डिजिटल अर्काईव्ह

आज आमचा या गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिध्द करू पाहतो आहे की, एकदा का लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली की, मुले वाचनाला/पुस्तकाला अगदी चिकटून जातात. आणि त्यांच्या हातात येणारी पुस्तके जर सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषय असणारी असतील तर ती पुस्तकाकडे का नाही ओढली जाणार? ही पुस्तके मुलांना आपले बनवतात. मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली की मुले कल्पनेत रमतात. पूर्वानुभवांचे बोट धरून त्याही पुढे भराऱ्या मारू लागतात. मग ती व्यक्त करू लागतात त्यांच्याच दुनियेतील भन्नाट कल्पना आणि हेच आम्हाला पहायला मिळते आमच्या पुस्तकांच्या दीडशे गाव ग्रंथालयांत!

कोणत्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही आणि त्याचे मन मारले जाईल अशा शाळेत त्याला जावे लागणार नाही, अशा एका जगाचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण गावात 1978 साली प्रगत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली. अगदी वंचितांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे आणि प्रत्येक मूल जन्मतः शिकण्याच्या ज्या नैसर्गिक प्रेरणा घेऊन येते त्या प्रेरणा शिक्षणाच्या प्रक्रियेत मारल्या जाऊ नयेत अथवा त्यांना लगाम बसू नये ही संस्थेची मुख्य तत्त्वे.

देशभरात प्रयोगशील म्हणून ओळखली जाणारी ‘कमला निंबकर बालभवन’ ही शाळा प्रगत शिक्षण संस्थेने सुरू केली. पण स्वतःच्या एक-दोन शाळा सुरू करून आपले व्यापक स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही हे संस्थेने जाणले. हे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर मुख्य प्रवाहातील म्हणजे शासनाच्या शाळांबरोबर काम करणे, त्यांच्या समस्या ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे हे संस्थेने ओळखले आणि त्या शाळांबरोबर छोटेखानी प्रकल्प सुरू केले. कधी नगरपालिकेच्या शाळा तर कधी जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश केला. मुख्यत्वे मराठी भाषा विविध आयामांतून कशी शिकवता येईल, मूल शाळेत कसे रमेल आणि त्याचा शाळेतील वावर तणावमुक्त कसा करता येईल याचा विचार या लहान प्रकल्पांतून केला जात होता. मात्र विचार मोठ्या पातळीवर पोचावा यासाठी 2014 मध्ये विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले.

ऑक्टोबर 2015 मध्ये या प्रयत्नांना यश आले आणि फलटण तालुक्यातील 145 जिल्हा परिषद शाळा आणि पाच आश्रमशाळा यांच्यासोबत काम करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. US-ID, Tata Trusts, Centre for Micro Finance यांनी आर्थिक भार उचलला आणि Nurturing Early Literacy in Primary Schools in Phaltan Block (NELPSPB) हा प्रकल्प अस्तित्वात आला. वाचणे म्हणजे इतर कोणी लिहिलेले शब्द वाचणे आणि लिहिणे म्हणजे स्वतःचे शब्द उतरवणे. मुलांना गोष्टी ऐकण्यातून जो आनंद मिळतो, तोच आनंद गोष्टी वाचतानाही मिळाला तर ती खऱ्या अर्थाने साक्षर झाली असे म्हणता येईल. मुलांबरोबर काम करतानाचा आमचा आजवरचा अनुभव इथे सांगायला हवा, ज्यामधून आम्ही मुलांना पुस्तकांच्या दुनियेत घेऊन जाण्याचा आग्रह का धरतो हे समजेल.

मुले अर्थ न समजता वाचतात तेव्हा आपल्याला काहीतरी नीट कळले नाही हेच त्यांच्या लक्षातच येत नसते. म्हणजे इथे फक्त ते अक्षर ओळखण्याचा/वाचण्याचा सराव करत असतात. त्यांना फक्त अक्षर-वाचन करणे हेच समजलेले असते. आपण वाचतो ते अर्थ समजून घेण्याची बाब त्यांना अगदी सुरुवातीपासूनच लक्षात आणून देण्यात आपण कमी पडतो का? होय. अर्थासाठी वाचन ही बाब मुलांना सातत्याने लक्षात आणून देऊन पुढे जायचे असेल तर बालसाहित्य म्हणजेच पुस्तकांशिवाय पर्याय नाही. हेच ओळखून आम्ही 150 गावांत गाव-ग्रंथालये उभी करण्याचा निर्णय घेतला. मग NELPSPB प्रकल्पाच्या माधमातून 150 गाव- ग्रंथालये उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात मुख्य सहभाग त्या-त्या गावातील जिल्हा परिषद शाळांचा घ्यायचा असे ठरले.

प्रकल्पाच्या पहिल्या वर्षात आम्ही जेव्हा गाव-ग्रंथालयांच्या माध्यमातून पहिली-दुसरीच्या मुलांना गोष्टींची पुस्तके देणार आहोत असा विषय एका जिल्हा परिषदेच्या शाळेत मांडला तेव्हा समोरून प्रश्न आला की, ज्या मुलांना अजून नीटशी अक्षर ओळखही नाही ती मुले पुस्तके काय वाचणार? म्हणजे मूल शाळेत जाऊन चांगले लिहिते-वाचते झाल्यावरच त्याच्या हातात बालसाहित्य द्यावे, असा एक विचार दुर्दैवाने समोर येत होता. खरे तर हा समज म्हणजे मुलांच्या लेखन-वाचन प्रवासाला पूर्णविराम आहे. कारण आज आमच्या गेल्या तीन वर्षांच्या अनुभवातून असे ठामपणे मांडू शकतो की, जी मुले अक्षर-ओळखीपासून कोसो दूर होती ती मुले पुस्तकांच्या साथीने लवकर आणि चांगल्या प्रकारे वाचायला लागली आणि मनातील भाव बोलण्यात, कागदावर उतरवू शकली. याचे कारण त्यांना त्यांच्या आवडीची अनेक पुस्तके त्यांनाच सहभागी करून घेत वाचून दाखवण्यात आली. यातूनच मुलांची लेखी मजकुराची जाण हळूहळू वाढत गेली आणि मुलांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण होताना दिसली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण जे वाचू त्यावर कोणतीही परीक्षा नाही द्यायची हे मुलांना समजल्यावर ती कोणतेही दडपण न घेता वाचू लागली.

वाचनातून भाषेच्या अनेक लकबी मुलांनी सहज आत्मसात केल्या. लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू एकदा का मुलांना येऊ लागली की, ती वाचनाला अगदी चिकटून जातात. आणि याच टप्प्यावर त्यांच्या हातात अधिकाधिक चांगली, त्यांच्या भावविश्वातील विषय असणारी पुस्तके पडणे गरजेचे असते. मुलांना आवडतील अशी चांगली पुस्तके शोधणे आणि ते पुरवणे हे विशेष आव्हान आमच्यासमोर होते. एक तर आमचे वाचक म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थी. त्यांना शहरी पात्रे असणारी पुस्तके रूचण्याची शक्यता जरा कमी वाटत होती. अनेक प्रयत्न करून चांगली पुस्तके मिळवली आणि त्यांची छोटेखानी ग्रंथालये 150 गावांत सुरू झाली. एकूणच अजून चांगले बालसाहित्य मुलांना द्यावे ज्याचे विषय या ग्रामीण भागातील मुलांच्या अनुभवविश्वातील असतील हे कायम वाटत होते. त्यासाठी प्रकल्पात गोष्टींची पुस्तके तयार करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली होती. त्या दृष्टीने काम सुरू झाले. गेल्या तीन वर्षांत आठ चांगली रीडर्स तयार झाली.

सावलीतील शेळी आणि इतर कथा, गाबूशेटचा पंजा, कुंपणाच्या आत कोंबडा ओरडला, चला कुरड्या करू, निळ्याशार आकाशाखाली म्हशी, भुरा लांडगा, मासेमारी असे मुलांच्या रोजच्या अनुभवातील विषय आणि भाषा हे मुलांच्या भावमनाला इतके स्पर्शून गेले की, त्यातून नवीन गोष्टी आणि चित्रे आपसूकच मुलांकडून बाहेर आली. या गाव-ग्रंथालयात शाळेतील मुले केवळ पुस्तके घेतात, वाचतात आणि ठेवतात असे होत नाही. प्रत्येक गावात त्याच गावातील एक ग्रंथपाल असतो. मुलांना तो कधी पुस्तके वाचून दाखवतो तर कधी पुस्तकांबरोबर काही उपक्रम घेऊन पुस्तकांशी वेगळेच नाते जोडून देतो. मुले पुस्तके घरी घेऊन जातात. आपल्या आजोबांना, आई-बाबांना त्यांचे काम सुरू असताना भन्नाट गोष्टींची पुस्तके वाचून दाखवतात. मग कधी पुस्तके शेतावर काम करणाऱ्यांकडे जातात, कधी मंदिरात बसलेल्या आजोबांकडे, तर कधी एक दोन वर्षांच्या बाळांकडेही. पुस्तके परत येतात ती आपल्या सोबत गावातील, अगदी गाव कुसातील आणि डोंगरावरीलही आपल्या पुस्तकमित्रांना घेऊन!

मग ती गाव-ग्रंथालयात आपला प्रवास नोंदवतात आणि पुन्हा निघतात एका आगळ्यावेगळ्या नव्या प्रवासाला. जिथे ग्रंथपाल जाऊ शकत नाही तिथे गावातच तयार झालेले छोटे ग्रंथपाल जातात. वाड्या-वस्त्यांवर पुस्तके पोहोचतात. अशा आगळ्या-वेगळ्या गावग्रंथालयांमुळे मागील तीन वर्षांत  एक नाही, दोन नाहीत तर तब्बल दीडशे पुस्तकांची गावे तयार झाली आहेत! हा पुस्तकानुभव गावांतील शिक्षक, मुले आमच्याकडे व्यक्त करीत असतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात स्नेहभाव निर्माण करायला ‘गोष्ट सांगण्या’सारखी दुसरी जादूची बाब कोणतीच नाही.

गोष्ट ऐकताना मुले शिस्तबद्ध आचरण शिकत असतात, त्यातून त्यांना प्रेरणा मिळते, त्यांची कल्पकता वाढीस लागते. याबाबत दडसवस्तीचे शिक्षक सांगतात, ‘वर्गात मुलांना शांत करणे, वर्गात नुसता गोंगाट न होऊ देणे हे एक आव्हान असते. मुलांना जेव्हा शांत करायचे असते तेव्हा मी एक छोटे पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरुवात करतो. मुले आपोआप शांत बसू लागतात. तसेच जेव्हा वर्गात शिक्षक नसतात तेव्हा एखाद्या मुलाला प्रगट वाचनासाठी पुस्तक देऊन वाचण्यास सांगितले तर शिक्षक नसतानादेखील मुले चांगला प्रतिसाद देतात.’ जावलीचे ग्रामस्थ म्हणाले, ‘काही गाव-ग्रंथालयांत मुले आपल्या पालकांना गोष्टींची पुस्तके वाचून दाखवतात. कधी न ऐकलेल्या भन्नाट गोष्टी ऐकून पुस्तकं नकळत पालकांच्या हातात जातात. काही ठिकाणहून पालक, आम्हालाही पुस्तके द्या अशी मागणी करत असतात.

मुलांकडच्या रंगीबेरंगी चित्रांच्या आणि कधीच न वाचलेल्या गोष्टीच्या पुस्तकाला बघून आम्हालापण पुस्तके मिळावी असे वाटत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत दहा पुस्तके वाचलीत.’ आज आमचा या गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिध्द करू पाहतो आहे की, एकदा का लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली की, मुले वाचनाला/पुस्तकाला अगदी चिकटून जातात. आणि त्यांच्या हातात येणारी पुस्तके जर सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविेशातील विषय असणारी असतील तर ती पुस्तकाकडे का नाही ओढली जाणार? ही पुस्तके मुलांना आपले बनवतात. मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली की मुले कल्पनेत रमतात. पूर्वानुभवांचे बोट धरून त्याही पुढे भराऱ्या मारू लागतात. मग ती व्यक्त करू लागतात त्यांच्याच दुनियेतील भन्नाट कल्पना आणि हेच आम्हाला पहायला मिळते आमच्या पुस्तकांच्या दीडशे गाव ग्रंथालयांत!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रकाश बापूराव अनभुले,  फलटण, जि.सातारा ( 1 लेख )
anbhuleprakash@gmail.com

प्रकल्प संचालक NELPSPB, प्रगत शिक्षण संस्था




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी