डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

घराणेशाहीच्या प्रथेने आपल्याकडे चांगलेच मूळ धरले आहे. त्यामुळेच रामाराव यांच्या कुटुंबात भाऊबंदकी झाली आणि सोनिया गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे म्हणून काँग्रेसजन धडपडत आहेत.

गेल्या महिन्याच्या १९ तारखेला संध्याकाळी केंद्र सरकारने अचानक एक अधिसूचना जारी केली आणि दिल्लीतील कॅनॉट प्लेस व कॅनॉट सर्कल या दोन ठिकाणांची नावे अनुक्रमे राजीव गांधी चौक व इंदिरा गांधी चौक अशी बदलून टाकली. 

या निर्णयाने गदारोळ उडाला. राज्यसभेत केंद्र सरकारवर टीका झाली. दिल्लीत सरकार भा.ज.प.चे. नवी दिल्ली महापालिका त्याच पक्षाच्या हाती. शहरातील रस्ते वा इतर ठिकाणांची नावे बदलण्याचा अधिकार या महापालिकेचा. तरीही केंद्र सरकारने अधिसूचना काढून नावे बदलल्याने भा.ज.प.च्या नाकाला मिरच्या झोंबल्या. 

केंद्रात काँग्रेसचे सरकार. इंदिरा गांधी व राजीव गांधी या पक्षाचे भूतपूर्व नेते. त्यात २० ऑगस्ट ही राजीव गांधी यांची ५१ वी जयंती. शिवाय सध्याच्या काँग्रेस नेतृत्वावर सोनिया गांधी यांची मर्जी खप्पा झालेली आहे. त्यांनी राजकारणात यावे म्हणून अर्जुनसिंग प्रभूती बंडखोरांचा प्रयत्न सुरूच आहे. अशावेळी पक्षातील राजीव निष्ठांना व गांधी कुटुंबीयांना खुश करण्यासाठी नरसिंहराव सरकारने कायदा नियम, प्रथा व संकेत या साऱ्या गोष्टी गुंडाळून ठेवून हे नामांतर केले, असे सर्वसाधारणतः मानले गेले. 

राव सरकारच्या या खेळीचा पक्षांतर्गत सत्तास्पर्धेत फारसा उपयोग झाला नाही, हे पाचच दिवसांनी अमेठीत दिसून आले. 

दोन अडीच आठवड्यांपूर्वीच्या या घटनांची आज उजळणी करण्याचे कारण म्हणजे आंध्र प्रदेशात झालेली राजकीय उलथापालथ. रामाराव कुटुंबीयांची भाऊबंदकी ही आंध्रातील राजकीय बदलास कारणीभूत ठरली, हे खरे. पण या भाऊबंदकीची बीजे आपल्या देशाच्या राजकारणात पडलेल्या घराणेशाहीच्या प्रथेत आहेत. या प्रथेला घरूनच १९८३ साली रामाराव प्रथम आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांची मुले व जावई हेही राजकारणात शिरले. रामाराव यांच्या राजकीय जीवनात जसे चढउतार झाले, तसे त्यांची मुले व जावई यांचेही राजकारणातील हितसंबंध कमी-अधिक होत गेले. रामाराव यांच्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार आपणच, अशी त्यांची मुले व जावई यांची ठाम खात्री होती. पण लक्ष्मी पार्वती या रामाराव यांच्या जीवनात अवतरल्या आणि त्यांच्या राजकीय वारश्यात आणखी एक वाटेकरी निर्माण झाला. पहिली पत्नी निवर्तल्यावर आजारपणात लक्ष्मी पार्वती यांनी केलेल्या सुश्रूषेमुळे रामाराव यांना त्यांचा भावनिक आधार वाटू लागला होता. रामाराव आता पूर्णतः आपल्यावर अवलंबून आहेत, याची लक्ष्मी पार्वती यांनाही खात्री पटली होती. तेव्हा या परिस्थितीचा फायदा उठविण्यास त्यांनी सुरुवात केली. 

आपल्या देशातील राजकारणाचा पोत आणि प्रशासकीय यंत्रणेची पठडी अशी आता बनली आहे की, सत्ताधारी नेत्याचा ज्याच्यावर विश्वास असेल, त्याच्याभोवती सत्तातुर व सत्तेचा फायदा उठवून आपापले हितसंबंध राखणाऱ्यांचे कोंडाळे आपोआप जमा होते. म्हणूनच रामाराव यांचा लक्ष्मीपार्वती यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, हे दिसताच त्यांच्या भोवती राजकीय गर्दी जमू लागली. त्या प्रमाणात लक्ष्मीपार्वती यांच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घातले गेले आणि रामाराव कुटुंबातील भाऊबंदकी सुरू झाली. 

रामाराव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आसनास सुरुंग लावण्यास त्यांच्या विरोधकांना संधी मिळवून दिल्याबद्दल आज लक्ष्मीपार्वती या सार्वत्रिक टीकेच्या लक्ष बनल्या आहेत. रामाराव हे खरे चांगले आहेत पण दुर्दैवाने ते लक्ष्मीपार्वतीसारख्या 'दुष्ट प्रवृत्ती’च्या महिलेच्या जाळ्यात सापडले आहेत, असे त्यांच्या विरोधात गेलेले तेलुगु देसमचे आमदार ठामपणे सांगत आहेत. एवढेच काय, रामाराव हे आम्हाला परमेश्वरासमान आहेत, अशी कबुली हे आमदार छातीठोकपणे देत आहेत. पण सारे खापर एकट्या लक्ष्मीपार्वती यांच्या डोक्यावर फोडणे कितपत न्याय्य आहे ? आपल्या पत्नीला राजकीय व प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची संधी रामाराव यांनीच दिली ना? तेव्हा तेही आजच्या परिस्थितीस तेवढेच जबाबदार नाहीत काय ? रामाराव यांच्या हाती सत्ता आली नऊ महिन्यांपूर्वी पण त्यांनी दुसरा विवाह केला तो १९९३ साली. ते लक्ष्मीपार्वतीच्या आहारी गेले आहेत, हे तेव्हापासून स्वच्छ दिसत होते. तरीही तेलुगु देसमचे इतर नेते व कार्यकर्ते गप्प कसे व का बसले ? उघडच आहे की, निवडून यायचे, सत्ता मिळवायची तर चंदेरी दुनियेतील भूमिकेमुळे अमाप लोकप्रियता लाभलेल्या व त्यामुळे जनमनात स्थान मिळवलेल्या रामाराव यांची गरज नेते व कार्यकर्ते यांना होती. म्हणून त्यांनी लक्ष्मीपार्वती यांना खपवून घेतले. ही गरज नेते व कार्यकर्ते यांना भासली, त्याचे कारण गेल्या पाव शतकात आपल्या देशात रुजलेली व्यक्तिनिष्ठ राजकारणाची परंपरा. 

रामाराव यांचा राजकीय उदयही याच राजकीय परंपरेतून झाला. रामाराव यांच्या राजकारणातील पदार्पणास निमित्त ठरले, ते राजीव गांधीच. 

आंध्रातील काँग्रेस राजवटीविरुद्ध जनमानस खदखदत असतानाच, राजकारणाशी काडीइतकाही संबंध नसताना आणि राजकीय घडामोडीत रस घेण्याची इच्छा नसलेले वैमानिक राजीव गांधी यांना केवळ इंदिरा गांधी यांचे चिरंजीव म्हणून पक्षाच्या सरचिटणीसपदी बसवण्यात आले होते. 'डून-स्कूल-संस्कृती'त वाढलेल्या मित्रांना राजीव गांधी यांनी आपल्याभोवती जमा केले. पक्षयंत्रणा कार्यक्षम करण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला. अशाच कार्यक्षमतेच्या कामगिरीवर असताना आंध्रचे त्या वेळचे मुख्यमंत्री टी. अंजय्या यांचा राजीव गांधी यांनी हैदराबाद विमानतळावर जाहीर अपमान केला. जुन्या पठडीतील काँग्रेसी नेत्याबद्दल राजीव यांध्या मनात एक प्रकारची अढी होती. देशाला २१ व्या शतकात नेण्यासाठी या नेत्यांचा उपयोग नाही, उलट ते अडथळाच बनतील, अशी त्यांची ठाम समजूत होती. टी. अंजय्या हे त्यांच्या या समजुतीचे बळी होते. 

अंजय्या यांच्या झालेल्या अपमानाचे निमित्त होऊन काँग्रेस राजवटीविरुद्धच्या असंतोषाला तोंड फुटले. या असंतोषाच्या लाटेवर स्वार होऊन रामाराव मुख्यमंत्रिपदाच्या आसनावर जाऊन बसले. 

'राजीव गांधी यांनी ज्या तत्त्वांसाठी सर्वोच्च त्याग केला तीच तत्त्वे आज पायदळी तुडविण्यात येत आहेत, फुटीर शक्तींचा प्रभाव वाढत आहे' अशी खंत सोनिया गांधी अमेठी येथील भाषणात व्यक्त करतात आणि त्यावरून सोनिया राजकारणात उतरल्या तर काय होऊ शकते,याची चविष्ट राजकीय चर्चा सुरू होते. पण त्याच वेळी ही चर्चा करणारे आंध्रातील घटनांवर कडवट भाष्य करतात, तेव्हा रामाराव यांना मुख्यंमत्री बनविण्यास राजीव हेच निमित्त ठरले, याची जाण ठेवली जात नाही. 

अमेठीतील भाषणात सोनिया गांधी यांनी राजीव यांच्याबरोबर इंदिरा गांधी आणि जवाहरलालजींचाही उल्लेख केला. नेहरूंचा राजकीय वारसा काय होता? 

जवाहरलालजीच्या कागदपत्रांचे जे खंड प्रसिद्ध होत आहेत त्यांतील १७ वा खंड नुकताच प्रकाशित झाला या खंडात १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालखंडातील कागदपत्रे आहेत. या खंडातील एका पत्रात पंडितजी म्हणतात लोकशाही राज्य व्यवस्थेतील राजकारण आणि निवडणुकीचा प्रचार यात काहीप्रमाणात एका नेत्याला महत्त्व मिळते, हे खरे, परंतु या नेतृत्वाने स्वतःचे महत्त्व वाढवण्याचे, स्वतःच्या हाती सर्व सत्ता एकवटण्याचे प्रयत्न करू नयेत. कोणतीही मोठी संघटना परिणामकारकरीत्या काम करू शकते, ती खालच्या स्तरांवरील कार्यकर्त्यांना मोकळेपणाने वावरायची संधी मिळाल्यावरच. त्यामुळेच त्यांच्यात जबाबदारीची भावना तयार होते. पण एका नेत्याच्या हाती सर्व कारभार एकवटला तर खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांना विकासाची संधीच मिळत नाही. त्यामुळे संघटना कमकुवत होत जाते. जोपर्यंत प्रखर विरोध होत नाही, तोपर्यंत हा कमकुवतपणा कळत नाही. पण विरोधास सुरुवात झाली की, संघटना कोलमडून पडायला प्रारंभ होतो. 

पंडितजींनी १९५२ साली लिहिलेले हे शब्द त्यांच्या मुलीच्या कारकिर्दीत १९७१ नंतर प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली होती. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळातच सत्तेचे केंद्रीकरण होत गेले. 'पक्षश्रेष्ठी ही संकल्पना अस्तित्वात आली, तीही याच कालावधीत, राज्या- राज्यांतील पक्षांच्या शाखांची स्वायत्तता संपली. प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीकडे डोळे लावणे राज्यातील नेत्यांना भाग पडू लागले. एखादा नेता प्रबळ असेल तर त्याला कसे प्रभावहीन बनवायचे, याच डावपेचांना महत्त्व येत गेले. गटा- गटांत भांडणे लावून आपले नेतृत्व पक्के करण्याची नीती अवलंबिण्यात येऊ लागली. 

बहुतांश राज्यांत काँग्रेसचीच सत्ता असल्याने पक्षांतर्गत सत्तेच्या या केंद्रीकरणाचे पडसाद राज्य कारभारातही उमटणे अपरिहार्य होते. दिल्लीतील सत्ताधारी आपल्या हिताकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशी भावना या केंद्रीकरणाच्या प्रक्रियेमुळे राज्यातील विविध समाजघटकांत निर्माण झाली. प्रादेशिक पक्षांचा उदय, अस्मितेची आंदोलने, ही या भावनेचीच परिणती होती. या भावनेला खतपाणी मिळत गेले, ते आपल्या विरोधातील पक्षांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी वा सत्तेवरून खाली खेचण्याकरिता. इंदिरा गांधी यांच्या कालावधीत खेळले गेलेले हे विधिनिषेधशून्य डावपेच. खलिस्तानी भिंद्रानवालेचा भस्मासुर त्यातूनच उभा राहिला. काश्मिरी दहशतवादाचा वणवा हा याच डावपेचांचा परिपाक होता. 

याच दहशतवादाच्या वणव्यात इंदिरा गांधी यांची आहुती पडली. 

पंडितजींचा वारसा या प्रकारे इंदिरा गांधी यांनी जवळजवळ मोडीत काढला. आपल्या आईने ठेवलेल्या राजकीय वारशाची झळ राजीव गांधी यांना बसली. तमिळी वाघांचा परिपोष झाला, तो इंदिरा राजवटीतच. या वाघांना रक्ताची चटक लागल्याचेही त्याच काळात स्पष्टपणे निदर्शनास आले होते. पण साहसवादी राजकारणापायी त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. परिणामी श्रीलंकेतील गुंता सोडविताना राजीव गांधी यांना तामिळी वाघांना आडवे जावे लागले आणि या वाघांनी त्यांचा बळी घेतला. 

आज राजीव गांधी यांच्या त्याच त्यागाची आठवण करून देऊन सोनिया सहानुभूती मिळवू पाहत आहेत. पराभवाच्या छायेत वावरणाऱ्या या काँग्रेस नेत्यांत या सहानुभूतीच्या आधारे तरी पुन्हा सत्तेचा सोपान चढता येईल, अशा आशेने सोनियाच्या पाठीशी उभे राहण्यात अहमहमिका लागली आहे. 

त्यामुळेच कॅनॉट प्लेसचे नाव बदलून राजीव चौक ठेवण्याचा खटाटोप होत असतो. राजीव गांधी यांच्या ५१ व्या जयंतीच्या निमित्ताने 'सद्भावना दौड' आयोजित करण्यात येते व सद्भावना पुरस्कार' दिले जातात आणि या कार्यक्रमांचे प्रत्यक्ष दूरदर्शन प्रक्षेपणही केले जाते. 

हा सद्भावना पुरस्कार दिला कोणाला जातो ? तर महंमद युनूस यांना. तोही स्वातंत्र्यसेनानी म्हणून. स्वातंत्र्य चळवळीतील युनुस यांचा वाटा काय? संशोधनच करावे लागेल. मात्र नेहरू घराण्याचे खंदे पाईक म्हणूनच ते ओळखले जातात. याच युनूस यांच्या मुलाला दिल्लीच्या विमानतळावरील 'एरोब्रिज' बसविण्याचे कंत्राट मिळाले होते. आणि त्याने बसविलेले हे 'एरोब्रिज' सदोष निघाले होते. युनूस यांच्या याच मुलाला अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी अमेरिकेत प्रदीर्घ कारावासाची शिक्षा झाली होती. राजीव गांधी यांनी पंतप्रधान झाल्यावर अमेरिकेला पहिली भेट दिली. त्या वेळी रेगन यांच्याकडे रदबदली केली आणि अमेरिकी अध्यक्षांनी खास माफी दिल्याने युनूस यांचा हा मुलगा सुटला होता. 

अशा या युनूस यांना कोणत्या सद्भावनेतून यंदाचा पुरस्कार मिळाला ? या पुरस्कार समारंभास उपराष्ट्रपती, पंतप्रधान व अर्थमंत्री उपस्थित होते आणि त्यांच्यासमवेत व्यासपीठावर होते रामेश्वर ठाकूर, रोखे घोटाळ्यात सापडलेले एक मंत्री. या ठाकूर यांनी समारोपाच्या भाषणात राजीव यांची तोंड फाटेतो स्तुती केली. पक्षाचा सरचिटणीस ते देशाचा पंतप्रधान हा प्रवास केवळ १० वर्षात करणारा जगातील एकमेव नेता, अशी स्तुतिमुमने ठाकूर यांनी उधळली.

घराणेशाहीच्या प्रथेमुळेच हा प्रवास राजीव करू शकले. याच घराणेशाहीवर कॉंग्रेसचे विरोधक तुटून पडत असतात. कॅनॉट प्लेसचे नामांतर केल्यावर दिल्लीतील भा. ज. प. नेते टीकास्त्र सोडू लागले. पण हे नामांतर झाले, त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे राजीव यांच्या जयंतीच्या दिवशीच झी.टी.व्ही.च्या 'एल' वाहिनीवर झालेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात भाजपचे राजकीय साथीदार सेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी संजय गांधी यांची बेफाट स्तुती केली. ‘संजय गांधी हे तडफदार होते आणि ते आज हयात असते, तर देशाचे चित्र बदलले असते,' असा निर्वाळा ठाकरे यांनी दिला. ठाकरे यांना संजयची आठवण झाली, तीही त्यांचा मुलगा जयदेव यांच्या शिकारीच्या प्रसंगावरून प्रश्न विचारला गेल्याने त्यातून घराणेशाहीचा मुद्दा पुढे आला आणि त्यासंबंधी बोलताना ठाकरे यांनी संजय गांधी उदाहरण दिले. 

घराणेशाहीच्या प्रयेने असे मूळ धरले असल्यानेच रामाराव यांच्य कुटुंबात भाऊबंदकी झाली आणि सोनिया गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे म्हणून काँग्रेसजन धडपडत आहेत. भारतीय राजकारणातील घराणेशाहीचा हा महिमा आहे.

(युनिक फीचर्स)
 

Tags: नरसिंहराव सोनिया गांधी राजीव गांधी इंदिरा गांधी घराणेशाही लोकशाही Indira Rajeev Nehru Gandhi gandhifamily NTR Lakshmiparvati Ramarao Congress Democracy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रकाश बाळ
prakaaaa@gmail.com

महाराष्ट्र टाइम्स व लोकसत्ता या प्रमुख मराठी दैनिकांत दीर्घकाळ कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार-संपादक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके