डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शंभर वर्षे लोटली पण समाजात अंधश्रद्धा तशाच आहेत. बुवाबाजी फोफावतेच आहे. यज्ञयागांचे स्तोम कमी होत नाही; की यात्रा, कुंभमेळे यांना ओहोटी लागत नाही. दर निवडणुकीने जातिबंधने अधिक घट्ट होत आहेत. दलितांना, स्त्रियांना समानतेने वागविणे जेथे सक्तीचे आहे तेथेही आपण खळखळ करतो. खाजगी व्यवहारात दुजाभाव मनसोक्त आहे. हे सर्व सुधारण्याचे काम आगरकरांचे सुधारकाचे आहे. ते कितीही मोठे असले तरी, आपण आपला खारीचा वाटा उचलावा यासाठी देशपांडे यांनी 'आजचा सुधारक' सुरू केला.

आम्ही 'सुधारक’ च्या निमित्ताने पाचसहा वर्षांपूर्वी भेट घेतलेले लोक जेव्हा भेटतात तेव्हा पहिला प्रश्न विचारतात की, तुमचे ते मासिक अजून चालू आहे का? 'हो' म्हणताना अंगावर मूठभर मांस येते, प्राध्यापक दि.य.देशपांडे यांनी 3 एप्रिल 1990 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी 'नवा-सुधारक’ सुरू केला. सुमारे 100 वर्षापूर्वी आगरकरांनी 'सुधारक’ साप्ताहिक काढले. आगरकरांचेच काम आपण पुढे चालवत आहोत ही देशपांड्यांची धारणा. म्हणून मासिकाचे नाव 'नवा सुधारक’ ठेवले. समाजसुधारणा करू इच्छिणाऱ्याला समाजाचे दोष दाखवावे लागतात. आपले दोष दाखवलेले कोणालाच आवडत नसतात. हे इतके अप्रिय काम आगरकरांनी सुरू केले तेव्हा ते 32 वर्षांचे होते. शिवाय कुठे पुणे, कुठे नागपूर? असाही विचार प्रश्नकर्त्यांच्या मनात असणार त्यामुळे, तुमचे ते मासिक अजून चालू आहे का? असे कोणी विचारले तर वाईट वाटून घेता आत्मविश्वासाने 'हो हो' म्हणताना किती बरे वाटते! 

आगरकरांचे काम पुढे चालवणे म्हणजे काय? 'सुधारक काढण्याचा हेतू' समाजाचे कुशल राहावे, त्याची उन्नती व्हावी असा असल्याचे आगरकरांनी सांगितले आहे. समाजहित व्यक्तिहिताहून वेगळे असत नाही, वास्तव, 'व्यक्तिमात्रास (पुरुषास व स्त्रीस) जितक्या स्वातंत्र्याचा उपयोग घेता येईल तितका द्यावयाचा! हे सुधारणेचे मुख्य तत्त्व आहे. व्यक्तीवर बंधने आहेत पण किती आणि कोणती? तर समाजाचे कुशल राहण्यासाठी जी आणि जेवढी अपरिहार्य आहेत, तेवढीच. अशा रीतीने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणे हे आगरकरांचे स्वीकृत कार्य होते. नव्या सुधारकाला ते आजही तितक्याच तीव्रतेने पुरस्कारणे आवश्यक वाटते. राजमान्यतेची वस्त्रे हवी असतील तर, तुम्ही प्रज्ञावंत असा की प्रतिभावंत असा, आम्हांला रुचेल तसेच बोलले पाहिजे, आमची मर्जी सांभाळून वागले पाहिजे अशी अपेक्षा ठेवून राज्यकर्ते आजही वागताना दिसतात की नाही? आगरकरांना स्त्री-पुरुष समानता हवी होती. 

सुखांचा उपभोग घेण्यास पुरुष जितका अधिकारी आहे तितकीच स्त्रीही आहे. प्रत्येक मनुष्य सुखाचा समान अधिकारी आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याची जात कोणतीही असो. अशी जाति-धर्म-लिंग निरपेक्ष मनुष्याची योग्यता मान्य करणे म्हणजे समानता. प्रत्येकाला सुख संपादण्याचे स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकजण सुखाचा सारखाच अधिकारी आहे. ही समानता आगरकरांना हवी होती. आगरकरांना हव्या असलेल्या सुधारणांची व्याप्ती इतकी मोठी असताना आणि आज, त्यांच्या मृत्यूनंतर 100 वर्षांनी या सुधारणांची गरज तितकीच तीव्र असताना काही पुरोगामीपणावे नाव सांगणारे कार्यकर्ते आगरकरांना समाजसुधारक न म्हणता, फार तर कुटुंबसुधारक म्हणावे असे मत मांडताना दिसतात. आणि तेही 'ब्राह्मणी कुटुंब-सुधारक' म्हणा हवे तर, असे म्हणण्याचे औदार्य (!) दाखवतात. 

सुमारे एक वर्षापूर्वी नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आगरकरांच्या निधनाला 100 वर्षे झाली, त्यानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ दोन दिवस झालेल्या परिसंवादात अनेक वक्ते या आशयाची भाषणे करीत होते. काही जास्त प्रक्षोभक आणि आक्रमक विधाने करीत होते. त्यात नागपूरस्थ होते तसे पुण्याचे होते: मुंबईकरही मागे नव्हते. प्रा. देशपांड्यांना आगरकरांचे काम अजूनही पुढे चालवावेसे वाटते ते यामुळेच. स्थितिप्रिय लोकनेत्यांना आगरकरांनी जाब विचारला होता की, 'ही सामाजिक स्थिती अत्युत्तम, ही फिरवाफिरव करण्यास कोठेही अवकाश नाही. 

सध्या येथे स्त्रियांचे पुरुषांशी, मुलांचे आईबापांशी, जे संबंध चालत आले आहेत तेच उत्तम आहेत व अनंतकाळ तेच चालले पाहिजेत; ज्ञान संपादणे हे पुरुषाचे कर्तव्य, शिशुसंगोपन हे स्त्रियांचे कर्तव्य पुरुष स्वामी, स्त्री-दासी; स्वातंत्र्य पुरुषांकडे, पारतंत्र्य स्त्रियांकडे; विवाहाशिवाय स्त्रीस गती नाही, व गृहाशिवाय तिला विश्व नाही; वैधव्य हेच तिचे महाव्रत व ज्ञानसंपादन हा तिचा मोठा दुर्गुण; अशा प्रकारच्या ज्यांच्या धर्मविषयक व समाजविषयक कल्पना- असे लोकाग्रणी काय कामाचे?' आगरकरांना समाजात कोठे कोठे आणि काय काय दोष दिसत होते याची यावरून कल्पना येते. आगरकरांच्या सुधारकाचा पहिला अंक बाहेर पडला 15 ऑक्टोवर 1988  रोजी. त्यानंतर उण्यापुऱ्या 7 वर्षात वयाच्या 39 वर्षी त्यांचा अंत झाला. 

शंभर वर्षे लोटली पण समाजात अंधश्रद्धा तशाच आहेत. बुवाबाजी फोफावतेच आहे. यज्ञयागांचे स्तोम कमी होत नाही; की यात्रा, कुंभमेळे यांना ओहोटी लागत नाही. दर निवडणुकीने जातिबंधने अधिक घट्ट होत आहेत. दलितांना, स्त्रियांना समानतेने वागविणे जेथे सक्तीचे आहे तेथेही आपण खळखळ करतो. खाजगी व्यवहारात दुजाभाव मनसोक्त आहे. हे सर्व सुधारण्याचे काम आगरकरांचे सुधारकाचे आहे. ते कितीही मोठे असले तरी, आपण आपला खारीचा वाटा उचलावा यासाठी देशपांडे यांनी ' आजचा सुधारक' सुरू केला. त्याला पाहता पाहता 7 वर्षे झाली. मुळात नाव होते 'नवा-सुधारक'; परंतु रजिस्टर ऑफ न्यूजपेपर्स अँड पिरियॉडिकल्स, दिल्ली यांच्याकडे नोंदणी करताना पाठविलेल्या नावांतून त्यांनी ‘आजचा सुधारक’ या नावाला मंजुरी दिली म्हणून फेब्रुवारी 91 पासून 'नवा-सुधारक’ आजचा-सुधारक झाला. 

प्रा. देशपांडे यांनी पहिल्याच अंकात लिहिले आहे की त्यांच्या दिवंगत पत्नी प्रा. मनू गंगाधर नातू यांच्या मनात आगरकरी कार्याचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार अनेक वर्षांपासून होता. शरीर-प्रकृती साथ देत नव्हती. तशातच मनूताईंचा अंत झाला (3 एप्रिल 1988) त्या आधातातून सावरण्यास दोन वर्षे लागली. आता अधिक विलंब लावल्यास कदाचित हे काम आपल्याच्याने कधी होणार नाही' अशा भीतीने 3 एप्रिल 1990 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी प्रा. दि. य. देशपांडे यांनी ‘नवा-सुधारक' सुरू केला. आपल्या 'विवेकी, परोपकारी. 

तेजस्वी व्यक्तीचे (पत्नीचे) स्मारक तिला अतिशय प्रिय अशा कार्याला वाहिलेले मासिक (पत्रिका) चालवून करावे अशी भावना वृद्धावस्थेत एवढे कठीण काम अंगावर घेताना प्रा. देशपांडे यांच्या मनात होती. या ठिकाणी प्रा. देशपांडे यांच्या विवेकवादी व्यक्तित्वाची ओळख करून देणे उचित होईल. ते तत्त्वज्ञ आहेत. उभी हयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशन ही संस्था त्यांनी काढली आणि तिचे त्रैमासिक-जर्नल त्यांनी सुमारे 19 वर्षे एकट्याने चालवून भारतात व परदेशात त्याचे नाव केले. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात डी.वाय. देशपांडे हे नाव असे सुप्रतिष्ठित आहे.

अज्ञेयवाद ही पळवाट

तत्त्वज्ञानात अनुभववादी आणि प्रज्ञावादी असे दोन पंथ आहेत. देशपांडे मुख्यत्वेकरून अनुभववादी आहेत. सर्व ज्ञानाचा उगम अनुभवात होतो. इंद्रियांनी मिळणाऱ्या अनुभवात हा उगम होतो आणि त्याच अनुभवाने ज्ञानाचे प्रामाण्य ठरते अशा मताचे ते आहेत. दुसऱ्या शब्दांत त्यांना अतींद्रियज्ञान मान्य नाही. दिव्यज्ञान, साक्षात्कार मान्य नाहीत. ज्याच्या खरे-खोटेपणाची कसोटी संवेदन शरण नाही ते ज्ञानच नाही अशी त्यांची धारणा आहे. एकूण ज्ञानाची साधने दोन एक ज्ञानेंद्रिये व दुसरे साधन तर्क. ज्ञानेंद्रियांनी प्रमाणित केलेले ते प्रत्यक्ष प्रमाण आणि प्रत्यक्षाधिष्ठित अनुमान हे दुसरे प्रमाण. मनुष्याची बुद्धी ज्ञानाचे ग्रहण करते. त्याचप्रमाणे औचित्याचा निवाडाही करते. 

बुद्धिप्रामाण्यवाद ज्ञान आणि नीती या दोन्ही क्षेत्रांत लागू करता येतो. ज्ञानाच्या क्षेत्रात तो लागू करून देशपांडे नास्तिक होतात. शब्दप्रामाण्य नाकारून देव, मरणोत्तर आत्म्याचे अस्तित्व, पूर्वज, पुनर्जन्म या गोष्टी ते नाकारतात. इहलोक हवा एकच लोक उरतो. परलोक आत्मा-परमात्मा यांच्याबद्दल जे आहे म्हणत नाहीत आणि नाहीही म्हणत नाहीत, जे आपल्याला या विषयांचे ज्ञान होणे शक्य नाही असे म्हणतात, ते अज्ञेयवादी या नावाने ओळखले जातात. प्रा. देशपांडे अज्ञेयवादी नाहीत. ह्याच्याही पलीकडचे नास्तिक(वादी) आहेत. ज्याच्या अस्तित्वाबद्दल कसलाही पुरावा उपलब्ध नाही ते मानायला त्यांची तयारी नाही. अज्ञेयवाद ही त्यांना पळवाट वाटते. बुद्धिप्रामाण्यवादाचा औचित्याच्या क्षेत्रातला विचार म्हणजे नीतिशास्त्र याबाबतीत प्रसिद्ध ब्रिटीश तत्त्वज्ञ जॉन स्टुअर्ट मिल् (18-06-73) हा त्यांचा गुरू आहे. त्याचे उपयोगितावादी नीतिशास्त्र त्यांना पटते. 

सुख आणि दुःख ह्या अनुभवसिद्ध गोष्टी आहेत. जो अनुभव हवाहवासा वाटतो ते सुख आणि नकोसा वाटतो ते दुःख. आपले ऐहिक जीवन सुखी व्हावे यासाठी नीती आहे. नीतीचा धर्माशी संबंध नाही. धर्म इहलोकापेक्षा परलोकाला प्राधान्य देतो. असे करणे चूक आहे. विचारी मनुष्याला समाजाचे महत्व आहे. ते असे की समाज म्हणजे स्वतंत्र असे काही नसून व्यक्तींचा समुदायव आहे. आपल्याप्रमाणे इतर व्यक्तीही सुखाच्या सारख्याच अधिकारी आहेत. म्हणून जास्तीत जास्त जीवांचे जास्तीत जास्त सुख ज्याने साधेल तो नीतीचा आचार हा नीतिनियम काही मूळ तत्त्वांवर आधारला आहे. उपयोगितावादासाठी व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय ही तत्त्वे मानावी लागतात. 

शुद्ध तर्काने त्यांचे अस्तित्व-वास्तविकता सिद्ध होत नाही. हे देशपांडे यांच्या ज्ञानविषयक भूमिकेच्या विरुद्ध आहे का? ज्याच्या अस्तित्वाबद्दल कसलाही पुरावा नाही ते मानायचे नाही अशी तर त्यांची भूमिका आहे. यावर देशपांडे यांचे म्हणणे असे की व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय या निष्ठा आहेत. अशा मूलभूत निष्ठा मानल्याखेरीज नीतिविचार संभवत नाही. ह्या मूलभूत निष्ठांना नीतिशास्त्रात साध्य मूल्ये म्हणतात. नीतिशास्त्र हा मूल्यविचार आहे त्यात साध्यमूल्यांपासून सुरुवात करावी लागते. धर्माला विरोध का, याचे देशपांडे प्रणीत उत्तर असे की, धर्मात परलोकविचार अटळ आहे. तो वेगवेगळ्या धर्मांत वेगवेगळा आहे. त्यातला कोणताच प्रमाण मानणे शक्य नाही. 

नीतिविचार सर्व धर्मात आहे. तेवढा भाग तरी धर्माचा स्वीकार्य भाग नाही का, या प्रश्नावर त्यांचे मत असे की, जी गोष्ट बुद्धीच्या प्रामाण्याने स्वीकारता येते तिच्यासाठी शब्दप्रामाण्य, शास्त्रप्रामाण्य, श्रद्धा अशा परस्पर विसंगत आणि घातकी ठरू शकणाऱ्या कल्पना हव्यातच कशाला? सर्व धर्माचा समान भाग नीतिशास्त्राच्या कक्षेत गेल्यावर प्रत्येक धर्माचा वेगळेपणा-अस्मितादर्शक भाग जो उरतो तो नुसता अभिनिवेश आहे, अंधश्रद्धा आहे. अतएव सर्वथैव त्याज्य आहे. अशा मनोभूमिकेतून देशपांड्यांनी आजचा सुधारक काढला. 

नीतीचे सारे सार असमान लैंगिक नियमांत?

आजचा सुधारकच्या पहिल्या अंकापासून 'विवेकवाद' नावाची लेखमाला प्रा. देशपांड्यांनी चालविली. या विषयावर त्यांनी लिहिलेल्या 20-25 लेखांची एकत्र मांडणी केली तर विवेकवादावर एक उत्तम ग्रंथ सिद्ध होऊ शकतो. समाज हा व्यक्तिभिन्न असा नसतो. समाजाच्या नावावर व्यक्तिजीवन बरेचदा अकारण दुःखी केले जाते. नीति-अनीतीचा मुळापासून विचार केला पाहिजे. अशी सुधारकी विचारसरणी आहे. नीतीचे  सारे सार लैंगिक नियम पालनात आणि तेही स्त्रियांसाठी एक आणि पुरुषांसाठी दुसरे, असे आपण मानत आलो आहोत. हा भेदभाव, दुजाभाव आहे. वैवाहिक नीतिमत्तेसंबंधी परंपरामुक्त विचार रसेलच्या ‘मॅरिज अँड मॉरल्स' या खळबळजनक ग्रंथात आहेत. त्या ग्रंथाचा अनुवाद आजचा सुधारक मध्ये पहिली जवळजवळ दोन वर्षे दिला आहे. 

भगवद्गीतेत नीतिशास्त्र नाही; स्थितप्रज्ञाची कल्पना व्यवहार्य नाही; भक्तिमार्ग हे जीवनमूल्य असू शकत नाही; आत्मा परमात्मा पुनर्जन्म, मोक्ष, कर्मसिद्धांत या सर्व पोकळ कल्पना आहेत, अंधश्रद्धा आहेत म्हणून त्याज्य आहेत. हे आणि यांसारखे विचार देशपांडे विवेकवादाध्या मांडणीतून व्यक्तबीत आहेत. विचार धक्के  देणारे आहेत पण प्रतिपादन विनम्र आणि ठाम आहे. अहंकार दर्पोक्तीपासून दूर आहे. आपल्या निरीश्वरवादी भूमिकेला ‘धादांतवाद' म्हणायला त्यांना आवडते. आपले काम लोकाना अप्रिय आहे याची जाणीव आरंभापासूनच ठेवून मासिक निघत आहे. धार्मिक माणसाचे जसे व्रत असते तसे नियर्मिक माणसाचेही व्रत असू शकते असे म्हटले तर ‘आजचा सुधारक’ हे व्रत म्हणून देशपांडे चालवत आहेत. 

या व्रताचे काही आयाम असे. एक :- जाहिरातीद्वारे उत्पन्न मिळवायचे नाही. दोन :- सरकारी मदत, अनुदान मागायचे नाही. मासिकाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. य. दि. फडके मुख्य पाहुणे होते. ते तेव्हा साहित्य संस्कृतीमंडळाचे अध्यक्ष होते. पुढेही पुष्कळ दिवस होते. अनुदान मिळणे सुलभ होते. पण ते मागायचे नाही असा निर्धार देशपांडे यांनी पाळला. सुरुवातीची 4-5 वर्षे तूट येत होती ती त्यांनी निमूटपणे सोसली. आता मात्र मासिक आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाले आहे. एक खर्च नाही- लेखकांना मानधन नाही हा परिपाठ आजवर पाळला गेला. पण त्या बाबतीत नेम केलेला नाही. सोयीनुसार बदल संभवही आहे. 

आर्थिक तुट सोसायची म्हटली तरी मासिकाचे काम या वयात अंगावर घेणे मोठे आव्हान होते. त्रैमासिक काढावे किंवा निदान त्रैमासिक ठेवावे असा सल्ला अनुभवी मित्रांनी दिला होता. आपल्या पसंतीला उतरेल असे साहित्य महिन्याच्या महिन्याला मिळणे मिळविणे ही दिवसेंदिवस दुष्कर गोष्ट होत चालली आहे. शिवाय मजकूर बिनचूक छापून वेळेवर देणारे छापखाने वाटेवर पडलेले नाहीत. या बाबतीत मासिकाचे प्रकाशक व सल्लागार मोहनींचे फार साहाय्य झाले. श्री. दिवाकर मोहनींची जवळजवळ सगळी हयात मुद्रण व्यवसायात गेलेली असल्यामुळे हा भार त्यांनी हलका केला. मासिकाचा कागद, छपाई शुद्धलेखन ह्या बहिरंगाची सुरुवातीपासून प्रशंसा होत आली आहे. संपादक मंडळातील भरणा एका वैचारिक कुटुंबातला आहे. 

मुख्य संपादकांचे तत्त्वज्ञानाशी नाते वर सांगितलेच आहे. सहाय्यक संपादक सगळे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. आजी माजी प्राध्यापक आहेत. सल्लागारांमध्ये श्री. मोहनी शिवाय श्री. नंदा खरे, डॉ. पु.वि.खांडेकर, डॉ. भा.ल भोळे आदी विद्वान, व्यासंगी सिद्धहस्त लेखक आहेत. त्यामुळे असेल, मज़ुकराची म्हणावी तशी वाण पडली नाही. म्हणजे अल्पमुदतीत निपूर भरून काढणे शक्य झाले. डॉ. र. वि.पंडित यांचेही साहाय्य नाव घेण्यासारखे मिळाले आहे. मासिकाला मान्यता हळूहळू पण निश्चितपणे मिळत चालली आहे. ‘आजचा सुधारका’ला तिसऱ्या वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार मिळाला. (अडीच हजार रुपये) पु.ल.देशपांडे यांच्या निधीतून 5 सहस्त्र रुपये आणि मनमोकळे प्रोत्साहन मिळाले. 

जयवंत दळवी पहिल्या वर्षापासून विशिष्ट रक्कम पाठवीत, बोलबाला न करण्याच्या अटीवर सर्वात मोठा पुरस्कार महाराष्ट्र फौंडेशनचा रु. पन्नास हजार रुपयांचा मिळाला. ध्येयनिष्ठ वृत्तीने मराठी वैचारिक नियतकालिक चालविण्याबद्दल हा महाराष्ट्र फौंडेशनचा पहिल्या वर्षाचा 1994 चा पुरस्कार मिळाला. आर्थिक ददात मिटली मासिक यशस्वी करण्याची दोन गुपिते श्री. मुकुंदराव किर्लोस्कर यांना पैतृक वारसा म्हणून मिळालेली त्यांनी सांगितली होती. मासिक महिन्याच्या ठराविक तारखेला निघालेच पाहिजे. हे एक आणि अल्पस्वल्प का असेना, लेखकास मोबदला दिलाच पाहिजे हे दुसरे, आम्हांला दोन्ही गोष्टी मान्य पण अजून वळल्या नाहीत. 

तारीख चुकली असेल पण महिना चुकला नाही. मजकुरात पुरेशी विविधता नसणे हा एक आक्षेप आहे. लेखनसाहित्याचा पुरेसा पुरवठा नसला म्हणजे असे होते. वार्षिक वर्गणी पहिली पाच वर्षे, फक्त चाळीस होती. सुटा अंक 5 रुपये आणि वार्षिक वर्गाणी 50  रुपये व्यक्तीला आणि 70 रुपये संस्थेसाठी ठेवली आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 'तुमचे ते मासिक अजून चालू आहे का?' या प्रश्नाला 'हो' म्हणण्याचे समाधान मिळत असले तरी अजून कितीतरी वाट चालायची आहे याचे ओझे मनावर असतेच. हार मात्र मानायची नाही.

Tags:  डॉ. य. दि. फडके डॉ. भा.ल भोळे डॉ. पु.वि.खांडेकर श्री. नंदा खरे साप्ताहिक प्रा. दि. य. देशपांडे प्र. व.  कुळकर्णी Dr. Y.D. Fadake Dr. B.L. Bhole Dr. P.V. Khandekar Mrs. Nanda Khare Weekly Prof. D.Y. Deshapande P. V. Kulkarni weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके