डिजिटल अर्काईव्ह

म्हसवड ते माणदेशी चँम्पियन व्हाया जॉर्जटाऊन युनिवर्सिटी

मग मला स्वतःच्या लहानपणाची आठवण झाली. बदक पकडायला मी पोहायचो त्यातूनच पुढे मी ‘स्विमिंग’ केलं, ‘बास्केटबॉल’ केलं. त्यातूनच मला आत्मविश्वास आला. अमेरिकेतल्या इतर खेळाडूंना कंपन्यांची गाठ घालून पैसे मिळवण्यासाठी मदत केली. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, माझ्या भागामध्ये अशा हजारो नकुसा आहेत; त्यांच्यासाठी मला काही तरी केलं पाहिजे. आज त्या ऊस तोडण्यासाठी घाम गाळत आहेत. पण त्यांना जी गोष्ट करायला आवडते, त्यासाठी त्यांनी का घाम गाळू नये? स्वेट फॉर समथिंग यू लव्ह. मग त्यानंतर मी ‘माणदेशी चॅम्पियन स्पोट्‌र्स प्रोग्रॅम’ चालू केला.

प्रश्न - तुझ्या बालपणातली तुझ्या लक्षात असलेली पहिली आठवण ऐकायला आवडेल...

- साताऱ्यातल्या माण तालुक्यातलं म्हसवड हे माझं गाव. हा सगळा दुष्काळी भाग आहे. लहानपण म्हटलं की आठवतं... मी घरासमोरच्या गुलमोहराच्या झाडावर चढत असे, झाडांवर चढून मधमाशांचं पोळं काढत असे. चप्पल न घालताच मी सगळीकडे फिरायचो. लहानपणी झाडांवर चढताना बुंध्याचा होणारा स्पर्श अजूनही मला लक्षात आहे... ही माझी पहिली आठवण असं म्हणू शकतो.

आमच्या गावापासून सात ते आठ किलोमीटरवर देवापूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे माझी शाळा होती. मी सायकलवरून शाळेला जायचो. ती कर्मवीर भाऊराव पाटील यांची शाळा. त्यामुळे तिथे ‘कमवा व शिका योजना’ असायची. त्या शाळेची शेती असायची. तिथे कापूस लावलेला असायचा. कापूस साठवायला जिनिंग असायची. आठवड्यातून एक-दोन वेळा आम्ही कापूस वेचायला जायचो. कापसामध्ये गांधीलमाशा असायच्या. काम करता करता आम्ही खोडसाळपणाने त्या माशा एकमेकांच्या अंगावर फेकायचो. रस्त्यातून जाताना मध्येच विहिरीत उड्या मारायचो. आम्ही इतका दंगा करायचो की, त्यामुळे आम्हाला रोज मार खावा लागे. अशी सगळी मजा होती.

लहानपणी महिन्यातून दोन-तीन वेळा आम्हाला लांडगा किंवा तरस कुठे ना कुठे दिसायचेच. आता झाडंच फारशी राहिली नाहीत. त्यामुळे हे प्राणीही कुठे दिसत नाहीत. झाडावर चढलेली मुलं तर मी अलीकडे पाहिलेलीच नाहीत. झाडावर चढून आम्ही सुरपारंब्या खेळायचो. अलीकडे गोष्टी फार वेगाने बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु बालपणात तरी तुम्ही ‘बालपण’ अनुभवलं पाहिजे. बालपणातले असे अनुभव तुम्हाला कायम जमिनीवर राहायला मदत करतात. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ आहे. माझ्या आजीसोबत मी वेळ घालवायचो. आजी मला गाजरं काढायला शेतात घेऊन जायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन म्हशी आणि चार शेरडं घेऊन आम्ही गावाजवळच्या तलावावर जायचो. वाटेत जाताना आम्हाला सापही दिसायचे. आजीने मला साप पकडायलाही शिकवलं होतं. माझ्या लहानपणाबद्दल विचार करताना या सगळ्या गोष्टी आठवतात. आता मी ग्रामीण भागातल्या मुलांमध्येच काम करतो. तिथे पारधी समाजातील मुलं या सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या, पण मी मात्र लहानपणापासून असाच वाढलेलो आहे.

आधी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शाळेत शिकलो. शाळेत शेतीबद्दलही खूप काही शिकायला मिळालं. मक्याच्या पिकाला पाणी द्यायला आम्ही रात्री जायचो. बऱ्याचदा आमच्याकडे 14-14 तास इलेक्ट्रिसिटी नसायची. आम्ही राहायला शेतामध्ये असायचो. पावसाळ्याच्या दिवसांत विजांचा कडकडाट व्हायचा. रात्री दोन-तीन वाजतासुद्धा लाईट गेल्यानंतर बाहेर कुठल्या तारा एकमेकांना चिकटलेल्या आहेत का, हे पाहायला आम्ही जायचो. लांब काठी घेऊन त्या सोडवायचो. दहा वर्षांचा असल्यापासून मी हे करतो आहे. मधमाशांची जीवनशैली कशी असते तेही मला माहीत होतं. आता तर ते मला अधिक शास्त्रीय पद्धतीने माहीत झालं आहे, मी ते सगळं प्रत्यक्ष जवळून पाहिलं होतं. अशा प्रकारचं बालपण अनुभवायला मिळालं याचा मला खूप आनंद आहे.

प्रश्न - खेडेगावामध्ये तुझं बालपण गेलं. शेती करणं असो, साप पकडणं असो किंवा झाडावर सूरपारंब्या खेळणं असो. हे सगळं तू अनुभवलंस. पण 13-14 वर्षांचा असताना अमेरिकेलाही जाऊन राहिला होतास...

- हो, माझ्या आईला (चेतन गाला-सिन्हा) येल युनिव्हर्सिटीमध्ये एक फेलोशिप मिळाली. लहान असताना मी कबड्डी, झाडावरच्या सूरपारंब्या किंवा सूरफाट्या असे खेळ खेळायचो; पण कधीच कुठल्या खेळांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला नव्हता. मला पोहण्याचा छंद होता. आमच्या इथे राजेवाडीला एक ब्रिटिशकालीन तलाव आहे, तिथे आम्ही पोहायचो.

तलावातील बदक पकडण्यासाठी मी खूप वेगाने पोहायचो, त्यामुळे पोहण्यामध्ये खूप पारंगत झालो. आईची येल युनिव्हर्सिटीमध्ये निवड झाली तेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेमध्ये गेलो. तेव्हा मी आठवीत असेन. तेव्हा मला पाण्याला इंग्रजीमध्ये ‘वॉटर’ म्हणतात एवढंसुद्धा माहीत नव्हतं. विमानात मी पहिल्यांदाच बसलो होतो.

अमेरिकेत गेल्यानंतर मला कळलं की, अशा खेळांच्या स्पर्धा असतात. मग मी पोहण्याच्या स्पर्धांत भाग घेतला, स्केटबोर्डिंग मी चांगलं खेळायचो, थोडासा बास्केटबॉलही खेळलो. तिथल्या शाळांच्या टीममधून खेळत असे. अमेरिकेतून भारतात परत आल्यानंतर इथे राज्यस्तरावर खेळलो. साताऱ्यामध्ये माझं अकरावी-बारावीचं शिक्षण झालं. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये असतानासुद्धा खेळांमध्ये भाग घेत होतो. मग पुन्हा पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो. लहानपणी पहिल्यांदा मी अमेरिकेला गेलो होतो, तेव्हा मला इंग्रजी येत नव्हतं. पण खेळांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. मला आत्मविश्वास दिला. (अर्थात तेव्हा ते बदक पकडणंदेखील माझ्यासाठी तितकंच आव्हानात्मक होतं. कारण बदक बुडालं की मीही बुडायचो.) लहान वयात गावातलं जीवन अनुभवायला मिळणं, तेराव्या वर्षी अमेरिकेला यायला मिळणं, खेळांची आवड, आजीचा सहवास या सगळ्या गोष्टींचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. इट मेड माय लाईफ डिफरन्ट, दॅन डिफिकल्ट!

प्रश्न - आजी, आई, बाबा आणि दोन धाकटे भाऊ या तुझ्या कुटुंबाविषयी थोडं सांग.

- माझे वडील ओबीसी समाजातील. त्यामुळे माझ्या आजूबाजूला दलित जास्त होते. माझी आई मुंबईची, जैन समाजातली. लग्नाआधी कधीही ती म्हसवडला आली नव्हती. वडील आणि आई सामाजिक संघर्षांमध्ये काम करत होते. आईने भारतातली पहिली ग्रामीण महिला बँक चालू केली. वडील स्वतः शेतकरी संघटनेत होतेच, स्वतः शेतकरीही होते. त्यांचा आईलाही तिच्या कामात पाठिंबा होता. दोघेही आपापल्या कामांमध्ये व्यस्त असायचे. लहानपणापासून मीही शेतकऱ्यांचे प्रश्न बघितले होते. नामांतरासाठी, संघर्ष वाहिनीमध्ये, दुधाला किंवा उसाला भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेतून केलेल्या आंदोलनामध्ये आई-बाबांना काम करताना मी पाहिलेलं आहे. त्या काळी त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागलेला मी पाहिला आहे.

आमचा दुष्काळी भाग तर गेली 32 वर्षं मी पाहतो आहे. तिथे पाणी यावं म्हणून 2012 पासून आम्ही बंधारे बांधायला सुरुवात केली. त्यासाठी अमेरिकेतून फंडिंग मिळवण्याचे प्रयत्न मी केले. त्यातून शेतकऱ्यांसाठी नदीवर, ओढ्यांवर जलसंधारणाची कामं केली, बंधारे बांधले. इतक्या वर्षांनंतर आता कुठे त्या भागात पाणी यायला लागलेलं आहे. आणि त्यामध्ये माझ्या आई-बाबांचा खूप मोठा वाटा आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो.

माझे छोटे भाऊ माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहेत. मला माझ्या लहानपणी काही गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या त्यांना मिळाव्यात अशी माझी इच्छा होती. एक भाऊ म्युझिक शिकण्यासाठी लहानपणीच म्हसवडबाहेर पडला. तो एका कंपनीमध्ये इंटरनॅशनल म्युझिक मॅनेजर आहे. दुसऱ्या भावाने ॲग्रिकल्चर पॉलिसी या विषयावर अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. मी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो आहे. अमेरिकतल्या सिनेटर्सचे ट्रेड वेबिनार घेणे, भारतातील शेतकऱ्यांसाठी आपण नवीन काय करू शकतो हे आमच्याही आस्थेचे विषय बनले ते आई-बाबांमुळे. पण बाकी आमच्या कुटुंबामध्ये एकत्र येऊन जेवणे वगैरे पद्धत नाही. जे काही करायचं ते आपलं आपण. बहुजन, शेतकरी, दलित यांचे मुद्दे मात्र नेहमीच आमच्या बोलण्यात असायचे. ‘ॲनहिलेशन ऑफ कास्ट’पासून ‘इंडिया आफ्टर गांधी’ ते ट्रायवर नोव्हासारख्या साउथ आफ्रिकन कॉमेडियनच्या पुस्तकांवर आम्ही बोलायचो. एकंदरीत, आम्ही आता ग्लोबल आहोत. पण तरीही म्हसवडमध्ये राहतो. आणि लोकांनाही आमच्याकडे येऊन राहायला आवडतं. दिवसाकाठी आमच्याकडे 10 ते 15 पाहुणे राहायला असतात. मग कोणी युएसमधून आलेलं असतं, तर कोणी युकेमधून. कधी कोणी साधा शेतकरी गंगोतीसारख्या खेड्यामधून येतो. असे वेगवेगळ्या ठिकाणांहून आमच्याकडे लोक येतात. त्यांना आमच्याशी बोलायला आवडतं. ते एक वेगळंच जग आहे.

प्रश्न - अमेरिकेत तुझं उच्च शिक्षण झालं, तिथे तू जॉबही करत होतास. मग तिथून परत येण्याचा निर्णय तू का घेतलास?

- जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीमध्ये मी शिकायला गेलो. ‘बिझनेस आणि फायनान्स’मध्ये मी तिथे मास्टर्स केलं. तिथेच मी एका मुलीच्या प्रेमात पडलो. ती अफगाण-जर्मन वंशाची होती. पंचविशीत असतानाच मी तिच्याशी लग्न केलं. पण मला भारतात परत यायचं होतं. त्यामुळे आम्ही वेगळं व्हायचा निर्णय घेतला. सहा-सात वर्षं आम्ही एकत्र खूप आनंदात होतो. पण अचानक आम्हाला जाणीव झाली की, आमचे पुढचे मार्ग वेगळे आहेत. तिचा आणि माझा प्रवास वेगळा आहे. आणि काही वेळेला तुम्हाला कुठे जायचं आहे, हे तुमच्या मनात अगदी पक्कं असतं. पण तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडता आणि लग्न करता तेव्हा वेगळं होणंही खूप त्रासदायक असतं.

माझा जॉब तेव्हा सुरू होता, मी स्पोर्टस्‌ एजंट होतो. विविध कंपन्या आणि स्पोट्‌र्समधले, ऑलम्पिकमधले प्रसिद्ध ॲथलेट्‌स यांना मी एकमेकांशी जोडून द्यायचो. स्पोट्‌र्स मार्केटमध्ये कंपनीने कशी इन्व्हेस्टमेंट करावी यासंबंधीचे सल्ले द्यायचो. जॉर्ज नावाचा माझा युनिव्हर्सिटी प्रोफेसर होता. आम्ही एकत्र काम करायचो. माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये अधूनमधून मी स्पीकर म्हणूनही जायचो.

आम्ही वेगळे झालो, कारण मला काही तरी वेगळं करायचं होतं. तेव्हा मी विचार केला की, आपण अमेरिकेमध्ये फक्त कामानिमित्त फिरलेलो आहे. मग मी ठरवलं की, आता एक महिना आपण फक्त फिरायचं. कुठल्याही हॉटेलमध्ये राहायचं नाही. पार्कमध्ये किंवा रस्त्यावर किंवा बेघर लोकांसोबत राहायचं. असं करत मी एका महिन्यात सात नॅशनल पार्कस्‌ फिरलो. रात्री ग्रीझली बिअर्स बघितले. आयरिश दहशतवादी ग्रुपमध्ये राहून नंतर पोलीस झालेल्या एका व्यक्तीला भेटलो. 93 वर्षांच्या एका महिलेला भेटलो. ती तरुणपणी एकाच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी  लग्न केलं. तो तिचा नवरा युद्धावर गेला आणि परत आलाच नाही. मग तिने दुसरं लग्न केलं. तो सत्तरी उलटल्यानंतर वारला. मग त्यानंतर दोन वर्षांनी तिचा पहिला नवरा तिला परत भेटला. आणि  त्यांनी परत लग्न केलं. ती मला ट्रेनमध्ये भेटली. आणि तिची ही सगळी कहाणी तिने मला ऐकवली. तेव्हा तिचे दोन्ही नवरे वारले होते. नंतर मी तिला वॉशिंग्टन डीसीमध्ये बोलवलं होतं आणि वॉशिंग्टन डीसी फिरवलं होतं. अशा अनेक सुंदर गोष्टी मला त्या काळात अनुभवायला मिळाल्या. एक मुलगा मला भेटला ज्याच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप होता. तो नऊ महिने जेलमध्ये होता. खरं तर तो निर्दोष होता. माझा एक मित्र अमेरिकन गव्हर्नमेंटमध्ये होता, त्याच्या मदतीने आम्ही त्या मुलाला बाहेर काढलं. लोकांना जाणून घेणं व त्यांना मदत करणं हे मी तिथेही करत होतो.

मी राहायला अमेरिकेत असलो तरी अधूनमधून घरी येत असे. अमेरिकेत स्पोट्‌र्समध्ये किंवा एन्डॉर्समेंट डील्ससंबंधी कामं करत असताना मला वाटायचं की, माझ्या देशात अडचणी खूपच मोठ्या आहेत. एकदा साताऱ्याजवळच्या पाटण तालुक्यामध्ये एके ठिकाणी ऊसतोड मजुरांची टोळी होती. तिथे मी थांबलो होतो. आणि त्यांच्याबरोबर बसून जेवण करत होतो. तिथे एक लहान मुलगी चिंध्यांच्या चेंडूने आबाधुबी खेळत होती. ती खूप खूश होती. मी तिच्या आई-वडिलांना विचारलं की, ‘ती कितवीला आहे?’ तेव्हा ते म्हणाले की, ‘ती ऊसतोड मजुरीचंच काम करते.’ मला खूप आश्चर्य वाटलं. 12 वर्षांची ती मुलगी कधीही शाळेत गेलेली नव्हती. ऊस तोडणीचं काम खूप जपून करावं लागतं. ऊसात सापही असू शकतात. पण जेवणाच्या सुटीत 15 मिनिटं मात्र ती आनंदाने खेळत होती. मी तिला तिचं नाव विचारलं. ती म्हणाली की, ‘माझं नाव नकुसा’. अर्थात मला हे नाव नवीन नव्हतं. तिचं नाव नकुसा, ती कधी शाळेत गेलेली नाही, या वयात ऊस तोडते, वर्षभरात तिचं लग्नही होईल. पण 15 मिनिटं जेव्हा तिच्या हातात बॉल येतो, तेव्हा ती हे सगळं विसरून जाते. तो छोटासा चिंध्यांचा बॉल किती महत्त्वाचं काम करतो, हे माझ्या लक्षात आलं.

मग मला स्वतःच्या लहानपणाची आठवण झाली. बदक पकडायला मी पोहायचो त्यातूनच पुढे मी ‘स्विमिंग’ केलं, ‘बास्केटबॉल’ केलं. त्यातूनच मला आत्मविश्वास आला. अमेरिकेतल्या इतर खेळाडूंना कंपन्यांची गाठ घालून पैसे मिळवण्यासाठी मदत केली. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, माझ्या भागामध्ये अशा हजारो नकुसा आहेत; त्यांच्यासाठी मला काही तरी केलं पाहिजे. आज त्या ऊस तोडण्यासाठी घाम गाळत आहेत. पण त्यांना जी गोष्ट करायला आवडते, त्यासाठी त्यांनी का घाम गाळू नये? स्वेट फॉर समथिंग यू लव्ह. मग त्यानंतर मी ‘माणदेशी चॅम्पियन स्पोट्‌र्स प्रोग्रॅम’ चालू केला. सुरुवातीला शेतीचाच प्लॉट आम्ही चारशे मीटर ट्रॅकमध्ये बदलला. तिथून सुरूवात झाली आणि आता आमच्याकडे स्विमिंग पूल आहे, पाच हजार स्क्वेअर फुटाची अमेरिकन स्टाईल जीम आहे. महाराष्ट्रात अशा तीन-चारच जीम असतील. त्यामध्ये रेस्टलिंगचे आखाडे आहेत. आता स्पॅनिश पद्धतीच्या गावडी स्ट्रक्चरमध्ये मी बास्केटबॉल फॅसिलिटी तयार केली आहे. तिचं निम्मं बांधकाम पूर्ण झालं आहे. मुलींसाठी होस्टेल आहे. म्युझिक सेंटर, परफॉर्मन्स सेंटर, पेंटिंग सेंटर असं सगळं आहे. शेतातल्या ट्रॅकपासून आमची सुरुवात झाली. आता महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम स्पोर्टिंग अँड एज्युकेशनल फॅसिलिटीपैकी ते एक बनलं आहे.

आमच्याकडच्या मुलांच्या काही इंटरेस्टींग स्टोरीज सांगतो. रेश्मा शाळा सुटल्यानंतर म्हशी राखायची. ती परवाच मला आत्मविश्वासाने सांगत होती, ‘मला सगळ्यात पहिल्यांदा पळायला शिकवलं म्हशींनी. कारण म्हैस चरत चरत दुसऱ्याच्या शेतामध्ये जायची. त्यामुळे म्हशीमागे मी पळत जायचे.’ ती म्हशींच्या मागे पळणारी रेश्मा आज बोस्टन मॅरेथॉन करते आहे. परवा सातारा जिल्ह्यामधली मॅरेथॉनही तिने जिंकली. भारतातल्या पहिल्या 10 रनर्समध्ये ती आहे. 22-23 वर्षांची ती घरातली चौथी मुलगी आहे. आणि आता चार-पाच लाख रुपये वर्षाला कमवते. एरवी ग्रामीण भागात या वयातल्या मुलींची लग्न लावून दिली जातात. पण अजून तिचं लग्न झालेलं नाही. कारण तिचं स्पोर्ट्‌समधलं करियर.

तशीच 19 वर्षांची काजल आहे. काजलच्या मोठ्या बहिणीचं नावही नकुसा. तिचं लग्न चौदाव्या वर्षी झालं. तिला घरातून छळ सहन करावा लागला. काजल ऊस तोडायची आणि स्वतःच्या लहान भावालाही सांभाळायची. तिला पाच बहिणी आणि काजल सहावी. तिच्यापाठचा भाऊ सातवा. काजल पूर्वी आकाशात विमानाकडे बघायची तेव्हा तिला कुतूहल वाटायचं. काजल गेल्या महिन्यामध्ये विमानातून आयर्लंडला गेली. तिथे तिने सिल्व्हर मेडल मिळवलं. भारताच्या ज्युनियर फिल्ड हॉकी टीममध्ये ती आहे.

अश्विनी कोळेकर ही धनगर समाजातली मुलगी. आई-वडील शेतकरी. तीही आयर्लंडला गेली आणि तिनेही सिल्वर मेडल मिळवलं. सध्या जिथे स्विमींग पूल आहे त्या ठिकाणी दुष्काळात ‘माणदेशी’ची चाराछावणी होती. तिथे ट्रेन झालेला आमचा खेळाडू बाळू भिसे आता भारतासाठी स्विमींग करतो आहे.

प्रश्न - गेल्या 10-12 वर्षांतला हा प्रवास आहे. तो ऐकायला खूपच भारी वाटतो आहे, पण तो सोपा नक्कीच नसणार. त्यामागे खूप कष्ट करावे लागले असतील. तुझ्याकडून ऐकताना कदाचित असं वाटू शकतं की, हे सगळं किती छान आहे! त्यांचंच शेत होतं, त्यामध्येच ट्रॅक केला. चारा छावणीची जमीन होती, तिथेच स्विमींग पूल केला. पण हे काम तितकं सोपं नाही. मी स्वतः ती चाराछावणी त्या भागात फिरून पाहिलेली आहे. मला असं वाटतं की, तुम्हाला कदाचित दोन प्रकारचे अडथळे आले असतील. एक तर, खेळासाठी कोण पैसे देणार, असा दृष्टिकोन आपल्याकडे अजूनही असतो. त्यामुळे काही आर्थिक अडचणी आल्या असतील. आणि दुसरं म्हणजे, या मुली रोजंदारीवर काम करायच्या. त्या त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचं साधन होत्या. काम करायचं, घर चालवायचं, लहान भावंडांना सांभाळायचं आणि खेळासाठीही वेळ काढायचा! त्यामुळे त्यांना खेळायला पाठवण्यासाठी त्यांच्या समाजाकडून आणि कुटुंबाकडून विरोध झाला असेल. या सगळ्याचा सामना तू कसा केलास?

- मला या मुलींच्या कुटुंबाकडून सगळ्यात जास्त अडचणी आल्या. या मुलींचे पालक मला म्हणायचे की, ‘मुलींना खेळायला पाठवतो, पण तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय देणार?’ अगदी अलीकडचं एक उदाहरण सांगतो. 26 जानेवारी रोजी मला एके ठिकाणी ध्वजारोहणासाठी बोलावलं होतं. तिथे बाहेर रस्त्यावर एक मुलगी होती. निळसर-हिरवे-करडे असे डोळे होते तिचे. 12 वर्षांची असेल. तिच्या पायात चप्पल नव्हती. थंडीमुळे ती थरथरत होती. मी झेंड्याला सलामी देत होतो, तेव्हाच माझं लक्ष तिच्याकडे गेलं. हातात झेंडे घेऊन ती गेटबाहेर उभी होती. मग माझ्या लक्षात आलं की, ती पारधी समाजातली आहे. ती आत आली नाही, कारण गेटवर सिक्युरिटी गार्ड होता. अर्थात त्याने तिला अडवलं नव्हतं. पण मी आत येणं अपेक्षित नाही हे तिचं तिनेच ठरवलं असणार. तिने कसं ठरवलं हे? तिने सिक्युरिटी गार्डकडे पाहिलं, सिक्युरिटी गार्डनेही तिच्याकडे पाहिलं. बस्स! अर्थात त्यात त्याचाही काही दोष नाही. भारतात कुठलंही पद दिलं की, आधी त्या व्यक्तीकडे ‘नाही’ म्हणायचीच सत्ता येते! मग मी तिच्यापाशी गेलो आणि तिला नाव विचारलं. तिने सांगितलं. मग मी तिला म्हटलं, ‘तुझ्या भावाचं नाव काय?’ तर ती म्हणाली, ‘टेम्पो’. टेम्पो का? तर तो टेम्पोत जन्मला! मी तिला विचारलं की, ‘तुम्ही कुठून आलात?’ ती म्हणाली की, ‘आम्ही इकडचे नाही. आम्ही पारधी आहे.’ मग मी तिला विचारलं, ‘26 जानेवारीला काय करतात सांग?’ ती काय म्हणाली असेल? ती म्हणाली, ‘झेंडे विकतात’. मग मी तिला म्हटलं की, ‘तुझ्या देशाचं नाव काय?’ ती म्हणाली, ‘पारधी’. पारधी समाज हा चोरी करणारा समाज म्हणून ओळखला जातो. आपण अजूनही त्यांना सिस्टिममध्ये घेतलेलंच नाही. आणि अशा या मुलांना आम्हाला खेळाकडे वळवायचं होतं. पण हे कसं करायचं हा मोठा प्रश्नच होता. ही मुलं तर त्यांच्या घरच्या उदरनिर्वाहासाठी काम करत असतात. 

मग मी मुलीच्या आई-वडिलांकडे जाऊन त्यांना म्हटलं की, तुम्ही निदान दोन तास तरी मुलांना पाठवा. त्या बदल्यात आम्ही त्यांना रोज चिकन देतो, अंडी देतो. पण मग तिथल्या पारधी वस्तीमधली सगळीच मुलं अंडी आणि चिकनसाठी आमच्याकडे यायला लागली. 2013 पासून आजपर्यंत अशीच परिस्थिती आहे. जी काजल आज भारतासाठी खेळते ती कधी काळी अंड्यांसाठी आणि केळीसाठीच आमच्याकडे आली होती. अजूनही मुलं त्याच आशेने येतात.

पारधी समाज सतत स्थलांतर करतो, धनगर समाजाची तीच परिस्थिती आहे. त्यामुळे अर्थातच मुलंही स्थलांतरित होतात आणि मग शाळा सुटते. यावर उपाय म्हणून पारधी समाजातल्या लोकांनाही नोकरी द्यायला आम्ही सुरुवात केली आहे. आमचा ‘ट्रॅव्हल कोच प्रोग्रॅम’ आहे. आता पारधी लोक काय शिकवणार असं वाटू शकतं. पण ते खूप चपळ असतात. ते दोरीवरून चालू शकतात. मग असे पारधी माणदेशीचं ‘शिक्षक’ असं लिहिलेलं जॅकेट घालतात आणि मुलांना दोरीवरून चालायचं प्रशिक्षण देतात. त्यासाठी आम्ही त्यांना पगार देतो. असं करत करत आम्ही त्यांच्या पालकांना आधी सिस्टीममध्ये आणलं. मग त्यांच्या मुलांची नावं शाळेमध्ये नोंदवून घेतली. पण त्या मुलांचे जन्माचे दाखले नव्हते, आधारकार्डस नव्हती. ती काढली. दहा मुलांची आधार कार्ड काढायला मला सहा महिने लागले! साताऱ्याचे कलेक्टर शेखर सिंग माझे मित्र होते. त्यांनी फोन फिरवून पुढचं काम थोडं गतीने करवून घेतलं. आता 50 पारधी मुलांची आधारकार्डस्‌, शाळेत त्यांची नाव नोंदणी, त्यांना बॅगा देणं असं काम झालं आहे. पण हे टिकलं पाहिजे. त्यासाठी त्यांच्या पालकांची आर्थिक सोय करणंही खूप आवश्यक आहे. पालकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि मुलांना जेवण देणे हे आम्ही नियमितपणे करतो आहोत. 

महिन्यातून एकदा आम्ही पालकांची मीटिंग घेतो. जवळपास 300 ते 400 पालक येतात. कारण, काजल, महाराष्ट्रातली फिल्ड हॉकीची कॅप्टन सरिता अशी उदाहरणं त्यांनी आता पाहिलेली आहेत. सरिता, रेश्मा, काजल, वैष्णवी अशा आमच्या मुलींना ते पालक रोल मॉडेल म्हणून बघतात. आता स्वतः पालक मुलांना सोडायला येतात. आमच्याकडे बसेस आहेत, त्या त्यांना आणतात-सोडतात. आम्ही रिप्रोडक्टिव हेल्थवर सध्या काम करतो आहोत. त्यातही शाळेतल्या शिक्षकांनाच आम्ही ट्रेनिंग देतो. महाराष्ट्र, छत्तीसगड, आसाम या तीन राज्यांमधल्या 800 शिक्षकांना स्पोट्‌र्स आणि वूमन्स रिप्रोडक्टिव हेल्थचं ट्रेनिंग आम्ही दिलं आहे. आपल्याला ऑलम्पियन घडवायचा आहे, एवढाच विचार करून उपयोग नाही. ते कधी घडतील? जास्तीत जास्त मुलं स्पोटर्‌समध्ये येतील तेव्हा! त्यामुळे फक्त 10 नॅशनल खेळाडूंवर मेहनत घेतली आणि त्यांना अमेरिकेला ट्रेनिंग दिलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यासाठी प्राथमिक शाळेपासूनच खेळासाठी स्वतंत्र शिक्षक हवेत. सरकारी शाळांमध्ये असे नेमलेले क्रीडाशिक्षक नसतात. त्यामुळे जे शिक्षक स्वतःहून उत्सुक असतील, त्यांना आम्हीच सर्टिफिकेट कोर्समधून प्रशिक्षण देतो.

आज दहा हजाराहून अधिक ऍथलिटससोबत आम्ही काम करत आहोत. आमचे 10 ते 12 खेळाडू भारताच्या संघांमध्ये आहेत. 80 हून अधिक खेळाडू महाराष्ट्रासाठी खेळत आहेत. पुष्कळ संस्था आम्हाला आर्थिक मदत पुरवतात. मुख्यत्वे त्या प्रोग्रॅम चालवायला पैसे देतात. पण उदाहरणार्थ, सिंथेटिक ट्रॅक आमच्याकडे नाही, तर तो उभा करायला पैसे मिळत नाहीत. आमचं बास्केटबॉलचं फ्लोटिंग स्टेडियम आणि आमचा स्विमिंग पूल पूर्णपणे सोलरवर चालतो. अशा कामांसाठी फंडिंग सहसा मिळत नाही. त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. तुमचे किती खेळाडू ऑलम्पिकमध्ये जाणार, ते आमचा टी-शर्ट वापरणार का असा फंडिंग देणाऱ्यांचा प्रश्न असतो. तुम्हाला ऑलम्पियन तर हवेत, पण त्यांना फॅसिलिटीज द्यायच्या नाहीत; अशा सगळ्या अडचणी असतात.

प्रश्न - सरकारी यंत्रणांचा तुझा अनुभव कसा आहे? खरं तर असे खेळाडू तयार करणं हे सरकारचं काम आहे. सरकारी यंत्रणांची मदत तुला होते का?

- सरकार सात-आठ कोटी रुपये खर्च करून जिल्हास्तरावर एक मोठं स्टेडियम उभं करतं. पण म्हसवड जिल्ह्याच्या ठिकाणापासून अडीच ते तीन तास अंतरावर आहे. मग इथला खेळाडू तिथे खेळायला कसा जाणार? यावर उपाय म्हणून आम्ही सरकारसोबत टाय-अप करतो. मगाशी सांगितलं तसं सरकारी शिक्षकांना प्रशिक्षण देतो. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांतल्या स्पर्धा आम्ही आमच्या ग्राऊंडवरती घेतो. याव्यतिरिक्त सरकारी फंडिंगच्या भानगडीत आम्ही फारसं पडत नाही. माझ्या मते, खेळांसाठी सरकारी मॉडेल हरियाणाच्या धर्तीचं असावं. तिथे प्रत्येक गावामध्ये आखाडे आहेत. आखाड्याची काळजी गावच घेतं. स्पोर्टस्‌ फिल्ड फक्त सरकारचं असून उपयोग नाही. गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन जरी 50 हजार रुपयांची फॅसिलिटी उभी केली तर तीदेखील उपयोगाची ठरू शकते.

आपल्या भागांमध्ये महिलांसाठी टॉयलेट्‌स नसतात. त्यामुळे बारा-तेरा वर्षांनंतर मुली ड्रॉपआऊट होतात. कारण साधारण तेव्हा मुलींची पाळी सुरू होते. याबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून दिल्लीतल्या एका संस्थेसोबत आम्ही पॅडस्‌च्या शेपमध्ये पाच किलोमीटर रन घेतला. त्याच्यामध्ये  600 मुलींनी भाग घेतला. मग त्या संस्थेकडून आम्ही रियुजेबल पॅडस्‌ विकत घेतले आणि त्या मुलींना वाटले.

आता आमच्याकडे रोल मॉडेल्स भरपूर आहेत, त्यामुळे तुलनेने फंडिंगच्या अडचणी कमी आहेत. पण आमच्या लक्षात आलं की, आपल्या मुलांमध्ये क्षमता नाहीत असं नाहीये, पण त्या क्षमतांचा व्यवस्थित विकास करणं आवश्यक आहे. त्यांनी स्वतःच्या आजूबाजूला त्यांना जे दिसतं त्या पलीकडेही विचार करायला हवा. म्हणून ‘क्युरिऑसिटी सेंटर’ नावाचा एक प्रकल्प आम्ही नुकताच सुरू केला. मुलांमध्ये केवळ खेळाच्या चांगल्या क्षमता असून उपयोग नाही, त्यांच्यामधला चौकसपणा वाढला पाहिजे. तो वाढावा म्हणून आम्ही त्यांना नाटकात काम करायला लावतो, चित्रं काढायला लावतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येकी 70 इतक्या बैठकक्षमतेची 360 डिग्री डोम असलेली दोन प्लॅनेटोरियमस्‌ आमच्याकडे आहेत. या प्लॅनेटोरियमच्या कोर्ससाठी मुलांना त्यांच्या शाळेपासून घेऊन येण्यासाठी बस असते. त्या प्लॅनेटोरियमचे स्वतंत्र शिक्षक आहेत, नाटकांच्या उपक्रमासाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. स्पोटर्‌सव्यतिरिक्त सगळे ‘आफ्टरस्कूल प्रोग्राम’ आमच्याकडे सुरू आहेत. ग्रंथालय आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत. आमच्या असं लक्षात आलं की आपण मुलांना शिक्षण, खेळ आणि इतर उपक्रमांची सुविधा पुरवतो आहोत.

आता शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जॉब. नम्रता नावाची आमची एक खेळाडू होती. ती जिल्हा पातळीच्या पुढे जाऊ शकली नाही. पण 17 वर्षांची झाल्याने तिचं लग्न झालं असतं. मग ती म्हणाली, ‘दादा, मला काही तरी करायचं आहे.’ मी तिला विचारलं की, ‘तुला काय बनायचं आहे?’ त्यावर ती म्हणाली, ‘पोलीस कॉन्स्टेबल.’ मग आम्ही तिला ट्रेनिंगसाठी मदत केली. तीन महिन्यानंतर ती कॉन्स्टेबल बनून परत आली आणि म्हणाली की, मी माझ्या गावातली पहिली महिला कॉन्स्टेबल आहे. जॉब मुलींसाठी किती महत्त्वाचा आहे हे मला तेव्हा लक्षात आलं. आमच्याकडे आता 800 मुली आहेत, ज्यांना आम्ही नोकरी देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना रिज्यूमे बनवण्यापासून आम्ही मदत करतो. त्यापैकी 30 मुली पोलीसमध्ये तर 100 मुलींनी बँकिंगमध्ये जॉब मिळवला आहे. त्या प्रोग्रॅममध्ये आम्ही मुलींना विचारतो की, ‘तुमचं स्वप्न काय आहे?’ तेव्हा बहुतेकदा असं उत्तर येतं की, ‘आम्हाला चारचाकी गाडी चालवायची आहे.’ ही एरवी आपल्याला किती किरकोळ गोष्ट वाटते! मग आम्ही जवळपास 500 हून अधिक मुलींना कार चालवायला शिकवली.

प्रश्न - डोकं खूप शिणतं आणि काहीच आपल्या नियंत्रणात नाही असं वाटतं त्यावेळी मीही सरळ गाडी काढते आणि अर्धा तास ड्राईव्ह करत भटकून येते.  त्यातून आय एम इन कंट्रोल’ असा एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. त्या 500 मुलींना तो आत्मविश्वास नक्कीच तुझ्यामुळे मिळाला असणार.. पण कोविडच्या काळातला तुझा अनुभव सांग ना.. 

- कोविड हा सगळ्यांसाठीच खूपच कठीण काळ होता.. कोविडमध्ये आम्ही एक वेगळा उपक्रम राबवला. पीपीई कीट आणि मास्क आम्ही आमच्या फंडिंगमधून द्यायला सुरुवात केली. माण तालुक्यामध्ये एकही सरकारी हॉस्पिटल कोविडसाठी चालू नव्हतं. तालुक्यात कार्डिएक ॲम्ब्युलन्सही नव्हती. चार लाख लोकसंख्या आणि एकच प्रायव्हेट हॉस्पिटल! आणि त्या काळात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किती गैरप्रकार घडले, हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये महाराष्ट्र सरकार, माणदेशी फाउंडेशन आणि आमचे काही कॉर्पोरेट पार्टनर्स यांनी मिळून एका सरकारी इमारतीमध्ये हॉस्पिटल उभं केलं. 30 बेड्‌सचं ते हॉस्पिटल होतं. ते आणि सरकारी हॉस्पिटल मिळून आम्ही आठ हजार रुग्णांवर उपचार केले.

कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये वेगळ्याच अडचणी समोर आल्या. पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नव्हता, डॉक्टर्स मिळत नव्हते. पुणे-मुंबईतून मी डॉक्टर्स मिळवले, त्यांना 50 टक्के जास्तीचा पगार दिला. पण आमच्याकडे ॲडमिट झालेल्या 30 टक्के लोकांना माहीतच नव्हतं की, त्यांना पूर्वी कोणकोणते आजार आहेत. कारण त्यांची कधी तपासणी झाली नव्हती. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, इथे हॉस्पिटल चालवणं खूपच गरजेचं आहे. मग आम्ही तिथे हॉस्पिटल उभं केलं. त्याच्या पुढे जाऊन रेडिओलॉजी सेंटर, पॅथॉलॉजी सेंटर उभं केलं. त्यासाठी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी आणि माणदेशी यांनी मिळून महाराष्ट्र शासनाबरोबर एक व्हाईट पेपर तयार केला. आणि हे सगळं करताना आम्ही मॉडेल समोर ठेवलं ते जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीचंच. गुणवत्ता हाच अंतिम निकष होता. कारण हे लोक गरीब आहेत म्हणून त्यांना सोयी पण गरीब आणि तडजोडीच्या द्यायच्या असं आम्हाला करायचं नव्हतं. त्यामुळे आमची सगळी सेंटर्स त्याच दर्जाची झालेली आहेत. आणि हे सगळं चॅरिटेबल आहे. कोविडमध्ये तर ते मोफतच होतं. इथल्या दोन रुग्णवाहिकांनी कोविड काळात हजारेक लोकांना सुविधा पुरवली. त्या काळात मी सकाळी सातला घरातून बाहेर पडायचो आणि परतायला रात्री दोन-तीन वाजायचे. हॉस्पिटलमध्ये लोकांची चौकशी करायचो तेव्हा ‘यांना आपण वाचवू शकू का’ असं वाटायचं. लोकांची स्वप्नं किती छोट्या छोट्या गोष्टींत असतात, हे मला तेव्हा लक्षात आलं. बेडवर असलेली एखादी व्यक्ती सांगायची की, ‘मला माझ्या मुलीला ग्रॅज्युएट होताना बघायचं होतं’ किंवा ‘स्वतःचं घर घ्यायचं होतं.’ कित्येकांनी आपली ही स्वप्नं उराशी बाळगूनच प्राण सोडले.  

आम्ही आता आणखी एक वेगळाच उपक्रम करतो आहोत. आमचा भाग हा लांडगे आणि तरस यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आता त्यांची संख्या कमी होते आहे. मला त्याबद्दल खूप वाईट वाटायचं. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाचा वनविभाग, अमेरिकेचा दूतावास, माणदेशी फाउंडेशन आणि स्थानिक शेतकरी असे मिळून आम्ही लांडगे आणि तरस यांच्यासाठीचं अभयारण्य माणमध्ये तयार करत आहोत.

प्रश्न - खेळांपासून सुरुवात करून, ग्रामीण भागातल्या महिलांचे प्रश्न समजावून घेऊन त्यासाठी काय करता येईल हेही तू पाहतो आहेस आणि त्याबरोबरच स्थानिक पर्यावरणाच्या समस्यांवरही तू काम करतो आहेस. आता तू वॉशिंग्टन डीसी मध्ये आहेस; तिथल्या माणसांपासून ते थेट माणदेशातल्या छोट्याशा खेड्यातल्या मुलापर्यंत अशी तुझी ह्युमन कनेक्शनची रेंज आहे. त्यामुळे तुला हा प्रश्न विचारावासा वाटतो की, आजच्या तरुणांसमोर काय आव्हानं आहेत? आणि त्यासाठी त्यांनी काय करायला हवं असं तुला वाटतं?

- एकदा ‘क्लिंटन ग्लोबल इनिशिएटीव्ह’ मध्ये 18-19 वर्षांच्या, वेगवेगळ्या देशांतल्या काहीतरी वेगळं काम करणाऱ्या तरुणांना बोलावण्यात आलं होतं. आफ्रिका, अझरबैजान, अफगाणिस्तान आणि जगभरातून तरुण तिथे आले होते. ऑक्टोबरपासून आपण तरस आणि लांडग्यांसाठी अभयारण्य उभं करत आहोत, त्या संदर्भाने मलाही तिथे बोलावलं होतं. तिथे मला अनेक सर्जनशील तरुण भेटले. तुम्हाला दीर्घकालीन कोविड आहे का, ते दाखवणारं ॲप एकाने तयार केलं होतं. एकाने असं तंत्रज्ञान तयार केलं होतं की, तुम्हाला तुमच्या फोनच्या मदतीने एक्स-रे काढता येईल. इतक्या कमी वयाच्या मुलांचे ते आश्चर्यकारक शोध पाहिल्यानंतर मलाच प्रेरणा मिळाली. मी आतापर्यंत जे केलं आहे त्याहून अधिक काहीतरी करायला पाहिजे असं वाटायला लागलं. अशी आपल्या आयुष्यात खूप रोल मॉडेल्स आजूबाजूला असतात. माझ्यासाठी माझ्यासमोर रेश्मासारखी  रोल मॉडेल आहे. जी एकही इंग्रजी शब्द न बोलता आज जगभर फिरते. जगभरच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आमच्या इथल्या मुलांच्या प्रेरणादायी कथा एखाद्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या तर कितीतरी लोकांना त्यांचा उपयोग होईल असं मला वाटतं. त्यासाठीही आम्ही काम करत आहोत. 

आयुष्यात कुठल्या व्यक्तीची भेट, का आणि कशी होईल हे सांगणं अशक्य आहे. आयुष्यात आपण ‘झिरो’वर आहोत असं वाटावं अशा वेळा नेहमी येत असतात. आता व्यक्तिशः मी ‘हंड्रेड’वर असेन कदाचित. पण मलाही ठाऊक नाही की, मी कधी पुन्हा ‘झिरो’वर असेन. आयुष्यात जवळच्या व्यक्ती आपण गमावतो, एखाद्या कामात अपयश येतं आणि आपण ‘झिरो’वर येतो. ‘झिरो’पासून सुरुवात तर होते, पण आयुष्यात तो पुन्हा पुन्हा येतो. त्यासाठी आपण नेहमीच तयार असलं पाहिजे. माझ्या आयुष्यात असे ‘झिरो’ अनेक वेळा आले, पण तेव्हा मी खचून गेलो नाही. आपण नेहमी लोकांशी चांगली नाती जोडत राहिलं पाहिजे, निगर्वीपणाने वागलं पाहिजे आणि कुठलाही नकारात्मक विचार न करता भरपूर मेहनत केली पाहिजे. ‘मी खूप चांगला आहे, पण मला लोक वाईट वागवतात’ असं कधी घडत नसतं. काही वेळा आपल्याला अपेक्षित असेल ते घडत नाही. त्यामुळे खचून न जाता तरुणांनी कायम सर्जनशील राहिलं पाहिजे, तंत्रज्ञानाचा चांगल्या कामासाठी भरपूर वापर केला पाहिजे. अनेक कल्पना लढवल्या पाहिजेत, लिहिलं पाहिजे, आजूबाजूला घडणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. तुमच्यासाठी जे नवीन असेल, जे आता तुमच्यासाठी अवघड असेल अशा गोष्टींमध्ये काम करायला सुरुवात केली पाहिजे. आणि निरपेक्षपणे लोकांना मदत केली पाहिजे. मला आठवतं, मला सुरुवातीच्या काळात अमेरिकेत जॉब मिळवून देण्यासाठी माझ्या एका प्रोफेसरने मदत केली होती. आता अशी वेळ आली की, मी त्याला त्याच्यासाठी अमेरिकेतच चांगला जॉब मिळवून देऊ शकलो. त्यामुळे ‘नेटवर्किंग फॉर अचिव्हींग नथिंग’ हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. लाईफ इज ऑलवेज रिव्हॉल्व्हिंग अराउंड ह्युमन कनेक्शन्स अँड ह्युमन स्टोरीज!

प्रश्न - तंत्रज्ञान ज्यांना सहज उपलब्ध आहेत असे तरुण सध्या एकलकोंडे होत चालले आहेत की काय, असं वाटतं. खरं तर आयुष्यात सगळ्याच बाबतीत कदाचित आपण असे एकेकटे होत चाललेलो आहोत, ह्युमन कनेक्शन हळूहळू कमी होतं चाललं आहे. तर त्या एकटेपणाकडून एकत्वाकडे जाणं खूप आवश्यक आहे, हे तुझं म्हणणं मला अनेक बाबतीत खरं वाटतं. तर आता यापुढचे तुझे स्वतःसाठीचे आणि माणदेशी चॅम्पियन्ससाठीचे प्लॅन काय आहेत?

- आता आमच्या यशस्वी खेळाडूंनी माणदेशी चॅम्पियन्स पुढे चालवावं असं मला वाटतं. त्या जशा खेळातून स्वावलंबी बनल्या तसंच त्यांनी हजारो मुलींना खेळायची संधी द्यावी. 2024 ला अमुक इतके ऑलम्पिक आम्हाला मिळावेत, असे काही माझे प्लॅन नाहीत. ते निश्चितच मिळतील. आत्ताच आमच्याकडे वीसेक इंटरनॅशनल मेडल आहेत. पण ते आमचं ध्येय नाही. आमचं ध्येय हे आहे की, इथल्या प्रत्येक मुला-मुलींना खेळाचा आनंद मिळावा. आणि माझा वैयक्तिक प्लॅन असा आहे की, इथल्या एखाद्या लहान गावातल्या महिलेलासुद्धा गावाजवळच हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा मिळावी. असं झालं तरच आपला देश चांगल्या स्तरावर आला आहे असं मला वाटेल. अगदी प्राथमिक स्तरावरच्या सुविधाही आपल्याकडच्या ग्रामीण भागांमध्ये महिलांना मिळत नाहीत. त्याची सुरुवात व्हावी, हेच माझं आता उद्दिष्ट आहे. आणि आता अभयारण्य झालं की, मी फकिरासारखा तिथे जाऊन राहीन. गवताळ मैदानावरून तिरपा चालत जाणारा चार-पाच लांडग्यांचा समूह एखाद्या टेकाडावरून पाहायला अशी मजा येते ना! मला वाघ बघण्यापेक्षाही त्यांना पाहायला जास्त आवडतं. कारण ती प्रजाती लुप्तप्राय होते आहे. तो माझ्यासाठी अफलातून अनुभव असेल. माणूस आणि निसर्ग यांच्या सुसंवादाने एकत्र येण्यातूनच ते घडेल. तर, ग्रामीण महिलांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणं, खूप मुलांना आनंदाने खेळताना पाहणं आणि सूर्यास्ताच्या दिशेने चाललेला लांडग्यांचा समूह जंगलात बसून पाहणं एवढेच प्लॅन्स सध्या आहेत.

प्रश्न - तुझी यशाची व्याख्या हीच आहे?

- त्या पारधी मुलीविषयी मी मगाशी बोललो ना. ती मला एकदा आमच्या हॉस्पिटलजवळ दिसली. शॉर्टस, नायकी शूज अशा वेषात ती धावत होती. काही दिवसांपूर्वी तिला तिचा देश कोणता हेही ठाऊक नव्हतं. तर ती माझ्यापाशी आली आणि म्हणाली, ‘दादा, गुडमॉर्निंग! मी आता पोहून आले आणि रनिंग करायला चालले आहे..’ याहून वेगळं यश काय असतं?

(शब्दांकन : सुहास पाटील)

संवादक: रिमा अमरापूरकर, मुंबई
amarapurkar.rima@gmail.com

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रभात सिन्हा,  म्हसवड ( 1 लेख )
prabhat@manndeshi.org.in

माणदेशी फौंडेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या माणदेशी चॅम्पियन्स या उपक्रमाचे संस्थापक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी