डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

एकविसाव्या शतकात, स्त्रियांच्या जगात पुरुषांचे स्थान

उद्याचे जग स्त्रियांचे व स्त्रियांसाठी असेल, ह्या निष्कर्षापर्यंत वैज्ञानिक पोचलेले आहेत. पुरुष मानववंशविस्तारासाठी हातभार लावण्यास कुचकामी ठरत आहेत. रोगग्रस्त, अशिक्षित, घरात कायम कटकटी निर्माण करणारा, हिंस्र बनणारा व आयुष्यमान कमी असलेल्या ह्या पुरुषाची आवश्यकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

जीवशास्त्र व आनुवंशिकताविज्ञानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा अभ्यास केला तर असे जाणवते की, एकविसाव्या शतकाच्या मध्यावर एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल तर मुलगीच पाहिजे असा आग्रह धरला जाईल. कुठलाही सूज्ञ मनुष्य मुलगा हवा अशी इच्छा करणार नाही. 

सबल पुरुष व अबला स्त्री ही संकल्पना कालबाह्य होईल. वैद्यकशास्त्राप्रमाणे जन्माला आलेला मुलगा गर्भावस्थेतूनच काही ना काही आनुवंशिक रोगाची शिकार झालेला असतो. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे मुलींमध्ये मुलांपेक्षा जरुरीपेक्षा जादा आढळणारे एक्स हे गुणसूत्र असावे. मुलांमध्ये एखादे बिघडलेले गुणसूत्र असेल तर ती चूक निस्तरण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे रंगांधळेपणा हेमोफिलिया (रक्तस्रावी रोग) यांसारखे रोग होण्याची शक्यता मुलांमध्ये जास्त असते.

मुलांची बाल्यावस्था तर आणखीच समस्याप्रधान असते. मुलींच्या तुलनेने मुले स्वार्थी असतात. नको तेथे फाजील उत्साह दाखवतात. वागण्यात उथळपणा जास्त असतो. अनाठायी शक्तीचा उपयोग करतात. नीतिनियमांचे बंधन पाळत नाहीत. डायलेक्सिया (वाचादोष / भाषा दोष, वाचता न येणे) व तोतरेपणा सामान्यपणे मुलांमध्ये त्रासदायक असतात.

पुरुष व वृद्धावस्थेची स्थितीसुद्धा फार आशादायक नाही. जीवघेण्या आजाराचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असते. हृदयविकाराने मरणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा दुप्पट आहे. विविध प्रकारच्या कर्करोगाने मरणाऱ्या वृद्ध पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे. पुरुषांमध्ये असणारी धूम्रपानाची सवय हे एक कारण असू शकेल. 

कर्करोगामुळे होणाऱ्या पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून स्त्रियांमध्ये हेच प्रमाण स्थिर राहिले आहे. पुढील काही दशकांमध्ये स्त्रियांचे आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त असेल. पुरुषांच्या ह्या परिस्थितीला पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक जबाबदार असण्याची शक्यता वाटते. पुरुषांच्या देहातील रोगप्रतिकारक्षमता कमी करण्यास हे संप्रेरक कारणीभूत आहे व त्यामुळे देह लवकर झिजून जात असेल. अशा प्रकारे टेस्टोस्टेरॉनचे अस्तित्व उत्क्रांतीच्या मार्गावर पुरुषांवर मात करण्यासाठी स्त्रियांच्या वतीने केलेला पूर्वनियोजित कटाचा भाग असेल असे वाटू लागते. पौगंडावस्थेतील मुला-मुलींचा अभ्यास केल्यावर असे वाटते की मुलींमध्ये मुलांपेक्षा लवकर समंजसपणा येतो. नापास होणाऱ्यांचे प्रमाण मुलांमध्ये जास्त आहे. मन लावून अभ्यास करण्याची गोडी मुलींमध्ये जास्त आढळते. गुणवत्ता यादीमध्ये मुलींची संख्या जास्त असलेली जाणवते. विनाकारण शाळा सोडणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या जास्त असते. महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षण पूर्ण करणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे.

तारुण्यावस्थेतील मुलगा म्हणजे जन्मदात्यांची सत्त्वपरीक्षाच असते. प्रत्येक क्षण भयभीत करणारा. ह्या अवस्थेमध्ये टेस्टोस्टेरॉन आपला उच्च बिंदू गाठत असतो. त्याचे परिणाम जास्त तीव्रतेने तारुण्यावस्थेत जाणवतात. क्षुल्लक कारणाकरिता हिंसाचाराचा उद्रेक होतो. खून करणारे व त्याला बळी पडणारे सर्वसाधारणपणे तरुण असतात. 

निरंतर घडणाऱ्या हिंसाचारांमध्ये तरुणींचा सहभाग नगण्य असतो. तरुणांमध्ये झपाटून टाकणाऱ्या निराशावादाचे कारणसुद्धा हे संप्रेरक असू शकते. काही तरुणांमध्ये टोकाचा हिंसाचार तर दुसऱ्या टोकाला झपाटून टाकणारा निराशावाद. अति मद्यपान व गर्दसारख्या व्यसनांचे बळी मुख्यतः तरुण मुलेच असतात. वेळेवर व्यसनांची पूर्तता न झाल्यामुळे बेभान होऊन समाजविरोधी कार्य करणाऱ्यांमध्ये तरुणांचा (मुलांचा) पुढाकार असतो. तुरुंगात दीर्घकाळ शिक्षा भोगणाऱ्यांमध्ये तरुणांचीच संख्या जास्त आहे. निराशावादाची परिणती आत्महत्येत होते. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणींच्यापेक्षा तरुणांची संख्याच जास्त आहे.

आधुनिक समाजातील तरुणाची वणवण थांबत नाही. जीवनात स्थैर्य आणण्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था त्याला करावीशी वाटते. पण भावी समाजामध्ये रोजगाराची संधी स्त्रियांनाच जास्त असेल. उद्योग व अर्थार्जनाच्या साधनांतील आधुनिकीकरणामुळे पारंपरिक रोजगाराची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. 

केवळ शक्तीच्या बळावर रोजगार मिळविणाऱ्या पुरुषाला अर्थवेळ रोजगार मिळत आहे. स्वयंचलित तांत्रिकीकरणामुळे पुरुष उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात उपरा होत आहे. उपजत समंजसपणा व नवीन क्षेत्रातील शिक्षण सहजपणे आत्मसात करण्याची क्षमता स्त्रीमध्ये असल्यामुळे सर्व प्रकारचे उद्योग पूर्णपणे स्त्रीमय होण्याची शक्यता जास्त आहे.

कित्येक सस्तन प्राण्यांमध्ये नर हा प्रजोत्पादनासाठी निमित्तमात्र असतो. मादी आपल्या साथीदाराला शोधून त्याला मोहाच्या जाळ्यात ओढून आपली इच्छा पूर्ण करून घेते. अपत्याच्या वाढीची जबाबदारी मादीची असेल तर त्याबद्दलचे सर्व निर्णय मादीच घेते. मनुष्यप्राण्याला मात्र जाचक नीतिनियमांच्या चौकटीत राहूनच आपले इप्सित साध्य करावे लागते. 

पुरुष हा तर आपल्या शुक्राणूंचा विक्रेता असतो व त्याला ती विक्री करण्याची घाई असते. त्यासाठी कुठलाही धोका पत्करण्याची त्याची तयारी असते. आव्हान स्वीकारून तो स्त्रीसमागमाच्या इच्छेने धाडस करत असेल तर त्याला असे आढळेल की त्याने शत्रूच्या पूर्ण सिद्धतेने तयार असलेल्या युद्धभूमीवर प्रवेश केला आहे. कायद्यासकट सर्व गोष्टींचा पाठिंबा स्त्रीला असेल. सुयोग्य साथीदाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे तिचे प्रयत्न चालूच राहतील. पुरुषांवर दडपण आणून मानववंशविस्ताराचा मार्ग अधिक सुकर करण्याची जबाबदारी तिच्यावर राहील.

धूम्रपान, मद्यपान, मांसाहारासारख्या पुरुषसहज सवयींवर स्त्रियांचे बंधन असेल. मांसाहार (रेडमीट) व चरबीयुक्त पदार्थ खाणाऱ्या पुरुषाला स्वतःवर काही बंधने घालून घ्यावी लागतील. पर्यावरणाच्या विनाशास कारणीभूत होणाऱ्या व आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या या मांसाहारास पर्याय शोधले जातील. सततच्या अशा प्रकारच्या दडपणांमुळे पुरुष आणखी निराश होऊन आपल्या उपयुक्ततेबद्दल साशंक होण्याची शक्यता आहे.

खरे म्हणजे नर ह्या प्राण्याच्या उपयुक्ततेबद्दल कित्येक जीवशास्त्रज्ञ साशंक आहेत. कित्येक प्राण्यांना व वनस्पतींना नराची आवश्यकता वाटत नाही. जर असे असेल तर हा नर मुळातच का आला व अजूनपर्यंत तो अस्तित्वात का आहे हा प्रश्न उरतोच. इतक्या वर्षात ही जात नष्ट व्हायला हवी होती. काही नैसर्गिक कारणांमुळे प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये पुरुषांची आवश्यकता वाटत असेल, पण उत्क्रांतीचा दबाव मात्र स्त्रियांची बाजू घेत आहे. 

प्रजोत्पादन-प्रक्रियेमध्ये स्त्रीमधील गर्भ हा केंद्रबिंदू आहे. सर्व परिस्थितीत गर्भाचे रक्षण करणे नर व मादीचे आद्य कर्तव्य असते. लैंगिक प्रक्रियेमुळे अद्ययावत् पेशीचे आवरण तयार होऊन गर्भाचे रक्षण होत असते. कृमी, जीवाणू व विषाणूंसारख्या परावलंबी जातीपासून गर्भरक्षणाची प्रक्रिया नर व मादीच्या समागमामुळे सुलभ होत असेल. पुरुषांना आपल्या अशा प्रकारच्या उपयुक्ततेबद्दल कदाचित थोडेसे समाधान मिळेल. एवीतेवी नरांचे अस्तित्व नाकारता येत नाही, म्हणून स्त्री त्याचा उपयोग जनुक चाळणीसाठी करून घेत असावी. दुर्बल पुरुषाचे जनुक स्त्रीच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतात. 

एकमेकांना जीवघेण्या अडथळ्याच्या स्पर्धेत उतरण्यास प्रवृत्त करून स्त्री दुर्बल पुरुषांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. इतर पुरुषांबरोबर स्पर्धा, अस्तित्वासाठी धडपड करताना करताना होणारी दमणूक, अनारोग्य इत्यादी गोष्टींवर मात करून स्त्रीपर्यंत पोचण्यासाठी पुरुषाला फार मोठी किंमत द्यावी लागते. आपल्या शुक्राणूसाठी स्त्री एक ग्राहक, म्हणून पुरुष हे सर्व सहन करत असावा. टेस्टोस्टेरॉनसारख्या जीवरसायनामुळे प्रसंगी हिंस्र बनणाऱ्या रोगग्रस्त पुरुषाला पूर्णपणे डावलणे स्त्रीला अशक्य वाटते. वरच्या वर्गातील सस्तन प्राण्यांमध्ये केवळ स्त्रीबीजांच्या संयुगाने प्रजोत्पादन करता येणार नाही. त्या निर्णायक क्षणात मिळणाऱ्या शुक्राणूला पूर्णपणे डावलून सुरक्षित प्रजोत्पादनाची हमी मिळत नसावी. 

गर्भाच्या सुरक्षित वाढीसाठी प्लासेंटा (पेशीने बनलेला अंडाशयावरील एक भाग) आवश्यक असतो व प्लासेंटा हा पुरुषाकडून आलेल्या जनुकांचे फलित असते. पुरुषाकडून मिळविलेले हे जनुक स्त्रीच्या देहावर गर्भकाळात पूर्ण ताबा मिळवतात. अशा प्रकारे जीव अभियांत्रिकीच्या ह्या प्रक्रियेमध्ये गर्भवाढीसाठी व सफल प्रसूतीसाठी शुक्राणूंचा सहभाग असतो. पण आधुनिक समाजातील पुरुषाकडील शुक्राणूंचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, ही एक फार मोठी चिंतेची बाब आहे. 

कधी तरी अशी वेळ येईल की पुरुषाकडे देण्यासारखे काहीही असणार नाही. शुक्राणुसंख्या कमी होण्याचे मूळ कुठे आहे याचे अजून संशोधन चालू आहे. काही हानिकारक रसायनांच्या सेवनामुळे उत्पादनावर परिणाम होत असावा. तर अशा प्रकारे उद्याचे जग स्त्रियांचे व स्त्रियांसाठी असेल, ह्या निष्कर्षापर्यंत वैज्ञानिक पोचलेले आहेत. पुरुष मानववंशविस्तारासाठी हातभार लावण्यास कुचकामी ठरत आहेत. रोगग्रस्त, अशिक्षित, घरात कायम कटकटी निर्माण करणारा, हिंस्र बनणारा व आयुष्यमान कमी असलेल्या ह्या पुरुषाची आवश्यकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. 

जनुकाची चाळणी म्हणून पुरुषाचे अस्तित्व असेल. गर्भरक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्लासेंटासाठी शुक्राणूंचा पुरवठा करणारा म्हणून पुरुषाकडे बघितले जाईल. पण उत्क्रांतीच्या मार्गावरील हा प्रवासी दीर्घकाळ सोबत देईल असे वाटत नाही. स्त्रीला पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

स्त्रीप्राबल्य असलेल्या भावी समाजामध्ये मांसाहार (रेडमीट) नसल्यामुळे निसर्गावर ताण पडणार नाही. हिंसेचा उद्रेक नसल्यामुळे शांती प्रस्थापित होईल. अशा प्रकारे उत्क्रांतीच्या पुढील मार्गावरील जग शांतपणे जगणाऱ्या, निसर्गाचे संतुलन न बिघडविणाऱ्या संपूर्ण विचार करून निर्णय घेणाऱ्या स्त्रियांचे असेल. मानववंशाच्या विस्तारास पोषक ठरणाऱ्या संस्कृती व तंत्रज्ञानाच्या निर्मितीमध्ये पुरुषांचा सहभाग फार मोठा आहे. पण निर्मिती करणे वेगळे व शेवटपर्यंत त्याचे रक्षण व विधायक उपयोग करणे वेगळे!

Tags: मानववंशशास्त्र टेस्टोस्टेरॉन संप्रेरके प्रजोत्पादन पुरुष स्त्री Fertility Anthropology Reproduction Testosteron Harmones weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके