डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतीय लोक, सर्वेक्षण प्रकल्प : ठळक निष्कर्ष

भारतीय लोक इहवादावर विश्वास ठेवत नाहीत; बाह्य सौंदर्यापेक्षा आध्यात्मिक गोष्टींकडे त्यांचा ओढा असतो इत्यादी पारंपरिक मतांना छेद देणाऱ्या गोष्टी सर्वेक्षणात आढळल्या.

स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकांचा मानववंशशास्त्रदृष्ट्या अभ्यास करण्याची गरज त्या क्षेत्रातील अभ्यासकांना फार वर्षांपासून जाणवत होती. कारण अशा प्रकारचे सर्व समावेशक सर्वेक्षण यापूर्वी झालेच नव्हते. हर्बर्ट रिस्ले यांनी 1905-1909 या काळात येथील मानवजातिवर्णनाचा अभ्यास करून निष्कर्ष काढले होते. पण त्याचा अभ्यास ब्रिटिशव्याप्त भारत व काही संस्थानिकांच्या प्रदेशापुरताच मर्यादित होता. 1930 मध्ये हटन यांनी केलेले सर्वेक्षणसुद्धा साम्राज्यवादी दृष्टीने केलेले होते. 1985 मध्ये 'भारतीय लोक' हा प्रकल्प भारतीय मानववंशशास्त्रीय सर्वेक्षणातर्फे घेण्यात आला. केंद्रशासनाने या प्रकल्पासाठी साडेतीन कोटी रुपये उपलब्ध करून दिले. 

500 संशोधकांना या प्रकल्पासाठी नियुक्त केले. गेल्या अकरा वर्षांत या संशोधकांच्या गटाने 3581 गावे व 1011 शहरे यांतील 25000 व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. भारताच्या 'मानवीय चेहऱ्याचे स्पष्ट चित्र उभे करण्याचा हा एक प्रयत्न होता. प्रकल्प लवकरच पूर्ण होत असून सर्वेक्षण संशोधकांनी संकलित केलेली माहिती चाळीस हजार मुद्रित पाने असलेल्या 43 खंडांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. (22 खंड आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत) 23  सप्टेंबर 96 च्या 'न्यू सायंटिस्ट' या इंग्रजी साप्ताहिकामध्ये तारा पटेल यांनी प्रकल्पातील ठळक निष्कर्षांची ओळख करून दिली आहे. 

सर्वेक्षणात 'जात’ हा घटक न मानता समुदाय किंवा सामूहिक रचना (कम्युनिटी) हा घटक मानलेला आहे. बहुधा एकाच धर्मश्रद्धेने व व्यवसायाने एकमेकांशी जोडलेला व आपण या समूहाचे आहोत याची तीव्र जाणीव असलेला समूह असा समुदाय किंवा कम्युनिटी या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे. सर्वेक्षण केलेल्या 4694 समुदायांपैकी सुमारे 75 टक्के समुदाय राज्य व केंद्रशासित प्रदेश यांमध्ये स्थावर आहेत. तर इतर विखुरलेले आहेत. या सर्वेक्षणाच्या अभ्यासातून काही महत्त्वाचे निष्कर्ष पुढे आले आहेत, त्यांचा हा थोडक्यात आढावा.

विवाहपद्धती

नात्यातील लग्नाचा प्रसार मोठया प्रमाणात आढळला. पूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार ही पद्धत केवळ दक्षिण भारतातील द्रविड वंशामधील काही जमातींमध्येच रूढ होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार उत्तर व उत्तर-पूर्व भागात आत्याच्या मुलीशी व मामाच्या मुलीशी विवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. (अनुक्रमे 43 व 50 टक्के समुदाय) काका पुतणीच्या विवाहाला 7 टक्के समुदायांत मान्यता आहे. बाल विवाहाचे प्रमाण कमी होत आहे. तसेच वधू विकत घेणे हा प्रकार नष्ट होत आहे. स्त्रिया विवाहित आहेत असे दाखविणाऱ्या  41 प्रकारच्या खुणा आढळल्या. 

कुंकू लावण्याचा प्रकार सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळला. 80 टक्के समुदायांमध्ये विधवा विवाहाला विरोध नाही. सती जाण्याची पद्धत असलेल्या जमातीतसुद्धा विधवा विवाहास प्रोत्साहन दिले जाते. कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात स्त्रियांचा मोठा सहभाग असूनही निर्णयप्रक्रियेत त्यांचे स्थान अजूनही गौण आहे. हुंडापद्धती मात्र सर्व थरांमध्ये व सर्व समुदायांत आहे. (99 टक्के) प्रेमविवाह अपवादानेच आढळतात. एक किंवा दोन अपत्य पुरे म्हणणाच्यांचे प्रमाण 17  टक्के समुदारयांत असून तीन तरी अपत्ये हवीत असे म्हणणार्यांचे प्रमाण 50 टक्के समुदायांत आढळले.

सामाजिक आचरण

भारतीय लोक इहवादावर विश्वास ठेवत नाहीत; बाह्य सौंदर्यापेक्षा आध्यात्मिक गोष्टींकडे त्यांचा ओढा असतो इत्यादी पारंपरिक मतांना छेद देणाऱ्या गोष्टी सर्वेक्षणात आढळल्या. प्रगत राष्ट्रांमधील समाजाप्रमाणे भारतीय समाज मद्यसेवन, धूम्रपान व नियमित मांसाहार करणारा आहे. भारतीय अस्तिक आहेत त्यामुळे बहुतेक जण संपूर्ण शाकाहारी असतात हे मत प्रचलित होते. परंतु अन्नसेवनाच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत. पारंपरिक शाकाहारी समजलेल्या समुदायांमध्ये मांसाहार करण्याचे प्रमाण वाढत आहे. संपूर्ण शाकाहाराचे प्रमाण 16 टके समुदायात आहे. मांसाहार करणाऱ्यामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने मासे खाण्यास अग्रक्रम असून त्यानंतर मटन, चिकन व पोर्क यांचा क्रमांक लागतो.

अनेक आदिवासी जमातीमध्ये पूर्वी दूध पिण्याची सवय नव्हती. ती आता लागलेली आहे. गव्हाचा सर्व प्रदेशांत उपयोग केला जात आहे. केवळ भात खाणाऱ्या पारंपरिक प्रदेशांतसुद्धा गहू मुबलक प्रमाणात वापरला जात आहे. 2469 समुदायांमध्ये अनियमितपणे, तर 1106 समुदायांमध्ये नियमितपणे मद्यसेवन केले जाते. धूम्रपान सर्वत्र आढळते (85 टक्के). त्यात बिडी ओढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तंबाखूसेवनाची सवय सर्व ठिकाणी आढळते. रेडिओचा उपयोग सर्वत्र आढळतो. टीव्ही 50 टक्के लोक पाहतात. जळणासाठी लाकडांचा उपयोग सर्वत्र केला जातो (91टक्के).

भाषाविषयक अभ्यास

सर्वेक्षण प्रकल्पामुळे पहिल्यांदाच भाषेविषयी सखोल अभ्यास केला गेला. भाषा-भाषांमधील फरक समजून घेण्यासाठी प्रत्यक्षपणे कुठली भाषा बोलली जाते यावर भर दिला जातो. एकूण 322 भाषा, पोटभाषा व बोलीभाषा प्रचलित आहेत. 24 प्रकारच्या लिप्या आहेत. 1961 च्या गणतीनुसार देशात 1652 भाषा आहेत असा निष्कर्ष काढला होता. परंतु त्या वेळी एकाच भाषेच्या वेगवेगळ्या छटांनासुद्धा स्वतंत्र भाषा म्हणून मानले होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. 65 टक्के समुदाय द्विभाषिक आहेत. बंगाल व अंदमान-निकोबारमधील काही कुटुंबांमध्ये सहा भाषा बोलल्या जातात. यावरून स्थलांतर किती मोठ्या प्रमाणात होत आहे व त्याचा परिणाम नित्य जीवनावर कसा होऊ शकतो हे ठळकपणे दिसून येते. इंग्रजी भाषेचे वर्चस्व मध्यमवर्गीयांमध्ये अजून आहे.

व्यवसाय व उद्योग

व्यवसायपद्धतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. श्रमविभागणीसाठी जातिव्यवस्था ही कल्पना खोटी ठरत आहे. ब्राह्मणांचा केवळ पूजा, हा व्यवसाय किंवा केस कापणे, लोहार काम, चांभार काम हे केवळ कनिष्ठ जातीचे व्यवसाय असे स्वरूप राहिले नाही. जातिनिहाय पारंपरिक व्यवसाय सोडून वेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्याकडे कल वाढत आहे. एकूण 349 प्रकारचे व्यवसाय आहेत असे आढळले. शेती, शेतमजुरी व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय आहेत. सरकारी नोकरीला प्राधान्य दिले जाते. मढे उचलणे, सोलणे, साप / माकड / अस्वल इत्यादींचे खेळ अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. मीठ तयार करणाऱ्या 32 समुदायांपैकी आता केवळ 19 समुदाय शिल्लक राहिले असून यांत्रिकीकरणाच्या दबावामुळे हा व्यवसाय तेवढा फायदेशीर ठरत नाही.

प्रादेशिकता

प्रादेशिक विविधतेबद्दलच्या एका महत्त्वाच्या निष्कर्षाकडे आपले लक्ष वेधले जाते. भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश आता बहुभाषिक, बहुवांशिक व बहुधर्मीय झाले आहेत. यामुळे भाषावार प्रांतरचना. प्रादेशिक अस्मिता या संकल्पना कालबाह्य ठरत आहेत. 776 प्रकारचे आर्थिक व प्रादेशिक असे वेगवेगळे गुणविशेष या सर्वेक्षणात दिसून आले. यांमध्ये प्रामुख्याने विवाहपद्धती, मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार व धार्मिक कर्मकांडे यांचा समावेश होतो. अनेक गुणविशेष प्रादेशिक अस्मितेशी संबंधित असून धर्म ही संकल्पना गौण मानली जाते.

दंगलींचे विश्लेषण

भारतीय इतिहासातील पाने दंगलींच्या वर्णनाने भरलेली आहेत. दंगलींच्या वेळी रक्तरंजित घटनांचे वर्णन केले जाते. दर वेळी या देशाचे काय होणार हा प्रश्न पडतो. परंतु दंगल शमल्यानंतर काही तुरळक अपवाद वगळता जनजीवन सामान्य होते. स्फोटक राजकीय परिस्थितीमुळे दैनंदिन जीवनात ढवळाढवळ होत असते. खेड्यांत अजूनही अस्पृश्यता पाळली जाते. शहरांत जात-पात मानत नसले तरी दंगलीच्या वेळी जाती-जमातींची अस्मिता जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जातिभेद कमी होत आहे हे जरी खरे असले तरी द्वेष  पसरविण्यासाठी मतलबी राजकारणी जातीय अस्मितेचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात.

Tags: व्यवसाय व उद्योग प्रादेशिकता दंगल हटण हर्बर्ट रिस्ले मानववंशशास्त्र प्रभाकर नानावटी Business industry Terrritoriality Riot Hutan Harbart Risle Anthropology Prabhakar Nanawati weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके