डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्मृतिभ्रंश : गमावलेली स्मृती अन्‌ दुरावलेली माणसं

अल्झायमर हा मेंदूचा आजार आहे. त्यामुळे मेंदूला उद्दीपित करणाऱ्या क्रिया केल्यास या आजारास काही प्रमाणात प्रतिबंध होऊ शकतो, अशीही गृहीतके आहेत. मेंदूला चालना देणारे बैठे खेळ खेळल्याने, शब्दकोडी- सुडोकू सोडवल्याने, नवी पुस्तके वाचल्याने, एखादी नवी भाषा, नवे वाद्य वा संगीत शिकल्याने, जवळच्या व्यक्तीशी विचारांचे आदान-प्रदान केल्याने काही प्रमाणात त्याला प्रतिबंध होऊ शकतो. आपल्यातील बहुसंख्य माणसे विद्यार्थिदशेनंतर नवे काही शिकतच नाहीत. अर्थार्जन करण्याच्या, प्रपंच सांभाळण्याच्या कसरतीत जुन्या आवडी-निवडी-छंद केव्हाच मागे पडतात. पुरुष आपल्या आनंदाच्या वाटा शोधू शकतात, परंतु मध्यमवयीन स्त्रीने आपल्या आवडी-निवडी-छंदांचा मागोवा न घेता स्वतःला गृहकार्यातच गुंतवून घ्यावे, अशी मानसिकता आजही सार्वत्रिक आहे.  

स्मृतिभ्रंश (dementia  - डिमेन्शिया) या आजाराबद्दल समाजात बरेच गैरसमज आहेत. स्मृतिभ्रंशाची कारणे अनेक आहेत. स्मृतिभ्रंशाचे जितके रुग्ण जगभरात आहेत, त्यापैकी 60 ते 70 टक्के रुग्ण हे अल्झायमर या आजाराने ग्रस्त आहेत. अलॉइस अल्झायमर या जर्मन डॉक्टरांनी आपल्या एका स्त्रीरुग्णाच्या स्मृतिभ्रंशाच्या लक्षणांचा सखोल आणि प्रदीर्घ अभ्यास करून 1906 मध्ये या आजाराची ओळख जगाला सर्वप्रथम करून दिली आणि त्यांचेच नाव या आजाराला देण्यात आले. या घटनेला एक शतक उलटून गेले असले तरीही जगभरातील 3 पैकी 2 व्यक्तींना (दोन-तृतीयांश व्यक्तींना) असे वाटते की, अल्झायमर या आजाराबद्दल त्यांच्या देशात पुरेशी जनजागृती नाहीये. याच अनुषंगाने अश्रूहशळाशी Alzheimer Disease International या संघटनेने 2012 पासून सप्टेंबर महिन्यास ‘अल्झायमर महिना’ आणि 21 सप्टेंबर या तारखेस ‘अल्झायमर दिवस’ म्हणून घोषित केलेय. या वर्षीच्या अल्झायमर दिवसाची थीम आहे- Remember me - माझी आठवण ठेवा. स्मृतिभ्रंशाच्या रुग्णाची उपेक्षा करू नका. भूतकाळात त्यांनी समाजासाठी जे योगदान दिले होते, त्याची आठवण ठेवून आयुष्याच्या सायंकाळी त्यांना सन्मानाने वागवा- असाच संदेश यातून प्रसारित करायचा आहे. 

WHO च्या आकडेवारीनुसार जगभरातील 5 कोटी लोक स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहेत. भारतात आजमितीस 40 लाख लोक स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहेत आणि पुढील 15 वर्षांत ही संख्या दुप्पट होईल, असा अंदाज आहे. अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखी कर्तृत्ववान माणसे उतारवयात स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होती. स्मृतिभ्रंश हा फक्त उतारवयातच होतो हा गैरसमज आहे. 

स्मृतिभ्रंशाच्या एकूण रुग्णांपैकी 9 टक्के रुग्ण 65 वर्षांच्या आतील असतात. रुग्ण जितका तरुण, तितक्याच तीव्रतेने आजार बळावतो. स्मृतिभ्रंशाचे रुग्ण लक्षात येण्यास, त्यांच्यावर उपचार होण्यास आपल्याकडे अक्षम्य विलंब होतो. वार्धक्यानुसार स्मृती क्षीण होणारच, असा गैरसमज अनेकांच्या मनात खोलवर रुजलेला असतो. वयोमानाने ज्याप्रमाणे केस पिकतात, त्याप्रमाणे बुद्धी-स्मरणशक्ती कमजोर होणे हे सामान्य नव्हे, तो आजार असू शकतो अन्‌ त्यावर उपचार व्हायला हवेत. आपल्यापैकी सर्वांनाच वयाच्या कुठल्याही टप्प्यावर काही गोष्टींचे विस्मरण होते, कामाच्या व्यापात एखादी वस्तू चुकून इकडे-तिकडे ठेवली जाते आणि नंतर शोधाशोध करण्यात त्रागा होतो. उतारवयात या गोष्टींची तीव्रता थोड्या प्रमाणात वाढू शकते. त्याला स्मृतिभ्रंश म्हणता येणार नाही. मग स्मृतिभ्रंश कसा ओळखावा? 

स्मृतिभ्रंशाचे 60-70 टक्के रुग्ण ज्या अल्झायमर आजारात आढळतात, त्याचे काही टप्पे आहेत. 

प्राथमिक टप्पा- आपल्या मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस (hippocampus) नावाचा एक भाग असतो. कुठलीही नवी गोष्ट शिकण्यासाठी या भागाचा उपयोग होतो. अल्झायमरमध्ये मेंदूचा हाच भाग सर्वांत अगोदर क्षतिग्रस्त होतो. त्यामुळे रुग्णामध्ये पुढील दोन लक्षणे ठळकपणे दिसून येतात - 1) कुठलीही नवी गोष्ट शिकण्यास अनुत्साह अन्‌ असमर्थता, 2) नुकत्याच घडलेल्या गोष्टींचे विस्मरण. आपल्या मेंदूत दोन प्रकारच्या स्मृती असतात- दीर्घ काळ (long term) असणारी स्मृती आणि अल्पकाळ (short term) असणारी स्मृती. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्ती-घटना यांच्या स्मृती दीर्घकालीन असतात, तर नुकत्याच भेटलेल्या नव्या व्यक्ती-घटना यांच्या स्मृती अल्पकालीन असतात. 

स्मृतिभ्रंशाच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्यक्तीला भूतकाळातील महत्त्वाच्या गोष्टी आठवतात; मात्र काल काय जेवण केले होते, कुणाशी काय बोलणे झाले होते ते आठवत नाही. पर्स कुठे ठेवली आहे, वीजबिल, टेलिफोन बिल भरले की नाही, यासारख्या दैनंदिन व्यवहारातील छोट्या-मोठ्या गोष्टींचे, महत्त्वाच्या नियोजित कामांचे विस्मरण वारंवार व्हायला लागते. मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीचे नाव आठवत नाही. व्यक्तीच्या वर्तणुकीतील बदल परिवारातील सदस्यांच्या लक्षात यायला लागतो. व्यक्तीचा शब्दसाठा कमी व्हायला लागतो. लिहिताना अथवा बोलताना नेमका शब्द आठवत नाही, त्यामुळे बोलण्यातील अस्खलितपणा कमी होतो. लिहिणे, चित्र काढणे, कलाकुसरीची कामे करणे अथवा सरावाच्या दैनंदिन कामातील अचूकता कमी होऊन ढिसाळपणा वाढत जातो; मात्र तो व्यक्तीकडून बऱ्याचदा दुर्लक्षिला जातो. 


मधला टप्पा - प्राथमिक टप्प्यातील सर्व लक्षणे मधल्या टप्प्यात अधिकच तीव्र होतात. व्यक्तीच्या दीर्घकालीन स्मृतींवरही परिणाम व्हायला सुरुवात होते. कधी कधी व्यक्ती स्थळ-काळाचे भान विसरते. बाहेर गेल्यानंतर घरी परत यायचा रस्ता विसरते. जवळच्या आप्तांची नावे विसरते. आपण अंघोळ-जेवण केले का, तेही व्यक्तीला आठवत नाही. त्यामुळे पुनःपुन्हा अंघोळीला जाणे, जेवण मागणे सुरू होते. मनाजोगत्या गोष्टी प्राप्त न झाल्यास चिडचीड, अस्वस्थता, त्रागा वाढतो. 

यात sundowning/ sundown syndrom नावाचा एक विकार होऊ शकतो. दिवसाचा नैसर्गिक प्रकाश मंद होत जाऊन सूर्यास्ताचा समय समीप आला की, अशा कातरवेळी ‘संध्याछाया भिवविती हृदया’ अशी व्यक्तीची अवस्था होते. सूर्यास्तानंतर व्यक्तीची चिडचीड, थकवा, अस्वस्थता वाढत जाते. वर्तणुकीत वारंवार बदल होतात. कुठलाही आवाज, गोंधळ सहन होत नाही. निद्रानाश जाणवतो, हातपाय थरथरतात. चालताना तोल जाऊन पडून दुखापत होण्याची शक्यता वाढते. (भारतीय समाजात विशेषतः ग्रामीण भागात सायंकाळी होणारा व्यक्तीच्या वर्तणुकीतील बदल हा ‘भूतबाधा’ समजून पीडित व्यक्तीवर अघोरी उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळतेच, शिवाय पीडित व्यक्ती योग्य वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहते आणि तिची अन्‌ तिच्या कुटुंबीयांची प्रचंड शारीरिक, मानसिक, आर्थिक अन्‌ सामाजिक कुचंबणा होते.) कधी रुग्णाला कपड्यांतच लघवी होते. 

पीडित व्यक्तीपेक्षाही त्याची काळजी घेणाऱ्या आप्तस्वकीयांसाठी ही अवस्था अत्यंत त्रासदायक आणि कसोटीची असते. जो मनुष्य आपला आदर्श अन्‌ आधारस्तंभ होता, तो आपल्याला धड न ओळखता अशा केविलवाण्या परिस्थितीत आयुष्याशी झगडतोय- या जाणिवेने आप्तस्वकीय आतल्या आत तुटत जातात, कोसळत जातात. रुग्णाचे उपचार घरीच करण्यापेक्षा जिथे तज्ज्ञ-प्रशिक्षित व्यक्तींकडून देखभाल होईल, अशा एखाद्या संस्थेत रुग्णाला ठेवण्याकडे आप्तस्वकीयांचा कल वाढतो. 

अंतिम अवस्था - या अवस्थेतील रुग्ण स्वतःच्या देखभालीसाठी पूर्णतः इतरांवर अवलंबून असतो. तो काही तरी असंबद्ध बोलतो अथवा त्याचे बोलणे पूर्णतः बंद झालेले असते. कधी कधी तो हावभावांनी मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. क्वचित तो अस्वस्थ अन्‌ आक्रमक होतो; पण बऱ्याचदा तो शारीरिक-मानसिक दृष्ट्या थकलेला अन्‌ निरुत्साही असतो. भूक मंदावल्याने अन्न नकोसे वाटते. काही रुग्णांना नळीवाटे पातळ अन्नपदार्थ द्यावे लागतात. पुरेशा पोषणाअभावी हाडे, स्नायू कमकुवत झाल्याने अनेक रुग्ण बिछान्यास खिळतात. काहींच्या अंगाला फोड येतात. त्यानंतर जंतुसंसर्ग, न्यूमोनिया होऊन रुग्ण मृत्युमुखी पडतो. जो माणूस मनाने केव्हाच अलिप्त झालेला असतो, त्याच्या शरीराचाही अंत होतो. अल्झायमरची ही लक्षणे वाचून कुणाही संवेदनशील व्यक्तीचे मन हळहळेल. अल्झायमर होण्याची कारणे काय? 

अल्झायमर रोगाची 1 ते 5 टक्के कारणे जनुकीय असतात. परिवारात कुणाला अल्झायमर असेल, तर तो जनुकांद्वारे पुढील पिढीत संक्रमित होऊ शकतो. बाकी कारणे काय असावीत, याबद्दल अनेक शास्त्रज्ञांनी अनेक गृहीतके मांडली आहेत आणि त्यावर संशोधन अविरत सुरू आहे. 

अल्झायमर अथवा स्मृतिभ्रंशावर उपचार काय? तो बरा होऊ शकतो का? स्मृतिभ्रंश कुठल्या प्रकारचा आहे, त्यावर ते अवलंबून आहे. थायरॉईड ग्रंथींचे असंतुलन, जीवनसत्त्वांची (vitamin B6, B12, E, D) कमतरता, नैराश्य (डिप्रेशन), अपघातामुळे डोक्याला लागलेला मार, ब्रेन ट्यूमर, अर्धांगवायू, कीटकनाशके, वा विषारी औषधे प्यायल्याने शरीरावर झालेले दुष्परिणाम, हृदयविकार, दम्यामुळे मेंदूला झालेला अपुरा ऑक्सिजनपुरवठा यामुळे झालेल्या स्मृतिभ्रंशावर उपचार करता येतात आणि तो बराही होऊ शकतो. पण अल्झायमरवर कुठलाही उपाय नाही! 

Donepzil, Rivastigmin सारख्या औषधांनी अल्झायमरच्या लक्षणांवर उपचार करता येतात, पण त्यामुळे रोग कायमस्वरूपी बरा होत नाही. नवनवीन औषधांवर संशोधन करण्यासाठी जगभर कोट्यवधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. भविष्यात त्यांच्या प्रयत्नांना यश येईल अशी आशा करून, सध्या जे उपचार उपलब्ध आहेत त्यांचा सुयोग्य वापर करायला हवा. आजाराचे निदान लवकर झाले, तर रुग्ण आजाराचा स्वीकार लवकर करून आयुष्य अधिक सकारात्मकरीत्या जगतो. स्वतःच्या व आप्तस्वकीयांच्या भविष्याचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो. 

औषधांवरील चाचण्यांमध्ये सहभागी होऊन नव्या संशोधनासही सहकार्य करू शकतो. स्मृतिभ्रंशाचे निदान लवकर होत नाही, कारण आपल्या समाजात मनाच्या-मेंदूच्या विकारांबद्दल पुरेशी जनजागृती नाही. ‘मला विस्मरण होतेय’ असे सांगताना व्यक्तीस कमीपणा वाटतो, कारण त्यामुळे त्याची हेटाळणी होण्याचा धोका असतो. हिंमत करून त्याने आपली व्यथा सांगितली तरी, ‘वयोमानाने असे होणारच’ असे म्हणून त्याचा आजार दुर्लक्षिला जातो. त्यामुळे प्राथमिक टप्प्यात आजाराचे निदान न होता मधल्या, अंतिम टप्प्यात रुग्ण पोहोचतो तोवर खूपच उशीर झालेला असतो. 

अल्झायमर कायमस्वरूपी बरा होत नसेल, तर तो टाळता येणे शक्य आहे का? अल्झायमरचा प्रतिबंध करण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला हव्यात, याबद्दलही जगभर संशोधन सुरू आहे. सद्य:स्थितीत कुठलाही खात्रीलायक उपाय नसला तरी सकस आहार, पुरेशी झोप, संतुलित व्यायाम, धूम्रपान-मद्यपान टाळून निरामय जीवनशैलीचा स्वीकार केल्यास अल्झायमरच्या लक्षणांची सुरुवात लांबविता येईल, त्याची लक्षणे सौम्य करता येतील- अशी गृहीतके मांडली जात आहेत. भारतीय आहारात कर्बोदके, स्निग्ध पदार्थ अधिक प्रमाणात असतात व प्रथिने अल्प प्रमाणात. असा आहार टाळून प्रथिने, जीवनसत्त्वे यांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला चौरस आहार घ्यायला हवा. 

अल्झायमर हा मेंदूचा आजार आहे. त्यामुळे मेंदूला उद्दीपित करणाऱ्या क्रिया केल्यास या आजारास काही प्रमाणात प्रतिबंध होऊ शकतो, अशीही गृहीतके आहेत.  मेंदूला चालना देणारे बैठे खेळ खेळल्याने, शब्दकोडी सुडोकू सोडवल्याने, नवी पुस्तके वाचल्याने, एखादी नवी भाषा, नवे वाद्य वा संगीत शिकल्याने, जवळच्या व्यक्तीशी विचारांचे आदान-प्रदान केल्याने काही प्रमाणात त्याला प्रतिबंध होऊ शकतो. आपल्यातील बहुसंख्य माणसे विद्यार्थिदशेनंतर नवे काही शिकतच नाहीत. अर्थार्जन करण्याच्या, प्रपंच सांभाळण्याच्या कसरतीत जुन्या आवडी-निवडी-छंद केव्हाच मागे पडतात. पुरुष आपल्या आनंदाच्या वाटा शोधू शकतात, परंतु मध्यमवयीन स्त्रीने आपल्या आवडी-निवडी-छंदांचा मागोवा न घेता स्वतःला गृहकार्यातच गुंतवून घ्यावे, अशी मानसिकता आजही सार्वत्रिक आहे. शारीरिक स्वास्थ्य कायम राखण्यासाठी व्यायाम करायला हवा, याबद्दलची जनजागृती वृद्धिंगत होतेय आणि लोक आपल्याला आवडेल तसा, झेपेल तसा व्यायाम करीत आहेत. मानसिक स्वास्थ्यासाठीही लोक आपापल्या आवडी-निवडीनुसार संगीत, हास्य क्लब, ध्यानधारणा इत्यादींकडे वळत आहेत. परंतु आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी आपापल्या आवडीप्रमाणे काही उपाययोजना करायला हव्यात, याबद्दल समाजात पुरेशी जनजागृती नाही. आपली विद्यार्थिवृत्ती कायम ठेवत नवनवीन गोष्टी शिकल्यास मेंदू ताजातवाना राहू शकतो. शालेय शिक्षणात नावडत्या विषयांचेही अध्ययन केल्याने, परीक्षेच्या ताणतणावास सामोरे गेल्याने विद्यार्थिदशेच्या स्मृती अनेकांसाठी सुखावह नसतात. परंतु प्रौढ वयात आवडत्या विषयांचा, छंदांचा मागोवा घेतल्यास विद्यार्थिदशेचा नवा आणि सुखावह अनुभव होऊ शकतो. 

स्मृतिभ्रंश या विषयावर ‘अस्तु’ आणि ‘स्माईल प्लीज’ हे दोन मराठी चित्रपट अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहेत. ‘अस्तु’ चित्रपटात स्मृतिभ्रंश झालेला वृद्ध मनुष्य जेव्हा बेपत्ता होतो, तेव्हा त्याचे कुटुंबीय पोलिसांत तक्रार देण्यासाठी जातात. आजाराची लक्षणे ऐकून पोलीस अधिकारी म्हणतो, ‘‘आता लक्षात येतंय की, माझ्या सासऱ्यांनाही हाच आजार असावा बहुदा. नाहीयेत आता ते. गावाकडे घराबाहेर विहिरीत पडून मेले, अशी तार आली होती. घरादाराला नको असलेलं माणूस कुणी बघितलंय पडताना?’’ हे उद्‌गार ऐकून मन सुन्न होऊन जाते. भारतीय समाजात स्मृतिभ्रंशाबद्दलच्या गैरसमजाची, रुग्णांच्या हेळसांडीची, आप्तस्वकीयांच्या द्विधा मन:स्थितीची व्याप्ती प्रचंड आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर महानगरांतील सुशिक्षित नागरिकांमध्येही रुग्णांप्रतीच्या संवेदनशीलतेचा अभाव जाणवतो. 

‘स्माईल प्लीज’ या चित्रपटात सुशिक्षितांमधील असंवेदनशीलतेचे दर्शन घडते. या चित्रपटाची नायिका उच्चभ्रू, यशस्वी फोटोग्राफर असते. ऐन चाळिशीत स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होऊन आपला व्यवसाय, आत्मविश्वास गमावून ती असहाय होऊन जाते. तिचा मित्र तिला सावरण्यासाठी पुढे सरसावतो; तेव्हा त्याचा सहकारी त्याला म्हणतो, ‘‘ती वेडी झाली ना रे!’’ त्यावर तो जे उत्तर देतो ते प्रत्येकासाठी उद्‌बोधक आहे. तो म्हणतो, ‘‘इतरांबद्दल काहीही बोलण्याअगोदर चार सेकंद विचार करावा. आपण दुसऱ्यांबद्दल काय बोलतो त्यातून इतरांची नव्हे तर आपली किंमत ठरते. ज्यांच्याशी धड भेट झाली नाही, ज्यांची चार शब्दांनी कधी विचारपूस केली नाही, ज्यांचा जीवनसंघर्ष आपल्याला ज्ञात नाही; त्यांच्याबद्दल लोक किती रुक्ष, कठोर, संवेदनाहीन टीकाटिप्पण्या करतात!’’ आधीच अडचणीत असलेल्या स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांच्या आणि त्यांच्या आप्तस्वकीयांच्या वाट्याला जो सार्वत्रिक उपहास येतो, त्यामुळेच त्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होऊन ते या आजाराशी दीर्घ काळ लढू शकत नाहीत. 

‘स्माईल प्लीज’ चित्रपटात स्मृतिभ्रंशग्रस्त नायिकेला जेव्हा तिचा मित्र फोटोग्राफी पुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित करतो, तेव्हा लोक त्याला विचारतात, ‘‘या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग आहे? एक दिवस ती सगळं विसरणारच आहे. ’’ तो उत्तरतो, ‘‘एखाद्या माणसाला हळूहळू संपून जाताना नुसतं बघत राहायचं का? उद्या सर्व काही संपणार म्हणून आज जगणं सोडून द्यायचं का?’’ फक्त स्मृतिभ्रंशच नव्हे, तर कुठल्याही असाध्य आजाराशी लढताना जितके प्रयत्न करता येतील तितके करून रुग्णाचे जीवन सुसह्य करायला हवेहाच संदेश यातून मिळतो. 

स्मृतिभ्रंशग्रस्त रुग्णाला आणि त्याच्या परिवाराला सन्मानाची वागणूक देऊन या असाध्य आजाराशी लढण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविणे, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. आजारी, अपंग, वृद्ध व्यक्तींविषयी दयेची नव्हे तर सेवेची अन्‌ सन्मानाची भावना मनात ठेवणे, हेच आपल्या मनुष्यत्वाचे लक्षण आहे. 

Tags: डॉ. प्रगती पाटील स्माईल प्लीज अस्तु नैराश्य स्मृतीभ्रंश डिमेन्शिया मानसिक आजार अल्झायमर मेंदूचा आजार health diseases mental diseases who pragati patil on Alzheimer Alzheimer Disease International dementia alzaimer Dr. pragati patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके