डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या पृथ्वीवर अनेक प्राणी-वनस्पतींच्या जाती असून तू मानवजातीचा एक घटक आहेस. पृथ्वी केवळ तुझ्या जातीच्या मालकीची आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस, काही विशिष्ट परिस्थितीमुळे मानव जातीच्या मेंदूची वाढ होऊ लागली.

तू जेव्हा जन्माला आलास तेव्हा सौरमालेतील ग्रह-नक्षत्रांची एक विशिष्ट स्थिती होती. परंतु त्याचा तुझ्या भावी जीवनावर कुठलाही परिणाम होणार नाही. तुझ्या नावामधील अक्षरावरुनसुद्धा तुझ्या पुढील जीवनातील घटनांचा क्रम लावता येणार नाही. कारण त्या चार-सहा अक्षराचा शब्द तुला हाक मारण्यासाठी आहे. तुझी ओळख करून देणारे ते एक लेबल आहे. त्या शब्दात वा जन्मवेळेत किंवा जन्मस्थळात गूढ, अतीद्रिय किंवा काही तरी महत्त्वाचे दडले आहे असा समज तू करू घेऊ नकोस, तुझ्या तळहातावरील रेषा, तुझ्या शरीररचनेतील भाग असून त्यामधून काही तरी अर्थ काढणे चुकीचे ठरेल. तू अमुक ठिकाणी, अमुक वेळेला किंवा अमुक आई वडिलांच्यापोटी जन्माला येणार व पुढील आयुष्यात तू काय काय करणार याची नोंद कुणाजवळही असण्याची शक्यता नाही. ज्या ग्रहावर तूझी वाढ होणार आहे तो ग्रह करोडो वर्षांचा असून विश्वाचा एक भाग आहे. 

या पृथ्वीवर अनेक प्राणी-वनस्पतींच्या जाती असून तू मानवजातीचा एक घटक आहेस. पृथ्वी केवळ तुझ्या जातीच्या मालकीची आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस, काही विशिष्ट परिस्थितीमुळे मानव जातीच्या मेंदूची वाढ होऊ लागली. त्यामुळे त्याची बुद्धी वाढत गेली. विचार करण्याची शक्ती मिळाली. याचा अर्थ, ही जात एका विशिष्ट कारणासाठी जन्माला आली किंवा अंतराळातील काही अतिमानवी शक्तींनी अनेक प्रयोग करून या मानव जातीची निर्मिती केली, असेही तू समजू नकोस तुझ्या मानव जातीच्या प्रचंड बौद्धीक सामर्थ्यामुळे तू इतर प्राणिमात्रांचा, जीवजंतूंचा, वनस्पतीचा विनाश घडवू शकतोस. परंतु त्यांच्या विनाशातच तुझाही विनाश असेल हे विसरू नकोस. तुझ्या बालपणातील छोटे-मोठे आजार, रंगीबेरंगी मणी- माळा, किंवा गंडे-दोरे ताईत इत्यादी बांधल्यामुळे बरे होणार नाहीत हे तुझ्या आई-वडिलांना कळू दे. 

देव-देवता भूत-पिशाच जशा काल्पनिक गोष्टींचा नवस करूनही तुझे आजार बरे होणार नाहीत, हे तुझ्या आई-वडिलांना माहीत असेलच. इतर प्राणि-जातींच्या तुलनेत मानवजातीचे बालपण प्रदीर्घ काळाचे आहे, त्यामुळे तुझ्या आई-वडिलांनी वेळीच काळजी घेतली पाहिजे तुझ्या सुहृट प्रकृतीवरच तुझे पुढील जीवन अवलंबून राहील. तू ज्या जगात वाढणार आहेस ते जग फार गुंतागुंतीचे व अनाकलनीय आहे. अनेक प्रकारच्या चित्र-विचित्र श्रद्धा, भीती, क्रौर्य, द्वेष, असूया, असमानता, धर्मवेडेपणा इत्यादी क्लेशदायक गोष्टींचा तुला सतत सामना करावा लागेल. परंतु त्याचबरोबर ज्ञान-विज्ञान, प्रेम, आनंद, निसर्गसौदर्य, मित्र-मैत्रिणी, विविध प्रकारचे लोक यांच्याशीही तुझा संबंध येऊन तुला तुझे जीवन फुलविता येईल. मला आशा वाटते की जगातील प्रत्येक गोष्ट तू पारखून बघशील. अविवेकीपणामुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून तुझे सदा सर्वकाळ रक्षण होईल ते केवळ पारखून बघण्याच्या सवयीमुळे! तुझ्या या सर्व प्रयत्नांमध्ये माझ्याकडून जितके साध्य होईल तेवढे साहाय्य भी करीन. कारण... मग आजोबा असतात तरी कशासाठी?

Tags: प्राणी-वनस्पती विश्व निसर्ग प्रभाकर नानावटी Animals plants World Nature Prabhakar Nanawati weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके