डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साने गुरुजींनी सांगितलेली गोष्ट

ही गोष्ट साने गुरुजींनी येरवडा तुरुंगात आम्हां राजबंद्यांना सांगितली. गुरुजींच्या रसाळ वाणीतून गोष्ट ऐकणे हे एक वेगळेच भाग्य होते, मला लाभले. तशी गोष्ट मला सांगता येत नाही, लिहिताही येत नाही. साने गुरुजींच्या जन्मदिनी आज मी ती गोष्ट तुमच्यासाठी, मला आठवते तशी, थोडक्यात लिहीत आहे.

बालमित्रांनो,

तुम्ही मुले ज्याप्रमाणे शाळेत शिकता त्याप्रमाणेच कौरपांडव हेही शिकत होते. ते राजपुत्र होते आणि म्हणून त्यांना गदायुद्ध, धनुर्विद्या असे लढाईचे शिक्षण दिले जात असे. त्याचप्रमाणे राज्य कसे करावे, प्रजाजनांवर प्रेम कसे करावें हेही या राजकुमारांना त्यांचे गुरुजन शिकवीत असत. काही राजपुत्र खेळात निपुण होते तर, काही मल्लविदयेत तरबेज होते. दुर्योधन आणि भीम उत्तम गदायुद्ध करीत, तर अर्जुन हा धनुर्विदयेत निपुण होता त्याच्या बाणाचा नेम कधी चुकत नसे. या राजकुमारांना शिकविणा्ऱ्या गुरुजनांमध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य असे श्रेष्ठ गुरुजन होते. एके दिवशी सर्व गुरुजन विश्रांतीच्या वेळी गप्पा मारीत बसले होते. गप्पांच्या ओघात कृपाचार्य म्हणाले, आपण ज्या राजकुमारांना शिकवतो त्यापैकी प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचे कौशल्य वेगळे असल्यामुळे त्यांची तुलना करणेही योग्य नाही. 

मंग यांच्यात सर्वश्रेष्ठ विद्यार्थी कोण आहे हे कसे ठरवायचे?' यावर द्रोणाचार्य म्हणाले, सर्व राजकुमारांमध्ये तुम्हांला कोण उत्तम वाटतो?' कृपाचार्य उत्तरले, 'दुर्योधन, तो सर्वात अधिक शूर आहे.' यावर द्रोणाचार्य म्हणाले, 'आपण राजकुमारांना शिकवतो, केवळ योद्धे नाही तयार करीत. मला वाटते की पांडवांमधला थोरला भाऊ धर्म हा सर्वापेक्षा अधिक चांगले राज्य करील.' कृपाचार्य उत्तरले, आपले मत आहे. आपण परीक्षा घेऊ या. द्रोणाचार्य म्हणाले परीक्षा काय घ्यायची ते मी सांगतो पण परीक्षा तुम्ही घ्या आणि श्रेष्ठ विद्यार्थी कोण आहे हा निर्णयही तुम्हीच या त्यानंतर द्रोणाचार्यांनी धर्माला आणि दुर्योधनाला बोलावले. त्या राजकुमारांनी आचार्यांना चंदन केले आणि विचारले, 'काय आज्ञा आहे? द्रोणाचार्य म्हणाले, 'गावाच्या पूर्व दिशेला वेशीबाहेर एक झोपड़ी आहे आणि पश्चीमेला वेशीबाहेर अगदी तशीच दुसरी झोपड़ी आहे. दुर्योधना, तू उद्या सकाळी पूर्वेकडील झोपडीत जा आणि सूर्यास्तापर्यंत झोपडी भरून टाक. 

धर्मा, तू उद्या सकाळी पश्चिमेकडील झोपडीत जा आणि सूर्यास्तापर्यंत तुझी झोपडी भरून टाक, झोपडी कशाने भरून टाकायची ते तुमचे तुम्हीच ठरवा. आम्ही सूर्यास्तानंतर तुमच्याकडे येऊ. दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या सुमारास पुन्हा सर्व गुरुजन एकत्र जमले. द्रोणाचार्य म्हणाले, 'आपण या आपल्या दोन्ही शिष्यांच्या झोपड्यांकडे जाऊ आणि त्यांनी काय केले ते पाहू. कृपाचार्य दोघांनी कार्य केले ते पाहून श्रेष्ठ विद्यार्थी कोण हा निर्णय आपण या. कुपाचार्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. सर्व गुरुजन प्रथम गावाच्या पूर्वेच्या बाजूच्या झोपडीकडे गेले. दुर्योधन गुरुजनाची वाट पाहत झोपडीबाहेर उभा होता. गुरुजन जवळ येताच त्याने त्यांना प्रणाम केला आणि तो त्यांना झोपडीकडे घेऊन गेला. झोपडीमध्ये दुर्योधनाने गवताच्या पेंड्या सुंदर रीतीने रवल्या होत्या. 

कृपाचायांनी झोपड़ी समोरून पाहिली. पाठीमागे जाऊन पाहिली. उजव्या बाजूने आणि डावीकडूनही पाहिली. दुर्योधनाने गवत असे कौशल्याने रचले होते की सुईचे टोकदेखील आत गेले नसते. कृपाचार्यानी संतोषाने मान डोलावली आणि ते म्हणाले "दुर्योधना तु पण पूर्ण केलास. आता आम्ही धर्माकडे जातो. त्यानंतर सर्व गुरुजन पश्चिमेच्या बाजूला गेले. झोपडीजवळ ते गेले तेव्हा त्यांची चाहूल लागून धर्म चटकन बाहेर आला. त्याने सर्व आचार्यांना चंदन केले आणि तो म्हणाला, 'आपण आत चलावे. कृपाचार्य म्हणाले, 'धर्मा, तुला झोपडी भरून टाकायला सांगितली होती, मोकळी ठेवायला नाही. 'यावर धर्म म्हणाला, 'मी माझ्या परीने झोपडी भरून टाकली आहे. आपण आत यावे. कृपाचार्य म्हणाले, 'तू भरलेल्या झोपडीच्या आत आम्हांला नेतो आहेस हे एक नवलच आहे. 

बरं चल तू म्हणतोस तर. सर्व गुरुजन आत गेले त्या वेळी त्यांना दिसले की झोपडीच्या मध्यभागी एक पणती लावली होती. धर्म म्हणाला, 'पणतीच्या प्रकाशाने झोपडी भरून गेली आहे.' कृपाचार्य स्तिमित झाले. द्रोणाचार्य त्यांच्याकडे वळून म्हणाले, झोपडी गवताने भरणारा श्रेष्ठ की ती प्रकाशाने भरून टाकणारा श्रेष्ठ हे तुम्हीच ठरवा.' कृपाचार्य एकदम उद्गारले, 'प्रकाशाने झोपडी मरून टाकणारा धर्मच उत्तम राज्य करील. त्याच्या राज्यात ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरेल. बालमित्रांनो, तुमच्या मनात आणि तुमच्या घरात अशीच ज्ञानाचा प्रकाश देणारी पणती लावा आणि तुमचे मन, तुमचे घर आणि अवघा देश प्रकाशाने उजळून टाका.

Tags: द्रोणाचार्य  युधिष्ठीर दुर्योधन साने गुरुजी प्रधान मास्तर Dronachary Yudhishtir Duryodhan Sane Guruji Pradhan mastar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके