डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजवर माणूसच बुद्धिमान असं समजलं जायचं. पण आता माणसाच्या जोडीला तंत्रज्ञान निर्मित बुद्धिमत्ता अस्तित्वात आली आहे. सबंध मानवी इतिहासातली ही एक अपूर्व घटना आहे. ती सांगितलेली ‘गोष्ट’ नाही. ती दिसणारी गोष्ट आहे. धर्म, विचारधारा आदी सांगितलेल्या ‘गोष्टी’वरचं हरारीचं भाष्य फार भेदक आहे. ते वस्तूच्या, विचारधारेच्या मूळ रूपापर्यंत जाणारं आहे. डॉ. हमीद यांनी त्याचा आवर्जून उल्लेख आपल्या लेखात केला आहे. हरारी म्हणतात, ‘... कुठलाही धर्म किंवा विचारधारा घ्या त्याच्या मूळ उद्देशाला व रूपाला छेद देणारी एक भ्रष्ट सावली त्याच्यासोबतच निर्माण होत असते. याचं भान ठेवलं तरच वर्तमान जगाला आणि येणाऱ्या कालखंडाला चांगलं समजून घेता येईल.’

‘साप्ताहिक साधना’च्या एप्रिल 21 चा अंक हाती आला. जागतिक पुस्तक दिनानिमित्त तो सिद्ध केलेला आहे. ‘मला प्रभावित करून गेलेले पुस्तक’ या विषयीचा आहे. तो केवळ साहित्याला वाहिलेला नाही. विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश त्यात केलेला आहे. हे सगळे नामवंत लेखक आहेत. ज्या पुस्तकांनी त्यांना प्रभावित केलेले आहे, ती पुस्तके आशयघन आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी जे गांभीर्य आणि कल्पकता लागते, ती त्यांच्याकडे आहे.

अशा लेखकांची निवड करून प्रस्तुत संपादकांनी त्यांना जणू पुनर्वाचन, पुनर्लेखन प्रक्रियेत ओढलं. प्रभावित पुस्तकांवर आपलं नवचिंतन अपेक्षित असल्याचं सूचित केलं. अगदी तसाच त्यांना प्रतिसादही मिळाला. आणि अंक हाती आला. अनेक वाचकांनी यातील काही पुस्तकं वाचलेली असणार. काहींना अपरिचित असणार. संकेतनिष्ठ वाचकांना काही साहित्यबाह्य वाटण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट निश्चित, की ती समाजसन्मुख आहेत. जीवनसन्मुख आहेत आणि त्यांच्या गाभ्याशी एक थॉट आहे, जो वाचकांच्या सजीव संज्ञेची जणू वाट पाहत आहे. कारण संहिता आणि वाचकांची संज्ञा यांची घुसळण झाल्याशिवाय भवतालात्म नव्यानं भावणं कठीण असतं; पण अशक्य नसतं. त्यासाठी संहिता आणि संज्ञा यांच्यामधील सह-संबंधांचं सातत्य जरुरीचं आहे. त्यातूनच जीवनविषयक भूमिका आकार घेत असते. कधी निर्मिती प्रक्रियेत वाचक ओढला जातो, तर कधी त्याच्या मन नावाच्या संज्ञेला विज्ञाननिष्ठ बैठक लाभते. धर्म आणि विचारसरणीतील ताठरपणा कमी होत जातो, पूर्वग्रहांना तडा जातो, संवेदनाचं नूतनीकरण होत जातं. प्रस्तुत नामवंत लेखकांनी त्यांच्यात होत गेलेलं ट्रान्स्फर्मेशन अनुभवलेलं असणार.

आणि संपादकांनी हा विशेषांक सिद्ध करून ज्या रसिक वाचकांची तहान भागविली आहे, त्या वाचकांपैकी मी एक आहे. तशी तोंडी प्रतिक्रिया दिली म्हणून या विशेषांकावर मी अभिप्राय लिहून पाठवावा, असं संपादकांनी सूचित केलं. मी तो वाचत गेलो, गुंतत गेलो. सर्वसाधारणपणे अभिप्राय गोळा-बेरीज स्वरूप असतात. असं करणं मला पटत नव्हतं. म्हणून मी फक्त तीन लेखांची निवड केली. (शितावरून भाताची परीक्षा व्हावी हा माझा उद्देश)

गिरीश कुबेर यांना एर्गिन यांच्या ‘द प्राईस’ या पुस्तकानं प्रभावित केलं. कुबेरांचा वाचनाचा आवाका खूप मोठा आहे. त्यांची संवेदनशीलता किती संस्कारित आहे, हे या लेखातून जाणवतं. ते म्हणतात, ‘पण एका पुस्तकानं आयुष्यात खरोखरच एक कवाड उघडलं आणि ग्रॅहम ग्रीन म्हणतात, त्याप्रमाणं भविष्य त्यातून आत आलं.’ त्याचं नाव ‘द प्राईस’. ग्रॅहम ग्रीन यांच्या शब्दांत एक अर्थपूर्ण संदिग्धता आहे. ती वाचकांच्या ऊर्जाक्षेत्राला जाग आणणारी आहे, असं वाटतं. जीवनाच्या आकलन प्रक्रियेत कुबेरांची संज्ञा आणि ते पुस्तक जणू विकसनशील राहिले, परस्परांना श्रीमंत करत गेले.

हे पुस्तक खनिज तेलाविषयी आहे. ते 900 पानी आहे. पस्तीस वर्षांपासून एर्गिन यांचा तेल हा चिंतनाचा विषय आहे. ‘द प्राईस’च्या अनेक आवृत्या निघाल्या. रूपकाच्या भाषेत बोलायचं, तर तेल विहीर म्हणजे जमिनीची सर्जक नेणीव. एर्गिन यांना तिनं झपाटलं. कारण तीमधील द्रव्यानं त्यांच्या नेणिवेमधील ऊर्जास्रोत त्यांना दिसू लागले, ते शब्दरूप घेऊ लागले आणि ‘द प्राईस’ मधील शब्दरूपानं गिरीश कुबेरांची नेणीव अन्‌फोल्ड होत गेली. तीमधील सर्जक क्षमतेनं चार पुस्तकांना जन्माला घातलं. दीड-दोनशे वर्षांमधील राजकारण, अर्थकारण आदी विषयांकडे स्वतंत्र नजरेनं कसं पाहावं, हे त्यांच्या लक्षात आलं. ऊर्जा मग ती जमिनीच्या आतून येणारी असो वा लेखकाच्या सर्जक संज्ञेच्या आतून येणारी असो, त्या दोहोंमध्ये एक जैव अनुबंध असतो आणि तो अनुबंध संज्ञेची दारं उघडत असतो. हा मूलगामी प्रभाव कुबेरांनी मनस्वीपणे अनुभवलेला दिसतो, असं वाचकाला जाणवत राहतं.

डॉ. आनंद नाडकर्णी यांनी इव्हान एलिच यांच्या ‘मेडिकल नेमेसिस’ या पुस्तकाच्या प्रभावाविषयीचा लेख लिहिला आहे. तो अनेक गोष्टीविषयी नव्यानं विचार करायला लावणारा आहे. तो विद्रोही संवेदनेचं महत्त्व सांगणारा आहे. इव्हान एलिच हा धर्मगुरू होते. चर्च या यंत्रणेविषयी ते असमाधानी होते. व्यवस्था मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो, ती सत्ताभिमुख होत असते; परिणामी त्यात विचारप्रक्रिया साकळत जाते, हे एलिच यांनी अनुभवलं. धर्म, ज्ञान, विज्ञान या संज्ञांमध्ये आशयघन चैतन्य असतं. त्या जीवनाला समृद्ध करत असतात. एलिच यांच्या लक्षात आलं की, हे चैतन्य विविध संस्था यंत्रणांमध्ये बद्ध होत आहे, तेव्हा त्यांनी धर्मगुरू पदाचा राजीनामा दिला आणि स्वत:चं विद्रोही संवेदन अधोरेखित केलं. याचं दृश्यरूप Deschooling Society  मध्ये प्रतिबिंबित झालं आहे. शिक्षण संस्थांमधून ज्ञाननिर्मिती आणि ज्ञान संप्रेषण होत नसेल, तर त्या यंत्रणेला वि-रचित केलं पाहिजे (Deconstruct), कारण ती विरचित केल्याशिवाय ज्ञानाचे स्रोत सापडत नसतात, यावर एलिच यांचा विश्वास होता. म्हणून ते धर्मसत्ता, राजसत्ता यावर मुक्त चिंतन करू शकत होते. या दोन यंत्रणांनी सामान्य माणसांचं शरीर आणि मन स्वत:च्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आता वैद्यकसत्ता पाय पसरवीत आहे. या सत्तेला शरीर हे एक केवळ यंत्र असं वाटत आलेलं आहे. यंत्रात बिघाड झाला की, यंत्रज्ञ-डॉक्टर हा एक महत्त्चाचा घटक ठरतो. कारण तो आजारावर उपचार करतो, औषधी देतो. एकदा औषधीच्या अधीन शरीर गेलं की वैद्यक व्यवस्था आकार घेऊ लागते. त्यातूनच  औद्योगिकरणाला सुरुवात होते आणि एक वैद्यकसत्ता अस्तित्वात येते आणि ती वेगानं पसरू लागते. मन आणि शरीर यांच्यातील दरी वाढू लागते. या दरीचं भान एलिच यांना अस्वस्थ करू लागलं आणि त्यातून ‘मेडिकल नेमेसिस’चा जन्म झाला. डॉ.आनंद नाडकर्णी यांनी आपल्या लेखात नेमेसिसचे दोन-तीन अर्थ दिलेले आहेत. अजून एका अर्थाची भर घालता यावी. एलिच धर्मगुरू होते. त्यांच्या नितळ धार्मिक संवेदनेला एका ग्रीक मिथकाची आठवण स्पर्शून गेली असावी, असं वाटतं. नेमेसिस ही विनाशाची देवता आहे. ती विनाशाचं सूचन करणारी आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रानं बायोमेडिकल- आजारकेंद्री दृष्टी स्वीकारली, हे एलिच यांना विनाशसूचक वाटतं. याचं प्रत्यंतर वैद्यकीकरणात होणार, हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. औद्योगिकरण प्रक्रियेतच नेमेसिस नावाची देवता स्वत:ला पाहात असते. आणि आजाराच्या उपचाराशी स्वत:ला सीमित करून घेते.

एलिच यांचं हे द्रष्टेपण डॉ. नाडकर्णी यांना मन:पूर्वकतेनं भावलेलं दिसतं. कारण या द्रष्टेपणाच्या केंद्रस्थानी शरीर-मन-समाज-पर्यावरणाची अभिन्नता काम करत असते. ते द्रष्टेपण नाडकर्णी यांना एक सर्जक नजर देणारं ठरलं. वैचारिक आणि ललित स्वरूपाचं लेखन त्यांच्याकडून झालं. मनाच्या आरोग्याचा ध्यास त्यांनी घेतला. प्रस्तुत लेखाच्या शेवटी ते म्हणतात, ‘औपचारिक ओळखीसाठी पूर्वी मनोविकारतज्ज्ञ होता, नंतर मनोविकासतज्ज्ञ झाला, पण activist पणा काही लोपला नाही. हे सारं ऋण त्या एका पुस्तकाचं.’ साधनाच्या संपादकांना प्रस्तुत अंकाच्या बांधणीत हेच अपेक्षित असावे.

अजून एक आवर्जून वाचण्यासारखा लेख म्हणजे ‘एकविसाव्या शतकासाठी एकवीस धडे’. याचे लेखक आहेत युवाल नोआ हरारी. डॉ.हमीद दाभोलकरांना प्रभावित करणारं हे पुस्तक.

डॉ.हमीद दाभोलकर हे डोळस विचारवंतांच्या परिवारातलं एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी वर्तमान वास्तवाच्या प्रवाहात पाय रोवून जगणं अनुभवलेलं आहे. त्या अनुभवातून आणि वैचारिक मंथनातून त्यांच्या भूमिकेनं आकार घेतलेला दिसतो. विविध धर्म आणि विचारसरणी यांना जीवनाच्या संदर्भात वस्तुनिष्ठपणे समजून घेतलेलं आहे. भारतीय आणि पक्षीय राजकारण संस्था- व्यवस्थांमधील सत्ताकांक्षा यांच्यामधून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना सकारात्मक दृष्टीनं त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांच्यामधील गुंतागुंत अनुभवलेली आहे. धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद, विज्ञाननिष्ठा या संज्ञांमधून निर्माण होणाऱ्या संवेदनेला जपलेलं अहे. तरी त्यांचे मन अस्वस्थ आहे, कारण वरील संज्ञांची पिछेहाट होते आहे. जणू विचारांचा विस्तार थांबला आहे. डॉ. हमीदमधला विचारवंत ‘नव्या करकरीत दृष्टिकोनाची वाट पाहतो आहे.’ अशा अस्वस्थतेच्या  टप्प्यावर हरारी यांच्या ‘एकविसाव्या शतकासाठी एकवीस धडे’ हे पुस्तक वाचायला मिळालं. ते पुस्तक वर्तमान जटील वास्तवातील प्रश्नांची असांकेतिक मांडणी करणारं आहे. याचा खालील एका वाक्यातून वाचकाला प्रत्यय येतो. ‘धर्माचं मोठेपण, समाजवाद, साम्यवाद अथवा भांडवलशाही यांचे श्रेष्ठत्व किंवा मानवी अधिकार अशा कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाहीत, या सगळ्या आपण एकमेकांना शतकानुशतके सांगितलेल्या गोष्टी आहेत.’

डॉ. हमीद दाभोलकरांच्या काही धारणांना, प्रमेयांना या पुस्तकानं हदरवून टाकलं. त्यांनी हे खुल्या मनानं मान्य केलं आहे आणि हरारी यांच्या पुस्तकातील असांकेतिक मांडणी गंभीरपणे समजून घेतली आाहे आणि ती वाचकांसमोर ठेवली आहे. उदाहरणार्थ- समाज मानसिकतेनं ‘अंतिम सत्याचं अस्तित्व’ गृहीत धरलेलं असतं. काही प्रज्ञा/प्रतिभावंत, विचारवंत त्याचा नव्यानं वेध घेऊ पाहतात. त्यांच्यासाठी ते एक श्रेयस आहे. ते डोळ्याला दिसत नाही, पण त्यातली प्रेरक शक्ती जाणिवेचा भाग झालेली असते. अशा काही महत्त्वाच्या प्रमेयासोबत समाज वाटचाल करत असतो आणि ते प्रमेय आव्हानातीत आहे, असं समजलं जातं. पण एखादा हरारीसारखा विज्ञाननिष्ठ प्रतिभावंत शाश्वत वाटणाऱ्या प्रमेय/गृहीतकांना आपल्या लेखनातून वि-रचित (deconstruct)  करतो आणि त्यांना ‘गोष्टी’ म्हणून संबोधतो, तेव्हा हमीदसारख्या गंभीर लेखकाला आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. कारण अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करताना त्यांना निखळ सत्य आणि निखळ ज्ञान अधोरेखित करावं लागलेलं आहे आणि मिथक या संज्ञेचा उल्लेखही टाळावा लागलेला आहे. आणि हरारींनी मात्र आपल्या विश्लेषणात्मक मांडणीत असं म्हटलं आहे की, मिथकं आशयघन असतात. मिथकांतून अनेकदा ऐतिहासिक घटनांचा अर्थ लागत असतो. ही संज्ञा मानवी विश्वाच्या अनुभूतीची गोष्ट सांगत असते. या संदर्भात हरारी म्हणतात, ‘मानव ही प्रजाती मिथक तयार करणारी आहे. छोट्या टोळ्यांच्या मर्यादेपलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणावर एकमेकाशी सहकार्य करण्यासाठी मानवी समूहाला मिथकांवर विश्वास ठेवणे, ही क्षमता उपयोगी पडली आहे.’

सत्याचा शोध आणि मिथक या दोहोत अंतर्विरोध आहे, असं डॉ. हमीद यांना वाटत होतं. पण हरारी यांच्या विश्लेषणात विरोधाभासांना समन्वित करणारी क्षमता लक्षणीय असल्याचा प्रत्यय त्यांना आला आणि त्यांच्या ‘अंतिम सत्याचा शोध’ या प्रमेयाला तडा गेला. पण त्याचा एक फायदा झाला. तो असा की, हरारी यांची दृष्टी आणि त्यांच्या द्रष्टेपणातील जोरकसपण अनुभवता आलं. आणि सत्य व मिथक यांच्या अनुबंधातील पदर उलगडता आले. काही धर्मांच्या व विचारधारांचा एक दावा असतो, की अंतिम सत्य त्यांना कळलं आहे. या दाव्यातील फोलपण हरारींनी मिथकांचं विश्लेषण करत सिद्ध केलं आहे. मिथक ही एक विलक्षण गोष्ट आहे. ती विश्वाच्या आणि मानवी अनुभूतीच्या गाभ्याला आपल्या कवेत घेऊ पाहणारी आहे. तिच्यामधल्या या क्षमतांचं भान सतत ठेवलं पाहिजे. आणि विज्ञाननिष्ठ संवेदनेची मौलिकताही राखली पाहिजे. नसता विज्ञानाचा धर्म व्हायला वेळ लागणार नाही, हे प्रभावीपणे हरारींनी मांडलं आहे, आणि या मांडणीचा अर्थाविष्कार डॉ. हमीद यांनी प्रवाहीपणे आपल्या लेखात केला आहे.

या लेखाचा उत्तरार्ध वाचकाला गंभीरपणे चिंतनास प्रवृत्त करणारा आहे. कारण त्यात आय.टी.च्या नंतरच्या वास्तवाचा परामर्ष घेतलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञानानं जीवनवास्तव ढवळून काढलं.

आजवर माणूसच बुद्धिमान असं समजलं जायचं. पण आता माणसाच्या जोडीला तंत्रज्ञान निर्मित बुद्धिमत्ता अस्तित्वात आली आहे. सबंध मानवी इतिहासातली ही एक अपूर्व घटना आहे. ती सांगितलेली ‘गोष्ट’ नाही. ती दिसणारी गोष्ट आहे. धर्म, विचारधारा आदी सांगितलेल्या ‘गोष्टी’वरचं हरारीचं भाष्य फार भेदक आहे. ते वस्तूच्या, विचारधारेच्या मूळ रूपापर्यंत जाणारं आहे. डॉ. हमीद यांनी त्याचा आवर्जून उल्लेख आपल्या लेखात केला आहे. हरारी म्हणतात, ‘... कुठलाही धर्म किंवा विचारधारा घ्या त्याच्या मूळ उद्देशाला व रूपाला छेद देणारी एक भ्रष्ट सावली त्याच्यासोबतच निर्माण होत असते. याचं भान ठेवलं तरच वर्तमान जगाला आणि येणाऱ्या कालखंडाला चांगलं समजून घेता येईल.’

हरारींच्या मते, जैवतंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे माध्यम अस्तित्वात येताना ती भ्रष्ट सावली आलेली आहे आणि तिचं असणं अधिक गंभीर स्वरूपाचं आहे. कारण तंत्रज्ञानाच्या बुद्धिमत्तेचा वेग माणसाच्या बुद्धिमत्तेच्या वेगापेक्षा जास्त असणार, हे फेसबुक आणि गुगलच्या वापरातून दिसते आहे. हा वापर जेवढा जास्त होईल, तेवढी अल्गोऱ्हिदमची कक्षा रुंदावत जाईल. ही लय म्हणजे एक आभासी मूल्यांकनाची लय वा आभासी विचार प्रक्रियेची गणितात्म लय- ही लय माणसाच्या ‘स्व’च्या शोधप्रक्रियेवर कुरघोडी केल्याशिवाय राहणार नाही. ही मानवी ‘स्व’ची शोकांतिका असेल, असं हरारींना वाटतं, हे त्यांनी आपल्या पुस्तकात अधोरेखित केलं आहे. या शोकांतिकेतून बाहेर पडायचं असेल, तर प्रत्येकानं स्वत:चा मेंदू स्वत:च्या ताब्यात ठेवला पाहिजे. त्याला अल्गोऱ्हिदमची लागण होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. स्वमधल्या सर्जकशक्तीला जपलं पाहिजे, तरच आपल्याला ‘आजच्या वास्तवाचे आणि भविष्यातील शक्यतांचे आकलन करता येईल’, असं हरारींचं प्रतिपादन आहे.

डॉ. हमीद यांनी प्रस्तुत पुस्तकाचं सूक्ष्म वाचन केलेलं वाचकाला जाणवतं. या वाचनक्रियेत त्यांचे पूर्वग्रह गळून पडले. त्यांचं संवेदन निरभ्र होत गेलं. हरारीचं तीनही काळावरचं दार्शनिक भाष्य त्यांना अनुभवता आलं. हाच ‘एकविसाव्या शतकाचे एकवीस धडे’ या पुस्तकाचा डॉ.हमीद यांच्या पेशीपेशाने स्वीकारलेला प्रभाव!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके