डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इराण- भारत संबंध : भाबडेपणा नको

इराणचे अध्यक्ष रफसंजानी यांच्या भारतभेटीच्या वेळी पंतप्रधानांनी राजशिष्टाचार धाब्यावर बसवून जवळीक दाखविण्याची गरज होती काय? पंतप्रधानांच्या या कृतीचा देशाला कितपत फायदा होईल?

इराणचे अध्यक्ष अली अकबर हाश्मी रफसंजानी यांनी नुकतीच भारताला भेट दिली. या भेटीच्या वेळी राजशिष्टाचार मोडून पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांचे विमानतळावर जाऊन स्वागत केले आणि इराणच्या अध्यक्षांना निरोप देण्यासाठीही पंतप्रधान जातीने विमानतळावर हजर राहिले. राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती भवनाच्या विस्तृत पटांगणात परदेशी पाहुण्यांचे समारंभपूर्वक स्वागत केले जाते. तेथेच त्यांना लष्करी मानवंदना देण्यात येते. या पाहुण्यांचा निरोप समारंभही तेथेच होतो.

ही प्रथा पंतप्रधान नरसिंह राव यांनी मोडली, कारण भारत इराण यांच्यातील संबंध घनिष्ठ आहेत, हे   त्यांना जगाला दाखवून द्यावयाचे होते, आशियातील राजकारणासाठी भारताच्या दृष्टीने इराणचे महत्त्व मोठे आहे, याची जाणीव श्री. राव यांना जगाला करून द्यावयाची होती, म्हणून त्यांनी राजशिष्टाचाराचे संकेत मोडले, असे सरकारी गोटातून खासपणे सुचविण्यात आले. पण पंतप्रधानांनी राजशिष्टाचार मोडण्याचे खरोखर एवढेच कारण होते काय? 

गौप्यस्फोट

अण्वस्त्र नविण्याची क्षमता मिळविण्याच्या प्रयत्नात इराण आहे, असा आरोप अमेरिका गेले काही महिने करीत आहे. रशिया आणि चीन या दोन देशांकडून इराण त्यासाठी साधनसामग्री मिळवू पाहत आहे, असा अमेरिकेचा आक्षेप आहे. भारतीय कंपनीने इराणला पाठविलेली रसायने घेऊन जाणारी बोट अमेरिकेच्या सांगण्यावरून मध्यंतरी आखाती देशांत अडविण्यात आली होती. इराणचे अध्यक्ष भारतात आले, त्या वेळी अमेरिकेचे अर्थमंत्री रॉबर्ट रुबिन हेही राजनैतिक भेटीसाठी दाखल झाले होते. 

या दोन्ही नेत्यांच्या भारत-भेटी होत होत्या, तेव्हाच न्यूयॉर्कमध्ये अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या नुतनीकरणासाठी परिषद भरली होती. भारत, पाकिस्तान आणि इस्रायल या तिन्ही राष्ट्रांनी आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आळा घालावा आणि या करारावर स्वाक्षऱ्या कराव्यात, असा अमेरिकेसह इतर अण्वस्त्रधारी राष्ट्रांचा आग्रह आहे. पण हा करार पक्षपाती आहे, अशी भारताची भूमिका आहे. म्हणून न्यूयॉर्क येथील परिषदेस हजर राहण्यासाठी भारताने नकार दिला आहे. पण ही भूमिका अधिकृतरीत्या घेत असतानाच, भारताने अमेरिकेच्या दडपणाखाली 'पृथ्वी' व 'अग्नी' या दोन क्षेपणास्त्रांच्या अंतिम चाचण्या थांबविल्या आहेत, असा गौप्यस्फोट अमेरिकी वृत्तपत्रांनी गेल्या काही दिवसांत केला आहे. त्यासाठी अमेरिकी सरकारच्या वरिष्ठ अधिकान्यांनी सिनेटच्या समितीपुढे दिलेल्या साक्षीचा हवाला या वृत्तपत्रांनी दिला होता. त्याचबरोअबर अण्वस्त्र निर्मूलनाचा आग्रह धरणारा ठराव संयुक्त राष्ट्रसंघात मांडण्याचा विचार भारताने क्लिंटन प्रशासनाच्या दबावाखाली सोडून दिला, अशीही बातमी नुकतीच 'वॉशिंग्टन पोस्ट' या मान्यवर अमेरिकी दैनिकाने प्रसिद्ध केली होती. 

संधी साधली

नरसिंह राव यांच्या सरकारने अधिकृतरीत्या अण्वस्त्र प्रसारबंदीच्या पक्षपाती कराराला विरोध केला असला, तरीही प्रत्यक्षात अमेरिकेच्या कलानेच भारत वागत आहे अशी प्रतिमा या बातम्यांमुळे उभी राहिली. सर्वच बाजूंनी पेचात सापडलेल्या अवस्थेत श्री. राव असताना अमेरिकी प्रसारमाध्यमांच्या या गौप्य स्फोटामुळे सरकारच्या विरोधकांच्या हाती आणखी एक कोलीत मिळणार होते. म्हणून अध्यक्ष रफसंजानी यांच्या भारतभेटीची संधी साधून अमेरिकेला आपण विरोध करू शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न श्री. राव यांनी केला.

केवळ योगायोग?

इराण अण्वस्त्र क्षमता मिळवू पाहत आहे, असा अमेरिकेचा आरोप आहे. क्लिंटन प्रशासनाच्या दडपणाखाली भारताने आपला क्षेपणास्त्राचा कार्यक्रम थांबविला आहे, असे अमेरिकी वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. अशा वेळी इराणच्या अध्यक्षांचे आगत-स्वागत करताना राजशिष्टाचार मोडल्याने, आपण अमेरिकेच्या विरोधाला भीक घालत नाही, असे दाखवून देण्याची संधी आहे, हा विचार श्री. राव यांनी केलेला दिसतो. 

इराणच्या अध्यक्षांच्या भारतभेटीच्या वेळेतच आपल्याला येथे यावे लागले, या बद्दल अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी जाहीररीत्या खेद व्यक्त केल्याने राव यांच्या शिष्टाचार मोडण्याच्या कृतीला अधिक झळाळी आली. त्यातही भारतीयांचा निरोप घेताना अध्यक्ष रफसंजानी यांनी अमेरिकी अर्थमंत्र्यांच्या विधानांची खिल्ली उडविली आणि शिष्टाचार मोडण्याची राव यांची कृती हा चाणक्यनीतीचा कसा आदर्श आहे, हे त्यांचे समर्थक सूचित करू लागले.   

वस्तुतः परदेशी पाहुण्यांच्या राजनैतिक भेटींचा तपशील अत्यंत काटेकोरपणे आखला जात असतो. अगदी बारीक सारीक गोष्टीही विचारात घेतल्या जातात. एकमेकांच्या विरोधात असलेल्या देशांचे नेते एकाच वेळी भेटीस येऊन राजनैतिक पेच प्रसंग निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जात असते. साहजिकच इराणच्या अध्यक्षांची भारत-भेट होत असतानाच अमेरिकेचे अर्थमंत्रीही दिल्लीत दाखल होणार नाहीत, याची खबरदारी आपल्या परराष्ट्र खात्याने घ्यायला हवी होती. 

किंबहुना अशी काळजी हे खाते घेणार नाही, ही गोष्ट असंभवच आहे. त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्र्यांच्या भारत भेटीच्या वेळेसच इराणचे अध्यक्ष रफसंजानीही तेथे असणार आहेत, हे अमेरिकेला माहीत नसेल, यावर कोण विश्वास ठेवील? अध्यक्ष रफसंजानी यांनी आपल्या निरोपाच्या पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या गुप्तहेरखात्याचा उल्लेख करून खिल्ली उडविली, ती त्यासाठीच.   

ज्या देशाला आपण राजनैतिक भेट देत असतो, तेथील सरकारची पंचाईतहोईल, अशी कृती वा वक्तव्य न करणे, ही राजशिष्टाचाराची प्रथा आहे. पंतप्रधान राव यांनी राजशिष्टाचार मोडला, तशी ही प्रथाही अमेरिकी अर्थमंत्र्यांनी पाळली नाही. भारतासारख्या मित्रराष्ट्राला भेट देताना तेथील सरकार अडचणीत येईल असे वक्तव्य न करण्याची खबरदारी त्यांनी घेतली नाही. राजशिष्टाचार मोडण्याची  पंतप्रधानांची कृती आणि राजनैतिक प्रथा न पाळण्याचा अमेरिकी अर्थमंत्र्यांची कृती हा केवळ योगायोग आहे, असे मानणे भावडेपणाचे ठरेल. 

मध्य आशियाचा संदर्भ 

इराण आणि भारत यांच्या संबंधांचा विचार असा भाबडेपणा आणि राजनैतिक कवित्व न करताच होणे गरजेचे आहे. इराण हा धर्मवादावर आधारित राज्यपद्धती मानणारा कट्टरपंथीय देश आहे. लोकशाही मूल्यांशी या देशातील सरकारला काही देणे-घेणे नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने इराण हा आपला मित्रदेश होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणातील डावपेचांपुरतेच इराणशी संबंध आपण ठेवायला हवेत. इराणही भारताकडे नेमक्या याच दृष्टीने पाहत आहे.

इराण हे राष्ट्र पाश्चिमात्य हितसंबंधांना धोकादायक ठरू शकते, असेअमेरिकेला वाटत आहे, ते केवळ इस्लामी पुनरुञजीवन वादाला रफसंजानी व त्यांच्या आधीचे खोमेनी सरकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देते म्हणून नव्हे. सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर मध्य आशियात निर्माण झालेल्या अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या पाच प्रजासत्ताकांशी आर्थिक संबंध चांगले प्रस्थापित करण्याची, त्यांच्या अर्थव्यवस्थांशी सांगड घालण्याची मनीषा इराण बाळगून आहे. 

भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या हे त्याला शक्य आहे. या पाचही राष्ट्रांना समुद्र किनारा नाही. निर्यातीसाठी इराण या राष्ट्रांना आपल्या बंदराचा  वापर करू देऊ शकते. अझरबैजानच्या तेल निर्यातीला फक्त इराण मार्फतच वाव आहे. साहजिकच या देशांना इराणचा मदतीचा हात मोलाचा ठरू शकतो. त्या बदल्यात आंतरराष्ट्रीय राजकारणातही राष्ट्रे इराणला फायद्याची ठरू शकतात. 
    
भारत, इराण आणि तुर्कमिनिस्तान या तिघांतील करार या पार्श्वभूमीवर बघायला हवा. पर्शियन आखातापासून तुर्कमिनिस्तानपर्यंत इराणला रेल्वेमार्ग बांधून हवा आहे. मध्य आशियातील इतर चार मुस्लिम प्रजासत्ताकांच्या रेल्वेयंत्रणांच्या जाळ्याशी हा रेल्वेमार्ग मग जोडता येईल. त्यामुळे या राष्ट्रांच्या निर्यातीचा मार्ग खुला होईल. पण हा रेल्वेमार्ग बांधण्याएवढा पैसा इराणकडे नाही. 

अनेक भारतीय कंपन्यांचे पैसे त्याने थकविले आहेत. काश्मीर- पाकिस्तान या प्रश्नावर भारताला सहानुभूती दाखवून , प्रसंगी मदतीचा हात देऊन आपण हा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी नरसिंहराव सरकारला भरीला घालू शकू, असा विश्वास इराणला वाटतो आहे. शिवाय मध्य आशियाई देशांना पाठवायचा माल भारत, पाक व अफगाणिस्तान मार्गे पाठवू शकत नाही. त्यामुळे आपल्या प्रदेशाचा त्याला वापर करू दिल्यास ते भारताच्या दृष्टीने आणखी एक आकर्षण ठरेल, असाही विचार इराणने केलेला दिसतो.

मर्यादा   

पाकच्या डावपेचांना उत्तर देण्यासाठी इस्लामी देशांच्या संघटनेचा महत्त्वाचा सदस्य असलेला इराण भारताच्या निश्चितच उपयोगी पडू शकतो. जिनिवा येथे झालेल्या मानवी हक्क आयोगाच्या बैठकीत इराणने अशी मदत केली होती. बाबरी मशिदीच्या प्रश्नावर विनाकारण वाद वाढवू नये, हे अध्यक्ष रफसंजानी यांचे आवाहन आणि त्यांनी लावनेनेला जाऊन शियापंथीयांची घेतलेली सभा, या दोन्ही घटना काँग्रेस पक्षाला फायद्याच्या ठरणाऱ्या आहेत.

त्या पलीकडे व्यापार व इतर गोष्टींत इराणचा भारताला फारसा उपयोग नाही. मध्य आशियातील देश हे मुख्यतः तेल व नैसर्गिक वायू निर्माण करतात. शिवाय या देशातील क्रयशक्तीची पातळी लक्षात घेता, भारतीय मालाला तेथे फारसा उठाव असण्याची शक्यता कमीच. त्यातही आखाती तेल हे सर्वांत स्वस्त आहे. तेव्हा भारत आणि मध्य आशियाई देश इराणयांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधात वृद्धी होण्यास मर्यादा आहे. ती लक्षात घेऊनच विचार व्हायला हवा. 

म्हणूनच इराण व भारतयांच्या संबंधांबाबत भाबडेपणा व प्रेम जोपासणे धोक्याचे आहे. त्याने सत्ताधारी काँग्रेसला निवडणुकीत मुस्लिम मते मिळविण्यासाठी कदाचित फायदा होईल, पण देशाचा काही फायदा होणार नाही.

(युनिक फीचर्स)

Tags: आंतरराष्ट्रीय संबंध अफगाणिस्तान पाकिस्तान भारत इराण संबंध नरसिंह राव America Politics P. V. Narsmiha Rao International Relations India Iran Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रकाश बाळ
prakaaaa@gmail.com

महाराष्ट्र टाइम्स व लोकसत्ता या प्रमुख मराठी दैनिकांत दीर्घकाळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार-संपादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके