डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

"बाबा रे संप, मोर्चा, बंद हे मार्ग आततायीपणाचे. सारे प्रश्न सामंजस्यानं चर्चेनं मिटवणं केव्हाही चांगलं. या बाबतीत डॉ.बंग यांचं उदाहरण देता येईल."
"काय केलं त्यांनी?" 

नेहमी उत्साही असणारा रोहन आज पडेल चेहऱ्यानं काकाच्या खोलीत प्रवेशत होता. काकालाही आश्चर्य वाटलं, काय बिनसलं असावं? शाळेच्या क्रिकेट टीममध्ये त्याचा समावेश न झाल्यानं रोहन खट्ट होता. ६ फलंदाज निवडायचे होते. निवडीसाठी शाळेतर्फे ५ सामने खेळवले गेले. ५ जणांची निवड झाली होती. चुरस होती सहाव्या फलंदाजासाठी रोहन व समीर यांच्यात. समीरच्या धावांची सरासरी भरली २५ तर रोहनची २४. अगदी थोडक्यासाठी रोहनची संधी हुकली.
“निराश होऊ नकोस. प्रयत्न कर. पुढच्या वर्षी संधी मिळेल.” काका समजूत घालत होता. 
"मी शाळेच्या मैदानावर बैठा संप करायचं ठरवलंय."
"ते का बाबा?" काकाला हसू फुटलं.
"कारण टीमला समीरहून मी जास्त उपयुक्त आहे असं माझं ठाम मत आहे."
"तू असं ठामपणे कसा काय म्हणू शकतोस?"
"कारण समीर भरवशाचा फलंदाज नाही. कधीतरी तो चांगली कामगिरी करतो. पण बऱ्याच वेळा लवकर बाद होतो." 
"निवडीसाठी खेळलेल्या तुझ्या आणि त्याच्या ५ सामन्यांच्या धावसंख्या सांगू शकतोस?"
"सांगतो ना, तोंडपाठ आहे. समीरच्या धावा होत्या ८९, ०, २, ३२ आणि २. सरासरी २५. माझ्या धावा २२, २७, १९, २२ आणि ३०. सरासरी २४."
"तुझ्या बोलण्यात तथ्य आहे." आकड्यांवर नजर फिरवत काका बोलला, "तुझी निवडच अधिक योग्य आहे. तुझ्या खेळात सातत्य आहे."
"मग मी बसू संपाला?"
"बाबा रे संप, मोर्चा, बंद हे मार्ग आततायीपणाचे. सारे प्रश्न सामंजस्यानं चर्चेनं मिटवणं केव्हाही चांगलं. या बाबतीत डॉ.बंग यांचं उदाहरण देता येईल."
"काय केलं त्यांनी?" 
"बरीच जुनी गोष्ट आहे. रोजगार हमी योजनेचे दिवस. मजुरांना अत्यंत कष्टाचे काम करावे लागायचे आणि मजुरी मिळायची दिवसाला जेमतेम साडेचार रुपये. त्या पैशात भाकरी, भाजीसारखं अन्न देखील पुरेसं मिळायचं नाही. अतोनात कष्टाला आवश्यक अशी ऊर्जा अपुऱ्या अन्नातून कशी मिळणार? मजुरी वाढवून मिळणं गरजेचं होतं. डॉ.बंग यांनी हा प्रश्न धसास लावला. त्यासाठी त्यांनी संप, रास्ता रोको, बंद अशा आततायी मार्गांचा अवलंब केला नाही. मजुराच्या कष्टाच्या कामाखातर दर दिवशी किती ऊर्जा खर्च होते याचं गणित मांडलं. एवढ्या ऊर्जेसाठी विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचं किती सेवन केलं पाहिजे याचंही गणित केलं आणि त्या वेळच्या बाजार भावानुसार त्या अन्नपदार्थांचे पैशाचे मूल्य काढले. ते आलं किमान साडेबारा रुपये. कमीतकमी एवढी तरी मजुरी मिळालीच पाहिजे याविषयी डॉ.बंग आग्रही होते. याशिवाय मजुरावर अवलंबून असणारं कुटुंब, मुलांचं शिक्षण, औषध-पाणी वगैरे मुद्दे होतेच. तथापि किमान साडेबारा रुपये मजुरी मिळवून देण्यात ते चर्चेद्वारे यशस्वी झाले. तुलादेखील आततायीपणा न करता शिक्षकांना त्यांची चूक ध्यानात आणून देता आली पाहिजे. तुझा मुद्दा सातत्य...' 

चौकट
१ किलो ग्रॅम अन्न पदार्थाची ऊर्जा (कॅलरीमध्ये)

पदार्थ गहू तांदूळ दूध साखर गूळ केळी शेंगदाणे तीळ खोबरे पोहे ज्वारी 
उर्जा (का) ३४८० ३४८० ११७० ४२७० ३५०० १५३० ५४९० ५६४० ३५७० ३५०० ३५७० 

"ऊर्जेचं गणित ठीक आहे, परंतु सातत्य गणितात कसं मांडायचं?"
"लक्षात घे, कोणतीही गोष्ट गणितात बसवता येते. तू तर तुझ्या शिक्षकांचे स्वभाव गणितात बसवले होतेस. सातत्य क्या चीज है? आता मला थोडं बाहेर जायचं आहे" काका कपडे करता करता बोलला, "दोन एक तासात मी परतेन तेव्हा सातत्याचं पाहू. तोवर तू... हां, नेहमीच्या खाद्य पदार्थातील उच्च ऊर्जेच्या पदार्थांसंबंधीचा हा तक्ता. तुझ्या घरातील प्रत्येकजण दर दिवशी सरासरी किती ऊर्जेचं म्हणजे कॅलरींचं सेवन करतो ते तू काढायचं."
"सोप्पं तर आहे" तक्त्याकडं पहात रोहन बोलला, “हे पदार्थ दिवसाला किंवा महिन्याला किती खरेदी केले जातात याची माहिती मी आईकडून घेईन. त्यावरून या पदार्थांचं दर दिवसाचं कॅलरीमधील सेवन काढता येईल. आम्ही तीन माणसं म्हणून त्या संख्येला तीनानी भागलं की दरदिवशी दर माणशी कॅलरी सेवन मिळेल."
"मी परतायच्या आत कर म्हणजे झालं." काका निघून गेला. काकानं दिलेला तक्ता असा होता...

आईकडून माहिती घेऊन रोहननं ऊर्जेचे गणित सोडवलं आणि तो काकाची वाट पहात बसला. काका येताना दिसताच तो त्याच्या खोलीत शिरला. काकाला कपडे बदलण्यासाठी फुरसतही त्यानं दिली नाही.
"काका, हे माझं उत्तर. आम्ही प्रत्येकजण दर दिवशी सरासरी २३२८ कॅलरी सेवन करतो." 
"ते ठिकाय, परंतु यात आणखी काही गोष्टी राहिल्यात." काका कपडे बदलता बदलता बोलला. 
"आणखी काय राहिलंय?" काकाचं दरखेपी काही तरी असतंच.
"तुझ्या घरात पाहुणे येत असतात. त्यांचं चहापाणी, जेवण होतं. ते तू हिशोबात धरलंस का?" 
"राहिलंच की! परंतु तो हिशोब करायचा म्हणजे..."
"असा बावचळून जाऊ नकोस. तुमच्या घरी जसे पाहुणे येतात तसेच तुम्हीदेखील इतरांच्या घरी जात असता. तेव्हा तो हिशोब बरोबरीत धरला तरी चालेल. परंतु आणखी एक गोष्ट राहिलीय."
"आता आणखी काय?" रोहनच्या चेहऱ्यावर नाराजी. 
"बऱ्याचदा तुम्ही बाहेरून खाद्यपदार्थ विकत आणता, तू बऱ्याच वेळा बाहेरचं आईस्क्रीम खातोस. तुझे बाबा तर रोज तीन-चार कप चहा बाहेर ढोसतात. ह्या गोष्टी हिशोबात नको धरायला? हिशोबात अगदी काटेकोर असावं लागतं एवढी गोष्ट लक्षात घे. आता तुझ्या जीवनमरणाचा प्रश्न, सातत्याचं गणित.'
रोहन सरसावून बसला.
"रोहन, तुझं अभ्यासाबाबतीत कितपत सातत्य आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यात दर दिवशी, म्हणजे दर दिवशी सरासरी तू किती तू तास अभ्यास करतोस?"
आता हे नवीन झेंगट. मुख्य मुद्यावर येण्याआधी काका आणखी काही गणितं करायला लावणार. तोपर्यंत काकाचा फोन खणाणतो. फोनवर काका गुलूगुलू गप्पा मारायला लागतो. प्रश्नच नाही काकाच्या गर्लफ्रेंडचा फोन. आता १५-२० मिनिटांची गच्छंती.

दर महिन्याला आपण किती अभ्यास करतो, रोहन आठवू लागला. जून महिना आणि अभ्यास यांचा ३६ चा आकडा. कधीमधी गृहपाठ करावा लागतो. या महिन्याचा अभ्यास दर दिवशी सरासरी १५ मिनिटे = ०.२५ तास धरायला हरकत नाही. जुलै पावसाचा महिना. बराच वेळ घरी जातो. तेव्हा पुस्तकात डोकं खुपसतो. दर दिवशी सरासरी १ तास? ठिकाय. ऑगस्ट महिना वर्षाभटकंतीचा. दर दिवशी सरासरी अर्ध्या तासाचा. सप्टेंबर महिना पुन्हा तासाभराचा. ऑक्टोबर महिना सहामाही परीक्षेचा. रोज सरासरी ४ तास तरी अभ्यास होतोच. नोव्हेंबर महिना दिवाळी सुट्टीचा, तेव्हा अभ्यासाला सुट्टीच. तो महिना हिशोबात घ्यायचाच नाही. डिसेंबर पुन्हा अर्ध्या तासाचा. जानेवारी एखादा तास. फेब्रुवारीत शाळेचा क्रीडा उत्सव आणि गॅदरींग, अभ्यासाला जेमतेम अर्धा तास. मार्च आणि एप्रिल हे खडतर महिने, अनुक्रमे दर दिवशी ५ आणि १० तासांचे. रोहननं अभ्यासांच्या महिन्यांची दरदिवशी वार्षिक सरासरी काढली. ०.२५+१.०+०.५+४.०+०.५+१.०+०.५+५.०+१०.०)/ ९ = २.५३ तास. सरासरी सुमारे अडीच तास,

काकानं मोठ्या खुषीत फोन खाली ठेवला. रोहनचं गणित पाहू लागला.
पहा, ह्या ९ महिन्यातील ६ महिने तू सरासरीपेक्षा फारच कमी अभ्यास करतोस आणि ३ महिने सरासरीहून बराच जास्त. याचाच अर्थ तुझ्या अभ्यासाच्या वेळापत्रकात सातत्य नाही. ते कसं राखायचं ते तुझं तू पहा. आता सातत्याचं मूल्यांकन गणितानं कसं करायचं ते मी सांगतो.

Tags: कॅलरी उच्च ऊर्जेच्या पदार्थ खाद्य पदार्थ गणित calories सरासरी high energy foods food math average weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके