डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रबोधनकार ठाकरे हे विसाव्या शतकातील एक झुंजार पत्रकार, सामाजिक सुधारणा व समतेची तळमळ असणारे एक व्यक्तिमत्त्व आणि इतिहाससंशोधक होते. धर्मातील अनुचित आणि अन्याय्य रूढींबद्दल त्यांनी आपली लेखणी अखंड झिजवली. 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' या त्यांच्या विवेचनातील काही भाग येथे एवढ्याचसाठी दिला आहे की देऊळ हे मांगल्याचे धाम नसून काही हितसंबंधी व्यक्तींचा अड्डा कसा बनला आहे याचे विश्लेषण त्यांनी त्यामध्ये केले आहे. विपरीत गोष्ट ही की आज त्यांचेच चिरंजीव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अयोध्येच्या राममंदिर निर्मितीसाठी हिरिरीने पुढे सरसावले आहेत.

उत्तरप्रदेशातील मतपेटीची लढाई भाजप हरला. राममंदिराचे निमित्त करून धार्मिक विद्वेषाचा भडका उडवणं, ही आता या शक्तींची पुढची खेळी असेल. त्यानिमित्ताने धर्म आणि देवळे यावर भेदक भाष्य करणारा प्रबोधनकार ठाकरे यांचा हा लेख.

आजचा हिंदू समाज 'समाज' या नावाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदू धर्म हे एक भले मोठे भटी गौडबंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे असून यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही. उभ्या हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसत नाही. यामुळे धर्मसंस्कृती, संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे, प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुफ्फुसे अजून बरीच दणकट राहिली आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती दैताने सड़ून गेलेली स्वच्छ दिसते, तरी 'द्वैतातच अद्वैत आहे' म्हणून शंख करणारे तत्त्वज्ञानीही काही कमी आढळत नाहीत. परंतु वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे. सभोवार परिस्थितीचा जो नंगानाच चालू आहे; आत्मस्तोमाच्या टिकावासाठी भिक्षुकशाहीची जी कारस्थाने गुप्तपणाने सुरू आहेत; आणि दिव्यावरच्या पतंगाप्रमाणे भटेतर लोक या कारस्थानात जे फटाफट चिरडले जात आहेत, त्यावरून हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही, असे स्पष्ट नमूद करायला या लेखणीस फार कष्ट होत आहेत. निराशाजनक अशाही अवस्थेत हिंदू समाज जगविण्याचे काही राजमार्ग आमच्या धर्मबांधवांना सुचविणे, हेच वास्तविक प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे.

भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय- वसतिस्थान ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पाहावे तो देव 'चराचर व्यापुनि' आणखी वर 'दशांगुळे उरला!' अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती? बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परागंदा होईपर्यंत (म्हणजे इसवीसनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेदकाळची गणना जास्तीत जास्त इसवीसनापूर्वी 7000 वर्षे धरली, तर इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत, पण या देवांना सकाळची न्याहारी, दुपारी पंचपक्वान्नांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय काकडआरत्या, माकडआरत्या, धुपार्त्या, शेजार्त्या आहेतच. कोट्यवधी गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळू हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गोणपाटाचे ठिगळही मिळण्याची पंचाईत, पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेच नाही.

देवळांचा उगम सुमेरियन संस्कृतीतून

देवळे आणि देव यांची आज कशी विल्हेवाट लावावी याचा विचार करण्यापूर्वी या दोन संस्था मूळ अस्तित्वात कशा आल्या, याची रूपरेषा वाचकांपुढे ठेवणे जरूर आहे. आर्यांनी पंजाब सर केल्यावर आणि त्यानंतर अनेक शतके त्यांच्या धर्मकल्पनेत देवळे घुसली नव्हती. त्यांच्या संघव्यवस्थेत राजन्यांच्या (क्षत्रियांच्या) पाठोपाठ उपाध्यांचा भिक्षुक भटांचा वर्ग जरी निर्माण झाला होता, तरी देवळांची कल्पना कोणालाच स्फुरण पावलेली नव्हती. या बाबतीत इजिप्तकडच्या सेमेटिक व सुमेरियन संघांनीच प्रथमतः पुढाकार घेतल्याचे इतिहासावरून दिसते. इजिप्त आणि मेसापोटेमियांत शहरांची प्रथम वस्ती होऊ लागली. त्याचवेळी प्रत्येक शहरात एक किंवा अनेक देवळांचा उगम प्रथम झालेला आढळतो. ही देवळे सामान्यतः राजवाड्यानजिकच असत. मात्र देवळांचा घुमट राजवाड्याच्या घुमटांपेक्षा विशेष उंच बांधण्यात येत असे. देवळांचा हा प्रघात फिनीशियन, ग्रीक व रोमन शहरांतही पुढे पसरत गेला. इजिप्त आणि सुमेरप्रमाणेच आफ्रिका युरोप आणि आशियाच्या पश्चिम भागांकडे जेथे जेथे प्राचीन संस्कृतीचे पाऊल पडत गेले, तेथे तेथे देवळांची उत्पत्ती प्रथमतःच ठळकपणे इतिहासात दृष्टीस पडते. अखिल मानवाच्या उत्क्रांतीच्या व संस्कृतीच्या इतिहासात देवळांची कल्पना ही अशी प्रथमच जन्माला आलेली आहे.

या सर्व देवळांत आतल्या बाजूस एक देवघर किंवा गाभारा असे. यांत अर्ध पशू व अर्धमानव अशा स्वरूपाची एक अक्राळविक्राळ अगडबंब मूर्ती बसविलेली असे. त्याच्यापुढे एक यज्ञकुंड असून देवाला द्यावयाच्या बळींची त्यावर कंदुरी होत असे. ही मूर्ती म्हणजे देय किंवा देवाचे प्रतीक म्हणून व देऊळ म्हणजे या देवाचे वसतिस्थान म्हणून मानण्यात येत असे. देऊळ नव्हते तोपर्यंत देव नव्हता, अर्थात त्याच्या सेवेकऱ्यांचीही गरज नव्हती व उत्पत्तीही नव्हती. पण देवळात देव येऊन बसल्यावर त्यांच्या पूजाअर्चेसाठी शेकडो भट आणि भटणी, तेलबत्तीवाले, झाडूवाले, कंदुरीवाले, धूपार्ती- शेजार्तीवाले, असे अनेक लोक निर्माण झाले. प्रत्येक जणांचा पेहेराव निराळा. लोकांतील शिष्ट, लोकमान्य काय ते हे. आर्यांप्रमाणेच, जो क्षत्रिय तोच ब्राह्मण, तोच गृहपती यजमान, वेळ पडेल तसे काम करणारा, ही पद्धत या लोकांत नव्हती, यांनी आपापला एक निराळाच ठरावीक व्यवसायाचा संघ बनविला. भट म्हणजे भट, मग तो कंदुरी करायचा नाही, कंदुरीवाला निराळा, सारांश. प्रत्येकाने आपापली एक ठरावीक धंद्यांची जातच बनविली, आणि बहुजन समाजातील पुष्कळ हुशार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले.

सहा दिवस काबाडकष्ट केल्यावर सातवा दिवस विश्रांतीचा असावा, त्याचप्रमाणे वर्षातील काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली, आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरविण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे. तिथीवार, सण, खडाष्टक, फडाष्टक इत्यादी भानगडी देवळामधूनच लोकांना कळत असल्यामुळे, देऊळ म्हणजे त्या काळचे चालते-बोलते कॅलेंडर ऊर्फ पंचांगच म्हटले तरी चालेल.

देऊळ म्हणजे सार्वजनिक रिकार्ड हापीस. ज्ञानभांडारही येथेच. सणावारीच लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या देवळात जात असे नव्हे. तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तेथे एकेकटीही जात असे. त्या काळचे भटजी वैद्यकी आणि छांछूही करीत असे. त्यांची प्रवृत्तीही परोपकारी असे. त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे.

आर्यसंस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवीसनाचा उदय होईपर्यंत, धार्मिक क्षेत्रात नव-जीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीचीही वादळे अखंड चालू होती. आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या प्रत्येक लहानमोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेवला होता. सापडेल त्या पशूचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्याच्या आचारविचारांत क्रांती होत होत बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदु समाज ‘अहिंसा परमो धर्म’वाला निवृत्तमांस बनला होता. धर्म आणि ईश्वरविषयक कल्पनाही पार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूलमानाने इसवीसनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकापर्यंत हिंदू जनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. जीर्ण मताभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून, भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात ‘देव आणि देवळे’ आढळून येत नाहीत. नाही म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदानीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती.. इसवीसनाच्या सात-आठव्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या ऊर्फ रजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्यासुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले. लक्षावधी लोकांना मसणवटीत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली. अशा रितीने हिंदुस्थानात हिंदू समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली.

बुद्ध विहारांच्या विध्वंसातून देवळे उभी

ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातील पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तीचा शंकराचार्य व त्यांचे शिष्य यांनी उच्छेद केला, आणि तेथे शंकराच्या पिंड्या स्थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडाबहुत फरक करून त्यांना शंकर-मूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळांत झाले.

शंकराची देवळे निघतात न निघतात, तोच गणपती सोंड हलवीत, मारुती गदा झेलीत, बन्सीधर कृष्ण मुरली मिरवीत एकामागून एक हजर. समाज बहिष्कृत झाल्यामुळे अस्पृश्य ठरलेल्या लक्षावधी लोकांनीही आपल्या जिवाच्या समाधानार्थ म्हसोबा, खैसोबा, चेडोबा असे अनेक 'ओबा' देव साध्या दगडांना शेंदूर फासडून निर्माण केले. आद्य शंकराचार्यांनी रक्तपाताच्या अत्याचारी पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेली भिक्षुकशाही जसजशी तरारू लागली, तसतशी जातिभेदाची आणि देवळांची पैदास डुकरिणीच्या अवलादीला बरे म्हणू लागली. हिंदूंच्या देवळांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे.

शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यातील सूडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती की, चालू घटकेपर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास चालू आहे. हिंदू जनांच्या मनांत बौद्ध द्वेषाचे पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असते, हे वाटेल त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे. वास्तविक या विहारात किंवा लेण्यांत महात्मा बुद्धाचे बौद्ध भिक्षू 'अहिंसा परमो धर्म’चे तत्त्वचिंतन आणि भूतदया क्षमा, शांती या सात्त्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारावरून फिरताच त्यांची खाडकन् स्मशाने बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले. त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला. ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका देवाची अगर देवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांच्या कंदुऱ्यांनी संतुष्ट करणाऱ्या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्याइतक्या फुगल्या.

देवळांचा उपयोग पूर्वी प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल. धर्मप्रसाराचे व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोंड्यादगडया देवदेवींनी आजपर्यंत काय केले, ते इतिहासावरून दिसतच आहे. गिझनीच्या महंमदाचा सोट्याचा तडाखा सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे इंपिरियल बँकेचे बाप असावेत, अशी पुसटसुद्धा कल्पना कधी इतिहासाला आलेली नव्हती. त्या वेळपर्यंत लघुरुद्र महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारे हिंदू आणि त्यांचे पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भुयारांत संपत्ती साठविण्याचा 'धर्मवान' धंदा करीत असतील, हे महंमद गिझनीला जसे बिनचूक कळले, तसे फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाही कळले नसावे, असे वाटते. देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे. सोट्याच्या तीन दणक्यांत पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुन्ह्याचे कागदपत्र मिळाले, तर असल्या घसघशीत बोहाणीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडसी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते?

देवळे म्हणजे धर्मांची आगरे. धर्माची गंगा येथेच उगम पावते. त्या उगमावरच भटांचे आसन. देवळांत तर प्रत्यक्ष देव, साऱ्या विश्वाचा स्वामी. 'चराचर व्यापुनी' आणखी वर जो ‘दशांगुळे उरला', तो हिंदूंच्या देवळांत जाऊन भरला. असल्या देवांचे कोण काय करणार? पण अशा त्या जगच्चालक सर्वपराक्रमी कर्तुमकर्तुम् अन्यथाकर्तुम सोमनाथावर ज्या वेळी महंमदाने सोटा उगारला, त्यावेळी रजपूत राजांच्या घिसाड दक्षिणांवर टोणग्यांप्रमाणे चरणारे हे देवधर्म-संरक्षक भट होते कोठे? ते सारे पंचा सावरून आधीच पळाले होते. सोमनाथ म्हणे मोठे जागृत कडकडीत दैवत. पण या दैवताचा कडकडीतपणा आणि जागृतपणासुद्धा ऐनप्रसंगी वायबार ठरला. जेथे देवच स्वतःचे संरक्षण करू शकला नाही, तेथे भटांनी तरी का हकनाहक प्राण द्यावेत; आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून तो जनानखान्यापर्यंतची दलाली देवाशी किंवा देवाच्या नावावर करण्यास सवकलेल्या हिंदू राजांनी देवासाठी व देवळासाठी काय म्हणून शस्त्र उचलावे?

देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोणी दाखवून देईल का? म्हणे ब्राह्मणांनी धर्म जगविला!

भटाच्या पोटापाण्याचे वर्म देवळातच

आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो, हे पाहिले पाहिजे, मूर्तिपूजा अथवा प्रतीक पूजा अनादिमध्यांतमनंतनीर्यम' अशा परमेश्वर चिंतनार्थ उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळ क्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलेही. परंतु देवळातली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे, केवळ धोंडा, भातुकलीच्या खेळांतल्या बाहुलीसारखी क्षुद्र वस्तू. ही वस्तुस्थिती पुजारी भटदलालांपासून तो तिच्यापुढे कपाळे घासणाऱ्या भक्त भक्तिणींपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते. असल्या घोड्याची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्तांचे मुळीच संरक्षण अगर तारण करू शकत नाही, हे प्रत्येक हिंदुमात्राला कळत असूनही देवळातील घंटा बडवायला सांजसकाळ कोटयवधी हिंदू काय म्हणून देवळात जातात? हिंदू लोकांची देवळा-देवांविषयी भावना जर अस्सल आणि आत्यंतिक प्रेमाची असती, तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देऊळ व एकही देव खास बळी पडला नसता. तरीही देव देवळांविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जिव्हेचा धबधबा पहावा, तो त्याच्या धडधडाटापुढे गिरसप्पा नायगाराच्या कानठळ्या बसतात! हे काय भटबंगाल आहे?

देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचे गुप्त मर्म आहे. या मर्माचे वर्म अफाट भटेतरांना कधीच उमगू नये, म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे. गीता व उपनिषदादी आचारविचार-क्रांतिकारक आणि सत्यशोधक ग्रंथ कितीही असले, तरी देवळांवर देह जगविणाऱ्या या भूदेवांचा विशेष मारा या पुराणांवरच असतो.

देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही, हा एक सनातनी नियमच ठरून गेला. ह्यामुळे पुराणप्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढविण्यासाठी देवांचीही संख्या वाढवीत ३३ कोटींवर नेऊन भिडविली. त्यात पुन्हा देवांमध्येही श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या. विष्णुपुराणांत विष्णू श्रेष्ठ, बाकी देव लुच्चे. गणेशपुराणात गणोबा श्रेष्ठ, बाकी देव कुचकामी. देवीपुराणात देवी श्रेष्ठ, बाकी पुल्लिंगी देव सारे बदमाश. अशी देवतादेवतांतच लठ्टालठ्ठी लावून दिली; आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्तसंघ हिंदू समाजात चिथावून दिले. त्यामुळे प्रत्येक देवाचे देऊळ, या अहमहमिकेने साऱ्या हिंदुस्थानभर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला. निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायांत जरी आडवा उभा विस्तव जाई ना, तरी सर्व देवळांत भट मात्र अभेदभावाने देव मानवातला दलाल म्हणून हजरच.

भटांनी शेकडो ईश्वर निर्माण करून देवळापायी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न चबचबीत वंगणावर सफाईत सोडवून घेतला. काकतालीय न्यायाने पुजारी बनविलेल्या भटांची घराणीच्या घराणी त्या त्या देवळाचे वंशपरंपरागत वतनदार बनली. पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदू देवांना गावे, जमिनी, दागदागिने आंदण द्यावी, ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत. नाव देवाचे आणि गाव भटाचे.

कित्येक देवळांतल्या देवांचे जमीन-जुमल्याचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे असून, वार्षिक यात्रेचा खुर्दा लाखाच्या खाली जात नाही. या मलिद्यावर किती लक्ष भटांची ऐदी पोटे रांजणासारखी फुगत असतात आणि त्यांच्या आपापसांतील यादवीमुळे कज्जेदलालीचा कसा धूडगूस चालत असतो, याची कमिशनद्वारा चौकशी केली, तर भयंकर विलक्षण प्रकार उघडकीस येतील.

सारांश, धर्माची देवळे म्हणून हिंदू कितीही नाचत असले, तरी आजच्या देवळांचा धर्म असा चमत्कारिक व शिसारी येण्याइतका गलिच्छ बनला आहे की त्यापुढे शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची ‘पवित्र पुराणोक्त' कथा पुष्कळच सभ्य ठरेल.

देवळांमुळे आणि त्यांतील देवांमुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती किती झाली, हे भटेभिक्षुकांच्या लठ्ठ तुंदिलतनूंवरून ठरवायचे असेल. तर आजचा हिंदू समाज आध्यात्मिक मोक्षाला पोचल्याची थेट पावली द्यायला काही हरकत नाही. देव देवळांनी थेट परमहंस स्थितीला नेऊन भिडविलेल्या हिंदू जनांना हे राजकारणी आणि समाजकारणी नसते उपद्व्याप हवेत कशाला? पण ज्याअर्थी हे उपद्व्याप चालू आहेत, त्या अर्थी धर्मनीती न्याय आणि सामाजिक संघटनांच्या कामी हिंदूंची देवळे आणि त्यांतील देव म्हणून पूजलेले दगडधोंडे अखेर मातीमोल ठरल्याचेच सिद्ध होत आहे.

हिंदुस्थान दरिद्री झाला; मातीतून अन्न काढणारा शेतकरीवर्ग भिकेला लागला; देशी धंदे ठार मेले; मध्यमवर्ग नामशेष झाला, सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली इत्यादी आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांड पंडितांनी, हिंदुस्थानातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्धाराच्या कामी न होता, लुच्चे, लफंगे, चोर-जार, ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची बेळ आली आहे.

देवळांत माजलेला अनाचार

देवळांच्या छपराखाली ब्रह्मचाऱ्यांचे वंश किती वाढतात; पती नसताही किती पतिव्रता पुत्रवती होतात; किती गोसावडे सावकारी करतात; किती गुरुमहाराजांचे मठ गोकुळकाल्यांत कटिबंध बुडतात, आणि किती पळपुट्या चंगीभंगी टग्यांचे थर तेथे खुशाल चेंडूप्रमाणे जगतात, या गोष्टीची न्यायनिष्ठुरतेने जर कसून तपासणी होईल, तर मुसलमानांनी देवळांवर घाव घालण्यापूर्वी, किंवा बोल्शेविझमवजा विचारांची वावटळ उठण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुण हिंदू संघ निराशेच्या झटक्यात या देवळांची राखरांगोळी करायला अस्तन्या वर सारून पुढे कधी काळी सरसावलाच, तर त्यात आश्चर्य वाटायला नको. धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की, त्याचे उच्चाटण केल्याशिवाय हिंदू जनांचे अस्तित्व यापुढे बिनधोक टिकणे बरेच मुश्किलीचे आहे. देवळे जर धर्माची मंदिरे, तर तेथे अखिल हिंदुमात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे. परंतु, सामाजिक बाह्यप्रदेशात भटांनी माजविलेला जातिभेद व जातीद्वेष या धर्ममंदिरांतूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूच्या जातिद्वेषाची नरककुंडेच म्हटली तरी चालतील.

मूर्तीपूजा बरी की वाईट, खरी का खोटी, तारक का मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी, देवळातल्या देवांत काहीतरी विशेष देवपणा असणे आणि तसा तो अकिल्मिष भासणे अगत्याचे आहे. देवाचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे मुक्ति चारी साधियेल्या।। अशा भावनेचे अभंग कवनात कितीही गोड वाटले, तरी ते हिंदू देवळांच्या व देवांच्या बाबतीत शब्दशः भंगतात. 

देवळात गेले की मग क्षणभर तापांतून मुक्त व्हावे. शांत व्हावे. घटकाभर जगाला विसरावे आणि देवाच्या चरणावर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंतत्वात विलीन व्हावे, असा अनुभव येण्याइतके या देवांच्या मूर्तीत काय असते? 'हिंदू' म्हणविणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला, मग तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असो, महार, मांग, धेड, अस्पृश्य असो, नाहीतर शुद्धीच्या मार्गाने परावर्तीत झालेला असो, त्या प्रत्येकाला हिंदू देवळात जाऊन तेथील हिंदू देवांची यथाभाव यथासाहित्य स्वतः पूजा करण्याचा, निदान त्या मूर्तीच्या चरणांवर मस्तक ठेवण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे. हा अधिकार जेथे जेथे नसेल, लौकिकी व्यवहारातले जातिभेद, मतभेद, आचार-विचारभेद जर देवळातही धुडगूस घालीत असतील, आणि 'अनाथाचा नाथ होसी तू दयाळा’ अशा देवापुढेही जर आमचा माणूसघाणेपणाचा उकिरडा सदैव पसरलेला राहात असेल तर कोणाच्याही मनोभावांची पर्वा न करता, कडवे सुधारक या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन, आम्ही स्पष्ट म्हणतो की, ही देवळे नसून सैतानखाने आहेत. हिंदू संघातल्या माणसामाणसांतच असली दुस्मानी सुलतानी गाजविणाऱ्या देवळांच्या पुरस्कारकर्त्यांच्या शुद्धिसंघटनांच्या वल्गना किती दांभिकपणाच्या आणि लुच्चेगिरीच्या आहेत, याचा वाचकांनीच विचार करावा.

सध्या लोकशाहीचे वारे वाहत आहे. व्यक्तिमात्राच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाचीही प्राज्ञा नाही. अशा वेळी हिंदू देवळांतही लोकशाहीची वावटळ घुसणे अगत्याचे आहे. राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणारांनी इतर सर्व क्षेत्रांतील गुलामगिरीची आणि गुलामगिरीप्रवर्तक सर्व संस्थांची राखरांगोळी केली पाहिजे. हिंदू समाजात माणूसघाणेपण पसरविणाऱ्या देवळांची विल्हेवाट लावण्याचे तीन मार्ग आम्ही हिंदुजनांना सुचवीत आहोत.
 
पहिला मार्ग बहिष्काराचा. हिंदूंच्या देवळात भटांशिवाय हिंदूंच्या प्रवेशाचा व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाथाडला जात असेल तर ती देवळे 'हिंदूंची' नव्हेत. ती सैतानांची स्मशानमंदिरे समजून त्यांच्यावर बहिष्कार टाकावा. या उपायाने देवळांचे पापी डोलारे जमीनदोस्त होण्यास कालावधी लागेल, आणि तोपर्यंत हिंदूंच्या जीवनात अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळीच बंद पडणार नाही. दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब ठेचून भरलेली आहे, की साऱ्या भटेतर दुनियेने देवळांवर जरी बहिष्कार घातला, तरी देवळांचा वर्णाश्रमी' सनातनी सवतासुभा भटजात बिनबोभाट आणखी दहा शतके चालवील. जुने देव आणि जुनी देवळे किफायतशीर होणार नाहीत, या दूर धोरणाने त्यांनी आतापासूनच नव्या धर्तीच्या देवळांचा उपक्रम सुरू केला आहे. आज जे पुतळे दिसत आहेत, नवीन नवीन बनत आहेत आणि त्यापायी जनतेचे लक्षावधी रुपये कायद्यांच्या ठाकठीक चापांतून बिनबोभाट दडपले जात आहेत, त्याकडे विचारपूर्वक पाहा; म्हणजे आमच्या शंकेची मख्खी समजून येईल. तात्पर्य, बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितका खटकेबाज उपायाचा नव्हे.

दुसरा मार्ग वहिवाटीला धाब्यावर बसवून, किंबहुना वहिवाटीचा चेंदामेंदा करून, हिंदुत्वाच्या ठळक सबबीवर अखिल हिंदू जनांनी देऊळ-प्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार धिटाईने बजावावा. धर्मात सरकार हात घालीत नाही, अशी एक गैरसमजूत रूढ आहे. धिटाईने देवळात प्रवेश करण्याच्या अगर देवपूजेच्या बाबतीत जर भटांच्या बाजूने सरकारी कायदा आडवा येत असेल, तर भटेतर अखिल हिंदू जनांच्या हिंदुत्वाचा तो अपमानच होय. असा अपमान सहन करण्यापेक्षा सत्याग्रह करून मेलेले काय वाईट? मात्र हा निर्वाणीचा प्रश्न दगड्या देवदेवींची पूजा करण्यास हपापलेल्या अंधश्रद्धाळू हिंदूंचाच आहे. नवमतवादी सुधारकांना देवदेवळांची गुलामगिरी यापुढे साफ नको आहे.

देवळे आपल्या मूळ धर्मापासून का चेवली? तर ती भटा भिक्षुकांच्या एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून. देवळात भट का घुसला आणि शिरजोर झाला? तर देवळात एक कोणी तरी दगड्या देव बसला म्हणून. देवामुळे भट आणि भटामुळे देवळे. अर्थात देवाचीच उचलबांगडी केली, तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्तेला कायमची गती मिळून, देवळांच्या इमारती व त्यांची उत्पन्ने हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होतील. हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंडी जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्यांचे एक कायम प्रदर्शन करावे. म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहाससंशोधकांना या प्रदर्शनामुळे हिंदू जनांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यासता येईल. रिकामी पडलेली देवळे आणि त्यांची कोट्यवधी रुपयांची उत्पन्ने याचा हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी व प्रगतीसाठी कसकसा उपयोग करावयाचा, ठरविण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे. अशी काही योजना झाल्यास पथ, मत, पक्ष भेदांचा निरास होऊन देवळांचा अनेक सत्कार्याकडे उपयोग होईल. सार्वजनिक वाचनालये, संशोधन शाळा, वेधशाळा, शास्त्रीय प्रयोगशाळा, दवाखाने, अनाथाश्रम, सोशल क्लब, व्याख्यानमंदिरे, तालीमखाने, सहभोजनशाळा इत्यादी नाना प्रकारच्या, देशोद्धारक गोष्टींकडे देवळांचा सदुपयोग अभेद भावाने करता येणे शक्य आहे. शुद्धी संघटनांचे कामही तेथे उत्तम होईल. या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदू जनांना दाखविता येत नसेल, तर स्वराज्यालाच काय, पण जगायलाही ते कुपात्र ठरतील, यात मुळीच संदेह नाही.

Tags: आद्य शंकराचार्य सम्राट अशोक बौद्ध धर्म सुमेरियन संस्कृती अयोध्या राम मंदिर निर्मिती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे adya Shankaracharya Samrat Ashok Buddha religion sumerian culture Ayodhya Ram Temple reconstruction Shivsena supremo Balasaheb Thakre Prabodhankar Thakre weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार)

जन्म : 17 सप्टेंबर 1885; मृत्यू : 20 नोव्हेंबर 1973
मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके