डिजिटल अर्काईव्ह

गरिबी निर्मूलन आणि आर्थिक विकास - नव्या युगासाठी नवीन मॉडेल

देशाच्या खेड्यापाड्यांतून त्रिसूत्री निविष्टीविना अनेक सुप्त प्रतिभेचे मानवी हिरे-माणके निस्तेज स्थितीत पडून आहेत. ह्यांच्या गुणवत्तेचे इष्टतमी करणे अत्यावश्यक आहे. हे गुणवंत आणि अनिवासी ज्ञानवंत व्यक्ती एकत्र आले तर आपला भारत एक महासत्ता आणि अत्युच्च संस्कृतीचा देश म्हणून अखिल विश्वात आदर्श ठरेल. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम भारत 2020 साली महासत्ता होईल असे स्वप्न पहात आहेत. उदारमतवादाने हे केवळ अशक्य आहे, माझे प्रतिमान कार्यान्वित केले तर ते सहजशक्य आहे. अशी माझी धारणा आहे.

गरिबी निर्मूलन आणि विकास यासाठी पथ नकाशा 
माझ्या मध्यवर्ती सिद्धांतावरून गरिबी निर्मूलन आणि विकास यासाठी एक सुस्पष्ट पथनकाशा तयार होतो तो असा दुष्ट प्रवृत्तीचा (उदा. आतंकवाद, भ्रष्टाचार यांचा) निःपात करून सत्प्रवृत्ती प्रस्थापित करणे, नैतिकता व सुसंस्कृती अस्तित्वात येणे, गतिमान समाजरचना प्राप्त होते. प्रत्येक व्यक्ती उत्पादनसक्षम, रोजगार व अर्थार्जन एकाचवेळी गरिबी निर्मूलन व आर्थिक विकास समृद्ध व सुसंस्कृत नागरिक आणि समाज हा परिवर्तनाचा नकाशा दीर्घकालावधीचा व कल्पितादर्शी वाटेल. पण जबरदस्त राजकीय इच्छा आणि प्रचंड जनआंदोलने यांनी क्रांतिसम परिवर्तन शक्य असते, हे इतिहासकाराने सिद्ध केले आहे. त्रिसूत्री निविष्टी सिद्धांतावरून एक शीघ्र परिणामी पथनकाशा प्रतिबिंबित होतो तो असा; हरएक व्यक्तीमध्ये त्रिसूत्री निविष्टी, व्यक्ती उत्पादनासाठी सक्षम, रोजगारामधून मिळते एकसमयावच्छेदी गरिबी निवारण व आर्थिक विकास ही दीर्घ आणि अल्पावधीचे दोनही पथनकाशे एकमेकांना उत्प्रेरक व पूरक आहेत.

ग्राम-परिवर्तनातून गरिबी व विकास समस्येची उकल 
सक्षम असूनही गरीब तरुणाला रोजगार मिळाला नाही, तर तो गरीबच राहणार. महाकाय उद्योग प्रधान संस्कृतीत खेड्यापाड्यातून राहणाऱ्या असंख्य अकुशल बेकारांना रोजगार पुरविण्याची ताकद नसते. मानवात व्यक्ती तसे देशात प्रत्येक ग्राम हा मूलभूत केंद्रक आहे. व्यक्ती उत्पादकतेच्या दृष्टीने सक्षम हवी, तसेच व्यष्टिस्तरावर हरएक ग्राम स्थानिक उद्योग आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने सक्षम हवे. व्यक्तिप्रमाणेच ग्रामाच्या गुणवत्तेच्या इष्टतमीकरणाचा सिद्धांत माझ्या मॉडेलमध्ये मध्यवर्ती आहे. ग्रामाची गुणवत्ता म्हणजे त्याची सुप्त पण मौल्यवान नैसर्गिक साधन-सामग्री, ही संपत्ती पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश आणि सजीव सृष्टी या रूपात अस्तित्वात असते. उदा. शेतजमीन, तिचा कस, पाणी, वनस्पती, पशु-पक्षी धन, इत्यादी या संपत्तीचा शोध घेऊन उत्पादन व रोजगारनिर्मिती यांसाठी तिची उपयुक्तता वाढविणे म्हणजेच नैसर्गिक संपत्तीरूपी ग्राम-गुणवत्तेचे इष्टतमीकरण होय. आपल्या अर्थनीतीतील रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ग्रामीण लघुउद्योग धंद्यांना प्राधान्य दिले पाहिजे. 

सुधारित शेती, दुग्ध व्यवसाय, कुटिर उद्योग, वनीकरण, पशुसंवर्धन, अशा लघुकाय उद्योगधंद्यांचे जाळे खेड्यापाड्यांतून पसरले पाहिजे. म्हणजे गावातच रोजगार मिळेल. गरिबी हटेल. शहरांकडे जाणारा बेकारांचा लोंढा थांबेल. हीच खरी भारतीय संस्कृती आहे. गांधीजींनी याच विचारसरणीचा पुरस्कार केला. 'स्मॉल इज ब्युटिफुल' हे विख्यात विचारवंत शूमाकर यांचे वाक्य सुभाषित होऊन जगप्रसिद्ध झाले. हे हवेतले मनोरे नाहीत. राजस्थानात वाळवंटाचे नंदनवन फुलविणारे राजेंद्र सिंह राणा, मणिभाई देसाई, विलासराव साळुंखे, अण्णा हजारे इत्यादी कर्मयोग्यांनी ग्रामरूपांतर प्रणित परिवर्तनाचे व गरिबी निर्मूलनाचे चमत्कार प्रत्यक्षात करून दाखविले आहेत. व्यक्तिपरिवर्तन रोजगाराची मागणी बाजू दाखविते; ग्रामपरिवर्तन पुरवठा बाजू दाखविते. अशा रीतीने रोजगार, मागणी व पुरवठा यांचे योग्य समीकरण होऊन बेरोजगारी, गरिबी व ग्रामविकास हे प्रश्न मार्गी लागतील.

पाश्चात्त्य प्रतिमान आणि माझे प्रतिमान यांची तुलना
काही महत्त्वाच्या निकषांवर उदारमतवादाच्या तुलनेत मॉडेलची काही ठळक वैशिष्ट्ये सूत्ररूपाने अशी आहेत, 1. आंतरशास्त्रीय मीमांसा: पाश्चात्य मॉडेल, गरिबी व विकास हा केवळ अर्थशास्त्राचा विषय आहे असे मानते. माझे मॉडेल समस्यांची उकल आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून करते. प्रा. देवदत्त दाभोलकर म्हणतात; पेठे यांचे प्रतिमान आंतरराष्ट्रीय संशोधनाला आवाहन करणारे आणि आव्हान देणारे आहे. ते अभिनव व विचारप्रवर्तक आहे. 2. ठिबक तत्त्वाच्या मध्यस्थीमुळे (प्रॉक्सी) उदारमतवाद प्रतिपत्री मॉडेल झाले आहे. माझे प्रतिमान गरिबीच्या प्रश्नावर सरळसरळ हल्ला करते. 3. विचारांची झेप गरिबीचे मूळ शोधताना उदारमतवाद आर्थिक मागासलेपणा या एकमेव चलघटकापर्यंत येऊन गोठतो. माझ्या मॉडेलची झेप वैश्विक आहे. यातील विश्लेषण आर्थिक, सामाजिक, नैतिक व शेवटी मानवाची मूळ वृत्ती-प्रवृत्ती या प्रश्नाच्या उगमस्थानापर्यंत येऊन मिडते. 4. व्यष्टी समष्टी प्राधान्य- पाश्चिमात्य प्रतिमान समष्टी म्हणजे राष्ट्रकेंद्रित आहे. ॲडम स्मिथ व गुन्नर मिरडाल यांच्या ग्रंथाच्या नामकरणात 'राष्ट्रांची’ संपत्ती व गरिबी असे शब्द आहेत. 

या प्रतिमानानुसार राष्ट्र सामर्थ्यवान होईल, पण असंख्य व्यक्ती गरीब व दुर्बल राहतील. माझे प्रतिमान व्यष्टी म्हणजे व्यक्तिकेंद्रित आहे. म्हणून हर एक व्यक्ती सक्षम असल्यामुळे राष्ट्रही प्रबळ असणारच. 5. पथनकाशे- पाश्चात्त्य मॉडेलनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह गरिबांपर्यंत पाझरतो असे म्हणणे म्हणजे सागराचा प्रवाह गंगोत्रीपर्यंत उलट्या दिशेने जातो असे म्हणण्यासारखे आहे. माझ्या मॉडेलमध्ये गरीब सक्षम व्यक्तीचे अर्थार्जन लगेचच राष्ट्रीय उत्पन्न वाढवितो. 6. मानवी चेहरा- नवसाम्राज्यवादाचा चेहरा लष्करी हस्तक्षेप व आर्थिक दबाव यामुळे निर्दय व नवभांडवलशाहीचा चेहरा दुष्परिणामामुळे कलंकित झाला आहे. माझ्या मॉडेलमध्ये नायक मानवच असल्यामुळे मानवी चेहरा प्रसन्न आणि तेजस्वी असणार. यांत अंतर्भूत हमी आहे. 7. एकांगीपणा की बहुसंग्राहकता- उदारमतवाद हा टोकाचा व एकांगी 'वाद' आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ हेच त्याचे एकच एक उद्दिष्ट आहे. समाजाला गतिमान करण्यासाठी सर्व घटकांना एकत्र गुंफून विकसित केलेल्या साकल्यशील अशाच रूपालोकाची आवश्यकता आहे. माझ्या प्रतिमानात मी महत्त्वाच्या विचारसरणीमधील गतिशील तत्त्वांचा समावेश केला आहे. उदा. ॲडम स्मिथच्या उदारमतवादातील उपक्रमशीलता, मार्क्सच्या समाजवादातील समतेचे तत्त्व आणि गांधीवादातील नैतिकता यांचा संगम माझ्या प्रतिमानात झाला आहे. विविध सांस्कृतिक रंगांनी नटलेल्या इंद्रधनुसम अशा आपल्या समाजाला सर्वसंग्राहक रूपालोकच उपयुक्त ठरेल. या दृष्टीने माझे प्रतिमान पौर्वात्य, विशेषतः भारतीय आहे असे मी म्हणेन.

समारोप :महासत्ता आणि उच्च संस्कृतीकडे
आर्थिक विकास मानवाची, मानवासाठी आणि मानवाकरवी साधणारी, अशी गतिमान प्रक्रिया आहे. म्हणून माझ्या मॉडेलमध्ये मानव हा केंद्रस्थानी आहे. हरएक व्यक्ती त्रिसूत्री निविष्टीने सक्षम होणे हे याचे प्रमुख सूत्र आहे. समाजात गुणवत्तेच्या निकषावर व्यक्तींचे तीन प्रकार असतात. 1. सर्वसामान्य गुणवत्तेच्या व्यक्ती 2. प्रतिभा संपन्न व्यक्ती 3. जणू काही दैवी प्रज्ञा आणि प्रतिभा लाभलेले महामानव, यातील सर्वसाधारण क्षमता असलेली मंडळी आहे ते जीवनमान त्याच पातळीवर ठेवण्याचे काम करू शकतात. प्रतिभाशाली व्यक्ती सामाजिक जीवनाची उंची उच्च स्तरावर नेतात. उदा. नोबेल किंवा तत्सम पुरस्कार विजेते, उत्तुंग प्रतिभेचे व्यास-वाल्मिकी, कालिदास, शेक्सपिअर, मार्क्स केन्स, न्यूटन आईनस्टाईन, पॉपर- रसेल, गांधी-विनोबा, मंडेला-मार्टिन, ल्यूथर किंग यांसारखे महामानव भौतिक व सांस्कृतिक उंची 'क्वांटम लीप' घेऊन अत्युच शिखरावर नेऊन पोहोचवितात असे महामानव शतकांतून एकदा जन्मतात. भारतातील अशी मानवी रत्ने-हिरे होती आणि भविष्यातही जन्म घेतील. 

सध्या काही अलौकिक ज्ञानवंत अमेरिकेसारख्या प्रगत देशात योगदान देऊन त्यांना समृद्ध करीत आहेत. कसा हा परस्परविरोध आणि दैवगती आहे पहा! श्रम आणि पैसा भारतीय पालकांचा आणि फायदा मात्र अमेरिकेचा किंवा तत्सम देशांचा! सोन्याची अंडी देणारी 'ब्रेन्स' रूपी कोंबडी पैशाच्या जोरावर श्रीमंत पाश्चात्त्य देश नेतात. त्यांतील थोडीशी अंडी वित्त प्रेषणाच्या रूपात भारताकडे येतात. त्यावर आपण किती बेहद्द खूष असतो. आर्थिक विकासात मानवी गुणवत्तेचे किती मोठे मोल आहे याबद्दलचे अज्ञानच आपण येथे दाखवितो. 'ड्रेन' झालेल्या 'ब्रेन्स'ना देशप्रेम नाही असे नाही. त्यांना योग्य वातावरण आणि योगदानाचे श्रेय दिले तर ते भारतात निश्चित परततील. देशाच्या खेड्यापाड्यांतून त्रिसूत्री निविष्टीविना अनेक सुप्त प्रतिभेचे मानवी हिरे-माणके निस्तेज स्थितीत पडून आहेत. ह्यांच्या गुणवत्तेचे इष्टतमी करणे अत्यावश्यक आहे. हे गुणवंत आणि अनिवासी ज्ञानवंत व्यक्ती एकत्र आले तर आपला भारत एक महासत्ता आणि अत्युच्च संस्कृतीचा देश म्हणून अखिल विश्वात आदर्श ठरेल. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम भारत 2020 साली महासत्ता होईल असे स्वप्न पहात आहेत. उदारमतवादाने हे केवळ अशक्य आहे, माझे प्रतिमान कार्यान्वित केले तर ते सहजशक्य आहे. अशी माझी धारणा आहे.

Tags: A. P. J. Abdul Kamal  Adam Smith Anna Hajare Vilasrav Salunkhe Manibhai Desai Rajendra Sing Rana Mahatma Gandhi Development Poverty Irradication Dr. Vasant Prabhaakr Pethe ए.पी.जे. अब्दुल कलाम अॅडम स्मिथ अण्णा हजारे विलासराव साळुंखे मणिभाई देसाई राजेंद्र सिंह राणा महात्मा गांधी विकास गरिबी निर्मूलन डॉ. वसंत प्रभाकर पेठे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी