डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

झेंडावंदनाची वेळ झाली. लोक आतुरतेने इकडे तिकडे बघत होते. पोलीस हातात बंदुका घेऊन नेम धरून उभे होते. अशा वेळेला एक तरुणी अरुणा असफअली जनसमुदायामधून धावत पुढे आली व वंदेमातरमचा नारा पुकारून तिने झेंडा वर चढविला.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 8 ऑगस्ट 1942 ला फार महत्त्वाचं स्थान आहे. त्या दिवशी मुंबईच्या गवालिया टॅकवर महात्माजींचा संदेश ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला होता. त्या अधिवेशनात गांधीजींनी इंग्रजी सत्तेला 'भारत छोडो' चा निर्वाणीचा इशारा दिला व लोकांना 'करेंगे या मरेंगे चा संदेश दिला. कारण स्वातंत्र्याची ही लढाईसुद्धा निर्वाणीची होती. ब्रिटीश सरकारचं अटकसत्र सुरू होणार हेही उघड होतं. गांधीजींचा संदेश ऐकायला त्या जनसमुदायात मी सुद्धा होतो.

खरं म्हणजे बेचाळीस साली सुरुवातीलाच राजकीय वातावरण तापत होतं. गांधीजी हरिजन साप्ताहिकाच्या माध्यमातून जनतेला जागृत करीत होते. माझ्यासारखे पुष्कळ तरुण ते साप्ताहिक वाचत होते. दुसऱ्या बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद देशाच्या विविध भागात जाहीर सभा घेऊन स्वातंत्र्यासाठी मोठा लढा होणार आहे, त्यामध्ये सामील व्हा असं जनतेला आवाहन करीत होते. मुंबईत युवकांचे पुढारी युसूफ मेहेरअली शाळा कॉलेजमध्ये फिरून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेण्याचा संदेश देत होते.

मला आठवतं, आमच्या कॉलेजमध्ये युसूफ मेहेरअलीनी अशी एक हाक दिली की तुम्ही तुरुंगात एक वर्ष राहिलात तर जीवनातलं दहा वर्षाचं शिक्षण मिळणार. त्यांनी तरुणांना एक मंत्र दिला, ऐष आरामात पडून राहू नका. साहसी व्हा. Live dangerously. 9 ऑगस्टची सकाळ झाली. गांधीजी व काँग्रेसचे सगळे पुढारी पकडले गेले. त्या दिवशी सकाळी गवालिया टँकवर झेंडावंदनाचा कार्यक्रम जाहीर झाला होता. आता झेंडावंदन होणार का? हजारोंच्या संख्येने चारी बाजूंनी लोक गवालिया टँककडे जात होते. सगळीकडे बंदूकधारी पोलीस सज्ज होते. लाउडस्पीकरवरून जाहीर करत होते, 144 कलम लागू केलेलं आहे. जमावबंदी केली आहे. झेंडावंदनाची वेळ झाली. लोक आतुरतेने इकडे तिकडे बघत होते. पोलीस हातात बंदुका घेऊन नेम धरून उभे होते. अशा वेळेला एक तरुणी अरुणा असफअली जनसमुदायामधून धावत पुढे आली व वंदेमातरमचा नारा पुकारून तिने झेंडा वर चढविला. 

जनतेने वंदे मातरमचा उत्स्फूर्त जयघोष केला. पोलिसांनी अश्रुधुराचा मारा सुरू केला. जनता व पोलिसांमध्ये युद्धाची ठिणगी पेटली व आमच्यासारखे तरुण 'इन्कलाब झिंदाबाद' चा नारा घेऊन मुंबई शहरात फिरू लागले. संध्याकाळी शिवाजी पार्कला कस्तुरबांची जाहीर सभा होती. त्या सभेवर सरकारने बंदी आणली. बंदी झुगारुन मुंबईचा जनसमुदाय सर्व बाजूने शिवाजी पार्कला चालला होता. त्या सर्व लोकांमध्ये मी पण शिवाजी पार्कला पोहोचलो. शिवाजीपार्कच्या मैदानाने जणू रणभूमीचं स्वरूप घेतलं होतं. पोलीस अश्रुधुराची नळकांडी फेकत होते. काही तरुण तीच नळकांडी पोलिसांच्या दिशेने फेकत होते. शिवाजी पार्कच्या आजूबाजूला सगळीकडे अश्रुधुराचा वास पसरला होता. आजुबाजूला राहणारे स्त्री-पुरुष, मुले आपल्या इमारतीच्या खाली पाण्याच्या बादल्या घेऊन साड्या व धोतराचे छोटे छोटे तुकडे करून जनतेला देत होते. पाण्याने भिजवलेला कपडा डोळ्याला लावून लोक पोलिसांशी लढा देत होते. 

रात्री पोलिसांनी मुंबई शहरात संचारबंदी जाहीर केली आणि तरुण दुसऱ्या दिवशीच्या लढ्याचे पवित्रे आखण्यात गर्क होते. अशी असामान्य कृती करण्याची शक्ती सामान्य मनुष्यात कुठून आली? स्वातंत्र्याच्या मंत्राने त्यांना बेहोश केलेलं होतं. त्याच अग्निज्चालेने माझ्यासारख्या पुष्कळ तरुणांच्या आयुष्याचा नकाशाच पूर्ण बदलला व त्यांचं जीवन कृतार्थ झालं. ज्या ज्या वेळेला जीवनात निराशेचे काळे ढग माझ्यासमोर येताना दिसतात त्या वेळी युसूफ मेहेरअलींनी दिलेला मंत्र 'लिव्ह डेंजरसली' माझ्या कानात गुंजतो आणि हिमतीने मार्ग काढून मी पुढे जातो.

[सौजन्य - मुंबई आकाशवाणी]

Tags: महात्मा गांधी   युसूफ मेहेरअली मौलाना आझाद सरदार वल्लभभाई पटेल  पंडित जवाहरलाल नेहरू प्रभुभाई संघवी Mhatma Gandhi Yusuf Meherali Sardar Vallabhabhai patel Pandit Jawaharlal Neharu Prabhubhai sanghavi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके