डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

स्त्रीमुक्ती आणि स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती म्हणजे काय? स्त्रीविशिष्ट शक्ती की, आज स्त्रीजवळ आढळते ती शक्ती? विनोबाजींनी स्त्रीशक्ती म्हणून ज्यांचे वर्णन केले आहे ते मान्य केले, तर स्त्रीशक्तीला स्त्रीविशिष्ट शक्ती म्हणता येणार नाही. त्या सप्तशक्ती स्त्रीकडे असू शकतात, तशाच पुरुषाकडेही असू शकतात. स्त्री असली म्हणजे त्या शक्ती तिच्याजवळ असतील असेही नाही, विनोबाजींनी मात्र या शक्ती स्त्रीच योग्यप्रकारे संवर्धील असे प्रतिपादलेले आहे.

 

स्त्रीजीवनविषयक प्रश्नांच्या चर्चेत प्रामुख्याने दोन कल्पनांचा विस्तार आढळतो. एक स्त्रीमुक्ती आणि दुसरी स्त्रीशक्ती. स्त्रीमुक्तीची कल्पना जगभर पसरलेली आहे. स्त्रीशक्तीची कल्पना मात्र खास भारतीय आहे. भारतीय समाजाची वाटचाल दोन दिशांनी होत आहे, असे म्हणून एका प्रख्यात समाजशास्त्रज्ञाने या दोन वाटांना संस्कृतीकरण आणि पाश्चात्यीकरण अशी नावे दिली आहेत. या परिभाषेत बोलायचे, तर ‘स्त्रीशक्ती’ संस्कृतीकरणाच्या वाटेला उभी आहे, तर ‘स्त्रीमुक्ती' पाश्चात्यीकरणाच्या वाटेला उभी आहे असे म्हणता येईल. 

सप्तशक्ती स्त्रियांचे वैशिष्ट्य नव्हे 

स्त्रीशक्ती म्हणजे काय? स्त्रीविशिष्ट शक्ती की, आज स्त्रीजवळ आढळते ती शक्ती? विनोबाजींनी स्त्रीशक्ती म्हणून ज्यांचे वर्णन केले आहे ते मान्य केले, तर स्त्रीशक्तीला स्त्रीविशिष्ट शक्ती म्हणता येणार नाही. त्या सप्तशक्ती स्त्रीकडे असू शकतात, तशाच पुरुषाकडेही असू शकतात. स्त्री असली म्हणजे त्या शक्ती तिच्याजवळ असतील असेही नाही, विनोबाजींनी मात्र या शक्ती स्त्रीच योग्यप्रकारे संवर्धील असे प्रतिपादलेले आहे.

उपजत की संस्कारजन्य 

आज स्त्रीचे व्यक्तिमत्व पुरुषापेक्षा वेगळे दिसते, प्रत्ययाला येते, आणि ते मिटता मिटणार नाही, असेही वाटते. पण मार्गारेट मीडसारख्या समाजशास्त्रज्ञेने स्त्रीचे स्त्रीत्व जन्मजात नाही. संस्कारजन्य आहे, असे प्रमाणे देऊन मांडले आहे. आणि स्त्री, पुरुषांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला तर स्त्री, पुरुषांतील भेद हा मौलिक नाही, तर केवळ तपशीलात्मक असेच म्हणावे लागते.

आमचे पंडित आणि उद्धारकर्ते पुरुष 

परदेशात स्त्री, दास्य, विमोचनाची चळवळ स्त्रियांनी जन्माला घातली, स्त्रियांनी संवर्धली आणि स्त्रियाच तिच्या विरोधातही उभ्या राहिल्या. आपल्याकडे मात्र स्त्रीबद्दल बोलायला काय किंवा स्त्रीच्या प्रगतीच्या दृष्टीने एखादा कार्यक्रम राबवायला काय, पुरुषच पुढे येतात. विनोबा, दादा धर्माधिकारी नाही तर लोहिया हे आमचे स्त्रीविषयक पंडित आणि कर्वे नाहीतर राजा राममोहन रॉय हे आमचे उद्धारकर्ते! पंडिता रमाबाईंसारखे अपवाद सोडले, तर आमच्या सर्व स्त्रीपुढारी पुरुषांकडून मार्गदर्शन घेणाऱ्या, त्यांच्या उदार आश्रयाने आपले कार्य चालवणाऱ्या. आमच्यापैकी काहीजणींना, विशेषतः स्त्रीमुक्तीच्या कल्पनांनी भारलेल्यांना, पुरुषांच्या या लूडबुडीची भारी चीड येते. यांना आमच्याबद्दल बोलायचे कारण काय? आणि अधिकार काय? असा प्रश्न त्यामुळे विचारला जातो.

स्त्री ही प्रथम मानव 

मला वाटते स्त्रीजीवनाचे प्रश्न जर योग्य दृष्टिकोनातून तपासायचे असतील, तर प्रथमतः हे मानावे लागेल की, हे सर्व मुलतः मानवी प्रश्न आहेत. स्त्री प्रथम मानव आणि मग स्त्री आहे. मानवाच्या अधिकारांचा, जबाबदाऱ्यांचा आणि जीवनसाफल्याचा जो काही विचार झाला असेल त्याला अनुसरूनच स्त्रीजीवनाच्या समस्यांबद्दल बोलावे लागेल. 

पुरुषांची लुडबूड 

दुसरे असे की, स्त्रीचे काय होते यावर पुरुषाचे काय होते हे अवलंबून आहे. कित्येकदा स्त्री ही पुरुषाच्या मार्गातील धोंड आहे, असे म्हटले जाते. अनेक दृष्टींनी हे सत्य आहे. स्त्रीचे जीवन परिपूर्ण वा सफल न झाले, तर समाजातील पुरुषवर्गाचेही होऊ शकत नाही. या दोन्ही दृष्टींनी पुरुषांचे या विषयात लुडबुडणे अगदी समर्थनीय आहे. पण त्यांनी मार्गदर्शकाची वा उपदेशकाची भूमिका घेणे कितपत योग्य आहे? स्त्रीच्या घडणीत ज्याप्रमाणे काही घोडचुका आहेत, त्याचप्रमाणे पुरुषाच्याही घडणीत घोडचुका आहेत. स्त्री बद्ध आहे आणि पुरुष काय मुक्त आहे? कोणत्या ना कोणत्या स्वरूपात स्त्रीला तिच्या पारंपारिक भूमिकेचा स्वीकार करायला लावण्याची जे भूमिका घेतात, ते अलिप्तपणाने स्त्रीला सल्ला देतात, हे काहीतरी समजू शकते. पण स्त्रीजीवनात मुलभूत बदल मागणाऱ्या पुरुषांनीही, पुरुषजीवनाचा संदर्भ न घेता, स्त्रीविषयी बोललेले ऐकले, की आश्चर्य वाटते!

पाल्हाळमागची भूमिका 

स्त्रीशक्तीबद्दल बोलणारे विचारवंत स्त्रीचा, तिच्या पारंपरिक भूमिकेत आणि आदर्शात, विचार करीत असतात, असे मला वाटते. त्यांनी कितीही पाल्हाळ लावला, तरी शेवटी स्त्रीने परंपरागत भूमिका सोडू नये, हेच त्यात मुख्य सूत्र असते. बहुसंख्य स्त्रियांनी आमच्यापेक्षा वेगळा जीवनप्रकार स्वीकारला, तर कुटुंबव्यवस्था कोसळून समाजजीवन विस्कळीत होईलच, पण माणसातील माणुसकीचा परिपोषही योग्य रीतीने होऊ शकणार नाही, असे यापैकी बहुतेक विचारवंतांना वाटत असते. व्यापक समाजहिताच्या दृष्टीतून स्त्रीजीवनाचा आत्मसमर्पणाचा आदर्श बदलू नये, अशा निर्णयाप्रत ते आलेले असतात. माझ्या मते स्त्रीशक्तीबद्दल बोलणारी माणसे स्त्रीजीवनाच्या समस्यांचा विचार प्रमुख मानीत नाहीत, सार्वजनिक हिताचा विचार त्यात प्रमुख असतो.

स्त्रीजीवनाच्या दृष्टीने पहायचे तर प्रश्न वेगळा मांडावा लागेल. आत्मसमर्पण आणि त्याचे सर्व अनुषंगिक गुण विकासाला पोषक आहेत का? आत्मसमर्पणाच्या आदर्शाला सर्वात जास्त विरोध काही व्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांकडून होत असतो. कारण कित्येकदा स्वार्थ आणि व्यक्तिविकास यात गल्लत होते. स्त्रीस्वातंत्र्यवाद्यांच्या एका गटाचे असेच झालेले आढळते. विकासासाठी स्वातंत्र्य हवे, याचा अर्थ बंधने नकोत. तेव्हा मग कौटुंबित बंधनेही नकोत, दुसऱ्या माणसाचे, बंधन नको, त्याने आमच्या स्वातंत्र्याचा ऱ्हास होतो, अशा निष्कर्षाप्रत ही मंडळी येतात. पण शैक्षणिक मानसशास्त्राच्या मते, माणसांच्या बंधनांचे आणि व्यक्तिविकासाचे असे हाडवैर नाही. बंधने ही विकासकारक बनू शकतात. इतकेच नाही, तर अशा बंधनाशिवाय माणुसकीचा विकास कठीण होऊन बसतो.

बंधने हवीत, पण लादलेली नको

मात्र बंधनाची दोन पथ्ये आहेत. एक म्हणजे बंधने कोणत्याही अर्थाने लादलेली नसावीत. कोणत्याही माणसाने वा माणसाच्या गटाने ती लादलेली नसावीत. एवढेच नाही, तर एकंदरीत सामाजिक परिस्थितीने वा भौतिक परिस्थितीनेही ती लादलेली नसावीत. दुसरे असे की, बंधन हे व्यवहारात पारस्परिक असावे. उदा. नवऱ्याचे बंधन पाळल्याने बायकोचा विकास होऊ शकत नाही. असली बंधने माणसाला निस्तेज बनवतात. 

स्वागतार्ह सल्ला 

बंधने लादलेली नसावीत हे जर मान्य केले, तर आपली पारंपरिक भूमिका सोडण्याची सूट असली पाहिजे. त्या दृष्टीने दादा धर्माधिकारी यांचा ‘सौभाग्यकांक्षा सोडा’ हा सल्ला स्वागतार्ह वाटतो. कारण त्यात स्त्रीला एक नवीन विकल्प मिळतो. पण या नव्या विकल्पाचा समाज आग्रह धरणार असेल, तर तोही लादलेला जीवनप्रकार होईल. विवाह न करणे हे प्रतिष्ठित झाले, तर विवाहाची प्रतिष्ठा वाढते. अविवाहित मातृत्वाला समाजात सूट असली, तर संसारी मातेची प्रतिष्ठा वाढते. आणि अशा संसारात स्वेच्छेने केलेल्या आत्मसमर्पणातूनही व्यक्तीचे जीवन सफल बनू शकते. 

कुढणे आणि त्रागा 

मग तथाकथित आत्मसमर्पणाभोवती स्वत:चे जीवन उभारणारी आजची स्त्री सफल जीवन का जगू शकत नाही? बहुसंख्य स्त्रिया घरीदारी दुसऱ्यासाठी राबतात. स्वत:चे जीवन, स्वत:च्या इच्छा, अशा त्यांना उरलेल्या दिसत नाहीत. तरीपण एक कुढणारे व त्रागा करणारे अपरिपक्व व्यक्तिमत्व त्यातून निर्माण होते. कारण या स्त्रियांनी केलेल्या स्वार्थत्याग त्यांच्यावर लादलेला असतो. आणि ज्यांना त्या त्यागाचा लाभ मिळतो, त्या व्यक्ती व एकंदर समाज त्या त्यागाची बुज ठेवत नाही. पण हे सहजासहजी बदलणार नाही. समाज कितीही उदार झाला, तरी सामाजिक नियंत्रणे शून्यवत् होणे कठीण. शिवाय स्वेच्छेने एखादे बंधन स्वीकारायचे याचा अर्थ माणसाला स्वेच्छा स्पष्टपणे कळली पाहिजे. पण, माणसाची स्वत:ला जाणण्याची ताकद फार तोकडी असते. आणि स्वत:ला फसवण्याची ताकद अमर्याद असते!

आत्मसमर्पण आणि साफल्य 

आत्मसमर्पणाचा मार्ग हा अशा रीतीने व्यवहार्य नाही. मानवजातीत संत, महात्मे, जसे थोडेच निर्माण होऊ शकतात. तसेच आत्मसमर्पणातून साफल्य फारच थोड्या स्त्रियांना साधेल. इतरांनी आत्मसमर्थनाला गुन्हा मानण्याची प्रवृत्ती सोडली पाहिजे आणि स्वातंत्र्य आणि समता या दोन निकषांवर माणसांवरची सामाजिक बंधने सतत तपासत राहण्याचा आग्रह धरला पाहिजे. त्यातूनच आपल्याला इष्ट असा विकास घडून येईल. 

न तपासलेले निष्कर्ष 

येथे आपण स्त्रीमुक्तीवाद्यांकडे येऊन पोहचतो. ‘जाचक बंधनापासून स्त्रियांना मुक्त करा’ हा त्यांचा उद्घोष आहे. पण सुरुवातीपासूनच त्यांच्या विचारात काही चुकीची गृहीतकृत्ये रिवतात असे मला वाटते. मुक्ती या शब्दात एक सूचन आहे. ते म्हणजे स्त्रीला कोणीतरी बंधनात टाकले आहे. हे केवळ सुचन असल्याने या गृहीतकृत्याची शहानिशा होत नाही. आणि पुढे स्त्रीला पुरुषाने बंधनात टाकले आहे. असाही तपासून न घेतलेला निष्कर्ष काढला जातो. स्त्रीला खरेच पुरुषांनी बंधनात टाकले आहे का? मला वाटते स्त्रीला पुरुषाने बंधनात टाकले आहे, असे म्हणणे एकतर पूर्णार्थाने सत्य नाही, शिवाय स्त्रीविषयक विचाराला चुकीची दिशा देणारे आहे. केव्हाही कोणतीही व्यक्ती वा सामाजिक गट शोषित असतो, दलित असतो, पीडित असतो, तेव्हा ती घटना केवळ बाह्य कारणाने घडलेली नसते. इतरांच्या दुष्टपणाने घडलेली नसते. शोषित स्वत:च्या अंगभूत दुबळेपणाने, दोषाने, प्रगतीविन्मुखतेने, शोषकाच्या निर्मितीला कारणीभूत आणि साह्यभूत होत असतो, स्त्रीला पुरुषाने दासी बनवले आहे, हे म्हणणे त्यामुळे पूर्णत: खरे नाही. केवळ अनिच्छेने, भीतीने, दडपणाने वा अज्ञानाने स्त्री पुरुषाची दासी बनते असे नाही. अनेकवेळा स्वार्थभावनेने जीवनातील आरामाच्या लालसेनेही ती दासी बनलेली दिसते. दासी, स्वामी या नात्याची जोपासना स्त्री, पुरुष दोघांनी मिळून केली आहे आणि मग, “मिया- बिवी राजी तो क्या करेगा काजी?” 

वेगळ्या घाटाचा संघर्ष 

सध्याच्या सामाजिक भूमिकांमध्ये जेवढे स्त्रीजीवनाचे नुकसान आहे, तेवढेच पुरुष जीवनाचेही नुकसान आहे. दोघेही परस्परांच्या प्रगतीपथावरील धोंड बनले आहेत. आपल्या समाजात अनेक द्वंदे आहेत. मालक,मजूर द्वंद आहे, ब्राम्हण, ब्राम्हणेतर द्वंद आहे. ग्रामीण, शहरी, व्यापारी, ग्राहक असेही आणखी आखाडे आहेत. स्त्री, पुरुष द्वंद हे त्या मालिकेत बसण्यासारखे नाही, कारण स्त्री व पुरुष एकमेकांशी व्यक्तिगत संबंध बांधून जीवन उभारत असतात. कारखानदार मालक इत्यादींप्रमाणे केवळ सांघिक संबंध बांधून राहात नाहीत. स्त्री, पुरुष समतेसाठी उभारायचा संघर्ष हा वर्णसंघर्ष, वर्गसंघर्ष इत्यादींपेक्षा वेगळ्या घाटाचा असेल याचे भान ठेवले गेले पाहिजे. 

संदर्भ हरवू नये 

कोणतीही सामाजिक समस्या समग्र सामाजिक जीवनाच्या संदर्भात मांडून पाहिल्याने अधिक चांगली समजते, यात शंका नाही, पण स्त्रीजीवनविषयक समस्येबाबत हे अधिकच खरे आहे. पुरुषाला स्त्रीविरोधी गट, अन्यायकर्ता गट वा शोषक गट मानल्याने आपण या संदर्भालाच मुकतो आणि स्त्रीदास्य विमोचनाच्या चळवळीला ‘आणखी एक समता संगर' मानल्याने चूकीला वाटेलाही लागतो, असे मला वाटते. 

Tags: स्त्रीमुक्ती स्त्रीशक्ती प्रभा श्रीनिवास स्त्रीमुक्ती आणि स्त्रीशक्ती #Weekly sadhana Streemukti Stree Shakti Prabha Srinivas Streemukti and Stree Shakti weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके