डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुंबईतील परदेशी नागरिकांच्या प्रश्नाचे पडसाद संसदेतच नव्हे, तर थेट पश्चिम बंगालच्या विधानसभेतही उमटले. पण या प्रश्नाचे खरे गांभीर्य युतीला आणि इतर पक्षांना जाणवले आहे की नाही याची शंका येते, कारण दोन्ही पक्षांनी अनेक मुद्यांचा विचारच केलेला नाही.

महाराष्ट्रात सत्तांतर झाले. भाजप-सेना युतीच्या हाती सत्ता आली. पण हे अपयश पचविणे पुरोगाम्यांना जड जात आहे आणि या यशाने भाजप-सेना युतीची तारांबळ उडविली आहे. म्हणूनच परदेशी नागरिकांच्या प्रश्नावरून वाद झडू लागला आहे. भारताच्या इतर राज्यांतून मुंबईत येणाऱ्यांना अटकाव करण्याच्या प्रयत्नावरून संसदेत गदारोळ उडाल्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना तातडीने माघार घ्यावी लागली आहे. 

मुंबईत येणाऱ्यांना शिधावाटप पत्रिका देण्याचे थांबविण्यात येईल, अशी घोषणा सेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी नव्या मुख्यंमत्र्यांचा शपथविधी झाल्यावर शिवाजी पार्क येथील भाषणात बोलताना केली होती. त्याचबरोबर परदेशी नागरिकांनाही शहरात थारा मिळणार नाही, त्यांना वेचून हुसकावले जाईल असे ठामपणे याच भाषणात श्री. ठाकरे यांनी सांगितले होते. 

श्री. ठाकरे यांच्या या विधानांवरून लगेच वाद सुरू झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस कृपाशंकर सिंह यांनी पहिली तोफ डागली. नवे राज्य सरकार घेणार असलेला पहिलाच निर्णय केवळ बेकायदेशीर नव्हे तर राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारा आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसांनी केली. त्याच दिवशी तिकडे पश्चिम बंगाल विधानसभेत, परदेशी नागरिकांसंबंधीच्या श्री. ठाकरे यांच्या विधानावरून मार्क्सवादी व काँग्रेस सदस्यांनी सेना-भाजप युतीवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात युतीच्या हाती आणि गुजरातेत भाजपकडे सत्ता आल्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याला धोका निर्माण झाला आहे, याबद्दल कधी नव्हे ते पश्चिम बंगालमधील काँग्रेस व मार्क्सवादी पक्षांत एकमत झाले. त्या राज्यातील काँग्रेसचे एक नेते सुब्रतो मुकर्जी यांनी श्री. ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली तर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद डॉ. मानस भुईना यांनी सेनाप्रमुखांना 'वेडे' ठरविले. बिहारमधील काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर हेही श्री. ठाकरे यांच्या अटकेची मागणी करत आहेत. 

महाराष्ट्रातील सेना-भाजपच्या विजयानंतरही काँग्रेस व इतर पुरोगामी पक्षांचे डोळे उघडे ठेवून चहुबाजूला शोधकपणे बघून आत्मसंशोधन करण्याची तयारी नाही, याचे हा गदारोळ हे लक्षण आहे.

जुनाच प्रश्न

मुंबईतील परदेशी नागरिकांचा प्रश्न फार जुना आहे. शहरात बेकायदेशीररीत्या परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात, ही चर्चा प्रथम सुरू झाली ती 11 वर्षांपूर्वी 1984 साली मे महिन्यात मुंबई व ठाणे परिसरात जातीय दंगल उसळल्यावर. तेव्हापासून सेनेने सतत हा आरोप केला आहे. पुढे सेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे निशाण खांद्यावर घेतले आणि त्यांच्या या आरोपातील धार वाढली. त्या आधीपासून ईशान्येत परदेशी नागरिकांचा प्रश्न ज्वलंत बनला होता. त्यावरून आसाम आंदोलनही झाले. काँग्रेसला आसामातील सत्ताही काही काळ गमवावी लागली होती. दरम्यानच्या काळात भाजपनेही परदेशी नागरिकांचा हा प्रश्न उचलून धरला. 

परंतु हिंदुत्ववादी व सेनेसारख्या पक्षांच्या या मोहिमेकडे सर्वसाधारण मुंबईकर तसे दुर्लक्षच करीत आला होता. हिंदुत्ववादी व इतर पक्षीय वर्तुळापलीकडे परदेशी नागरिकांच्या या प्रश्नांची फारशी चर्चा होत नव्हती. पण बाबरी मशीद पडल्यावर मुंबईत झालेल्या दंगली व विशेषतः नंतर 12 मार्च 1993 ला झालेले बाँबस्फोट या घटनांनी ही परिस्थिती आमूलाग्र पालटली. मुंबई व महाराष्ट्रभर परदेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहतात या आरोपात सामान्य माणूसही रस घेऊ लागला. 

'परदेशी नागरिक' म्हणजे पाश्चिमात्य व इतर देशांतून आलेल्यांवर सेना-भाजपचा रोख कधीच नव्हता. त्यांना पाकिस्तानी व बांगलादेशीय अभिप्रेत होते. या दोन्ही पक्षांचा मुस्लिम द्वेषाचा दृष्टिकोनच त्यामागे होता. त्यामुळेच बांगला देशातून आलेल्या चकमा व हिंदूंना 'परदेशी' ठरविण्याची भाजपाची तयारी नव्हती. मूलतः जातीय दृष्टिकोनातून खेळल्या जाणाऱ्या 'परकीय नागरिकां'च्या या वादाला सर्वव्यापी परिमाण लाभले, ते बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या घटनांनी. याची दखल अजूनही पुरोगामी घ्यायला तयार नाहीत. 

सर्वसामान्यांचा दृष्टिकोन

सर्वसामान्य माणूस जातीय नसतो. आपले जीवन सुखी, समाधानी, व सुरक्षित असावे अशी त्याची माफक अपेक्षा असते. तो आपल्या परीने बरे-वाईट जोखत असतो. वाईटाच्या मागे तो सहसा जात नाही. कायद्याच्या चौकटीतच राहणे त्याला मानवते. तणाव, दंगल इत्यादींच्या तो विरोधात असतो. कारण त्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबीयांचे जीवन धोक्यात येते. त्याची रोजी-रोटी बुडते आणि हातावर पोट असल्याने त्याला आपल्या कच्च्याबच्च्यांना भुकेले राहिलेले पाहावे लागते.

आपल्याला धोका आहे, याची प्रखर जाणीव मुंबईतील दंगली व बाँबस्फोटांमुळे सर्वसामान्य माणसाला झाली. या दंगलीत व बाँबस्फोटांत शहरातील माफिया टोळ्यांचा हात होता, हे सत्य पोलिसी तपासानंतर त्याला दिसून येऊ लागले. बाबरी मशीद पाडल्यामुळे चिडून मुस्लिमांनी दंगली केल्या आणि या दंगलीत पोलिसांनी निष्ठुर कारवाई केली म्हणून 

 

( लेख अपूर्ण आहे )

Tags: तारिक अन्वर मानस भुई सुब्रतो मुकर्जी कृपाशंकर सिंग शिवाजी पार्क Tariq Anwar Manas Bhui Subrato Mukarjee Kripashankar Singh Shivaji Park weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रकाश बाळ
prakaaaa@gmail.com

महाराष्ट्र टाइम्स व लोकसत्ता या प्रमुख मराठी दैनिकांत दीर्घकाळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार-संपादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके