डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

खरोखरच आपण बुद्धिमत्तेच्या मर्यादेपर्यंत पोचलो आहोत का? विद्यार्थ्यातील बुद्धिमत्ता वाढवण्यासाठीचे आपले प्रयत्न अपुरे पडत आहेत का? उत्तेजन देण्यास कमी पडत आहोत का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला अजून शोधावयाची आहेत. एक मात्र खरे की आर्थिक सुबत्ता व बुद्धिमत्ता यांचे प्रमाण नेहमीचे व्यस्त असते. रोमन नागरिक सुख संपत्तीत लोळत असताना विचार करण्यासाठी म्हणून ग्रीक लोकांची मदत घेत होते. अशीच परिस्थिती आज अमेरिकेसारख्या अतिविकसित देशांच्या बाबतीत. पौर्वात्यांचा वरचष्मा याच कारणासाठी असू शकेल!

पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा हुशार आहे? बुद्धिमत्तेच्या मर्यादेपर्यंत आपण पोचलो आहोत का? विद्यार्थ्यातील बुद्धिमत्ता वाढवण्यासाठीचे आपले प्रयत्न अपुरे पडत आहेत का?

शास्त्रीय पाहण्या काय सांगतात. पूर्व-प्राथमिक वा पहिली-दुसरीतील मुलं जेव्हा 70-80 टक्के गुण मिळवतात, तेव्हा पालकांना आपल्या घरात खुद्द आइन्स्टाइन जन्माला आला आहे, असेच वाटत असते. परंतु जेव्हा हीच मुलं मोठी होऊन आपले गुण उधळू लागतात, तेव्हा मात्र पालकांचे डोळे उघडतात. यासाठी वस्तुनिष्ठपणे विचार करून आपल्या पाल्यांच्या कुवतीचा अंदाज घेणे शहाणपणाचे ठरेल. अनेक वेळा आपला अंदाज चुकत असला तरी सामान्यपणे आजच्या पिढीचा बुद्ध्यांक मागच्या पिढीपेक्षा नक्कीच जास्त आहे. कदाचित आपल्याला खरे वाटणार नाही; परंतु आताची पिढी आपल्यापेक्षा नक्कीच जास्त शहाणी आहे. संगणक, टेलिफोन, टीव्ही, केबल टीव्ही, कार्टून्स, आकर्षक जाहिराती, वेगवान कार्सचे विविध प्रकार इत्यादींमुळे आजची मुलं जास्त 'स्मार्ट’ होत आहेत. त्यांच्या 'स्मार्ट’पणाचा अंदाज टीव्ही चॅनेल सेट करणे, संगणकावरील डेस्कटॉपची रचना, संगणकप्रणालीतील गुण-दोष शोधण्याची कुशलता, संभाषण-चातुर्य, हजरजबाबीपणा, बहुश्रुतता, धडाडी यांवरून सहजपणे येऊ शकतो. मुले आपल्यापेक्षा सरस आहेत, याचा प्रत्यय वेळोवेळी व अनेक प्रसंगी आपल्याला येत असतो. व्हिडिओ गेम्स खेळत असताना आई वडिलांवर ते सहजपणे मात करू शकतात. मुला-मुलींनाही आपले आई-बाबा बावळट आहेत, असेच वाटत असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या वाटण्यात खरोखरच तथ्य आहे. बुद्धिमत्तेच्या मोजमापासाठी बुद्धयांक (आय.क्यू.) हे मापन गृहीत धरल्यास 1950 नंतर बुद्ध्यांकात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुढची पिढी, मागच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आहे, असे जणू काही ही बुद्ध्यांकातील वाढ सुचवू इच्छिते. परंतु असा निष्कर्ष काढण्यात घाई होत नाही ना? बुद्धिमत्ता ही काळाप्रमाणे बदलणारी, लवचिक अशी संकल्पना आहे. मुळात बुद्ध्यांकात वाढ होत आहे याबद्दल मानसशास्त्रज्ञांत मतभेद आहेत. काही संशोधकांना, बुद्धिमत्तेत वाढ झाली नसून कठीण समस्यांची उत्तरे शोधण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे, असे वाटते. इतरांच्या मते बुद्ध्यांक 'वास्तव' परिस्थितीशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या चातुर्याचे मापन ठरत आहे. या वाढीलासुद्धा मर्यादा आहेत व त्यानंतर वाढ शक्य नाही, असेही काही तज्ज्ञांचे मत असल्यामुळे गोंधळात भर पडली आहे.

न्यूझीलंड येथील जेम्स फ्लिन या राज्य शास्त्राच्या प्राध्यापकाने याविषयी संशोधन केले असून बुद्ध्यांक नेमके काय सुचवतात व काय सुचवत नाहीत, यांविषयी त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या शोधनिबंधात चौदा देशांतील तरुण पिढीच्या बुद्ध्यांकांची तुलना केली आहे. नेदरलँड, बेल्जियम यांसारख्या युरोपियन राष्ट्रांमध्ये सक्तीची सैनिक भरती असल्यामुळे तरुणांना बौद्धिक चाचणीला सामोरे जावे लागते. यावरून त्या त्या राष्ट्रांतील सरासरी बुद्ध्यांकांसंबंधीची माहिती फ्लिन यांना मिळाली. इतर काही देशांतील बुद्धांकांची माहिती मिळवून फ्लिन यांनी आपला शोधनिबंध सादर केला.

बुद्ध्यांकांची शाब्दिक, संख्यात्मक व दृक्अवकाशीय अशा प्रकारांत त्यांनी विभागणी केली आहे. शाब्दिक बुद्ध्यांक चाचणीत अचूक शब्दांची वा वाक्यरचनेची, संख्यात्मक चाचणीत अंकगणित व बीजगणित यांच्यावरून संख्यांची व दृकअवकाशीय चाचणीत भूमितीय संरचना, आकृतिबंध यांची निवड करावी लागते. फ्लिन यांच्यामते दृक्अवकाशीय प्रकारातील बुद्ध्यांकातच फक्त वाढ झाली असून इतर प्रकारांत जास्त फरक जाणवत नाही.

याचे परिणाम काहीही असले, तरी आधुनिक मानवाच्या बुद्धीचा प्याला काठोकाठ भरला आहे, असे मानण्यास फ्लिन यांची तयारी नाही. आपले आजोबा, पणजोबा मतिमंद होते व आपण मात्र चतुर, चाणाक्ष आहोत, असा अर्थ काढता कामा नये; फार तर अमूर्त अशा समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी लागणारी बौद्धिक प्रगल्भता व कुशलता आपण आत्मसात केली आहे. असा निष्कर्ष आपण काढू शकतो. अशा समस्यांकडे जास्त गांभीर्याने बघण्याकडे आता कल घातला आहे, असाही अर्थ यातून ध्वनित होते.

आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळातील समस्यांचे स्वरूप सर्वस्वी वेगळे होते. त्यांची बौद्धिक कुशलता त्या काळानुरूप होती. एके काळी औटकी, पावकी, अडीचकी व इतर पाढे तोंडपाठ करण्यातच हुशारी समजली जायची. कारण तोळा, मासा, रत्तल, शेर, मण, पै, आणे, अधेली इत्यादी व्यवहारातील मापनासाठी या पाढ्यांचा उपयोग होत असे. सर्व आकडेमोड तोंडी करावी लागत असे. कॅल्क्युलेटर्स, कॅश रजिस्टर्स, संगणक अशी साधने त्यांना उपलब्ध नव्हती. बेरीज वजाबाकी, गुणाकार-भागाकारसारख्या अंकगणितीय कौशल्याची त्या काळी गरज होती. इंग्रजीतील शब्दसंग्रह व वाक्यरचनेतील प्रभुत्वासाठी तर्खडकरांची पुस्तकं वाचली जात होती. आताच्या युगात बदललेल्या अद्ययावत साधनांमुळे या पद्धती कालबाह्य ठरल्या आहेत. आताच्या पिढीला एकेकाळची ही कुशलता 'काय कामाची', असे वाटत आहे.

फ्लिन यांच्या मते आजचा समाज बुद्धिमत्तेच्या बाबतीत फारच हळवा झाला आहे. जीवनोपयोगी समस्यांकडे पाठ फिरवून अमूर्त समस्या सोडवण्यासाठीच आपली बुद्धी खर्ची घालत आहे. टीव्ही, केबल टीव्ही, संगणक, मोबाईल्स, वेगाने धावणाऱ्या कार्स इत्यादींमुळे दृक्-अवकाशीय कुशलता पिढ्यांनुसार वाढत आहे. ही वाढ एकाच पिढीत झालेली नसून अनेक पिढ्यांतून उत्क्रांत होत आजच्या अवस्थेपर्यंत पोचली आहे. आपल्या बुद्धिमत्तेत वाढ होत आहे, याबद्दल तज्ज्ञांच्या मध्ये दुमत नाही. परंतु ही वाढ कशामुळे होत आहे. याची कारणे मात्र वेगवेगळी आहेत. सकस आहार, निरोगी शरीर, लहान कुटुंब, शिक्षणाची संधी, पर्यावरणीय बदल इत्यादींमुळे बुद्धिमत्तेत वाढ झालेली जाणवते. दृक्अवकाशीय उपक्रमांबरोबरच आपला समाज दिवसेंदिवस जास्त जटिल होत असून त्यातून उद्भवणाऱ्या कठीण समस्यांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांमुळे बुद्धिमत्तेची वाढ होत आहे. उत्तर शोधताना अमूर्त अशा संकल्पना समजून घ्याव्या लागतात. अनुभवाची शिदोरी असावी लागते. मगच समस्यांना परिहार शोधता येतो. सुरुवातीला कुठलीही संकल्पना समजून घेण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद, न्यूटनचे गती-नियम, एंट्रॉपीचा सिद्धांत इत्यादी समजून घेण्यासाठी अर्धे- अधिक आयुष्य खर्ची घालावे लागत असे. सेट थिअरी, इंटिग्रल कॅल्क्युलससारखे विषय पदवी परीक्षेसाठी होते. आज मात्र हेच विषय दहावी-बारावीची मुलं काही महिन्यांच्या अभ्यासानंतर आत्मसात करू शकतात. संकल्पना समजून घेण्यासाठी कमीत कमी वेळ लागत आहे. एकेकट्याने प्रयत्न करण्यापेक्षा परस्पर सहकारातून सामूहिकरीत्या प्रयत्न केल्यास समस्या सुटतात, याची जाणीव होत आहे. त्यामुळे आता कुठलीही समस्या कठीण, असे वाटेनासे झाले आहे.

आकलनक्षमतेत वाढ

परंतु काही संशोधक मात्र बुद्ध्यांकाच्या पलीकडे जाऊन 'वास्तव' परिस्थितीतील बुद्धिमत्तेच्या शोधात आहेत. बुद्धिबळासारख्या मेंदूला ताण देणाऱ्या बौद्धिक खेळात कमी वयातील तरुण-तरुणी ग्रँड मास्टर्स होत आहेत. 1950-1951पर्यंतच्या ग्रँड मास्टर्सच्या वयाच्या सरासरीत बदल झाला नव्हता. 91 नंतरच्या ग्रैँड मास्टर्सचे सरासरी वयोमान मात्र भरपूर खाली उतरलेले जाणवते. कदाचित जीवघेण्या स्पर्धेमुळे, आर्थिक लाभासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा लहान वयापासूनच करावी लागत असल्यामुळे अगदी लहान वयातच अनेकजण ग्रँड मास्टर्स झाले आहेत. वैज्ञानिकांच्या बाबतीतसुद्धा हाच अनुभव आहे. वैज्ञानिकांवरील आर्थिक सामाजिक व शैक्षणिक दबावामुळे शोधनिबंधांच्या संख्येत दरवर्षी लाखोंनी भर पडत आहे. मात्र वास्तवतेशी निगडित असलेल्या पेटंटस्च्या संख्येत मात्र फार मोठी वाढ झालेली जाणवत नाही.

वरील सर्व विधाने पटण्याजोगी असली तरी आजची मुलं हुशार आहेत, याबद्दल शंका नाही. दृक्-श्राव्य माध्यमाच्या वाढत्या प्रसारामुळे मुलांच्या आकलन क्षमतेत वाढ होत आहे. दृक्अवकाशीय प्रकारात त्यांचे प्रभुत्व जाणवत आहे. यामुळे बुद्ध्यांकात वाढ होत आहे हे मात्र नकी. अमूर्त स्वरूपातील जटिल समस्या सोडवण्यासाठीची चलाखी मुलांमध्ये आहे. कठीण प्रसंगांतून येनकेन प्रकारे निभावून जाण्यासाठी मार्ग शोधण्याची कला या पिढीने आत्मसात केली आहे, काही अपवाद वगळता ही चलाखी किंवा 'स्मार्टनेस' आपल्या आजोबा, पणजोबा यांच्याकडे नव्हती.

बुद्धिमत्ता अशीच वाढत राहणार आहे का? आजचे शहाणे समजले जाणारे 2050 साली मठ्ठ समजले जातील का? कदाचित तसे नसावे. यासंबंधीची माहिती घेताना बुद्धिमत्तेतील वाढीचा व औद्योगिकीकरणाचा संबंध जोडता येईल का, याचाही विचार केला आहे. संशोधकांनी ऑस्ट्रेलियातील शिक्षकांनाच हा प्रश्न विचारला. कारण शिक्षकच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे जास्त परखडपणे विश्लेषण करू शकतात. आस्ट्रेलियातील शिक्षकांना मात्र विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होत आहे हे जाणवले नाही. हाच प्रश्न सिंगापूर व कोरिया या देशांतील प्राथमिक शिक्षकांना विचारल्यावर अगदी वेगळीच प्रतिक्रिया ऐकावयास मिळाली. त्यांच्या मते विद्यार्थी फार प्रतिभावान आहेत. या संबंधातील डेन्मार्क येथील उदाहरणसुद्धा उद्बोधक आहे.

डेन्मार्क येथे सक्तीची सैनिक भरती असल्यामुळे 17 वर्षांच्या तरुणांना (व तरुणींनासुद्धा!) बुद्धिमत्तेच्या चाचणीला सामोरे जावे लागते. 1957 पासूनच्या चाचणींचा अभ्यास केल्यास 1960 ते 1997 पर्यंत शाब्दिक, संख्यात्मक वा दृक्अवकाशीय चाचणीत समर्पक उत्तर दिल्यामुळे बुद्ध्यांकात वाढ होत आहे, असे आढळून आले. भूमितीय आकार, संख्यांची मांडणी, संकल्पनेतील नातेसंबंध (सूर्य-दिवस, चंद्र...) अशा प्रकारच्या चाचणीत समर्पक उत्तरे दिली जात होती. परंतु 90 नंतर दृक-अवकाशीय प्रश्नांनाच योग्य उत्तरे लिहिली गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1999 नंतर या बुद्ध्यांकाचा ग्राफ खाली येऊ लागला. शाब्दिक व संख्यात्मक चाचणीतील बुद्ध्यांकाच्या ग्राफमध्ये फरक नव्हता. एवढेच नव्हे तर 1999 साली उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात घट झाली. याची कारणे शोधताना डेनिश तरुण-तरुणीतील चाचणीबद्दलच्या क्षमतेत घट होत आहे, हे लक्षात येऊ लागले. बुद्धिमत्तेच्या वाढीलाही काही मर्यादा असू शकतात हे प्रकर्षाने जाणवू लागले. डेन्मार्क सारख्या अतिविकसित, औद्योगिक राष्ट्रातील बुद्धिमत्तेचा ऱ्हास होत आहे हे पहिल्यांदा लक्षात आले. परंतु पौर्वात्य देशातील समाज गेली 40 वर्षे विकसित होण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे त्यांना परिस्थिती शहाणे बनवत आहे. आर्थिक सुबत्ता व बुद्धिमत्ता यांचे व्यस्त प्रमाण बुद्ध्यांक स्थिर असण्याचे किंवा ऱ्हास होण्याचे अजून एक कारण उत्तेजनांचा अभाव हाही असू शकेल. आस्ट्रेलियन विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात तेथील शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड नाही हेच जणू सुचवायचे होते. विद्यार्थी हुशार किंवा मठ्ठ ही बुद्धिमत्तेची अवस्था नसून शिकण्यासाठी उत्तेजनांची गरज असते. त्यातून आवड निर्माण होऊ शकते. अतिविकसित देशात नेमका याचाच अभाव आहे. संशोधक मात्र या विधानाला आक्षेप घेत आहेत. कदाचित नेहमीप्रमाणे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कमी लेखत असावेत. परंतु कोरियातील शिक्षकांपासून विद्यार्थी जास्त श्रम घेत नाहीत हे जाणवत होते.

दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षांचे परिणाम काय सुचवतात, हाही बुद्धिमत्तेचा निकष होऊ शकतो. कालमानाप्रमाणे प्रश्रांचे स्वरूप सारखे बदलते. विद्यार्थी बदलतात. यामुळे परीक्षांच्या परिणामांवरून निष्कर्ष काढणे तेवढे सोपे काम नाही. या बाबतीतला अमेरिकेतील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांकाचा ग्राफ स्थिर असून ब्रिटनमध्ये तो वाढत आहे. परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून परीक्षेतील प्रश्न सोपे केले असतील ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरोखरच विद्यार्थी हुशार आहेत की नाही हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. एकेकाळी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी 70-80 च्या पुढे नसायची. आता मात्र ती 98-99 च्या आसपास असते. परंतु ही टक्केवारीसुद्धा बुद्धिमत्तेच्या वाढीचे मापन होऊ शकत नाही.

खरोखरच आपण बुद्धिमत्तेच्या मर्यादेपर्यंत पोचलो आहोत का? विद्यार्थ्यातील बुद्धिमत्ता वाढवण्यासाठीचे आपले प्रयत्न अपुरे पडत आहेत का? उत्तेजन देण्यास कमी पडत आहोत का? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला अजून शोधावयाची आहेत. एक मात्र खरे की आर्थिक सुबत्ता व बुद्धिमत्ता यांचे प्रमाण नेहमीचे व्यस्त असते. रोमन नागरिक सुख संपत्तीत लोळत असताना विचार करण्यासाठी म्हणून ग्रीक लोकांची मदत घेत होते. अशीच परिस्थिती आज अमेरिकेसारख्या अतिविकसित देशांच्या बाबतीत. पौर्वात्यांचा वरचष्मा याच कारणासाठी असू शकेल!

(संदर्भ : 'न्यू सायंटिस्ट’: 2 मार्च 2002)

Tags: अंकगणित मानसिक स्वास्थ्य शिक्षण सैनिक भरती मानसशास्त्रज्ञ बुध्यांक विज्ञान न्यू सायंटिस्ट बुद्धिमत्ता प्रभाकर नानावटी The key to the bevelopment of intelligence Prabhakar Nanavati weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके