डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सहकारी क्षेत्रातील एक वेगळा प्रयोग

पुण्यामध्ये सध्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा उत्साहात चालू आहेत. आपल्याकडे स्पर्धा भरविण्यासाठी अतोनात खर्च केला जातो. मात्र खेळाडूंचा दम आणि प्रावीण्य वाढविण्याकडे राष्ट्रीय क्रीडा संचालनालयाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असते, या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील काही क्रीडाप्रेमी लोकांनी सुरू केलेल्या एका सहकारी प्रयोगाची ही कथा.

बेळगावजवळील चंदरगी येथील क्रीडाशाळा

ऑलिंपिक्स, एशियाडसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे आपल्या भारतीय खेळाडूंची होत असलेली नाचक्की बघून कुठलाही सुज्ञ भारतीय अंतर्मुख होतो. एवढी प्रचंड लोकसंख्या असूनसुद्धा मूठभर चांगल्या दर्जाचे खेळाडू आपण तयार करू शकत नाही. हॉकीसारख्या खेळात तरी आपला क्रमांक एके काळी बरा होता. आजकाल ते पण नाही. कबड्डीसारख्या भारतीय खेळातसुद्धा श्रीलंकेसारखा छोटा देश आपल्याला तिसऱ्या नंबरवर ढकलतो हे वाचून आपली मान शरमेने खाली जाते.

क्रीडास्पर्धेमध्ये भारताची पीछेहाट झाल्यावर आपण आपला राग त्या स्पर्धकांवर काढतो. पुढील 10-15 वर्षे आपण भाग घेऊ नये असे म्हणतो. वशिलेबाजी, चमचेगिरी इत्यादी शिव्या देऊन सगळे अपयश सरकारवर ढकलतो. सरकार मात्र ढिम्मपणे एखादी समिती नेमून काही मलमपट्टी सुचविते. परत ये रे माझ्या मागल्या!

आपली ही वृत्ती चांगले खेळाडू तयार होण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत घटकांचा विचार करायला तयार होत नाही. अव्वल दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी खूप परिश्रमांची आवश्यकता आहे. भरपूर आहार, आधुनिक क्रीडासाधने, इत्यादींची सोय असावी लागते. मूलतः समाजामध्ये खेळाडूंबद्दल आपुलकी असावी लागते. खेळाडूंची आठवण फक्त स्पर्धेच्या वेळी होणे हे काही ठीक नाही. इतर वेळी तो काय करतो, प्रशिक्षक आहेत की नाही, कशा प्रकारच्या सुविधा आहेत, त्याच्या पोटापाण्याची सोय काय... इत्यादी तपशिलामध्ये आपण शिरत नाही. खेळाडूंमध्ये जिद्द असावी लागते. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी इतर समाज पुढे यायला पाहिजे. त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी मदतीचा हात पुढे यायला पाहिजे, निवृत्ती नंतरसुद्धा ताठ मानेने त्याला जगता येईल ह्याची काळजी घ्यायला हवी. नाहीतर त्याचा उत्साह टिकून राहणार नाही. इतर प्रगत देशांमध्ये खेळाडूंना मिळणारे प्रोत्साहन प्रचंड असते. 10-15 वर्षाची ही चिमुकली मुले पंचविशी ओलांडायच्या आतच करोड़पती होतात. लहान असतानाच त्यांच्यातील क्रीडागुण ओळखून परिश्रम केले जातात.

स्पर्धेच्या या युगामध्ये खेळाडूंमध्ये केवळ उत्साह किंवा स्वप्ने असून चालत नाही. क्रीडास्पर्धा जिंकण्यासाठी भरपूर मेहनत, अत्याधुनिक सुविधा, सकस व भरपूर आहार, अनुभवी प्रशिक्षक इत्यादींची फार आवश्यकता आहे. एखादीच व्यक्ती हे सर्व करू शकणार नाही. एके काळी शिक्षणसंस्था पुढाकार घेऊन ह्या सुविधा काही प्रमाणात पुरवीत होत्या. खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असे. शाळा कॉलेजला खेळाडूंचा अभिमान वाटत असे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे खेळ ह्या प्रकाराची दुरवस्था होऊ लागली. अशा परिस्थितीत बेळगाव येथील काही क्रीडाप्रेमी मंडळी खेळाच्या या दुनियेत वेगळा प्रयोग करण्यास पुढे आली. याच कंपूतल्या एका खेळाडूचे नाव आहे श्री. एस. एम. कलूती.

1982 च्या एशियाड क्रीडास्पर्धा प्रत्यक्ष बघुन झाल्यावर श्री कटूती यांना भारतीय खेळाडूंनी केलेली घोर निराशा बघून फार वाईट वाटले. खेळाडूंसाठी काहीतरी करून दाखविण्याची जिद्द त्यांनी मनात बाळगली. त्याचीच फलश्रुती म्हणजे ही चंदरगी येथील क्रीडाशाळा. चंदरगी हे बेळगावपासून 72 किलोमीटरवर बागलकोट रस्त्यावरचे एक छोटेसे खेडे आहे. या प्रकारच्या उपक्रमाला चंदरगी का निवडले गेले त्यामागे एक इतिहास आहे.

नेहमीप्रमाणे पैशाचा प्रश्न उभा राहिला. श्री. कलुती कर्नाटक शासनाच्या सहकार खात्यात रजिस्ट्रार ह्या हुद्द्यावर असल्यामुळे सहकारी क्षेत्रातच अशा प्रकारची संस्था उभी करावी असे त्यांना वाटले. कर्नाटक व महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला वरदान ठरलेल्या ह्या सहकार क्षेत्राचा क्रीडाविकासासाठी उपयोग करून घ्यावा असे त्यांनी ठरवीले. ग्रामीण विभागामध्ये विखुरलेल्या उदयोन्मुख खेळाडूंना चांगले प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्तरावर चमकविण्याची ईर्ष्या बाळगून श्री. कलूती यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 'क्रीडा उत्तेजन व अभिवृद्धी सहकार संस्था नियमित' ह्या नावाने एक संस्था बेळगाव येथे 1984 मध्ये स्थापन केली. जनता व सहकारी संस्थांकडून भाग भांडवल जमा करण्यात आले. संपूर्ण  भारतातच अशा प्रकारचा हा पहिला प्रयोग होता. एस. जी. बाळेकुंद्री, डॉ. ही. ए. हेगडे, बी आर. मुतगी, एम. जे. तेरणेकर, डॉ. के सी. तोडकर गोपाल नायक, बी. एस कती इत्यादी सहकाऱ्यांच्या अविरत परिश्रमांमुळे ही संस्था नावारुपास आली.

क्रीडाशाळा म्हणजे भरपूर मोकळी जागा हे ओघानेच आले. शहरातील भडकत्या भावाने जागा खरेदी करणेही सहकारी क्षेत्रातील गरीब शेतकरी मंडळींना न जमणारी गोष्ट. जागेच्या शोधात असताना पुण्यात स्थायिक झालेले तोरगल ह्या संस्थानाचे माजी महाराज श्री. उदयसिंहराव शिंदे यांनी 18 एकर जमीन व एक दुमजली राजवाडा ह्या संस्थेला नगण्य किंमतीत कुठलीही अपेक्षा न करता देऊन टाकला.

अशा प्रकारे प्राथमिक यशानंतर आणखी जमीन विकत घेऊन चंदरगी येथील ही क्रीडाशाळा आता 75 एकर जमिनीवर वाढत आहे. खेळाडूंना खेळाबरोबरच इतर शिक्षणाची पण सोय केलेली आहे. गुरुकुल पद्धतीने दोन्ही प्रकारचे शिक्षण येथे दिले जाते. 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय येथे आहे. शिक्षणाचे माध्यम कन्नड असून वाचनालय, प्रयोगशाळा आहे. या बोर्डिंग स्कूलमध्ये 300 विद्यार्थी चालू वर्षी असून 10 क्रीडा प्रशिक्षक आणि इतर विषयांसाठी 16 शिक्षक आहेत. शाळेच्या आवारातच बेकरी, डेअरी, लौंड्री सहकारी तत्वावर चालविल्या जातात. विद्यार्थ्यांना सकस शाकाहारी आहार पुरविला जातो.

अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, फूटबॉल, पोहणे, कुस्ती, बासकेटबॉल मल्लखांब, सायकलिंग, हॉलीबॉल, खोखो इत्यादी खेळ प्रकारांचे प्रशिक्षक येथे आहेत. ते सर्व विद्यार्थ्यांबरोबर राहतात. वैयक्तिक लक्ष ठेवून स्पर्धात्मक खेळांसाठी खेळाडू तपार केले जातात. जलतरण तलाव, बेलोड्रोम, इन्-डोअर स्टेडियम, जिम्नेशियम इत्यादी सर्व आधुनिक सुविधा शाळेच्या आवारातच आहेत. फुटबॉल हॉकी साठी स्वतंत्र मैदाने आहेत. सायकलिंगमध्ये जास्त मेहनत करता यावी म्हणून जपानहून आधुनिक स्पोर्ट्स सायकली मागवून घेतल्या आहेत. कुठल्याही क्रीडास्पर्धेसाठी साधनांची उणीव भासू नये ह्याची बारीक सारीक तपशीलासह काळजी घेतली जाते.

शासकीय कृपामर्जी नसूनसुद्धा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या लक्षणीय प्रगतीने जाणकारांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये ह्या शाळेच्या 60 पेक्षा जास्त खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत भाग घेतला आहे. 40 पेक्षा जास्त पदके वेगवेगळ्या खेळामध्ये मिळविलेली आहेत. आट्यापाट्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत लागोपाठ गेली तीन वर्षे हाया क्रीडा शाळेला क्रमांक मिळाले आहेत. 1990 च्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत व्ही. टी. नामेगौडा ह्याने दुसरा क्रमांक मिळविला. सी. पी. हानगंडी व आर. एम. प्रसाद मल्लखांब स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आले. बी. एम. होजूरमठ शॉटपुटमध्ये कर्नाटक राज्यात पहिला आला व राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा आला. कुमार गटात, किशोर गटात ह्या शाळेतील संघ चांगली प्रगती दाखवीत आहे. जीम्न्यास्टिकमध्ये कीर्तिनाथ तपकेरी हा छोटयाशा खेळाडूने पाच सुवर्णपदके पटकाविली आहेत. हे खेळाडू आपल्या अभ्यासामध्येसुद्धा भरपूर तयार आहेत. दहावी परीक्षेचा निकाल 90 ते 100 टक्के लागतो.

श्री. बसवराज कत्ती हे आता ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. हे एक सरळ मनाचे, मितभाषी गृहस्थ असून सहकारी क्षेत्रातील प्रचंड अनुभव पाठीशी असल्यामुळे सरकारी व राजकारण्यांच्या कपिमुष्टीतून ह्या संस्थेला बंधमुक्त करण्यासाठी धडपडत असतात. पुढील काही वर्षांमध्ये संस्थेसाठी काय काय करायला पाहिजे याची स्पष्ट कल्पना त्यांना आहे. प्रत्येक निर्णय भरपूर विचार करून घेतात. शाळेतील उणिवांची पूर्ण कल्पना त्यांना आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या समाजाला उठविण्याचे कठीण काम त्यांना करावे लागणार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा पुढाऱ्यांची कास न धरता पक्षनिरपेक्ष पद्धतीने ही संस्था ते चालवत आहेत. कित्येक वेळा या धोरणामुळे तोटाही होतो. पण क्षणिक लाभासाठी ध्येय धोरणाकडे पाठ फिरविणे त्यांना जमणार नाही.

मुक्त आर्थिक व्यवस्था, डंकेल प्रस्तावासारख्या आंतरराष्ट्रीय विळख्यातून यानंतर आपला देश कितपत सामाजिक कार्यक्रम हाती घेईल ह्याबद्दल संशयच आहे, शिक्षण आरोग्य इत्यादींसारख्या बाबींवर पैसे खर्च करणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीची हानी अशीच समजूत होण्याची शक्यता आहे. डॉक्टर मंडळी आतापासूनच सामाजिक बांधिलकी विसरून धंदा मांडत आहेत. त्यामुळे ह्यानंतरच्या पिढीला शरीराने धडधाकट राहायलाच हवे, सकस अन्न, भरपूर व्यायाम, निर्व्यसन इत्यादींचे पालन करुन डॉक्टर मंडळीना चार हात लांब ठेवल्यावरच आपण थोड्या प्रमाणात तरी आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणू शकू. म्हणून पुढील दशकातील पावले ओळखून अशा प्रकारच्या क्रीडाशाळा उभ्या करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

Tags: क्रीडा स्पर्धा कर्नाटक सहकार क्रीडा खेळ Co-Operative Sector Sports #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके