डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वतंत्रपणे विचार करून कृती करण्यास प्रेरित होणे हा साक्षरतेचा उद्देश असावा. दैनंदिन घडामोडींबद्दल भाष्य करता येणे. इतरांशी संवाद साधणे, स्वतंत्रपणे निर्णय घेणे इत्यादी गोष्टी या साक्षरतेशी निगडित आहेत. अशा प्रकारच्या जीवनोपयोगी साक्षरतेला क्रियात्मक साक्षरता असे म्हणता येईल. वैज्ञानिक साक्षरतेलासुद्धा हाथ अर्थ अभिप्रेत आहे.

अक्षरज्ञानाबरोबरच मानवी समाजाला आपल्या समृद्धीसाठी विज्ञानविषयक ज्ञानाचीसुद्धा गरज आहे. ही वैज्ञानिक साक्षरता (यामध्ये तंत्रज्ञानविषयक साक्षरतासुद्धा गृहीत धरली आहे.) चांगली नोकरी मिळविण्यासाठी. सामाजिक व वैयक्तिक प्रगतीसाठी व लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वैज्ञानिक साक्षरता म्हणजे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी विज्ञानशाखाविषयक पाठ्यपुस्तकातील गोष्टींचा अभ्यास नव्हे, हे प्रथम लक्षात ठेवायला हवे. समाजातील अनेक व्यक्ती विज्ञान तंत्रज्ञान विषयांत डिग्री मिळवूनसुद्धा वैज्ञानिकदृष्ट्या निरक्षर असू शकतात. वैज्ञानिक साक्षरता म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक प्राथमिक परंतु मूलभूत स्वरूपाचे ज्ञान, वैज्ञानिक विचार पद्धती व वैज्ञानिक पद्धतींचे आकलन असे थोडक्यात म्हणता येईल. ह्या प्रकारच्या आकलनासाठी वैज्ञानिक विषयातील बारीकसारीक तपशिलांच्या अभ्यासाची गरज नसते. वैज्ञानिक विषयाबद्दल ढोबळ परिचय, विषयाशी संबंधित नियमांची माहिती, माहितीचा नेमकेपणा व त्या विषयाचे विविध क्षेत्रावर होणारे परिणाम या गोष्टी वैज्ञानिक साक्षरतेला पुरेशा आहेत..

वैज्ञानिक साक्षर व्यक्ती

वैज्ञानिक साक्षर असलेली व्यक्ती ज्योतिष हे विज्ञान नाही हे ठामपणे सांगू शकेल. निर्जीव वस्तु दूध पिऊ शकत नाहीत हे त्याला पटेल दैवी चमत्कार, मूल होण्यासाठी बुवा बावांचा आशीर्वाद मरणोत्तर सुखाची कल्पना इत्यादी गोष्टींवर अशा व्यक्ती विश्वास ठेवणार नाहीत. वैज्ञानिक साक्षर माणसाला कोनीय संवेग (अग्यूलर मोमेंटस्) चा अर्थ डीएनए आरएनए-जनुक रंगसूत्र इत्यादींचा एकमेकांशी संबंध. कृष्ण विवरामुळे विश्वव्यवहारात होणारे बदल, इत्यादी विज्ञानातील अनेक सूक्ष्म विषयांचे ज्ञान असावे अशी अपेक्षा नाही. परंतु शासनाने महाकाय धरण बांधण्याचे ठरवल्यास, अणुभट्टी प्रकल्पाचा प्रस्ताव केल्यास, जंगल तोडून कारखाना चालू करण्याचा विचार असल्यास किंवा कारखान्यामुळे प्रदूषण होत असल्यास जागृत वैज्ञानिक साक्षर व्यक्ती ठामपणे योग्य पाऊल उचलेल. स्वतःची सदसदविवेकबुद्धी वापरून मत बनविण्यास वैज्ञानिक साक्षरता मदत करू शकेल.

क्रियात्मक साक्षरता

सामान्यपणे साक्षरता म्हणजे वाचन लेखन क्षमता एवढाच मर्यादित अर्थ घेतला जातो. परंतु केवळ अक्षरओळख सामान्य माणसाच्या जीवनातील समस्यांना उत्तर शोधण्यास मदत करू शकणार नाही. स्वतंत्रपणे विचार करून कृती करण्यास प्रेरित होणे हा साक्षरतेचा उद्देश असावा. दैनंदिन घडामोडींबद्दल भाष्य करता येणे. इतरांशी संवाद साधणे, स्वतंत्रपणे निर्णय घेणे इत्यादी गोष्टी या साक्षरतेशी निगडित आहेत. अशा प्रकारच्या जीवनोपयोगी साक्षरतेला क्रियात्मक साक्षरता असे म्हणता येईल. वैज्ञानिक साक्षरतेलासुद्धा हाथ अर्थ अभिप्रेत आहे. रोज घडणाऱ्या तांत्रिक समस्यांना उत्तरे शोधीत आपली आर्थिक प्रगती करून घेणे, आर्थिक प्रगतीसाठी इतरांशी संवाद साधणे, कमी खर्चात आधुनिक सुखसोयींचा उपयोग करून घेणे या गोष्टींचा क्रियात्मक वैज्ञानिक साक्षरतेत समावेश होतो.

आर्थिक व सामाजिक प्रगती

देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी उद्योगव्यवस्थेस आवश्यक असणारा मनुष्यबळातील फार मोठा हिस्सा कामगारांचा असतो. आधुनिक उद्योगव्यवस्थेतील जटिल तंत्रज्ञानाची माहिती आजच्या कामगाराला असावी लागते. यंत्रांचा योग्य वापर त्यांची नियमित देखभाल, प्राथमिक स्वरूपाच्या दुरुस्त्या इत्यादींचे ज्ञान कुशल कामगारांना असावे लागते. इतरांशी संपर्क साधण्यासाठी, त्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाची भाषा अवगत करावी लागते. त्यामुळे तांत्रिक शिक्षण घेतलेल्या श्रमशक्तीची मोठया प्रमाणात गरज भासत आहे अकुशल कामगार या सर्व आधुनिक व्यवस्येमुळे बाहेर फेकला जात आहे. 

अकुशल कामगारांना तंत्रज्ञानात कौशल्य मिळवून देणे, कुशल कामगारांच्या तंत्रज्ञान-कौशल्यात वाढ करून देणे यासाठी वैज्ञानिक साक्षरता हातभार लावू शकेल वैज्ञानिक साक्षरतेचा उपयोग केवळ औद्योगिक क्षेत्रातील कामगारापुरताच सीमित नसून इतर क्षेत्रातसुद्धा त्याचा उपयोग होत आहे. शेतीव्यवसाय आता केवळ मुबलक मनुष्यबळावर करता येणार नाही. नवीन प्रकारची सुधारित बी-बियाणे, रासायनिक व सेंद्रीय खते, कीटकनाशके, सिंचनव्यवस्था, शीतगृहांचा साठवणीसाठी उपयोग, आधुनिक शेती अवजारे यांमुळे शेतीव्यवसापाचे आधुनिकीकरण होत आहे. शेती उत्पादन व त्यातील विविधता याद्वारे विदेशी बाजारपेठ मोठया प्रमाणात काबीज करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ही सर्व प्रक्रिया : समजून घेणे आता आवश्यक झाले असून ग्रामीण भागात वैज्ञानिक साक्षरता रुजविल्याशिवाय आर्थिक प्रगती शक्य नाही. सेवाक्षेत्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. तंत्रज्ञानाच्या प्राथमिक माहितीसाठी वैज्ञानिक साक्षर असणे आवश्यक आहे.

लोकशाही प्रक्रिया

सार्वजनिक जीवनातील बारकावे समजून घेऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी वैज्ञानिक साक्षरतेची गरज यापुढे भासणार आहे. आधुनिक उद्योगव्यवस्थेसाठी रस्ते, पूल, धरण, वीज इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे होणाऱ्या पर्यावरणावरील परिणाम, विस्थापितांचे पुनर्वसन हे कळीचे प्रश्न बनले आहेत. प्रकल्पांचे नियोजन मुख्यतः वैज्ञानिक व तंत्रज्ञानविषयक माहितीवर अवलंबून असते. लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी प्रतिनिधींमध्ये तंत्रज्ञानाचे प्राथमिक ज्ञानसुद्धा नसेल तर दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. ही परिस्थिती लोकशाही निर्णयप्रक्रियेला मारक ठरण्याची शक्यता आहे. विकास कार्यक्रमांचे विश्लेषण करून अचूक निर्णय घेणे इष्ट असताना वैज्ञानिक साक्षरतेअभावी बाहेरून लादलेल्या निर्णयामुळे फसगत होण्याची शक्यता आहे. 

त्याचे आर्थिक दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे लोकशाही कमकुवत बनते. योजना असफल होतात. सर्वसामान्य जनता राजकारणी व्यक्तींच्या आश्वासनांची योग्यपणे दखल घेऊन मूल्यमापन करू शकत नसेल तर संपूर्ण देशाच्या आर्थिक नाड्या निवडक लोकांच्या हाती राहून लोकशाही चेष्टेचा विषय होऊ शकतो. त्यासाठी जनसामान्यांची वैज्ञानिक जाणीव वाढवायला हवी. मोठमोठे आकडे तोंडावर फेकणाऱ्या तज्ज्ञांना दुसरी बाजू सांगणारी व स्वहित कशात आहे याची जाणीव असणारी जनता लोकशाही बळकट करू शकते. यासाठी जनसामान्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विषयांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. यासाठी पाठ्यपुस्तकीय अभ्यासाचीसुद्धा गरज नाही. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विधानांची आर्थिक, सामाजिक आरोग्यविषयक व पर्यावरणाशी संबंधित बाजूंची चिकित्सा करण्याइतपत वैज्ञानिक समज सर्वसामान्यांमध्ये यायला हवी. येथे भरमसाठ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्यांचे पितळ उघड करणे गरजेचे आहे. विधानांची सत्यासत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे आहे.

जनसामान्यांचा सहभाग

वैज्ञानिक साक्षरतेमुळे बिनखर्चाच्या किंवा कमीत कमी जोखीम असलेल्या उपक्रमांमध्ये जनसामान्यांचे सहकार्य सुलभतेने मिळू शकेल.. पर्यावरण विनाश थोपविता येईल. सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांमध्ये जनसामान्य उत्स्फूर्तपणे भाग घेतील. विस्थापितांना न्याय मिळवून देण्याइतपत प्रगल्भता जनतेमध्ये असेल दिशाभूल करून गरज नसलेल्या खर्चिक वस्तूंचा जाहिरातीद्वारे भडिमार करणाऱ्या गोष्टींना आळा बसेल. जाहिरातबाजीतील पोकळपणा कळेल. टी.व्ही. पडद्यावर जे दिसते ते सर्व सत्य आहे या चुकीच्या समजुतीला वैज्ञानिक साक्षरतेमुळे धक्का बसेल, प्रसिद्ध लेखक व वैज्ञानिक अ‍ॅसिमोव्ह म्हणतो की विज्ञानाचे समर्थन करणे व नवनव्या ज्ञानाचे स्वागत करणे ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजचे विज्ञान हे उद्याचे उत्तर आहे तसेच ते उद्याचे प्रश्नचिन्ह आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विज्ञान हे मनुष्याचे व सदा सर्वकाळाचे परमश्रेष्ठ साहस आहे. अज्ञानाच्या अंधःकाराला मानवी बुद्धीने दिलेले ते एक जबरदस्त आव्हान आहे. हे आव्हान आता आपण स्वीकारायला हवे.

Tags: रसायनशास्त्र भौतिकशास्त्र चिकित्सा वैज्ञानिक साक्षर प्रभाकर नानावटी Chemistry Physics Medicine Scientifically literate Prabhakar nanawati weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके