डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंधश्रद्धेला आव्हान - ऐंशी वर्षांपूर्वीसुद्धा!

समाज प्रबोधन ही एक निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्याची जाणीव अंधश्रद्धा ह्या समस्येच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवते. रूढी व परंपरेच्या विळख्यातून सुटण्यासाठी समाजसुधारकांची फळी उभी करावी लागते.. ऐंशी वर्षांपूर्वी ह्याचे स्वरूप आणखी भयानक असणार. तरीसुद्धा नाईकांसारखे तळमळीचे कार्यकर्ते प्रचलित समाजाच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध लिहिण्याचे धाडस करीत होते. त्या वेळच्या सामाजिक बंधनांचा विचार केला तर नाईकांनी केलेली धडपड कौतुकास्पद वाटते.

रामकृष्ण बळवंत नाईक ह्यांनी 1914 मध्ये लिहिलेल्या ‘भुताचा बागुलबुवा’ ह्या पुस्तकाचे प्रा. य. ना. वालावलकर ह्यांनी पुनर्लेखन करून ते वरदा प्रकाशनातर्फे नुकतेच प्रसिद्ध केले आहे. प्रकाशन व्यवसायाचा साच्यातला व्यावहारिक दृष्टिकोन बाजूला सारून प्रकाशकाने हे प्रसिद्ध करून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला हातभार लावला आहे. 

समाज प्रबोधन ही एक निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्याची जाणीव अंधश्रद्धा ह्या समस्येच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवते. रूढी व परंपरेच्या विळख्यातून सुटण्यासाठी समाजसुधारकांची फळी उभी करावी लागते. सातत्याने प्रयत्न करावा लागतो. ऐंशी वर्षांपूर्वी ह्याचे स्वरूप आणखी भयानक असणार. तरीसुद्धा नाईकांसारखे तळमळीचे कार्यकर्ते प्रचलित समाजाच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध लिहिण्याचे धाडस करीत होते. त्या वेळच्या सामाजिक बंधनांचा विचार केला तर नाईकांनी केलेली धडपड कौतुकास्पद वाटते.

धार्मिक व ऐतिहासिक उदाहरणांचा, संतकवींच्या अभंगांचा वापर करूनच त्यांनी भुताच्या संदर्भातील अंधश्रद्धेवर हल्ला केलेला आहे. सामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणारी चाणाक्ष मंडळी भूतयोगी, आत्म्याचे अस्तित्व, पुनर्जन्म, सूक्ष्म शरीर इत्यादी संकल्पनांचा उपयोग करुन जनतेला लुबाडत होती. सिद्धमांत्रिक, बहुरूपी, पंचाक्षरी, देवऋषी, ज्योतिषी, हस्तसामुद्रिक, मनकवडे इत्यादी मंडळी अंधश्रद्धेची वाढ करण्यात पुढाकार घेत होती. नाईक यांनी त्यांच्या कुकर्मावर चांगलाच प्रकाश टाकला आहे.

आत्म्याच्या संदर्भातील नाईकांचे विचार आधुनिक काळानुरूप असे आहेत. ‘मागे आशा ठेवून गेलेला प्राणी धनलोभी, ज्याचे पिंडदान केले नाही तो, ज्याचे श्राद्ध होत नाही तो, व्रतवैकल्ये खोटी म्हणतो तो, ज्याचा खून झाला आहे तो, ज्याने आत्महत्या केली आहे तो, ज्याचा अपघाती मृत्यू झाला आहे तो, असे सर्व लोक भूतयोनीत जातात.’ अशी पुराणात वर्णने आहेत. म्हणजे बहुतेक सगळ्याच माणसांची मरणानंतर भूते होतात असे म्हटले पाहिजे. 

अशा प्रकारे नव्याण्णव टक्के लोक मरणानंतर भूतयोनीत जाऊन नंतर जिवंत असलेल्या लोकांवर सूड उगवताना दिसायला पाहिजे होते, पण तसे काही घडत असावे असे वाटत नाही. संभाजीचे भूत औरंजेबाच्या उरावर बसले नाही. नारायणराव पेशव्यांचे भूत आनंदीबाई किंवा सुमेरसिंगला त्रास देत होते अशी आख्यायिकासुद्धा नाही. ह्या असंख्य भुतांना राहण्यासाठी एखादी भूतसृष्टी ह्या भूतलावर किंवा एखाद्या परग्रहावर - असायला हवी होती. जर हेच खरे असेल तर तेथील जीव पृथ्वीवर अवतरून मनास येईल तसली नाना रूपे धारण करून येथील जनसामान्यांच्या पाठीमागे लागायला हवी होती. पण असे का घडत नाही? मग ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून 

‘भूत सृष्टीतील जीव सूक्ष्मदेहधारी बनून भूतलावर येतात व ते फक्त कावळ्यांना दिसतात.’ असे सांगण्यात येते. हा सगळा प्रकार तार्किकतेच्या पलीकडचा आहे. नाईक ह्यांनी हा विषय तर्कशुद्धपणे हाताळला आहे. भूतसृष्टी हा प्रकार असूच शकत नाही हे त्यांनी प्रत्यक्ष प्रमाण, तर्क प्रमाण व शब्दप्रमाण इत्यादींचा आधार घेऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या काळातील वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधील भूत-पिशाच्चांच्या गोष्टींचा संदर्भ घेऊन वैज्ञानिक निकषांवर प्रत्येक घटनेचे विश्लेषण त्यांनी केले आहे. देव प्रत्यक्ष भेटतो किंवा देवाचा अवतार आहे, असे सांगून जनतेला फसवणाऱ्या बुवांच्यावर सुद्धा त्यांनी ताशेरे ओढले आहेत कार्य-कारण, संमोहन, भ्रम, भास, मनोविभ्रम, दृष्टिभ्रम, शब्दभ्रम, वैज्ञानिक परीक्षण इत्यादींच्या साहाय्याने भुतांच्या चमत्कारिक घटनांचे स्पष्टीकरण करता येते, असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले आहे.'

या जगात अनियमित असा कोणताच कारभार नाही, सर्व सृष्टी निसर्गनियमांनी बद्ध आहे. या नियमाबाहेर कोणालाही जाता येत नाही. असे असताना हे निसर्गनियम भुतांनासुद्धा लागू होतात. मग हे भूत अनिर्बंधपणे कधी बकरे, कधी मांजर, कधी कुत्रे, कधी पुरुष तर कधी स्त्री कसे होऊ शकते? जर एखादी व्यक्ती विचित्रपणे वागत असेल तर तर्काचे निकष लावून शोध घेता येऊ शकतो. मनोवैज्ञानिकाकडे जाऊन रोगनिदान व उपचार करता येतात. पण काही हपापलेले लोक आपली विकृत इच्छा तृप्त करण्यासाठी भूतयोनीसारखे कुभांड रचून ह्या समाजाला वेठीस धरत होते. 

जनसामान्यांना लुबाडणे व त्यामधून अमानुष आनंद मिळविणे हा उद्देश असलेल्या मंडळींनी कित्येक घरे उद्ध्वस्त केलेली आहेत. भुतांना पळवून लावण्यासाठी करत असलेले अघोरी उपाय बघून आपली आपल्याला लाज वाटते. असंबद्ध वागणे हा एक प्रकारचा रोग असून शास्त्रीय उपचाराने हा रोग बरा होऊ शकतो, हे माहीत असूनसुद्धा मतलबी मंडळी गरिबांची दिशाभूल करतात.

भारतीय किंवा महाराष्ट्रीय समाज जाऊ द्या, प्रगत राष्ट्र म्हणवून घेणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांतसुद्धा भूतसृष्टीवर विश्वास ठेवणारे व संघटितपणे त्याची उपासना करणारे भरपूर लोक आहेत. 1875 मध्ये स्थापन झालेल्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या उद्देशाबद्दलसुद्धा लेखकाने संशय व्यक्त केला आहे. परलोक, परमेश्वर, पुनर्जन्म, प्रकृती, पुरुष इत्यादी वादग्रस्त तात्त्विक विषयांवर चर्चा घडवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या ह्या संस्थेच्या मादाम ब्लाव्हाट्स्की व कर्नल अल्कॉट ह्या मंडळींवर नाईक ह्यांनी मार्मिकपणे लिहिले आहे. 

स्वामी दयानंद सरस्वती, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी इत्यादींचे या संदर्भातील विवेचन वाचण्यासारखे आहे.

(ह्या संदर्भात प्रा. वालावलकर ह्यांची टिप्पणी ब्लाव्हाट्स्कीबाईंच्या करामतीवर जास्त प्रकाश टाकते. अदृश्य शक्तीशी संपर्क साधता येतो, हे जनसामान्यांना दाखविण्यासाठी ह्या बाई छोट्या जागेत बसून तिथून कुणाच्या नकळत चोरकप्प्यातून गूळसंदेश लिहिलेले कागद टाकत होत्या. या प्रकारे फसलेले अनेक लोक थिऑसॉफीच्या नादी लागले. नंतर काही चिकित्सक मंडळींनी मद्रास येथील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ही गोष्ट उघडकीस आणली.)

पिशाच्चयोनीच्या संदर्भात आगरकरांचे विचार नाईक यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहेत. ‘पिशाच्चयोनीत गेलेला जीव किती वर्षे त्या स्थितीत राहतो आणि पुढे त्याची स्थिती बदलण्यास कोणती कारणे संभवतात? कोट्यवधी पिशाच्चरुपी आप्तात्मे राहतात कोठे आणि आपला चरितार्थ कसा चालवितात? जर जुन्या भुतांना किंवा पिशाच्चांना अथवा मृतपित्रात्म्यांना अन्न-पाण्याची, वस्त्रपात्रांची, घरादारांची गरज नसेल तर जे तुमच्या डोळ्यांपुढे मरतात त्यांच्याकरिता तरी असले श्राद्धादी हास्यास्पद संस्कार तुम्ही का करता? खरे तर तुम्ही विचारशक्तीस काडीमोड दिली आहे म्हणून हा सगळा मूर्खपणा तुमच्या हातून घडतो.’ 

अंतर्मुख करायला लावणारे हे विचार आगरकरांचे आहेत. नाईक ह्यांच्या पुस्तकाचे मूळ स्वरूप बदलून वाचनीय पुस्तक हाती दिल्याबद्दल प्रा. वालावलकर अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मूळ पुस्तकातील भाषा जुन्या वळणाची होती. वाक्यरचना लांबणीची व किचकट होती. लेखनात सुटसुटीतपणा नव्हता, पुस्तकात प्रकरणे नव्हती. परिच्छेदांना शीर्षके नव्हती. ह्या सगळ्या उणिवा भरून काढून प्रा. वालावलकर ह्यांनी पुस्तकाचे उत्कृष्टपणे पुनर्लेखन केले आहे. आवश्यक तेथे आजच्या संदर्भातील तळटीपा दिल्या आहेत. 

डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ह्या पुस्तकाला दिलेली प्रदीर्घ प्रस्तावना म्हणजे अंधश्रद्धेच्या संदर्भातील एक मुक्त चिंतनच होय. सामाजिक संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना अनेक दिव्यांतून जावे लागते. त्यातल्या त्यात सामान्य कार्यकर्त्यांचे हाल बघवत नाहीत. प्रसिद्धीचे वलय नसल्यामुळे कायम हेटाळणी त्यांच्या वाट्याला येते. त्यावेळची परिस्थिती बघता नाईक ह्यांचे धैर्य वाखाणण्यासारखे आहे. 

देवाला ‘चमच्याने दूध पाजणाऱ्या, ग्रहणाच्या दिवशी शहरातील रस्ते ओस पडणाऱ्या आजच्या समाजपुरुषाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी नाईक ह्यांच्यासारख्या तळमळीने काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे.

भुताचा बागुलबुवा
लेखक : रा. य. नाईक
पुनर्लेखन : प्रा. य. ना. वालावलकर
प्रकाशक : 'वरदा' सेनापती बापट रोड, पुणे 411 016.

Tags: अंधश्रद्धा निर्मूलन डॉ. नरेंद्र दाभोलकर भुताचा बागुलबुवा य.ना.वालावलकर रामकृष्ण नाईक पुस्तक परिचय Superstitions Dr. Narendra Dabholkar Bhutacha Bagulbuva Y.N.Walavalkar Ramkrushna Naik Book Review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके