डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमृत महोत्सव साजरा करणारे मधु दंडवते हे जनमानसातील आदरणीय प्रेरक व्यक्तिमत्त्व आहे. अमृतमहोत्सवानिमित्ताने ‘साधना’ तर्फे त्यांना अभिवादन व अभिष्ट चिंतन. माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही अनोख्या पैलूंवर त्यांच्या ‘गृह’ खात्याकडून टाकण्यात आलेला हा प्रकाशझोत वाचकांना आगळावेगळा व रोचक वाटेल.
 

नाना म्हणजे मधू, आठ भावंडांतले एक. दुसऱ्या नंबरचे, त्यांच्यापेक्षा मोठे दादा (पद्मनाभ) आणि त्यांच्यानंतर ताई (सुलभा कोरान्ने), बाळू (बाळ दंडवते), सुमती (विळदकर), रघू, वृंदावन आणि सर्वात धाकटी आणि सर्वांचीच लाडकी रेवा (कुलकर्णी). सगळी भावंड अतिशय प्रेमळ, एकमेकांसाठी जीव टाकणारी तशीच ती व्रात्यही . जशी भांड्यात भांडी बसावी तशी. घरात इतका धिंगाणा करीत की सासूवाई मजेत म्हणत, ‘बरं झाले, मेली एकाच घरात जन्माला आली आहेत ती. एकच घर नासलंय.’ मधू सर्वांत व्रात्य आणि खोडकर, माझं लग्न होऊन मी प्रथम माझ्या नणंदांना भेटले तर प्रत्येकीलाच काय बोलावं आणि किती बोलावं काही समजत नव्हतं. नानांविषयी सगळ्यांनी गुऱ्हाळ लावलं होतं. जणू त्यांना गाऱ्हाणी सांगायला जागा मिळाली होती.

दादा सर्वात मोठे. तेव्हा थोडेसे गंभीर लहानपणी दिवाळीच्या दिवशी किल्ला करायचे. एके वर्षी दादांनी सुंदर किल्ला बनवला. शिवाची महाराजांचा. त्याला दरवाजे. सभोवती शत्रूपक्षाचे पायदळ, घोडेस्वार वगैरे लावून फार मजा आणली होती. दादा कुठेतरी आपल्या मित्राकडे गेले आणि इथे छोटया मधूने धूमधडाका लावला, शत्रूने हल्ला केला. सर्व सैनिक मरून गेले, असे म्हणत आणि तोंडाने ‘हरहर महादेव’ चा गजर करीत सर्व सैनिकांच्या माना तोडून टाकल्या. तेवढ्यात दादा परत आला. बघतो तर सैनिकांच्या माना तोडून टाकलेल्या. त्याने भोकांड पसरलं , तसे बाबा खूपच रागावले तर छोटा मधू म्हणतो कसा, ‘अरे, शत्रूच्या सैन्याचा पाडाव झाला. सर्व सैनिक मरून गेले.’ काय रागावणार त्या बाळाला. पण दादांनी मात्र रागाने सर्व किल्ला आपल्या पायाने उद्ध्वस्त केला. 

पुढे मधू शाळेत जायला लागला. तल्लख बुद्धी आणि खेळातही तरबेज. त्यामुळे तो विद्यार्थ्यांत प्रिय होता. पण त्याच्या मनात सारख्या शंका निर्माण होत, आणि त्याचे निरसन करून घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. एकदा आपल्या वर्गशिक्षकांना मधूने आपल्या मनातली शंका विचारली, ‘मास्तर , पृथ्वी गोल असते आणि ती स्वतःभोवती फिरत असते. मग तिचा पृष्ठभाग खाती जातो तेव्हा आपण पडत कसे नाही?’ गुरुजींना गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगता येईना. ते खुप रागावले. म्हणाले, ‘प्रथम हात पुढे कर.’ चांगल्या चार पट्ट्या हातावर मारून म्हणाले, ‘तू पडला आहेस का कधी? मग बाकी कसे पडतील? उगाच काहीतरी शंका विचारून वर्गाचा वेळ घेऊ नकोस.’ 

असाच आणखी एक प्रसंग. मधूने मास्तरांना शंका विचारली, ‘आपण गणितात एक आण्याला चार लिंबे तर रुपयाला किती, हे त्रैराशिक लिहिताना दोन टिंबे आणि चार टिंबे कशासाठी देतो?’ मास्तर खूप रागावले. प्रथम एक तोंडात मारली आणि विचारले, ‘का रे तुझे आडनाव दंडवते का?’ मधू म्हणाला, ‘ते तसेच आहे सर.’ मग हेही तसंच आहे. समजलं? जा जागेवर जाऊन बस.. 

मधू तसा फारच धीट. कुणालाही घाबरत नसे. एकदा काय मजा झाली, मधू त्यावेळी जेमतेम दहा वर्षांचा असेल. रात्रीची वेळ होती. भुताखेताच्या गोष्टी ऐन रंगात आल्या होत्या. मधूचा भुतावर विश्वास नव्हता. म्हणाला, ‘कुठे आहे भूत? मला दाखवा.’बोलण्यावरून बोलणे वाढत गेले, आणि कुणीतरी मधूला म्हणाले, ‘जा, आत्ता जा स्मशानात आणि बघ तुला भूत बघायचं असेस तर.’दहा वर्षांचा चिंटुकला मधू निघाला. गेला एकटाच स्मशानात. रात्रीचे बारा वाजले होते. किर्रर शांतता होती. स्मशानात जाऊन बघतो तर तिथे एक प्रेत जळत होते. मधू त्या प्रेताजवळ गेला, आणि गरम गरम राख आपल्या छोट्या मुठीत घेऊन परत आला. म्हणाला, ‘मला नाही दिसलं तुमचं भूत. ही पहा मी माझ्या मुठीतून प्रेताजवळची राख आणली आहे. आणि त्याने आपली मूठ सर्वांच्यासमोर उघडी केली. 

मधूच्या घरचे वातावरण साहित्यिक होते. घरात सर्व साहित्यिक अनेकदा येत. कवी यशवंत, दत्तो वामन पोतदार, मामा वरेरकर, कवि मायदेव आदी मंडळी नगरला आली की त्यांच्याच घरी उतरत. सारखी चर्चा चाले. त्याचे संस्कार मधूवर होतच होते. 23 व्या मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष त्याचे खुद्द वडीलच होते. शिवाय आत्या कै. मनोरमाबाई रानडे, रविकिरण मंडळाच्या सदस्य. आजोबा हे भास कवीची नाटके आणि कौटिल्य अर्थशास्त्र या मराठी ग्रंथाचे लेखक. घरात खूप मोठी लायब्ररी. त्यात खूप मोठे मोठे ग्रंथ होते. संपूर्ण रामायण, महाभारत, विवेकानंद, समग्र शेक्सपियर ही पुस्तके त्यात होती. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांचे वाङ्ममय, गांधीजी, गोखले, टिळक, यांचे ग्रंथ व साने गुरुजींची पुस्तके लायब्ररीत होती. ती सतत वाचणे, त्यांचे मनन करणे हा मधूचा छंद, शिवाय मोठमोठया व्यक्तींची भाषणे पाठ करणे, ती लोकांसमोर म्हणून दाखविणे हा त्याचा नाद होता. अशा रीतीने त्याचे मन संस्कारित होत होते. 

मधूला क्रिकेटचा फारच शौक. शाळेच्या टीममधून खेळत असे. एकदा शाळेच्या गॅदरिंगच्या दिवशी त्याच्या वर्गाची दुसऱ्या वर्गाबरोबर मॅच होती. त्या मॅचचा हिरो मधू झाला. त्याने इतक्या धावा व विकेटस् घेतल्या की त्याच्या वर्गाचा विजय झाला. विजयामुळे आनंदित झालेल्या मुलांनी मधूला उचलून घेतले आणि मिरवणुकीने घरी आणले. आईवडिलांना खूपच आनंद झाला बाबांनी मनाशी ठरवले आपला मुलगा क्रिकेटर होणार. त्याला पेन्टॅन्ग्युलरमधून खेळण्याची संधी मिळणार. म्हणून त्यांनी मधूची रवानगी मुंबईला केली. मधू मुंबईला पुढील शिक्षणासाठी आला. ब्रेवॉर्न स्टेडियमचा अभ्यास करता करता कधी राजकारणात शिरला त्याला कळलेच नाही. क्रिकेटच्या मैदानावर चौकार मारण्याऐवजी राजकारणात त्याने षट्कार मारले. 

मधूच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीची ज्योत तेवत होती. त्याला वाट त्याने लहानपणीच दिली. 1938 साली वयाच्या 14 व्या वर्षी 26 जानेवारीच्या पूर्व रात्री त्याने अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या हायस्कूलच्या टॉवरवर चढून तिरंगी झेंडा फडकवला होता आणि नगर शहराला धक्का दिला होता. 

9 ऑगस्ट 1942. मधूच्या जीवनातील क्रांतिदिन. मधू गवालिया टँक मैदानावर गेला. काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वातावरणाने भारून गेला. त्याच्या मनात स्वतःच्या गुलामगिरीची चीड निर्माण झाली. आपणही स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्याचा निश्चय त्याने केला, अरुणा असफअलीने झेंडा फडकावला आणि सर्वत्र गोंधळ माजला. पोलिसांनी अश्रुधूर सोडला. मधूचे डोळे चुरचुरले, भरून आले पण त्याचवेळी स्वदेशाभिमानाने त्याचे हृदय भरून आले व डोळे खाडकन् उघडले.

कॉलेजला सुट्टी झाली म्हणून मधू गावी अहमदनगरला गेला. पण त्याचा जीव स्वस्थ बसेना. देशात स्वातंत्र्य लढा चालू होता. आपण काहीतरी केले पाहिजे. ब्रिटिश राजवटीची प्रतीके उद्ध्वस्त करावी अशा विवंचनेत तो होता. एक दिवस रात्रीची वेळ होती. घरातील सर्व मंडळी झोपी गेली होती. सर्वत्र सामसूम झाल्यानंतर मधू हळूच उठला. त्याची आत्या, पिंगळे गुरुजींची पत्नी त्याला सामील झाली होती. तिने रॉकेलमध्ये बुडवलेले कापडाचे बोळे व काडीपेटी मधूकडे दिली. बाकी सर्व साहित्य घेऊन मधू निघाला. त्याचा एक मित्र घराबाहेर वाट बघतच होता.

सर्व सामग्री घेऊन दोघेजण गावाच्या सीमेजवळ असणाऱ्या बेंच मॅजिस्ट्रेट कोर्टाजवळ गेले. कोर्टाच्या दरवाज्याला लावलेले भक्कम कुलुप त्यांनी तोडले. दरवाजा हळूच उघडला आणि कापडाचे बोळे आतमध्ये फेकले. इतक्यात कुणीतरी आल्याचा आवाज झाला. दोघांच्या पोटात धस्स झाले. जीव घेऊन दोघेजण कोर्टाच्या आवारातून मागल्या वाडिया पार्कमध्ये पळाले. 

कोर्टाला आग लागली, सर्व कागदपत्रे आणि कोर्ट जळून खाक झाले. सगळीकडे धावाधाव झाली. मधूचे वडील म्युनिसिपालिटीचे ऑफिसर, आग विझविण्याची जबाबदारी त्यांच्याच खात्यावर होती. दुसऱ्या दिवशी आग विझविण्याचा प्रयत्न त्यांच्याच देखरेखीखाली पार पडला. आग कुणी लावली याचा पत्ता कुणाला लागला नाही. पुढे 4-5 वर्षांनी मधूनेच, आपल्याच मुलाने आग लावली ही हकीकत त्यांना कळाली. त्यानंतर लवकरच हेडव्कॉर्टर्सकडे जाणाऱ्या टेलिफोनच्या ताराही मधूने कापल्या. 

पुढे मधू एस.एस.सी. झाला. मुंबई विद्यापीठातून तो दुसऱ्या नंबराने पास झाला. त्याला अनेक ठिकाणाहून नोकऱ्या सांगून आल्या. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे सिद्धार्थ कॉलेज सुरू केले. ते हुशार माणसांच्या शोधात होते. त्यांनी नानांना आपल्या कॉलेजमध्ये फिजिक्स शिकविण्यासाठी निमंत्रण दिले. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम करण्याची संधी ही जीवनातील अमूल्य संधी असे मानून मधूने सिद्धार्थ कालेजमध्ये नोकरी पकडली. ती त्याने 1971 साली लोकसभेवर निवडून जाईपर्यंत केली. 

तसे नाना (मधू) लाजरे फारसे कुणाशी बोलत नसत. लग्न न करण्याचाच त्यांचा विचार, त्यावेळी वयाच्या 23 व्या वर्षापासून ते प्रजा सोशलिस्ट पार्टीचे मुंबईचे चिटणीस. खूप कष्ट घेत, रात्रंदिवस त्यांचे काम चाले. पण कॉलेजमधील लेक्चर्सवर त्याचा परिणाम नव्हता. ते इतके उत्कृष्ट शिकवीत की त्यांच्या लेक्चरला इतर, एल्फिस्टन किंया झेवियर्समधील मुळे येऊन बसत. 

त्यावेळी मी राष्ट्रसेवादलामुळे इतकी भारले गेले होते की, मीही लग्न न करता सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला होता. पण माझे वडील माझ्या मागे लागले. मला घरात इतका त्रास होऊ लागला की लग्न करण्याशिवाय गत्यंतर नाही असे मला वाटायला लागले. मी एस.एम.जोशींकडे गेले. त्यांना मी माझी अडचण सांगितली. तशी त्यांनी माझ्यासमोर होतकरू मुलांची यादीच ठेवली. ते त्यावेळी मधूबद्दल म्हणाले, ‘तो प्रामाणिक आणि सत्शील प्रोफेसर.’ माझ्या मनाने निर्णय घेतला. ज्याच्यासाठी कधीही चुकीच्या गोष्टीसाठी समर्थन करण्याची पाळी माझ्यावर येणार नाही असा हाच माणूस. मी मधूच्या नावाला संमती दिली. पण आम्ही एकमेकांना भेटायला तयार नव्हतो. ती आमची भेट मंगला पारीख, जीजी पारीख यांनी घडवून आणली. मधूला माझ्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले, ‘मी युगोस्लाव्हियाला जाऊन येतो आहे, तोपर्यंत तिचे लग्न जमले तर तिला करू दे. मी आल्यानंतर सांगेन.’ तीन महिन्यांनी नाना आले, आणि मग  आमचे बोलणे झाले. आणि दोन लग्न न करण्याचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तींचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने घरातल्या घरात रजिस्टर पद्धतीने झाले, आणि आम्ही दोघे सेवा पथकाबरोबर गेलो.

असा हा मधू. त्याचे लग्न झाले तरी त्याचा खोडकरपणा गेला नव्हता. आम्ही दोघे शारदाश्रमात राहायला आलो. मी एकटीच घरात होते. नानांची वाट पाहात. सात-साडेसात झाले नानांना यायला. लगेच मी चहाचे आधण ठेवले. चहा तयार झाल्याबरोबर नानांना द्यायला गेले तर नाना कुठे? ते तर कुठेच दिसेनात. मी सगळीकडे शोधलं. त्यांना हाका मारायला सुरुवात केली. जीव अगदी रडकुंडीला आला. हाका मारून दमले तर हे निघाले लोखंडाच्या कपाटातून. लहानपणी लपाछपी खेळताना रेवाच्या पाळण्यात नाही तर कपडे वाळवण्याच्या दांडयावर झोपणारे नाना जाऊन बसले कपाटात. 

एक दिवस मी विळीवर भाजी चिरत बसले होते. रतन डिसोझा बाळंतपणासाठी आमच्याकडे आली होती. नाना कुठेतरी बाहेर गेले होते. इतक्यात रतनला नाना पायाला रुमाल बांधून लंगडत येताना दिसले. ती धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘प्रमिला उठ, नानांना लागलं दिसतंय. तू उठ.’ मी शांतपणे म्हणाले, ‘काही झालेलं नसणार. त्यांची चप्पल हरवलेली असणार. चप्पल हरवली म्हणून ही युक्ती करून लंगडत आले आहेत.’
मी तशीच बसून राहिले. नाना बेल वाजवून घरात आले आणि म्हणाले, ‘प्रमिला, अग आगगाडीत माझी चप्पल हरवली. मग काय करू? मी युक्ती केली, पाय रुमालाने बांधला आणि रस्त्याने आलो लंगडत.’ मी रतनकडे बघितले. माझ्या दृष्टीने तिला समजले, ‘बघ, माझं म्हणणं खरं ठरलं की नाही?’ 

एकदा पुन्हा अशीच मजा. खूप पाऊस पडत होता. अगदी धो..धो.. नानांना कुणाला तरी भेटायला स्टेशनवर जायचं होतं. म्हणाले, ‘बघ मी असाच जातो, नुसता अंडरवेअर बनियन घालून आणि वरती रेनकोट.’ मी म्हणाले,‘अहो, पण पाऊस थांबला तर?’तर म्हणतात, ‘इतके भरून आले आहे आभाळ... की पाऊस कुठून थांबतोय.’गेले तसेच. आणि मी म्हटलं तसंच झालं, पाऊस थांबला, आणि चक्क ऊन पडले, मग करतात काय? टॅक्सी केली आणि आले घरी. 

1955 साल उजाडलं, आणि देशात गोवा मुक्ती आंदोलनासाठी वातावरण तापू लागलं. गोवा-विमोचन साहाय्यक समितीची स्थापना झाली. नानाच समितीचे सेक्रेटरी. ‘लाठी गोली खाएंगे, फिर भी गोवा जाएंगे’, ‘कभी नहीं कभी नहीं, भारत गोवा अलग नहीं’ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. ठिकठिकाणी मिरवणुका निघत होत्या. मीही त्यात सामील झाले होते. नानांनी मुंबई सत्याग्रहींचे नेतृत्व करण्याचे ठरविले. ते आई-वडिलांना भेटून आले, त्यांना सांगितले, ‘मी परत येईन असं वाटत नाही. आपली ही शेवटचीच भेट.’

मी नानांच्याबरोबरच होते. नाना निघाले त्या दिवशी बोरीबंदर स्टेशनवर सिद्धार्थ कॉलेजचे सर्व विद्यार्थी आपल्या लाडक्या प्रोफेसरला अश्रुपूर्ण निरोप द्यायला जमले होते. सर्वत्र हुंदके ऐकू येत होते. तशाच वातावरणात सत्याग्रहींचा जयजयकार होत होता. 

नाना बेळगावला पोहोचले आणि मोरारजीभाईंनी वाहनांवर बंदी घातली. बस, ट्रक वगैरे सर्व बंद, सर्वांनी चालत गोवा सरहद्दीवर जाण्याचा निर्णय घेतला. 15 ऑगस्टला सत्याग्रह होता. पण सर्वांनी आग्रह धरला की, मधू दंडवतेच्या नेतृत्वाखालीच सत्याग्रह करणार. मग तेरेखोलला हिरवे गुरुजींना नेतृत्व करण्यासाठी पाठवले. ते आणि शेषनाथ वाडेकर पोर्तुगीजांच्या गोळीला बळी पडले. नानांच्या नेतृत्वाखाली सर्व सत्याग्रही पायी चालत निघाले 85 मैलांचा तो रस्ता त्यांनी पायी तुडवला. वरून पाऊस धूमधडाक्याने पडत होता.

बेळगावला मला एस.एम.जोशींनी भेटायला बोलावले. मी गोवा-विमोचन सहाय्यक समितीच्या ऑफिसमध्ये गेले. एस .एम नी मला विचारले, ‘प्रमिला, इतकी माणसं पोर्तुगीजांच्या गोळीला बळी पडताहेत. सत्याग्रह मागे घ्यावा का? असा प्रश्न समितीसमोर आहे. तुझें काय मत आहे?’ मी क्षणाचाही विलंब न करता सांगितले, ‘अण्णा, मृत्यूला घाबरून सत्याग्रह मागे घेऊन कसे चालेल? सत्याग्रह करण्यापूर्वीच आपल्याला माहीत होतं काय होणार ते. माझे मत आहे सत्याग्रह चालूच राहावा. फक्त एकच विनंती की मलाही सत्याग्रहात भाग घेऊ द्या.’

पुढे समितीने निर्णय घेऊन सत्याग्रहींची संख्या कमी करून तीन जथ्यांनी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. नानांच्या तुकडीने नेतर्डामार्गे सत्याग्रह करण्याचे ठरविले. नशीब बलवत्तर म्हणून आदल्या दिवशी पोर्तुगीज सैनिकांना हलवून पोलिस त्याजागी बसविले. त्यांनी सत्याग्रहींवर हल्ला केला नानांच्या छातीवर बंदूक रोखली. शेवटी खूप मार दिल्यानंतर ते पडले तेव्हा त्यांच्या पाठीवर पोर्तुगीज पोलिस बुटांनी नाचले त्यांना बंदुकीच्या दस्त्याने मारले. ते बेशुद्ध पडले. तेव्हा सहकारी त्यांना उचलून आम्ही सर्वजण वाट पाहात होतो, त्या मंदिरात घेऊन आले. तिथून स्ट्रेचरवर घालून नानांना सावंतवाडीच्या आणि नंतर बेळगावच्या हॉस्पिटलात आणण्यात आले तिथे तपासणी केल्यानंतर आढळते की नानांच्या कमरेच्या हाडात क्रॅक होती. ती उपचारांनी तात्पुरती सांधली गेली. पण आज इतक्या वर्षांनी म्हणजे 45 वर्षांनी पुन्हा उघडली गेली. त्याचा त्रास नानांना सहन करावा लागला व शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली. 

उमलत्या वयातील नानांचा मिष्किलपणा ते लोकसभेत पाच वेळा निवडून गेले तेव्हा खुशखुशीत आणि खोडकर विनोदाच्या रूपाने अनेक वेळा व्यक्त झाला. 

अशा आहेत नानांच्या जीवनातील काही मजेदार आठवणी.

Tags: स्वातंत्र्य चळवळ एस.एम. जोशी मधू दंडवते प्रमिला दंडवते Freedom Movement S M Joshi Madhu Dandavate Pramila Dandavate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके