डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अद्वितीय आणि अनुपम : ‘आनंद’

ज्या चित्रपटाने राजेश खन्नाला चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले त्या चित्रपटाच्या निर्मितीची कथा प्रकाश चांदे राजेश खन्नाच्या निधनानिमित्ताने सादर करत आहेत. चित्रपटसृष्टीत अर्धशतक कार्यरत असणारे नामवंत निर्माते- दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांच्या मते ही त्यांची अद्वितीय निर्मिती!  

चांगल्या कथानकाच्या बीजाला कधी कधी मूर्तरूप धारण करून मोठ्या पडद्यावर अवतीर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट बघावी लागते; त्यातून हिन्दी चित्रपटसृष्टी म्हणजे वेळ, पैसा, मनुष्यबळ आणि इतर अनेक बाबतींत जगड्‌व्याळ बाब! शिवाय जे धंदेवाईक निर्माते नाहीत त्यांना तर ते अफाट भांडवल उभे करणे ही महा कठीण गोष्ट! पण आंतरिक तळमळ असलेली व्यक्ती या सर्व अडचणींतून मार्ग काढते आणि चित्रपट निर्मितीचे आपले स्वप्न पुरे करते. त्यामुळेच चित्रपटसृष्टीत सकस, आशयघन आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट निर्माण होत राहतात. 

शांताराम, मेहबूब, देवकी बोस, बिमल रॉय यांच्या परंपरेत ‘फिट्ट’ बसणारे निर्माते दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी ऊर्फ हृषीदा हे अशाच र्दुीळ निर्मात्यांपैकी एक. त्यांनी निर्मिती केलेला ‘आनंद’ हा त्यांच्या मते त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. 1951-52 च्या सुमारास राज कपूर हा राजा नवाथे दिग्दर्शित ‘आह’ ह्या चित्रपटाची निर्मिती करत होता. चित्रपटाचा नायक अर्थात तोच होता. या चित्रपटाचे संकलक होते हृषीदा. हे चित्रीकरण चालू असतांना एक दिवस ध्यानीमनी नसतांना राज कपूरला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे उपचार करून घेण्यासाठी त्याने काही दिवस विश्रांती घेतली. पण उपचार करून घेऊन आलेला राज कपूर हा पूर्वीप्रमाणेच हसरा, खेळकर, चेष्टेखोर, आणि उत्साही होता. जणू काही झालेच नाही अशा थाटात त्याने परत आपल्या कामाला सुरुवात केली. हे बघून पंचविशीतील हृषीदा कमालीचे आश्चर्यचकित झाले! 

जवळजवळ मृत्यूच्या भोज्ज्याला शिवून आलेल्या राज कपूरचे हे रूप बघून त्यांच्या मनात, ‘जीवघेणा आजार झालेला रुग्ण शेवटपर्यंत स्वत: आनंदी राहून इतरांनाही कायम आनंदी ठेवतो आणि स्वत: हसत हसत मृत्यूला कवटाळतो,’ या कथानकाचा जन्म झाला! पुढे-मागे आपण निर्माते झालो तर या कथानकावर खुद्द राज कपूरलाच घेऊन चित्रपट निर्मिती करण्याचे त्यांनी त्याच क्षणी मनात ठरवले; इतकेच नव्हे तर राज कपूरला कथा ऐकवून त्याचा होकारही घेऊन ठेवला. शिवाय, हा आपला पहिलाच चित्रपट असल्याने तो लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण व्हावा म्हणून दिलीपकुमार आणि देव आनंदलाही या चित्रपटात भूमिका देण्याचे त्यांनी मनात पक्के केले. 

मात्र, कसलेही आर्थिक बळ नसणाऱ्या एका नवशिक्या तंत्रज्ञाला हिन्दी चित्रपटसृष्टीत निर्माता बनणे इतके सोपे असते काय? परंतु, 4-5 वर्षांत हृषीदा ‘मुसाफिर’ चित्रपटाद्वारे चित्रपट निर्माते- दिग्दर्शक झालेही; पण या चित्रपटाचा योग काही येत नव्हता. मात्र, जेव्हा त्यांनी या कथानकावर चित्रपटनिर्मिती करण्याचे ठरवले तेव्हा एक-दीड तपाचा काळ उलटून गेला होता. तो पर्यंत बऱ्याच गोष्टी कमालीच्या बदलल्या होत्या. मुख्य म्हणजे राज कपूरचे वय आणि शरीरयष्टी तरुण नायकाला साजेशी राहिलेली नव्हती. म्हणून मग नव्या आणि योग्य नायकाचा शोध सुरू झाला.

हा चित्रपट तसा विनोदी नसला तरी नायक हा खेळकर स्वभावाचा असल्याने किशोरकुमार आणि त्या वेळेस नुकतेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला आणि आपल्यात अभिनय गुण आहेत, याची झलक दाखवणाऱ्या संजीवकुमार यांची निवड पक्की करून चित्रीकरणाला सुरुवातही झाली. चित्रीकरणाचा एखादा हप्ता पुरा झाला नाही तोच, किशोरकुमारने या चित्रपटातून आपले अंग काढून घेतले. (चौकट पाहा) मग तरुण, देखण्या आणि अभिनयाची उत्तम जाण असणाऱ्या शशी कपूरला विचारले, पण आर्थिकदृष्ट्या आपले बस्तान न बसलेल्या शशी कपूरने पारिश्रमिकाचा आकडा ऐकून नकार दिला.

कुठलेही योग्य नाव डोळ्यासमोर येईना. अखेरीस, ‘राज’, ‘बहारोंके सप्ने’, ‘आराधना’, ‘दो रास्ते’, अशा चित्रपटांतून चमकलेल्या आणि लोकप्रिय होत असलेल्या राजेश खन्ना या होतकरू नायकाशी संपर्क साधण्याचे ठरले. तोपर्यंत ‘मुसाफिर’, ‘अनाडी’, ‘अनुपमा’, ‘आशीर्वाद’ अशा जाणकारांनी दखल घेतलेल्या आणि अमाप लोकप्रिय झालेल्या चित्रपटामुंळे त्याने हृषीदा यांच्यासारख्या प्रथम श्रेणीच्या नामवंत दिग्दर्शकाकडे प्रमुख भूमिका मिळते आहे म्हटल्यावर क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.

ही भूमिका करण्यासाठी फक्त रु.60,000 मिळतील; आणि चित्रपट शक्य तितक्या लवकर पूर्ण करावयाचा असल्याने चित्रीकरणासाठी सलग तारखा द्यावयास लागतील; हेही बजावले गेले. राजेश खन्नाने या सर्व गोष्टी काहीही खळखळ न करता मान्य केल्या. या चित्रपटाला रूढ अर्थाने नायिका नव्हती; म्हणून त्या भूमिकेसाठी कोणाला निवडायचे हा प्रश्न नव्हता. कथेत मोजकीच पात्रे असल्याने अन्य भूमिकांत अमिताभ बच्चन (याचा हा दुसराच चित्रपट), सुमिता सन्याल, रमेश देव, सीमा (देव) यांची निवड केली.

ललिता पवार, असित सेन, दुर्गा खोटे, दारासिंह, ब्रह्म भारद्वाज आणि जॉनी वॉकर यांची पाहुणे कलाकार म्हणून निवड झाली.  स्वत: हृषीदांनी गुलजारच्या साहाय्याने पटकथा लेखन केले. गेली अनेक वर्षे या कथेवर चिंतन-मनन झालेले असल्याने संपूर्ण चित्रपट त्यांच्या डोळ्यांसमोर होता. त्यामुळे पटकथा आटोपशीर आणि बांधेसूद झाली. सर्वसाधारणपणे व्यावसायिक गरज म्हणून नायिकेचे पात्र निर्माण करण्याचा आणि त्या भूमिकेत तत्कालीन लोकप्रिय अभिनेत्रीला चमकावण्याचा मोह कुठल्याही दिग्दर्शकाला झाला असता, पण हृषीदांनी तो मोह टाळला. प्रत्येक प्रसंग विचारपूर्वक घालून, त्याचे ताकदीने चित्रीकरण करण्यात त्यांनी कसूर केली नाही.

‘आपल्या आयुष्याचे केवळ काही महिनेच उरले असून त्यानंतर आपला मृत्यू अटळ आहे,’ हे मनोमन ओळखून आनंदाने आणि जिंदादिलाने वागणाऱ्या आनंदची भूमिका राजेश खन्नाने आपल्या सहज सुंदर, उत्स्फूर्त आणि अकृत्रिम अभिनयाने अजरामर करून ठेवली आहे. या भूमिकेचे त्याने सोने केले आहे. येता-जाता सतत स्वत: हसणारा, दुसऱ्यांनाही हसवणारा, जाईल तेथे आपल्या वागण्या-बोलण्याने कायम प्रसन्नतेचा शिडकावा करणारा हा तरुण कर्करोगाचा रुग्ण वाटतच नाही. त्या वेळेस राजेश खन्ना हा लोकप्रिय झालेला, बस्तान बसलेला, आघाडीचा अभिनेता नव्हता. त्यामुळे लोकप्रिय पण भूमिकेसाठी अनावश्यक असणारे नायकाचे ‘मॅनरिझम्स’ टाळण्यात दिग्दर्शक हृषीदांना 100 टक्के यश आले आहे.
त्याच्या खास शैलीत, ऋजू आवाजात त्याने मारलेल्या बाबूमोशाय, मुरारीलाल! या हाका त्या वेळेस तरुण-तरुणींत चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. ही राजेश खन्नाची नि:संशय सर्वोत्कृष्ट भूमिका!

नंतर पडद्यापेक्षा मोठ्या झालेल्या अमिताभ बच्चनची ही केवळ दुसरीच भूमिका, चित्रपटात नायकानंतर हीच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ती अमिताभने पुरेशा मेहनतीने साकारली आहे. गरिबांसाठी कळकळ असणारा, सेवाभावी डॉक्टर भास्कर अमिताभने मनापासून पेश केला आहे. ‘हा उद्याचा महत्त्वपूर्ण अभिनेता असणार आहे’, याची जाणकारांनी दखल घ्यावी, इतक्या ताकदीने त्याने अभिनय केला आहे. त्याच्या दैनंदिनीतून चित्रपटाची कथा उलगडत जाते. चित्रपट फ्लॅश-बॅक तंत्राने सादर केला आहे. मात्र या चित्रपटात सर्वांत सुंदर भूमिका झाली आहे ती जॉनी वॉकरची. खरं तर ही पाहुण्या कलाकाराची भूमिका. फुटेजचा विचार केला तर तशी नगण्यच, पण पटकथेत ही भूमिका छान खुलवली आहे; आणि जॉनी वॉकरने तिचे अचूक मर्म ओळखून हृषीदांना अपेक्षित तऱ्हेने अभिमीत केली आहे.

आनंदच्या ‘मुरारीलाल’ला योग्य तऱ्हेने प्रतिसाद देणारा, एका हौशी नाटक मंडळीचा पैशाने गरीब असणारा हा मालक. मात्र, प्रत्येक फुटात त्याने असे काही गहिरे रंग भरले आहेत की ही छोटी भूमिका न वाटता प्रमुख भूमिकांइतकीच लक्षात राहते, महत्त्वाची वाटते. आनंद हा केव्हाही मृत्यू पावेल हे कळताच जॉनी वॉकरने जो हृदयस्पर्शी अभिनय केला आहे त्याने सुबुद्ध प्रेक्षकांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात. जॉनी वॉकरला डोळ्यासमोर ठेवून यापेक्षा मोठ्या भूमिका लिहिल्या गेल्या, पण त्या सर्वांवर कडी करेल अशीच ही भूमिका आहे. त्याला या भूमिकेसाठी ‘फिल्म फेअर’चे नामांकन मिळाले होते.

या चित्रपटात अखेरीस ध्वनिमुद्रण यंत्राचा जो उपयोग करून घेतला आहे, त्याचे तर कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे! ही कल्पना ज्या कोणाला सुचली त्याला मन:पूर्वक सलाम! तो काळ ‘स्पूल’ पद्धतीच्या मोठ्या ध्वनिमुद्रण यंत्रांचा. कॅसेट, टेपरेकॉर्डर नुकतेच भारतात येऊ लागले होते. या स्पूल यंत्रावर टेप संपल्यावर चक्राचे जे गरगर फिरणे दाखवले आहे तो तर प्रतिभेचा, कल्पकतेचा अनोखा चमत्कारच!

आनंद मृत्यू पावला आहे हे कळल्यावर ‘तू बोल, बोल’ असे उद्वेगाने डॉ.भास्कर म्हणतो, आणि अचानक बाबू मोशाय! ही आनंदची चिरपरिचित हाक अत्यंत अनपेक्षितपणे ऐकू येते! हा मृत्यू पावलेला असूनही बोलतो कसा, या संभ्रात प्रेक्षक असतात; पण त्याचवेळी त्या संबोधनासरशी प्रत्येक प्रेक्षकाच्या अंगावर जो सर्रकन शहारा उठतो, त्याचे समर्पक वर्णन करणे केवळ अशक्यच आहे! हा अनुभव चित्रपट गृहातच घ्यावयास हवा! 

‘दो बिघा जमीन’पासूनच हृषीदांशी सूर जुळलेल्या अनोख्या, प्रयोगशील संगीतकार सलील चौधरी यांनीच या चित्रपटाचे संगीत नियोजन केले आहे. यात केवळ चारच गाण्यांना वाव आहे. मुकेश (2), मन्ना डे आणि लता मंगेशकर प्रत्येकी एक. ही गीते गुलजार आणि योगेश यांनी लिहिली आहेत. ती अर्थपूर्ण असून सुगम आणि प्रासादिकही आहेत. त्यांना अर्थानुकूल आणि खास सलील चौधरी ढंगाच्या चाली लावल्या आहेत. कथानकात खंड न पडेल अशाच जागा या गीतांसाठी निश्चित केल्या गेल्या आहेत. तरीही एका  आठवड्यानंतर लताचे गीत त्यातून कापले गेले. पार्श्वसंगीतावर विशेष मेहनत घेणारे संगीतकार म्हणून सलीलदा यांचा असलेला लौकिक त्यांनी सांभाळला आहे.

हा चित्रपट मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्करोग्याची कथा सांगणारा असल्याने तसा तो अंगावर येणारा; हे ओळखून हृषीदांनी कथानकाच्या गांभीर्याला अजिबात धक्का न लावता आवश्यक तेथे नर्मविनोदाची प्रसन्न पखरण केली आहे. दुसऱ्या कोठल्याही दिग्दर्शकाने विरंगुळ्यासाठी लोकप्रिय विनोदी अभिनेत्याची योजना केली असती. मात्र, त्यामुळे ते विनोदी प्रसंग मूळ गंभीर कथानकाला ठिगळ लावल्यासारखे दिसण्याचा धोका होता. सुरुवातीलाच ‘डॉ.भास्कर हे फक्त दवाच्या दुनियेत प्रसिद्ध आहेत, दारूच्या नव्हे’; असे आलेले वाक्य. 

वाढदिवसाच्या दिवशी सीमा ‘हम प्रेझेंट्‌स वगैरा लेनेवाले नही,’ असे म्हणते, ‘तो क्या सिर्फ तु कॅश लोगी?’ हा आनंदचा सवाल. रमेश देव, सीमाचे मराठी बोलणे; आनंदला ‘साला’ अशी दिलेली शिवी. सदैव हसणारा आनंद एकदा रडतरडत डोळे पुसताना दिसतो, हा विसंगत वाटणारा प्रसंग प्रत्यक्षात तो कांदा कापत असल्यामुळे डोळ्यात अश्रू आलेले असतात. ललिता पवार, असित सेन या आणि अन्य पात्रांबरोबर योजलेल्या सौम्य विनोदी प्रसंगांमुळे प्रेक्षकांना आवश्यक तो विरंगुळा मिळण्याची काळजी घेतली आहे.

कथा, पटकथा, संकलन आणि दिग्दर्शन यांत हृषीदा कमालीचे झळाळून उठले आहेत. गुलजार यांचा सहभागही मुद्दाम उल्लेख करावा इतका लक्षणीय आहे. अन्य तांत्रिक अंगे सफाईदार आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता- राजेश खन्ना, सहाय्यक अभिनेता- अमिताभ बच्चन, कथा- हृषीदा, संवाद- गुलजार, संकलन- हृषीदा अशी पाच ‘फिल्म फेअर’ पारितोषिके पटकावली. अन्यत्र अनेक पारितोषिके या चित्रपटाने पटकावली. वितरित झाल्यावर चित्रपट लवकरच लोकप्रिय झाला. त्याने यथावकाश रौप्यमहोत्सवही साजरा केला. खऱ्या विनोदाच्या खाली अश्रूंचे तळे असते, असे जे म्हणतात, याचे हा चित्रपट हे उत्कृष्ट उदाहरण! हृषीदा या चित्रपटाला आपली सर्वोत्कृष्ट कलाकृती मानत असत. 

---

1. राज कपूर- आनंद, दिलीपकुमार- डॉ.भास्कर आणि देव आनंद- डॉ.कुलकर्णी; अशा भूमिका हृषीदांच्या मनात असलेला हा चित्रपट ‘मुसाफिर’ अगोदर निर्माण होऊन ‘अनाडी’सारखा लोकप्रिय झाला असता तर? 

2. या चित्रपटाचे संगीत-दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी करावे अशी हृषीकेश मुखर्जींची इच्छा होती. तसे झाले असते तर चित्रपटाचे नाव ‘आनंद’ आणि संगीत-दिग्दर्शकाचे नाव ‘आनंदघन’ (कारण याच नावाने लताबाई संगीत-दिग्दर्शन करतात.) असे दृश्य दिसले असते. 1961 साली ‘सखी रॉबिन’ नावाचा चित्रपट आला होता; त्याच्या संगीत-दिग्दर्शकाचे नाव होते ‘रॉबिन!’ याचीच पुनरावृत्ती झाली असती; नाही का? 

3. त्या वेळेस किशोरकुमार आर्थिक अडचणीत होता, हे पाहून हृषीदांनी किशोरकुमारला या चित्रपटात नायकाची भूमिका दिली होती. मात्र हे किशोरकुमारला कळताच त्याचे डोके सटकलेच; आणि हा आपला अपमान समजून त्याने काहीही न सांगता चित्रपटातून आपले अंग काढून घेतले! 

4. मूळ कथा राज कपूरसाठी बेतलेली असल्यामुळे हा चित्रपट हृषीदांनी राज कपूर आणि मुंबई शहर यांना अर्पण केला होता; आणि तसा उल्लेखही त्यांनी चित्रपटाच्या श्रेयनामावलीत केला होता. मात्र त्यावेळचे वैचारिक साप्ताहिक ‘माणूस’च्या समीक्षकाने या चित्रपटाच्या सुरुवातीला राज कपूरचा उल्लेख असूनही तो चित्रपटात कोठेच न दिसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते! काय म्हणावे या समीक्षकाला? 

5. याच कथानकावर तात्यासाहेब शिरवाडकरांनी नाटक लिहावे, असा प्रस्ताव आल्यावर हा चित्रपट तात्यासाहेबांनी पाहिलेला नसल्यामुळे त्यांच्यासाठी या चित्रपटाचा एक खास ‘शो’ नाशिकमध्ये आयोजित केला होता. त्याला हृषीदा यांच्याबरोबर गुलजारही हजर होते. इथपासून गुलजार आणि तात्यासाहेबांची दोस्ती सुरू झाली, असे खुद्द गुलजारनी मला सांगितले. 

6. या चित्रपटात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ना, जिया लागे ना’, हे गीत होते. परंतु लवकरच हे गीत चित्रपटात रसभंग करते, म्हणून चांगले झालेले असूनही कापण्यात आले. 

7. या चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’नंतर झालेल्या पार्टीत ‘अमिताभ बच्चन हा केवळ आपल्या आवाजाच्या जोरावर तुझा प्रतिस्पर्धी ठरू शकण्याचा मोठा धोका आहे’, असे फटकळ देवयानी चौबळने त्या वेळचा तिचा परम मित्र राजेश खन्ना (ऊर्फ ‘काला मांजा’) याला बजावल्याचे तेथे हजर असलेल्या सुधीर गाडगीळने नमूद करून ठेवले आहे.

8. त्या वेळेस शशी कपूरने नाकारलेले ‘आनंद’ आणि ‘हाथी मेरे साथी’ हे दोन्ही चित्रपट राजेश खन्नाने क्षणाचाही विलंब न लावता स्वीकारले. या दोन्ही चित्रपटांनी राजेश खन्नाची लोकप्रियता कळसाला पोचली!   

Tags: गुलजार लता मंगेशकर देव आनंद दिलीपकुमार राज कपूर Gulzar Lata Mangeshkar Dev Anand Dilip Kumar Raj Kapoor weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रकाश चांदे
prakshchande2004@yahoo.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके