डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वैज्ञानिकांच्या जगातसुद्धा स्त्रियांना स्थान नाही!

लाखो-करोडो स्त्रियांसारखी पतिसेवा करण्यात किंवा नट्टा-पट्ठा-पार्ट्या करत आयुष्य घालवण्यापेक्षा सर्व अडचणीचा डोंगर पार करून संशोधन क्षेत्रात या महिला का उतरल्या? त्यांच्यामागे कुठली प्रेरणा होती? याचा आढावा घेतल्यास काही उद्बोधक माहिती मिळते. विज्ञानाची आवड हीच सर्वांत महत्त्वाची प्रेरणा त्यांच्यामागे होती. विज्ञानसंशोधन हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सुखकारक असा अनुभव होता. इतर स्त्रियांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या संगीत, मनोरंजनासाठी वाचन, स्वयंपाक, बालसंगोपन, गप्पा-टप्पा, छान-छोकी, देवदर्शन इत्यादी आवडी निवडीपेक्षा विज्ञानाने त्यांचे आयुष्य उजळून टाकले. संशोधन कार्य व विज्ञान यांच्यावर त्यांचे प्रेम होते.

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी स्त्री-पुरुष विषमतेबद्दल हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यान देतान लिंगभेदाचे सात प्रकार आहेत, असा उल्लेख केला आहे.

1. जीवन-मरण विषमता: स्त्री म्हणून जन्मास आलेल्या अर्भकाची निर्घृणपणे हत्या करणे,
2. गर्भावस्थेतील विषमता: गर्भजल परीक्षा करून स्त्री-गर्भ आढळल्यास भ्रूणहत्या करणे,
3. विषम सुविधाः मानवी प्राणी म्हणून आत्माभिमानाने जगण्यास आवश्यक असलेल्या शिक्षण, आरोग्य, आहार, निवास -इत्यादी सुविधांच्या बाबतीत स्त्रियांना, दुय्यम स्थान देणे; त्यांची हत्या करणे; आत्महत्येस प्रवृत्त करणे.
4. विशेष संधीची विषमता: उच्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा विविध प्रवेश परीक्षा इत्यादींसाठी स्त्री म्हणून सवलती नाकारणे.
5. व्यवसाय विषमता: रोजगार नाकारणे; वेतन कमी देणे; विनावेतन काम करून घेणे; जास्त कष्टाची व निकृष्ट दर्जाची कामे करून घेणे; नोकरीच्या जागी उपद्रव, बदनामी इत्यादींतून स्त्री-पुरुष विषमता पोसणे.
6. संपत्ती वाटपातील विषमताः स्थावर जंगम मालमत्तेच्या वाटणीत स्त्रियांना संपूर्णपणे डावलणे. 
7. घरकाम विषमता: कुटुंब हे पती-पत्नी या दोघांचेही असूनसुद्धा घरकामातील अर्धा वाटा पुरुष उचलत नाही. बालसंगोपन फक्त स्त्रियाच करू शकतात असे पिढ्यानपिढ्या बिंबवल्यामुळे घरकामातील ओझ्याची व कष्टांची कामे स्त्रियांच्या माथीच मारणे.

स्त्री-पुरुष विषमतेची भीषणता विकसित देशांपेक्षा अविकसित वा विकसनशील देशांत प्रकर्षाने जाणवते, हे खरे असले तरी पुढारलेल्या देशांतसुद्धा छुपेपणाने विषमता पोसली जाते. युरोपियन टेक्नॉलॉजी असेसमेंट नेटवर्क या संस्थेने 1088 वरिष्ठ संशोधकांचे सर्वेक्षण केले व त्यांच्या मते केवळ दहा टक्के महिला उच्च पदावर आहेत. इटलीमधील एका संस्थेच्या अहवालानुसार जीवशास्त्रात 50 टक्के महिला पदवीधर असूनही केवळ 9 टक्के स्त्रिया गेल्या 30 वर्षांत प्राध्यापकपदापर्यंत पोचू शकल्या. बुद्धिमत्ता, तर्क व नीतिमत्ता यांबाबतीत स्वतःला नेहमी उजवे समजणाऱ्या वैज्ञानिकांच्या जमावातही विषमतेची बीजे खोलवर रुजली आहेत व स्त्रियांच्या पाठीमागील हा ससेमिरा अजूनही सुटलेला नाही, हे वास्तव आहे. एखाद्या स्त्रीला कथा-कादंबरी लिहावीशी वाटल्यास तिला त्यासाठी घरातील एखादा निवांत कोपरा, लेखन साहित्य, घरकामातून थोडीशी फुरसत इत्यादींची गरज असते. त्याचप्रमाणे एखाद्या विज्ञानशाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या महिलेला संशोधनक्षेत्रात उतरण्यास प्रयोगशाळेतील या संस्थेत एखादं पद, प्रयोगशाळेतील सुविधांचा वापर करण्यास परवानगी, उत्तेजन, प्रकल्पनिधी इत्यादींची गरज असते. परंतु अती प्रगत देशांतसुद्धा वैज्ञानिक संशोधनातील अत्यंत गरजेच्या मानलेल्या संसाधनांवर व मुळात प्रवेश प्रक्रियेवर पुरुष वर्गाचीच सत्ता असते. काही तुरळक अपवाद वगळता स्त्रियांना उच्चपदापर्यंत पोचू द्यायचे नाही हा अलिखित नियम तंतोतंत वर्षानुवर्षे पाळला जातो.

युरोपमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असल्या तरी दहा टक्क्यांपेक्षा कमी स्त्रिया संशोधनक्षेत्रात काम करतात. विद्यापीठ व वैज्ञानिक संस्थेतील वरच्या व मोक्याच्या सर्व पदांवर पुरुषांचीच मक्तेदारी असते. उच्च पद मिळविण्यासाठी पुरुष सहकाऱ्यांपेक्षा जास्त कष्ट घेणे या स्त्रियांना अपरिहार्य आहे. अमेरिकेसारख्या अति-विकसित देशांत अभियांत्रिकी पदवी संपादन करणाऱ्या महिलांची संख्या केवळ 16 टक्के आहे. 9 टक्के महिला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतात. परंतु प्रत्यक्षात केवळ 6 टक्के स्त्री-अभियंत्या अमेरिकेत आहेत. वैद्यकीय संशोधनक्षेत्रात महिला आघाडीवर असल्या तरी प्राध्यापकासारख्या उच्च पदापर्यंत मोजक्याच महिला पोचू शकतात. वैज्ञानिक क्षेत्रात मानाचे समजले जाणाऱ्या विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची यादी चाळल्यास गेल्या शंभर वर्षांत 300 पेक्षा जास्त वैज्ञानिकांना हे पारितोषिक मिळाले आहे. परंतु या पारितोषिक विजेत्यांमध्ये फक्त अकरा महिला वैज्ञानिक आहेत! या 3 टक्के महिलांनासुद्धा हे पारितोषिक सहजपणे मिळालेले नाही.

विज्ञान म्हणजे क्लिष्ट, कळण्यास कठीण, तर्ककर्कश ज्ञानशाखा असल्यामुळे स्वभावाने मृदू, प्रकृतीने दुर्बल, व बुद्धीने 'मेद' असलेल्या स्त्रियांना विज्ञान संशोधन झेपणार नाही; व संशोधनक्षेत्रात त्या प्रगती साधू शकणार नाहीत, असा एक (गैर)समज पुरुष वैज्ञानिकांत रूढ झाला आहे. महिला वैज्ञानिकांना गंभीर विज्ञानात आस्था नसते; व शेवटपर्यंत त्या टिकत नाहीत, म्हणून त्यांना महत्त्वाच्या संशोधनापासून दूर ठेवण्यात पुरुषवर्ग यशस्वी झाला आहे. युद्धभूमीवरसुद्धा पराक्रम गाजवून अनेक शौर्यपदके मिळविणाऱ्या महिलांनी अत्युच्च पदे भूषविली आहेत. परंतु विज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेशासाठी अजूनही त्यांना दार ठोठावे लागत आहे.

एमी नोथर (1882-1935) या गणित शाखेतील वैज्ञानिकेला विद्यापीठात प्रवेश मिळत नव्हता. एवढेच नव्हे तर त्या काळातील शिक्षणपद्धतीमुळे विद्यापीठात मिळविण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या टेक्निकल स्कूलमध्ये शिकण्यासाठीसुद्धा तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. 1920 पर्यंत युरोपमधील स्त्रिया केवळ शिक्षणापर्यंत पोचू शकत होत्या. पुढील शिक्षण त्यांना वर्ज्य होते. विद्यापीठात प्रवेश हवा असल्यास विज्ञान, लॅटिन व ग्रीक विषयांचे शिक्षण खासगी ट्यूशन क्लासमधून घ्यावे लागत असे. लिझी मायट्नर (1878-1968) या स्त्री अणुशास्त्रज्ञाच्या वडिलांनी शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय प्रवेश परीक्षेच्या ट्यूशन क्लासला जाऊ दिले नव्हते. रिटा लेव्ही मोंटाल्सिनी (1909) या वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकेच्या पित्याने तिला वीस वर्षांपर्यंत शालेय शिक्षण घेण्यास परवानगी नाकारली होती. तिच्या संशोधनामुळे पुढील काळात अल्झायमर रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले. लिझी मायट्नर व रिटा लेव्ही मोंटाल्सिनी या दोघींनाही आपल्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात फार उशिराने करावी लागली. विद्यापीठातसुद्धा मेरी क्यूरी (1867-1934) एमी नोथर व लिझी माइट्नर यांना कुठल्याही अधिकृत पदाशिवाय काम करावे लागले.

अमेरिकेतील परिस्थिती युरोपपेक्षा फार वेगळी होती असे समजण्याचे कारण नाही. अमेरिकेतील विद्यापीठांत स्त्रियांना मुक्त प्रवेश असे. परंतु संशोधक म्हणून काम करण्यास मञ्जाव होता. संशोधनक्षेत्रात काम करण्यास एखाद्या पुरुष जोडीदाराची मदत घ्यावी लागत असे. परंतु त्यानंतर संशोधन मात्र एकट्यानेच करायचे, अशा धर्मसंकटात त्या सापडत होत्या.

बालकाच्या आजारपणावर संशोधन करून नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या गेर्टी कोरी (1896-1956) या वैज्ञानिकेला तिच्या वयाच्या बावन्नाव्या वर्षी, तेही नोबेल पारितोषिक मिळाले म्हणून, प्राध्यापकपद मिळाले. मारिया मेयर (1906-1972) या भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या वैज्ञानिकेला एका अतिसामान्य विद्यापीठात विनावेतन काम करावे लागत होते. बार्बरा मॅक्लिंटॉक (1902-1992) या नोबेल पारितोषिक विजेतीची अमेरिकन जेनेटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे विद्यापीठातील नोकरीला तिला मुकावे लागले. ग्रेर्ड्र्युड एलियन (1918) या जीवरसायन शास्त्रातील संशोधिकेला सुमारे दहा वर्षे सेक्रेटरी किंवा तत्सम प्रकारच्या सामान्य नोकऱ्या कराव्या लागल्या. अवयवारोपण, ल्युकेमियासारखे आजार, कॅन्सरच्या उपचारातील साईड इफेक्टस् यांवरील तिच्या संशोधनामुळे एडससारख्या भयानक आजारावर उपचार शोधणे शक्य होत आहे. रोसलिंड फ्रँक्लिन ( 1920-1958) या संशोधिकेच्या माहितीच्याच आधारे डी.एन.ए.चे जनक वॅरसन व क्रिक यांना नोबेल पारितोषिक मिळाले; परंतु शोधनिबंधावर तिचा नामोल्लेखही नव्हता. माहितीचा समावेश करताना तिची संमतीसुद्धा घेण्याची तसदी या दोघांनी घेतली नव्हती. मेरी क्यूरीची मुलगी इरियन जोलिएट क्यूरी (1897-1956) ही पण नोबेल पारितोषिक विजेती आहे, परंतु दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात तिला कम्युनिस्ट ठरवून तिची निर्भत्सना करण्यात आली. एखादी वैज्ञानिका पुरुषांच्या जोडीने संशोधन करत असल्यास वैज्ञानिकांचे जग सर्व प्रशंसा पुरुषालाच बहाल करते. स्त्रीचे नाव केवळ उपचारापुरते आहे असेच समजते. मधुमेहावर प्रगत संशोधन करणाऱ्या टॉलो या पती-पत्नींच्याबद्दल प्रशंसोद्गार काढताना बहुतेकांनी रोसलिन टॉलो (1921)च्या पतीलाच झुकते माप दिले. पतीच्या मरणानंतर संशोधनातील महत्त्वाचे व जास्तीत जास्त कार्य स्वतः केले आहे हे सिद्ध करण्यासाठी रोसलिनला आटोकाट प्रयत्न करावे लागले.

संशोधनकार्यात व्यवसायातील भेदभावाबरोबरच वांशिक व धार्मिक भेदाभेदाचे व दारिद्र्य, युद्धजन्य परिस्थिती, अपंगत्व, आजार, आत्माभिमानाला टोक या इतर मानवी विषम प्रकाराच्या पण स्त्रिया बळी होत्या. मेरी क्युरी, इरिना क्यूरी, डोरोथी हॉजकिन (1910) या स्त्री-वैज्ञानिकांना संशोधनामुळेच जीवघेण्या आजाराने घेरले. दुसऱ्या जागतिक युद्धाने लिझी माइट्नरचे व्यावसायिक आयुष्य बरबाद केले. नाझींच्या छळातून सुटका मिळविण्यासाठी रिटा लेव्ही मोटाल्सिनीला आपल्या शयनगृहातच प्रयोगशाळा उघडावी लागली. गेर्ट्र्युड एलियनला, वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी स्वतःची डॉक्टरेट पदवी पूर्ण करता आली नाही. चिएन शियुंग वू (1912) या एशियन वैज्ञानिकेला युद्धकाळात घरी बसावे लागले. जोसेलिन बेल बर्नेल (1943) हिने पल्सरचा शोध पदवीसंपादन काळातच लावला. परंतु पदवीनंतर उपजीविकेसाठी तिला पार्टटाइम नोकरी करावी लागली.

इतर लाखो-करोडो स्त्रियांसारखी पतीसेवा करण्यात किंवा नट्टा-पट्टा करत आयुष्य घालवण्यापेक्षा सर्व अडचणींचा डोंगर पार करून संशोधन क्षेत्रात या महिला का उतरल्या? त्यांच्यामागे कुठली प्रेरणा होती, याचा आढावा घेतल्यास काही उद्बोधक माहिती मिळते. विज्ञानाची आवड हीच सर्वांत महत्त्वाची प्रेरणा त्यांच्यामागे होती. विज्ञानसंशोधन हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सुखकारक असा अनुभव होता. इतर स्त्रियांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या संगीत, मनोरंजनासाठी वाचन, स्वयंपाक, स्वेटर विणणे, कुटुंबाची काळजी, बालसंगोपन, गप्पा टप्पा, छान-छोकी, देवदर्शन इत्यादी आवडी निवडीपेक्षा विज्ञानाने त्यांचे आयुष्य उजळून टाकले. संशोधन कार्य व विज्ञान यांच्यावर त्यांचे प्रेम होते. विज्ञान संशोधनातील रोमांचकारी अनुभवाने त्यांना भारावून टाकले होते. या संशोधनात पुढे काय होणार आहे, या थरारनाट्याचा त्या अनुभव घेत होत्या. क्षणोक्षणी आश्चर्यचकित होत होत्या. काही स्त्री वैज्ञानिकांना त्यांच्या कुटुंबीयांकडून संशोधनाविषयी प्रोत्साहन मिळत होते. रोसलिन टॉलो या वैज्ञानिकेचा अपवाद वगळता इतर नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या कुटुंबातील व्यक्ती शिक्षण वा वैज्ञानिक क्षेत्रात किंवा अभियंते, डॉक्टर्स, वकील म्हणून आपापल्या व्यावसायिक क्षेत्रांत नावाजलेल्या होत्या. शिक्षण हे आपल्या विकासाचे साधन आहे, या शिकवणुकीचा फार मोठा परिणाम अगदी बालपणापासून त्यांच्यावर झाला होता. शिक्षणाविषयी आस्था व जिज्ञासा हे विसाव्या शतकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. याच काळात स्त्रियांना मतदानाचा व शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून स्त्री स्वातंत्र्याची चळवळ जोम धरत होती. विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. स्त्रियांना असे नगण्य लेखणाऱ्या समाजाला आपणही कुठे कमी पडणार नाही ही उर्मी मनात बाळगून ह्या स्त्रियांनी संशोधन कार्यात झोकून घेतले. संधी चालून आली होती व या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला.

आजही वैज्ञानिक जगातील परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे असे वाटत नाही. पुरुष वैज्ञानिकांमध्ये जुन्या काळात असल्याप्रमाणे उघड आक्रमकता नसली तरी छुपेपणाने लिंगविषयक भेदांना पुष्टी देण्याची प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे. याचबरोबर स्त्री वैज्ञानिकांच्या मनात घर करून बसलेला न्यूनगंडसुद्धा पुरुषी मानसिकतेला खतपाणी घालत आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रांत उच्च स्थान मिळवण्यासाठी व टिकविण्यासाठी वरपांगी ज्ञान पुरेसे नाही. त्यासाठी कुशाग्र बुद्धी, वैज्ञानिक समस्यांची उकल करण्यासाठी भूक-तहान विसरून महिनोनमहिने शारीरिक व बौद्धिक कष्ट घेण्याची तयारी व क्षमता, नेमकेपणा, तर्कसुसंगती, माहितीचा डोंगर उपसून हवे असलेले ज्ञान शोधण्याची हातोटी, गणितीय सूत्ररूपात मांडणी करण्याची कल्पकता इत्यादींची गरज असते. एक काळ असा होता की पक्षी किंवा फळ-फूल-झाडे, जीवजंतू यांचे केवळ निरीक्षण करून व्यवस्थित मांडणी केली तरी वैज्ञानिक म्हणून ओळखले जात असे. आज मात्र अशा प्राथमिक स्वरूपातील गोष्टींना स्थान नाही. परंतु अजूनही स्त्री-वैज्ञानिक, वैज्ञानिक संशोधनाकडे जास्त गांभीर्याने पाहत नाहीत.

सामान्यपणे विज्ञान-तंत्रज्ञान संस्थेत प्रत्यक्ष संशोधन वा प्रकल्पाची कार्यवाही व या संशोधन प्रकल्पाला पूरक अशा सेवा अशी कामाची विभागणी केलेली असते. पहिल्या कामाच्या तुलनेने दुसरे काम सोपे असते. म्हणूनच स्त्री वैज्ञानिक या दुसऱ्या प्रकारची कामे पसंत करतात. त्यांच्या जीवनशैलीला हे कार्य सुसंगत असल्यामुळे प्रत्यक्ष संशोधनात त्या सहसा सहभागी होत नाहीत. त्यामुळे त्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकल्या जातात. याच  कारणास्तव कदाचित विजेत्यांच्या यादीत पारितोषिक विजेत्यांच्या यादीत स्त्रियांची नावे तुरळकपणे आढळत असतील. 

लेखात उल्लेख केलेल्या स्त्री-वैज्ञानिकांच्या पुढेही अनेक समस्या होत्या. परंतु सर्व अडचणींवर मात करून अतिरथी-महारथी अशा पुरुष वैज्ञानिकांना लाजवेल असे संशोधन करून विज्ञानाच्या इतिहासात आपले नाव अजरामर करून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपल्या येथील स्त्री (व पुरुष) वैज्ञानिकांनी कड्या मेहनतीची तयारी ठेवून पाऊल उचलल्यास ठळक संशोधन नक्कीच दृष्टिपथात येऊ शकेल! 

Tags: टॉलो मेयर मारिया गेर्टी कोरी मोंटालेसिनी रिटा लेव्ही एमी नोथर हार्वर्ड विद्यापीठ अमर्त्य सेन वैज्ञानिकांच्या जगात स्त्रियांकडे दुर्लक्ष प्रभाकर नानावटी Ignorance to female scientists in the world of scinetists Prabhakar Nanavati weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके