डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गेली अनेक वर्षे परिणामकारक राजकीय नेतृत्वाच्या अभावी आपल्या देशाची घसरगुंडी चालू असलेली आपण अनुभवत आहोत. नेतृत्व म्हणजे काय आणि नेतृत्व गुणांचा विकास कसा होतो व त्याचा भोवतालच्या समाजावर परिणाम कसा होतो, याची थोडक्यात चर्चा करणारा हा लेख.

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक पक्षासमोर नेता निवडीचा यक्षप्रश्न उभा होता. स्वतःबद्दलच्या गैरवाजवी व अवास्तव कल्पनेमुळे प्रत्येक सभासदाला पक्षनेतृत्वाची व पंतप्रधानपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी असे वाटत होते. परंतु नेतृत्वगुणाच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता असते ह्याची जाणीव कित्येक नेता म्हणविणाऱ्यांमध्ये नसते. 

विविध क्षेत्रांतील यशस्वी नेतृत्वशाली व्यक्तींचा अभ्यास केल्यावर तेथे वेगळेच पाणी मुरत असते ह्याचा प्रत्यय येईल.

जागतिक परिस्थितीचे परिशीलन केल्यावर पूर्ण मानववंश

1. अणुयुद्ध किंवा आण्विक शास्त्रज्ञांच्या अपघाती विस्फोटामुळे,

2. पर्यावरणाचा विनाश होऊन त्वरित पसरणाऱ्या एखाद्या भयंकर अज्ञात रोगामुळे किंवा

3. शासन व इतर संस्था यशस्वीपणे चालवू शकणाऱ्या परिणामकारक नेतृत्वाच्या अभावामुळे, सर्वनाश ओढावून घेत आहे असे दिसून येते. 

अणुयुद्ध किंवा पर्यावरण विनाश सारख्या भयसूचकांना मिळणारी प्रसिद्धी नेतृत्वशक्तीच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस मिळत नसल्यामुळे नेतृत्वाबद्दल बेफिकीर वृत्ती बळावण्याची शक्यता जास्त आहे. पण ह्याकडेसुद्धा तातडीची समस्या म्हणून गंभीरपणे बघायला हवे. 

खाजगी व सार्वजनिक उद्योग, सार्वजनिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शासन व्यवस्था, युद्धक्षेत्र, क्रीडाक्षेत्र इत्यादींसारख्या सर्व ठिकाणी नेतृत्वशक्तीच्या उतरंडीमुळे वाईट परिणामांस तोंड द्यावे लागत आहे. विकसित देश व विकसनशील देश ह्या दोन्ही प्रकारांमध्ये ही समस्या असून अनेक देशांतील ढासळलेल्या परिस्थितीला कर्तृत्वशून्य नेतृत्व हे सुद्धा एक कारण असू शकते. राजकीय क्षेत्रातील नेतृत्वामधील उणिवांचे देशहितावर दूरगामी परिणाम होऊ शकतात.

जनतेची मनःस्थिती बहुतेक वेळा वैफल्यग्रस्त व त्वरित निर्णय न घेऊ शकणारी असते. कित्येक वेळा आततायी व विध्वंसक कृत्य करण्याकडे तिचा कल असतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कुवत नसल्यामुळे नेता म्हणविणाऱ्या या व्यक्ती जनतेचे नियंत्रण करू शकत नाहीत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते व पुढाऱ्यांची अवस्था केविलवाणी होते. जनता नंतर अशा परिणामकारक नेतृत्वशक्ती नसलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही. योग्य वेळी त्यांची उचलबांगडी केली जाते. 

पण परिणामकारक नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तीच्या एका इशाऱ्याद्वारे जनसमुदायावर नियंत्रण ठेवता येते, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. अशा प्रकारचा नेता आपल्या व्यक्तिगत आचरणाद्वारे जनतेच्या वर्तनावर, विचारांवर व भावनेवर प्रभाव पाडू शकतो.
परिणामकारक नेतृत्वामध्ये मुख्यत्वेकरून चार गोष्टींचा समावेश असावा लागतो.

1.    अनुयायांबरोबर असलेले भावनिक बंधन.

2.    कुठल्याही कृतीमध्ये पूर्णपणे सामील होण्याची किंवा वेळप्रसंगी अलिप्त राहण्याची वृत्ती. 

3.    बोलल्याप्रमाणे वागण्याचे प्रत्यंतर.

4.    झुंडशाही किंवा गैरप्रकार न करता उत्स्फूर्त निवडीतून मिळवलेली सत्ता.

नेता व नेतृत्वाच्या संदर्भात कित्येक उलटसुलट मतप्रवाह आहेत. चित्रपटातील नायकाप्रमाणे नेत्याकडे करिष्मा असल्यास आपोआपच असाध्य वाटणाऱ्या कित्येक गोष्टी साध्य होऊ शकतात, असे काहींना वाटते. 

परंतु नेतासुद्धा एक सर्वसामान्य माणूस असून काही विशिष्ट परिस्थितीमुळे नेतृत्वगुणांचा विकास त्याच्यामध्ये होतो, म्हणून प्रत्येक समस्येला त्याच्याकडे उत्तर असू शकते हे शक्य वाटत नाही. काही अभ्यासकांना नेता कुठल्याही लाटेवरून तरंगत जाणाऱ्या यशस्वी क्रीडापटूसारखा वाटतो. काहींना तो नुसता तरंगत जाणाराच नव्हे तर प्रसंगी अनुकूल अशी लाटसुद्धा निर्माण करणारा वाटतो. अशा प्रकारच्या मतप्रवाहांना पुष्टी देणारी कित्येक उदाहरणे सापडतात. 

नेतृत्व जन्मतःच असते की भोवतालच्या परिस्थितीनुसार प्रयत्न करून मिळविता येते, हाही एक मुद्दा नेतृत्वगुणाच्या संदर्भात उपस्थित केला जातो. नेतृत्व हे उपजतच असते का परिस्थितीनुसार येते ह्या चर्चेला तितके महत्त्व देण्याचे कारण नाही. मुळात नेतृत्वगुणाचाच दुष्काळ सगळीकडे असल्यामुळे ह्या चर्चेत वेळ घालवणे अप्रस्तुत वाटते. 

परंतु नेतृत्वशक्ती असलेल्या व्यक्तींचा अभ्यास केल्यावर, त्यांच्यामध्ये काही विशिष्ट गुणांची जोपासना केलेली आढळते. ह्या व्यक्ती जोखीम पत्करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. प्रत्येक विषयाबद्दल, घडामोडीबद्दल त्यांना कुतूहल असते. अभ्यास करून निष्कर्ष काढणे व न डळमळता कार्याचरण करणे त्यांना जमते, प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण या व्यक्ती करू शकतात. अत्यंत उत्साही असतात, मुख्य म्हणजे त्यांच्याकडे सूक्ष्म विनोदबुद्धी असते.

नेतृत्वगुणांच्याबद्दल चर्चा करताना नेतृत्व वास्तववादी असावे की आदर्शवादी हा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन धाडसाने पाऊल टाकणारे पुढारी जनसामान्यांच्या जीवनपद्धतीवर परिणाम करू शकतात. म्हणूनच नेतृत्व एकाच वेळी आदर्शवादी व वास्तववादी असू शकते. आदर्श नेते वास्तव स्वप्न बघत असतात. त्यांच्याकडे दूरदर्शीपणा असतो. अनुयायांकडून कामे करून घेण्याचे कसब त्यांच्या अंगी असते. पारंपरिक शिक्षणापेक्षा जनसंपर्कामुळे नेतृत्वाला उभारी येते.

नेतृत्व कधीही निरर्थक प्रयत्न करत नसते. प्रत्येक घटनेचा पुरेपूर फायदा उठवणे हेच ध्येय त्यांच्यासमोर असते. पुढारी व त्यांचे अनुयायी ह्यांच्या आशा-आकांक्षांना व स्वप्नांना नेतृत्व प्रत्यक्ष रूप देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे पुढारी व अनुयायांमध्ये एक अतूट नाते निर्माण होते. एका विशिष्ट उद्देश्यपूर्तीसाठी दोघेही एकत्र येऊन प्रयत्न करीत असल्यामुळे परस्पर विश्वास निर्माण होतो. सामंजस्य वाढते. एकमेकांस पूरक, सांभाळून घेणारे वर्तन त्यांच्यामध्ये असते . पण ह्या सर्वापेक्षा नेत्याच्या पाठीमागे अनुयायांचा समुदाय असणे फार महत्त्वाचे आहे. प्रगत विचार, कणखर इच्छाशक्ती, संमोहित करणारे हास्य इत्यादी गोष्टी अनुयायांशिवाय काहीच उपयोगाच्या नाहीत.

नेतृत्वाचे शिखर केवळ भाषणकौशल्याच्या जोरावर सर करता येणार नाही. नेता म्हणविणाऱ्याला दुसऱ्यांचे म्हणणे एकाग्र चित्ताने ऐकून घेता आले पाहिजे. गटाबरोबर सुसंवाद साधता आला पाहिजे. निवेदन करणाऱ्यांचे दुःख व वेदना स्वतः भोगत आहोत अशी जाणीव निर्माण केली पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञासारखे निवेदकाच्या सुख दुःखांपासून अलिप्त राहून चालत नाही. 

नेता व त्याच्यामागे असणारा समुदाय ह्या दोघांची स्वप्ने व आशाआकांक्षा यांमध्ये दरी असता कामा नये. परिणामकारक नेतृत्व अमूर्त आशाआकाक्षांना कार्यवाहीत आणण्याचा प्रयत्न करते व ह्या प्रयत्नात यशस्वी पण होते.

परिणामकारक नेतृत्वाचे वरील विवेचनातील निकष लावले तर आपल्यासमोर एकच व्यक्ती उभी राहते ती म्हणजे महात्मा गांधी! म्हणून तर आपल्यासारख्या खंडप्राय देशातील प्रचंड जनसमुदायाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या खडतर प्रवासामध्ये त्यांचे नेतृत्त्व कधीच थिटे पडले नाही.

(संदर्भ : हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यू : जाने- फेब्रु. 1996)

Tags: वास्तववादी आदर्शवादी अनुयायी नेतृत्व महात्मा गांधी realists idealists followers leadership Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके