डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्या गावातील सर्व व्यवहारांवर, विकास कार्यक्रमांवर आपण नजर ठेवायहा हवी. नाही तर काही विशिष्ट घराण्यांभोवतीच हे राजकारण फिरत राहील, असा इशारा लेखक देतो. भावी काळातील परिस्थितीची अनिश्चितता आजच्या युवकाला भेडसावते . भीतीमुळे जुनी, रुळलेली, माहीत असलेली वाट सोडणे नको वाटते. म्हणून जात-धर्म  यांना तो चिकटून बसतो. जातीचा जन्माशी संबंध नाही हे माहीत असूनसुद्धा जातीच्या पलीकडे जाऊन लग्न करावयास त्याचे मन धजत नाही. परंतु दुसरे मन सांगत असते की हे असेच किती दिवस चालायचे? 'मी कोण?' हाही प्रश्न त्याच्या मनात घर करून आहे.

पुस्तक व्यवसायातील अलीकडील वाटचाल बघता असे दिसून येते की समाजातील प्रत्येक गटासाठी विशिष्ट प्रकारची पुस्तके प्रकाशित करून जास्तीतजास्त फायदा मिळवण्याचा एकमेव उद्देश असल्यासारखे हे ग्रंथोपजीवी वागत आहेत. वैचारिक मार्गदर्शन किंवा एखा्या विषयावर अर्थपूर्ण चर्चा या गोष्टी जवळ जवळ इतिहासजमा झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्त्रीवर्गासाठीची पुस्तके म्हणजे केवळ पाककला, कौटुंबिक ताणतणाव, श्री-आरोग्य वा काहीतरी 'टाईम पास’ करणाऱ्या रंजक कथा; वा बालसाहित्य म्हणजे काऊ-चिऊच्या गोष्टी किंवा संस्काराच्या नावाखाली पुराणातील अतिरंजित कथा असे एक समीकरण तयार झाले आहे. 

युवक म्हणजे केवळ गुलाबी प्रेमकथेत रंगणारे किंवा रहस्य वा हाणामारीतच रस घेणारे अशी जेव्हा प्रतिमा उभी केली जाते तेव्हा तशाच प्रकारचे 'माईंड कंडिशनिंग' करणाऱ्या पुस्तकांचे ढीगच्या ढीग बाजारात उपलब्ध होत असताना दिसतात. परंतु संवेदनाक्षम युवकांमधील सुप्त शक्तीला आव्हान देणारी, त्यांच्यातील बहुविध क्षमतेला उत्तेजन देणारी पुस्तके किंवा अशा प्रकारची पुस्तके लिहिणारे लेखक कमी होत चालले आहेत. मान्यवर प्रकाशकांनासुद्धा अशा 'कमी खपाच्या प्रकल्पांमध्ये इंटरेस्ट नसतो. सामाजिक बांधिलकी म्हणून एखादा प्रकाशक किंवा लेखक पदरमोड करून अशा प्रकारचे  पुस्तक प्रसिद्ध करतो. परंतु प्रस्थापित प्रकाशकांच्या प्रसार माध्यमांवरील घट्ट पकडीमुळे अशा प्रकारचे पुस्तक अपेक्षित गटापर्यंत पोचत नाही. 

तरीसुद्धा जिद्दीने काही व्यक्ती वा संस्था आपले प्रयत्न सोडत नाहीत. म्हणूनच 'एका परिवर्तनवादी तरुणाचे आत्मशोधन’ सारखे पुस्तक बाजारात, काही काळापुरते का होईना, उपलब्ध होताना दिसते. या पुस्तकाचे लेखक वा. सी. काणे आधुनिक युवकांच्या मनात येणा-या अनेक प्रश्नांचा आढावा येतात. युवक व त्याचे कुटुंबातील स्थान व इतरांशी त्याचे असलेले संबंध, वैवाहिक समस्या, जाती, धर्म, राष्ट्र, क्रांती यांसंबंधीच्या कल्पना, तसेच क्रांतीचे कारण-परिणाम, त्यास लागणारी वैचारिक बैठक, पोषक वातावरण, परंपरा-संस्कार इत्यादींचा ऊहापोह, राष्ट्रवाद, न्यायप्रियता, विश्वास इत्यादी युवकांच्या मनातील विचारांबद्दल लेखक तळमळीने लिहितो. 

लेखकाला पुढील पन्नास वर्षांचा काळ सुवर्णकाळ व्हावा असे वाटते. त्याकरिता या काळाला कशी दिशा द्यायची वाचे वेध आतापासून घेतले पाहिजेत असे त्यास वाटते. झपाट्याने बदलणारी जागतिक परिस्थिती, वैज्ञानिक प्रगती इत्यादींचे संदर्भ घेऊन आपल्याला आराखडा तयार करावयाचा आहे, त्याकरिता जुनी धार्मिक, सामाजिक व राजकीय बैठक स्वसामर्थ्यावर बदलावयाची आहे. केवळ थातुरमातुर मलमपट्टी चालणार नाही. आणि हे आताच केले नाही तर राजकीय सत्तास्पर्धेत भ्रष्टाचार व नैतिक मूल्यांच्या अभावी आपला समाज अराजकाकडे जाण्याची शक्यता आहे. 

वाचकांशी संवाद साधणारा हा युवक उच्चशिक्षित, शहरात राहणारा, सर्व प्रसार माध्यमांशी अतिपरिचित असलेला, प्रगत विचारास पोषक अशा कौटुंबिक वातावरणात वावरणारा नसून हा खेड्यातील नवतरुण आहे. तो भांबावलेल्या स्थितीत आहे। शहरी संस्कृतीला कंटाळलेला आहे. स्वतःबरोबरच संवाद साधत वाटचाल करत आहे. लाखो शिक्षित-अर्धशिक्षित-अडाणी अशा तरुणांच्या कळपातला तो एक आहे. माणुसकी, देव- धर्म, ग्रामपंचायती, लोकराज्य, चालू पोकळ लोकशाही, अनेक प्रकारच्या क्रांतीच्या कल्पना इत्यादी अनेक विषयांवर तो विचार करत आहे. विचारी, स्वावलंबी, विनोदी, प्रेमळ म्हणजे थोडक्यात 'चांगला' माणूस आपण व्हावे ही त्याची इच्छा आहे. 

कोणी ज्येष्ठ, सुप्रसिद्ध , पैशात किंवा सत्ता-लोभात गुंतलेला व कुणालाही विकत घेणारा किंवा विकला जाणारा असे त्याला व्हायचे नाही. माणूस होण्यासाठी त्याला विवेकवादाशी जवळीक साधावीशी वाटते. मानवी नैतिक मूल्यांचा व धार्मिक नैतिक मूल्यांचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. नैतिक मूल्ये ही प्रत्येक माणसात अंतर्भूत असतात. फक्त त्यांच्या जागृतीची, जोपासनेची व वाढीची गरज असते. लेखकाने या सर्व जिव्हाळ्याच्या विषयांवर सोप्या भाषेत विचार मांडले आहेत. लेखकाच्या मते युवकाने राजकारण निषिद्ध मानू नये. 

आपल्या गावातील सर्व व्यवहारांवर, विकास कार्यक्रमांवर आपण नजर ठेवायहा हवी. नाही तर काही विशिष्ट घराण्यांभोवतीच हे राजकारण फिरत राहील, असा इशारा लेखक देतो. भावी काळातील परिस्थितीची अनिश्चितता आजच्या युवकाला भेडसावते . भीतीमुळे जुनी, रुळलेली, माहीत असलेली वाट सोडणे नको वाटते. म्हणून जात-धर्म  यांना तो चिकटून बसतो. जातीचा जन्माशी संबंध नाही हे माहीत असूनसुद्धा जातीच्या पलीकडे जाऊन लग्न करावयास त्याचे मन धजत नाही. परंतु दुसरे मन सांगत असते की हे असेच किती दिवस चालायचे? 'मी कोण?' हाही प्रश्न त्याच्या मनात घर करून आहे. 

धर्माचा जात, अंधश्रद्धा, चमत्कार हा मूळ गाभा तसाच ठेवून राष्ट्रवादाचा मुलामा चढवून गोंधळलेली परिस्थिती निर्माण करणाण्याकडे हताशपणे तो बघत उभा आहे. लेखकाने राष्ट्रवादाचे दुष्परिणाम, राष्ट्रवादाची शक्याशक्यता यांबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. धर्म रूढी, परमेश्वर यांच्या पलीकडे जाऊन नवनव्या विचारांना आवाहन करून ते विचार आत्मसात करून वैचारिक क्रांतीला पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे. विश्ववादाची वैचारिक बैठक आत्मसात करायला हवी. सामाजिक व राजकीय क्रांतीकडे वाटचाल करताना आपला अंतिम उद्देश मानवी क्रांती हाच असायला हवा. अशा प्रकारे एका संवेदनशील तरुणाचे मन लेखक आपल्यासमोर उघडे करतो. 

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील तरुणांच्या मनातील विचार समजून घेणारे लेखकाचे मनही तितकेच संवेदनशील आहे. कुठल्याही प्रकारचे उपदेश नाहीत ; चुका दाखवून देण्याचा आविर्भाव नाही. आजच्या तरुणांच्या मनात चाललेली घालमेल बघून त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न लेखकाने केला आहे. सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ स. मा. गर्गे ह्यांनी आपल्या प्रस्तावनेत त्यांचे विचार नेमकेपणाने मांडले आहेत. लेखकाच्या या तळमळीने लिहिलेल्या विचारांना सर्व युवकांनी प्रतिसाद यायलाच हवा. 

एका परिवर्तनवादी तरुणाचे आत्मशोधन
लेखक : वा. सी. काणे

नवजागृती समाज प्रकाशन, मुंबई.
वितरक - श्रीविद्या प्रकाशन, पुणे.
किंमत 60 रुपये.

Tags: पुणे. श्रीविद्या प्रकाशन मुंबई नवजागृती समाज प्रकाशन ले. वा. सी. काणे एका परिवर्तनवादी तरुणाचे आत्मशोधन युवकाशी मनःपूर्वक केलेला संवाद साहित्य परिचय स. मा. गर्गे प्रभाकर नानावटी Pune Shrividya Prakashan Mumbai Navjagruti Samaj Prakashan Le. Vaa. See. Kane Ek Parivartanvadi Tarunache Atmashodhan Yuvakashi Manhpurvak Kelela Sanvad Sahitya Parichay S. M. Garge Prabhakar Nanavati weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके