून गेलेला आणि हबकूनही.

- हेमकिरण पत्की

कबर
 
चर्चचं विस्तीर्ण आवार
 मुख्य दरवाजाच्या पायऱ्या
ओलांडल्यानंतर
तुझ्या कबरेवर माझा पाय पडतो
मी येतो
येतो तेव्हा हमखास होते तुझी गाठभेट
 कारण तूच एक शाश्वत आहेस 
पृथ्वी होऊन मला तळहातावरती 
झेललं आहेस...

तुझ्या आठवणीसारखीच

होऊ लागली आहेत अस्पष्ट, 
संगमरवरी चिऱ्यावरची अक्षरं
 कित्येक महिन्यांत
वर्षात...
नाही लावली वात तुझ्या कबरीवरती 
तुझ्यापर्यंत येणे होऊ लागले होते.
विरळ
मी माझ्या आतच घेतली होती बांधून
तूझी कबर
किती काळ
मी तुला माझ्यापासून
 दूर ठेवू शकणार होतो?

जिवंत किंवा मृत
वाहून नेते कोणीतरी आपल्याला 
आपणही वाहत असतो कुणालातरी 
नाही फेकून देता येत पूर्णपणे
शरीराचं गाठोडं
 शरीराबाहेर
करून द्यावी लागते
आपल्या आतच
मोकळी जागा मृत शरीरासाठी
 रुजत घालावा लागतो
दाणा
आपल्या आपल्या जमिनीप्रमाणे
उगवते पीक
कबर म्हणजे सृजनाचे गीतच.

नाही तोडता येत
तुझ्याशी असलेल्या नात्याचा धागा
अनुभवलेल्या
जगाबद्दलचे ममत्व
आणि न पाहिलेल्या रूपगंधाचा शोध
 तू जाऊन लोटला आहे काळ
 ह्याच अवधीत एक विश्व
नव्याने आलंय आकाराला
तरीही कुठे कुठे अस्तित्वात
आहेत खुणा
कबरीच्या रूपात इतिहास होऊन
इतिहास म्हणजे
एक न संपणारी 
कबरच आहे

ओळीने उभ्या असतात
कबरा
जगण्याला वेढा घालून
कितीही असला आकर्षक देखावा कबरीचा
तरीही ते दुःस्वप्नच असते.
 काळजावरचा धोंडा लोटूनही 
करता येतो कबरे आत प्रवेश
जाता येते गर्भाच्या पार तळापर्यंत
जसा मुळाचा प्रवास 
मातीच्या गर्भापर्यंत

कबर म्हणजे
न भेदता येणारा 
काळोखाचा तुकडा
डोळे मिटलेल्यांसाठी
सारा आसमंत
एक भव्य कबरच असते
ज्यात देह जखडलेला
 आणि इतिहासाचे काळीज
दुखत राहते.
तुझ्या हातून माझा हात
निसटल्यानंतर 
मागे उरते काय?
एक दुर्लक्षित कबर
वाऱ्या पावसात झिजलेला
संगमरवरी दगड
काही अस्पष्ट अक्षरे 
आणि घरातील धुळभरती फ्रेम
मृत्यूच म्हणजे
ओठ टिकवण्यासाठी
मातीचा मातीकडे प्रवास अव्याहत

- सायमन मार्टीन

मुले...

मुले, बेमुर्वत कातडी ओरबाडून ल्याहा ल्याहा करीत फिरणारी
मुले प्रार्थनासाठी अंगणाचा पवित्र करीत जाणारी
 मुले, टीव्हीचा पडदा फाडून चेकाळून चॅनल गाळणारी
मुले, रक्त पिळून म्हातारीचा कर्करोग जखमांनी झाकणारी 
मुले, गळा दाबून खुशाल भोसकून दहशतीत फिरणारी
मुले, पदव्या अंथरून बेकारीच्या टाचेखाली गळा चिरून भेकणारी
मुले, दंड क्रूर नजरेच्या धाकात स्वखुशीने मारता मारता मरत जाणारी
मुले, उपाशीपोटी भारत माझा देश आहे, प्रतिज्ञा म्हणत राहणारी
मुले, चाड चेपलेली, भीड नसलेली, लिंगमोकाट गुटख्यात गर्दाळलेली 
मुले, गर्दीत बोट सुटलेली, भांबावलेली, कोणत्याही मिरवणुकीत आई शोधत असलेली
मुले, रात्रभर आपल्याच नादात बेशुद्धपणे बुचकळत राहणारी
मुले, लयीत गाणे गुणगुणत तळहातावर चांदणं ठेवत जाणारी
मुले, नसावीतच, नकोतच, नको नकोशी जन्म कुरतडत ठेवणारी 
मुले, नवसात गुंडाळून, पाच मुलींच्या सोललेल्या पाठीवर गर्भाशयात अंगठा चोखणारी
मुले, भवितव्याला शिवीगाळ करीत पूर्वजांवर थुंकत थुंकत धार मारणारी
 मुले, संचिताच्या गुहेतून, नशिबाचा दगड शोधून, त्यावर घामाच्या अभिषेकाची धार धरणारी
मुले, छिन्नभिन्न रंग फासून परदेशात चवली-पावलीसाठी मेंदू हलवीत खेळ करणारी 
मुले, चोरलेल्या गवऱ्या धडाड पेटवून इडा पिडा टळो ची धुर्राड बोंब ठोकणारी
मुले, फसत, घुसत, नासत वा झवत गेल्या जिंदगीला कोलत, प्रत्यही आत्महत्या करणारी 
मुले, मातीसाठी, माणसांसाठी, जळत जळत, प्रकाशाला उजळत नेणारी

- किशोर पाठक

उपाय

1. 
सहा बैलांच्या नांगराशिवाय 
यांचं काळीज उकलणार नाही

उम्हाटपाळी घातल्याशिवाय
 यांचे ढेकूळ फुटणार नाही

वैशाख उन्हात तापवल्याशिवाय 
यांचा कस लागणार नाही

मग पाजू यांना मिरगाचं पाणी 
तेव्हा होतील मऊसूत लोण्यावाणी.

2.
 यांची पडीक बुट्टी 
आपण बटाऊनं करूयात

खूप मेहनत करून 
चांगली पिकऊयात

आपल्याविषयी त्यांच्या मनात
 मग विधायक विचार येतील

3. 
यांचा मेंदू गाईच्या 
शेणा-मुतात घोळसून

गंगेकाठच्या शेतात
खोल खोल पुरावा

मग यांच्या डोक्यात 
चांगले विचार उगवतील

4.
यांना फासाटीला बांधून 
वावडभराची रासन करावी

 अडकले मधीच पासेला 
तर इळतिनं यांचं वसन काढावं 

यांच्या कचऱ्याचे वावरात लागले ढीग
तर फेकून द्यावेत धुऱ्यावर

 तिथं बैलांच्या चाऱ्याआड येऊ लागले
 तर यांचं फुरसन फुकून द्यावं

 कुणी म्हणालाच तेव्हा आपणाला विध्वंसक 
तर त्याला भाषेचं नवं शास्त्र शिकवावं

5.
हे बुजगावण्याला घाबरत नाहीत
गोफणगुंडाच घ्यावा लागेल हातात

 पाखरू म्हणून कीव करू नये यांची 
घुमवून गोफण यांच्या वर्मी घाव घालावा

 पोट भरल्यावर उडून जाणारी 
निरागस पाखरं नव्हेत ही

 जखमात चोची खुपसणाऱ्या
 डोमकावळ्यांची जात आहे यांची

6.
यांना टाकावं खळ्यात बैलांच्या पायाखाली 
म्हणजे हे मोकळे होतील खाकऱ्यातून

 मग यांना उधळावं तिव्यावरुन 
म्हणजे यांचं भुसकट उडून जाईल वाऱ्यावर 

जात्यात घालून यांना छान म्हणावी ओवी
म्हणजे यांच्यातलं सत्व निकं होत जाईल

 नंतर यांना बारीक चाळणीने चाळून
 यांच्यातला उरला-सुरला कोंडा काढून टाकावा 

- इंद्रजित भालेराव

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके